ताम्हिणी घाटात एक रात्र

Primary tabs

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in भटकंती
11 Jul 2017 - 12:15 pm

एक सौदीवाला , एक कुवेतवाला आणि एक ओमानवाला अशा तीन मित्रांची ओळख फेसबुकवर झाली २०१० मध्ये ... एक समान धागा म्हणजे तिघेही कोकणातले... सहासात वर्षात फेसबुक आणि इतर सोशल मीडिया वर धमाल मस्ती चाललेली ... पण तिघांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला तो या वर्षी फेब्रुवारीत ... त्याच वेळी ठरले की या पावसाळ्यात कुठेतरी जंगलात एक रात्र काढायची... आम्ही गेली ३/४ वर्षे चालवलेल्या "भुताटकी"पेज ला नवीन स्टोरीज साठी काहीतरी मटेरियल सुद्धा मिळेल ही अपेक्षा ;)

तर शेवटी होता होता ८-९ जुलै तारीख अन ताम्हिणी घाट फिक्स झाले . आम्ही दोघे रत्नागिरीकर पहाटेच्या रत्नागिरी दादर पॅसेंजर ने सकाळी १० ला कोलाड ला पोहोचलो . दोघे पनवेलकर आणि एक पेणकर असे तिघे मित्राच्या नव्याकोर्‍या एर्टिगा मधून दुपारी आले. त्याना यायला उशीर झाला म्हणून आम्ही थोडीशी पेटपूजा कोलाडला हायवेच्या एका धाब्यावर उरकली .. एर्टिगा आली आणि दोन वाजता आम्ही ताम्हिणी घाटाकडे प्रयाण केले . वाटेत एका रिक्शाच्या टपावरून ४/५ राफ्टिंग बोट्स वाहून नेताना पाहून मजा वाटली... मग २०११-१२ च्या फेसबुकवरील धम्माल आठवणी शेअर करत अन "चिल्लम ट्रान्स" ऐकत घाटमाथ्यावर पोहोचायला साडेचार वाजले...

पोहोचताच आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला ... कारण आम्ही ज्या भूत बंगल्याची अपेक्षा करत होतो तो सापडला . घाटमाथ्यावर एक जुनाट पडिक पीडब्ल्यूडी गेस्टहाउस आहे. मग तिथेच बंगल्याच्या
आवारात आम्ही डेरा टाकला . सर्वानी रस्त्याच्या कडेला असलेल्या धबधब्याखाली आंघोळीचा मनमुराद आनंद लुटला ...

येताना जेवणाचे सामान ,कोळसा आणि पावसासाठी प्लास्टिक्चा कागद आणला होताच ...जेवण बनवायला सुरुवात केली . चूल मान्डली , कोळसा तर होता पण वरून पाऊस आणि खालून ओली जमीन यामुळे रॉकेलशिवाय विस्तव पेटवणे महाकर्मकठीण झाले होते...तरी पण प्रयत्न सुरूच होते... मग बाकी विसरलेले सामान आणि काहीजणांसाठी आवश्यक असलेल्या "विरंगुळादायक सोनेरी"च्या शोधात घाटाच्या पायथ्याशी असलेल्या विळे गावात एक चक्कर टाकली असता सर्व गोष्टी उपलब्ध झाल्या ...फक्त "५०० मीटर"च्या नियमामुळे थोडीशी शोधाशोध अन तंगडतोड करावी लागली इतकेच :)

परत आमच्या भूतबंगल्यावर आलो तोवर रात्रीचे आठ वाजले होते..आमच्याप्रमाणेच इतर अनेक पर्यटक तिथे होते... पण रात्री तिथे थांबणारे कोणीच नव्हते..भात चुलीवर चढला होता ...पण विस्तव पेटण्याचे नाव घेत नव्हता ... त्यामुळे उपस्थित ५ जणांमध्ये दोन तट पडले... अर्धे म्हणत होते जवळ कुठे हॉटेल असेल तर शोधूया आणि तिकडेच जेवून घेवूया ... पण आमचे दोन उत्साही शिलेदार इथेच जंगलात जेवण करायचे म्हणून अडून बसले... शेवटी सोबत असलेल्या प्लास्टिक बॉटल्स /पिशव्या , थर्माकोल डिश इत्यादी जाळून अग्नी प्रज्वलित करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले . मग अशा अथक प्रयत्नांतून शेवटी दहा वाजता भात शिजला ... शाकाहारींसाठी भाजी आणि मांसाहारींसाठी चिकन मसाला तयार होईपर्यंत रात्रीचे पावणेबारा झाले . मग झोपलेल्याना जागे करून रात्री बारा वाजता जेवण झाले... जेवून दीड वाजता मन्द आवाजात जुनी हिन्दी गाणी ऐकत आणि ताम्हिणीतल्या भूतकथांवर चर्चा करतकरत निद्राधीन झालो....

रानातील पशुपक्ष्यांच्या आवाजाने सकाळी सहाच्या आधीच जाग आली . चहा नव्हताच कारण पुन्हा विस्तव पेटवण्याचे महादिव्य करण्याचे मनोधैर्य कोणातच नव्हते ... पुन्हा एकदा धबधब्यावर आंघोळी करून फोटोसेशन करत घाटात पुढे निघालो ... रायगड-पुणे चेकपॉइन्ट्च्या पुढे "शिवराज"म्हणून एका हॉटेलवर नाश्ता केला आणि मग काळकाई मन्दिरात पोहोचलो. अतिशय शान्त आणि निर्जन वातावरणात हे देऊळ आहे . तिथे थोडा टाइमपास करून मागे फिरलो आणि घाट उतरलो. वाटेत देवस्थानाना भेट देवून नागोठणे गाठले. तिथून पेण-पनवेल वाले गाडीने पुढे गेले आणि आम्ही रत्नागिरीकर एस टी ने मार्गस्थ झालो . घरी पोहोचायला रविवारचे रात्रीचे १० वाजले. पण एक अविस्मरणीय रात्र अनुभवल्याची स्मॄती कायम मनात घर करून राहील !

फोटोज--- tamhini

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

11 Jul 2017 - 1:14 pm | कपिलमुनी

तुमच्यासारख्या जुन्या कार्यकर्ते कडून फ़ोटो ची अपेक्षा आहे.

चौकटराजा's picture

11 Jul 2017 - 3:55 pm | चौकटराजा

इथे फोटो का नाहीत याचे उत्तर फोटोबकेट या साईटने आता थर्ड पार्टी होस्टिंग साठी फी चालू केली आहे. सबब आता दुसरे चकट फू साईट शोधून इथे फटू टाकावे लागतील. बाकी लेख ठीक आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jul 2017 - 4:20 pm | अमरेंद्र बाहुबली

पोस्टईमेट.ओआरजी वापरा.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jul 2017 - 4:21 pm | अमरेंद्र बाहुबली

पोस्टईमेज.ओआरजी वापरून बघा.

गामा पैलवान's picture

12 Jul 2017 - 1:06 am | गामा पैलवान

मंदार कात्रे,

भटकंती आवडली. पावसाळ्यात चुलीवरचं खायला ज्याम धमाल येते.

या फोटोत अक्षरं आरशातली उलटी का दिसताहेत ते कळलं नाही.

http://photobucket.com/gallery/user/Mandar_Katre/media/cGF0aDovSU1HXzIwM...

 photo IMG_20170709_092616_zps8zubfj2e.jpg

जेव्हा कळलं तेव्हा हसलो खूप.

आ.न.,
-गा.पै.