ओटी

ज्याक ऑफ ऑल's picture
ज्याक ऑफ ऑल in जनातलं, मनातलं
10 Jul 2017 - 1:52 pm

ओटी .... !!

पंढरी- रोजसारखाच आजही त्याला घरी जायला तसा उशीरच झाला होता. बरोबरच होतं म्हणा, आजकाल सुट्ट्या चालू असल्यामुळे लोकांची ये जा वाढलेली असणं अपेक्षितच होतं. त्यात याची ड्युटी कोकण पट्ट्यावर , म्हणजे पाहायलाच नको. थकून जायचा बिचारा , पण तो थकवा फार काळ काही टिकायचा नाही , सुट्टीवर ... मामाच्या गावी जाणारी लहान लहान मुलं , त्यांचा तो उत्साह ... थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. अन त्यात आज गजर्याचा दिवस होता, उद्या सुट्टी म्हणजे आज मजा करायला मोकळा होता तो.

आजची ड्युटी संपली होती, आता रोकड आणि उरलेली तिकिटं परत केली की चंद्री कडे जायला हा मोकळा.

* * * * * * *

“काय मावशे ?? चंद्री कुठाय ?? तिला सांग पंढरी आलाय म्हणा बसायला ... अन ज्यादा वेळ थांबणारे आज ... काय ते दाम घेऊन टाक आधीच ... नंतर दिष्टर्ब नाय पायजे !!” ... पंढरी

“या पंढरी शेट ... होती कुठं स्वारी म्हणायची ?? या वक्तास ज्यादा उशीर केलात यायला . अन आज माफ करा शेट , पण यमने संगत बसा आज ... चंद्री नाईये २-३ आठवडे झाले !! फोन केला त फोन पण घेईना गेली रांडेची .. माजलीये जणू !! लोकानले निस्ता पैसा हवा ... मोहन पण रांडेचा गिर्हाईक देईना आजकाल !!”

* * * * * * *

चंद्री बिगर आजची रात्र नेहमी प्रमाणे नव्हती ... पंढरी लवकर घरी निघाला !! शरीराची भूक भागली होती , पण मन अजूनही चंद्री साठी आसुसलेलं होतं. पुढील वेळेस चंद्री भेटली की तिला जाब विचारायचा या विचारात तो मावशीला येतो सांगून निघाला.कोपर्यावरून थोडी खारी आणि भेळभत्ता घेतला. पुढे जाऊन मोहन वाट पाहत असेल अस मनात येते न येते तोच त्याची हाक पडलीच कानावर.

मोहन ... मावशेच्या मागच्या गल्लीतला गजरेवाला !! गजर्यातून पैसा कमीच ... गजरे कुस्करणार्या कडूनच काय ती पैश्याची उलाढाल !! चंद्री सोबत मोहननेच पंढरीची बैठक करून दिली होती पहिल्यांदा. तेव्हापासून दुसऱ्या कुणाला हात नव्हता लावला पंढरीने.
पण आज फुलांत ती टवटवी नव्हती, कोमेजून गेलेली वाटत होती बिचारी , आणि “मोहनचा” चेहरा पण तसाच होता ... कोमेजलेला !!

“काय शेठ ? आज फारशी गिऱ्हाईकी झालेली दिसत नाई ? तोंड का पाडून बसलायत ? का ड्राय डे मुळे धंदा चालेनासा झालाय ?” ... पंढरी
.
“नाई हो ... धंदा न चालाय काय झालय ? बायको ला २-३ आठवडे बर नाय म्हणून विचार करीत बसलोय ... का पैसा कुठन आणायचा ?”

“अरे बाबा .. पण धंद्यात लक्ष नाय दिलं तर कसं चालल ?? चंद्री कडून माग कि पैसा. नायतर मावशेशी बोलू का मी ? दील तुला ती. तू इतकं गिर्हाईक आणून देतो चंद्री साठी. वरून गजर्याच्या धंद्यातला प्राफीट पण देतोयस .. काय कमी केलं का तू मावशे साठी ?” ... पंढरी.

“नाय हो ... मावशे देव माणूस हाय ... पण मीच लाजतोय मागायला ... काय तोंड दावायच मावशेला ? ती आधीच चंद्रेला अन मला खूप मदत करते ? “ ... मोहन.

“काय तोंड दाखवायचं म्हणजे ? आरे रोजचं १० गिर्हाईक देतोयस मावशेला ... मग ?? काय हक हाय का नाय ?” पंढरी .

“जाउद्या पंढरीशेट ... जावा तुम्ही तुमाला नाय कळायचं ... मी बघतो काय करायचं ते !!”
* * * * * * *

“अरे पंढरी .... तुला कितीवेळा सांगितल ? उकिरडे फुंकायला जाऊ नकोस ... घरी सोन्यासारखी बायको आहे. तर नाही .. तुम्हाला अय्याशीतून अन रंडीबाजीमधून फुरसत नाही. भोग आता आपल्या कर्माची फळं . फार दिवसाचे नाहीत पाहुणे आपण !!” ... डॉक्टर हिंगमिरे जरा चिडूनच बोलत होते. “हा आणखी एक संसार ... सुरु होण्याआधीच संपलेला” ... ते मनात म्हणाले . पंढरीला एड्स डिटेकट झाला होता .

“अरे , पार्वती येऊन गेली परवा ... म्हणत होती की ती वांझोटी आहे म्हणून घरी जायला नकार देतोस. अरे पण हि जी मर्दानगी गाजवलीयेस, त्याचं काय करायचं आता ?? आणलस न रस्त्यावर फुलासारख्या बायकोला ? बिचारी अजूनही लहान बाळासाठी डोळे कोरडे करतेय ... तुला काय त्याच ?” , हिंगमिरे संतापून बोलत होते.

* * * * * * *
“मीराताई काय सांगू ?? आम्ही गरीब माणसं ... औषधाला पैसा नाय ... त्यात देवाने असं खेळ केलाय बगा . ५ वरस घातल, देव देव केलं , कोंबड कापलं . पण मुल होईना बगा. आता दत्तक घ्यायचं तर कोण देईना झालं या गरिबाला. बायको बगा रीत्या कुशीला धरून रड्तीया. म्हून मग निर्णय घेतला, का हा उपाय करायचा ... जीवाला आधार अन मनाला समाधान तर लागल अशी येडी अशा होती बघा ताई . कूस भरली कि आम्ही दोघबी सगळं सोडून गावाला जाणार होतो बगा. पण काय झालं बगा. आता एकट्याने काय करावं जगुन ? अन कोणाला तोंड दाखवावं ? डाक्तर म्हणतय की उशीर झालाय ... २-५ म्हयन्याचाच खेळ आये . सोन्यासारख्या बायको ला येड्या आशेला लावून जीव घेतला बागा जिवंतपनी तिचा. आर सात जलम बी वांझोट राहन चालतंय .. पण अशी जीवाला जीव देनारी चंद्री सारखी बायको गावायची नाय कुठं हो !! आमच्या संसारा साठी किड्या सारखी मेली हो .. या हातान सौदे केले हो तिचे म्या ... ” मोहन ढसाढसा रडत आपलं मन एचआयवी कोन्सेलर मीरा समोर उघडं करत होता.

* * * * * * *

"चंद्री नाईये २-३ आठवडे झाले !" ....... मावशे
"बायको ला २-३ आठवड बर नाय म्हणून विचार करीत बसलोय का पैसा कुठन आणायचा ?” ... मोहन

"“नाय हो ... मावशे देव माणूस हाय ... पण मीच लाजतोय मागायला ... काय तोंड दावायच मावशे ला ? ती आधीच चंद्रेला अन मला खूप मदत करते ?”
"जाउद्या पंढरीशेट ... जावा तुम्ही तुमाला नाय कळायचं ... मी बघतो काय करायचं ते !!” ... मोहन.

“अरे पंढरी .... तुला कितीवेळा सांगितल ? उकिरडे फुंकायला जाऊ नकोस"…डॉ हिंगमिरे
सगळे चेहरे आणि संवाद काल घडल्यासारखे पंढरीच्या डोळ्यासमोर तरळून जात होते .

* * * * * * *
अचानक पंढरीची तंद्री भंग झाली .... समोर एक विदारक सत्य आणि एक भोळी आशा एकाच वेळेस चितेवर जळत होती.

पंढरी आणि मोहन स्मशानात उभे होते . समोर चंद्रीच निपचित कलेवर शांत चेहऱ्याने चितेवर पहुडलेल होतं. पार्वती तोंडात पदराचा बोळा कोंबून ढसढसा रडत होती. आणखी २-३- महिन्यानी त्याच चितेवर पडलेला असणारा पंढरी तिला दिसत होता.

सगळा खेळ संपला होता .... अचानक काल खूप मोठं वाटणार आयुष्य प्रत्येक सेकांदागणिक कमी होतंय हि बोच खूप जीवघेणी होती.

आणि अचानक पंढरीच्या कानावर मोहनची एक आर्त हाक पडली .....

“चंद्रेssssssssगं .....मला सोडून जाऊ नकोस ....कूस नाय भरली तरी चालल पण अशी जीनगी रिती करून नको जाउस गं” !!

आता चितेवर एक शरीर...चंद्रीचं !! एक आत्मा.... पंढरीचा आणि दोन मनं ... मोहन आणि पार्वतीची.. भडभडा जळत होती !!

मागे राहिली होती ती फक्त छिन्न विच्छिन्न भग्न झालेली दोन स्वप्न ... भरल्या "ओटी"ची अन सुखी जीवनाची !!

कथालेख

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

10 Jul 2017 - 2:56 pm | पद्मावति

:( वाईट वाटलं.

एस's picture

10 Jul 2017 - 3:36 pm | एस

सुन्न!

छान लिहिलीय..पण भेदक आहे..

पूर्वी तुझ्या ब्लॉग वर वाचलेली, मनाला चुटपुट लावून गेली, तेव्हाही, आणि आता परत वाचली तेव्हाही...लिहीत राहा ...

छानच लिहिलय ... एकदम काळजाला भिडलं..

सूड's picture

10 Jul 2017 - 6:45 pm | सूड

अर्र

किसन शिंदे's picture

10 Jul 2017 - 11:45 pm | किसन शिंदे

लिहिलंय जबर एकदम. शेवटाला चटका लावूनच जाते गोष्ट

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

11 Jul 2017 - 5:57 am | योगेश लक्ष्मण बोरोले

मस्तच लिहीलीय.

वकील साहेब's picture

11 Jul 2017 - 10:02 am | वकील साहेब

काळीज विदीर्ण करून गेली. लिहित रहा

ज्योति अळवणी's picture

11 Jul 2017 - 9:26 pm | ज्योति अळवणी

मन सुन्न झालं

मितान's picture

11 Jul 2017 - 10:26 pm | मितान

ओह्ह !!!!

दशानन's picture

11 Jul 2017 - 10:36 pm | दशानन

हम्मम..!

रुपी's picture

12 Jul 2017 - 6:20 am | रुपी

:(

प्रीत-मोहर's picture

12 Jul 2017 - 8:50 am | प्रीत-मोहर

:(