दुहेरी ब्राह्मण ?

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
10 Jul 2017 - 1:19 pm

लेख प्रस्तावना:
ग्राहकाच्या दृष्टीने सहसा एका चांगल्या विक्रेत्याकडून असलेली अपेक्षा, ग्राहकाची गरज आणि क्षमता लक्षात घेऊन विक्रेत्याने योग्यते मार्ग दर्शन आणि साहाय्य करावे अशी असते. पण प्रत्यक्षात एस्कीमोंच्या गळ्यात फ्रीज, टकल्याच्या गळ्यात कंगवा लटकवणारा, मातीस सोने म्हणून विकणारा किंवा आधी तर्कसुसंगत समजावून द्या, समजले नाही तर पैसे द्या (करप्ट करा) आणि तेही शक्य नसेल तर ग्राहकास कन्फ्यूज करणारा तो विक्रेता अशा प्रकारची इमेज जनमानसात उभी रहाण्यास बाकी समाजा सोबत बहुतांश विक्रेते स्वतःही जबाबदार असतात. तदानुभूती ठेवून आपला मुद्दा तर्कसुसंगत पद्धतीने गळ्यात उतरवण्याची कला विक्रेत्यांनाही सहजसाध्य नसते ज्यांना येते त्यांनाही प्रत्येक वेळी यश येते असे नाही. संस्थात्मक विक्री असेल तर पर्चेस ऑफीसरला करप्ट करणे जमेल पण ग्राहकास गोंधळात टाकणे अधिक सोपे असते. मानवी स्वभावाचीही कमाल आहे, बहुसंख्य ग्राहक अगदी इररॅशनल अर्ग्यूमेंटही स्विकारतील तर्कसुसंगत दावे नाकारतील आणि आपण तर्कसुसंगत दावे नाकारत आहोत आणि इररॅशनल अर्ग्यूमेंट स्विकारत आहोत हे सांगूनही पटण्याची शक्यता बहुतां बाबतीत नसतेच. ज्यांना समजतेही त्यातील बहुते निमूटपणे सहन करत असतात.

इररॅशनल अर्ग्यूमेंट कश्या स्विकारल्या जातात याची गंमत वाटते, राजीव गांधीच्या समोर श्रीलंकन सैनिकांची परेड चालू असताना एका श्रीलंकन सैनिकाने त्याची बंदूक उलटी करुन राजीव गांधींवर मारल्यावर राजीव गांधी त्या हल्ल्यातून बाल बाल बचावले. श्रीलंकेच्या त्यावेळच्या अध्यक्षांना त्या बद्दल पत्रकारांनी विचारले तर त्यांनी त्या सैनिकाला उन लागले असावे असे उत्तर दिले. उन लागल म्हणून कुणी कुणावर हल्ला करत नसते.

काही मिपा वाचकांनी मागील काही महिन्या पुर्वी येऊन गेलेली 'माहौलीक सत्य' नावाची मिपावरील चर्चा घागा वाचला असेल एकुण काय तर बहुसंख्य वेळेस वस्तुस्थिती काय आहे याचे मानवास खूप देणे घेणे असते असे नसावे. तर सांगण्याचा मुद्दा हा की इररॅशनल गोष्टी खपवून घेतच मनुष्य प्राणी जगत असतो. मागच्या दोन चार वर्षात सोशल मिडीयातील काही उपद्व्यापींनी कलश स्थापना उपडी असेल तर शुभ असते तर मग गुढीवर बसवलेला उलटा तांब्या अशूभ नसतो का असा काहीसा प्रचार केला. तांब्याच तांब्या जगात कोणत्याही दिशेने ठेवल्याने त्यात शुभ अशूभ काय ? - गुढी किंवा ध्वजावर कापड बांधल्या नंतर शोभिवंत वस्तुचे काम काय ते उपडा तांब्या करते. आता गुढी ध्वजावर कुम्भ बसवण्याचा उल्लेख अग्निपुराणात आहे इतपत जुनी प्रथा असावी पण हे पुढील किर्तनकारास माहित होते का माहित नाही; आणि मुक्य म्हणजे तर्कसुसंगतात पुरेल तो मानवी श्रोता कसला तर्कसुसंगत अभ्यासपूर्ण उत्तर देईल तो वक्ता कसला ? आता हा प्रसंग (प्रश्न) एका किर्तनकारास विचारला गेला असावा आता त्यांनाही त्याचे नेमके उत्तर सुचले नसावे त्याचे त्यांनी दिलेले प्रश्नोउत्तर आम्हास आंजावर सापडले ते असे

१. गुढीवरील तांब्या उपडा का ठेवतात ?

तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वसन (गुढीवरील रेशमी वस्त्र) हे सात्त्विक लहरींनी भारीत बनते....

हे असे आणखी बरेच मुद्दे त्यांनी बनवलेले असावेत इथे उदाहरणा दाखल एवढा एक पुरे.

धागा लेखाचा मुख्य विषय
एकुण भारतातील 'जात' हि संकल्पना कशी तयार झाली असावी ? कशी रुजली असावी ? आणि त्यातील 'ब्राह्मणांचा रोल' प्रभाव इत्यादी इत्यादी बद्दल बरेच उलत सुलट तर्क, संशोधन आणि चर्चा झडत असतात. देश विदेशच्या विद्वानां कडून नवनवीन विचार मांडले जात असतात. 'ब्राह्मणी प्रभाव' या विषयावरील त्यातल्या त्यात नविन/वेगळी तरीही गेल्या दहा वर्षातील एक नविन मांडणी 'Brahmin double' अशी नवी संकल्पना मांडत 'ख्रिस्टीअन ली नोव्हेत्झके (Christian Lee Novetzke‌ ) यांनी २०११ मध्ये त्यांच्या The Brahmin double: the Brahminical construction of anti-Brahminism and anti-caste sentiment in the religious cultures of precolonial Maharashtra या लांबलचक शीर्षक असलेल्या शोधनिबंधातून केली आहे.

त्याची एक चांगली समिक्षा Crossing the Lines of Caste:Visvamitra and the Construction of Brahmin Power in Hindu Mythology (दुवा) या २०१५सालच्या ग्रंथातून अधीश ए. साठे. यांनी केली आहे.

जातींची निर्मिती कशी झाली हा मानववंशशास्त्र आणि भारतीय समाजशास्त्राच्या इतिहासाच्या जिज्ञासामुलक शोधासाठी महत्वाचा भाग असू शकतो. भारतातील जाती व्यवस्था घालवण्यास कठीण जाते म्हणून या चर्चेत पडणारा आपापले सहज तर्क जोडणाराही एक मोठा वर्ग आहे. वस्तुतः अंधश्रद्धा कमी झाल्या, जुन्या व्यवस्थेची जागा नवीन व्यवस्थेने घेतली की जुनी व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडते. आणि जाती व्यवस्थाही निश्चीत मागे पडेल. मानवी इतिहासातल्या असंख्य घटनांच्या नोदी होत नाहीत. जे माहितच नाही त्याचा कितीही शोध घेतला तरीही एका मर्यादेच्या पुढे हाती काही लागणार नाही हे माहित असते तेव्हा उत्तर देण्याच्या अहमाहमीकेत अचाट तर्कांची निर्मिती होत रहाते. आणि त्यातलेच काही अचाट तर्क घोळून घोळून चर्चीले जातात. त्यातलाच एक तर्क म्हणजे एका विराटपुरुषाच्या वेगवेगळ्या अवयवातून चातुर्वण्याची निर्मिती झाली. ज्याला एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहित नाही तोच उत्तर देण्याच्या घाईत असे काहीसे इररॅशनल उत्तर देऊ शकतो कमाल म्हणजे समर्थक असोत का विरोधक अशा अचाट तर्कांवर प्रचंड वेळ आणि मानसिक श्रम घालवत असतात. तर एकुण चातुर्वण्य अथवा ब्राह्मण जाती एखाद्या पुरुषाच्य (कितीही विराट असलातरीही) अंगातून बाहेर पडण्याची शक्यता नाही. मग हे ब्राह्मण आले कुठून विस्तारले कसे आणि आपले जाती/वर्ण वर्चस्व समाजाच्या मनात ठसवले कसे ?

मानवी मनातील असुरक्षीततांना वैज्ञानीक उपाय-उत्तरे माहित नसलेल्या काळात, पौरोहीत्य करुन त्यावर उपजिवीका करण्याची संधी समाजातील एका गटाने घेतली असणार, ज्ञ्माधारीत जाती व्यवस्था निर्माण होण्यास विशेषते काय लागते ? सहज उपजिवीका जे वडील करतात तेच आपण करायचे एवढेच. ब्राह्मण म्हणजे काय तर काही तरी विशेष 'ब्रह्म' जाणणारा आणि काही समाज मान्य आदर्शे स्विकारणारा अशा विशेषत्वाचा गौरव समाजाने स्विकारण्यास सुरवात केली. हे हे विशीष्ट गूण असतील तर विशेष म्हणजे ब्राह्मण व्याख्येस पात्र असू शकतील अशी भूमीका अगदी वैदीक पौरोहीत्य न स्विकारणार्‍या बौद्ध धर्मीयांनीही घेतली म्हणजे एकी कडे पौरोहीत्याच्या मर्यादांवर टिका दुसरीकडे ब्राह्मणत्वात विशेष असेल तर गौरव.

लोकसंख्येने अल्प असलेल्या ब्राह्मण समाजाचा प्रभाव कसा वाढत गेला हे पहाताना इतरांची केलेल्या चर्चेतील कदाचीत सुटलेल्या काही गोष्टी लक्षात घेणे उपयूक्त ठरु शकते. भारतातील व्यापार उदीम वाढण्यास जैन आणि बौद्धधर्मीय अहींसावादी प्रयत्नांनी सुरक्षेचा भार नक्कीच हलका केला असणार त्यामुळे जेव्हा बौद्ध धर्मीय घरटी एक मुलगा प्रचारक म्हणून मागत होते तेव्हा समाजाने ते सुरवातीस स्विकारले असावे. पण ज्या ऐतिहासिक काळात मृत्यूदर प्रचंड असेल घरातल्या असंख्य जन्मलेल्या मुलातून काहीच वाचत असतील तेव्हा घरटी एक मुल प्रचारार्थ बाहेर पाठवणे आणि तेही वाढत्या शेतीच्या संधी दुर्लक्षून ही सामाजिक दृष्ट्या महाग गोष्ट राहीली नसेल का ? (या बाबत सुस्पष्ट विरोधाच्या स्पष्ट नोंदी भारतात नाही आढळल्या तरी चीन बद्दल आढळतात - इंग्रजी विकिवरील संदर्भ चूक असू शकतात तेव्हा चुभूदेघे) पण या विरोघात भारतात जे पौराणिक साहित्य निर्माण झाले त्यातील मांडणीच्या दोन ठळक बाजू लक्षात घेता येतील की मोक्ष हे अंतिम लक्ष्य कायम असले तरीही गृहस्थाश्रम आणि मूल असणे आवश्यक केले गेले म्हणजे समाजाची एक तत्कालीन गरज भागली पण त्या मुलाने पालकांच काळजीही तर घेतली पाहीजे तर माता पित्यांच्याच आज्ञांच्या पालनास श्रेष्ठत्व दिले गेले इथे दुसरी व्यवस्थेची आणि भावनिक गरज भागवली गेली. दुसर्‍या बाजूला राज्यकर्त्यांना स्वतःचे इगो असतात, अहंगंड असणार्‍यांना सोबत अहंगंड असणारे लोक लागतात पण ते स्पर्धक असू नयेत अथवा स्पर्धक बनू नयेत, त्यांचे स्वतः सारखाच इगो असलेल्यां दुसर्‍या राज्यकर्त्यांपेक्षा स्वतः अंहगंड बाळगणारे पण काव्ये रचून इगो भागवणारे , त्यांना आणि त्यांच्या मुलांना चातुर्य कथा आणि प्रशिक्षण देणारे आणि अध्यात्मिक अधिष्ठान देत मानवी मनाच्या असुरक्षीततांची काळजी घेणारी कर्मकांडे करणारा एक गट म्हणूनही हा पुरोहीत वर्ग उपलब्ध झाला. भारतातील ग्रंथ प्रसार कसा होत घेला याबद्दलची मराठी विश्वकोशातील एक नोंद लक्षात घेतली तर राजे आणि त्यांच्या पुत्रांच्या गरजा भाग्वण्यासाठी जे लेखन चालू झाले ते भक्तीमार्गीय प्रवचने/ किर्तने यांच्या परफॉर्मन्स सोबतच्या प्रवासातच लिहिलेले ग्रंथही वितरीत केले जात म्हणजे केवळ छपाईची साधने नसलेल्या काळात ग्रथंलेखन आणि प्रवचनांवर उपजिवीका जी चालू झाली या कलांमधून येणारा राजाश्रय आणि जनाश्रय जाऊ नये त्यासाठी आत्मसात झालेले ज्ञानार्जन कौशल्य इतरांना देण्यावर बंधने स्विकारली गेली राज्यकर्त्यांनीही त्याला आपल्या सोईचे मानल्याने ती दीर्घकाळ टिकलीही. इथ पर्यंत माझे विचार.

इथून पुढे ख्रिस्टीअन ली नोव्हेत्झके यांची 'दुहेरी ब्राह्मण' ही रोचक मांडणी विचारात घेता येते. या पौरोहीत्या प्रकारातील मर्यादांना विरोध झाला नसेल तरच नवल होते तो तसा झालाही किंबहूना ख्रिस्टीअन ली नोव्हेत्झके यांच्या मतानुसार कथा किर्तने नाटय इत्यादी कौशल्ये आत्मसात केलेल्या ब्राह्मण समाजाने स्वतःच आदर्श नसलेली ब्राह्मण पात्रे मोठ्या प्रमाणावर रंगवली आधी नकारात्मक किंवा कम अस्सल काय आहे ते दाखवून मग अस्सल म्हणजे काय याच्या व्याख्या केल्या व जनमानसाची सहानुभूती आणि पाठींबा मिळवला. यासच ख्रिस्टीअन ली नोव्हेत्झके यांची 'दुहेरी ब्राह्मण' Brahmin Double हा शब्द प्रयोग करतात. अर्थात अधीश साठे यांच्या मते ख्रिस्टीअन ली नोव्हेत्झके यांची मते मुख्यत्वे एकनाथादी मराठी संत साहित्य आणि कला परंपरा ते ब्राह्मण समाजातील आधुनिक सुधारणावादी यावर आधारीत आहेत. पण माझ्या मते रामायण असो वा महाभारत वा इतरही पौराणिक साहित्य ब्राह्मणांचे रंगवलेले सर्वच वागणे आदर्श नाही. म्हणजे आम्ही उठसूठ कुणालाही आदर्श म्हणत नाही आणि मग आदर्शांची हि व्याख्या असेल तर आम्हाला आदर्श / वरीष्ठ म्हणा आणि स्विकारा हा खाक्या. या विषयाकडे अधिश साठे विश्वामित्राचे उदाहरण घेत जरासे वेगळ्या पद्धतीने पहातात व Brahmin double एवजी brahmin other अशी काहीशी संकल्पना वापरताना दिसतात. अधिश साठेंचेच्याच ग्रंथाचे उदाहरण द्यायचे झाले तर त्यांच्या स्वतःच्या ग्रंथातील उल्लेखांबाबत ते आवर्जून म्हणतात की माझ्या ग्रंथातील सर्व उल्लेखांची जबाबदारी माझी स्वतःची आहे इतर कूणाचीही नाही.' २००३ च्या काळातील एका ग्रंथातील उल्लेखांवरुन उफाळलेला वाद आणि ग्रंथ लेखक ते त्याचे मार्गदर्शक यांनी जबाबदारी टाळण्याच्या पार्श्वभूमीवर अधिश साठे जबाबदारी घेणारी भूमिका घेतात तेव्हा उठून दिसतात आणि एक जबाबदारी न घेणारे वागणे ते काही झाल्यास एक जबाबदारी स्विकारणारण्यास तयार असण्यास तयार असलेले वागणे ब्राह्मण मर्यादांवर मातकरत स्वतःस पुढे करत जातात म्हणजेच ब्राह्मणांची हि दुहेरी प्रतिमा जगवत टिकाकारांनी केलेली टिका स्विकारत कधी सावकाश बदलत ब्राह्मण समाज टिकून आहे. सोबतीला टिकाकारांच्या टिका नकारात्म्क झाल्यास वर गुढीचे उदाहरण दिले तसे मूळ प्रश्नासच तार्कीकमर्यादा असल्यामुळे आलेले उत्तर समाधानकारक नसले तरीही नकारात्मकतेपेक्षा चुकीचे पण आश्वासक उत्तर स्विकारण्याकडे समाजाचा कल असतो का ?
आणि मिळालेल्या ओसरीवर हातपाय पसरण्याच्या कौशल्याचे गमक आहे का ?

सरते शेवटी आपल्या उपजिविकेसाठी पौरोहीत्य करताना इतर विक्रेत्यांप्रमाणे प्रत्यक्ष वस्तू विकली नसेल पण अ‍ॅबस्ट्रॅक्ट संकल्पना कधी तर्काने तर कधी तर्कांशी जूळत नसताना गोंधळात गोंधळ वाढवणारी वक्तव्ये करुन गळी उतरवण्याचे कौशल्य तुलनेसाठी गंमत म्हणून नोंदवले.

ख्रिस्टीअन ली नोव्हेत्झके आणि अधिश साठे यांचे पूर्ण लेखन वाचण्यास अवधी देणे शक्य नव्हते पण एक वेगळी संकल्पना दिसली ती मिपाकर वाचकांना मला जशी समजली तशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. अपूर्ण वाचनामूळे माझ्या लेखनात आपसूकच त्रुटी असू शकतात. जिज्ञासूंनी त्यांचे लेखन मूळातून वाचावे हेच श्रेयस्कर असावे. माझ्या लेखनात फॅक्ट्यूअल चुका असल्यास निर्देश करावा. सोबतच दुहेरी ब्राह्मण या संकल्पना विषयाचा सर्व आवाका कव्हर करण्याची शक्यता कमी पण दखल घेण्या जोगी वाटली. त्यांचे लेखन मुळातून वाचणे झाल्यास संकल्पनांबद्दल आपापली मते जरुर मांडावीत.

चुभूदेघे.

धर्मइतिहास

प्रतिक्रिया

पर भै केहना क्या चाहते हो?

माहितगार's picture

10 Jul 2017 - 7:50 pm | माहितगार

मला वाटते ख्रिस्टीअन ली नोव्हेत्झके (Christian Lee Novetzke‌) ला काय म्हणायचे आहे ते आधी समजून घेणे सोपे ठरेल.

Brahmin double ची व्याख्या तो खालील प्रमाणे करतो.

“I define the Brahmin double as a rhetorical strategy deployed by Brahmin performers in public contexts. This ‘double’ is a result of a very specific context where a Brahmin performer or public figure (real or imagined) performs for an audience, the majority of which are likely not Brahmins. The Brahmin double consists of the character of a ‘bad Brahmin’, who is portrayed as foolish, greedy, pedantic or casteist, and who serves as a ‘double’ for a ‘good’ Brahmin......Thus, the symbolic capital of Brahminism is discursive power, whether it is literary or performative, itisthepower touselanguage toshape society,politics and culture, whichisdifferent from other forms of power such as the force of numbers (a feature often of a ‘dominant’ caste) or the force of arms.”

तो असे का म्हणतो ते त्याच्या शोधनिबंधात वाचावे लागेल.

सौन्दर्य's picture

11 Jul 2017 - 2:10 am | सौन्दर्य

फारसं काही कळले नाही. तुमची काही काही वाक्ये फार मोठी आहेत त्यामुळे वाक्याच्या सुरवातीचा विचार वाक्य संपेपर्यंत डोक्यातून निघून जातो असे मला वाटते.

आधीच किचकट असलेला विषय काहीसा अधिक किचकट झाल्यागत वाटला. वाक्ये छोटी असती तर अधिक चांगल्या प्रकारे तुमचे मत पोहोचले असते.
असो, नोव्हेत्झके च्या लेखनाचा दिलेला दुवा वाचला. वाचायला वर्थ नक्कीच आहे. वेळ मिळेल तसे दुसरा भाग पण वाचेन.

गामा पैलवान's picture

11 Jul 2017 - 3:40 am | गामा पैलवान

माहितगार,

एकंदरीत वर्णनावरून नोव्हत्झ्के चक्क भंकस करतोय असं माझं मत आहे. एक ब्राह्मण घ्या. त्याला कीर्तन करायला लावा. कीर्तनातनं दुष्ट ब्राह्मण रंगवा. मग शेवटी सुष्ट ब्राह्मण काय आहे ते सांगा. अशा रीतीने ब्राह्मण स्वत:चीच लाल करेल. हे श्रोत्यांनी निमूटपणे ऐकायचं. हा सगळा ओढाताण करून आणलेला प्रकार आहे.

नाही म्हणायला स्वत:ला मुस्लिमांचे तारणहार म्हणवणारे मुल्लामौलवी मुस्लिमांना सतत हिंदूंच्या भ्रामक धोक्याच्या काल्पनिक छायेखाली ठेवतात. आणि पुरोगामी त्यांची री ओढतात. एक मोदी घ्या. त्याने २००२ च्या दंगली अवघ्या ७२ तासांत आटोक्यात आणल्या याकडे दुर्लक्ष करा. मोदींची सतत बदनामी करून तो मुस्लिमांसाठी कसा धोकादायक आहे ते पेश करा. मग मुस्लिमांचे तारणहार केवळ पुरोगामीच आहेत याचं कीर्तन करंत बसा. मुस्लिमांची मतं मिळाल्याखेरीज भारतात सत्ता मिळंत नाही याचा सदैव पुनरुच्चार करा. दुहेरी पुरोगामित्व म्हणतात ते हेच.

सांगायचा मुद्दा असा की ही दुहेरी नीती ब्राह्मणांच्या ऐवजी पुरोगाम्यांना आणि मुस्लिमांच्या नेत्यांना अधिक चपखलपणे लागू पडते.

आ.न.,
-गा.पै.

मला वाटते त्यांना दुटप्पीपणा अथवा जाणीवपुर्वक प्रोसेस म्हणावयाचे नसावे. स्वकीयांवर टिका करुन घेण्याच्या मनमोकळेपणातून होणारा फायदा असे म्हणावयाचे असावे. चुभूदेघे.

सगळा गोंधळ वाटतोय. लेख शांतपणे तीनदा वाचूनही श्री. माहितगारांना काय सांगावयाचे आहे तेच स्पष्ट होत नाही. नेहमी मुद्देसूद लिहणार्‍या श्री. माहितगारांच्या या लेखात तीन जणांचे विचार मांडावयाचा प्रयत्न दिसतो. मला काय समजले त्यावर माझे भाष्य. ( नीट स्पष्ट कळलेले नाही हे पहिल्यांदी सांगून !)
(१) श्री माहितगार : (अ) जर लेख ब्राह्मणांच्या "दुटप्पी" ( हा माझा शब्द) पणाबद्दल असेल तर उलटा कलश वगैरे संपूर्णपणे अप्रस्तुत. (ब) पौरोहित्य करणारे पुरोहित व किर्तनकार एक नव्हेत. (क) पुरोहित काही वेळी पोथी वाचतात पण त्यात वा किर्तनकार किर्तनात कोठे ब्राह्मणाची "टिंगल " करतात असे मला तरी कधीही आढळलेले नाही. जरा उदाहरणे मिळाली तर बरे होईल. (ड) विसाव्या शतकापासून काही वक्ते ( प्रचनकारही) ब्राह्मणांवर आसूड ओढतात; पण ते एकुण स्रर्वच ब्राह्मण वर्गावर. (इ) जे ब्राह्मण, ब्राह्मणाने करावयाची कर्मे करत नाहीत त्यांचावर प्राचिन धर्मशात्राने कोरडे ओढले आहेत. ते ब्राह्मण नव्हेतच, त्यांच्याकडून कर वसूल करावा व त्यांना गरज पडल्यास वेठीस लावावे इतक्या कडक शब्दात त्यांचा निषेध केला आहे. (ई)रामायण व महाभारत यांचे लेखक महाकवी होते. त्यांना कोणीही (व्यक्ती किंवा वर्ण-समाज ) परिपूर्ण असू शकत नाही याची पूर्ण कल्पना होती. त्यांनी ब्राह्मण परिपूर्ण असेल अशी कल्पनाही केलेली नाही. आता तुम्हाला पुराणांबद्दल बोलावयाचे असेल तर आपले हात वर !

(२) श्री. नोव्हेत्झके: यांनी साहित्यातील उदाहरणे दिली असतील तर ती वाचावयास आवडेल. नाटकातील विदुषक हे पात्र ब्राह्मण असू शकते पण तेथील सर्वच विनोद म्हणूनच घेतले पाहिजे. ती नाटकाच्या कथानकातील गरज आहे व ती गरज लेखक, कोणत्या वर्णाचा आहे यावर अवलंबून नसते.
(३) श्री साठे : वर संस्कृत नाटकांबद्दल लिहले आहे तेच एकनाथ यांच्या साहित्याबद्दल. एकनाथ यांच्या भारूड वगैरे प्रकारात असे काही मिळाले असेल तर तेही याच संदर्भात पाहिले पाहिजे. एकनाथांना असे लिहून आपल्याबद्दल काही आदर वगैरे मिळवावयचा होता असे म्हणणे हास्यास्पद (नाही पटले तर) विनोदीच म्हणावयास पाहिजे.
या सगळ्यात विश्वामित्र्र क्षत्रियाचा ब्राह्मण का व कसा झाला याचा संबंध काय ? विश्वामित्राची संपूर्ण गोष्ट सर्वांना माहीत असेलच असे नाही म्हणून ती दुसर्‍या धाग्यात देत आहे.
(परत एकदा. मला श्री. माहितगार यांच्याबद्दल व मराठी भाषा संवर्धनाबाद्दल ते करत असलेल्या कामाबद्दल आदर आहे. म्हणूनच मला श्री स्पा यांच्या प्रमाणे या धाग्यात त्यांना काय लिहावयाचे आहे हेच कळत नाही याचा खेद वाटतो.
) शरद

माहितगार's picture

11 Jul 2017 - 5:14 pm | माहितगार

इतरांना वाचनही अवघड जात असताना संयमाने वाचलेत या बद्दल आभार. चर्चेतील मुख्य विषय लोकसंख्येने मिनीस्क्यूल अत्यल्पसंख्य असलेल्या सामाजिकरणाच्या प्रक्रीयेत सांस्कृतिक प्रभाव समाजावर कशा पद्धतीने कोणकोणत्या मार्गाने पडला हा आहे. अनेक मार्गांपैकी एका शक्यतेकडे निर्देश करण्याचा प्रयत्न असावा. सामाजिकरणाच्या प्रक्रीयेत सांस्कृतिक प्रभाव अनाहूतपणे कसा पडला असेल याचीच आहे. यात हेतुपुरसरतेचा माझा दावा नाही बहुधा नोव्हेत्झकेचाही नसावा. व्यक्तीगत आणि समुह हितसंबंधांची सुरक्षा हा वेगळा विषय आहे हेतुपुरसरतेचा त्यात असू शकतो (पण तुर्तास या चर्चेत तो मुख्य विषय नाही). म्हणून ह्या प्रक्रीयेस दुटप्पीपणा म्हणण्याचा निश्चीतच प्रयास नाही. अमुक ब्राह्मण पात्राची जाणीवपुर्वक "टिंगल " किंवा टिका केली असे नाही पण कथानकातून अप्रत्यक्ष येणार्‍या इतर पात्रांसोबतच परिपूर्ण नसलेली ब्राह्मण पात्रेही मनमोकळेपणाने रंगवली गेली आहेत. संस्कृत साहित्यात प्रतिस्पर्धी विचारधारांचा अनुल्लेख एवढा आहे की तो जाणीवपूर्वक वाटतो. तसा अनुल्लेख ब्राह्मणांना स्वसमुहातील पात्रांना अनुल्लेखीत ठेवता आले असते. पण तसे त्यांच्या अपुर्णतांना जाणीवपूर्वक अनुल्लेखीत ठेवल्याचे वाटत नाही.

नोव्हेत्झकेच्या निमीत्ताने मी समाजिकीकरणाच्या प्रक्रीयेत इतर काय प्रभाव समाविष्ट असू शकतात याचा मार्केटींगच्या दृष्टीतून विचार करण्याचा प्रयत्न केला. कारण इफेक्टीव्हली ब्राह्मण (किंवा इतर धर्मप्रसारक ) संकल्पना गळी उतरवत असतात तुमच्या मनाची हि असुरक्षीतता आहे तर आमच्याकडे हा उपाय आहे. हे एक दुसरे नरेटीव्ह मांडण्याची पद्धत -खास करुन टिकेला तोंड देण्याची पद्धत. यात
स्वकीयांवर -म्हणजे ब्राह्मणांनी ब्राह्मणांवर- टिका करुन घेण्याच्या मनमोकळेपणातून होणारा फायदा त्याला जोडून आदर्श ब्राह्मणची मांडणी. त्याच वेळी साहित्यात सहसा प्रतिस्पर्धी धर्मीयांचा प्रत्यक्ष उल्लेख न करणे / अनुल्लेखाने मारणे ( प्रशिक्षीत सेल्स आणि मार्केटींगची मंडळी या बाबत काळजी घेत असतात) .

धार्मीक वादविवाद सभात तर्कशास्त्राचा आवर्जून उपयोग केला जातो पण जनसामान्यांशी संवाद साधताना तर्काच्या आधारास तेवढे प्राधान्य जाणवत नाही. इथे माझ्या सेल्स मार्केटींगच्या अनुभवातून मी तुलना केली, माझा व्यक्तीशः तर्कपूर्ण मांडणीवर भर असेल पण सर्वसामान्य ग्राहक व्यक्तीचा तार्कीक बाजूवर भर कमी असेल. माझ्या स्पर्धकाच्या मांडणीत मोठ्या तार्कीक उणीवा असल्या तरीही ग्राहकास चालून जातात. असो. चर्चा करत राहूच.

नोव्हेत्झके आणि साठे यांची दखल मराठी विकिपीडियातील लेखात घ्यायचा मनोदय होता त्या आधी त्या दोघांच्या मांडणी बबात इतरांचे मत काय पडते ते जाणून घ्यावयाचे होते. आपल्या मनमोकळ्या प्रतिसादामुळे तो उद्देश सफल झाला.

मनमोकळ्या प्रतिसादासाठी पुन्हा एकदा आभार.

माहितगार's picture

11 Jul 2017 - 5:19 pm | माहितगार

लोकसंख्येने मिनीस्क्यूल अत्यल्पसंख्य असलेल्या 'ब्राह्मणांचा' ... असे वाचावे.

माहितगार's picture

16 Jul 2017 - 7:38 pm | माहितगार

@शरद
उपलब्ध केलेले अनुवाद आणि अन्वयार्थ बरोबर असतील तर अगदी, ऋग्वेद 7.103 आणि छांदोग्य उपनिषदात थट्टेचा (सटायर) चा समावेष असल्याचे आंतरजालीय माहिती वरुन दिसते आहे. चु.भू.दे.घे. संदर्भ इंग्रजी विकिपीडिया लेख छांदोग्य उपनिषद (हा प्रतिसाद लिहिताना जसा दिसले)