रावेरखेडी ३

Primary tabs

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in भटकंती
5 Jul 2017 - 1:03 am

गुगल मँप्स वर रस्ता
.
आम्ही लवकरच सनावद ला पोहोचलो. तेथे बेडीया चा रस्ता विचारून बेडीयाच्या दिशेने गाडी निघाली. रस्ता नविनच
बनवला गेला होता. आम्ही दर ५कि.मी ला कुणाला ना कुणाला रस्ता विचारत होतो. माझा अंदाज होता की समाधी बहुतेक लोकांना माहीत नसेल. पण आम्ही ज्याला कोणाला विचारले त्याने प्रत्येकाने "पेशवा सरकार" बद्दल व्यवस्थीत माहिती पुरवली. बेडीया हुन आम्ही पीपलगोन रोड ला लागलो. २०चे ४० किमी झाले तरी समाधी येईना म्हणून चालक थोडा वैतागला होता. पण काही की.मी जाताच आम्हाला म.प्र. सरकारचा हा मोठा फलक दिसला.
.
आम्ही पटापट गाडीतुन ऊतरून फलका जवळ सेल्फीस घेतल्या.मी ऐकून होतो की रस्ता खराब आहे पण
ह्या फलका पासुन ते रावेरखेडी पर्यंत रस्ता बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले होते.
.
रावेर येथून 8 की.मी. होते. लवकरच आम्ही खेडी ह्या गावी पोहचलो. इथे एक माहिती भेटली रावेरखेडी ह्या अखंड नावाचे कुठलेही गाव नाही. रावेर व खेडी ह्या वेगवेगळ्या नावाचे दोन गावे आहेत. त्यापैकी बहूतेक रावेर ह्या गावात समाधी आहे.
ते ह्या बोर्ड वरून पण लक्षात येईल.
.
आम्ही गावात विचारपुस केली. समाधी अजून 2 किमी पुढे आहे अशे कळाले. त्याप्रमाणे एका चिंचोळ्या रस्त्यावरून गाडी वळवून पुढे निघालो. व पोहोचलो. गाडी अलीकडे लावून आम्ही पायी निघालो. समाधीस्थळ महेश्वर धरण प्रकल्पामुळे बूडणार आहे.तशा लाल खुणा येथील घरांवर घरांवर केल्या आहेत. असं मी कुठेतरी वाचलं होत पण मला अश्या कुठल्याही खुणा येथील घरांवर आढळल्या नाहीत समाधी जवळ पोहोचताच नजरेत भरेल असा फलक म.प्र. शासनाने लावलाय.
.
त्याच्या बाजुलाच श्रीमंत बाजीराव पेशवे ह्यांची पुर्ण माहिती पुरवनारा आणखी एक मोठा फलक लावलाय.
.
समाधीस्थळाच्या दरवाजा उघडाच होता. बाहेरच पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या मारोती चे दर्शन घेऊन आम्ही आंत प्रवेश केला. आत भरपूर मोकळी जागा आहे. उजव्या बाजूला श्रीमंत पेशव्यांच्या अस्थींची छत्री आहे. माझी छाती भारावलेली होती. एका खूप मोठ्या स्थळी आल्याचा खूप आनंद झाला होता. मी हात जोडून छत्री समोर उभा राहीलो. महाराष्ट्राला नर्मदेपल्याड पोहचवणार्या, जगातल्या शेवटच्या हिंदू राज्याला साम्राज्यात रुपांतरीत करणार्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण करणार्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या समोर ऊभा असल्याचा मला भास झाला. सर्वांनी समाधीचे दर्शन केले.
.
समाधीवर असलेला फलक
.
दर्शन घेऊन व फोटो काढून आम्ही एका चिंचोळ्या जिन्याने वर चढलो. बाजूलाच विशालपात्राच्या नर्मदेचे दर्शन झाले.

त्या ठिकाणी नर्मदेत एक बेट आहे. आज ह्या ठिकाणी काही नसले तरी पुर्वी नर्मदा फक्त येथूनच पार केली जायची. मराठ्यांनी येथे टोलनाका बसवला होता. श्रीमंत बाजीराव पेशवे आपल्या १ लाख फौजेसह ह्या ठिकाणी असतांना सतत १२ तास घोडदौड केल्याने अतीश्रमाने त्यांचे निधन झाले. ग्वाल्हेरच्या शिंदेंनी त्यानंतर इथे समाधी बांधली. आम्ही संपूर्ण समाधीला चक्कर मारूण बाहेर आलो. गाडीकडे निघालो. जातांना मी गावातल्या एकाकडे चौकीदार नारू बद्दल चौकशी केली. तो गावात कुठेतरी फिरत असेल असे त्याने सांगितले. आम्ही गाडीत बसून निघालो. पुढे कसरावद ~ महेश्वर~ धामनोद~ इंदौर असा प्रवास करून आम्ही शाजापुर पोहचलो.
ह्या आधी व ह्या नंतर आम्ही सांची, भिमबेटका, ऊज्जैन, आग्रा, ग्वाल्हेर, भोपाळ अनेक ठिकाणी फीरलो. पण इथे आल्याची सर अजून कुठेही जाऊन आली नाही.
(समाप्त).

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

5 Jul 2017 - 1:52 am | पद्मावति

अप्रतिम ___/\___

मोदक's picture

5 Jul 2017 - 8:32 am | मोदक

व्वाह...!!!

सुरेख प्रवास झाला :)
आवडले!

प्रीत-मोहर's picture

5 Jul 2017 - 10:00 am | प्रीत-मोहर

अप्रतिम!! तुमच्यासोबत आम्हीही प्रवास केला .

मस्तच लिहीलय. अपडेटेड माहिती मिळाली. समाधी पाण्यात बुडणार नसेल तर त्याहून समाधानाची गोष्ट नाही. म.प्र. सरकारने रस्ता सुधारला व माहिती फलक लावला हि खुपच स्तुत्य बाब आहे. ह्या स्थळाचा असाच विकास होण अपेक्षित आहे.
आणखी काही भटकंती केली असेल तर लिहा. पु.ले.शु.

मुक्त विहारि's picture

5 Jul 2017 - 11:59 am | मुक्त विहारि

"सांची, भिमबेटका, ऊज्जैन, आग्रा, ग्वाल्हेर, भोपाळ अनेक ठिकाणी फीरलो."

ह्या भागां विषयी, तुम्ही लिहिलेले वाचायला नक्की आवडेल.

वरुण मोहिते's picture

5 Jul 2017 - 1:50 pm | वरुण मोहिते

श्रीमंत पेशवे बाजीराव ह्यांच्याबद्दल फार आदर आहे . मी साधारणतः २-३ वर्षांपूर्वी पाहिलेली समाधी . बरीच नवी माहिती मिळाली . अजूनही काही लिहिले असते तरी चालले असते .

जुइ's picture

5 Jul 2017 - 7:14 pm | जुइ

तुम्ही केलेल्या या भटकंतीच्या निमित्याने बाजीराव पेशव्यांची समाधी प्रथमच पाहिली.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Jul 2017 - 9:20 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद!!! :-)

कंजूस's picture

6 Jul 2017 - 7:28 am | कंजूस

नेहमीचा पर्यटक मार्ग ओंकारेश्वर-बडवाह-माहेश्वर-मांडू-धार हा नर्मदेच्या उत्तर काठावरून जातो तर हा रावेर भाग दक्षिण काठावर असल्याने टाळला जातो॥ मुद्दामहून गेल्यासच हे ठिकाण पाहून होईल.

अभिजीत अवलिया's picture

6 Jul 2017 - 8:08 am | अभिजीत अवलिया

आवडला हा भाग.

हे पटले नाही - पेशव्याचा मृत्यू ज्वर येऊन झाला असा इतिहासात उल्लेख आहे. २३ एप्रिल १७४० या दिवशी ज्वरास सुरुवात आणि २८ एप्रिल १७४० रोजी मृत्यू.

श्रीमंत बाजीराव पेशवे आपल्या १ लाख फौजेसह ह्या ठिकाणी असतांना सतत १२ तास घोडदौड केल्याने अतीश्रमाने त्यांचे निधन झाले. ग्वाल्हेरच्या शिंदेंनी त्यानंतर इथे समाधी बांधली.

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Jul 2017 - 11:26 am | अमरेंद्र बाहुबली

हो! तुम्ही म्हणताय ते बरोबर १००% बरोबर आहे. ज्वरास कारण सतत १२ तासाची घोडदौड व अती श्रम से मुख्य कारणे आहेत.

अनुप ढेरे's picture

6 Jul 2017 - 9:54 am | अनुप ढेरे

मस्तं लिहिलं आहे. आवडले लेख!

II श्रीमंत पेशवे II's picture

12 Jul 2017 - 10:55 am | II श्रीमंत पेशवे II

खरच , खूप छान ...

जेव्हापासून इतिहास हा विषय शिकायला सुरुवात केली , तेव्हा अगदी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल जी जी माहिती मिळेल ति वाचली , नंतर अनेक क्रांतिकारकांच्या कहाण्या , पुस्तके वाचली ..पण जेव्हा शिक्षणासाठी पुण्यात होतो तेव्हा पुण्याचा इतिहास , पेशवे , शनिवारवाडा या बद्दल वाचन झालं तेव्हा लक्षात आल कि अरे ज्या गावात आपण जन्माला आलोय ...त्याच गावातून पेशव्यांचा जन्म झालाय ......आणी माझी वाचनाची भूक अजून वाढली ...श्रीमंत पेशव्यांच्या बद्दल बरच वाचन केलं पण त्यांचा शेवट कुठे झाला हे मला माहित नव्हत पण जाणून घ्यायची खूप इच्छा / ओढ होती
मिपा वर रावेरखेडी वर भटकंती मध्ये वाचलं तेव्हा मला पूर्ण माहिती मिळाली

मी श्रीवर्धन ला जन्माला आलोय ... माझी एकच प्रबल इच्छा आहे कि एकदा तरी रावेर-खेडी ला जायचं , समाधी च दर्शन घ्यायचं . लिहणार्याने प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे , मी तर वाचत असतानाच मला खूप गदगदून आला , आपोआप डोळे ओले झाले .... ग्रेट.....हो आणि खरंच जर का समाधी चा भाग पाण्याखाली जाणार असेल तर तो वाचावा , आणि त्यासाठी ज्या संस्था प्रयत्न करत असतील त्यांना होईल तशी मदत करावी अशी इच्छा आहे.
येत्या दिवाळी सुटीत अगोदर रावेर खेडी ला जायचा प्लान करतोय

भ्त्कन्ति मधून खूप माहिती उपलब्ध झालीय त्या आधारावर तिथे नक्कीच पोहचता येईल

मनपूर्वक धन्यवाद .........

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Jul 2017 - 3:47 pm | अमरेंद्र बाहुबली

हो!! नक्कीच भेट द्या माझ्या मते प्रत्येक मराठी माणसाने जीवनात एकदातरी ह्या ठिकाणी यावेच.
मी ज्या दिवशी रावेरखेडी ला होतो. त्याच दिवशी मोठा भाऊ श्रीवर्धन ला होता. ( काय योगायोग!).
तुम्ही नक्की भेट द्या. गुगल मँप्स वर रस्ता शोधाल तर रावेरखेडी ऐवजी पेशवे बाजीराव टाँम्ब असा शोध घ्या. आपल्या प्रवासाला आतापासुन शुभेच्छा!!! :-)