धावणाऱ्यांची मुंबई

आशुतोष-म्हैसेकर's picture
आशुतोष-म्हैसेकर in जनातलं, मनातलं
3 Jul 2017 - 12:46 am

धावणाऱ्यांची मुंबई

मुंबई, तसं ह्या विषयावर नेहमीच लिहिलं जातं, विविधांगी आणि विविध पद्धतीने मुंबई बद्दलची माहिती रोजच कुठून येतच असते त्यात मी त्या विषयावर चार ओळी लिहिणं म्हणजे समुद्रात खडेमिठाचे तुकडे फेकून मीच तो खारट केला म्हणण्यासारखं आहे. अनेकांसाठी चाऊन चोथा असला तरी माझ्यासाठी हा नाविन्याचा विषय,सगळ्यांच्या मनात असेल तसं स्वप्नांचं शहर मुंबई माझ्यासाठी सुद्धा.

लहानपणापासून औरंगाबाद सारख्या ठिकाणी राहून मुंबई बद्दल फक्त ऐकून होतो, इथे मोठमोठ्या इमारती असतात. मोठं शहर म्हणजे वैभव,दिमाखदार, इथल्या बऱ्याच गोष्टींचं कौतुक. इथं पाय ठेवला की पहिलीच गोष्ट समोर दिसते ती म्हणजे माणसांची गर्दी. ही समोर दिसणारी जिकडे तिकडे पसरलेली गर्दी म्हणजे गोष्ट नकारात्मक आहे की सकारात्मक ते ठरवता येत नाही,कारण ते ठरवायला इथे ह्या गर्दीतल्या कुणालाही वेळ नाही. इतक्या मोठ्या गर्दीच्या लोंढ्याला अजिबात क्षणाची उसंत नाही. सर्व जण धावताहेत धावताहेत आणि कसल्यातरी मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताहेत. मोठी शहरं, मोठी माणसं म्हणजे त्यांची स्वप्नं मोठी असणार अन ती पुरी करण्यास ह्या माणसांना धावतच रहावं लागणार, आमच्या सारखी संथगती डुलत डुलत निघाली तर काम कसं चालेल?

इथे येण्याआधीच जिथं जिथं जायची त्या ठिकाणांचे पत्ते विचारावे म्हटलं, तर कळालं इथले सगळे अंतर मोजतात मिनिटांत,तेही लोकल रेल्वेच्या वेगाने. म्हणजे शहराच्या एक भागातून दुसऱ्या भागात जायला माणसाला तितकाच वेळ लागतो जितका त्या लोकल ला! ती लोकल मुंबईच्या रक्तात भिनली आहे, जणू काही त्या लोकल शिवाय ह्यांची वेळही पुढे सरकू नये.

कोपऱ्या कोपऱ्याने गाडीवर मिळणारा वडापाव इथे कधी कुणाला उपाशी ठेवत नसावा, एक खाल्ला की रात्री घरी पोहचून जेवण करेपर्यंत ह्यांच्या पोटाची विश्रांती.

तसं इथे सगळंच अजब आहे हो, म्हणजे रेल्वेचे एकामागून एक डबे असावेत तश्या खोल्यांनी बनलेल्या चाळी आणि त्याच प्रकारच्या निवासी इमारती. अगदी इवल्या इवल्या जागा, त्यात ही माणसं मोठ्ठाली स्वप्नं पाहत आरामात पहुडतात,अगदी सुखात. दादरच्या पुढे उड्डाणपुलावरून जाताना समोर दिसणाऱ्या उंच उंच भव्य इमारती पाहिल्या की खात्री पटते,मुंबई ने त्या छोट्या छोट्या खुराड्यांत राहून पाहिलेली,किंबहुना अनेकांनी पूर्ण केलेली हीच अशीच ती स्वप्नं आहेत बहुदा. उंच स्वप्नांच्या साक्षी त्या उंच इमारती भासतात.

इथे मुंबईबद्दल आणि तिथल्या माणसांबद्दल लिहिण्यासारखं खूप काही आहे. मुळात मुंबई आणि तिथली माणसं ह्या काही दोन वेगळ्या गोष्टी नाहीत,तिथली न थकणारी न थांबणारी माणसं म्हणजे मुंबई,तीच तिथला जीव, भलेही गर्दीत जीव घुसमटल्या सारखा होत असेल, पण ही गर्दीच तर मुंबई आहे, घोळक्यात राहूनही आपली ओळख जपणं हेच तर इथलं जीवन. अख्ख्या देशभरातून आलेली विविध रंगरूपाची यंत्रासारखी माणसं,त्यांना इथली लोकल चाके देते,गती देते, धावायला शिकवते. माधव ज्युलियन यांनी सांगितलेली थांबला तो संपला वगैरे ओळ खरी कुणी केली तर मुंबईने. जुनाट चाळीतल्या कोपऱ्यात झोपून अनेकांनी मोठी साम्राज्ये उभारली,ती ही मुंबईची ओळख.

इथं आयुष्य धकाधकीचे वगैरे नाही,मुंबई मध्ये कधीही न राहिलेल्यांना ते तसं वाटतं, मुंबईत राहिलेला माणूस कधी असं म्हणत नाही,तो वाट पाहतो,बेस्टची,लोकलची आणि गर्दीत ढकलून चढून निघून जातो,ह्याला मुंबईत धकाधकी म्हणत नाहीत.

मुंबई जगायला शिकवते असं कुणी म्हणालं ते उगीच नाही, इथे गिचमीडित गल्ल्या,झोपड्या आहेत,पण थोडी मान उंच केली तर मोकळा अथांग कोरा समुद्रही आहे. दिवसभर धावपळ करून ही माणसं रात्री समुद्राच्या किनारी जाऊन बसतात, सगळ्या धावपळीच्या आयुष्याला,त्रासांना,गर्दीला एक क्षणात पाठ करून समुद्राकडे बघत,भेळ खात आनंदानं आपली संध्याकाळ घालवतात,जणू काही ह्यांच्या पाठी असलेल्या धावाधाव जगण्याचं ह्यांना काही देणंघेणं नाही. अथांग समुद्रासारखी स्वप्नं डोक्यात घालून ही परत जातात,पुन्हा सकाळी त्या स्वप्नांच्या मागे धावायला. इथे सगळं खरंच अजब आहे, ह्याला अगदी थोडक्यात सांगणं शक्य नाही,मुंबई शब्दात सांगता येणं अवघड आहे,मुंबई कळायची म्हणजे इथं येऊन जगलं पाहिजे,दादरच्या पुलावर धावलं पाहिजे,लोकलच्या गर्दीत रेटून उभं राहिलं पाहिजे,वडापाव खाऊन दिवस ढकलायला पाहिजे,घामाच्या धारांत न्हाऊन निघालं पाहिजे.

माझ्यासाठी मुंबई ही धावणाऱ्यांची आहे,थांबला की धक्के पडणार,तुम्हाला धावावेच लागणार,थांबायला वेळ कुणाकडे आहे? मी ह्यावर जास्त लिहायला नको,जास्त लिहिलं तर ते वाचायला वेळ मुंबईला असेल का अशी शंका मला आहे.

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2017 - 7:42 am | अत्रुप्त आत्मा

व्वाह! मजा आ गया.

ज्योति अळवणी's picture

3 Jul 2017 - 8:01 am | ज्योति अळवणी

खरी मुंबई! तरीही सगळ्यांना सामावणारी, वेड लावणारी आणि मोहात पडणारी. जरा हट के जरा बच के ये हे मुंबई मेरी जान!

सतिश गावडे's picture

3 Jul 2017 - 9:56 am | सतिश गावडे

कोकणातल्या कोणत्याही मुलाप्रमाणे शिक्षण संपल्यावर मीसुद्धा नोकरीसाठी मुंबईकडे धाव घेतली. मात्र माझ्यासारख्या संथ स्वभावाच्या व्यक्तीचा अविरत धावणार्‍या मुंबईत निभाव लागणार नाही हे लक्षात येताच मुंबईला अलविदा केला. :)

Ranapratap's picture

3 Jul 2017 - 8:20 pm | Ranapratap

मुंबई नगरी बडी बाका
जशी रावणाची लंका
कधी हि कुणाला उपाशी न राहू देणारी ही लंका

असंका's picture

4 Jul 2017 - 7:41 am | असंका

अप्रतिम!!!!

धन्यवाद...!!

सुबोध खरे's picture

4 Jul 2017 - 12:51 pm | सुबोध खरे

मुंबई नगरी हि सगळ्यांच्या कुतूहल, कौतुक, हेवा आणि भीतीयुक्त आदराची मानकरी का झाली याचा सहसा कुणी विचार करताना आढळत नाही.
मुंबईतील काम करणारा माणूस आपण काम केले तर आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे हे स्वप्न घेऊन आलेला असतो. उत्तर प्रदेश बिहार येथून मुंबईत येणारे भय्ये हे देखील आयुष्यात काही तरी करायचे म्हणून आलेले असतात. उगाच "दाढेला घटका घटका तमाखू" लावून थंड बसणारे लोक येथे येतच नाहीत.
मुंबईची संस्कृती हि काम करणाऱ्यांची आहे. पेन्शनीत आलेल्या लोकांची आणि टिळक मोठे कि आगरकर यावर काथ्याकूट करणाऱ्यांची किंवा
ठेल्यावरून पान मागवून गप्पा हाणणाऱ्यांची नाहीकिंवा बर्मागठिव्का म्हणत म्हणत अर्धा तास गप्पा मरणाऱ्यांची पण नाही .
लिहिण्यासारखं खूप आहे. असो.

वरुण मोहिते's picture

5 Jul 2017 - 3:03 pm | वरुण मोहिते

लै शालजोडीत दिलेत डॉक ह्यांनी . ते मुंबईची गर्दीच किती आणि काय - काय सांगणार्यांनी एकदा मुंबई नीट पहा . अहोरात्र काम चालू असते मुंबईत विविध क्षेत्रांमध्ये . १ महिना कमी पडेल इतके वेगवेगळे सेक्टर दाखवू शकतो कामाचे . ५ -५ मिनिटाला १० हॉटेल आहेत त्यामुळे अस्सल मुंबईकरांना कुठल्या पदार्थाचा अभिमान पण नाहीये . इकडे हेच छान मिळते तिकडे हेच छान मिळते असल्या गोष्टी मुंबईकर नाही करत . दादर ,गिरगाव ,फोर्ट मध्ये फिरलेले

.....असल्या गोष्टी मुंबईकर नाही करत ."

+ १

प्रमोद देर्देकर's picture

5 Jul 2017 - 2:41 pm | प्रमोद देर्देकर

बर्मागठिव्का

खल्लास लय भारी डॉ. साहेब
लेखकाने आता त्यांच्या कडे किती संथ पणा आहे याविषयी सुध्दा लिहावे
कारण आम्हा मुम्बई करांन ते खरच माहीत नाहीये हो.

आशुतोष-म्हैसेकर's picture

1 Aug 2017 - 5:18 pm | आशुतोष-म्हैसेकर

सध्या हैदराबाद शहरात वास्तव्य आहे, इथल्या टोपभरून बिर्याणी खाऊन,पोटभर आळस देत, जगण्याची आम्हाला सवय आहेच

मुक्त विहारि's picture

5 Jul 2017 - 3:30 pm | मुक्त विहारि

कष्टकर्‍यांची आहे.

मग ते बौद्धिक असोत किंवा शारिरीक.

शिवाय, ह्या भूलभुलैय्या नगरीतला १ सेकंदाचा उशीर तुम्हाला आयुष्यातून उठवू शकतो किंवा आयूष्यात बदल घडवू शकतो.

मराठी_माणूस's picture

5 Jul 2017 - 3:37 pm | मराठी_माणूस

खरे म्हणजे हा एक स्वतंत्र देशच केला पाहीजे. तसा ही तो स्वयंपुर्ण आहेच.
उर्वरीत प्रदेशाच्या ऐदी, ऐतखाउ लोकांची गरजच काय.

महेश हतोळकर's picture

5 Jul 2017 - 3:44 pm | महेश हतोळकर

माझ्यासाठी मुंबई ही धावणाऱ्यांची आहे,थांबला की धक्के पडणार,तुम्हाला धावावेच लागणार,थांबायला वेळ कुणाकडे आहे?

न्हायी पर मी म्हंतो येव्ढी वडातान करून जायाचं कुटं?

पुंबा's picture

5 Jul 2017 - 5:48 pm | पुंबा

डॉ खर्‍यांचा उर्मट, स्टिरियोटाईप करणारा प्रतिसाद वाचून हे तेच का असा प्रश्न पडला..

सुबोध खरे's picture

7 Jul 2017 - 12:01 pm | सुबोध खरे

खरं तर प्रतिसाद देण्याची इच्छा नव्हती. पण असो.
तुम्ही उर्मट स्टिरियोटाईप म्हणालात . असो
लेखकाने मुंबई पहिलीआणि त्याला त्यातील फक्त गर्दी आणि धावणारी माणसं दिसली. हे स्टिरियोटाईप नाही का?
मुंबई नगरी हि सगळ्यांच्या कुतूहल, कौतुक, हेवा आणि भीतीयुक्त आदराची मानकरी का झाली याचा सहसा कुणी विचार करताना आढळत नाही.
याबद्दल कुणाचे काहीच म्हणणे नाही. आता सोडलं तर इतर सर्व क्षेत्रात बढती मिळण्यासाठी माणसे मुंबईतच येतात.
कष्टकरी सुद्धा गावाकडे असणाऱ्या कुटुंबाच्या पोटात चार घास पडावे म्हणूनच मुम्बैत राहात असतो. मुंबईत बिगारी काम करणारा सुद्धा दिवसाला ५०० रुपये मिळवतो. कोकणी माणूस गावाकडून मुंबईत येतो कारण गावाकडे असलेल्या आईबापाच्या तोंडात चार चांगले आणि पोटभर घास पाडावेत, भावंडांचे मुलांचे शिक्षण होऊन कुटुंबाला बरे दिवस यावेत. गावाची ओढ कितीही तीव्र असली तरी तो मुंबईतच राहतो कारण गावाकडे राहून काम तर नाहीच पण एक खाणारे तोंड वाढते. त्यावर विश्वास नसेल तर दिवा सावंतवाडी किंवा दादर रत्नागिरी पॅसेंजर गणपती उत्सवाच्या एक दोन दिवस अगोदर पहा.
बाकी सर्व जाऊद्या. थंडीमुळे गारठून माणूस मेला उष्माघातामुळे किंवा गारांच्या वर्षावाने माणूस मेला असे कधीही मुंबईत घडत नाही.
पाऊस पडला, थंडी पडली, गर्मी झाली तरी मुंबई माणसाची नेसत्या तुटपुंज्या वस्त्रानिशी काळजी घेते. फार पाऊस झाला तर गरीब माणूस मुंबईत स्टेशनचा आधार घेतो. साथ लाख लोक मुंबईत झोपडीत राहतात. का याचा जरा विचार करा.
माझ्यासारखा माणूस देशभर फिरून स्थायिक होण्यास परत मुंबईतच येतो कारण येथे असणारी संधी देशात कोणत्याही शहरात नाही हि वस्तुस्थिती. मुंबईत घर घेतले तर निवृत्त झाल्यावर देशात कोणत्याही शहरात तेवढेच( आणि बहुतेक वेळेस बरेच मोठे) घर घेता येते. पण पैसा कमावण्याच्या संधी ज्या मुम्बैत आहेत त्या कोणत्याही शहरात नाहीत. माणसं उराशी स्वप्न पाहून मुंबईत येतात. बहुतांशी माणसांची स्वप्नं पुरी होतात. त्यासाठी लागणाऱ्या कष्टांची त्याची तयारी असते.
१९८५ साली माझ्या भावाने सिमेन्स सारख्या कंपनीत नोकरी असताना व्यवसाय करायचा म्हणून मुंबईत लोकांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. तेंव्हा सकाळी ८ ते ५ नोकरी करून तो संध्याकाळी ५ ते १० लोकांना भेटायला जात असे. रात्री १० वाजता आल्यावर आपल्या मोटारसायकलची दुरुस्ती करण्यासाठी काढली तर हार्डवेअरचे दुकान रात्री ११ पर्यंत मुंबईत उघडे असे. हि मुंबईची कार्य संस्कृती होती /आहे.
याउलट पुण्यात १९९२ साली कॅम्पात दुपारी जेवायला गेलो असता बायकोचे डोके दुखत असताना कॅम्पात दुपारी १ नंतर एकही केमिस्ट उघड नव्हता. चार किमी परत जाऊन ए एफ एम सी मध्ये माझ्या खोलीत जाऊन क्रोसिनची गोळी आणण्याला लागली. हि वस्तुस्थिती.
आमच्या वडिलांचा मित्र रबरी हातमोजे बनवायचा व्यवसाय. आपली नाशिकची कंपनी बंद करून परत मुंबईत आला कारण फ्रान्समधून आलेली ऑर्डर पूर्ण करायची असली तरी कामगार अधिक काम करायला तयारच होत नाहीत ओव्हरटाईम दिला तरी. आज काय घरी पूजा आहे उद्या गणपती आहेत. पर्वा डोकं दुखतंय. असली कारणे मुंबईतील माणसं देत नाहीत( दिली तर दुसऱ्याच दिवशी डच्चू मिळेल.) कारण येथे आलेला माणूस काम करायला आलेला असतो काम टाळण्यासाठी किंवा जगावर उपकार करण्यासाठी नाही.
इतर शहरात राहून लोकांना मुंबईची फक्त गर्दी आणि घाम दिसतो. ते बरोबरच आहे. ज्याची जशी नजर असते तेच त्याला दिसणार अजून काय बोलावे.

प्रतिसाद आवडला. याच तुमच्या संयत शैलीबद्दल आदर वाटतो आणि तो कमी कधीही झाला नव्हता. मला तुमचा आधीचा प्रतिसाद उर्मट आणि बाकीच्या शहरांबद्दल स्टिरियोटाईप्स बाळगणारा वाटला. म्हणूणच त्याचे आश्चर्य वाटले फक्त. मुंबईकर तेवढे कष्टाळू आणि उर्वरीत महाराष्ट्रातले आळशी अशी मांडणी सुचकपणे केलेली दिसली, हे तुमचे वैशिष्ट्य नसल्याने तसे म्हणालो.
मुंबई जगातील महान शहरांपैकी एक आहे, इथल्या संधी, प्रचंड आकाराची इकॉनॉमी, मल्टिकल्चरीझम याबद्दल आदर आहेच की. पण कुठल्यातरी एका गावाचा माणूस विशिष्ट गुणावगुणांनी सिद्ध आहे असे म्हणणे धारिष्ट्याचे वाटते. पुणे असो की नाशिक कि कोल्हापूर, सांगली, सगळी कडेच जागतिकिकरणाच्या रेट्यात धावणे भाग आहे. आळशी राहणे परवडणारे नाहीच. म्हणून इथला माणूस असा, तिथला तसा हे विनोदापुरतं ठीक बाकी ठार चुकीचे.

पुंबा's picture

7 Jul 2017 - 1:09 pm | पुंबा

कृपया लोभ असू द्यावा..

मराठी_माणूस's picture

2 Aug 2017 - 3:12 pm | मराठी_माणूस

म्हणून इथला माणूस असा, तिथला तसा हे विनोदापुरतं ठीक बाकी ठार चुकीचे.

ही तर लाखाची गोष्ट , पण काही शहरातल्या लोकांना हे जन्मात समजणार नाही.

जेनी...'s picture

5 Jul 2017 - 6:17 pm | जेनी...

एनिटाइम मुंबै :)

मुंबई = लोकलची धक्काबुक्की असंच नव्हे. अनेकजण सुरुवातीला हे रेल्वेचे धक्के खाऊन नंतर आपलं सेटिंग बरोब्बर करुन घेतात. स्वतःच्या वाहनाने, बेस्टच्या बसने वगैरे आरामदायक ऑप्शनही निवडतात हळुहळू.

अमित मुंबईचा's picture

7 Jul 2017 - 11:12 am | अमित मुंबईचा

मुळात धक्के लागतात ते मुंबईकर नव्हेच अस माझ स्पष्ठ मत आहे. खऱ्या मुंबईकर या गोष्टीला इतके अवगत झालेले असतात कि त्यांना गर्दीत मिसळून जाणे फार सोप्पे वाटते.

मराठी कथालेखक's picture

5 Jul 2017 - 8:13 pm | मराठी कथालेखक

म्हणजे मुंबईत कुणीच निवांत नसतं का ? मला उगाच वाटलं (सिनेमात वगैरे बघून) की तिथे निवांत टवाळक्या -टपोरीगिरी करणारे, वाटेल तेव्हा क्रिकेट, कॅरम खेळणारे अनेक रिकामटेकडे तरुण असतात म्हणून...
बाकी काम करणारे सगळे निवृत्त झाल्यावर मुंबई सोडतात का ? की निवृत्त होवुनही उगाच इकडे तिकडे (रस्त्यातली, लोकलची गर्दी वाढवायला फिरत असतात) ? .. तर ते एक असो.
बाकी एखाद्या शहरात आयुष्य धकाधकीचं की निवांत हे साधारणत: कामाचे ठिकाण आणि राहण्याचे ठिकाण यातील अंतर आणि ते कापण्यास उपलब्ध साधनांनी लागणारा वेळ यावर अवलंबून असतं. बाकी कामाच्या वेळा साधारणतः सगळीकडे सारख्याच असतात (साडे आठ /नऊ वा फारतर दहा तास). औरंगाबाद हे तुलनेनं (तुम्ही औरंगाबादचे, म्हणून त्याचं उदाहरण आधी घेतो) कमी पसरलेलं शहर आहे. तिथे बहुतांशी कुठूनही कुठे स्वतःच्या वाहनाने वा रिक्षाने पंधरा मिनटात पोहोचता येते ( मी तिथे काही महिने वास्तव्य केले त्या अनुभवाने सांगतो आहे, काही चुकले असल्यास दुरुस्ती सुचवावी) . काही अंतरे जास्त म्हणजे अर्ध्यातासापर्यंत असावीत (जसे वाळूज MIDC ते विमानतळ ई). त्यामुळे औरंगाबादला बहुतांशी लोकांना काहीसा निवांतपणा अनुभवता येत असावा.
मुंबईत अंधेरीत राहून अंधेरीतच नोकरी करणार्‍या माणसाकडे निवांत वेळ पुण्यात विमाननगरला राहून हिंजवडीला (तेही फेज१ म्हणू.. थोडं सुसह्य... फेज २/३ ला तर अगदी चिंचवड/पिंपळे-सौदागरवाले पण त्रासलेत) नोकरी करणार्‍या व्यक्तीपेक्षा काहीसा जास्तच असेल यात शंका नसावी.

सचिन काळे's picture

6 Jul 2017 - 12:39 pm | सचिन काळे

बाकी एखाद्या शहरात आयुष्य धकाधकीचं की निवांत हे साधारणत: कामाचे ठिकाण आणि राहण्याचे ठिकाण यातील अंतर आणि ते कापण्यास उपलब्ध साधनांनी लागणारा वेळ यावर अवलंबून असतं.

>>> लक्षात घेण्यायोग्य मुद्दा आहे.

Nitin Palkar's picture

5 Jul 2017 - 8:48 pm | Nitin Palkar

अतिशय छान लिहिलय!

मराठी_माणूस's picture

6 Jul 2017 - 10:57 am | मराठी_माणूस

ऐसी वरचा "संवाद" नावाचा लेख वाचा. मुंबईचे खरे स्वरुप उघडुन दाखवले आहे.

सुबोध खरे's picture

6 Jul 2017 - 11:28 am | सुबोध खरे

दुवा द्या

मराठी_माणूस's picture

7 Jul 2017 - 10:33 am | मराठी_माणूस
सुबोध खरे's picture

7 Jul 2017 - 11:01 am | सुबोध खरे

हे म्हणजे म्हशीचा फक्त पार्श्वभाग पाहून म्हैस हा शेणाने बरबटलेला गलिच्छ प्राणी आहे असे म्हणण्यासारखे आहे.
बाकी लेखाची भाषा पाहून लेखकाच्या मानसिक पातळीची कल्पना येते.
असो.

गामा पैलवान's picture

7 Jul 2017 - 11:58 am | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

एक वेगळा मुद्दा मांडतोय. मी जी काही मुंबई बघितलीये त्यातली बहुतांश धावपळ फक्त दैनंदिन प्रवासाची म्हणजेच अनुत्पादक असते. यांत भर म्हणून कामाचे निश्चित तास नसतात. कितीही वेळ कचेरी वा कर्मशाळेत घालवला तरी कमीच पडतो (कृपया शासकीय आस्थापने वगळणे). मग शरीराची झालेली झीज भरून काढता येत नाही. लोकं निरनिराळ्या विकारांचे बळी होतात. विश्रांती हा घटक जवळजवळ हद्दपार झाला आहे.

आ.न.,
-गा.पै.

पण आजकाल तरी ह्याला केवळ "मुंबईच" जबाबदार नाही.

खाण्याच्या आणि विश्रांतीच्या सगळीकडेच बदललेल्या आहेत. पुर्वी कट्ट्यावर किंवा पारावर जमणारी मंडळी पण वेड्या खोक्यात डोके खूपसून बसलेली आढळतात.

शिवाय खते आणि कीटकनाशके ह्यांचा प्रभाव पण आहेच.

खेड्यातील जुन्या माणसांना ह्र विकार सध्या नाहीत पण अज्जुन २५-३० वर्षांनी सगळीकडेच अशक्त व्यक्तींचे प्रमाण जास्त असेल.

वरील मते ही माझी अंदाजपंची आहेत.

डॉ. लोकांनी अज्ञान दूर केल्यास उत्तम.

सुबोध खरे's picture

8 Jul 2017 - 12:11 am | सुबोध खरे

प्रवासात घालवलेला वेळ हा अनुत्पादकच असतो असे नाही. बदलापूर वरून मुंबईत येणार आमचा एक मित्र सकाळी तासभर छान झोप काढतो. परत जाताना ठाण्याच्या पुढे बसायला मिळाले की अर्धा पाऊण तास परत झोप काढतो आणि ताजा तवाना होतो. पण तासभर उभे राहून प्रवास केला तर "दगदग" सोडून पदरात दुसरं कहोच पडत नाही. तुला व्यायाम म्हणणे हे स्वतःची फसवणूक करणारे आहे.

सुबोध खरे's picture

8 Jul 2017 - 12:14 am | सुबोध खरे

मुंबईतील माणूस प्रवासात वेळ फुकट घालवतो पण इतर शहरातील लोक काही तो फार सत्कारणी लावतात असे नाही ज्याला व्यायाम करायचा आहे तो कोणत्याही शहरात करतोच आणि नाही करायचा त्याला असंख्य कारणे आहेतच.

सुबोध खरे's picture

8 Jul 2017 - 12:15 am | सुबोध खरे

मुंबईतील माणूस प्रवासात वेळ फुकट घालवतो पण इतर शहरातील लोक काही तो फार सत्कारणी लावतात असे नाही ज्याला व्यायाम करायचा आहे तो कोणत्याही शहरात करतोच आणि नाही करायचा त्याला असंख्य कारणे आहेतच.

मराठी_माणूस's picture

8 Jul 2017 - 12:16 pm | मराठी_माणूस

हेच दुसर्‍या शहरातील लोकांच्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या बाबतीत सुध्दा खरे आहे.

गामा पैलवान's picture

8 Jul 2017 - 11:56 am | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

प्रवासातला वेळ सत्कारणी लावता येणं ही चैन आहे. तो नियम नाही. झोपडपट्टीतली माणसं अगदी जिवाला जीव देणारी असतात. उच्चभ्रू वस्तीतल्यांसारखी एकमेकांशी फटकून वागणारी नसतात. मात्र तरीही हाती पैसे असलेल्या लोकांचा कल उच्चभ्रू वस्तीत घर घेण्याकडे असतो. त्याप्रमाणे प्रवासातला वेळ कितीही सत्कारणी लावता येत असला तरी ती एक तडजोड आहे. मुंबईतली अवाजवी गर्दी कमी करण्याकडे गांभीर्याने पाहिलं जाव, इतकीच माझी अपेक्षा आहे.

आ.न.,
-गा.पै.

.... इतकीच माझी अपेक्षा आहे."

पण तसे होणे कठीण आहे.

मुलांच्या शिक्षणासाठी मला मुंबईला यावेच लागले. (मुंबई इतकेच उत्तम शिक्षण पुण्याला पण मिळते. त्यामुळे, पुणे हा पण एक पर्याय होता, पण पुण्यात प्रवास करतांना मला तरी त्रास होतो. त्यापेक्षा लोकल बरी.गर्दीच्या वेळा काही अंशी टाळून आज तरी लोकलचा प्रवास बर्‍यापैकी
आरामात होतो.)

गांधीजींनी सांगीतल्या प्रमाणे, खेडी जर स्वयंपूर्ण झाली असती किंवा झाली तरी, शहरांवरचा अनावश्यक भार बराच कमी झाला असता किंवा होईलही.

इतरांचे माहीत नाही पण येत्या ५-६ वर्षात मी तरी मुंबई सोडीनच. ह्या शहरा वाचून माझे तरी काही अडणार नाही.