एक red wine नातं!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
30 Jun 2017 - 7:44 pm

ती त्याच्याहून साधारण आठ वर्षांनी मोठी. तिच लग्न झाल होत. एक मुलगा आणि प्रेमळ नवरा असा सुखी संसार. पण तरीही त्याची आणि तिची झक्कास मैत्री होती. दोस्ती झाली तेव्हा नुकतेच इंटरनेट सुरु झाले होते. भेटण कमी व्हायचं दोघांच. पण याहू मेसेंजरवर खूप गप्पा व्ह्यायच्या. ती त्याला सतत चिडवायची कोणत्या ना कोणत्या मुलीवरून. तो ते एकदम खेळीमेळीने घ्यायचा. अशीच दोघांची दोस्ती वाढत होती. त्याच्या घरी गणपतीला नवऱ्याला आणि लेकाला घेऊन ती गेली होती. तिच्या मनात होतं कदाचित् त्याचे पालक आणि तिचा नवरा असे सगळे मिळून एक कौटुंबिक मैत्री होईल. पण तस काही झाल नाही. अर्थात त्याचा तिला विषाद वाटला नाही की त्याला दु:ख झाल नाही. 'त्यांच नाही जमलं पण आपण दोस्त आहोत न? बास आहे की!' दोघांच्याही मानत होत.... एकमेकांना एकदाही अस काहीही न सांगता. दोघही एन्जॉय करत होते हे दोस्तीच नातं. मग कधीतरी त्याच लग्न ठरलं. ठरलं म्हणजे त्यानेच ठरवलं. प्रेम विवाह! त्याच्या लग्नाला ती हौसेने आली. मग त्याच्या बायकोच्या मंगळागौरीला देखील. पण त्याच्या बायकोची आणि तिची मैत्री नाही झाली. 'नाही तर नाही. आपण दोस्त आहोत न? बास आहे की!' परत एकदा दोघांच्या मनात होत.....

आणि मग तो परदेशात निघाला. थोडं अजून शिकायला... थोडं अजून चांगल आयुष्य मिळवायला. ती धावली त्याला विमानतळावर भेटायला. पण तिला तसा थोडा उशीरच झाला. ती पोहोचली तोवर तो गेला होता आत. त्याच्या आई-वडिलांशी थोडफार बोलून ती जड मनाने परतली. घरी खिडकीत बसून दोघांच्या मेसेंजरवरच्या गप्पा, कधीतरी अधून मधून भेटले होते तेव्हाचे किस्से आठवत होती; आणि अचानक तिचा मोबईल वाजला. त्याचा फोन होता. विमानतळावरून! तिच्या डोळ्यात पाणी उभं राहीलं.

'जातोस?'
'हो ग! जायला हवं न?'
'हम्! विसरशील?'
'वेडी! आणि तू?'
'वेडा आहेस?'
'मेल्स करत जा....' दोघांनी एकमेकांना बजावलं आणि तो गेला.

दिवस जात होते... महिने... वर्ष.... संपर्क थोडा कमी झाला होता. ती संसारात अडकत जात होती. तो त्याच्या शिक्षणात अडकला होता. त्याच्या अडचणी खूप वेगळ्या होत्या आणि तिचे प्रश्न तिचेच होते. पण मेल्स मात्र चालू होत्या.

त्याला तिथेच छानशी नोकरी लागली. थोडा सेटल झाला तो आणि मग दोन वर्षांनी आला इथे. त्याने दुसऱ्याच दिवशी तिला फोन केला.

'भेटशील?'
'हा काय प्रश्न आहे? उद्या एका कामासाठी चर्चगेटला जाते आहे. तू येतोस तिथे?'
'ओके!'

तिच काम पटकन उरकून ती स्टेशनवर येऊन बसली होती. त्याची वाट बघत. आणि तो तिला दिसला. धावली ती. त्याला मिठी मारून मनापासून हसली. क्षणभर तो गोंधळाला. पण मग स्टेशन गुलाबी झालं. मग खूप गप्पा. त्याला आलेल्या अडचणी... त्यावर त्याने केलेली मात.... आता छानशी नोकरी.... सगळ कसं छान चालू आहे ते तो उत्साहाने सांगत होता आणि ती समाधानाने मनापासून ऐकत होती. तिच्या आयुष्यात घडलेले आणि घडणारे बदल ती देखील मनापासून त्यला सांगत होती... तिच्या डोळ्यात खोलवर बघत तो ते ऐकत होता.

'असं काय बघतोस?'

'काही नाही.'

'ए तुझ्या डोळ्यांच्या पापण्या मला फार आवडतात; आणि तुझे ब्राऊन डोळे तर खूपच गहिरे आहेत रे.'

'फक्त माझे नाही... तुझे पण त्याच रंगाचे आहेत. आणि त्याला ब्राऊन नाही गावठी मधाचा रंग म्हणतात.'

'कोण म्हणतात?' ती चेष्टेच्या मूड मध्ये.

'आम्ही.... म्हणजे मी ग. तुझ्या डोळ्यातला गावठी मध मला गुंतवून ठेवतो.' त्याचा ओलावलेला हळुवार आवाज.

त्याच्या बोलण्यावर ती मधाळ हसली फक्त.

तो होता तोवर जस जमेल तस पण दोघे भेटत होते.... आणि मग हे जणूकाही ठरुनच गेल. दर वर्षी तो यायचा आणि ते दोघे दर वर्षी भेटायचे. मग कधी एखादा बस स्टॉप गुलाबी व्हायचा तर कधी एखादा मॉल.

दोस्ती पुढे सरकली होती खरी. पण ते 'so called' प्रेम नव्हत. ते दोघे प्रियकर प्रेयसी नव्हते. एक ओढ लागलेलं नातं होत.... पण त्याला नाव नव्हत. तिच्या आयुष्यात घडणारी लहानात लहान गोष्ट त्याला माहित असायची. इतकच काय पण तिच्या email चा पासवर्ड देखील त्याला माहित होता. त्याच्या बँकेच्या खात्याची तिला माहिती होती. तो तिला भेटला की दोन गिफ्ट्स नक्की असायची. एक पाडव्याच आणि एक तिच्या वाढदिवसाच. पाडवा? हो!! पाडवा!!! कधी सुरु झाल ते दोघानाही आठवत नव्हत... पण हे अस काहीस होत खर दोघात.

तो तिला हाक मारताना कधी 'राणी' म्हणायचा तर कधी 'डार्लिंग'. ती मात्र त्याला नेहेमी नावानेच हाक मारायची. का? कारण अस काही नाही.... पण ती थोडी तशीच होती; म्हणून असेल कदाचित्.

तो तिच्याशी बोलतो अधून मधून इतकच त्याच्या घरी माहित होत. आणि तो तिचा एकदम खास मित्र आहे हे तिच्या घरी. याहून जास्त माहिती करून घ्यावी अस कोणाला वाटलं नाही आणि त्यांनी काही सांगितलं नाही. वर्ष जात होती.

असाच एकदा तो आला होता... यावेळचा त्याचा नूर वेगळा होता. एरवी ती खूप बोलायची आणि तो फक्त तिच्याकडे बघत तिचं ऐकाचयचा. पण यावेळी तो खूप बोलत होता. ती मनापासून ऐकत होती. इतक्या वर्षात दोघांनाही काही गोष्टी न सांगता देखील कळायला लागल्या होत्या. त्यांच्यात काहीतरी बदलत होत.... ते प्रेम एक वेगळ वळण घेत होत...

आणि मग तिला त्याचा एक मेल आला.... फक्त तिच्याचसाठी लिहिलेला....

दिवस, महिने... वर्षे सरली,
तशीच ओढ तरी का मज तुझ्या भेटीची?
नेहेमीच होते मन अधीर भेटण्यास तुला;
जाते चुकवून हळूच काळजाचा ठोका.
दिसताच तू वाटे धडधड अनामिक,
बोलायाचे असे बरेच,पण शब्दच हरवतात,
असे परंतु काही जादू तुझ्या स्पर्शांत,
मज जाणवले ते प्रत्येक क्षणात.
घेताच मी हात तुझा माझ्या हाती,
होते शांत काहूर उठले जे मनात.....

तिने मेल वाचली आणि ती हसली... डोळ्यात अश्रू तरळले होते का दोन? फक्त त्याच्यासाठ? कुणास ठाऊक!

तिने त्याला फक्त 'मस्त' इतकाच रिप्लाय केला. अन् पुरेसा होता तो त्याला. एक मंद स्मित होत त्याच्या चेहेऱ्यावर तिचा तो एक शब्दाचा मेल वाचताना.

त्यानंतरच्या एका भारत भेटीत ते दोघे भेटले होते तेव्हा त्याने तिच्या डोळ्यात खोल बघत तिला विचारलं................

'एक सांगू?'
'अजूनही अस विचारव लागत का आपल्यात?'
'तरीही.....'
'बर... बोल.....'
'तुला प्रपोज करणार आहे.....'
'एका अटीवर....'
'कोणत्या ग राणी?'
'नरीमन पॉईंटला.... कोसळत्या पावसात.... एका गुढग्यावर बसून करणार असलास न तरच!!!' ती हसत म्हणाली....

त्यावर तिचा हात हातात घेत तो म्हणाला........... 'तुला कसा कळला माझा प्लान?'

मग दोघेही एकमेकांकडे बघून खळखळून हसले.

मैत्री फुलत होती......... नातं मुरत होतं........ आणि जगाच राहाटगाडग देखील फिरत होत......

आणि एकदिवस अचानक त्याचा मेल आला...

मी घोळ घालून ठेवला आहे. माझ्या बायकोने तुझे माझे whatsaap वरचे chats बघितले. तसं मी नेहेमी डिलीट करतो ग. पण काल राहिलं आणि तिने माझा फोन हाताळताना तुझ नाव वाचून आपलं chat उघडल आणि बघितल. आपल्या साध्याच गप्पा होत्या नेहेमी प्रमाणे. पण मी तुझा उल्लेख 'राणी', 'सोन्या', 'डार्लिंग' असा केलेला तिने बघितला आणि मग घरात तिसरं महायुद्ध झाल. तिने लगेच आई-बाबांना फोन करून सांगितलं. त्यांना हे माहित आहे की आपण अधून मधून बोलतो. पण तरीही त्यांना देखील हे असलं बोलण पटल नाही. त्याचं देखील बरोबर आहे न. आपली जी आणि जशी मैत्री आहे ती सहसा कोणाला पटणार नाही. म्हणून त्यांच्या समाधानासाठी तुला एक whatsaap मेसेज करोतो आहे.

आणि त्याचा whatsaap वरचा मेसेज होता.....
आपल्यामध्ये जी काही मैत्री or जे काही होत ते सगळ मी थांबवतो आहे. ह्या पुढे मी तुला कुठलाही मेसेज, chat or इतर काहीही contact करणार नाही. good bye

तिला धक्का बसला.... पण क्षणभरात तिने स्वतःला सावरल आणि त्याच्या मेसेजला उत्तर लिहील.....

जे काही होत? अरे आपली एक चांगली healthy मैत्री आहे. किंवा होती म्हणू. हे अचानक काय आल? पण ठीके! नाही बोलायचं तर नको. तू माझ्याशी किंवा मी तुझ्याशी न बोलल्यामुळे आपल आयुष्य थांबणार नाही आहे. किंवा बोलल्यामुळे आयुष्य वेगळ देखील होणार नाही आहे. मुळात आपण अस किती बोलतो रे की बोलण थांबवायचा मेसेज तू करोत आहेस? एक लक्षात घे मी एक सुखी सांसारिक स्त्री आहे. तुझे आई-वडील आणि माझा नवरा एकमेकांशी का comfortable होऊ शकले नाहीत ते मला माहित नाही. त्यामुळे माझ देखील तुझ्या आई-वडिलांशी बोलण थांबल... पण अस का झाल ते मी त्यांना देखील कधी विचारलं नाही. बर; थट्टा, मस्करी, गप्पा याव्यातीरिक्त आपण नक्की काय बोलतो रे की तू म्हणावस की जे काही होत? अरे माझा मुलगा आणि नवरा देखील माझा मोबाईल घेतात. मी कधी तुझे मेसेज डिलीट नाही करत. तुझा हा मेसेज बघून त्यांचा काही गैरसमज होऊ शकतो ना. किमन १० वेळा विचार करायचास की रे मेसेज करताना. बर फक्त तुझ्या माहितीसाठी सांगते आहे... मी हे मेसेज पण डिलीट नाही करणार. जर त्यांनी बघितले आणि काही विचारलं तर मी स्पष्ट सांगीन की आम्ही बोलायचो.. आणि त्याने असा अचानक हा मेसेज का पाठवला त्याच त्याला माहित. तुला माझी बाजू सांगण मला गरजेच वाटलं म्हणून हा मेसेज करते आहे. good bye

तिने whatsaap बंद केल आणि तशीच स्वस्थ बसून राहिली. तिला फार वाट बघायची गरजच नव्हती. मेल आल्याच तिच्या मोबाईलने लगेच ओरडून सांगितल तिला. तिने हसतच inbox उघडलं.

अग हा काय मेसेज केलास? मी फक्त त्यांच्या समाधानासाठी मेसेज करतो आहे असा मेल केला होता तो बघितला नाहीस का? रागावली आहेस का राणी? खरच बोलायचं नाही का आपण आता? अर्थात तू अस ठरवलं असलस तर तुझ देखील बरोबर आहे म्हणा. हे अस खोट बोलून नाव नसलेलं नात जपण तुला पटत नसेल तर मी तुला काहीच प्रश्न नाही विचारणार.

ती हसली. मात्र त्याचा उतरलेला चेहेरा तिच्या डोळ्यासमोर आला आणि तिने घाईघाईने रिप्लाय केला.

वेडा आहेस तू अगदी. माझ्या मेसेजने तू जर गडबडला आहेस तर नक्कीच त्याचा योग्य तो परिणाम इतरांवर झाला असेल न? मला कळत रे की नाही पटणार तुझ्या घरच्यांना हे अस आपलं बोलण. ही मैत्रीच स्विकारण अवघड आहे सगळ्यांना. तो मेसेज करताना देखील मला मनातून वाटत होतं की खर तर हे अस काहीतरी एक बोलायचं आणि वेगळच वागायचं मला पटत नाही. तसा माझा काय आणि तुझा काय स्वभाव नाही. पण कोणालाही काहीतरी सिद्ध करून दाखवण्यापेक्षा.... आणि काय पटत आहे किंवा नाही याहीपेक्षा तुझं माझ्या आयुष्यात असणं मला जास्त महत्वाच वाटत. तुझ मन देखील हेच सांगत आहे तुला याची मला खात्री आहे. त्यामुळे आता फार विचार करू नकोस. झाल गेल संपल ते सगळ. बस! आता मात्र काळजी घे.

तिचा मेल वाचून तो विसावला आणि मग त्याचं उत्तर आल तिच्या मेलला....

आठवतं का ग असच एकदा आपण गप्पा मारत होतो तेव्हा कधीतरी मी तुला विचरल होत 'काय नाव द्यावं आपल्या या नात्याला?' आणि तू म्हणाली होतीस 'या नात्याला नाव नको देऊया.' पण आत्ता माझ्या मूर्खपणामुळे ज्या काही घटना घडल्या आणि तू मला सावरून घेतलस.... आणि त्याहूनही जास्त महत्वाचं म्हणजे... तू का सावरून घेतलस याच कारण सांगितलस आणि मनात आल खरंच काही नाव का नसावं ह्या नात्याला? किंवा काय नाव देता येईल ह्या नात्याला? तस आपल्या सामाजिक परिस्थितीत आपल हे नातं कुठेच बसत नाही. म्हणजे 'खूप चांगली मैत्री'च्या बरच पुढे 'girlfriend - boyfriend' च्या देखील पुढे गेलंय हे नातं. तरीही अस्तित्वात असलेल्या कोणत्याही नात्यापर्यंत पोहोचू न शकणार अस हे विलक्षण साधस आणि तरीही गुंतागुंतीच.......... भावनिक आणि तरीही सुंदर........... नात आहे. मग मनात विचार आला ह्या विलक्षण नात्याला नाव देखील तेवढच विलक्षण हवं. नाव असावच अस नाही, पण काय आहे न आपल दोघांच हे नातं खरच खूप सुंदर आहे. इतकी वर्ष होऊनही तेवढच जिवंत आणि तरुण आहे. ना कधी भांडण ना वाद... हा एखादा विषय पटला नाही तर चर्चा होतेच की आपल्यात.... तू तुझा मुद्दा सोडत नाहीस आणि मी माझा... पण ते तेवढ्या पुरतच असत; आणि दोघांनाही त्याची पूर्ण जाणीव असते. एक वेगळीच समज आहे या नात्याला. मग अशा या नात्याला नाव पण तसच हवं न.

विचार करताना मनात आलं एक नाव.... red wine च नात! रुढार्थाने कोणत्याही नात्याच्या अटींमध्ये न बसणारं आणि एकमेव अस हे नात आहे. आता जर हे नाव मी देतो आहे तर त्याच कारण देखील तुला सांगितल पाहिजे न.... हेच नाव का ते सांगू?

एकतर red wine आपल्याला दोघांना आवडते. बर wine घ्यायला काळ वेळ लागत नाही. तरीही जेव्हा wine घेतली जाते ती वेळ खास असते. आपल पण असच आहे न... केव्हाही आणि कुठेही भेटलो तरी ती जागा आणि ती वेळ खास होते. red wine मध्ये एकूणच elegance आहे, नाजुकपणा आहे. wine घेताना ती कधी संपू नये असं सारखं वाटत असत. तसच आपल्या नात्यात आहे. एक elegance आहे... एक नाजुकपणा आहे आपल्या नात्यात..... आणि भेटलो की ती भेट संपूच नये अस वाटत. बियर म्हंटल की विजय मल्ल्याची किंगफिशर आणि त्याची जाहिरात करणाऱ्या अल्पवस्त्रांकित ललना डोळ्यासमोर येतात. त्यामुळे तू आणि बीअर असा विचार कधी मनाला नाही शिवला. red wineच तस नाही. red wine म्हंटल की एक शांत संध्याकाळ.... मावळतीचा सूर्य किंवा एखादी पौर्णिमेची रात्र आठवते. समोर अथांग समुद्र... जो आपल्याला दोघांना आवडतो.... आणि माझ्या शेजारी संपूर्ण पांढऱ्या शुभ्र ड्रेस मध्ये केस मोकळे सोडून बसलेली तूच आठवतेस. अजून एक कारण हेच नाव देण्याच. red wine चा लाल रंग; तू असलीस की सगळ गुलाबी होत न... हा गुलाबी रंग पण त्या लाल रंगात मुरला आहे. एक अजून, red wine ची चव बराच वेळ रेंगाळते.... तुझ्या आठवणी सारखी. आणि सर्वात महत्वाच म्हणजे wine ला expairy date नसते.... उलट ती जितकी जुनी तेवढीच तिची चव मुरते.... तिचा elegance वाढतो आणि रंग गहिरा होत जातो.

राणी आज या नात्याला नाव देताना मनातून समाधान वाटत आहे.... खूप काहीतरी शांत झाल आहे मनात. माझं माझ्या आयुष्यावर.... आई-बाबांवर आणि बायकोवर जितक प्रेम आहे न तितकच तुझ्यावर देखील आहे.... हे 'red wine' नात खूप खूप खास आहे माझ्यासाठी............. अह................. आपल्यासाठी!!!

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

30 Jun 2017 - 8:20 pm | मराठी कथालेखक

चांगली कथा... पण थोडी आटोपशीर जास्त आवडली असती. यातले नायक-नायिका प्रत्येक भावना अगदी अति विस्ताराने शब्दांत व्यक्त करत आहेत असं वाटलं.
बाकी दाट मैत्री ही छानच गोष्ट आहे .. पण म्हणून ईंमेल चा पासवर्ड आणि बँकेचे डिटेल्स !!

जव्हेरगंज's picture

30 Jun 2017 - 8:27 pm | जव्हेरगंज

भारी आहे ही वाईन !!!

जेनी...'s picture

30 Jun 2017 - 8:51 pm | जेनी...

सुरुवात मस्त केलित ... मध्यावर थोडी हलली ..
अन्बिलिवेबल काहिसं वाटलं ... जसं बॅंकेचे डीटेल्स
त्यातुन या नात्यात आणि नवरा बायकोच्या नात्यात निदान संभाषणवाइझ
तरी फारसा फरक वाटला नाहि ;)
एनिवेझ छान प्रयत्न

ज्योति अळवणी's picture

30 Jun 2017 - 9:34 pm | ज्योति अळवणी

नायक नायिका प्रत्यक्ष फारसे भेटत नाहीत. तरीही दोघांच्याही मनात एक वेगळीच ओढ आहे हे under line करण्यासाठी bank details आणि पासवर्ड हा उल्लेख आहे.

नातं दोस्तीच्या पलीकडे आणि नवरा-बायको सारख्या नात्याच्या अलीकडे आहे असं काहीसं म्हणायचं आहे मला.

लेखन / कथा अजून वाचलेली नाही आहे, वाचतो.
पण , कोणी कितीही खास/आपलं/घरच असले तरी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या शेअर करु नये. उदा. बँक डिटेल्स किंवा otp!
हा फक्त सावधगिरीचा इशारा, बाकी आपली मर्जी.

मराठी कथालेखक's picture

1 Jul 2017 - 8:23 pm | मराठी कथालेखक

"वेगळीच ओढ" आणि पासवर्ड/बँक डिटेल्स शेअर करणं यातला संबंध नाही कळाला.
आजकाल तर नवरा बायको पण पासवर्ड (निदान ईमेलचे) शेअर करत नाहीत सहसा..
बाकी "जवळच्या नात्यातील पासवर्ड शेअरिंग" या विषयावर एक काथ्याकूट धागा निघू शकतो :)

ज्योति अळवणी's picture

30 Jun 2017 - 10:44 pm | ज्योति अळवणी

बँक डिटेल्स आणि पासवर्ड हे केवळ कथेतल्या कल्पना आहेत... दोघांचा एकमेकांवरचा विश्वास emphasyze करायला... इतकंच!

स्रुजा's picture

30 Jun 2017 - 10:57 pm | स्रुजा

बाप रे, हे ईमोशनल अफेअर च झालं की... नाही पटली बुवा ही कथा.

मलाही नाही पटली.. कथेतले बरेच डीटेल्स असे आहेत, ज्य्य्मुळे ही 'हेल्दी मैत्री' वाटत नाहीये.,

तर अत्तरच निघाले.

असो,

बादवे, आजकाल "सोत्रि" कुठे आहेत?

याला रेड वाईन म्हणण्यापेक्षा 'केक खायचापण आहे आणि ठेवायचापण आहे' नाते म्हणणे जास्त योग्य होईल :D

परवाच द गर्ल विथ ड्रॅगन टॅटू मधल्या मायकेल ब्लोमकविस्त बद्दल विचार करत होते. त्याच्या कितीतरी सेक्स पार्टनर असतात; पण तो प्रामाणिक एकीशीच असतो.

गवि's picture

1 Jul 2017 - 11:49 am | गवि

याला म्हणतात "गुंतुनि गुंत्यात सा-या पाय माझा मोकळा"!!!

चिनार's picture

1 Jul 2017 - 2:23 pm | चिनार

कथा छान..
बाकी ही अशी नाती इतरांना झेपणं जरा कठीणच..त्याच्या बायकोने कधी मेल चेक करायला मागितले तर हा काय करणार? सुखी संसार मोडकळीस येऊ शकतो..
या नात्याला, एक अ"चाट" नातं असं नाव सुचवतो..

जेनी...'s picture

1 Jul 2017 - 3:28 pm | जेनी...

मी पण एक नाव सुचवते ..

एक 'झिंगाट ' नातं ... :D

जेम्स वांड's picture

2 Jul 2017 - 10:45 am | जेम्स वांड

तो तिला पाडव्याचे गिफ्ट देतो वगैरे नंतर सपशेल झोप लागली!

त्याशिवाय साखरपेरणी करीत थोडेफार व्यभिचाराचे उदात्तीकरण केल्यासारखं वाटलं. असो, आमचं गावठी इमान वेगळं अन हे रेड वाईन कल्चर वेगळं, सगळ्यांसोबत जगणे शिकायला हवं

नीलमोहर's picture

2 Jul 2017 - 2:03 pm | नीलमोहर

दोन व्यक्तींत असं नाव नसलेलं, नात्यांपलीकडचं नातं असू शकतं, ते चूक की बरोबर हा वेगळा प्रश्न,
लिखाण आवडलं, काही भाग पटला काही नाही,

अभिजीत अवलिया's picture

2 Jul 2017 - 8:57 pm | अभिजीत अवलिया

कथा अजिबात पटली नाही.

मराठी कथालेखक's picture

2 Jul 2017 - 9:08 pm | मराठी कथालेखक

मानलेला नवरा-मानलेली बायको :)
मानलेले आई-वडील , बहीण -भाऊ ई असू शकतात तर मानलेली बायको/मानलेला नवरा का नाही ...

जेम्स वांड's picture

2 Jul 2017 - 10:45 pm | जेम्स वांड

बद्दल एकच विचारावे वाटते आहे, तुम्ही केली आहे का एखादी मानलेली बायको? किंवा तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही आहात का कोणाची मानलेली बायको, 'मानलेली बायको' करायला (ठेवायला म्हणवत नाही) तशी हरकत तुम्हाला नसेल, आमची हरकत घरातच आहे!! स्वयंपाकघरात!!

क्रांती करा पण दळभद्री तरी नको, तरीही तुमची ह्या खदिरंगार वाटेवर चालायची हौस असलीच तर भाऊ तुम्ही पुढं व्हा, आम्ही तळ्याकाठी बसून कपडे सांभाळतो तुमचे अन शिट्या मारतो कसे!

मध्यमवर्गीय-एकपत्नीव्रती , वांडोबा.

ह्म्म हे मानलेली बायको आणि मानलेला नवरा ....काहि पटलं नाहि...

मराठी कथालेखक's picture

3 Jul 2017 - 4:04 pm | मराठी कथालेखक

इथे लेखिकेनं एक कथा लिहिलिये.
हा काथ्याकूट नाही
कथा काहीही असू शकते.
एखाद्या कथेत लेखकानं असं रंगवलं की कुणीतरी कुणाचा तरी खून करतोय तर याचा अर्थ असा नाही की कथालेखकाने प्रत्यक्ष जीवनात खून केलेला असेल.
कथेवर दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्ही प्रतिसादकाला व्यक्तीगत प्रश्न विचारत आहात की "तुमच्या जीवनात असं काही आहे का ?" वगैरे. असं विचारणं अस्थायी आहे असं मला वाटतं. तुम्ही फारतर, "तुमचे विचार असे आहेत का ?" असे विचारांबद्दलचे प्रश्न विचारु शकता. असं माझं मत. अर्थात तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य आहेच.
असो. तर मी माझ्या विचारांबद्दल फक्त बोलेन आणि मानलेला नवरा/बायको , वा ओपन रिलेशनशिपची संकल्पना मला तत्वतः पटते. त्याचवेळी अशा गोष्टी वास्तवात (प्रॅक्टिकली) खूप कठीण , गुंतागुंत निर्माण करणार्‍या असू शकतात हे ही मी जोडतो.
असो. या विषयावर वेगळा काथ्याकूट होवू शकतो. कथेचा रसास्वाद घेताना मला तरी इतकी चर्चा पुरेशी वाटते.
धन्यवाद.

व. पू आणि दवणेंचं काँबिनेशन वाटल. कथा अर्थातच आवडली नाही .

धर्मराजमुटके's picture

3 Jul 2017 - 7:04 pm | धर्मराजमुटके

नात्याला काही नाव नसावे. तुही रे मेरा 'मिटवा' !