आमची भारतीय प्रमाणवेळ !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
27 Jun 2017 - 11:30 am

‘’अनेक बाबतीत विविधता व मतभिन्नता असलेल्या तुमच्या देशातील नागरिकांमध्ये एखाद्या बाबतीत तरी समानता आहे का हो?’’ असा प्रश्न जर आपल्याला एखाद्या परदेशी व्यक्तीने विचारला, तर त्याचे उत्तर ‘’होय, आम्ही भारतीय, ठरलेली वेळ न पाळण्याच्या बाबतीत समानधर्मी आहोत’’ असे देता येईल!

काय, दचकलात ना हे उत्तर ऐकून? पण वास्तव नाकारून कसे चालेल? आपल्याकडे कुठलाही प्रसंग असो, ठरलेली वेळ ही अभावानेच पाळली जाते. थोडाफार उशीर करणे हा आपला स्थायीभाव आहे. जर कोणी आपल्याला यावरून टोकले तर आपण अगदी बेफिकीरीने मान उडवत अन मनगटावरच्या घड्याळात बघत म्हणतो, ”हा हा, त्यात काय एवढे, ही तर आपली भारतीय प्रमाण वेळ !” वर पुढे खो खो हसून आपल्याला वेळेचे गांभीर्य नसल्याचे दाखवून देतो.

आपल्या शालेय जीवनात आपण वेळेचे महत्व शिकविणारी अनेक वचने, सुभाषिते वगैरे शिकतो. नमुन्यादाखल ही पाहा काही :

‘वेळेचे मूल्य पैशापेक्षाही जास्त असते’,
‘वेळ ही फुकट मिळणारी अमूल्य गोष्ट आहे’.

पण हे सर्व वाचण्यापुरते राहते. मोठे झाल्यावर व्यवहारात त्याचे पालन करण्याबाबत मात्र आपण अगदी उदासीन असतो. बहुसंख्य लोकांमध्ये ही उदासीनता भिनल्यामुळे समाजाच्या अनेक क्षेत्रात वेळ न पाळण्याच्या वृत्तीची लागण झालेली दिसते. त्यामुळे अनेकांना अनेक प्रसंगी नुकसान सोसावे लागते. बघूयात याची काही ठळक उदाहरणे.

बहुतेक सरकारी कार्यालये ही वेळेच्या बाबतीत बेशिस्तीचा वस्तुपाठ घालून देतात. बऱ्याच कर्मचाऱ्यानी कामावर उशीरा जाणे पण, तिथून निघताना मात्र बरोबर वेळेवर निघणे हा पायंडाच पाडला आहे. जसपाल भट्टी यांच्या एका दूरदर्शन मालिकेतील एक सरकारी कर्मचारी अगदी निर्लज्जपणे म्हणतो, ‘’ देखो, शाम ५ बजें दफ्तरसे मेरा निकलना बहोत जरूरी है, क्योंकी दिनमें दोनो टाईम मै कैसा लेट हो सकता हू?’’ बस्स, बहुतेक कर्मचाऱ्यांनी हे वाक्य अगदी वास्तवात आणलेले आहे. या अनागोंदीमुळे जनतेची असंख्य कामे रखडलेली असतात.पण, त्याची फिकीर कोणाला? अर्थात, गेल्या काही वर्षात सरकारी आणि खाजगी क्षेत्रात हजेरीच्या ‘बायोमेट्रिक’ पद्धतीमुळे या बेशिस्तीवर काही प्रमाणात तरी नियंत्रण आलेले आहे, हेही नसे थोडके.

बर, एक वेळ आपण सरकारी नोकरीचे सोडून देऊ. पण,खाजगी व्यावसायिकांमध्ये तरी काय स्थिती असते? समाजातील अनेक व्यवसाय हे संबंधीत ग्राहकांना पूर्वनियोजित वेळ देऊन चालवलेले असतात. पण बऱ्याचदा तिथेही वक्तशीरपणाचा अभाव दिसतो. कधी खूप कार्यमग्न असलेले व्यावसायिक वेळ पाळू शकत नाहीत तर कधी ग्राहकही वेळेवर पोचण्यात बेफिकीर असतात. एकमेकांच्या वेळेची कदर करणे हा आपला अंगभूत गुण नाही, हेच खरे.
आता बघूयात जरा सांस्कृतिक आघाडीवर डोकावून.

बहुसंख्य सभा, संमेलने, उद्घाटनाचे कार्यक्रम इ. नियोजित वेळेपेक्षा उशीरानेच सुरू होतात. त्याची अनेक कारणे असू शकतात पण, मुख्य कारण म्हणजे समारंभाच्या प्रमुख पाहुणे वा अध्यक्षाना उशीरा येण्यातच भूषण वाटते. त्यातून ही मंडळी जर राजकारणी असतील तर मग विचारायलाच नको. अनेक शिक्षणसंस्थांमधील कार्यक्रम तर या बाबतीत अगदी बदनाम झालेले आहेत.कार्यक्रमाच्या दिवशी तेथील विद्यार्थी व कर्मचारी आदीना भल्या पहाटेपासून हजर राहावे लागते.तो कार्यक्रम मात्र वेळेवर सुरू न होता पाहुण्यांच्या येण्याच्या वेळेनुसार सुरू होतो व त्यांच्याच इच्छेनुसार संपतो. आपण वेळ न पाळल्यामुळे आपण हजारो लोकांच्या वेळेचा अपव्यय करतो याची जाणीव अशा मंडळीना कधी होणार?

हां, पण अशा मंडळीना सरळ करणारे काही मोजके संयोजक असतात. त्यासंबंधीचा हा एक घडलेला किस्सा. सुमारे २० वर्षांपूर्वीचा. महाराष्ट्रातील एक नामवंत संस्था. तिचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम ठरला होता. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण होते. कार्यक्रमाचे सूत्रधार होते संस्थेतील एक कठोर शिस्तप्रिय गृहस्थ. कार्यक्रमाची वेळ होती सकाळी १० वाजता. हळूहळू सभागृह भरत होते. ९ वाजून ५० मिनिटांपर्यंत पाहुण्यांचा पत्ता नव्हता. ९.५५ ला सूत्रधारांनी घोषणा केली की सर्वानी शांत बसावे, कार्यक्रम बरोबर १० वाजता सुरू होईल. १० वाजले. पाहुण्यांचा पत्ता नव्हताच. तसेच काही निरोपही नाही. १० च्या ठोक्याला सूत्रधारांनी कार्यक्रम सुरू केला. त्यांच्यापुढे बोलण्याची संस्थेतील कोणाची हिम्मत नव्हती.
आता कार्यक्रम चालू झाला होता. सुमारे दीड तासाने बाहेर मुख्यमंत्री अवतरले. कार्यक्रम सुरू झाल्याचे त्याना कळले. त्यावर त्यांनी फक्त स्मित केले आणि त्याच क्षणी बाहेरच्या बाहेर निघून जाण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर संध्याकाळी त्यांनी संस्थाप्रमुखाना फोन करून दिलगिरी व्यक्त केली.तो कार्यक्रम यथासांग पार पडला, हे सांगणे नलगे. असे वक्तशीर सूत्रधार व त्यांचा आदर करणारे मुख्यमंत्री हा योग दुर्मिळच मानावा लागेल! अन्यथा पाहुणा जेवढा अधिक प्रसिद्ध आणि वलयांकित तेवढा तो जास्तच उशीर करणार असे एक विचित्र समीकरण रूढ झालेले आढळते.

आपण नाटक, चित्रपट, संगीताचे कार्यक्रम अशा करमणुकीच्या ठिकाणी तर पैसे मोजून जात असतो. तिथे यायची आपल्याला कुणी सक्ती केलेली नसते. तरीसुद्धा सर्व प्रेक्षक कार्यक्रमाच्या बरोबर वेळेवर तिथे हजर असतात का? बऱ्याच जणांना थोडे उशीरानेच अंधारात चाचपडत आत जाण्यात भूषण वाटते. त्यांच्या उशीरा आत येण्याने उपस्थित प्रेक्षक व कलाकार अशा सर्वांचाच रसभंग होतो हे त्यांच्या गावीही नसते. परदेशात कलाकारांच्या कुठल्याही मैफिलीत असे कोणीही करत नाही कारण तो कलाकारांचा अपमान समजला जातो.

निरनिराळ्या कारणांसाठी आपण सार्वजनिक वाहनांनी प्रवास करत असतो. त्यासाठी बस, रेल्वे आणि विमान ही साधने आपण वापरतो. या प्रवासांच्या बाबतीत वेळेचा काटेकोरपणा अजूनही समाधानकारक नाही, हे खेदाने म्हणावे लागते. आपले वाहन बरोबर ठरलेल्या वेळी निघाले व पोचलेसुद्धा तर स्वताला भाग्यवान समजायला हरकत नसावी. प्रवासाची वेळ पाळली न गेल्याने अनेक प्रवाशांचे काहीतरी नुकसान होत असते. पण, ही गोष्ट प्रवासी यंत्रणा पुरेशा गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. ‘’आपल्याला होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत’’ असे एक ध्वनिमुद्रित वाक्य वारंवार ऐकवले की त्यांचे काम झाले! जपानमध्ये अगदी एखाद्या मिनिटाचा जरी उशीर वाहन यंत्रणेकडून झाला तर प्रवाशांना चक्क आर्थिक नुकसानभरपाई दिली जाते, हे आपण फक्त वाचायचे अन सोडून द्यायचे. असो.

वेळ न पाळण्याच्या बाबतीत अग्रेसर असलेले अजून एक क्षेत्र म्हणजे आपली न्यायालये. ‘तारीख पडणे’ हा बदनाम वाक्प्रचार तेथूनच उगम पावला आहे. एखाद्या पक्षकाराला सुनावणीसाठी ठराविक तारीख व वेळ दिल्यानंतर त्यावेळेस प्रत्यक्ष काम होईलच असे बिलकूल नसते. तारखांवर तारखा पडत सुनावणी महिनोंमहिने लांबत जाते हा सार्वत्रिक अनुभव. याची कारणे काहीही असोत पण, नागरिकांच्या वेळेची किंमत नसणे हीच त्यामागची मनोवृत्ती.

तर सारांश हा की आपल्या नागरी जीवनात आपण कार्यालयीन, शैक्षणिक, व्यावसायिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा अनेक आघाड्यांवर वेळेबाबत दक्ष नसतो. एखाद्याने एखाद्या प्रसंगी वेळ न पाळण्याचे परिणाम हे त्या घटनेपुरते मर्यादित राहत नाहीत. हळूहळू सर्वांमध्ये ही वृत्ती मुरत जाते आणि मग तिचे सामूहिक परिणाम दिसू लागतात. एकदा का ‘चलता है’ ही सामाजिक मनोवृत्ती झाला की कार्यसंस्कृती झपाट्याने ढासळत जाते. अनेक मोठे सामाजिक प्रकल्प वेळेत पूर्ण न होण्यास त्यातील प्रत्येकाने आपापली वेळ न पाळण्याचा अवगुण कारणीभूत आहे.

आपले कुठलेही काम वेळच्यावेळी करण्यासंबंधी एक हिंदी दोहा प्रसिद्ध आहे. तो म्हणजे ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब...’. परंतु, आपण भारतीयांनी आपल्या वेळेबाबतच्या बेफिकीरीने पुढील दोहा प्रचारात आणला आहे:

आज करे सो कल कर, कल करे सो परसो
जल्दी जल्दी क्या पडी है, जब जिना है बरसों ‘

असे काही लिहिताना मला मनापासून खेद वाटतो. ‘जाऊ द्या, आपण असेच आहोत’ असे हताशपणे म्हणून हा विषय सोडून द्यावासा वाटत नाही. आपण सर्वांनी मनात आणले तर हे चित्र नक्की बदलू शकू. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरवात केली पाहिजे.
आजकाल आपल्याला प्रत्येक बाबतीत ‘स्मार्ट’ व्हायची घाई झाली आहे. पण, त्याआधी आपण वक्तशीर होण्याची नितांत गरज आहे.प्रत्येकाने वेळ पाळण्याचे बंधन स्वतःवर घातले तर कुणाचाच वेळ वाया जाणार नाही. त्यातून वाचवलेले कित्येक मनुष्यतास सत्कारणी लावता येतील. शिस्तबद्ध समाज घडविण्याच्या दृष्टीने टाकलेले ते एक महत्वाचे पाउल असेल.
***************************************************************

समाजविचार

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

28 Jun 2017 - 9:56 am | ज्योति अळवणी

खरय... सुरवात कोणीतरी केलीच पाहिजे. मी 99% वेळा वेळेत मीटिंगला किंवा कार्यालयात पोहोचणे याविषयी पक्की आहे. त्यामुळे अलीकडे माझ्या कार्यालयात वहिनीच्या वेळे प्रमाणे की इतरांच्या? असा प्रश्न मीटिंगचा निरोप मिळाला की विचारतात

धर्मराजमुटके's picture

28 Jun 2017 - 10:52 am | धर्मराजमुटके

लेख चांगला आहे. बाकीच्यांचे माहित नाही पण रेल्वेने प्रवास करणारा मुंबईकर वेळेच्या बाबतीत इतरांपेक्षा नक्कीच पक्का आहे. नाहीतर ७.२७, ८.१३, १०.५८ अशा विचित्र वेळा असलेल्या गाड्या तो कधी पकडू शकलाच नसता.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2017 - 2:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

वेळ पाळली नाही तर चटका बसेल अश्या सर्व जागी भारतीय कटाक्षाने पाळतात. उदा. रेल्वे/विमानाची वेळ (याबाब्तीत आमदार वगळा :) ), परिक्षेच्या पेपरची वेळ, इ. इतर ठिकाणी न चुकता उशीर करतात. एकंदरीत, फटका बसण्याची खात्रीच सर्वसामान्य भारतियाला सुधारू शकते ! :(

उपाशी बोका's picture

6 Jul 2017 - 8:27 am | उपाशी बोका

सहमत.

मुक्त विहारि's picture

6 Jul 2017 - 9:41 pm | मुक्त विहारि

....... अश्या सर्व जागी भारतीय कटाक्षाने पाळतात. "

+ १

कुमार१'s picture

28 Jun 2017 - 11:23 am | कुमार१

ज्योति व धर्मराज, आभार !
रेल्वेने प्रवास करणारा मुंबईकर वेळेच्या बाबतीत इतरांपेक्षा नक्कीच पक्का आहे. >>> +१००. आपण जसे मुंबईपासून राज्याच्या कोपर्‍याकडे दूर जाउ लागतो, तसे वेळ पाळण्याबाबतचा काटेकोरपणा कमी होत जातो !

प्रमोद देर्देकर's picture

28 Jun 2017 - 8:25 pm | प्रमोद देर्देकर

वेळेवर प्रतिसाद न दिल्याबद्दल क्षमा असावी.

रुपी's picture

28 Jun 2017 - 11:47 pm | रुपी

अगदी सहमत!
मला कधीही कुठे उशीरा जायला आवडत नाही. पण समारंभांना वेळेवर पोहचणे म्हणजे आपलाच मूर्खपणा वाटावा अशीच परिस्थिती असते बर्‍याचदा. एखादा समारंभ हॉटेल/ कार्यालयात असेल तर काही वेळा यजमानसुद्धा आमच्यापेक्षा कितीतरी उशीरा पोहचतात.

इथे अमेरिकेत बरेच अभारतीय लोक वेळेवर किंवा बर्‍याचदा वेळेच्या आधीच येतात हा अनुभव आहे. खास करुन घरात एखादे काम करुन घ्यायचे असेल तर काँट्रॅक्टर्स आधी पोहचून गाडीत थांबून राहतात आणि वेळ झाली की बेल वाजवतात.
पण काही भारतीय स्नेही अक्षरशः दीड-दोन ताससुद्धा उशिरा येतात आणि त्याबद्दल जराही खेद व्यक्त न करता उलट हसतात.

अर्थात काही समविचारी मैत्रिणीपण आहेत, ज्या अगदी वेळेच्या पक्क्या आहेत, त्यामुळे आपण अगदीच मूर्ख नाही म्हणून जरा बरे वाटते :)

प्रमोद व रुपी, आभार !
अर्थात काही समविचारी मैत्रिणीपण आहेत, ज्या अगदी वेळेच्या पक्क्या आहेत, त्यामुळे आपण अगदीच मूर्ख नाही म्हणून जरा ब रे वाटते>>> +१. असेच समविचारी वाढीस लागोत ही इच्छा !

फेरफटका's picture

6 Jul 2017 - 7:46 pm | फेरफटका

वेळ नाही पाळेली तरी चालेल, पण निदान दिलेल्या दिवशी तरी माणसं भेटावी अशी परिस्थिती घरगुती सेवा पुरवणार्या व्यावसायिकांची(?) आहे. ह्या कॅटेगरीमधे प्लंबर्स, इलेक्ट्रिशियन्स, घरगुती उपकरणे (मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, कंप्युटर ई.) दुरूस्त करणारे येतात.

आपल्या तत्वज्ञानात वेळ ही एक सलग संकल्पना असल्यामुळे हे होत असावं का? म्हणजे आज केलेल्या कर्माचं फळ, आज-उद्याच काय, पण पुढच्या जन्मात वगैरे पण मिळू शकतं.

लष्करात ध्वजवंदन रोज सकाळी ०८.०० वाजता होते. काही वेळेस विशेष व्यक्ती येणार असेल तरीही ध्वजवंदन "आठ म्हणजे आठ" लाच होते. एकदा एक जनरल साहेब ट्राफिक जॅम मध्ये अडकले तेंव्हा त्यांना पोहोचायला एक मिनिट उशीर झाला त्यावेळेस ध्वज स्तंभावर चढवला जात होता तेंव्हा त्यांना गेटवरच थांबायला लागले आणि ध्वज वर चढवून त्याला शस्त्रासहित वंदन झाल्यावर जनरल साहेबाना मैदानावर प्रवेश मिळाला.
अर्थात त्याबद्दल त्यांनी कोणतीही कुरकुर केली नाही आणि उशीर झाल्याबद्दल सर्वांची क्षमा हि मागितली.
दुर्दैवाने नागरी आयुष्यात आल्यावर कसोशीने वेळ पाळणारे कमीच. चार पाच वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी मी व्याख्यान देण्यास गेलो असताना वेळेच्या पाच मिनटे अगोदर पोहोचलो तर फक्त तेथील चार पदाधिकारी आणि दोन चार वरिष्ठ नागरिक हजर होते. लाजे काजेस्तोवर तेथील पदाधिकारी चहा मागवतात. मग तो पिऊन होइस्तोईवर पुढच्या अर्ध्या तासात हळू हळू चार टाळकी जमा होतात. आणि व्याख्यान सुरु झाल्यावरही लोक येतच असतात. यास्तव मी आजकाल कुठेही व्याख्यान देण्याचे टाळतो.
मी दवाखान्यात अपॉईन्टमेन्ट दिली तरी लोक ती पाळत नाहीत आणि उशिरा येऊन मलाच अगोदर तपासा म्हणून असून बसत. यामुळे मी अपॉईन्टमेन्ट देणेच बंद केले. मी माझ्या वेळेवर येतो आणि वेळ संपली कि दवाखाना बंद करतो. वेळ संपल्यावर फोन केल्यास आता दवाखाना बंद झाला असे सांगतो. आता लोकांना माहित आहे कि माझा दवाखाना साडे आठला बंद होतो. त्यामुळे बरेच लोक वेळेत येण्याचा प्रयत्न करतात.
पण दुर्दैवाने तसे सगळ्या वेळेस शक्य होत नाही. अंबरनाथहून येणारी गरोदर बाई आम्ही ठाण्याला पोहोचलो आहोत आणि १० मिनिटात येतोय म्हणून फोन केला तर तिला परत जा सांगणे शक्य नसते. अशा वेळेस अगतिकता येते.

कुमार१'s picture

6 Jul 2017 - 8:42 pm | कुमार१

फेरफटका, सहमत आहे.
सुबोध, तुमच्या अनुभवाशी सहमत आहे. त्यावरुन एक अवतरण आठवले - "वेळेवर जाण्याचा एक महत्वाचा तोटा म्हणजे , तुम्ही वेळेवर पोचल्याची दखल घ्यायला तिथे कुणीच हजर नसते !"