आजोळच्या आठवणींची सोनेरी पानं

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
26 Jun 2017 - 1:42 pm

सचिन काळे यांचा 'आठवणींच्या हिंदोळ्यावर' हा लेख आणि पुरवणी लेख वाचल्यानंतर नॉस्टॅल्जिक झाले. गिरगावातल्या आजोळच्या आठवणी मनात जाग्या झाल्या. त्या तुमच्याशी शेअर करते आहे.

आजोळच्या आठवणींची सोनेरी पानं

आपल्या सर्वांच्याच लहानपणच्या आजोळच्या अशा काही ना काही आठवणी असतात. मामाच्या गावाला झुकझुक गाडीतून जातानाच गाण तर आपण सर्वानीच लहानपणी अनेकदा म्हंटल असेल. माझ्या बाबतीत सांगायचं तर माझं आजोळ गिरगावातल आणि माझा जन्म उपनगरातला. त्यामुळे आम्ही खरच कायमच लोकलने चर्नीरोडला उतरून मग चालत  जायचो सिक्का नगरला. आजोळी  माझी आज्जी, आजोबा, दोन मामा आणि एक मामी असे सगळे राहायचे. आमची मावस भावंड बेंगलोरला राहात असल्याने फारशी येत नसत. माझे दोन्ही मामा माझ्या आईपेक्षा लहान. त्यामुळे मी तिसरी किंवा चौथीमध्ये असताना एका मामाच लग्न झाल आणि दुसऱ्याच तर मी दहावीत असताना. त्यामुळे देखील लहानपणी आजी, आजोबा आणि मामा लोकांकडून सगळे लाड फक्त आणि फक्त आमचेच झाले. 

माझी पहिली मामी आजही दिसासायलाअत्यंत सुंदर आहे आणि त्याहूनही सुंदर तिच मन आणि स्वभाव आहे. त्यावेळी तर ती म्हणजे परीच वाटायची मला. माझी पहिली मैत्रिण अस देखील म्हणता येईल. त्याकाळात म्हणजे साधारण १९८९-९० मध्ये ती पार्लरमध्ये जाऊन केस कापायची. ही घटना माझ्यासाठी खूप मोठी होती. तिचं ते perfect साडी नेसण आणि केसाला पिन्स लावण याच मी मन लावून निरीक्षण करायचे. ती कुठल्याश्या क्लासमध्ये काहीतरी शिकवायला जायची. घरून  निघताना आम्हाला सांगायची की अमुक एका वेळेला क्लास जवळ या दोघे. मग आम्ही शहाण्या मुलांसारखे तिथे जायचो. त्यानंतर आम्ही तिघे बस ने कधी hanging garden तर कधी चालत चौपाटी तर कधी गेट वे of इंडिया ला जायचो. तिथे मी आणि माझा भाऊ बऱ्यापैकी मस्ती करायचो. मग येताना भेळ, कुल्फी किंवा घराजवळ आलं की प्रकाश कडच पियुष आणि साबुदाणा वडा ठरलेलं असायचं. कधी कधी सिक्का नगरच्या जवळच्या मंदिरांमध्ये मामी मला न्यायची. फणस वाडीतल व्यंकटेश मंदिर तर मला आजही आठवत. ते मंदिर म्हणजे एखाद्या राजा सारख त्या परिसरात मिरवायचं. त्या मंदिरात संध्याकाळी प्रसाद म्हणून दही भात आणि भिसिबिली भात द्यायचे. अलीकडेच त्या मंदिराकडे जाण्याचा योग आला होता. पण आता तिथलं चित्र आगदी बदलून गेल आहे. कुठेतरी आत खोलात एक गरीब बिचारं दगडी मंदिर उभ आहे अस आता त्याच्याकडे बघताना वाटत होत. 

आजोळी असलं  की रोज सकाळी लवकर उठवून आजी आम्हाला फडके मंदिरात न्यायची. ती कलावती आईंची उपासना गेली कित्येक वर्षे करते. सुट्टीत ती आम्हाला देखील करायला लावायची. म्हणजे सकाळी मंदिरात जाऊन इतर मुलांबरोबर बसून बालोपासना म्हणायची. आजीच भजन वगैरे आटपेपर्यंत आम्ही मुलं मंदिराच्या आवारत किंवा मंदिराच्या व्हरांड्यात खेळायचो. आंता मात्र मंदिराचा व्हरांडा bars लावून बंद केला आहे आणि आवारात गाड्या लावलेल्या असतात. 

आम्ही घरी यायचो तोवर आण्णानी (माझे आजोबा) बेकरीतून मस्त ताजी गरम बटर आणलेली असायची. ही खास फर्माईश माझ्या भावाची असायची. मे महिना असेल तर बटर बरोबर आंबा चिरलेला असायचा. आजोळच आंबा पुराण हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. कारण आम्ही तिथे गेलो की दुसऱ्याच दिवशी आण्णा बाजारातून एक पेटी आंबे आणायचे. त्याकाळची ती पाच डझन आंबे असलेली लाकडी पेटी बघितली की आमचे डोळे चमकायचे. मग आजी आणि मामी मिळून त्याचे खिळे काढायच्या आणि घराच्या त्या प्रशस्त पुरुषभर उंचीच्या खिडकीत एका चादरीवर ते आंबे पसरायच्या. मग काय सकाळी आंबा, सकाळी आणि रात्री जेवताना आंबा! आम्ही सारखे आंबे खायचो. आज जेव्हा माझ्या मुलींच  चिमणी सारख खाण बघते त्यावेळी आमचं खाण आठवून हसायलाच येत. 

फडके मंदिराच्या समोरच आण्णांच सोन्याच्या दागिन्यांचं दुकान होत. दिवसभरात माझी आणि माझ्या भावाची एक तरी फेरी दुकानात असायची. पण त्याच कारण खास होत. बाजूलाच गिरगावातल प्रसिद्ध आवटेंच आईस्क्रीम च दुकान होत. आमच्या दुकानातल मागलं दार त्यांच्या किचनमध्ये उघडायचं. त्यामुळे आम्ही आवटे आईस्क्रीम आमचच असल्यासारखं हक्काने मागच्या दराने आत जाऊन हव ते आईस्क्रीम काढून घ्यायचो. त्याकाळात प्लास्टिकच्या बॉलमध्ये आईस्क्रीम भरलेलं असायचं. त्याच सर्वात जास्त आकर्षण असायचं आम्हाला. 

त्याकाळी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये साहित्य संघात बरीच बालनाट्य असायची. आण्णा आम्हाला त्यांच्या लुनावरून तिथे सोडायचे. बरोबर खाऊचा डबा दिलेला असायचा. नाटक संपलं की मी आणि माझा भाऊ गायवाडीमधून चालत घरी परत जात असू. त्याकाळातली नाटकं अजूनही मनात घर करून आहेत. सात बुटके नाटकात दिलीप प्रभावळकर चेटकीण होते. त्यांनी त्यांची एन्ट्री सभागृहातल्या एकदम मागच्या दारातून घेतली. मोठ्याने चित्र-विचित्र आवाज काढत ते धावात स्टेजच्या दिशेने गेले. सभागृहातल्या आम्हा सगळ्या मुलांच्या छातीत तेव्हा धडकी भरली होती ती चेटकीण बघून. अशी कितीतरी नाटकं आम्ही तिथे बघितली. 

त्या रम्य आठवणी आजही सुखावून जातात. शाळा संपली आणि कॉलेज सुरु झाल्यावर मात्र दर सुट्टीतलं गिरगावात जाण कमी झालं. आता तर तिथे इतके मोठे मोठे बदल झाले आहेत; की पूर्वीच गिरगाव त्यात हरवूनच गेलं आहे. आता आजोळी जाणं हे फक्त काही ना काही समारंभाच्या निमित्तानेच होतं. क्वचित कधीतरी मुद्दाम ठरवून माझ्या ८८ वर्षाच्या आजीला आणि अजूनही खुप सुंदर दिसणाऱ्या आणि खूप खूप प्रेमळ मामीला भेटायला जाते. तिथे गेल की जुन्या आठवणीमध्ये हरवून जाते. परत एकदा ते दिवस जगावेसे वाटतात.... आणि मनात येत...... जाने कहां गये वो दिन!!!

मांडणीलेख

प्रतिक्रिया

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

26 Jun 2017 - 5:09 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

मन हुरळुन गेले वाचतांना. माझे आजोळ खेडेगावातील व तेथली मजा वेगळीच. तुमचे लेखन वाचुन मन भुतकाळात थोडे हिंडुन आले. तसेच गिरगावाची, आम्ही कधी कल्पनाही न केलेली ओळख तुम्हि करुन दिलीत. धन्यवाद!

दशानन's picture

30 Jun 2017 - 5:57 pm | दशानन

असेच म्हणतो.

खुपच सुंदर लिहले आहे. जुन्या आठवणीना चांगला उजाळा मिळाला

ज्योति अळवणी's picture

26 Jun 2017 - 11:44 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2017 - 9:54 am | धर्मराजमुटके

आम्ही बरेच वर्ष साकीनाका भागात राहत होतो. मात्र माझ्या प्रॉपर मुंबईच्या आठवणी व्यवसायाशी निगडीत आहेत. आवडले लिखाण !

बोबो's picture

27 Jun 2017 - 3:12 pm | बोबो

छान लिहिलंय

खट्याळ पाटिल's picture

28 Jun 2017 - 2:33 pm | खट्याळ पाटिल

भारी लेख , खूप आवडला

विनिता००२'s picture

28 Jun 2017 - 5:16 pm | विनिता००२

भूतकाळात गेले मी पण!
मस्त आठवणी

सिरुसेरि's picture

30 Jun 2017 - 2:45 pm | सिरुसेरि

छान आठवणी . ---- सात बुटके नाटकात दिलीप प्रभावळकर चेटकीण होते. त्यांनी त्यांची एन्ट्री सभागृहातल्या एकदम मागच्या दारातून घेतली. मोठ्याने चित्र-विचित्र आवाज काढत ते धावात स्टेजच्या दिशेने गेले. सभागृहातल्या आम्हा सगळ्या मुलांच्या छातीत तेव्हा धडकी भरली होती ती चेटकीण बघून. ---
बहुदा हे नाटक रत्नाकर मतकरी यांचे "अलबत्त्या गलबत्त्य " असावे . त्यामधील दिलीप प्रभावळकर यांचा चेटकीण हा रोल खुप गाजला होता .

ज्योति अळवणी's picture

30 Jun 2017 - 7:30 pm | ज्योति अळवणी

सिरुसेरि

असेलही कदाचित अलबत्या गलबत्या नाटक. त्या वयात इतकी छान बाल नाट्य होती आणि माझ्या आजोबांना आम्ही ती सगळीच बघितली पाहिजेत असं वाटायचं की आम्ही सारखे साहित्य संघात पडलेले असायचो दुपारच्या वेळी. त्यामुळे आता त्या सगळ्या नाटकांची मनात सरमिसळ होऊन एक भेळच झाली आहे.

आजकाल ती रपुंझल आहे न तिचं नाटक पण आठवत मला. पण नाव नाही आठवत. त्यावेळी माझे केस देखील खूप लांब होते पण सोनेरी नव्हते. तर माझा भाऊ म्हणाला होता तुझे केस सोनेरी असते तर तुला पण चेटकिणीने नेले असते. त्यावेळी मी घाबरून खूप रडले होते; आता मात्र त्या आठवणींनी खूप हसायला येत.

मुक्त विहारि's picture

30 Jun 2017 - 5:42 pm | मुक्त विहारि

आवडला...

ज्योति अळवणी's picture

30 Jun 2017 - 7:32 pm | ज्योति अळवणी

आपणा सर्वांना लेख वाचल्यावर लहानपणच्या आठवणीत हरवल्यासारखं वाटलं हे वाचून खरच खूप बरं वाटलं. लेख लिहिण्याचं उद्दिष्ट सुफळ संपूर्ण!

एस's picture

30 Jun 2017 - 9:15 pm | एस

लेख आवडला.