"आरोग्यदायी" झटपट पराठे

रुपी's picture
रुपी in पाककृती
17 Jun 2017 - 3:58 am

p1

हे पराठे अगदीच झटपट नाश्ता/ ब्रंच/ लंच/ डिनरसाठी करता येतात. स्वयंपाक करायला फार वेळ, उत्साह नाहीये पण काहीतरी पौष्टीक तर खायचंय अशा वेळी मी माझे आणि इतर मंडळींचे पोट या पराठ्यांनी भरते. घरात असलेल्या कुठल्याही भाज्या वापरुन ते पटकन बनवता येतात. फक्त भिजवलेली कणीक असेल हे गृहीत धरुन!

इतर साहित्यः

१. पालक, कोबी, गाजर, शेपू यांपैकी एक किंवा एकापेक्षा जास्त भाज्या चालतील. जास्त असतील तर उत्तम! काहीच नसेल तर निदान कोथिंबीर तरी? तीही नसेल तर जरा अवघड आहे. जे काही घ्याल ते बारीक चिरुन/ किसून घ्या.

२. तीळाची, जवसाची, दाण्यांची यांपैकी एक किंवा जास्त चटण्या. एकही नसेल तर निदान मीठ, लाल तिखट/ बारीक चिरुन हिरवी मिरची.

३. जिरेपूड, मिरपूड, लिंबाचा रस, किसलेले चीज, कुस्करुन पनीर, बारीक चिअरलेला कांदा यांतले काहीही चवीत बदल म्हणून.

४. तेल/ तूप/ बटर.

कृती:

१. साहित्यातले १,२,३ मधले जे पदार्थ असतील/ आवडतील/ चालतील ते एका बाऊलमध्ये घेऊन हलक्या हाताने एकत्र करा. मिश्रणाला फार पाणी सुटायला नको.

२. पोळी/ पराठ्यासाठी घेतो तेवढा कणकेचा गोळा घ्या. पुरीएवढा लाटून, हवे असल्यास थोडेसे तूप लावून घ्या. त्यात वरचे मिश्रण घाला, सर्व बाजूंनी वर उचलून नीट बंद करुन घ्या. भाज्या बाहेर येणार नाहीत अश्या हलक्या हाताने पराठा लाटा. (थोडेफार बाहेर आले तर हरकत नाही).

ही पद्धत अवघड वाटत असेल तर नेहमीच्या पोळीसारखे लाटा. त्यावर मिश्रण पसरवा, आणि वरुन आणखी एक पोळी ठेवून कडा बंद करुन घ्या.

अजून शॉर्टकट हवा असेल तर एकच पोळी लाटा, अर्ध्या भागावर मिश्रण पसरवा आणि उरलेल्या अर्धा भाग त्यावर दुमडून पराठा बंद करा - अर्धवर्तुळाकार पराठा बनवा.

(पराठा लाटताना किंवा कडा बंद करताना पोळपाटाला पराठा चिकटणार नाही याची काळजी घ्या.)

३. तूप, तेल, बटर यातले जे आवडेल ते लावून भाजून घ्या.

दही, लोणचे, केचप, चटणी याबरोबर खायला द्या.

p

पहिल्यांदा बनवले तेव्हा मी भाजी बरीच कमी घातली होती, आता जम बसला आहे त्यामुळे भरपूर घालते. हे मिश्रण अगदी 'मागणी तसा पुरवठा' तत्त्वावर बनवता येत असल्यामुळे काहीच वाया जात नाही. शिवाय लहान मुलांसाठी कमी तिखट, चीज; मोठ्यांसाठी जास्त तिखट, चटणी असे बरेच बदल करता येतात. पोळीभाजी खायला कंटाळा करणार्‍या मुलांना किंवा कोबी, शेपू यांना नाके मुरडणार्‍या मोठ्यांना यातून भरपूर भाजी खाऊ घालता येते. शेपू घालणार असाल तर अजून १-२ भाज्या शक्यतो घालाच, नुसत्या शेपूचे पराठे बहुतेक फार लोकांना आवडणार नाहीत.

कुठल्याच भाज्या नसतील तर फक्त किसलेले चीज, बा.चि.हि.मि., मीठ, मिरपूड घालूनही पराठा बनवता येईल, पण तो तेवढा आरोग्यदायी नसेल... "आनंददायी" मात्र फार आहे!

प्रतिक्रिया

सविता००१'s picture

17 Jun 2017 - 6:50 am | सविता००१

मस्त......
मीही हे असेच प्रयोग करते.
चवीतले वेगवेगळे बदल खरोखर छान वाटतात. आणि तुमच्या कौशल्याला पुरेपूर वाव.
रूपी, खूप आवडलाय हा धागा.

वा! खरोखर आरोग्यदायी. माझ्या धाग्यात ह्या धाग्याची लिंक जोडतो.

मितान's picture

17 Jun 2017 - 6:50 pm | मितान

मस्त दिसताहेत पराठे !!!

छ्या, यह पराठा तो कुछ भी नही ;)

माझ्या प्रकारे पालक-मटर पराठा करून दाखवाच!

:P

पद्मावति's picture

18 Jun 2017 - 12:40 am | पद्मावति

वाह! क्लास.

संजय क्षीरसागर's picture

18 Jun 2017 - 9:22 am | संजय क्षीरसागर

बायकोला लिंक पाठवलीये !

मंजूताई's picture

18 Jun 2017 - 2:47 pm | मंजूताई

मस्त!

कलंत्री's picture

19 Jun 2017 - 3:02 pm | कलंत्री

जेवण झाले असतानाही तोंडाला पाणी सुटले.

प्रीत-मोहर's picture

19 Jun 2017 - 4:48 pm | प्रीत-मोहर

मस्स्त्स्त रेशिपी. कमी तेल वापरुन नक्कीच करण्यात येईल

रुपी's picture

20 Jun 2017 - 4:57 am | रुपी

सर्वांना धन्यवाद :)
@दशानन - नक्कीच.. हाताशी जरा वेळ असला तर ;)

नूतन सावंत's picture

20 Jun 2017 - 11:26 am | नूतन सावंत
नूतन सावंत's picture

20 Jun 2017 - 11:26 am | नूतन सावंत
नूतन सावंत's picture

20 Jun 2017 - 11:28 am | नूतन सावंत

अरे! प्रतिसद अर्धाच पडला,

सिरुसेरि's picture

20 Jun 2017 - 6:33 pm | सिरुसेरि

मस्त लेख . मस्त फोटो .

अजया's picture

1 Jul 2017 - 9:43 am | अजया

मस्त पाकृ. सध्या जे फ्रिजमध्ये सापडेल ते बनवणे मोड आॅन आहे. त्यामुळे अगदी वेळेवर मिळाली पाकृ!