३-१३ आणि १७६० .......

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
8 Jun 2017 - 3:00 pm

डिस्लेमर =====> खालील लेख हा निव्वळ टाईमपास म्हणून लिहिला आहे.

आमच्या एका गुरुंच्या कृपेने, आम्ही बर्‍याचदा (खासकरून शनिवारी रात्री) सुक्ष्मात जातो. गेली ३०-३२ वर्षे गुरु शोधण्याची खूप पराकाष्ठा केली. सुरुवातच फार दणक्यात झाली. आमच्या काकांच्या कृपेने घरात बाटलीबंद गुरु बरेच असायचे. काळ्या कपड्यातला चालणारा जॉनी, लाल कपड्यातला चालणारा जॉनी, पांढरा घोडा, सोनेरी गरूड हे त्यापैकीच. तसे हे सगळेच गुरु उत्तम पण हे रोज-रोज भेटायला आम्हाला भेटत नाहीत.असो.....

पुढे लंडन मधील पिल्सनर येथे राहणार्‍या गुरुंची ओळख झाली. (तसे सौम्य खंड्या किंवा ऑस्ट्रेलियातील फोस्टर पण बरे आहेत.आम्ही जहाल गुरुंच्या नादी लागत नाही.) आणि आम्ही त्यांचीच दिक्षा घेतली.तसे आमचे गुरु फारच सौम्य. पण त्यांच्या बरोबर २-३ जपमाळा ओढल्या की मात्र आम्ही सुक्ष्मात जातो.कधी चंद्रावर तर कधी मंगळावर स्वारी करता करता एक दिवस आम्ही अचानक "३-१३" नामक ग्रहावर पोहोचलो.

तर ही झाली आमची आणि ग्रह ३-१३ ह्यांची ओळख कशी झाली? ह्याबद्दल थोडी माहिती. (गरजूंना अधिक माहिती हवी असल्यास वेलकम टू डोंबोली.तसे आमचे गुरु सर्व ठिकाणी असतात पण .....पुणे शक्यतो नकोच....एन केन प्रकारेण धाग्यात पुणे आलेच.जावू दे असते एखाद्या शहराचे नशीब.)

=================

मुळामध्ये ग्रह ३-१३ हा फार विचित्र ग्रह आहे.तुम्ही जर आनंदी असाल तर तो पण आनंदी असतो आणि तुम्ही जर दू:खी असाल तर तो पण दू:खी असतो. थोडक्यात तुमच्या मूड प्रमाणे तो वागतो.

ह्या ग्रहाला ३ सुर्य आणि १३ चंद्र आहेत, म्हणूनच ह्याला ३-१३ ग्रह असे म्हणतात.आता एकाच वेळी आकाशात ३-३ सुर्य कसे काय? किंवा १३-१३ चंद्र कसे काय? किंवा १७६० उपग्रह कसे काय? हा प्रश्र्न पडला असेल तर तो मनांतच ठेवा.देवाची मर्जी, असे म्हणायचे आणि गप्प बसायचे.(शाळेत हेच शिकलो..... शंका विचारल्या की गप्प बसा.... ह्या शालेय शिकवणीचा लग्न झाले की फायदा होतो....विशेषतः बायको शिक्षिका असेल तर फार म्हणजे काय.......फारच) असो.....

इथे झाडे-झुडपे जास्त नाहीत.जे काही ते फक्त माती-दगड आणि धोंडे.पाण्याचे प्रमाण जास्त नसल्याने तहान लागलीच तर, ते प्राणी मातीचा आंबवलेला रस दगडाबरोबर किंवा दगडाच्या रेतीबरोबर घेतात.अर्थात मी तिथे फार जास्त वेळ रहात नसल्याने सुर्य उगवला (म्हणजे बायकोच्या भाषेत डोक्यावर आला की) मी परत इथे येतो.

थोडक्यात काय तर रोज माती खाणे आणि चैन म्हणजे दगड खाणे असे इथल्या प्राण्यांचे जीवन आहे.

इथे ३-१३-१७६० ही सुत्रावली आहे.म्हणजे ३ पंतप्रधान, १३ उप-पंतप्रधान आणि १७६० मंत्री. अर्थातच अफाट लोकसंख्या असल्याने हे असे होणे साहजिकच.पण इथले प्राणी तसे वेगळेच.तसे प्राण्यांचे विविध प्रकार असले तरी प्रत्येक प्राण्याच्या डोक्यावर १०-१२ शिंगे असतातच आणि भल्या मोठ्या शेतट्या. मी तर एका मु<गी सदृश्य प्राण्याला पण मैलभर लांब शेपटी आणि ४-५ मजली उंच शिंगे बघीतली आहेत.त्यामुळे इथल्या प्राण्यांमध्ये शहनशीलता फार असावी असे माझे मत.(अर्थात माझे मत असल्याने ते परखड आणि त्रिवार सत्यच असणार, यात निदान मिपाकरांना तरी शंका असणार नाही.)

इथे पण निवडणूका होतात.कारण, मी त्याच काळात तिथे जातो.आपल्याकडे ज्या वेळी निवडणूका असतात त्याच वेळी तिथे पण असतात. पण आपल्यासारखी पद्धत तिथे नाही.तिथे कोण किती माती खातो आणि कोण किती चैन करतो, ह्यावर मते देतात.त्या देशाच्या नेत्याने माझ्या समोर २-३ डोंगर माती हां हां म्हणता खाल्ली.ती रिचयायला ४-५ ट्रक खडी आणि २ टँकर भरून मातीची वाईन पण प्यायला.

तसे खात पित असतांना त्यांचे लक्ष इतरांकडेच जास्त, भला उसकी कमी़ज, मेरे कमीज़ से खराब क्यौं....असे बोंबलत खात असतात.कधी कधी ते त्यांच्या भाषेत बोलतात पण आजकाल हिंदी बर्‍या प्रमाणात आणि इंग्रजी जास्तच.

रस्त्यातुन जातांना त्यांची प्रार्थना स्थळे पण दिसतात. आपल्या कडे फक्त १ सूर्य आणि १ चंद्र असतांना आणि सगळेच मानव, एक रंग-रूप-उंची सोडले तर, समानच असतांना पण इथे धर्म आणि जात, तर तिकडे किती असतील?आणि ते यसेच आहे.डाव्या सुर्याची उपासना करणारा मधल्या आणि उजव्या सुर्याची उपासना करणार्‍याकडे जात नाही, असे ७व्या चंद्राची उपासना करणार्‍या अमिबाने मला सांगीतले.(तिथल्या भाषेत "अमिबाला" काय म्हणतात? ते मला माहीत नाही.पण त्या एक पेशीय प्राण्याला पण प्रत्येकी ४ फूटी शिगे, ती पण १०-१२ आणि २५०-३०० मीटर शेपटी होती.एक पेशीय प्राण्याला शिंगे आणि शेपटी कशी काय? हा प्रश्र्न नेहमीप्रमाणेच गैरलागू.... (मी सांगतोय तेच त्रिवार सत्य असणार, यात निदान मिपाकरांना तरी शंका असणार नाही.)

आता इतक्या विविध भाषिक आणि धार्मिक प्राण्यांची मोट बांधायची म्हणजे तिथल्या सरकारला किती त्रास होत असेल? असा मला पण प्रश्र्न पडला.पण मी लगेच इथे धागा न काढता, तिथल्याच सभेत गेलो.(आम्ही प्रसंग बाका की, मगच "मिपावर" मदत मागतो, हे सुज्ञांच्या लक्षांत आलेच असेल.काही "मिपाकरां" कडे सगळ्या प्रश्र्नांची उत्तरे असतात.हा भाग वेगळा.......)

त्यांच्या प्रथेप्रमाणे सभा वेळेवर सुरु झाली.आपल्याकडे एखाद्या राजकीय पक्षाची,त्या तारखेच्या पहाटे ४ची सभा,त्याच रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी तरी नक्कीच सुरु होतेच होते.वेळेवर सभा सुरु झाली तर वक्त्यांना रिकाम्या सतरंज्या आणि खुर्च्या बघायला मिळतात.मी तरी इथल्या राजकीय सभांना ४-५ तास उशीराच जातो.फुकटात करमणूक हो, दुसरे काय्?अरेरावी, माज, अहं ब्रह्मास्मी, दुसरा राजकीय पक्ष आमच्यापेक्षा तूच्छ कसा, हे कसे दाखवायचे? ह्याचा वस्तूपाठ मिळतो.असो....

तर त्यांची सभा मात्र २ दिवस उशीराच सुरु झाली.सगळे वक्ते, मान्यवर, नेते आले आणि आल्या आल्याच प्रगाढ झोपले.तिथल्या पंतप्रधानांचे मुख्य काम म्हणजे झोपा काढणे.तसा हा फार मोठा विनोदी कार्यक्रम असतो.मी गेलो त्यावेळी दगडांचा नक्की आकार काय असावा? ह्यावर चर्चा चालली होती.शरीराने मोठे असणारे प्राणी लहान दगडांच्या आकारामुळे त्रस्त होते.कारण काय? तर त्यांच्या बायका त्यांना मोजून-मापून खायला देत.४ म्हणजे ४च दगड वाढते हो माझी बायको.आणि ते पण मोहरी एव्हढे.....असे एक डायनॅसॉरच्या आकाराचा प्राणी टाळ्या वाजवत म्हणाला.तिथे दू:ख व्यक्त करायची ही एक पद्धत आहे.त्यामुळे घरोघरी टाळ्यांचे आवाज येत असतात आणि फारच दू:ख झाले की मग नाचतात.

तर द्विपेशीय प्राणी, म्हणाले की हे ४ मोहरी एव्हढे मोठे दगड पचवतांना आमच्या शेपटीला शिंगे फुटतात.(शेपटीला शिंगे फुटणे म्हणजे आपल्या भाषेत नाकी नऊ येणे.....फार अभ्यास केलाय हो मी त्या भाषेचा.)

जाता-जाता, तिथे नुसते द्विपेशीय प्राणीच नाही तर त्रिपेशीय, चार पेशीय काय म्हणाल त्या पेशीय प्राणी असतात.आता हे प्राणी आम्हाला दिसले कसे? हा प्रश्र्न गैरलागू...कारण लक्षांत आले असेलच.........आम्ही म्हणतो तेच सत्य.

असो,

सध्या इथेच थांबतो. बहूदा ह्या शनिवारी रात्री तिथल्याच एका मित्राकडे (तो चौपेशीय आहे) कट्टा करायला जाणार आहे. जमल्यास वृतांत टाकीन.आज वेळ आहे म्हणजे उद्या असेलच असे नाही.

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

अप्पा जोगळेकर's picture

8 Jun 2017 - 3:12 pm | अप्पा जोगळेकर

कं लिवलंय. मुविकाका रॉकिंग एकदम.

तुषार काळभोर's picture

8 Jun 2017 - 6:12 pm | तुषार काळभोर

;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jun 2017 - 6:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))
सूक्ष्मात जाऊन जड विश्वात मोठे मोठे चिमटे काढायला शिकवणार्‍या तुमच्या गुरुंना आमचा सादर प्रणाम कळवा ! ;)

एस's picture

8 Jun 2017 - 6:53 pm | एस

अफाट! घेत नसलो तरी तुमच्यासोबत एकदा बसेन म्हणतो. :-)

सोबत हवे तर मी देखील येतो ;)

अभिजीत अवलिया's picture

8 Jun 2017 - 6:58 pm | अभिजीत अवलिया

असा सूक्ष्मात जाण्याचा अनुभव एकदा मुविंबरोबर एकत्र घेऊन झालाय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jun 2017 - 11:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुविंचे गुरु सापडले !

दया, आमच्या नजरेतून सुटेल अशी एकपण गोष्ट नाही :D

(चित्रपट कायप्पावरून साभार)

पुंबा's picture

9 Jun 2017 - 10:07 am | पुंबा

व्हॉट लक..!!
:))
अवांतरः तुमच्याशी या विषयावर चर्चा करायचीये..