पाऊसवेड

अमलताश_'s picture
अमलताश_ in जनातलं, मनातलं
30 May 2017 - 12:45 pm

पाऊसवेड म्हणजे मज्जा असते. हे म्हणजे त्या गुलाबी का कसल्या थंडीसारखं नाही हं... काय तर, बाहेर जग धुक्याच्या रजईत आणि आपण आत लोकरीच्या!

पावसात खिडक्या उघडून ओली चिंब थंडी आत घ्यायची. चेहऱ्यावर ओला वारा झेलत बाहेरची गम्मत बघायची. बाहेर झाडं, घरं, रस्ते, गाड्या, सगळ्यावर पाणीच पाणी. आणि पाऊस ना, त्या सगळ्यांच्या कडा विरघळल्या सारख्या पुसट करून टाकतो. नीट नेटकं असं राहत नाही काही. आपला आकार विसरून गेल्यासारखी पानं, चिमण्या, झाडं, सगळेच!

थरथरणारे. खिडकीवरच्या थेंबात उलटे दिसणारे.
एकमेकात मिसळून जातायत कि काय असं वाटतं एक क्षण.

पावसाचं हे कडा आणि टोकं विरघळून टाकणं आवडतं मला.

सहज स्वाभाविकपणे मिसळायला लावणारा पाऊस... उगीच नाही रोमँटिक वाटत!

रेखाटनप्रकटन

प्रतिक्रिया

अहो मग 'अमलताश' ह्या आयडीऐवजी 'शिरीष' हा आयडी घ्यायचा ना! ;-)

सचिन काळे's picture

30 May 2017 - 4:38 pm | सचिन काळे

छोटूसं आणि गोड!

थरथरणारे. खिडकीवरच्या थेंबात उलटे दिसणारे.>>> खरंच! असे खिडकीवरचे थेंब पाहून कित्येक वर्षे लोटलीत. मी त्या थेंबांना बोटांनी सरकवून खाली पाडायचो.

मीसुद्धा लहानपणी तासंतास खिडकीतून पाऊस कोसळताना पहायचो. भुरभुरणारा, जाड थेंबाचा, आडवा तिडवा कोसळणारा, सरकत जाणाऱ्या धारांचा पाऊस. ते भिजलेले पंख फडफडवणारे कावळे आणि चिमण्या, रेनकोट टोप्या घालून पावसात चालणारी शाळेची मुलं, गाड्यांचे हलणारे वायपर, बाष्पाने धूसर झालेल्या खिडकीच्या काचा, काचेच्या बाष्पावर बोटांनी ओढलेल्या रेघोट्या, काडी मोडक्या छत्र्या, पावसात भिजलेल्या नोटा, फुटपाथच्या कडेने वाहणारा पाण्याचा जाड ओघळ, बागेतला निसरडा चिखल, ओली घसरगुंडी, पावसात खेळलेली आबादुबी, पहिल्या पावसात घसरून पडलेले सायकलीवरचे दूधवाले, डांबरी रस्त्यावर पाण्यात मिसळणारा किटलीतून सांडलेल्या दुधाचा ओघळ.

आणि अजून बरंच काही आठवले. माझा हरवलेला पाऊस तुमच्या ह्या लेखाने मला पुन्हा गवसला. धन्यवाद!!!!