प्रदूषण... (लघुकथा)

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
23 May 2017 - 2:58 pm

शहराच्या मधोमध बांधलेला तो फ्लायओव्हर रखडून रखडून शेवटी पूर्ण झाला. उदघाटन,कौतुकसोहळे पार पडले. मुख्यमंत्री स्वतः आले होते उदघाटनाला. काही विरोधकांनी पर्यावरणाच्या वगैरे घोषणा दिल्या मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना. विरोधकांच्या मते, या फ्लायओव्हरसाठी झाडं तोडण्यात आली, सिमेंटच्या अजस्त्र बांधकामामुळे शहराचं तापमान वाढू शकते, वाहतूक वाढल्यामुळे प्रदूषण होईल वगैरे वगैरे. ते काय नेहमीचंच असतं. मुख्यमंत्री स्वतः विरोधक असताना त्यांचंही मत काही वेगळं नव्हतं! पण एकदा सत्तेच्या सागवानी खुर्चीत बसल्यावर जंगलातील सागवानाविषयी आस्था तुटते ती कायमचीच! असो.

नुकत्याच शहरात आलेल्या सोनीला या सगळ्याशी काही देणंघेणं नव्हतं. तिचं जग वेगळंच होतं. मुळात तिचं जग पूर्णतः उध्वस्त झालं होतं. नापिकीने आई-बापाला अन सावकाराने जमिनीला खाल्ल्यावर गाव सोडण्याशिवाय तिच्यासमोर काही पर्याय नव्ह्ता. अखेरीस लहान बहिणीला घेऊन ती शहरात आली. जोडीला थोडेसे पैसे होते. पण राहणार कुठे अन खाणार काय हा प्रश्न समोर होता. एक-दोन दिवस कुठेतरी आडोश्याला थांबल्यावर तिसऱ्यादिवशी कुणीतरी तिथून हाकललं. सोनी तशी धीट होती. थोडीबहुत शिकलेलीसुद्धा होती. या शहरात राहायचं तर कामधंदा करावाच लागेल हे तिनं ठरवलं. आसपास फिरणाऱ्या फेरीवाल्यांसारखं तिनेसुद्धा छोटेमोठे खेळणे,टिकल्या,हेयरकलीप वगैरे विकायला सुरु केलं. जोडीला तिची धाकटी बहीण गाजरे विकायची. तात्पुरती राहण्याची सोय म्हणून सोनीने त्या फ्लायओव्हरच्या आडोश्याला बस्तान मांडलं. फ्लायओव्हर जिथून सुरु होतो तिथं माणूसभर उंचीची जागा होती. थोडीशी अडचणीची असली तरी पर्याय नव्हता. दिवसभर सामानाची विक्री केल्यावर त्या दोघी तिथेच आपली चूल मांडायच्या. हळूहळू कामातही त्यांचा जम बसत होता.

तिथे समोरच एक दुकान होतं. तो दुकानदार सोनीला भला माणूस वाटला. तिच्याजवळचं विक्रीचं सामान रात्री स्वतःच्या दुकानात ठेवायला तो आनंदाने तयार झाला. सोनीची ही चिंता मिटली पण आणखी एक मोठी चिंता तिला सतावत होती. रात्री दोघी बहिणी तिथेच फ्लायओव्हरखाली झोपायच्या. आता त्यांचं शरीर सोडलं तर लुटून नेण्यासारखं दुसरं काहीही नव्हतं. ‘गजरा’ विकत घेताना लोकांच्या ‘नजरा’ तिच्या चांगल्याच ओळखीच्या झाल्या होत्या.बाजूच्या रस्त्यावरून कितीतरी गाड्या जायच्या. रात्रीच्यावेळी एखादी जरी गाडी थांबली तर सोनी दचकून उठायची. गस्तीवरती पोलीस असायचे. पण सोनीला त्यांचीही भीती वाटायची. एका रात्री चुलीवर भाकऱ्या थापताना तिची लहान बहीण सोनीला म्हणाली,
"ताय..आपण इथं असं किती दिवस राहनार?"

"काऊन? काय झालं तुले असं विचारायले?"

"मले भेव लागते रात्री."

"कायचं भेव? म्या आहे ना?"

"आवं..रात्रीच्या या पुलावरून गाड्या जाते ना. कधी कधी वाटते हा पूल खाली पडला तर."

सोनीला थोडं हसू आलं. आणि स्वतःला वाटणारी भिती बहिणीला वाटत नाहीये हे पाहून ती थोडी निश्चिन्त झाली.

"काही होत नाही पुलाले? तू जेव गुपचाप."

"पण त्रास होते ना."

"कायचा त्रास?"

"आवं..इतक्या गाड्या जाते शेजारून धूर सोडत. नाकातोंडात जाते सगळा धूर. तू पण तं खोकलते रात्रीची."

"हाव..हे बरोबर हाय तुय...पन...."

"एखादं झाड पन नाही इथे. रात्रीची हवा पन मिळत नाही. नुसतं गरम असते सगळं."

"हे पाय..काही दिवस इथंच राहा लागन आपल्याले. अन आपण तं आत्ता आलो इथे. आपल्या आधी काय माणसं राहात नव्हते का शहरात?? शहरात प्रदूषण तर असणारंच ना थोडं."

सोनी हे बोलत असताना दोन पोलीस समोर येऊन उभे राह्यले.

"अये पोऱ्रींनो..चला निगा इथून. गव्हर्नमेंटची जागा हाय."

"साहेब..."

"काही साहेब गिहेब नाही. नुसता पसारा मांडला इथं.चला आवरा अन निगा."

"साहेब आम्ही कुठं जानार?"

"कुठंही जा पन इथून निगा."

"साहेब आम्ही इथं आडोश्याला राहतो. कोणाला त्रास देत नाही. राहू द्या ना आम्हाले."

पोलिसाने निर्दयीपणे समोरच्या चुलीला लाथ मारली. त्यावरचं भांड भेलकांडून पडलं.

"त्रास देत नाही म्हने. चुलखंड चालू असते इथं सतत. नुसता धूर सगळीकडे. साऱ्या गावात प्रदूषण करून ठेवते तुमच्यासारखे. चला निघा."

समाप्त

कथाअनुभव

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

23 May 2017 - 5:56 pm | ज्योति अळवणी

आवडली तरी कसं म्हणू? पण पंच चांगला आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 May 2017 - 7:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

"त्रास देत नाही म्हने. चुलखंड चालू असते इथं सतत. नुसता धूर सगळीकडे. साऱ्या गावात प्रदूषण करून ठेवते तुमच्यासारखे. चला निघा."

भिडलं भाउ. :(!

चौथा कोनाडा's picture

23 May 2017 - 10:15 pm | चौथा कोनाडा

सुंदर लघुकथा !

शेवटी, गरीबांचं चुलखंड हे प्रदुषण, अन सरकारी प्रदुषण म्हंजे विकास हेच खरं !

एस's picture

24 May 2017 - 12:52 pm | एस

+१

चिनार's picture

24 May 2017 - 9:40 am | चिनार

धन्यवाद !

अत्रे's picture

24 May 2017 - 10:13 am | अत्रे

मस्त कथा, आवडली.

यावरून आठवले - असेच लॉजिक होळीच्या वेळी जी लाकडे जाळतात त्याचे समर्थन करणारे वापरतात. की गाड्यांनी एवढे प्रदूषण होते - मग आमचे सण साजरे करताना थोडे प्रदूषण झाले तर काय बिघडले वगैरे वगैरे.

टवाळ कार्टा's picture

24 May 2017 - 12:09 pm | टवाळ कार्टा

आणि याचे समर्थन करणारे चांगले शिकले सावरलेले सुजाण वगैरे असलेले मिपाकरसुद्धा आहेत

गामा पैलवान's picture

24 May 2017 - 7:09 pm | गामा पैलवान

अत्रेबुवा,

का बरं हिंदूंच्या सणांवर घसरला आहात?

आ.न.,
-गा.पै.

अत्रे's picture

24 May 2017 - 7:37 pm | अत्रे

यावरून आठवले

गोष्ट वाचून होळीच्या वेळी फेसबुकवर वाचलेल्या कमेंट्स आठवल्या.

अद्द्या's picture

24 May 2017 - 12:30 pm | अद्द्या

छान कथा

विनिता००२'s picture

24 May 2017 - 2:12 pm | विनिता००२

आवडली

पैसा's picture

24 May 2017 - 2:34 pm | पैसा

कोणत्याही कारणाने रस्त्यावर रहाणे हा प्रकार पटत नसला तरी कथा आवडली.

पाटीलभाऊ's picture

24 May 2017 - 3:13 pm | पाटीलभाऊ

मस्त लघुकथा

हेमंत८२'s picture

24 May 2017 - 4:06 pm | हेमंत८२

खूप छान. पोलीस लोक अजून बरेच काही बोलतात. बाकीचे पण बरच असतात या लोकांना त्रास देणारे..

राघवेंद्र's picture

24 May 2017 - 10:09 pm | राघवेंद्र

कथा आवडली !!! पंच जबरदस्त...