शामभट्टाची "युरोप" वारी .. इटली, स्वीस, फ्रान्स लेखांक ३

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
19 May 2017 - 2:32 pm

दिवस तिसरा

कालचा दिवस " रोम" स्पेशल असे काहीही हाती काहीही लागले नाही म्हणून आजचा दिवस तरी पुरता कारणी लावायचा या निश्चयाने बाहेर पडलो. बाहेर गार हवा व थोडासा पाउस पडत होताच. आम्हाला सांता मारिया चर्च बघायचे आहे असे एकाला विचारले असता त्याने " आता येणार्‍या बस क्र २३ ने पिरॅमिड चौकात उतरा व तेथून ८ नंबर ट्राम ने मोरमाटा मार्गाने एम्पोरिओ चौकात उतरा तेथून जवळ त्रास्तवेर विभाग सुरू होतो." असे सांगितले.
.
पिरॅमिड चौक .
आम्हाला कालच त्या विभागात भटकायचे होते. टूर ऑपरेटर जे दाखवीत नाहीत ते आपण आवर्जून पहायचे असे मी ठरविले होतेच. आम्ही लवकरच एम्पोरिओ चौकात उतरून चौकशी केली तर "पूल ओलांडून पलिकडे जा त्रास्तवेर साठी " असे एकाने सांगितले तर तिकडे गेलो तर पुन्हा दुसर्‍याने सांगेतले नदीला समांतर असा रस्ता जातो त्याने चालत चालत जा . म्हणून पुन्हा पुलाच्या अलिकडे येण्यासाठी वळलो.
क्त दंड वसूली एवढेच करतात. " />
युरोपमधील स्वयंशिस्त. भारतात हे का जमत नाही - कारण एकच स्त्यावर ट्राफिक पोलिस फक्त दंड वसूली एवढेच करतात.
युरोपात व विशेषतः पुण्यात पब्लिक सेन्स मध्ये काय फरक आहे याचे पुराव्यासह दर्शन झाले. एकही माणूस आपले वाहन घेऊन झेब्रा पट्ट्यावर आला नव्हता व सर्व दुचाकी स्वार हेल्मेट घालूनच गाडी चालवीत होते. आम्ही ही मग हिरवा दिवा लागल्यावरच पादचारी झेब्रा ओलांडून पुन्हा नदी च्या अलिकडे आलो. व त्या समांतर रस्त्याने चालू लागलो. किती चालावे लागणार म्हणून काही कल्पना नव्हती. पण नेणारा फूटपाथ रम्य होता. नदीच्या कडेने जाणार्‍या मार्गावर रोममधे सर्वत्र नदीला समांतर अशी झाडे लावलेली दिसतात. टायबर नदीच्या मध्यातच एक बेट आहे त्यावर एक सुंदर इमारत ही बांधलेली आहे. रस्त्याची दुसर्‍या बाजूला एक टेकडी आहे. रोम हे सात टेकड्यानी बनलेले गाव आहे. आम्ही जात असलेला रस्ता लुन्गेतेन्वेर अवन्तिनो होता व ती टेकडी अवन्तिनो अशी माहिती सकाळी आपले कुत्रे बरोबर घेऊन वॉक ला निघालेल्या एक॑ रोमन बाईने आम्हाला दिली. व सन्ता मारिया चर्च साठी कोणत्या पुलाने पलिकडे जायचे हे ही सांगितले. त्या पुला पर्यंत जाउन आम्ही बेटाच्या मध्यावर आलो. च तिथून पुन्हा त्याच नदीला समांतर असा पलिकडे रस्ता होता .ही आमची चाल जवळ जवळ दोन कि मी झाली. त्यात पाउण तास गेला व दु: खाची गोष्ट अशी ही ज्या ८ नंबरच्या ट्राम ने आम्ही एम्पोरिओ चौकात येऊन ती ट्राम सोडली त्याच ट्रामने थेट सांता मारिया जवळ जाता येत होते पण पॅरिस प्रमाणे इथे रोमचे बस अ‍ॅप नसल्याने पायपीट व पाउण तासाचा गैर वापर होऊन गेला.

जाता जाता मी , अभ्या, स्पावडू , चित्रगुप्त , बबन तांबे, प्रीत मोहर . संदीप डांगे ई ना खास आवडेल असे दृश्य दिसले एक बाई. त्या बेटावरील पूल त्यापलिकडे दिसणार्‍या इमारती व राखाडी आकाश यांचे एक लॅन्डस्केप तयार करताना तन्मय झालेली दिसली. मला असे चित्रकार चित्र तयार करताना पहायला फार आवडते. असा आनंद कधी कधी जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेरही अनुभवायला मिळतो. तिला सॅल्यूट करून आम्ही पुढे गन्तव्याकडे सरकलो.सन्ता मारिया चर्चला जो बोळकांडीवजा रस्ता जातो त्याच्या सुरवातीलाच एक बांगला देशी माणसाचे दुकान आहे. त्याने मात्र आस्थेने मार्ग सांगितला. जाता जाता दगडी फरसबंद गल्ली, मधेच बाहेर खुर्च्या टाकून केलीली उपहागृहे दिसत होती. जमेल तिथे फुलांचे गुच्छ् ठेवणे हा एक धर्मच युरोपात मानला जातो. त्या धर्माचे पालन रोम पासून जे सुरू होते. ते अखंड पणे पहावयास मिळते.
.
सान्ता मारिया चर्च - आतून
आम्ही सांन्ता मारिया चर्चच्या पुढील प्रांगणात आलो. तिथे एक बर्‍यापैकी सुरेख कारंजे आहे. चर्चच्या दर्शनी भागाची काही दुरूस्ती चालली होती. त्यासाठी तो भाग मोठा पडद्याने झाकण्यात आलेला होता. चर्च बाहेरच्या भागात संगमरवरात कोरलेले काही शिलालेख भिंतीवर बस॑विले आहेत. आत गेलो. तर चर्च बरे म्हणावे असे होते. बाजूचे ग्रनाईटचे खांब जवळ जवळ ५ ते सहा फूट व्यासाचे होते.

चर्च पाहून झाल्यावर एक न उघडलेल्या उपहारगृहाच्या दगडी पायरीवर बसलो. कालचे काही वडे वगैरे शिल्ल्कक होते. त्याच बरोबर फलाहार केला व जवळच असलेल्या सर्वजनिक नळाचे स्वच्छ चविष्ट व थंडगार पाणी पिऊन आता त्रास्त्वेर भागातील टेकडी चढण्यासाठी काही पायपीट करून जिना चढू लागलो. वर गेलो तर पूर्ण निराशा झाली. गवत वाढलेला एक चौक होता. आम्हाला येताना काही प्रवासी जिन्यात दिसले होते. त्या अर्थी इथे काहीतरी पहाण्यासारखे नक्की असावे असा पत्नीला धीर देत मी मार्ग क्रमू लागलो.
.
गियानिकोलो टेक्डीवरील कारंजे /धबधबा

.

टेकडी वरून रोमचे विहंगम

या टेकडीवररून रोमचे विहंगम द्रुश्य दिसते असे आमच्या होस्ट ने सांगितले होते म्हणून तर मी इथे आलो होतो. एवढ्यात एक सुंदर भिंतवजा कमान दिसली. ती मधे तीन धबधबे तीन चौकटीतून खाली पुष्कर्णीत पडत होते. निळेशार पाणी डोळ्याना सुखावीत होते. समोर एक कट्टा होता त्यावर बसून काही प्रवासी रोमचे विहंगम दृष्याचा आस्वाद घेत होते. या टेकडीचे नामकरण "टेराझ्झा डेल गियानिकोलो " असे होते. बाकी इथे काही नेत्रदीपक वगरे काही नसल्याने टेक्डी वरून खाली नेणार्‍या बसची वाट पाहत राहिलो तर पाउण तास बसचा पत्ताच नाही. शेवटी कंटाळून खाली चालत चालत आलो. पाय जाम दुखत होते. एका ठिकाणी बसची नीट माहिती नसल्याने दोन किमी फुकटच चालावे लागले व आता ही बस येईना सबब पुन्हा पायपीट. मग इथे येणार्‍या ८ क्रमांकावर " "पिआझ्झा व्हेनेझिया " ही पाटी पाहिली व आता रोम मधे आत घुसल्याशिवाय गत्यंतर नाही असे वाटून त्या ट्रामने रवाना झालो.
.
रोममधील एक प्रमुख स्मारक विक्टर इमॅन्यल राजाचे .

बस "विक्टर इमॅनुअल " च्या स्मारका समोर उभी राहिली. आता आपण खरे रोम मधे आलो असे प्रथमच वाटले. रस्ता ओलांडून स्मारकाच्या पायथ्याशी गेलो. आत प्रवेशासाठी काही तिकिट आहे का अशी चौकशी केली असता आत सोडण्यात आले. बहुदा तिकीट नसावे. हे स्मारक म्हणजे प्राचीन रोमन साम्राज्याचा काही भाग वगैरे नाही. पण ते भव्य असून टाईपरायटर सारखे दिसते व पूर्ण सफेद रंगाचे आहे.

मला एक नंबरचा तातडीचा कॉल आल्याने पोलिसाला " टॉयलेट" कुठे आहे ?" असे विचारले तर " बार" असे त्याने उत्तर दिले. ही मात्र युरोप मधील एक अडचणीची गोष्ट आहे . या बाबत आमची पिंपरी चिंचवड ची महापालिका फारच प्रगत आहे. आमच्या येथे कुणाची " पंचाईत" होण्याची शक्यता कमी. युरोपमधे या कामासाठी रेल्वे चा वापर विनामुल्य व परिणाम कारक रित्या करता येतो कारण रेल्वेतील या लहानशा रूम्स " चक्क सुगंधी" असतात . आता काय करायचे असा प्रश्न पडला मग थेट मेट्रोने रूम गाठायची व पुन्हा जरा रूमवर खाना उरकून थोड्या वेळाने पुन्हा रोमवारी साठी बाहेर पडायचा बेत केला. त्यासाठी जवळचे मेट्रो स्थानक " कोलोस्सो " म्हणजे कलोसियम हे होते. पिआझ्झा व्हिनिझिया च्या चौकातून एक रस्ता कलोसियम कडे जातो या रस्त्यास "इम्पिरियल रस्ता" असे नांव आहे.
.
भल्या बुर्‍या इतिहासाचा साक्षीदार " इम्पीरिअल रस्ता " रोम

.
आर्च ऑफ कोन्स्टन्टाईन व कलोसियम रोम

हा अर्ध्या किमी चा असेल पण त्याने फार मोठा इतिहास पाहिला आहे. एका बाजूला उंच विटकाम असलेली वास्तू तर दुसर्‍या बाजूस प्राचीन रोम फोरमचे अवशेष आपल्याला खुणावीत असतात. ते पडके बांधकाम ही मूळ वास्तूवैभवाची साक्ष देण्यास पुरेसे आहे. रोम फोरमच्या बाजूस एक माणूस डबल बेस ( ओ पी नय्यर चा फॅन असल्याने ) माझे आवडते वाद्य आहे, ते वाजवीत लोकांचे मनोरंजन करीत पैसे कमावीत होता. समोर भव्य या एकाच शब्दात वर्णावे असे रोमन कलोसियम दिसत होते. तीच चार मजली असलेले हे प्राचीन स्टेडियम आहे. ते मूळतः दगडात बांधले असले तरी काही भाग आता विटानी " रिस्टोअर" करण्यात आला आहे . लंडनचा जसा टॉवर ब्रीज, पॅरिसचा जसा आयफेल टॉवर तशी रोमची ओळख म्हणजे कलोसियम.पूर्वी येथे शर्यती, तलवार बाजी , कुस्त्या यासाठी वापर होत असे. ज्यानी ग्लॅडिएटर हा सिनेमा पाहिला असेल त्याना याची थोडीफार कल्पना असेलच. तासन तास रमावे असा हा भाग आहे. तो फक्त ओरिएटेशन टूर मधे पहात पुढे जाणे अन्यायाचे आहे.
कलोस्सो मेट्रो मधे शिरून सातेक मिनिटात आमच्या रेल्वे स्थानकावर पोहोचलो. रूमवर गेल्यानंतर सर्व उरकले व पुन्हा बाहेर पडण्यास मेट्रो स्थानक गाठले.
रोमची मेट्रो सिस्टम एकदम साधी आहे. एकमेकात क्रॉस असलेली. त्यातील टर्मिनी या स्थानकावर एका लाईन वरून दुसर्‍या लाईनवर जाण्याचा जोड आहे.
.

.
फोन्टाना डेल नय्यडी

.
पिआझ्झा रिपब्लिका
आमच्या रेलेवे स्थानकापासून टरमिनी पर्यंत जात दुसरी मेट्री लाईन पकडली व पाचच मिनिटात पिआझ्झा डेल रिपब्लिका या भव्य चौकात अवतरलो. खरे तर उद्धतरलो कारण मेट्रो स्टेशन जमीनीखाली आहे. या चौकात मधोमधे एक सुरेख कारंजे आहे. त्याचे नाव " फोन्टाना डेल नैयाडी" . चार कोपर्‍यात चार आकर्षक शिल्पे असलेले ते कारंजे. चौकात अर्ध वर्तुळाकार प्रासाद एका बाजूस॑ तर दुसर्या बाजूस सान्ता मारिया चर्च . या चौकातून रोम मधील एक महत्वाचा रस्ता 'विया नॅशनल" सुरू होतो. इ स १८७० मधे हे कारंजे तयार करण्यात आले. १९०१ मधे मूळ सिंहाच्या आकृति बदलून चारी बाजूस आता दिसतात त्या जलकन्या बसविण्यात आल्या. रात्रीच्या वेळी हा चौक फार सुरेख दिसतो
.
फोन्टाना ट्रिटोन
. हे पाहून पुन्हा मेट्रो गाठली व पुढच्याच चौकाचे दर्शन घेण्यासाठी " बार्बेरिनी" या स्थानावर उतरलो. चौकाचे नाव " पिआझ्झा बार्बेरिनी" चौकात एक मस्त कारंजे आहे. त्याचे नांव "फोन्टाना देल त्रिटोन.असे असून १६४२ च्या सुमारास ते इटालियनशिल्पकार बर्निनी याने तयार करण्यास सुरूवात केली. माशांवर स्वार झालेला बलदंङ ग्रीक देव ट्रिटोन हा या शिल्पाचा नायक.
.
जगप्रसिद्ध " त्रेवी" कारंजे रोम.

मग नकाशा काढून त्रेवि फऊंटन कुठे असावे याचा अंदाज आला. दहा मिनिटे विया नॅशनल चालल्यावर डाव्या बाजूला एक तिरका रस्ता जातो त्यात शिरलो . विरूद्ध बाजूने प्रवासी येताना दिसत होते त्यामुळे आपण बरोबर चाललो आहोत याची खात्री पटत होती. खरे तर हे ठिकाण त्याच्या बहारदार शिल्पकृतिमुळे सर्व जगतात प्रसिद्ध आहे. तिथे पैसा टाकला की रोमला परत यायला होते अशा समजुतीने नितळ निळ्या पाण्याखाली सुट्टे पैसे विसावलेले दिसतात. एका इमारतीचा दर्शनी भाग असे या कारंजाचे रूप आहे . ते अगदी जवळ जाईपर्यन्त कुणालाही दिसत नाही. आजूबाजूचे रस्ते अरूंद .सबब सीजन मधे या ठिकाणी प्रचंड गर्दी होऊन खिसे कापू व चोरटे यांचेच नंदनवन असे स्वरूप या चौकाला प्राप्त होते. १६१ फूट लांब व ८३ फूट उंच असलेले हे शिल्प निकोला सल्वी याने करावयास घेतले व ते पिएट्रो ब्राक्की याने पूर्णत्वास नेले. हे कारंजे १९९८ मधे दुरूस्त केले गेले. त्याचे फिनिशिंग अत्यंत कुशल कारागिरांकडून करून घेतल्याचे आपल्या द्रूष्टीस पडते. पार्श्व भूमीवर मधोमध एक अर्धगोलाकृति घुमट असून बाजूला कॉरिन्थियन शैलीतील स्तम्भ आहेत. शिल्पात एक पुरूष एक सहा सात घोडे ओढणारा रथ असा सामावेश आहे.

इथे गर्दीत बायकोच्या दोन वर्ग मैर्त्रीणी भेटल्या . त्या वीणा वर्ल्ड बरोबर आलेल्या होत्या . जग किती लहान होत आहे याचा प्रत्यय आला.
.
" पॅन्थिऑन" चा दर्शनी भाग याच्या प्रांगणाला "पिआझ्झ अझ्झ डेला रोटंडा " असे नाव आहे. इथेही एक कारण्जे रोमच्या शिरस्त्यानुसार आहेच.
.
पॅन्थिऑन चा अंतर्भाग वरच्या डोमच्या व्यास ४३ मीटर तर वर्टुळाकार गवाक्षाचा व्यास ९ मीटर आहे. आत सर्वत्र बहुविध रंगाचा इटालिअन मार्बल व ग्रानाईट चा मुबलक वापर केलाय.

" त्रेवी " च्याच प्रांगणातील एका कोपर्‍यातून पुढचे पर्यटन स्थळ पहायला रस्ता जातो ते म्हण्जे " पॅन्थीऑन " .वर घुमटाचे छत त्यात एक गोलाकार खिडकी अगदी मधोमध . अशा रचनेत दर्शनी भागात टिपिकल रोमन पोर्टिको आयताकार . वर समद्विभूज त्रिकोणी आकाराचे पेडिमेन्ट असून त्याला : कॉरिन्थिअन शैलीचे १६ खांबांचा आधार आहे. हे सर्व खांब इजिप्त हून आणलेल्या ग्रानाईट चे आहेत. अधिक माहिती https://en.wikiarquitectura.com/building/pantheon/ या पानावर मिळेल.
.
पिआझा नवोना मधील एक कारंजे . पलिकडे उंच स्तंभ असलेले एक कारंजे आहेत त्यात पवित्र "गंगा " माई नदीच्या प्रतिकाचा समावेश आहे. भारत व इटली यांचा ऋणानुबंध स्कूटर रिक्षा यांच्या उल्पादना पेक्षाही जुना आहे.

हे देऊळ पाहून झाल्यावर मग जवळच असलेल्या "पिआझ्झा नवोना " या आयताकार प्रांगणात आम्ही येउन पोहोचलो.
या ठिकाणी एकूण तीन कारंजी असून ती खरेच पाहाण्यालायक आहेत. आम्ही अशी आशा करीत होतो की येथे सायंसमयी दिवे लागतील व ही कारंजी प्रकाशात न्हाऊन निघतील व अधिक शोभा पहावयास मिळेल म्हणून एका पायरीवर बसून जवळचे काही पदार्थ खात टाईम पास करू लागलो पण दिवे चालू व्हायचे काही लक्षण दिसेना. सूर्यास्त उशीरा म्हणजे साडे आठला होत असल्याने असे असेल. तेथील एक दुकानदाराकडे चौकशी केली असता दिवे लागले तरी ते फारसा प्रकाश टाकत नाहीत असे त्याने सांगितले . मग आपण आजच्या दिवसाची भ्रमंती संपून रूम वर जावे असा विचार केला. व बस थांबा शोधू लागलो. जरा पायपीट केल्यावर तो मिळालाही. पण बसमधे बसल्यानंतर मधेच कुठेतरी उतरून आपल्या गन्त्वव्या॑ पर्यंत पहोचू असा कयास चुकीचा ठरला बराच वेळ बस अतिशय अपरिचित भागातून भटकत होती.

या बसला काही अंत आहे की नाही असे मनात आल्याने मधेच एका ठिकाणी उतरलो . रात्रीचे नउ तरी वाजले असतील. बस स्टॉप वर लावलेली माहिती पाहिली. टिबुरर्टिना रेलेवे स्थानकाकडे नेणारी बस येऊ घालली होती. ( युरोपात सर्वत्र पुढची बस आता किती मिनिटात अपेक्षित आहे याची माहिती डिसप्ले वर मिळत असते ) . बस आली ,आता जीव भांड्यात पडला. आता आमचा दिवसाचा पास वापरून आम्ही रूमवर अचूकपणे पोहोचू शकणार या भावनेने हायसे वाटले. आजचा दिवस अगदीच भाकड ठरलेला नव्हता याचे समाधान मनाशी घोळत झोपी गेलो.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

19 May 2017 - 6:21 pm | कंजूस

फार सुंदर!

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 May 2017 - 10:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त चालली आहे सफर ! विशेषतः तुमच्या सुंदर शैलीत 'जसे घडले तसे' वर्णन वाचण्यास मजा येत आहे.

पुभाप्र.

अत्रुप्त आत्मा's picture

20 May 2017 - 7:12 am | अत्रुप्त आत्मा

+१...

मससससस्त... :)

यशोधरा's picture

19 May 2017 - 10:48 pm | यशोधरा

वाचते आहे..

प्रचेतस's picture

20 May 2017 - 9:01 am | प्रचेतस

धमाल सफर चालू आहे काका. पायपीटीमुळे चौराकाकूंची बोलणी तुम्हाला खावी लागली असतील ह्याची खातरी आहेच.
पुढचा भाग लवकर येउ द्यात.

बबन ताम्बे's picture

20 May 2017 - 10:29 am | बबन ताम्बे

वर्णन खासच ! पुढील भागाच्या प्रतीक्षेत .

अभ्या..'s picture

20 May 2017 - 11:29 am | अभ्या..

मस्त ट्रिप चालुय काका,
मिपाकरांच्या आठवणी तिथेहि पाठ सोडत नाहीत ना.
स्कूटर्स मस्त आहेत तिथल्या. ऐस्पेस सीटाच्या.

चौकटराजा's picture

20 May 2017 - 12:07 pm | चौकटराजा

आपल्याकडे मोटरसायकल ला जो शेप रूढ झालेला आहे तशी त्यांच्याकडे मोटरसायकल दिसतच नाही. ती बरीचशी आताच्या भारतातील नॉन गिअरर्ड स्कूटर सारखी दिसते. जिनीव्हा ला आल्यावर एका बी एम ड्ब्लू कंपनीच्या स्कूटरचा फोटो टाकेन. बाहेरून इन्जिन दिसले तर पदमिनी अल्लाउदीन दिसली असे त्याना वाटत असेल काय ?

पैसा's picture

20 May 2017 - 11:33 am | पैसा

निवांत सफर चालू आहे!

चित्रगुप्त's picture

20 May 2017 - 11:47 am | चित्रगुप्त

झकास प्रवासवर्णन.
पँथेऑन मधे लिओनार्दो चा समकालीन सुप्रसिद्ध चित्रकार रॅफेल (1483 –1520) याचे थडगे आहे: बाजूच्या अंडाकार कोनाड्यात त्याचे व्यकिचित्रही आहे.
...

चौथा कोनाडा's picture

29 May 2017 - 9:01 pm | चौथा कोनाडा

झक्कास् !
फोटो अन वृतांत दोन्ही, खास चौरा इस्टाईल !

दिग्गज मिपाकरांचा उल्लेख वाचून छान वाटले !