"स्वयंसेवक है" - अनिल माधव दवेंची एक आठवण.

Primary tabs

जीएस's picture
जीएस in जनातलं, मनातलं
18 May 2017 - 7:07 pm

दोन हजार सहा सालची गोष्ट आहे. माझा एका उद्योगसमूहाच्या बायोडिझेल प्रकल्पाशी संबंध आला. अखाद्यतेलावर प्रक्रिया करून बायोडिझेलची निर्मिती असे प्रकल्पाचे स्वरूप होते. साहजिकच असे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर करंज तेलासारख्या अखाद्य तेलांची खरेदी करू शकतात. यातूनच एक योजना सुचली होती की वनवासींना पडीक वनजमिनीवर जर करंज लागवड करायला मदत केली तर एका एकरात एका कुटुंबाला २४००० रुपये एवढे शाश्वत उत्पन्न मिळू शकेल.

सुरुवातीला पाच हजार एकर जमीन व पाच हजार वनवासी परिवार असा एक पथदर्शी प्रकल्प राबवता येईल अशी कल्पना होती. कुठल्यातरी राज्य सरकारच्या मदतीनेच हे होणे शक्य होते. मला श्री. अनिल दवेंची आठवण झाली. दर वर्षी थिंकर्स मीट मध्ये त्यांची भेट होत असे, रात्र रात्र चर्चा रंगत आणि त्यातूनच त्यांच्या अभ्यासू आणि प्रभावी व्यक्तीमत्वाची माझ्यावर चांगलीच छाप पडली होती. ते तेंव्हा मध्यप्रदेश भाजपचे संघटनमंत्री होते आणि शिवराजजी नुकतेच मुख्यमंत्री झाले होते.

अनिलजींना फोन केला, कामाचे स्वरूप सांगितले, "भोपाळला ये" मग बोलू म्हणाले. सरकारदरबारी कुठलेही काम घेऊन जाण्याची माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे थोडा साशंक होतोच. पण भोपाळला पोहोचलो.

अनिलजी स्वतः घ्यायला आले होते. आपल्या मिटिंगला थोडा वेळ आहे तोपर्यंत एक दोन भेटी करून घेऊ म्हणत आम्ही भोपाळमध्ये तीन चार ठिकाणी गेलो. त्यांच्या कामाचा आवाका व झपाटा बघून मी थक्कच झालो. नर्मदा संवर्धनापासून ते कुठेतरी बंद पडलेला मोठा कारखाना कामगारांच्या मालकीने पुन्हा सुरू करण्यापर्यंत असंख्य विषय ते हाताळत होते.

अखेर दुपारी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचलो. मुख्यमंत्र्यांचे सचिव वगैरे होतेच. मी थोडक्यात प्रकल्प सादर केला. प्रकल्प समजावून घेण्याच्या दृष्टीने काही प्रश्नोत्तरे झाल्यावर सचिवांनी एकदम उलट्तपासणीच्या थाटात प्रश्नांही फैर झाडली.
सचिव: ही पाच हजार एकर जमीन तुम्हाला द्यायची आहे का ?
मी: नाही, वनवासींना.
सचिव: रोपांसाठी तुम्हाला अनुदान द्यायचे का ?
मी: नाही, वनवासी कुटुंबाला.
सचिव : पण मग रोपे तुमच्याकडून घ्यायची का ?
मी: नाही, त्यांनी स्वतःच तयार करायची, मोफत मार्गदर्शन पुरवू.
सचिव : मग बिया तुमच्याकडून घ्यायच्या का ?
मी: नाही, बाजारातून.
सचिव: त्यांचे उत्पादन तुम्ही आता म्हटलेल्या किमतीलाच तुम्हाला विकावे लागणर ?
मी: नाही, हा हमीभाव आहे, बाजारभाव जास्त असेल तर त्या भावाने.
सचिव: पण तुम्हालाच विकावे लागणार?
मी: नाही, आम्ही घेण्याची हमी देत आहोत. पण ते हवे तर विकू कोणालाही शकतात.

सचिव : (शेवटी ते मनातले अखेर बोललेच) तो आपका इसमे फायदा क्या है ? व्हाय आर यू डुईंग धिस ?
मी काही बोलण्याआधीच अनिलजींनी मला हात करून थांबवले, आणि सचिवांना म्हणाले, "स्वयंसेवक है"
पुढच्या क्षणी मुख्यमंत्री सचिवांना म्हणाले, "कैसे करना है देखिये" आणि विषयच संपला.

एखादा माणूस संघ स्वयंसेवक असेल तर तो समाजासाठी स्वतःच्या फायद्याविनाही काही करायचे असेल तर करणारच त्यात काही विशेष नाही हे इतक्या सहज अधिकाराने अनिलजींनी त्या सरकारी कामांना सरावलेल्या सनदी अधिकार्‍याला ऐकवले की त्या विश्वासानेच मी अंतर्मुख झालो.

काम झाल्यावर अनिलजी म्हणाले,"गोविंदजी, चला, आमच्या कार्यालयातले पोहे खिलवतो, एकदम खास असतात". वाटेतही फोनवरच अनेक महत्वाची कामे त्यांनी लीलया मार्गी लावली. सकाळचा बंद पदलेल्या फॅक्टरीचा प्रश्नही सुटण्याच्या दिशेने जातांना दिसत होता.

कार्यालयात पोहोचलो. "माझ्या खोलीत बसू" म्हणाले, मला वाटले की त्यांना वेगळे ऑफिस असेल. आत जाउन बघतो तर काय ? एका चुटकीसरशी पाच हजार एकर जमीन मंजूर करू शकणारा हा मनुष्य त्या छोट्या कार्यालयातल्याच १२ बाय १२ च्या एका खोलीत , एक छोटा पलंग, टेबल खुर्ची, पुस्तकाची तीन कपाटे एवढ्या संपत्तीसह रहात होता. वीसहून जास्त वर्षे राजकारणात काढल्यावर एका राज्याच्या कारभाराच्या किल्ल्या हाती असतांनाही !!!

पण मला आश्चर्य मात्र वाटले नाही, कारण मलाही हे माहित होतेच की "अनिल माधव दवे... स्वयंसेवक है "

लायसन्स संपले म्हणून रेडिओ न ऐकणार्‍या दीनदयाळजींसारख्या नेत्याबद्दल आपण ऐकलेले असते. त्याच निष्टा आणि सचोटीने "स्वयंसेवक है" ही ओळख, हा परस्परांबद्दलचा विश्वास आणि या स्वत्वाची जाणीव ठेवून राजकारणासह विविध क्षेत्रात नेतृत्व करणारे हजारो स्वयंसेवक संघाने घडवले आहेत एवढेच या निमित्ताने पुन्हा आठवले.

महाविद्यालयीन जीवनात अनिलजी संघाच्या संपर्कात आले, आणि पुढे चाळीस वर्षे त्यांंनी प्रचारक म्हणून आपले जीवन संघकार्यालाच वाहून घेतले. विभाग प्रचारक म्हणून कार्यरत असतांनाच त्यांच्याकडे भाजपचे काम आले. २००९ मध्ये ते खासदार झाले तर २०१६ मध्ये केंद्रिय पर्यावरण मंत्री झाले. पण "स्वयंसेवक है" या निष्ठेनेच ते काल शेवटच्या श्वासापर्यंत अविरत काम करत राहिले. त्यांच्याबद्दल तुम्हाला गुगलून देखील फार सापडणार नाही. कारण ना त्यांना स्वतःचे वैयक्तिक जीवन होते ना त्यांनी उभ्या केलेल्या कामाला त्यांनी कधी स्वतःच्या नावाचे लेबल लावले. पंतप्रधान मोदींपसून ते सरसंघचालक मोहनजींपर्यंत त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी व्यक्त केलेली भावना हीच त्यांच्या कामाची पावती आहे. अनिल माधव दवेंना विनम्र श्रद्धांजली.
- गोविंद सोवळे

लेखसमाज

प्रतिक्रिया

श्री. अनिल दवे हे तडफेने काम करणारे पर्यावरणवादी होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

सुबोध खरे's picture

18 May 2017 - 8:08 pm | सुबोध खरे

सुंदर लेख
ज्यांनी डोळ्यावर चष्मा घातला आहे त्यांना संघाबद्दल द्वेषच वाटतो.
पण असे निरलसपणाने काम केलेले/ करणारे कार्यकर्ते पहिले कि माणूस आपोआप नतमस्तक होतो.
ज्यांनी असे लोक प्रत्यक्ष पाहिले आहेत त्यांनाच समजेल कि माणूस काय अंतः स्फूर्तीने असे काम करु शकतो आणि कसल्या मातीने हि माणसे बनलेली आहेत.

माहितीबद्दल धन्यवाद. आणि अनिलजीना आदरांजली.
बाकी संघाची कार्यपद्धती माहीत असल्याने आणि असे कार्यकर्ते प्रत्यक्षात पाहिले असल्याने आश्चर्य वाटले नाही.
असाच एक स्वयंसेवक त्यांची जागा घेवो इतकेच आपण म्हणू शकतो.

उपेक्षित's picture

18 May 2017 - 8:28 pm | उपेक्षित

संघाचा समर्थक नसूनही ओळख भावली, अनिलजीना आदरांजली _/\_

जाता जाता काही संघाच्या लोकांबद्दल प्रचंड आदर आहे ( उदा. मनोहर पर्रीकर)

अनुप ढेरे's picture

18 May 2017 - 11:29 pm | अनुप ढेरे

छान आठवण!

यशोधरा's picture

18 May 2017 - 8:35 pm | यशोधरा

सुरेख लिहिलेस जीएस.

"स्वयंसेवक है"

खरं आहे. अशा व्यक्ती खूप जवळून पाहिल्या आहेत.
श्री. अनिल दवेंना श्रद्धांजली.

मितान's picture

18 May 2017 - 9:35 pm | मितान

समयोचित आणि चांगला लेख !

Ranapratap's picture

18 May 2017 - 10:10 pm | Ranapratap

भावपूर्ण श्रद्धांजली

प्रेरणादायी व्यक्तीमत्व _/\_

पैसा's picture

18 May 2017 - 11:04 pm | पैसा

समयोचित, उत्तम ओळख.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 May 2017 - 11:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

समयोचित लेख. भावपूर्ण श्रद्धांजली !

मोदक's picture

19 May 2017 - 12:00 am | मोदक

__/\__

या लेखात त्यांचा एखादा फोटो टाकाल का..?

तसेच मायबोलीतील प्रतिसादामध्ये तुम्ही दिलेले अनिलजींचे मृत्युपत्र इथेही द्या.

जीएस's picture

19 May 2017 - 10:32 am | जीएस

पण संपादन करता येत नाही असे दिसते आहे.

एखादा माणूस संघ स्वयंसेवक असेल तर तो समाजासाठी स्वतःच्या फायद्याविनाही काही करायचे असेल तर करणारच त्यात काही विशेष नाही हे इतक्या सहज अधिकाराने अनिलजींनी त्या सरकारी कामांना सरावलेल्या सनदी अधिकार्‍याला ऐकवले की त्या विश्वासानेच मी अंतर्मुख झालो.

यालाच राजकीय हस्तक्षेप म्हणता येईल का? म्हणजे उद्या कोणी दुसऱ्या एखाद्या संघटनेचा कार्यकर्ता आपले काम घेऊन आल्यास आणि त्याच संघटनेचे लोक सरकारमध्ये असल्यास आणि एकाच संघटनेचे असल्यामुळे त्यांनी सनदी अधिकाऱ्याच्या कामात हस्तक्षेप केला, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?

पुंबा's picture

19 May 2017 - 10:14 am | पुंबा

+१
संघ स्वयंसेवक म्हणजे निरलसपणे, समाजहीतार्थ काम करणाराच असेल असे मानून कुठलीही शहानिशा न करता विश्वास टाकणं मला तरी अयोग्य वाटलं.
दवेंच्या पर्यावरणासंबंधी कामाबद्दल, त्यांच्या निस्वार्थी, ऋजू स्वभावाबद्दल आदरच वाटतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

जीएस's picture

19 May 2017 - 10:30 am | जीएस

अनिलजींनी उत्तर कुठल्या प्रश्नाला दिले ?
मी हे का करतोय? या प्रश्नाला. यात माझा फायदा काय? या प्रश्नाला.

सरकारने या प्रकल्पाला जमीन का द्यावी ? या प्रश्नाला नाही.

अत्रे's picture

19 May 2017 - 10:48 am | अत्रे

समजा त्या अधिकाऱ्याने "स्वयंसेवक असला तर काय झाले?" असे उलट उत्तर दिले असते तर?

उपेक्षित's picture

19 May 2017 - 10:54 am | उपेक्षित

अत्रे त्यासाठी वेगळा धागा काढा नंतर, इथे श्रद्धांजली साठी हा धागा आहे याचे मला वाटते तारतम्य असू द्यावे....

ठीक आहे. मला जी गोष्ट खटकली तिच्याबद्दल मी लिहिले. उगाच श्रद्धांजलीच्या पोस्टवर वाद नको.

उपेक्षित's picture

19 May 2017 - 11:22 am | उपेक्षित

धन्यवाद

विशुमित's picture

19 May 2017 - 10:58 am | विशुमित

स्वयंसेवक असल्या कारणाने चप्पल ने नसते मारले त्या अधिकाऱ्याला, एवढे पक्के आहे. असो.

दवे जी ना भावपूर्ण श्रद्धांजली..!!

जीएस's picture

19 May 2017 - 10:55 am | जीएस

Will

अद्द्या's picture

19 May 2017 - 11:26 am | अद्द्या

वाह .. आदरणीय व्यक्ती .
त्यांना श्रद्धांजली

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 May 2017 - 10:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

__/\__

कराच्या पैशातून जनतेसाठी उपलब्ध केल्या जाणार्‍या, बसच्या थांब्यांवर आणि कचरा गोळा करणार्‍या गाड्यांवर, "क्ष्क्ष्क्ष्क्ष च्या सौजन्याने" अशी स्वतःची जाहीरात करणार्‍या सद्याच्या राजकारण्यांच्या पार्श्वभूमीवर, असे काही पाहीले की, निरिच्छपणाने काम करणारी माणसे किती महाग झाली आहेत हे ध्यानात येते ! :(

स्वयंसेवक आहे यातच सर्वकाही आले.

रामदास२९'s picture

19 May 2017 - 12:17 pm | रामदास२९

अनिलजीना आदरांजली _/\_

नीलकांत's picture

19 May 2017 - 11:36 pm | नीलकांत

आदरांजली _/\_

रमेश आठवले's picture

20 May 2017 - 2:03 am | रमेश आठवले

एका स्वच्छ सज्जन निरलस समाज सेवका बाबत चा हा प्रसंग मिसळ पाव वर त्यांच्या निधना नन्तर विदित करण्या बद्दल धन्यवाद. श्री अत्रे यांना एवढेच सांगावेसे वाटते की त्या सनदी अधिकाऱ्याला कोणी व्यक्ति स्वार्था शिवाय इतरांच्या कामा साठीं रदबदली करू शकते ह्याचा पूर्व अनुभव नसावा. त्याच्या साठी मुख्य मंत्र्यानी मंजुरी दिली एवढे पुरे होते.

दशानन's picture

21 May 2017 - 9:51 pm | दशानन

स्वयंसेवक
हा एक शब्द पुरेसा
_/|\_

रुपी's picture

22 May 2017 - 11:19 pm | रुपी

चांगला लेख! भावपूर्ण श्रद्धांजली !

स्वधर्म's picture

23 May 2017 - 12:53 pm | स्वधर्म

अनिल दवे यांच्याविषयी फारशी माहिती नव्हती. हा लेख जरी त्यांच्याबद्दल असला, तरी अापण ज्या प्रकल्पासाठी गेला होता, तो पूर्ण झाला का? अादिवासींना जमीन मिळाली व त्यांच्या उत्पन्नाची सोय झाली का? मध्य प्रदेशात बहुतेक सरकार तेच अाहे, त्यामुळे उत्सुकता अाहे.

शलभ's picture

24 May 2017 - 8:08 pm | शलभ

__/\__

राघवेंद्र's picture

24 May 2017 - 9:28 pm | राघवेंद्र

अनिलजीना आदरांजली _/\_