विरगावचा भोवाडा

Primary tabs

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 May 2017 - 5:25 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

मी लहान होतो तेव्हा दरवर्षी आखाजीच्या आसपास चैत- वैशाख महिण्यात आमच्या विरगावला भोवाडा व्हायचा. अजूनही भोवाड्याची परंपरा विरगावला कायम असली तरी पूर्वीसारखं दरवर्षीचं सातत्य आता उरलं नाही. चैत-वैशाख म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यात शेतकर्‍यांना फारशी कामं नसतात. म्हणून खेड्यापाड्यांवर उन्हाळ्यातली लोकरंजन भोवाड्याची लोकपरंपरा आताआतापर्यंत टिकून राहिली असावी. मात्र अलिकडे रंजनाचे अनेक माध्यमं उपलब्ध झाल्याने हा लोकपरंपरेचा प्रकार क्षिण होऊ लागला.
भोवाडा सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधीपासून गावकर्‍यांमध्ये भोवाड्याचा उत्साह दिसून येत असे. चैत पुनवेला गावातून भोवाड्याची दांडी मिरवून पेठगल्लीतील भोवाड्याच्या नियोजित ठिकाणी पूजा- अर्चा करून ही दांडी रोवली जात असे. सागाच्या लाकडाच्या दांडीच्या वरच्या टोकाला वाळलेल्या रोयश्याचे गवत बांधून तयार केलेली दांडी वाजत गाजत नाचवत तिची मिरवणूक गावभर काढली जात असे. यामुळे गावात भोवाडा होणार असल्याची वर्दी संपूर्ण गावाला मिळत असे.
भोवाड्याच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरूवात होण्याच्या दोन दिवस आधी गावात सोंगं आणली जात. विरगावजवळ खामखेडा नावाचं एक गाव आहे तिथून ही सोंगं (मुखवटे) भाड्याने आणली जात. दोन बैलगाड्यांमध्ये मोडतोड होणार नाही अशी काळजी घेत ही सोंगं आणून चावडी जवळील शाळेत ठेवली जात असत. सोंगं पाहण्यासाठी आमच्यासारख्या लहान मुलांसोबत गावातील थोराडही त्या खोलीभोवती गर्दी करायचे. सोंग याचा अर्थ मुखवटा. कागदाचा भिजलेला लगदा आणि त्याला चिकटपणा येण्यासाठी मेथीचं पीठ एकत्र कालवून सोंगं तयार केली जात. काही सोंगांना मोठमोठ्या ताट्याही असत. ह्या ताट्या टोकराच्या म्हणजे बांबूच्या कामट्यांपासून बनवलेल्या असत. रावण, विराट, आग्यावेताळ अशा सोंगांना मोठ्या आकाराच्या ताट्या असत.
भोवाडा सुरू होण्याच्या दिवशी चावडीजवळ एकेका सोंगांचा लिलाव करण्यात येत असे. हा लिलाव मात्र फक्‍त एका रात्रीसाठीच असे. भोवाडा संपल्यानंतर पहाटेला दुसर्‍या दिवशीच्या भोवाड्यासाठी सोंगांचा पुन्हा लिलाव करण्यात येई. सर्वात जास्त बोली बोलणार्‍याला ते सोंग नाचवण्याचा मान मिळे. ह्या पैशांमधून भोवाड्याचा खर्च भागवला जात असे. सोंगांचं भाडं, टेंभ्यांचं रॉकेल, सांबळ वाद्याचे पैसे, तमाशाचे पैसे, टेंभा धरण्यासाठी लावलेली माणसं या सर्वांचा पगार ह्याच लिलावाच्या पैशातून दिला जात असे.
सोंग घेणार्‍या माणसाला सोंग बांधण्याअगोदर रात्री त्याला सजवतात. म्हणजे गणपतीच्या सोंगासाठी त्याला पितांबर नेसवतात. एकादशीचं सोंग घेणार्‍या माणसाला लुगडं नेसवतात, दागिने घालतात. मेकअप करतात.
भोवाड्यात सर्वप्रथम बेलबालसलाम नावाचं तीन शिपायांचं सोंग निघतं. तोंडाला रंग दिल्याने यांच्या तोंडाला सोंग बांधण्याची गरज उरत नाही. हे शिपाई भोवाडा सुरू करण्यासाठीचे सूत्रधार असत. हे चावडीपासून पूर्वेकडे नाचत येऊन वडाच्या झाडापर्यंत येऊन परत फिरत आणि भोवाड्याच्या मध्यभागी येऊन ‘होऽऽ’ असं म्हणत. असं म्हणताच सांबळ वाद्य बंद होत असे. शिपाई म्हणत, ‘गणपतीची सवारी येऊ येऊ करीत आहे होऽऽ’ आणि पुन्हा वाद्य वाजू लागत. शिपाई नाचत चावडीकडे निघून जात. यानंतर मग धोंड्या, गणपती, सरस्वती, दत्तात्रेय, एकादशी, दुवादशी, त्रयोदशी, खंडेराव, मगरमासा, कच्छ, मच्छ, तंट्याभील, विराट, रावण, वराह, मारूती, बिभिषण, आग्यावेताळ, हुरनारायन (नरसिंह), दैत्य, नंदी, अस्वल, चुडेल, इंद्रजित, जांबुवंत, नरशू, विरभद्र, चुडेल-डगरीन, बाळंतीण बाईची खाट, चंद्र, सूर्य अशी सोंगं येत. ही सोंगं पेठगल्लीत साधारणत: दोनशे मीटरपर्यंत नाचत पुढे जात आणि तसंच परत येत. प्रत्येक सोंग नाचण्याच्या सांबळावर वेगवेगळ्या चाली लावाव्या लागत. त्या चालींवर ती सोंग नाचत. पेठ गल्लीत अर्थात गावाच्या मुख्य गल्लीत हा भोवाडा होतो. गल्लीच्या दोघं बाजूच्या ओट्यांवर, जमिनीवर खाटा टाकून, गोणपाट अंथरून संपूर्ण गाव आपल्या लेकराबाळांसह भोवाडा पाहण्यासाठी गर्दी करत. बाया-माणसं, म्हातारी-कोतारी, लहान सहान पोरं अशी ही गर्दी असे. तीन रात्री संपूर्ण गाव जागरण करून हा भोवाडा पाहत असे. भोवाडा पाहण्यासाठी आजूबाजूच्या दूरदूरच्या गावाची माणसंही येत असत.
प्रत्येक सोंगाच्या मागे-पुढे टेंभे घेतलेली दोन दोन माणसं असत. परंतु आग्यावेताळ सारख्या सोंगाला आठ टेंभे लावले जात. टेंभा म्हणजे मशाल. टेंभ्याच्या उजेडातच सोंगं पहावी लागत. त्यासाठी बत्ती किवा कंदील लावण्याची पध्दत नव्हती. चंद्रे या वनस्पतीच्या ओल्या फांद्यांच्या एका टोकाला कापडांच्या चिंध्या बांधून ते रॉकेलमध्ये बुडवून पेटवतात. त्याला टेंभा म्हणतात. टेंभ्यांबरोबर एकजण रॉकेलचे उघडं डबं घेऊन चालतो. टेंभ्याचं रॉकेल संपत आलं की टेंभावाला जळता टेंभा रॉकेलच्या डब्यात बुडवून पुन्हा टेंभा चांगल्या पध्दतीने पेटवतो. अशा ह्या टेंभ्याच्या प्रकाशात रात्रभर भोवाडा चालतो.
एका सोंगानंतर दुसरं सोंग येतं. ह्या दोन्ही सोंगांमध्ये वेळ शांत जाऊ नये म्हणून त्या वेळेत तमाशावाले प्रेक्षकांचं मनोरंजन करत. गाणी, लावण्या, लोकगीतं, पोवाडा, नाच, नकला असे प्रकार या तमाशात असत. भोवाड्याच्या मध्यभागी भोवाड्याची दांडी रोवलेली असते, ‍ितेथे एका बाजूला हा तमाशा थाटलेला असायचा. पडद्याचा उपयोग केला जात नाही. मोकळे अवकाश हाच ह्या तमाशाचा पडदा असतो. ह्या तमाश्याजवळ दोन बत्त्या टांगलेल्या असत. सोंग येण्याचे सांबळ वाजू लागलं की हा तमाशा बंद होत असे आणि सोंग येऊन गेलं की पुन्हा सुरू होई.
जवळजवळ मध्यरात्रीच्या आसपास आग्या वेताळाचं सोंग निघत असे. ह्या सोंगाचा आकार मोठा आणि अक्राळविक्राळ असे. त्याच्या उघड्या तोंडातल्या मोठ्या दातांतून लालभडक जीभ लोंबकळताना दिसे. कंबरेला कांबडींचं रिंगन तयार करून त्याला चोहोबाजूंनी टेंभे लावलेले असत. दोन्ही हातात दोन मडके असतात. त्यातून जाळ निघत असे. हे सोंग घेणारी व्यक्‍ती गरजेपुरतं अंग झाकून बाकी उघडीबंब असत. त्या उघड्या अंगावरच लालभडक रंगाचे पट्टे ओढलेले असत. असा आग्यावेताळाचा भयानक अवतार सर्वांना घाबरवून सोडत असे. वेताळ म्हणजे भुतांचा राजा. वेताळाचं सोंग भोवाड्याच्या मध्यभागी आलं की त्याची पूजा करून त्याला नारळ फोडलं जात असे.
आग्या वेताळाचं सोंग निघण्यापूर्वी वातावरण निर्मितीसाठी चुडेलींचा खेळही दाखविण्यात येत असे. चुडेल ही ग्रामीण लोकांची काल्पनिक संकल्पना आहे. स्त्री लिंगी भूत म्हणजे चुडेल. भीती वाटेल असा विद्रुप काळा चेहरा, मोकळे सोडलेले केस, वेडेवाकडे शरीर अशी ही चुडेलीची संकल्पना आहे. चुडेलीचं हे सोंग देवराव महाले नावाचे गृहस्थ अप्रतिम साकारायचे. त्यांनी घेतलेलं सोंग बघून खरोखरची चुडेलही घाबरली असती इतका तो अभिनय अप्रतिम असायचा. केवळ रंगरंगोटी, अंगावरचे कपडे, हातात कडूनिंबाचा पाला आणि बीभत्स नाच याच्या बळावर ही चुडेल सर्वांना घाबरवून सोडत असे. चुडेलींची संख्या तीन चार पर्यंत असूनही देवराव महालेची चुडेल भाव खाऊन जायची. चुडेली पेठेतल्या कोणत्याही बोळीतून एकदम भोवाड्यात प्रवेश करायच्या. म्हणूनच त्यांची दहशत भोवाड्यात सर्वाधिक असायची. चुडेली निघायच्या अगोदर भोवाड्याच्या मध्यभागात एक गवळी आणि गवळण लोणी काढायचं नाटक करत. तेव्हा ते गाणीही गात असत:
घुसळन घुसळन दे बाई, लोनी अजून का नाही
लोनी येईना ताकाला, माझा गवळी भूकेला
ही लोणी खाण्यासाठी अचानक चुडेली निघत. चुडेलींच्या नाचानंतर आग्यावेताळ निघत असे. या चुडेलींच्या खेळाला आग्यावेताळची सपातनी असं म्हणत.
संध्याकाळची जेवणं आटोपल्यावर भोवाडा सुरू झाला की सकाळी सूर्योदयाच्या वेळी बंद व्हायचा. रात्र संपूनही सोंगं मात्र संपत नाहीत, म्हणूनच ‘रात थोडी सोंगं फार’ अशी म्हण रूढ आहे. ही म्हण मराठीतही रूढ झाली आहे. म्हण ही लोकपरंपरेंकडूनच भाषेला मिळालेली देणगी असते. अशा प्रकारच्या अनेक म्हणी/ वाक्प्रचार भाषेत लोकपरंपरेतून आले आहेत.
चंद्र, सूर्य, मारूती, बिभिषण, जांबुवंत, इंद्रजित, नरंसिंह, देवी ही सोंगं फक्‍त शेवटच्या रात्रीच निघत. चंद्र-सूर्य दिवस उगवण्याच्या वेळी निघत. नरसिंहाचं सोंग पूर्वेकडून निघत असे. ह्या सोंगासाठी कागदांचा एक मोठा पडदा तयार केला जाई. तो पडदा दोन्ही बाजूंनी लोक धरून ठेवत आणि नरसिंहाचं सोंग तो पडदा फाडून बाहेर येई. नरसिंह अवतार लाकडी खांबातून बाहेर आला या कथानकाला अनुसरत भोवाड्यात तो कागदाचा पडदा फाडून बाहेर येतो. नरसिंह जमिनीवर लोळण घेई. पुन्हा उठून हातात ढाल असलेल्या माणसावर धावून जाई. आपल्या हातातल्या लोखंडी कड्या त्याच्या हातातील ढालीवर आपटून जमिनीवर लोळण घेई. त्याच्या मागेपुढे हातात ढाल घेतलेले दोन लोक असत.
मग शेवटी सकाळी देवीचं सोंग निघत असे. दुपारपर्यंत सर्व गावभर ते मिरवलं जातं. देवीचं सोंग फक्‍त भोवाड्यापुरतं नाचत नाही. भोवाड्याच्या सुरूवातीपासून सकाळी ते निघालं की संपूर्ण गावातून मिरवणूक झाल्याशिवाय त्याची सांगता होत नसे. घरोघरी देवीची आरती, पूजा केली जात असे. देवीचं सोंग एकदा बांधलं की गावभर मिरवणूक पूर्ण होईपर्यंत सोडता येत नाही. म्हणून सोंग घेणार्‍याचा थकवा घालवण्यासाठी सोंगाच्या तोंडातून गव्हाच्या काडीने त्याला दूध पाजलं जात होतं. मिरवणूक पूर्ण होईपर्यंत त्याला काही खाता येत नसे. घरोघर देवीची पूजा करून खणानारळाने तिची ओटी भरली जात असे. संपूर्ण गावातून मिरवून झाली की जिथून भोवाडा सुरू होतो तिथे आणून पूजेनंतर देवीचं सोंग सोंडलं जायचं. तोपर्यंत त्या दिवसाची तिसरी प्रहर टळून जायची.
देवांसोबत दैत्यांचेही सोंगांमधून अशा पध्दतीने दर्शन दाखवून गाव आणि परिसरातील लोकांचे मनोरंजन करत आमच्या गावातील तीन दिवसाच्या पारंपरिक भोवाड्याची सांगता होत असे.
(या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

लेखसाहित्यिक

प्रतिक्रिया

अरे वा. रोचक प्रकरण आहे. विशेषतः 'तंट्या भिल्ला'चं सोंग?

रोचक वाटलं. कधी पुन्हा पाह्यलंत तर किंवा तुमच्याकडे फोटो असतील तर ते अपलोडवा.

कंजूस's picture

16 May 2017 - 5:29 am | कंजूस

छान!

इरसाल कार्टं's picture

16 May 2017 - 10:32 am | इरसाल कार्टं

आमच्या पालघर जिल्ह्यात विक्रमगड, जवाहर- मोखाडा भागात आजही हे बोहाडे होतात. एकदा जाऊन बघण्याचा मानस आहे.

पैसा's picture

16 May 2017 - 11:27 am | पैसा

खूपच छान माहिती. कोकणातल्या दशावतारी खेळे आणि शिमग्याच्या जवळपास जाणारी पद्धत दिसते आहे.

पद्मावति's picture

16 May 2017 - 11:29 am | पद्मावति

छान माहिती. लेख आवडला.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 May 2017 - 5:14 pm | डॉ. सुधीर राजार...

नमस्कार.
एस, सूड, कंजूस, इरसाल कार्ट, पैसा, पद्मावती या सर्वांचा मी खूप आभारी आहे. विरगाव हे गाव नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात आहे.

छान माहिती. डॉ.साहेब, भोवाड्यातील सोंग व त्यांचे संवाद(पदं) याबाबत आणखी लिहिता येईल.
अलीकडे भोवडा पूर्णपणे बंद झाले आहेत.

सिरुसेरि's picture

16 May 2017 - 9:26 pm | सिरुसेरि

तंट्या भिल्लाचा पोवाडा , तंट्या भिल्लाचा खजिना यांबद्दल पुर्वी वाचले आहे .

जव्हेरगंज's picture

17 May 2017 - 9:37 pm | जव्हेरगंज

वा वा!

मस्त लेख!!!

शेवटचा डाव's picture

23 May 2017 - 8:58 pm | शेवटचा डाव

ईतके जवळ असुन सुद्धा भोवाडा हा प्रकार प्रथम आयकतोय