बिडी जलायले.....: नाशिकचा उद्योग ०६

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
11 May 2017 - 7:42 pm

( उत्तरार्ध ) :
नाशिकच्या आर्थिक आणि सामाजिक बदलाबरोबर नाशिकचा भूगोल बदलायची ही सुरुवात होती. कारण पारंपरिक किंवा जाती किंवा वर्ण व्यवस्थेवर आधारित करण्याच्याच्या व्यवस्थेला नाशिकपुरते तरी बिडी व्यवसायानेच एका अर्थाने सुरुंग लावला. विशेषतः बहुजन समाजातल्या विशेषतः मागास जातीतील कुटुंबाना त्यांच्या पारंपरिक व्यवसायाव्यतिरिक्त पैसे मिळवण्याची पहिली संधी बिडी उद्योगानेच दिली ही एका अत्यंत महत्वाच्या स्थित्यंतराची सुरुवात होती. आपापली कामे झाल्यावर उरलेल्या वेळात सुरुवातीला बिडीच्या कारखान्यात जाऊन काम करण्याची संधी विशेषतः बहुजन समाजाच्या लोकांना मिळत असे. पुढे तर बिडी वळण्याचे काम घरी मिळायला लागल्यावर ते काम आपसुकच घरातल्या महिलेकडे आले. त्यामुळे बिडी उद्योगाचे एका सामाजिक बदलाकडे घेऊन जाणारे हे काम व्यवसायापलीकडेही जाऊन बघितले पाहिजे . नाशिकच्या बाबतीत आणखी एक महत्वाचा मुद्दा या व्यवसायाच्या बाबतीत होता तो असा की नाशिकच्या शहरीकरणाची किंवा विस्ताराची सुरुवात ही काही अंशी बिडी उद्योगामुळेच झाली.
१८८१ साली नाशिकची लोकसंख्या २४,१०१ होती आणि १९४१ साली होती ५२,३८६. म्हणजे सुमारे २८,००० लोकसंख्या वाढीला साठ वर्षे लागली. पण दहाच वर्षांनी १९५१ साली नाशिकची लोकसंख्या सुमारे पन्नास हजाराने वाढून एक लाखाच्यावर पोहोचली होती. नाशिकपासून सुमारे सहा मैल त्रिज्येच्या टापुतल्या सातपूर, गंगापूर, आनंदवल्ली, सातपूर, पिंपळगाव वगैरे ग्रामीण भागातील सर्व भूमिहीन, मजूर, इत्यादी मनुष्यबळासाठी नाशिकमध्ये विशेषतः वाढणारा बिडी उद्योग हे वरदान ठरले होते. त्यामुळे १९४१ ते १९५१ सालात नाशकात वाढलेली लोकसंख्या ही प्रामुख्याने इथे रोजगारीसाठी आलेल्या आजुबाजुच्या नागरिकांची होती. उदाहरणार्थ गंगापूरची १८८१ सालची लोकसंख्या होती १०८७ आणि १९४१ साली होती १०८३ ! साठ वर्षांनी गंगापूरची लोकसंख्या तेवढीच राहण्याचे मुख्य कारण रोजगारासाठी तिथून नाशकात झालेले स्थलांतर. सारडा उद्योग समूहाचे संस्थापक बस्तीरामजी सारडा गेले त्या वर्षी म्हणजे १९६३ साली एकट्या सारडा यांच्या उद्योगामध्ये बिडी कामगारांची संख्या होती पंधरा हजार.ती जरी सिन्नरसह अहमदनगर वगैरे ठिकाणी पसरलेल्या त्यांच्या व्यवसायामध्ये विखुरलेली असली तरी नाशकातल्या बिडी कामगारांचा त्यात मोठा आकडा होता. त्याच सुमारास म्हणजे १९६३ साली नाशिकमध्ये भिकुसा यमासा यांच्या बिडी व्यवसायामध्ये काम करणाऱ्या बिडी कामगारांची संख्या १४०० इतकी होती. ज्या मे १९६४ साली नाशिक नगरपालिकेला शंभर वर्षे पूर्ण झाल्या प्रित्यर्थ नाशकात शतसांवत्सरिक उत्सव तत्कालीन नगराध्यक्ष निवृत्ती त्र्यंबकराव वझरे यांच्या नेतृत्वाखाली दणक्यात साजरा करण्यात आला त्यावर्षी नाशकात बिडी उत्पादन करणारे दहा कारखाने होते. वरील व्यतिरिक्त के. सी. तिवारी अँड सन्स, नरहर कोंडाजी, कांबळे, इस्माईल महंमदखान इत्यादी आणि या छोट्या मोठ्या कारखान्यात काम करणाऱ्या बिडी कामगारांची संख्या होती सुमारे पाच हजार. त्यामुळे अनेक दशके या व्यवसायाने प्रतिष्ठेने नाशकात तगच धरली असे नव्हे तर मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचे महत्वाचे योगदानही दिले. नाशकात १९६३ -६४ साली रोजगार देणारा बिडी व्यवसाय हा सगळ्यात मोठा व्यवसाय होता ज्या मध्ये एकूण रोजगार निर्मितीच्या सुमारे ३५% इतका प्रचंड रोजगार एकट्या बिडीच्या उद्योगाने निर्माण केला होता.
बिडी व्यवसायाची एक गंमत आहे. हा संपूर्ण पुरुषप्रधान व्यवसाय आहे, म्हणजे पुरुषी वर्चस्व असणारा. पण सातत्याने अगदी आजवर तो अवलंबून मात्र आहे स्त्री कामगारांवर. बिडी व्यवसायाला आवश्यक असणारे सुमारे ९० टक्के मनुष्यबळ हे मुख्यतः महिलांचे आहे. महिला बहुदा त्यांना असणाऱ्या अडचणींमुळे किंवा वेगवेगळ्या कारणांनी लहान मुलांची मदत घेतात - बाल कामगार. त्यामुळे आज ही या व्यवसायाची मदार महिला आणि बाल कामगारांवरच आहे. महिलांचे या एकूण व्यवसायातले काम हे बिडी वळण्याचे. एका सर्वेक्षणामध्ये महिलामध्येच या वळण्याच्या कामाचे कसब पुरुषांपेक्षा उत्तम असते असे आढळले. बालकामगारांमध्ये हे कसब मुलींमध्ये अधिक असते असे हा सर्वे सांगतो. सुरुवातीला बिडी विक्रेता स्वतः त्याच्या कुटुंबियांकडून बिड्या वळून, भाजून घेत असे. पुढे काम वाढल्यावर कारखाने आले जिथे मोठ्याप्रमाणात महिला आणि मुले बिड्या वळण्याचे काम करत. बिड्या निवडणे, भाजणे, पॅकिंग आणि मग विक्री ही कामे मात्र पुरुषांकडे. या व्यवसायाची पहिली आणि मोठी गोची झाली १९६६ साली. केंद्र सरकारने बिडी आणि सिगारेट कामगार कायदा : १९६६ पारित केला. बिडी कामगारांना कायद्याने संरक्षण मिळाले आणि नाशकातच नव्हे तर देशभरात सगळीकडेच कारखान्यात बिडी वळून घ्यायच्या पद्धतीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आले. या कायद्याने विशेषतः कारखान्यांच्या बाबतीत बरीच बंधने आणली. कारखाना चालू करायचा परवाना, त्याचे वार्षिक नूतनीकरण, कारखान्याची स्वच्छता, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वगैरे बऱ्याच अटी या कायद्यान्वये कारखान्यांना लागू झाल्या आणि कारखान्यांना घरघर लागली. त्यामुळे बऱ्याच बिडी कंपन्यांनी बिडी वळण्याचे काम कंत्राटदाराकडे द्यायला सुरुवात केली आणि कंत्राटदार बिडी वळण्याचे मुख्य काम घरोघरी द्यायला लागले. तंबाखू, तेंदूपत्ता आणि धागा कंत्राटदाराकडून महिलानी घेऊन जायचे आणि घरी बिड्या वळायच्या.
सुमारे आठ तासात एक महिला सरासरी १००० बिड्या वळते. १००० बिड्या वळणाऱ्या कामगाराला या कामापोटी सुमारे दीडशे रुपये आज मिळतात. नाशिक जिल्ह्यात आज मितीस ३२ कारखाने आहेत. या कारखान्यात बिडी वळणाऱ्या कामगारांमध्ये शंभर टक्के महिलाच आहेत. एकेकाळी नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या बिडी उद्योग आज फक्त सुमारे एक टक्का कामगारांना रोजगार देतो. एप्रिल २०१७ महिन्याच्या अहवालात नोंदल्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातल्या बिडी कामगारांची संख्या २७९३ इतकीच आहे. देशभरात सुमारे ऐशी लाख बिडी कामगार आहेत. महाराष्ट्रात देशाच्या एकूण तीन टक्के.
सिगारेटचे प्रस्त वाढले, लोकांना बिडी पिणे कमीपणाचे वाटते, सरकारच्या आरोग्याविषयक जाहिरातींमुळे, बिडीला गुटख्यासारख्या उत्पादनांची स्पर्धा निर्माण झाल्यामुळे बिडी उद्योग जवळपास विझायच्याच बेतात आहे. सरकारच्याच एका कामगार विषयक पत्रकात म्हटल्याप्रमाणे बिडी धोकादायक असली तरी बिडी विझल्यावर बिडीवर अवलंबून असणाऱ्या सुमारे एक कोटी रोजगाराचे काय करायचं हा प्रश्न आधी सोडवायला लागेल. कारण ग्रामीण भागात भूमिहीन वृद्ध, गरोदर, अपंग आणि घराबाहेर पडू न शकणाऱ्या महिलांना आज बिडी वळण्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाला पर्याय शोधल्याशिवाय बिडीतून बाहेर पडायचा विचारही सरकारला करता येणार नाही. या उद्योगातल्या महिला कामगारांच्या समस्या हा स्वतंत्र लिखाणाचा आणि समाजाने समजून घेण्याचा विषय आहे. ओमकारा सिनेमातल्या गुलजार यांनी लिहिलेल्या "बिडी जलायले जिगरसे पिया, जिगर मा बडी आग है" या गाण्याचे वास्तव आज तरी "जिनको पीनी है, जिगरसे बिडीही पियो क्योकी पेट मा बडी आग है" असेच आहे.

इतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

निपाणीच्या बिडी उद्योगाविषयी अनिल अवचटांचा लेख वाचला आहे. (बहुदा "प्रश्न आणि प्रश्न" किंवा "धागे उभे आडवे" - यांपैकी कोणत्यातरी पुस्तकात हा लेख आहे.)

बिडी कामगार महिलांची कशी पिळवणूक आणि शोषण होते हे वाचून या उद्योगाची काळी बाजू प्रथम कळाली होती.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

एस's picture

11 May 2017 - 10:51 pm | एस

लिहीत रहा. वाचतोय.

अनेक महिलांना या कामाचा आधार आहे हे खरं आहे. अहमदनगरमध्ये आजही कितीतरी महिला अन्यत्र नोकरी करत असल्या तरी संध्याकाळी घरी जाऊन बाकी कामे आटोपून बिड्याही वळतात.

तुमच्या लेखांतून खूप वेगळी माहिती मिळत आहे.
पुभाप्र

ही लेखमालिका आवडते आहे. भाग ४, ५ आणि ६ अनुक्रमणिकेमध्ये अ‍ॅड करुन घ्या.