ये कश्मीर है - दिवस चौथा - १२ मे

Primary tabs

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
6 May 2017 - 4:57 pm

मी उठलो आणि नेहमीच्या सवयीने खिडकीबाहेर एक नजर टाकली.बाहेरचे दृश्य फारसे उत्साहवर्धक नव्हते. आकाशात ढग दाटून आले होते आणि हवा पावसाळी होती. मी खोलीबाहेर पडलो आणि हाऊसबोटीत एक फेरी मारली. आजची आमची ही हाउसबोट अनाकर्षक नसली तरी पहिल्या हाऊसबोटीच्या मानाने तशी साधीच होती.

हाऊसबोटीच्या दिवाणखान्यात एक विक्रेता बाजार मांडून बसला होता. आम्ही सोडून आणखी एक कुटुंब ह्या हाऊसबोटीत रहायला होते. त्या कुटुंबातल्या काकू उत्सुकतेने त्याचा माल पाहत होत्या.

पहिल्या हाऊसबोटीचे मालक गुलामनबींशी गप्पा मारताना या हाऊसबोटींविषयी काही माहिती मिळाली. आकार, एकूण खोल्या, आतली सजावट, फर्निचर या गोष्टींनुसार प्रत्येक हाऊसबोटीची किंमत बदलते आणि ती काही कोटींपर्यंत असू शकते. बोट तुमच्या मालकीची असली तरी तुम्ही ती सरोवरात तशीच उभी करू शकत नाही; सरोवरात तुम्ही बोट उभी करता त्या जागेचे भाडे तुम्हाला दरवर्षी सरकारकडे जमा करावे लागते. हाऊसबोटींच्या मैलापाण्य़ाचे निस्सारण करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही; तेव्हा ते नगीन किंवा दल सरोवरातच सोडले जाते. या कारणामुळेच या दोन्ही सरोवरांमधे नविन हाऊसबोटीची भर टाकण्यास आता सरकारची परवानगी नाही. ’बाहेरची कितीतरी घाण या दोन्ही सरोवरांमधे येते ती सरकारला चालते, मग मैलापाण्याबाबतच सरकार एवढे जागरूक का?’ गुलामनबींचा हा प्रश्न रास्त होता खरा, पण ह्या दोन्ही सरोवरांचे प्रदूषण होत राहिले तर श्रीनगरचा संपूर्ण पर्यटन व्यवसायच धोक्यात येईल हेही तितकेच खरे होते.

हाऊसबोटीच्या सज्ज्यातून पाहिले तर बाहेर नगीन सरोवरही गारठलेले दिसत होते. जवळच काही शिकारे उभे होते. हवामान असेच राहिले तर आज त्यांच्यात कुणी बसेल ही शक्यता कमीच होती.

हाऊसबोटीभोवती एक फळकुटांचा रस्ता होता. त्यावर चालायला मजा आली असती, पण उगाच धरपडलो तर? (आत्ता फोटो पहाताना वाटते की पाणी ३ फुटांपेक्षा खोल नसावे.)

थोड्याच वेळात सगळेच उठले. ओले, कुंद नगीन सरोवर पहात आम्ही वाफाळता चहा प्यालो. आज आम्हाला कसलीच घाई नव्हती. गुलमर्गचे अंतर फार नव्हते आणि तिथे जाऊन आम्हाला काही करायचेही नव्हते. तेव्हा आम्ही आरामात सगळे आवरले आणि हाऊसबोटीचा हिशोब चुकता करून शिका-याची वाट पाहू लागलो. शिकारा काही वेळातच आला. किना-यावर सज्जाद आमची वाटच पहात होते. आम्ही निघालो आणि गाडी गुलमर्गकडे मार्गक्रमण करू लागली.

श्रीनगरमधे आम्हाला भेटायला आलेला पाऊस गुलमर्गपर्यंत आमच्या सोबतीला होता. वाटेत आम्ही 'जेकेटीडीसी'च्या एका हॉटेलात जेवण केले आणि पुन्हा गुलमर्गकडे मार्गस्थ झालो. गुलमर्गला जाताना एका घाटातून जावे लागते. इथे दिसलेले एक दृश्य माझ्या ह्दयपटलावर कायमचे कोरले गेले आहे, ते मी आयुष्यात विसरणे शक्य नाही. भर पावसात आपले सैनिक ह्या घाटात पायी गस्त घालत होते. ५/६ च्या जथ्याने चाललेले हे सैनिक आमची गाडी जवळ आली की क्षणभर थांबत आणि आमच्याकडे पहात. ते थांबले की त्यांच्या पिवळ्या रेनकोटावरून थेंबथेंब निथळणारे पाणी आम्हाला दिसे. मी उबदार गाडीत आरामदायी आसनांवर बसून गुलमर्गला चाललो होतो आणि दोन दिवसांत तिथून निघणार होतो. हे सैनिक तो घाट पायी चढत होते आणि काही महिने तरी तिथेच थांबणार होते. ते माझ्या देशाचे सैनिक आहेत म्हणून त्यांचा अभिमान, त्यांना या परिस्थितीत काम करावे लागते याबद्दल दु:ख आणि त्यांना या परिस्थितीत काम करण्यासाठी कारणीभूत ठरलेला पाकिस्तान आणि दहशतवादी यांच्याविरुद्ध राग अशा अनेक भावना माझ्या मनात दाटून आल्या. मी मनोमन त्या सैनिकांना सलाम ठोकला आणि आम्ही पुढे निघालो. मला वाटते आपले सैनिक ज्या परिस्थितीत काम करतात त्या दाखवणा-या चित्रफिती आपल्या सरकारने बनवाव्यात आणि नागरिकांनी त्या रोज न चुकता पहाव्यात. आपली ९०% कुरकूर आपोआप बंद होईल!

घाट पार केल्यावर काही वेळातच आम्ही गुलमर्गला पोचलो. श्रीनगरपासून फक्त ५० किमी दूर असलेले गुलमर्ग काश्मीरमधल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. ’गुलमर्ग’ म्हणजे ’फुलांचे कुरण’. गुलमर्गला निसर्गसौंदर्याची देणगी आहेच, पण आताशा ते प्रसिद्ध झाले आहे तिथल्या गोंडोल्यासाठी. (गोंडोला म्हणजे रज्जूमार्ग, अर्थात रोपवे.) शहरात प्रवेश करताच दिसते ते गुलमर्गचे प्रसिद्ध गोल्फ कोर्स. २६५० मीटर्स अर्थात ८६९० फूट उंचीवर असलेले हे गोल्फ कोर्स जगातले सर्वात उंचीवर असलेले गोल्फ कोर्स आहे.

गुलमर्गलादेखील इतर शहरांमधून आलेल्या गाड्या आत नेण्याची परवानगी नाही. गाडी वाहनतळावर लावून आणि घोडा करून किंवा पायी फिरून तुम्हाला गुलमर्ग पहावे लागते. पण आम्ही गुलमर्गला राहणार होतो आणि तसे इंटरनेटवरून केलेले आरक्षणही आमच्याकडे होते; तेव्हा आम्हाला गाडी आत नेण्याची परवानगी मिळाली. आम्ही आत शिरलो आणि जेकेटीडीसीच्या ज्या बंगल्यात आमची सोय होती तिथे गेलो. आम्ही तिथे पोचताच तिथला केअरटेकर धावतपळत आला आणि त्याने आमचा ताबा घेतला. “सामान तुम्ही माझ्या लोकांकडे द्या. ते आणतील.” असे म्हणत तो आम्हाला आमच्या बंगल्याकडे घेऊन गेला. जेकेटीडीसीचे हे बंगले मोठे आणि एकदम प्रशस्त आहेत. दिवाणखाना, दोन शयनकक्ष आणि स्वयंपाकघर अशी आम्ही रहात असलेल्या बंगल्याची रचना होती. बंगले मोठे असले तरी अंतर्गत सजावट/फर्निचर नाममात्रच आहे. तेव्हा एवढे मोठे हे बंगले बांधण्याऐवजी सरकारने दोनच खोल्या बांधल्या असत्या पण आतली सजावट थोडी चांगली केली असती तर बरे झाले असते असे (माझ्या पुणेरी मनाला) वाटून गेले.

इथे एक मजेशीर घटना घडली. बंगल्यात आम्ही स्थिरस्थावर होतोच आहोत तेवढ्यात आमचे सामान ज्यांनी आमच्या खोलीत ठेवले ते लोक आले आणि बक्षीसी मागू लागले. आता ४ बॅगा १०० मीटर अंतर न्यायला किती बक्षीसी द्यायला हवी? मी त्यांना ५० रुपये दिले, पण ते त्या रकमेला हातही लावायला तयार नव्हते. ते तीन जण होते आणि मी प्रत्येकी शंभर रुपये असे ३०० रुपये त्यांना द्यावेत अशी त्यांची अपेक्षा होती. ३००? कसंही, कुठल्याही बाजूने पाहिलं तरी ३०० हा आकडा मला जरा जास्तच वाटत होता. शेवटी बराच वेळ थांबून ते १५० रुपये घेऊन गेले!

आम्ही गेलो तेव्हा गुलमर्गला एवढी थंडी नसली तरी इतर वेळी तापमान बरेच खाली जात असल्याने इथे गाद्यांवर गरम होणा-या ब्लॅंकेटसची सोय होती. बटन दाबले की ही ब्लॅंकेटस पटकन गरम होत; थंड, पावसाळी वातावरणात या उबदार ब्लॅंकेटसवर झोपण्याची मजा काही औरच होती.

गुलमर्ग पाहण्यासाठी आम्ही उत्सुक होतो, पण पावसाळी हवेने आमच्या उत्साहावर संपूर्ण बोळा फिरवला. हवामान संध्याकाळी तरी सुधारेल अशी आमची आशा होती, पण तीही फोल ठरली. पावसाची भुरभुर चालू असताना, रस्त्यांवर चिखल झाला असताना गुलमर्ग भटकायला आमच्यापैकी कुणालाच उत्साह नव्हता. आम्ही काही वेळ टीव्ही पाहिला, नंतर बाहेर पडून आजूबाजूला थोडा फेरफटका मारला. बंगल्याच्या मागेच जंगल होते; तिथे दिसलेल्या एका पक्षामागे आम्हीही जंगलात शिरलो आणि त्याची काही छायाचित्रे काढली.

एवढे सगळे होईपर्यंत रात्र होत आली होती. जेकेटीडीसीचे जेवण करायचे हॉटेल बरेच लांब होते, त्यात आमचे चालक सज्जाद साहेब काहीतरी काम उगवल्याने गाडी इथेच ठेवून श्रीनगरला परत गेले होते. ह्या पावसात आणि चिकचिकीमधे एवढे अंतर चालून कोण जाणार? पण फिकर नॉट. आमच्या केअरटेकर साहेबांनी लगेच एका हॉटेलला फोन लावून दिला आणि आम्ही जेवणाची ऑर्डर दिली. काही वेळात जेवण आलेही. आम्ही ते लगेच फस्त केले आणि गरम होणा-या त्या मजेशीर ब्लॅंकेटस्वर मस्त ताणून दिली.

गुलमर्गने आज आमची किंचीत निराशा केली असली तरी उद्या हे गाव ती कसर दामदुपटीने भरून काढणार यावर माझा १००% विश्वास होता.

उद्या? गुलमर्गचा तो प्रसिद्ध गोंडोला!

प्रतिक्रिया

एस's picture

6 May 2017 - 5:05 pm | एस

वाचतोय. पुभाप्र.

पैसा's picture

6 May 2017 - 9:23 pm | पैसा

वाचत आहे.

निशाचर's picture

6 May 2017 - 10:02 pm | निशाचर

पुभाप्र.