राजकवींना थोबाडाया . . .

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
4 May 2017 - 9:31 am

जमाना बिरुदांचा

एक जमाना होता विशेषतः महाराष्ट्रामधे ज्यावेळी प्रत्येक व्यक्तीला नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव या तीन गोष्टी पुरत नसत. पूर्ण नावामागे त्याला एखादे तरी बिरूद जोडावेसे वाटे. त्याशिवाय त्याच्या व्यक्तीमत्वाला किंवा जनमानसातल्या प्रतिमेला पूर्णत्त्वच आल्यासारखे वाटत नसे.

उदाहरणे अनेक आहेत.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भालाकार भोपटकर,
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, 'काळ'कर्ते शि म परांजपे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर,
प्रबोधनकार ठाकरे. इथे अनेकांना त्यांनी नेमके प्रबोधन काय केले असा प्रश्न पडू शकतो. पण प्रबोधन हे त्यांच्या वर्तमानपत्राचे नाव होते हे सांगावे लागते.

साहित्यसम्राट असे म्हटले की नरसिंह चिंतामण केळकर हे उत्तर सर्वांना ठाऊक असते. पण त्यांचे नेमके साहित्य काय हे मात्र अनेकांना सांगता येत नाही तरीही उल्लेख मात्र साहित्यसम्राट असा केला जातो.

लोकनायक बापूजी अणे, लोकमान्यांचे कर्नाटकातले एक अनुयायी होते. त्यांचा उल्लेख कर्नाटकसिंह गंगाधरराव देशपांडे केला जाई. नेमस्तांचे एक नेमस्त पुढारी होते. ते होते मुंबईचा सिंह फिरोजशहा मेहता. लोकमान्य, महात्मा, स्वातंत्र्यवीर अशी बिरुदे कुणीतरी घेतल्यावर काही जणांनी स्वतःच्या नावापुढे दे. भ. लावायला सुरुवात केली. देशभक्त शंकरराव देव. पण दे. भ. न लावणारे देशभक्त नसतात काय हा प्रश्न उरतोच.

चित्रपटक्षेत्रामधे कुणी चित्रमहर्षि तर कुणी चित्रपती असतात. आमचे गदिमा महाकवी ग. दि. माडगूळकर होते. शास्त्रीयच नव्हे तर सुगम संगीताच्या क्षेत्रातही काही जणांचा पंडित असा उल्लेख केला जातो. त्यांच्या पांडित्याशी त्या बिरुदाचा काही संबंध असेलच असे नाही.

पूर्वी असेच कुणी महात्मा तर कुणी महर्षि होवून गेले. विशेषतः रुळणारी दाढी राखणार्‍या लोकांना आपसूकच महर्षि, ऋषि किंवा ऋषितुल्य असे बिरुद हटकून मिळते. ते व्यक्तीमत्त्वाने ऋषि असलेच पाहीजेत असे नाही.

कुणा एकाचा उल्लेख बालगंधर्व झाल्याबरोबर इतरांनी उरलेली नावे रीजर्व करून टाकली. कुणी कुमार गंधर्व झाले, कुणी छोटा गंधर्व झाले.

आजकाल काही आमदार किंवा नगरसेवकांचा कार्यसम्राट इ उल्लेख होतो. लेखक विश्वास पाटील यांचा पानिपतकार असा उल्लेख होतो, तो रास्तही आहे.

काही वेळा माणूस छोटा पण त्याचे बिरुद मात्र मोठे असाही प्रकार होतो. आता ही असली बिरुदे नेहमीच लोक देतात असे नव्हे. मनमोहन नातू नावाचे एक कवी होते. त्यांच्या काळात राजकवी म्हणवून घेणारे अनेक जण होते. नातूंना लोककवी म्हटले जात असे. त्यांना कुणीतरी विचारले, हे बिरुद तुम्हाला कुणी दिले ? ते म्हणाले. असे कुणी बिरुद देत वगैरे नसते. आपले आपणच घ्यायचे असते. मग लोकही तसा उल्लेख करायला लागतात.
त्यांनी स्पष्टीकरण दिले
राजकवींना थोबाडाया
लोककवी मी पहीला झालो !

बिरुदे आणि उपाधींबाबत सध्या एवढेच बास !

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

माहितगार's picture

4 May 2017 - 10:10 am | माहितगार

:) बिरुदांची महती सांगणारा आणि मनमोहन नातूंची ओळख करून देणारा लेख आवडला. मराठी विकिपीडियावरील नोंदी नुसार त्यांचे खरे नाव गोपाळ नरहर नातू असे होते; 'मनमोहन' हे सुद्धा स्वतःस लावून घेतलेले आहे का माहीत नाही. आजच्या काळात बिरुदे बदालली पण बिरुदप्रेम कमी झालेले नाही आणि व्यक्तिपुजा म्हणाल तर ती कमी होण्याएवजी वाढलेलीच आहे (बिरुदप्रेम आणि व्यक्तीपुजा बोकाळली जाण्यातून ज्ञानकोश असूनही मराठी विकिपीडियासुद्धा सुटलेला नाही.)

नर्मदेतला गोटा's picture

4 May 2017 - 10:44 am | नर्मदेतला गोटा

रियासतकार सरदेसाई
ज्ञानकोशकार केतकर
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

माहितगार's picture

4 May 2017 - 10:15 am | माहितगार

कुणि बिरुदांची यादी बनवून दिल्यास मराठी विकिपीडियासाठी पाहिके आहे.

पैसा's picture

4 May 2017 - 11:17 am | पैसा

मनमोहन हे नाव त्यांनी स्वतः घेतलेले होते. पण लेखात दिलेल्या बहुतेक लोकांनी स्वतः बिरुदे लावून घेतली नव्हती. बाकी चालू द्या.

नर्मदेतला गोटा's picture

4 May 2017 - 12:07 pm | नर्मदेतला गोटा

लेखात दिलेल्या बहुतेक लोकांनी स्वतः बिरुदे लावून घेतली नव्हती

अगदी बरोबर !

गामा पैलवान's picture

4 May 2017 - 12:03 pm | गामा पैलवान

नगो,

लेखाबद्दल धन्यवाद. या लेखाच्या निमित्ताने माझी 'नीतिमत्तेचा महामेरू' व 'स्वयंघोषित धर्ममार्तंड' या स्वयंघोषित बिरुदांची पुनरपि उजळणी करून घेतो.

आ.न.,
-गा.पै.

कुणा एकाचा उल्लेख बालगंधर्व झाल्याबरोबर इतरांनी उरलेली नावे रीजर्व करून टाकली. कुणी कुमार गंधर्व झाले, कुणी छोटा गंधर्व झाले.

गंधर्व किती आहेत याची गणतीच नसावी. कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, आनंद भाटें: 'आनंद गंधर्व'. आता महेश काळेला कसला गंधर्व म्हणतात काय माहित? :प

बाकी, पंडीत पलुस्करांच्या 'भारत गायन समाजाच्या' पाटीवर त्यांना देवगंधर्व म्हटलेले आढळले. 'गायनाचार्य' ही पदवी त्यांना पुर्वीपासूनच असावी. देवगंधर्व ही उपाधी बालगंधर्व युगाच्या आधीपासून आहे की आता आता चिकटली गेली याबद्दल शंका आहे.

अत्रन्गि पाउस's picture

4 May 2017 - 12:56 pm | अत्रन्गि पाउस

हि भास्कर बुवा बखलेंना म्हटलेले आहे तो गायन समाजही त्यांचाच ...
पलुस्कर हे गंधर्व महाविद्यालयाशी संबंधित नाव

पुंबा's picture

4 May 2017 - 1:01 pm | पुंबा

हो हो... . क्षमस्व..
भास्करबुवा बखलेच म्हणायचे होते. धन्यवाद अत्रंगी पाऊसजी..

अत्रन्गि पाउस's picture

4 May 2017 - 12:56 pm | अत्रन्गि पाउस

हि भास्कर बुवा बखलेंना म्हटलेले आहे तो गायन समाजही त्यांचाच ...
पलुस्कर हे गांधर्व महाविद्यालयाशी संबंधित नाव

कपिलमुनी's picture

4 May 2017 - 1:03 pm | कपिलमुनी

नव्यानेच कळलेले राष्ट्रऋषी बिरूद लेखामध्ये न दिसल्याने निराशा झाली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 May 2017 - 3:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडल्या बिरुदावल्या.

-दिलीप बिरुटे

दिली बिरुदे हा आयडि कसा वाटतो?

नर्मदेतला गोटा's picture

5 May 2017 - 12:50 am | नर्मदेतला गोटा

धन्स

अस्वस्थामा's picture

4 May 2017 - 3:41 pm | अस्वस्थामा

पुण्यात एका फ्लेक्स वर 'पॅनेलसम्राट' अशी (स्वघोषित) उपाधी लावलेली पहायला मिळाली. :))
भरुन पावलो.. _/\_

बोका-ए-आझम's picture

4 May 2017 - 4:34 pm | बोका-ए-आझम

मिळाल्यावर तो सन्मान देशातल्या सर्व जनतेचा आहे असं म्हटलं होतं. त्यामुळे आपण आपल्या नावापुढे भारतरत्न लावायला हरकत नाही. तसं मिपाकर हे बिरूदही अभिमानास्पद आहे.

आनन्दा's picture

4 May 2017 - 7:50 pm | आनन्दा

तसं मिपाकर हे बिरूदही अभिमानास्पद आहे.

जोरदार अनुमोदन.

नर्मदेतला गोटा's picture

5 May 2017 - 1:00 am | नर्मदेतला गोटा

मराठीहृदयसम्राट आणि हिंदूहृदयसम्राट ही बिरुदे कोण देते

वाचूका's picture

6 May 2017 - 10:29 am | वाचूका

बरेचशे सहकारसम्राट आणि सहकार्शिरोमणी.... यांनी सहकारचे काय केले ते माहित नाही....

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2017 - 4:26 pm | धर्मराजमुटके

लेख आवडला.