काखेत कळसा ... सह्याद्रीला छोटासा वळसा

Primary tabs

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in भटकंती
3 May 2017 - 6:57 pm

काखेत कळसा .. सह्याद्रीला छोटासा वळसा ..

०१ मे .. सुटी ..

काल दिवसभर कौटुंबिक स्नेह सन्मेलन व संध्याकाळी cfu करांचे स्नेहमिलन .. अनलिमिटेड गप्पा .. रात्री घरी यायला उशीर
आज सुटी असूनही धड कोणती राईड करावी या बद्दल अनिश्चितता.. .
उशीरा आलेली जाग ..
उन्हाळ्यात योग्य असा सायकलिंग चा मुहुर्त टळलेला ...
मग पुर्वी जेथे सायकल ने गेलोय त्याच मार्गावर ..
स्कुटर ने केलेली अचानक भ्रमंती ..
खंडोबा .. म्हसा .. देवळोलीची विहीर ..
एका दमात पाहून दुपारी घरी आलो ..
एक मन खातंय .. सतत .. सुटी असून सॅडल पॅडल चा विरह ..
अख्या महाराष्ट्रातील सायकलिस्ट कुठे कुठे जाऊन आले आणि तू घरी बसलाहेस ...
छा .. हे काही बरे नव्हे ..
चल उतर खाली मार दोन चार पॅडल ..
मन म्हणेल तिकडे चल पण सॅडल पॅडल चा संपर्क होउ दे .
मग निघालो ..

फोटो १

परवानगी मिळतेच हल्ली निघायला ..
त्यात आज तर ९०/१०० किमी स्कुटर प्रवास एकत्र केलेला... त्यामूळे बॅलंस फूल..
*अस्मी* चा थोडा मेक अप केला व निघालो ...
अस्मी म्हणजे अस्मादिकांची सेकन्ड लव्हर ..
कुठे जायचं याबद्दल एकमत नाही .. हिचंही ..
पण जायचं याबद्दल मात्र ठाम .. दोघंही ... नव्हे नव्हे तिघंही .. घरवालीला ही पूर्ण खात्री .. आता हे दोघं सटकणार , या बद्दल ...
हेड , टेल लाईट्स , हवा , पाणी, सर्व सुरक्षा उपकरणे या सकट पाच वाजता लिप्ट ने खाली आलो अस्मी व मी ..
चलो .. कूछ अलग करते है ..असं म्हणत ..
दिवसभर ९०/१०० किमी *चाकपिट* झालेली . त्यातले काही किमी रहदारीतले .. त्यामुळे आता रहदारी चा रस्ता नको या बद्दल मी ठाम ..
अस्मी ची बिचारीची काही तक्रार नाही .. *मम* तू नेशील तिकडे मी तयार आहे यायला .. फक्त चल ..
सोसायटीच्या बाहेर पडल्यावर लगेच राईट टर्न घेतला ..
कमीतकमी रहदारीचा रस्ता म्हणून...
थोडा कॉंक्रीट चा रस्ता , थोडा मातीचा पण घट्ट असा पार करुन , पाईपलाइन रोड ला लागलो ..
डावी उजवीकडे वळायचं या बद्दल द्विधा मनस्थिती..
कुठेही वळलास तरी रहदारी आहेच ...
अस्मी म्हणाली सरळ चल ... माझं ऐक ..
काय हिम्मत ... नाही म्हणायची ...
निघालो ..
पालेगांव च्या भव्य कमानीतून पलिकडे गेलो ..
मला उगाचच अस्मीच्या तब्येतीची काळजी.. रस्ता कसा असेल , हिला झेपेल का .. वगैरे ..
पण ही आपल्याच मस्तीत .. मला घेउन सुसाट ..
अगं अगं xx .. मला कुठे नेशी असं म्हणे पर्यंत एक गाव आलेच ..
मस्त रस्ता .. दोबाजूला भाताची खाचरं गेल्या हंगामाचे खुंट मिरवत .. जमीन, नुकतीच पावसाची वाट पाहू लागलेली,
अजून पुर्ण भेगाळलेली नाही पण विरहाची जाणीव गालावर उमटू लागलेली ..
इतक्यात रस्ता संपला ..
आता काय ..
दोन चार पोरं गावातली सायकल भोवती जमा ...
किधर से आया ..
अरे मराठीत बोल .. मी इथलाच आहे ..
रस्ता संपला का ?
हो ..
आमची वाडी संपली ..
डावीकडे वळा ..पूढे दुसरं गाव आहे .. पुढचा रस्ता चांगला आहे ..
पोरांनी माहिती दिली .. एक नजर अस्मीवर त्यांची, हे सांगताना ..
डावीकडे पाहिले ..
थोडाच पण उभा चढ ..आहे त्या गिअर्स वर चढणं अशक्य .
थोडं पुढे जाऊन वळलो ... योग्य गिअर्स मध्ये आलो ..
झपकन चढाव संपवला ..
पोरांनी टाळ्या पिटल्या ..
माझ्या पेक्षा अस्मीच खूष झाली ..
चढ संपवून उजवीकडे वळलो ..मस्त पेव्हर ब्लॉक्स चा रस्ता ..कुणा थोर समाज सेवकाची कृपा ...असो.
वस्ती संपली अन पेव्हर ब्लॉक चा रस्ताही ..
आपला चिरपरिचित काळा डांबरी रस्ता सुरू झाला ..
सहज समोर नजर गेली ...आहाहा ..
तावली , मलंग यानी नटलेला सखा सह्याद्री अगदी हाकेच्या अंतरावर असल्यासारखा ...
मग थांबलोच नाही .. रस्ता संपेपर्यंत जायचेच असा निर्धार करुन दोघंही पळू लागलो (अस्मी व मी )
फोटोंचा मोह झालाच .. येताना काढू असे समजावत निघालो ..
फूस्स .. रस्ता संपत आल्याच्या खूणा दिसू लागल्या .. व सह्याद्रीही अगदी जवळ येऊ लागला ..
दोन चार गावकरी भेटले ..
आधी राष्ट्रभाषेतून मग मायबोलीत संवाद झाले ..
त्याचा मतितार्थ असा : ही धनगर वाडी .. गावाचं नाव बोहनोली ..

फोटो २

मलंगगड ला जायचं असेल तर येतो ..
हजार रुपयं लागतिल . ह्यो रस्ता आता संपला .. गाडी ठेवा आणि चालत निघा ...
अरे मला नाही जायचय गडावर ..
तुमच्या वाडीत रस्त्याचं काम चाललय असं समजलं म्हणून पहायला आलो ..
माझा निरुपद्रवी खोटारडेपणा ..
मग खुष झाले गडी ..
अगदी ताजी ताडी ही द्यायला तयार झाले ..
नको रे बाबा ...मी.
वस्तीतली लहान पोरं माझ्या ध्यानाकडे बघून हसताहेत ..

फोटो ३

फोटो ४

तीस पस्तीस वर्षांपूर्वी आपणही एखाद्या फॉरेनर कडे असेच पाहात होतो ..
तेव्हा त्यानां काय त्रास झाला असेल याची बोचणी आज मनाला होत्ये .. मनोमन त्यांची माफी मागितली..
मुलांशी गप्पा मारल्या .. नशिबाने थोड्या आवळा कॅंडी होत्या फ्रंट पाउच मध्ये त्या वाटल्या सर्वाना ..
आता रस्ताच संपला .. काय करणार ,म्हणून पाठ केली सह्याद्री कडे .
तो " बाबुल कि दुआए लेती जा" असे म्हणतोय असा भास मला सतत ...
चला ... सुखी संसारात रममाण व्हायला असे समजावत स्वतःला .. मी उदासपणे पॅडल मारतोय ..
मला सर्व समजतंय ... अशा थाटात .. अस्मी ही आता माझी पाठराखीण झालेली .. निमूटपणे ..
आता थोडा भानावर येउन चार दोन फोटो काढले ....

फोटो ५

फोटो ६

तिठ्यावर आलो ... शिरवली गाव ...
एका गावकऱ्यांने पाणी विचारले .. अगदी चहा चा ही आग्रह .. दोन चार मोठे पोट्टे सायकल भवती ..
मी पाणी पितोय तो वर एकाने अस्मीचा ताबाही घेतला ..
मी हताश ..
गिअर्स बदलू नको .. असे बजावतोय तो पर्यंत हा बेटा पसार ..
पण रस्ताच संपला म्हणून आला परत ..
मग दुसरा ..
तो पर्यंत गावकरी व मी यांच्यात सायकलिंग कसे चांगले यावर परिसंवाद...
मग निरोप घेउन निघालो ..
परत येइन असे सांगून ..
आवडलेल्या ठिकाणांचे फोटो काढत .. रमत गमत ..

फोटो ७

फोटो ८

सात च्या आत घरात ...दोघंही ...
इतकी छोटी तरीही इतकी हवी हवीशी वाटणारी राईड केल्याचं , सह्याद्रीच्या एका कोनाचं का होइना मनोसक्त दर्शन झाल्याचं समाधान लाभलं..
अस्मीलाही समजलं असावं .. या येड्याला काय भावतंय ते .
उगाच माझ्यामुळे तू व सह्याद्री यांच्या मैत्रीत दुरावा नको ..
असे भाव तिच्या ही मनात ..
रहदारीचे रस्ते सोडून हाकेच्या अंतरावर असलेल्या सह्याद्रीकडे सायकली वळाव्यात म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न ...
आजच्या महाराष्ट्र दिनी ..

प्रतिक्रिया

एस's picture

3 May 2017 - 7:12 pm | एस

भारी!

दुर्गविहारी's picture

3 May 2017 - 7:22 pm | दुर्गविहारी

वा ! मस्तच. वाचायला फारच मजा आली.

स्वच्छंदी_मनोज's picture

3 May 2017 - 8:47 pm | स्वच्छंदी_मनोज

भारीच.. मस्त राईड

प्रमोद देर्देकर's picture

3 May 2017 - 8:57 pm | प्रमोद देर्देकर

लय भारी काका!

दशानन's picture

3 May 2017 - 9:33 pm | दशानन

वाह!!!
नशीबवान आहात!

पैसा's picture

3 May 2017 - 10:04 pm | पैसा

भटक्या खेडवालांच्या नावावर टाकून द्या ओ संपादक! फारच झकास लिहिलय!

#काल भटक्या खेडवाला यांना भेटून त्यांच्या " हाइब्रिड" टाइप सायकलची माहिती घेतली. ( फक्त माहितीच घेणार, सायकलिंग नाही करणार! )ही सायकल चांगला आणि मातीचा धोंडाळ रस्ता दोन्हीकडे चालते. टायरस जाडजूड आहेत. आठ गिअर्स आहेत. डिस्क ब्रेक्स आहेत. सायकलचे वजन दहा किलो असेल.
( दुसरी एक रेसर सायकल असते ती चारेक किलो वजनाची असते परंतू ती फक्त चांगल्या गुळगुळीत रस्त्यांवरच धावू शकते)
( आणखी एक रेसर पुर्वी पाहिलेली त्याला फक्त पेडल ब्रेक्स होते. )
भटक्या खेडवाल्यांनी लेख टाकायला सांगितला होता.
सायकलवाल्या कुणितरी सायकलींचा तांत्रिक-यांत्रिक माहितीचा लेख फोटोसह द्यायला पाहिजे.
अक्सेसरिज - हेडलाइट्स, पंप, मोबाइल अॅप वगैरेचा वेगळा लेख द्या.

इरसाल कार्टं's picture

3 May 2017 - 10:04 pm | इरसाल कार्टं

मस्त वाटलं वाचून.

वेल्लाभट's picture

3 May 2017 - 10:23 pm | वेल्लाभट

प्रेरक ! सॉलीड.

भ ट क्या खे ड वा ला's picture

3 May 2017 - 11:30 pm | भ ट क्या खे ड वा ला

धन्यवाद , कंजूस सर

भ ट क्या खे ड वा ला's picture

3 May 2017 - 11:30 pm | भ ट क्या खे ड वा ला

धन्यवाद , कंजूस सर

सायकलींची माहिती "मोदक" यांचा धागा पाहा = http://www.misalpav.com/node/28858

किसन शिंदे's picture

4 May 2017 - 11:07 am | किसन शिंदे

पहिल्या फोटोत डावीकडे वरच्या बाजूस नानाचा अंगठा दिसतोय नाणेघाटातला.

तुमचं भारी कौतुक वाटतं.

सुधांशुनूलकर's picture

4 May 2017 - 5:44 pm | सुधांशुनूलकर

चालत राहा
(सायकल) चालवत राहा
लिहीत राहा

खास भ खे टच असलेली वाक्यं खूप आवडली -
एक मन खातंय .. सतत .. सुटी असून सॅडल पॅडल चा विरह ..
*चाकपिट*
तीस पस्तीस वर्षांपूर्वी आपणही एखाद्या फॉरेनर कडे असेच पाहात होतो ..
तेव्हा त्यानां काय त्रास झाला असेल याची बोचणी आज मनाला होत्ये .. मनोमन त्यांची माफी मागितली..
अस्मीलाही समजलं असावं .. या येड्याला काय भावतंय ते .
उगाच माझ्यामुळे तू व सह्याद्री यांच्या मैत्रीत दुरावा नको ..
असे भाव तिच्या ही मनात ..

शाली's picture

5 May 2017 - 11:14 am | शाली

मस्त.

यमगर्निकर's picture

6 May 2017 - 2:45 pm | यमगर्निकर

छान

वरुण मोहिते's picture

6 May 2017 - 3:03 pm | वरुण मोहिते

बाकी ताजी ताडी एक घोट तरी मारायची .असा आग्रह तुम्ही मोडला ह्या एका वाक्याचा निषेध .
सफर आवडली .