भटकंती सह्याद्रीच्या कुशीतली...K2S ट्रेक

Primary tabs

sagarshinde's picture
sagarshinde in भटकंती
1 May 2017 - 9:07 pm

(ट्रेकिंग बद्दल माझे अनुभव लिहिण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे त्यामुळे व्याकारनिक चुका सांभाळून घ्या हि विनंती :-) )

मागे काही दिवसा पूर्वी सत्याचा फोन येवून गेला "K2S ट्रेक ला जातोय माझ्या भटक्या ग्यांग बरोबर तुही येतोस का? तुझी भटकी ग्यांग घेवून" मग मीही ट्रेक ला जायचं ठरवलं पण ग्यांग जमवता आली नाही माझी पांडव सेना घेतली यात माझ्याबरोबर अक्षय, यश, दीपक, मनीषा, आदित्य सामील झाले. ट्रेकचा ठरलेला दिवस आला आणि दुपारी १२ वाजता आम्ही ट्रेन ने पुण्याला निघालो, या प्रवासात माझ्या बरोबर सत्या बरोबरचे नेहमीचे भटकेही होते. ट्रेन मध्ये प्रवास करताना इतिहासात घडलेला शिवाजी महाराजांचा तो प्रसंग आठवला ज्याचा संबध कात्रज च्या घाटाशी येतो..

"शिवाजी महाराजांनी लाल महालात अचानक हल्ला करून शाहिस्तेखानाची बोटे कापली आणि गनीम गनीम ओरडत तेथून पळ काढला. त्यांनी खानाला चकवा देण्यासाठी आधीच नियोजन केले होते थोड पुढे गेल्यावर कात्रज घाटातल्या दबा धरून बसलेल्या आपल्या मावळ्यांना इशारा केला, मावळ्यांनी तेथील आजूबाजूला झाडांवर कंदील टांगले. त्यावेळी शिवाजी महाराजांनी पर्यायी मार्गाने सिंहगडाकडे कूच केले. त्यांचा पाठलाग करणारे खानाचे मुघल सैनिक कंदिलाप्रकाशाच्या दिशेने घाटाकडे गेले. खूप वेळानंतर मुघलांना त्यांच्या मूर्खपणाची जाणीव झाली व ते माघारी फिरले आणि सिंहगडावर हल्ला करायला निघाले. मुघलांनी सिंहगडचा पायथा गाठला. पण तोपर्यंत महाराज त्यांच्या तोफेनिशी गडावर सज्ज होते. मुघल तोफेच्या आवाक्यात येताच पहिला बार उडाला आणि धांदल उडाली. यात कित्येक गेले कित्येक जखमी झाले."

हा प्रसंग मनात घोळत पुणे कधी आल हे समझलच नाही, पुण्यामध्ये सत्य मी अन बाकीचे भटके जोडीदार भेटले. मग सगळे ऐकत्र येवून स्वारगेटला गेलो तिथे आणखी काही जोडीदार आमच्यात सामील झाले, स्वारगेट मधूनच आम्ही कोंडणपूर ला जाणारी बस पकडली. जुन्या पुणे-सातारा रस्त्या वरील कात्रजचा जुना बोगदा जिथे संपतो तिथे आम्ही उतरलो. इथूनच या ट्रेकला सुरुवात होते, सार्वजन एकत्र आले कि नाही याची सत्य अन भूषण याने खात्री करून घेतली, आणखी ३-४ जन पाठीमागून येता आहेत अस सत्याने आम्हाला सांगितलं. बोगाद्याच्या वरच्या बाजूला पद्मावती देवीचा मंदिर आहे तिथे आम्ही जावून थांबलो. इथून रात्री अख्ख पुणे लखलखताना दिसत, डोळ्यांचे पारणे फिटण्यासारखी रोशनाई दिसते इथून. रात्रीचे साधारण ८ वाजलेले होते एकत्र जमलेल्या भटक्याची संख्या मोजली आकडा ६० पर्वंत पोहचला, त्यातील बरेचसे भटके हे नवीन होते काही तर पहिल्यांदाच ट्रेकिंग ची मजा घेणार होते, जमलेल्या सगळ्या भटक्यांनी आपली स्वतःची ओळख करून दिली, सत्याने ट्रेकिंग चे काही महत्वाचे नियम सांगितले, पुष्कराज भूषण (पुण्याचा) याला रा ट्रेक च्या दरम्यान लीड करायला सांगितले मी अन सत्य मध्ये राहणार होतो तर ग्रुप च्या पाठीमागे सचिन अन भूषण (मुंबईचा) यांना राहायला सांगितले.

लांबच लांब अशा वर खाली वर खाली करत जाणाऱ्या डोंगराकडे आम्ही सगळ्यांनी वाघजाईचे दर्शन घेऊन कूच केले. एप्रिल महिना संपत आलेला असला तरी या दिवसात उन्ह्चा पार हा चाडलेलाच असतो अन अशा या रणरणत्या उन्हाळ्यात दिवसभराचे ऊन, त्याउलट रात्रीचे हे आल्हाददायक वातावरण आणि मंद वाऱ्याच्या झुळूक, आमच्या सगळ्या भटक्यांच्या मनाला वेड लावून गेले आणि आम्ही आमच्या भिंगरया लागलेल्या पायांना वाट मोकळी करून दिली…सुरु झाली आमची अजून एक अविस्मरणीय भटकंती... भटकंती सह्याद्रीच्या कुशीतली...!!

आमच्यापैकी मी अन पुष्कराज ने हा ट्रेक या अगोदर केलेले होता पण बाकी ग्रुप मधील कोणीही याच्याआधी या वाटेला कधी भटकलेलं नव्हतं, त्यामुळे बाकी सगळ्यांसाठी रस्ता पूर्णपणे नवखा होता, ट्रेक सरू झाल्यावर मध्ये लागलेली बऱ्यापैकी रुंद वाट संपली आणि परत चढ सुरु झाला, पहिला डोंगर आम्ही चाढाल्यला सुरवात केली त्या डोंगराला हत्ती डोंगर म्हणतात. पहिल्याच डोंगराला सगळ्यांना पहिला दम लागला, वाटेत मला दमछाक झालेली श्रेय दिसली, एकमेकांना उत्साह देत आम्हीही पुढे सरकत होतो, रात्रीच्या अंधारात वाट हि अस्पष्ट होती, मला अजूनही सिंहगडावरील लाईट दिसत नव्हता, अरुंद अशा पायवाटेने चालत आम्ही पहिला हत्ती डोंगर चढलो. माथ्यावर पोहचल्यावर आम्हाला सिंहगडावरील लाईट दिसली, माथ्यावर चढेपर्यंत वाऱ्याचा मागमुसही नव्हता पण माथ्यावर पोहोचल्या पोहोचल्या वाहणाऱ्या थंड आल्हाददायी अशा वाऱ्यानी आमचे स्वागत केले. माथ्यावरून सिंहगडपर्यंत दिसणारी मोठीच्या मोठी डोंगरांची लांबच लांब रांग रात्रीच्या अस्पष्ट स्पष्ट दिसत होती, आता सोबतच्या भटक्यां बरोबर आज रात्री या सह्याद्रीच्या डोंगरांच्या अंगा खांद्यावर उद्या मारत भाटकायच, याच विचाराने मन सुखावलं. माथ्यावर थोडा वेळ थांबलो. माझ्या बरोबरच्या भटक्यांना गडावर असणारया दूरदर्शनच्या खांबावरचा लाईट दिशादर्शक दाखवून आपल्याला तो गड गाठायचा हे समजावलं. आमच्या पुढे असणारा पुष्कराज हा तो डोंगर उतरून पुढे सरकला होता, सत्याने ट्रेक च्या सुरवातीलाच माझ्याकडे ते "वकी टाकी" काय ते दिला होत (ते कस वापरायच हे पण मला निट माहित नव्हत) त्याच "वकी टाकी" न मी सत्याला पहिला डोंगर चढल्याच सांगितलं.

माथ्यावर एक मळलेली वाट दिसली त्या दिशेने पुढे मी आणि मागे आमची भटकी गँग असे करत आल्हाददायक वाऱ्याचा मजा घेत एकमेकांना मदत करत आम्ही तो डोंगर उतरायला सुरवात केली. थोड्याच वेळात माथा उतरलो सगळी पोर उत्साही होती उत्साहाने पाय उचलत रपरप चालत होती. आम्हा भटक्याची वारी सुरु होती. आमच्या बरोबरचे काही भटके मागेच राहिले होते तर काही पुढे गेले होते. अजून दोन तीन छोट्या मोठ्या डोंगरांचा पल्ला गाठत एका मोठ्या पठारावर येऊन पोहोचलो इथेच माझ्या बरोबरच्या सगळ्या भटक्यांना पुन्हा एकत्र केल थोडा आराम केल काहींनी तर लगेच थंडगार जमिनीला पाठ टेकवली मी थोडी घाई करत होता, "चला पटकन, खूप चालायचय आपल्याला थोडे पुढे जाऊन आराम करूयात". पोरं उठली आणि आम्ही पुन्हा पायपीट चालू केली. अजून एक डोंगर चढून माथ्यावर आल्यवर मी पाहील कोणाच्याच तोंडातुन शब्द निघेना, सगळीकडे एकदम शांतता. आता मात्र सगळ्यांनाच जमीनीला पाठ टेकवण्याची नितांत गरज भासत होती. प्रचीही "मला झोप आलीय, आपण कुठे तरी आराम करूयात का थोडावेळ" अस म्हणत होती, श्रेय सुरवातीला मागेच होती पण नंतर मात्र तिने कंबर खचली अन जमेल तसा जोर लावून ती चालत होती.

भूषण मागे होता तो एकठिकानी रस्ता चुकलेला तो पुन्हा परत ट्रेक रूट वर आला, पुष्कराज आमच्या पासून खूप पुढे गेलेला जेवणाची वेळ झालेली सगळ्यांना खूप भूक लागली होती मलाही भूक लागली होती. पुष्कराज ला सांगून आम्ही पुढे एका ठिकाणी जेवायला थांबलो, तिथे आम्ही डबा उघडला. डब्यात चपाती आणि भेंडीची भाजी, पुरणपोळी होती, सत्याने बरोबर श्रीखंड आणलेला होता, सगळ्याने जेवणाचा मनमुराद आनंद घेतला थोडावेळ आराम केला अन पुन्हा ट्रेक ला सुरवात केली, पुढे एक दोन डोंगर चढून मी एका डोंगराच्या माथ्यावर पोहचलो तो आठवा डोंगर होता त्यावेळी सत्य वा त्याबरोबरचे भटके आमच्या मागील डोंगराच्या माथापर्यंत पोहचले होते भूषण हि त्याच्या मागे होता आठवा डोंगर आम्ही उतरून गेली त्याचवेळी मला सत्याचा त्या "वकी टाकी" वर मेसेज आला,
"सागर हा राईट साईडला जाणारा रस्ता बरोबर आहे का? आम्ही हा रस्ता पकडून खूप पुढे आलो आहोत"
झाल आता सत्या रस्ता चुकालेलाल होता नक्की कुठे जायचे हे त्याला समझत नव्हते शेवटी माझ्या बरोबर असलेल्या मित्रांना मी त्याच ठिकाणी थांबवून मी परत त्याला रस्ता दाखवण्यासाठी माघारी फिरलो, डोगर माथ्यावारती पोहचून जवळील टॉर्च ने त्याला दिशा दाखवली त्या दिशेने तो परत वरती आला यामुळे भूषणलाही बराच वेळ मागे थांबव लागल, सत्य वरती पोहचल्यावर पुन्हा आम्ही चालायला सुरवात केली.

रात्रीच्या या प्रवासात एकदम शांतता होती बरोबरचे सगळे भटके थकलेली होते, कोणालाही आता पाय उचलणे शक्य नव्हत, तरीसुद्धा प्रत्येक भटका जोर लावून चालत होता आता शेवटचे तीन डोंगर राहिले होते, तिसरा डोंगर माथा चाडल्यावर पश्चिमेकडे असणाऱ्या सिंहगडाचे आणि पूर्वेकडे नित्यनेमाने उगवणाऱ्या सुर्यनारायणाच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या पहाटेच्या फुटलेल्या तांबड्याचे दर्शन झाले. सगळ्यांनी याच डोंगराच्या वरून सूर्योदय पहायचा हट्ट केला पण अजून भरपूर मजल मारायची होती म्हणून याच डोंगराचा माथा उतरून परत पुढचा डोंगर चढायला सुरुवात केली. आमच्या उजवीकडे खडकवासला जलाशय, पहाटेच्या धुकट वातावरणाची चादर पांघरून सकाळच्या कोवळ्या उन्हाची वाट पाहत अजूनही बिछान्यात असल्यासारखे जाणवले. अजून २ डोंगर चढून उतरायचे होते. थोड्याच वेळात रात्रभर पाय मोडेपर्यंत भटकंती केलेल्या डोंगरांच्या कुशीतुन सुर्योद्यास सुरवात झाली आणि लाल-तांबड्या ठिपक्याने आम्हाला आपले दर्शन दिल माथ्यावर आलो तेव्हा सिंहगड कोवळं उन्हं पडल्यामुळे सोनेरी रंगात न्हाऊन निघाला होता. मागे वळून पहिले तर सह्याद्रीतली ही भुलेश्वर डोंगररांग पावसाची आतुरतेने वाट पाहत होती. सुर्यनारायणाच्या दर्शना नंतर आम्ही पुन्हा एकदा चालायला सुरवात केली.

शेवटचा डोंगर उतरून आल्यावर पायथ्यालाच मस्त ताक प्यायलो, थोडावेळ आराम करून आम्ही पुन्हा गडाच्या दिशेने चालायला सुरवात करत करवंदाच्या झाडीत शिरलो. सकाळी सकाळी डोंगरातल्या काळ्या मैनेला फस्त (करवंद) करून नाश्ता आटोपला, माझ्या बरोबर श्रेय अन सायली या दोघे चालत होत्या. करवंदाच्या झाडीतुन बाहेर पडत आम्ही डांबरी रस्त्याला लागलो. "चौदाएक डोंगरांची पायपीट करून आल्यानंतर या सपाट रस्त्याला चालणे म्हणजे स्वर्गसुखच" डांबरी रस्त्यावरून चालत आम्ही पुढे एका छोद्याशा हॉटेल जवळ येवून थांबलो नंतर इथून आम्ही सगळे थोडेथोडे गाडी करून गडाच्या पायथ्याला पोहचलो पायथ्या लागत असलेल्या हॉटेलमध्ये जावून सगळे जन फ्रेश जाले अन कांदे पोहे, कादाभाजी ब्रेकफास्ट केला, पावसाळ्यात हाच सिंहगड हिरवी शाल पांघरलेला असतो, ज्याचे अनोखे सौंदर्य अनुभवायला अनेक भटक्याची तसेच पर्यटकाची गर्दी होते, या दिवसात गडावर धो-धो पावसात गरमागरम पिठलं-भाकरी आणि कांदा भज्यांची रेलचेल असते. काहीवेळा अंतिम लक्ष्यापेक्षा ते लक्ष्य गाठण्यासाठी केलेली धडपड, खटाटोप अधिक सुखावह ठरते आणि याचाच अनुभव आज माझ्या बरोबरील सगळ्या भटक्या मित्रांना आला. सगळ्याची आवर आवर झाल्यावर गडफेरी मारायला जायचं ठरलं.

सिंहगड उर्फ कोंडाणा. "आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे." अस म्हणत मोजक्या मावळ्यानिशी गडावर यशवंती नावाच्या घोरपडीच्या मदतीने चढून गडावर विजय मिळवणाऱ्या वीर तानाजीच्या शौर्याची आठवण करून देणारा कोंडाणा! स्वराज्याच्या अनेक चढउताराची साक्ष असणारा कोंडाणा! परंतु आता दुर्दैवाने वीकेंड ला मौज-मजा करण्याचे ठिकाण बनलेला कोंडाणा? अशी गात झालीय या गडाची .....असो तर बापूजी देशपांडे यांच्या मदतीने महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. त्यानंतर शहाजी महाराजांची सुटका, पुरंदरचा तह, संभाजी महाराजांचा मृत्यु, अशा एक-अनेक कारणांमुळे तो मुघलांकडून स्वराज्यात आणि स्वराज्यातून मुघलांकडे वाऱ्या करत होता. शेवटी ब्रिटिशांनी जिंकुन घेतला.

आम्ही गड फिरायला सुरुवात केली. लोकमान्य टिळकांचा वाडा पाहायला अगोदर निघालो "लोकमान्य टिळकांचा वाडा बद्दल असं ऐकल आहे कि ही जागा टिळकांनी एका रामलाल नाईक नावाच्या व्यापाराकडून घेतली." सध्या वाडा बंद करून ठेवलाय, पाहता येत नाही. राष्ट्रपिता आणि लोकमान्यांची भेट या वाड्यावर झाली होती. वाडा पाहून झाल्यावर (बाहेरूनच) आम्ही छत्रपती राजारामांच्या समाधीकडे वळलो. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी सिंहगडावरच निधन झालेल्या राजारामांची समाधी राजस्थानी पद्धतीने बांधली आहे. आजुबाजुचे दोन-तीन पाण्याचे टाके स्वच्छ होण्याची वाट पाहत आहेत. समाधी पाहुन तानाजी स्मारका कडे चालायला लागलो. स्मारक दर्शन करून झाल्यावर आम्ही कल्याण दरवाजाही पहिला, अशा अनेक ऐतिहासिक वास्तु बघुन आम्ही परत फिरून अजुन एका अविस्मरणीय भटकंतीची आठवण मनात साठवुन आम्ही परतीची वाट धरली.

प्रतिक्रिया

किती किमी आहे? फोटोही टाका!

दुर्गविहारी's picture

2 May 2017 - 12:54 pm | दुर्गविहारी

छान वर्णन केल आहे, पण थोडे फोटोही टाका. हा पावसाळी ट्रेक मानला जातो. सध्या या भागात टेकड्या तासून बंगले बांधण्याचे काम जोरात सुरू आहे. कदाचीत हा रुटही काही दिवसांनी बंद होइल. या पुर्ण रस्त्यात पाणी उपलब्ध नाही हे महत्वाचे.
फक्त एका चुकीची दुरुस्ती करतो. सिंहगडावर तानाजीची समाधी नसुन स्मारक आहे. तानाजीची समाधी रायगड जिल्ह्यात महाबळेश्वर पोलादपुर रस्त्यावरील घाटापासुन आत उमरठला आहे.

sagarshinde's picture

3 May 2017 - 8:57 pm | sagarshinde

तानाजी स्मारका कडे चालायला लागलो. स्मारक दर्शन करून झाल्यावर आम्ही कल्याण दरवाजाही पहिला

दुरुस्ती केली

सध्या या भागात टेकड्या तासून बंगले बांधण्याचे काम जोरात सुरू

:(

पाटीलभाऊ's picture

3 May 2017 - 2:18 pm | पाटीलभाऊ

K2S बद्दल अजून थोडे तपशीलवार येऊ द्या.

पैसा's picture

3 May 2017 - 10:10 pm | पैसा

छान लिहिलय!

यमगर्निकर's picture

20 May 2017 - 12:21 pm | यमगर्निकर

छान ट्रेक झाला तुमचा