न्यूरेम्बर्ग - भाग ३

Primary tabs

अफगाण जलेबी's picture
अफगाण जलेबी in जनातलं, मनातलं
1 May 2017 - 6:11 pm

न्यूरेम्बर्ग - भाग २

न्यूरेम्बर्ग - भाग ३

२० नोव्हेंबर १९४५ या दिवशी खटल्याला प्रत्यक्ष सुरुवात होण्याआधी अनेक पडद्यामागच्या घडामोडी घडल्या. खटला सुरु होण्याच्या साधारण एक आठवडा आधी रशियन सरकारी वकील रुदेन्कोला मलेरिया झाल्याचा निरोप न्यायाधीशांना मिळाला. ब्रिटिश आणि अमेरिकन वकिलांचा आणि न्यायाधीशांचा अर्थातच याच्यावर विश्वास बसला नाही. ‘ हा राजनैतिक मलेरिया असावा ‘ असं मत ब्रिटिश परराष्ट्र खात्याने व्यक्त केलं. दुसरीकडे सर्व आरोपींच्या वकिलांनी या न्यायालयाच्या वैधतेला आव्हान देणारी एक याचिका दाखल केली. युद्ध हे कुठल्याही आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार गुन्हा नसल्याचं त्यांचं मुख्य प्रतिपादन होतं. अमेरिकन्स आणि ब्रिटिश यांची मात्र खटला वेळेवर चालू होऊन वेळेवर संपावा अशी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी दोन गोष्टी केल्या. एकीकडे रशियन वकिलांना रुदेन्कोला झालेला मलेरिया हे नाटक असल्याचं वर्तमानपत्रांमध्ये जाहीर करू अशी धमकी दिली आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या सनदेमधील कलम ३ च्या अन्वये न्यायालयाच्या अधिकाराला कोणत्याही प्रकारे आव्हान देता येणार नाही हे जाहीर केलं आणि आरोपींच्या वकिलांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. आता यापुढे कुणालाही या न्यायालयाच्या आणि या खटल्याच्या वैधतेबद्दल शंका घेता येणार नव्हती.

या दोन्ही कडक उपाययोजनांचा अपेक्षित परिणाम झाला. आरोपींच्या वकिलांनी निमूटपणे खटल्याच्या कामकाजावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आणि रुदेन्कोनेही आपला मलेरिया आश्चर्यकारकरीत्या बरा झाल्याचं जाहीर केलं.

२० नोव्हेंबर १९४५. न्यायालय,त्याच्याजवळ असलेला आणि सर्व कैद्यांना जिथे ठेवण्यात आलं होतं तो तुरुंग आणि तुरुंग आणि न्यायालय यांच्यामधला रस्ता – या सर्व ठिकाणी कडेकोट बंदोबस्त होता. जर्मन सैन्याचा एक ख्यातनाम सेनानी एर्विन रोमेलची भाची न्यायालयाच्या वाचनालयात काम करत होती. तिने अशी अफवा पसरवली होती की काही कडवे बव्हेरियन नाझी आपल्या नेत्यांची दोस्तराष्ट्रांच्या कैदेतून सुटका करण्याचा निकराचा प्रयत्न करतील. त्यात काही तथ्य नसल्याचं तपासाअंती दिसून आलं होतं. पण तरीही कैद्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणाऱ्या कर्नल अँड्रसला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळे ज्याला कुणाला त्या दिवशी खटल्याचं कामकाज पाहायचं होतं, त्याला असंख्य चेक पॉईंटस् आणि शेकडो पहारेकरी यांचे अडथळे पार करून जावं लागलं. या खटल्यामधलं नाट्य जगातल्या प्रसारमाध्यमांच्या नजरेतून अर्थातच सुटलं नव्हतं. त्यामुळे जवळपास २३ देशांच्या प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हा खटला कव्हर करायला न्यूरेम्बर्गमध्ये आले होते. अमेरिकन टेलिव्हिजन नेटवर्क सी.बी.एस. कडून दिग्गज पत्रकार हॉवर्ड स्मिथ आणि सुप्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार विल्यम शिरर उपस्थित होते. शिरर युद्धापूर्वी बर्लिनमध्येच काम करत होता. १९४१ मध्ये जर्मनीने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारल्यावर त्याला बर्लिन सोडावं लागलं होतं. बर्लिनमधल्या परिस्थितीचं वर्णन करणारी त्याची बातमीपत्रं अमेरिकेत लोकप्रिय होती. आता तो (त्याच्याच शब्दांत सांगायचं तर) या कथेला पूर्णविराम द्यायला आला होता. लाईफ नियतकालिकाने प्रसिद्ध कादंबरीकार जॉन डॉस पासोसला पाठवलं होतं. न्यूयॉर्कर मासिकाच्या वतीने जॅनेट पार्कर आणि रिबेका वेस्ट या दोघीजणी होत्या. या सुपरस्टार्सशिवाय अजूनही अनेक पत्रकार, लेखक, व्यंगचित्रकार आणि नाटककार हा अभूतपूर्व खटला बघण्यासाठी न्यूरेम्बर्गला पोचले होते.

या सगळ्या पत्रकार आणि लेखकांनी या खटल्याच्या सुरुवातीबद्दल एकच शब्द वापरलेला आहे – जाणीवपूर्वक आणलेलं गांभीर्य. न्यायालयाच्या इमारतीच्या खिडक्यांवर गर्द हिरव्या रंगाचे पडदे लावले होते. कर्नल अँड्रसने त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या सर्व सैनिकांपैकी सर्वात धिप्पाड आणि उंच सैनिकांची प्रत्यक्ष न्यायालयात नियुक्ती केली होती. या सैनिकांच्या हातात पांढऱ्याशुभ्र रंगाच्या लाठ्या होत्या आणि सकाळ असली तरी सगळे ट्यूबलाईट्स चालू होते. हे अर्थातच या खटल्याचं चित्रीकरण करणाऱ्या कॅमेऱ्यांसाठी होतं.

सकाळी दहाच्या ठोक्याला या ऐतिहासिक खटल्याला सुरुवात झाली. सुरुवातीला न्यायमंडळाचे अध्यक्ष सर जॉफ्री लॉरेन्स यांनी या खटल्याच्या कामकाजाशी संबंधित असणाऱ्या सर्वांना त्यांचं कर्तव्य कुठल्याही भीती किंवा प्रलोभनांना बळी न पडता कायदा आणि न्याय यांचं पावित्र्य राखून बजावण्याची आठवण करून दिली. यानंतर आरोपींवर निश्चित करण्यात आलेल्या आरोपांचं वाचन करण्यात आलं. ही अर्थातच औपचारिकता होती कारण सर्व आरोपींना जवळपास एक महिन्याआधी त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांची प्रत मिळाली होती. हे वाचन चालू असताना सर्वांचं लक्ष साहजिकच सर्व आरोपींकडे होतं.

गोअरिंग, कायटेल आणि जोड्ल जर्मन सैन्याच्या गणवेशात होते. त्यावर कोणत्याही प्रकारची पदकं किंवा इतर तामझाम नसल्यामुळे त्यांचे गणवेश जरा विचित्र वाटत होते. बाकीच्या आरोपींनी सूट घातले होते. फ्रिक एक भडक रंगाचं चेक्स असलेलं जॅकेट घालून आला होता. आरोपांचं वाचन चालू असताना गोअरिंगच्या चेहऱ्यावर कंटाळल्याचे भाव होते. बाकी आरोपींचे चेहरे बिर्विकार होते. फक्त माजी परराष्ट्रमंत्री रिबेनट्रॉपला प्रचंड घाम येत होता आणि माजी अर्थमंत्री वाल्थर फंक अधूनमधून हुंदके देत होता. प्रेक्षकांपैकी बहुसंख्य लोकांनी हजार वर्षे राज्य करण्याची वल्गना करणाऱ्या नाझी थर्ड राईशबद्दल आणि त्याच्या शिलेदारांबद्दल फक्त ऐकलं होतं. त्यातल्या प्रमुख सत्ताधीशांना याचि देही याचि डोळा बघून बऱ्याच जणांची निराशा झाली. विल्यम शिरर लिहितो – Shorn of the power and the glory and the glittering trappings of Nazidom, how little and mean and mediocre they look.’

खटल्याचा पहिला दिवस आरोपांच्या वाचनात गेला. दुसऱ्या दिवशी सर्व आरोपींना हे आरोप मान्य आहेत किंवा नाहीत हे विचारलं जाणार होतं आणि त्यांची उत्तरं अधिकृतरीत्या न्यायालयाच्या कामकाजात नोंदवली जाणार होती. सुरुवात झाली आरोपी क्रमांक १ – हर्मन गोअरिंगपासून. त्याला आपल्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांविषयी बरंच काही सांगायचं होतं, पण सर लॉरेन्सनी त्याला थांबवलं आणि फक्त ठेवलेले आरोप मान्य की अमान्य तेवढं सांगायला कडक शब्दांत सुनावलं. विजेत्या दोस्तराष्ट्रांमध्ये आणि जर्मनीमध्येही अनेकांचा या खटल्याला या कारणामुळे विरोध होता, की नाझी आरोपी नाझीवादाचा प्रचार करण्यासाठी या खटल्याचा व्यासपीठाप्रमाणे वापर करतील. त्या सर्वांना सर जॉफ्री लॉरेन्स यांच्या या कृतीमुळे उत्तर मिळालं.

मात्र त्याचवेळी सर लॉरेन्सनी गोअरिंगला त्याला न्यायालयात जे म्हणायचं होतं, ते लिखित स्वरुपात वर्तमानपत्रांना द्यायला परवानगी दिली आणि त्याप्रमाणे गोअरिंगचं ‘ भाषण ‘ वर्तमानपत्रांमध्ये छापून आलं. त्यावरून तो पुढे आपला कशा प्रकारे बचाव करणार आहे त्याचीही झलक सर्वांना मिळाली. त्याच्या वक्तव्याचा साधारण आशय असा होता – माझ्यावर जे आरोप ठेवण्यात आलेले आहेत, त्या सर्व आरोपांचा मी अत्यंत ठामपणे इन्कार करतोय. मी जे काही केलं त्याची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे, पण त्या गोष्टींना गुन्हा मानायला माझा विरोध आहे. त्याशिवाय ज्या लोकांना मी वैयक्तिकरीत्या ओळखत नाही, त्यांच्या कृत्यांची जबाबदारी मी कदापि घेणार नाही.
बाकी सर्व आरोपींनीही त्यांच्यावर ठेवलेले सर्व आरोप फेटाळून लावले. हे अपेक्षित होतंच.

जेव्हा प्रमुख प्रॉसिक्युटर रॉबर्ट जॅकसन आपल्या सुरुवातीच्या भाषणासाठी उभे राहिले तेव्हा सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोचली होती. जॅकसन अमेरिकन सरकारची बाजू मांडणार होते. अमेरिकेमध्ये त्यांची त्यांच्या वक्तृत्वाबद्दल ख्याती होतीच. इथेही त्यांनी श्रोत्यांना निराश केलं नाही.
त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालय स्थापन होणं आणि हा खटला त्याच्यासमोर चालवला जाणं ही एक अत्यंत मोठी उपलब्धी असल्याचा पुनरुच्चार केला, आणि मग त्यांच्या वक्तृत्वाला बहर आला –
“ फक्त ८ महिन्यांपूर्वी ज्या न्यायालयात आपण सर्व बसलो आहोत, तो सर्व परिसर शत्रूसैनिकांच्या – एस्.एस्. च्या सैनिकांच्या ताब्यात होता. सर्व साक्षीदार आणि कागदपत्रंसुद्धा शत्रूच्या ताब्यात होती. हे न्यायालय कायद्याच्या ज्या तत्वांच्या आधारे आपला निर्णय देणार आहे आणि न्यायनिवाडा करणार आहे, ती तत्वंदेखील ठरवण्यात आलेली नव्हती. ही इमारत कशीबशी उभी होती. हजारो – लाखो जर्मन दस्तऐवज तपासायचे बाकी होते, प्रॉसिक्युशनची जबाबदारी कोण सांभाळणार हेही ठरलेलं नव्हतं, बहुतेक सर्व आरोपी तुरुंगाच्या बाहेर होते, आणि ज्या चार देशांनी त्यांच्यावर इथे संयुक्तरीत्या हा खटला भरलेला आहे, त्यांचं अनेक गोष्टींवर एकमत होत नव्हतं.”

जॅकसननी याचबरोबर हा खटला म्हणजे विजेत्यांचा न्याय असल्याच्या आरोपाचाही स्पष्ट उल्लेख केला आणि या खटल्यामागची – आदर्शवादी म्हणून टीका झालेली भूमिकाही स्पष्ट केली.

“ इथे बसलेले हे सर्व आरोपी हे त्यांच्या पूर्वायुष्यात उच्च पदावर होते. त्यांनी जी कृष्णकृत्यं केली आणि त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याविषयी जे विचार सध्या आहेत, ते पाहता न्याय आणि सूड यांच्यातली सीमारेषा ही फारच धूसर आहे असं म्हणावं लागेल. तरीही आपल्याला आपल्या सूडभावनेला बाजूला ठेवून आणि आपली न्यायबुद्धी शाबूत ठेवून हा खटला आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी मानवतेने केलेल्या न्यायाचं उदाहरण बनावा अशा पद्धतीनेच चालवला पाहिजे. “

अमेरिकन सरकारने संपूर्ण नाझी राजवट म्हणजे एक गुन्हेगारी संघटना असल्याच्या दृष्टीकोनातून हा खटला चालवायचं ठरवलं असल्यामुळे जॅकसननी नाझींच्या कुठल्याही कृतीमागे गुन्हेगारी संगनमत असल्याचं पुनःपुन्हा प्रतिपादन केलं. जर्मनीमध्ये जानेवारी १९३३ मध्ये नाझी पक्षाची सत्ता प्रस्थापित झाली. त्यानंतर लगेचच आपल्या राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करायला नाझींनी सुरुवात केली. या लोकांमध्ये कम्युनिस्ट, कामगारांच्या युनियन्सचे पदाधिकारी, धर्मगुरू आणि जर्मनीमधले ज्यू यांचा समावेश होता. नाझींनी उभारलेल्या छळछावण्या आणि यातनातळांमध्ये सर्वात पहिल्यांदा याच लोकांना पाठवण्यात आलं होतं. जॅकसनच्या मते ही नाझींनी नंतर युरोपवर केलेल्या आक्रमणाची नांदी होती. आपल्या या प्रतिपादनाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी हिटलरचे स्वतःचेच शब्द वापरले. आरोपींपैकी चार जण हजर असलेल्या एका बैठकीमध्ये हिटलरने lebensraum किंवा जर्मन जनतेसाठी राहण्याची जागा ही संकल्पना मांडली होती. ही बैठक १९३७ मध्ये, युद्धाच्या २ वर्षे आधी झाली होती. त्यात हिटलरने वेळप्रसंगी बळाचा वापर करण्याची आवश्यकता स्पष्टपणे व्यक्त केली होती. या बैठकीची टिपणं फ्रेडरिक हॉसबाखने काढलेली होती. “ आणि हे केवळ हिटलरचे विचार नव्हते, तर इतर लोकांचंही हेच मत होतं,” जॅकसन म्हणाले आणि याचा पुरावा म्हणून त्यांनी १९३९ मध्ये प्रसिद्ध झालेला जर्मन नौदलाचा जाहीरनामा वाचून दाखवला – “ जर निर्णायक यश मिळवण्यासाठी युद्ध करावं लागलं तर ते जरी आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विरोधात असलं तरीही ते करायलाच पाहिजे.”

नाझींच्या कागदपत्रांमधून त्यांच्या कृत्यांचे पुरावे दाखवणं हे आता जॅकसन संपूर्ण खटला चालू असताना अनेकवेळा करणार होते. नाझींना त्यांच्याच शब्दांच्या जाळ्यात अडकवणं हा त्याच्यामागचा हेतू होता. जेव्हा युद्धाच्या दरम्यान केल्या गेलेल्या गुन्ह्यांबद्दल बोलायला त्यांनी सुरुवात केली, तेव्हा तर हे तंत्र प्रचंड परिणामकारक ठरलं. पोलंडची राजधानी वॉर्सा हे नाझींच्या ताब्यात गेलेलं पहिलं मोठं शहर. पोलंडमध्ये ज्यू वस्ती भरपूर होती आणि पोलंडची निर्मिती पहिल्या महायुद्धानंतर जर्मन साम्राज्याचा लचका तोडूनझालेली होती. त्यामुळे हिटलरचा पोलंडवर राग होता. त्यामुळे पोलंडवर महायुद्धाच्या सुरुवातीपासूनच अनन्वित अत्याचार करण्यात आले. वॉर्सावर ताबा मिळवल्यानंतर लगेचच नाझींनी तिथल्या आणि पोलंडच्या इतर भागांतून आलेल्या ज्यूंना वॉर्सा घेट्टोमध्ये कोंडलं होतं. या घेट्टोमधल्या लोकांनी पाच वर्षांच्या अत्याचारांनंतर नाझी राजवटीविरुद्ध उठाव केला. तो एस्.एस्.ने तितक्याच निर्दयपणे चिरडून टाकला. या उठावाबद्दल बोलताना जॅकसननी एस्.एस्. जनरल जुर्गेन स्ट्रूप याच्या अहवालातल्या ओळी वाचून दाखवल्या – “ ज्यू लोक जळणाऱ्या इमारतींमध्ये लपून राहिले आणि जेव्हा ती उष्णता असहनीय झाली, तेव्हा त्यांनी खिडक्यांमधून खाली उड्या मारल्या. त्यानंतर त्यांनी हातपाय मोडलेल्या अवस्थेत रांगत रस्ता पार करायचा प्रयत्न केला.”

रशियावर जर्मनीने १९४१ मध्ये आक्रमण केलं. तेव्हा जर्मन सैन्याने एखादा भाग ताब्यात घेतला की लगेचच एस्.एस्.ची भरारी पथकं (यांना जर्मन भाषेत Einsatzgruppen असं नाव होतं) त्या भागात यायची आणि तिथल्या सोव्हिएत कमिस्सार आणि इतर कम्युनिस्ट पदाधिकाऱ्यांना आणि अर्थातच ज्यूंना ठार मारायची. सुरुवातीला हे काम सरळ गोळ्या घालून केलं जात असे. पण नंतर ते प्रचंड वेळखाऊ आहे असं एस्.एस्. प्रमुख हिमलरच्या लक्षात आलं. त्यामुळे एकाच वेळी अनेकांना मारण्यासाठी गॅस व्हॅन्सचा पर्याय स्वीकारण्यात आला. या गाड्यांमध्ये लोकांना अक्षरशः कोंबलं जात असे आणि नंतर या गाड्या एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी नेल्या जात आणि तिथे या गाड्यांमध्ये विषारी वायू पसरवला जात असे. पण या गाड्या कोरड्या हवेतच व्यवस्थित काम करतात असं एका एस्.एस्. अधिकाऱ्याने लिहून ठेवलेलं होतं – “ दमट हवेमध्ये किंवा पाऊस पडत असताना हा वायू नीट पसरवला जात नाही. त्यामुळे लोक नीट मारले जात नाहीत.”

जे २१ जण आरोपीच्या पिंजऱ्यात बसलेले होते, त्यांच्या आदेशांवरूनच ही कृत्यं घडली हे जॅकसनना ठासून सांगायचं होतं, आणि त्यात ते, निदान सुरुवातीला तरी, यशस्वी झाले. तिथे हजर असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी या गोष्टीला भरपूर प्रसिद्धी दिली.

सुरुवात एवढी दणदणीत झाल्यावर नंतर मात्र खटला रेंगाळायला सुरुवात झाली. नाझींनी कशाप्रकारे आपली राजवट ही एखाद्या गुन्हेगारी संघटनेप्रमाणे चालवली, याचे युद्धाआधी घडलेल्या आणि युद्धादरम्यान घडलेल्या घटनांच्या संदर्भातले विस्तृत पुरावे न्यायालयासमोर यायला लागले. हे आवश्यक होतं, पण त्यात नाट्यमय असं काही नव्हतं. अमेरिकन सरकारचा या खटल्याला प्रसिद्धी देण्याचा हेतूही लगेचच दिसून आला. नाझी पक्षाबद्दल बनवलेल्या कागदपत्रांच्या फक्त ६ प्रती आरोपींना मिळाल्या होत्या तर प्रसारमाध्यमांकडे जवळपास २५० प्रती पोचल्या होत्या.

अजून एक प्रश्न येत होता. जॅकसन यांचे सहकारी असलेले इतर वकील नाझींवर असलेला आरोप वाचत होते आणि नंतर त्याच्या समर्थनार्थ असलेल्या कागदपत्रांचे फक्त संदर्भ देत होते आणि ती कागदपत्रं नंतर न्यायालयापुढे सादर करत होते. त्यामुळे इंग्लिश भाषा न येणाऱ्या लोकांना हे नक्की काय चाललंय ते काहीच कळत नव्हतं. त्यामुळे २६ नोव्हेंबर या दिवशी – म्हणजे खटला चालू होऊन एक आठवडा व्हायच्या आत न्यायालयाला पुराव्यांच्या प्रस्तुतीविषयी नवीन नियम आणावे लागले. आता यापुढे जो पुरावा असेल तो सगळाच वकिलांना न्यायालयासमोर वाचायचा होता आणि त्याच वेळी त्याचं वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर करून ते लोकांना ऐकवलं जाणार होतं. त्यासाठी त्यांना हेडफोन्स पुरवावेत असा न्यायालयाने आदेश दिला. या सगळ्या व्यापांमध्ये खटल्याची प्रगती गोगलगायीच्या गतीने व्हायला लागली. प्रसारमाध्यमांमध्ये लगेचच यावर टीकाही झाली.

पण २९ नोव्हेंबरच्या दुपारी हे सगळं बदलणार होतं.

क्रमशः

संदर्भ –
१. Nazi War Trials – Andrew Walker
२. A Train of Powder – Rebecca West
३. Spandau: The Secret Diaries – Albert Speer
४. Reaching Judgment at Nuremberg – Bradley Smith
५. The Rise and the Fall of the Third Reich – William Shirer.

लेखइतिहास

प्रतिक्रिया

हाही भाग रोचक. पुभाप्र.

पिलीयन रायडर's picture

1 May 2017 - 7:07 pm | पिलीयन रायडर

असेच म्हणते!

यशोधरा's picture

1 May 2017 - 6:33 pm | यशोधरा

वाचते आहे..

अजया's picture

1 May 2017 - 7:07 pm | अजया

वाचतेय ..

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 May 2017 - 1:26 am | डॉ सुहास म्हात्रे

रोचक आहे. पुभाप्र.

पैसा's picture

2 May 2017 - 11:28 am | पैसा

खूप इंटरेस्टिंग लिहिता आहात.

limbutimbu's picture

2 May 2017 - 2:33 pm | limbutimbu

वाचतोय...

उत्सुकता ताणुन ठेवलीत. पुढचा भाग लवकर आणा...

संजय क्षीरसागर's picture

3 May 2017 - 1:35 am | संजय क्षीरसागर

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

माझीही शॅम्पेन's picture

3 May 2017 - 1:44 pm | माझीही शॅम्पेन

अप्रतिम लेख , पुढील भागाच्या प्रतीक्षेत

दीपक११७७'s picture

3 May 2017 - 7:14 pm | दीपक११७७

मजा येत आहे वाचताना......

अप्रतिम लेख , पुढील भागाच्या प्रतीक्षेत

sagarpdy's picture

4 May 2017 - 9:30 pm | sagarpdy

मस्त. पु भा प्र

फारच रोचक झालाय हा भाग.
पुढचा भाग लवकर येऊ द्या :)

अमितदादा's picture

6 May 2017 - 4:47 pm | अमितदादा

सुंदर लेखमाला...पुभाप्र

इडली डोसा's picture

20 May 2017 - 2:43 am | इडली डोसा

पुढे वाचण्यास उत्सुक.. पुभालटा

नया है वह's picture

26 Jun 2017 - 7:50 pm | नया है वह

सुंदर लेखमाला...पुभाप्र

अमित खोजे's picture

19 Jan 2018 - 11:26 pm | अमित खोजे

पुढचा भाग आता येणे नाही असे दिसतंय. अशा उत्कंठा वाढवणाऱ्या कथा लिहून वाचकांना जखडवून ठेऊन नंतर कथा अर्धवट सोडून देणे म्हणजे घेट्टो मधून जिवंत बाहेर पडलेल्या ज्यूंनी युद्ध संपल्यावर आता कुठे जायचे या प्रश्नाचा सामना करण्यासारखे आहे.
अशा उत्कंठावर्धक कथा लिहून अर्धवट सोडून देणाऱ्या लेखकांवर मिसळपाव संपादक मंडळाने पुणे-मुंबई-नागपूर येथे एकत्रित खटला चालवावा अशी सर्व वाचकांतर्फे नम्र विनंती करतो.

- कृ ह घ्या