साद

मिडास's picture
मिडास in जनातलं, मनातलं
1 May 2017 - 9:11 am

माझ्या आजोबांना एक सवय होती, ते कुठल्याही लहान मुलाला 'देवा' अशी हाक मारायचे. खूप गम्मत वाटायची त्या गोष्टीची. त्यांची ती हाक ऐकण्यासाठी म्हणून मग मी मुद्दाम लपून बसायचो कुठेतरी. घराच्या एखाद्या अनोळखी कोपऱ्यात दडून त्यांची हाक ऐकण्यामध्ये एक अपूर्व असा आनंद होता. या म्हाताऱ्या लोकांच्या आवाजात काय जादू असते कळंत नाही. सतत मुरत असलेल्या मुरंब्याची गोडी असते त्यांच्या स्वरात. त्यांच्या स्वरांची जादू असेल किंवा त्या शब्दाची असेल पण कसलीतरी भूल पडत होती त्या वेळी. वयात आलो. जगाचे भले बुरे अनुभव घेतले, बऱ्या प्रमाणात पुस्तकं वाचली, पण ती जादू कसली होती हे काही उमगलं नाही. मग आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर एका मन नावाच्या गोष्टीचं अस्तित्व जाणवलं. कुणाची तरी हाक ऐकल्यावर काळजाला झालेली जखम अजूनही ताजीच राहिली आहे. आपलं नाव इतकं सुंदर आहे याचा पहिल्यांदा साक्षात्कार झाला होता तेव्हा. मग त्या जखमेला गोंजारायला आवाजाचे जादूगार सोबतीला येऊन विसावले. शब्दांच्या किमयागारांनी त्यांना तितकीच तोला-मोलाची साथ दिली. हळू-हळू शब्दांची, आवाजाची जादू उलगडायला लागली. शब्दांनी सुखावलं, आवाजांनी दुखावलं, कुणी अहंकार जोपासला तर कुणी भयंकर अपमान केला. पण मग त्या शब्दांचे त्या आवाजांचे अर्थ नव्याने उलगडू लागले. पंजाबी ट्रक ड्रायवर ने पोटतिडकीने दिलेल्या शिव्या ऐकल्यावर मनमुराद हसलो होतो मी. फाटक्या भिकारणीच्या तोंडून 'बाबूजी' आवाज ऐकून तिच्यापेक्षा फटका झालो होतो मी.

एकदा सखी गप्पांच्या ओघात बोलून गेली सहज, "हे शब्द, सूर, आवाज वगैरे काहीही नसतं रे. त्या शब्दाला तुझ्या मनाची जोड असली ना कि सगळंच छान वाटतं ऐकायला, अगदी शिव्या सुद्धा." सखीचं हे असंच असतं. बोलता बोलता असा यॉर्कर टाकून जाते ती. माझ्या डोक्यात मग जो काही चरखा सुरु झाला तो झालाच. किती वायफळ बोलत असतो आपण. उत्तराला प्रत्युत्तर या पलीकडे त्याला काही अस्तित्व तरी असतं का ? मनापासून मनातलं बोलायला आपण कधी शिकलोच नाही बहुतेक. सराईत नटाच्या तोंडावर एक हसरा मुखवटा सतत असतो तसाच एखादा बुरखा तर आपण चढवून नाही बसलो ना या विचाराने तर हैराण केलं होतं मला कित्येक दिवस. पण मग याची दुसरी बाजू पण उमजायला लागली. गुलजार सारखा एखादा कलंदर जेव्हा "वो आके पेहलू मे ऐसे बैठे के शाम रंगीन हो गयी है" असं जेव्हा लिहून जातो तेव्हा ते सुंदर शब्द, ती तालबद्ध लय या पलीकडे जाऊन गुलजारचं आतलं मन उजळून निघतं. जगजीत च्या आवाजात "चिट्ठी ना कोई संदेश" ऐकताना त्याच्या हृदयाला पडलेला पीळ जाणवतो अगदी आतपर्यंत. मग वाटतं या भावनाच तर बहाल करत नसतील आपलं सौंदर्य त्या शब्दांना. शेवटी तुमचे शब्दं, तुमचा आवाज हे सुद्धा एक अभिव्यक्तीचं माध्यमच आहे की. तुम्ही व्यक्तं होणं आणि समोरच्याने ते उमजून घेणं यालाच कदाचित संवाद (सह:वाद)म्हणत असावेत. परवाच आईने मला मारलेली हाक ऐकून माझ्या इवलुश्या पिल्लाने तिच्या बोबड्या आवाजात मला साद घातली होती. लगेच सखीला फोन करून सांगितलं होतं मी कि पिल्लूचा आवाज अगदी तुझ्या आवाजासारखा आहे म्हणून.

"देवा !!!" तीच्या तोंडातून शब्द उमटला. मला आजोबांची आठवण झाली. म्हटलं चला, एक वर्तुळ पूर्ण झालं

मुक्तकप्रकटनविचारअनुभव

प्रतिक्रिया

रातराणी's picture

1 May 2017 - 9:38 am | रातराणी

सुरेख!

यशोधरा's picture

1 May 2017 - 11:00 am | यशोधरा

छान लिहिलंय, आवडलं.

प्राची अश्विनी's picture

1 May 2017 - 1:39 pm | प्राची अश्विनी

सुरेख!खूप भावलं.

खरंय तुमचं म्हणणं. असं होतं खरं.
काही काही जागाच अशा खास जमून गेलेल्या असतात की जन्मभर आपल्याला सोबत करतात. :-)

- एका मित्रासोबत एकाच विषयावर अनेकदा तेच तेच बोलून सुद्धा समाधान होत नाही..
- एकच पुस्तक कितीही वेळा हाती घेतलं तरी काही ठरावीक पानं, परिच्छेद आपोआप वाचल्या जातात..
- एका सिनेमातला ठरावीक सीन पुन्हा पुन्हा पाहिला तरी परत बघावासा वाटतो..
- आजीचा पाठीवरून फिरलेला हात दुसरा कुणीही फिरवू शकत नाही, पण डोळे मिटून एकदा आठवलं की खरंच पाठीवरून पुन्हा तोच हात फिरतो..
- पूर्ण जेवण झाल्यावर सुद्धा आईच्या हातचा तिनं स्वतःच्या ताटात कालवलेला भात थोडासा खाण्यातलं सुख अवर्णनीय असतं..
.
.
.

या आणि अशा अनेक आठवणी परत ताज्या करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! :-)

खूप खूप सुंदर लिहिलं आहे!