आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग १)

Primary tabs

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
22 Apr 2017 - 7:15 pm

‘संस्कार’ कादंबरी वाचली ती दहावी अकरावीत असताना. चाळीतल्या शेंडे काकूंनी त्यांच्या संग्रहातील प्रत वाचायला दिली होती. नंतर कित्येक वर्षे त्यांना ती कादंबरी परत करायला टाळाटाळ करत होतो आणि परत केल्यावर हातातून काहीतरी महत्वाचं निसटून गेलंय अशी भावना मनात सलत होती. पुढे पैसे मिळवू लागल्यावर लेखकाला ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणारी ही कादंबरी विकत घेतली. सुखांत किंवा दुःखांत नसलेली पुस्तके आधी वाचली होती. पण शेवटी उत्तर न देता प्रश्न पाडणारी आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सांगणारी ही कादंबरी वाचल्यानंतर यू आर अनंतमूर्ती या लेखकाबद्दल आदराशिवाय दुसरी कुठलीही भावना मनात येऊ शकत नाही. अवघ्या १२२ पानांत अनंतमूर्तींनी जे मांडलेलं आहे ते तितक्याच प्रभावीपणे श्री रं शा लोकापूर आणि श्री वि ग कानिटकरांनी मराठीत आणलंय.

अनंतमूर्तींनी संस्कारशिवाय अजून दोन कादंबऱ्या लिहिल्या. पण मला त्या मिळत नव्हत्या. तोपर्यंत भैरप्पा त्यांच्या पुस्तकातून भेटले. त्यामुळे भैरप्पा आणि अनंतमूर्तींचा वाद कळला. मला आवडलेल्या वंशवृक्ष या भैरप्पांच्या कादंबरीत अनंतमूर्तींनी काढलेली चूक आणि मला आवडलेल्या संस्कार या अनंतमूर्तींच्या कादंबरीत भैरप्पांनी काढलेली चूक वाचली. २००७ मध्ये भैरप्पांच्या आवरण या गाजलेल्या कादंबरीच्या प्रकाशनवेळी अनंतमूर्ती आणि भैरप्पा यांच्यात झालेल्या वादाचा धुरळा उडालेला पाहिला. अनंतमूर्ती म्हणाले, ‘भैरप्पा एक उत्तम वादविवादपटू आहेत पण ते कादंबरीकार नाहीत”. त्यावेळी भैरप्पा समर्थकांनी अनंतमूर्तींवर, “आयुष्यभरात केवळ अडीच कादंबरी लिहू शकणाऱ्या माणसाने भैरप्पांना कादंबरी लिहिण्यास शिकवू नये”, अश्या अर्थाने केलेले विधान वाचले (अनंतमूर्तींच्या दोन कादंबऱ्यांचे आकार बरेच छोटे आहेत). आणि अनंतमूर्तींच्या, ‘संस्कार’ सोडून इतर कादंबऱ्या वाचायच्या बाकी आहेत हे पुन्हा जाणवले. पण त्या मिळत नसल्यामुळे शांत राहण्याशिवाय इतर कुठलाही पर्याय नव्हता.

आणि डोंबिवलीत साहित्य संमेलन झाले. दोन दिवस पुस्तकांच्या राज्यात फिरताना इतके दिवस हुलकावणी देणाऱ्या अनंतमूर्तींच्या दोन कादंबऱ्या सापडल्या. त्यांची नावे भारतीपूर आणि अवस्था. सौ उमा वि कुलकर्णी आणि श्री विरुपाक्ष कुलकर्णी यांनी कन्नडमधून मराठीत रुपांतरीत केलेल्या साहित्याने माझ्याकडच्या कपाटातील एक कप्पा ओसंडून वाहतो आहे. ह्या सिद्धहस्त जोडप्याने माझ्यासारख्या कन्नड न कळणाऱ्या मराठी वाचकाला आजन्म ऋणी करून ठेवले आहे.

‘अवस्था’ आकाराने थोडी लहान असल्याने आधी वाचली. पण ती माझ्या मनावर अपेक्षित प्रभाव पाडू शकली नाही. त्यातील आस्तिकांची आणि कम्युनिस्टांची तुलना फारच लक्षवेधी होती. आणि नंतर कळले की घटश्राद्ध या कथेतून सुरु झालेला अनंतमूर्तींच्या विचारांचा रस्ता प्रथम संस्कार या कादंबरीवर पोहोचतो, तिथून तो दुसरी कादंबरी भारतीपूरला जातो आणि शेवटी अवस्था या कादंबरीमध्ये त्याचा शेवट होतो. दुसरी कादंबरी न वाचता मी थेट तिसऱ्या कादंबरीकडे वळलो म्हणून कदाचित माझा अपेक्षाभंग झाला असावा. मग भारतीपूर वाचायला घेतली. आणि पुन्हा एकदा अनंतमूर्तींच्याविषयीचा आदर दुणावला.

क्रमशः

आस्वादसंस्कृती

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

22 Apr 2017 - 11:30 pm | जयंत कुलकर्णी

छान लिहिलय. मला कानडी येत असते निश्चितच बर्‍याच कानडी कादंबर्‍यांचे मराठीत भाषांतर केले असते.....

पैसा's picture

23 Apr 2017 - 8:50 am | पैसा

पुढच्या भागाची वाट बघत आहे.

यशोधरा's picture

23 Apr 2017 - 9:01 am | यशोधरा

यांनी कन्नडमधून मराठीत रुपांतरीत केलेल्या साहित्याने माझ्याकडच्या कपाटातील एक कप्पा ओसंडून वाहतो आहे.

नावे मिळतील काय? मला नसलेली पुस्तके घेता येतील. तुम्हांला दुवा मिळेल.

Anand More's picture

23 Apr 2017 - 11:24 am | Anand More

लेखक : एस एल भैरप्पा

 1. पर्व
 2. पारखा
 3. माझं नाव भैरप्पा
 4. धर्मश्री
 5. आवरण
 6. मंद्र
 7. तडा
 8. परिशोध
 9. काठ
 10. सार्थ
 11. तंतू
 12. वंशवृक्ष
 13. परिशोध

लेखक : यू आर अनंतमूर्ती

 1. अनंतमूर्तीच्या कथा
 2. संस्कार
 3. भारतीपूर
 4. अवस्था

लेखक : के पी पूर्णचंद्र तेजस्वी

 1. चिदंबर रहस्य
 2. कर्वालो

लेखक : शिवराम कारंत
डोंगराएवढा

धन्यवाद, ह्यातील बरीचशी आहेत, नसलेली घेईन.
पुनश्च आभार!

सतिश गावडे's picture

23 Apr 2017 - 12:57 pm | सतिश गावडे

श्री प्रचेतस हे सुद्धा भैरप्पा यांच्या कादंबरी लेखनाचे (अर्थात उमा कुलकर्णी भाषांतरीत) चाहते आहेत.

त्यांनीही आज या ठिकाणी आपले बहुमोल मत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो.

अरे वा! त्यांचे मत वाचायला नक्कीच आवडेल. पण ही लेखमाला अनंतमूर्तींच्या भारतीपूर या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील एका शब्दप्रयोगावरून स्फुरली आहे.

भैरप्पांची मंद्र सोडून सर्वच अनुवादित कादंबर्‍या मजकडे आहेत. सर्वाधिक आवडती वंशवृक्ष आणि सार्थ.

अनंतमूर्ती ह्यांची कुठलीच कादंबरी अजून वाचली नाही.

मंद्रपण छान आहे. गेल्या वर्षी घेतलेल्या तंतू आणि पारखापण मला आवडल्या... वंशवृक्ष, तंतू आणि पारखा या तिन्ही कादंबर्‍यांना आगमन, निर्गमन आणि पुनरागमनापैकी आगमन नोंदवणाऱ्या साहित्यकृती म्हणता येईल.

पारखा उत्कृष्ट आहे. गाईविषयक चित्रण खूपच सुरेखरित्या रेखाटले आहे.

एस's picture

23 Apr 2017 - 1:32 pm | एस

वाचतोय. पुभाप्र.

दोन्ही आपापल्या स्थानावर असामान्य लेखक आहेत. दोन्ही भिडतात ते ही शोभुन दिसत.
मी दोघांचा वेगवेगळ्या मुद्द्यांवर फॅन आहे.
भैरप्पांचे आत्मचरीत्र पर्व मंद्र या सुरेख आहेत.
दोघांचे परस्परावरील आरोप व दोघांच्या चाहत्यांचे परस्परावरील आरोप
एक व्यापक आवश्यक मंथनाला परस्परविरोधी विचार धारांच्या घुसळणीला
प्रोत्साहन देतात.
आजकाल अशी दमदार भिडंत ही दुर्मिळ झालीय.

मारवा's picture

23 Apr 2017 - 8:10 pm | मारवा

पुरेशा ताकदीने लढवले जात नाहीत.
वैचारीक वाद जसे मराठीत जुन्या काळात वाई कॅम्प कडुन शास्त्रीजींच्या प्रोत्साहनाने लढवले जात
उदा. शरद पाटील विरुध्ह मेहेंदळे यांचा नवभारता ती ल किंवा कुरुंदकरांचा द ग गोडसेंशी अशा
दमदार वैचारीक लढती वाचकाला प्रगल्भ करणार्‍या हल्ली होतच नाहीत.
याचा अर्थ पुर्वीचा मराठी समाज अधिक प्रगल्भ होता कींवा खुल्या मनाचा होता तुलनेने असे वाटते.
( सोशल मिडीया वरील उथळ वादां चा दर्जा वरील प्रकारच्या दर्जा पेक्षा फारच निन्मस्तराचा आहे तो अपेक्षीत नाहीच )
आजकाल भिन्न वैचारीक वर्तुळे एकमेकांशी फटकुन आपापल्या ऑर्बिट मध्ये फिरण्यातच धन्यता मानतात.
एकमेकांच्या वर्तुळांना भिडुन एक दुसर्‍या वर्तुळाला सक्षम आव्हाने दिली जात नाहीत स्वीकारली जात नाहीत.
सर्व जण तु मला धुंदीत फिरु दे माझ्या वर्तुळात मी तुला फिरु देतो तु़झ्या वर्तुळात अशी भुमिका घेतांना दिसतात.

मारवा's picture

23 Apr 2017 - 10:54 pm | मारवा

फार वर्शापुर्वि वाचली भैरप्पांचि एक कादबरि नाव जरा आठव्त नाहि हो ति कुठ्लि आहे ज्यात नायिका मनोरुग्ण अस्ते नाय्क आरकिटेकट असतौ वेडेपणातील विचाराची तीव्र आवर्तने फार प्रत्ययकारकतेने ज्यात दाखवलेली आहे नायक देवदास कुलीन आ णि एक बुद्धाचे वचन ज्यात येते फार विषण्ण करणारा अनुभव ती वाचताना येतो बघा ती कुठली हो ?

प्रचेतस's picture

24 Apr 2017 - 6:24 am | प्रचेतस

काठ