50x7 सायकलिंग चॅलेंज आणि तीळसे येथील मंदिराला एक भेट.

Primary tabs

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in भटकंती
19 Apr 2017 - 5:48 pm

नमस्कार मंडळी,
आज लिहितोय आमच्या(मी, प्रसाद दाते आणि धडपड्या) 50x7 सायकलिंग चॅलेंज बद्दल आणि त्या निमित्ताने माझ्या तीळसे येथील शिव मंदिराच्या भेटीबद्दल.

तर नेहमीप्रमाणे ग्रुपातली मरगळ झटकण्याचा रामबाण उपाय म्हणून कुणीतरी पुन्हा एकदा आठवड्याच्या आव्हानाचा मुद्दा 'सायकल सायकल' या समूहात मांडला. आणि पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. लागलीच मोर्चेबांधणी सुरु झाली सगळ्यांची. तर, अस्मादिकांची नुकतीच पुणे ते वाडा घौडदौड कमालीची यशस्वी झालेली आणि चोहोबाजूंनी येणाऱ्या कौतुकाचा परिणाम म्हणून दुणावलेला आत्मविश्वासाच्या भरात आम्हीही लागलीच त्या चर्चेत उडी घेतली. मागच्या धावण्याच्या आव्हानाची यशस्वी सांगता केल्यापासून आता सायकलस्वारीचे आव्हान स्वीकारण्याची प्रसाद दातेंची सुप्त इच्छाही मी जाणोन होतोच, त्यामुळे पहिली हाक त्यांनाच मारली. तेही आमच्याकडेच कान देऊन असल्यामुळे लगेच ओ करून आपली संमती कळविली. झालं, आता फक्त एक भिडूंची गरज राहिली होती म्हणजे आम्ही सात दिवसांसाठी ५० किमीचं आव्हान स्वीकारण्यास मोकळे. मोदकराव व्यस्त असणार हा आमचं अदमास होताच, म्हणून त्यांना विचारणे योग्य वाटले नाही. शोधाशोध चालू होती तेवढ्यात धडपड्याने कायप्पा करवी सांगावा धाडला कि ते आम्हा बरोबर युती करावयास तय्यार आहेत. मग काय म्हणताय, त्रिकुट जमलं आणि मुहूर्त निघाला ३ एप्रिलचा.
आता पुढचे सात दिवस कुठेही बाहेर जाणे होणार नाही असे घरी जाहीर केले आणि अव्हन पेलण्यास सज्ज झालो. तिघे मिळून पन्नास किमी रोज होणे कठीण वाटत नसल्याने रोज प्रत्येकाने शक्य तेवढे जास्त अंतर कापायचे असा ठराव मंजूर करणेत आला.
उगवला ३ एप्रिलचा दिवस. इकडे मला नव्यानेच मिळालेला भिडू आज पुढे निघून गेला होता बहुतेक, त्यामुळे पहिल्याच दिवशी एकटाच निघालो वातावरणाची मजा घेत. मग आज नेहमीचं ३०किमीचा पूर्ण रूट न करता सरळ जाऊन वैतरणा नदीच्या छोट्याश्या बंधाऱ्यावर जाण्याचा विचार केला आणि रोजचं उजव्या बाजूला घेत असलेलं वळण चुकवून सरळ गेलो. शांत पाण्यावर नदीपात्रापल्याडची झाडी आणि उगवत्या सूर्याला न्याहाळत तिथेच बराच वेळ रेंगाळलो. ग्रुपात आग लावायला म्हणून मोबाईलच्या कॅमेरानेच काही फोटो काढले आणि निघालो. पहिलाच दिवस आणि माझी एकट्याची घौडदौड २१ किमी झाली. बाकीचा भार दाते आणि धडपड्यावर सोपवला आणि हापिसात गेलो. दुसऱ्या दिवशीही तिघांनी जोमात प्रत्येकी तीस किमीच्या राइड्स करून टीमचा आकडा नव्वदी पार नेला. पण तिसऱ्या दिवशी मला अडथळा आलाच. सकाळी सायकलिंगला जाणे जमले नाही म्हणून संध्याकाळी जायचे ठरवले.
wada

wada

wada

अर्थात माझ्या पार्टनर्सनी साठी पार केली होती पण नियमानुसार मला किमान १०किमीचा कोटा पूर्ण करणे क्रमप्राप्त होते. संध्यकाळी सायबर कॅफे बंद केल्यानंतर निघालो, ८:३० ला. मुख्य रस्त्यावर हिम्मत होईना म्हणून माझ्या धावपट्टीला आलो. सायकल घेतल्यापासून इकडे फिरकलो नव्हतो, आता निवांत सायकलिंग सुरु केली. रात्रीच्या शांत चांदण्यात सायकल चालवण्याचा अनुभव मात्र जबरदस्त होता. अर्थात, मधेच काही श्वानांनी रसभंग केलाच. पण ते चालायचंच.
अशीच आमची घौडदौड जोरात चालू होती, आव्हान पूर्ण व्हायला आता दोन दिवस राहिले होते, शनिवार आणि रविवार. शनिवारी पुन्हा सकाळी सायकलिंग जमले नाही, संध्याकाळी व्यायाम मला जाड जातो म्हणून सायकल घेऊनच ऑफिसात गेलो. जवळ जवळ सहा किमी वर असलेल्या ऑफिसचा फेरा माझा दिवसाचा कोटा पूर्ण करून देणार होता.
रोजचे तीस किमी काही विशेष जड वाटत नसल्यामुळे आव्हानाची सांगता किमान ५०किमि सायकलिंगने करावी असे मनोमन ठरवले. आणि दातेंनी बरोबर माझ्या मनाचा ठाव घेत हाच विषय टीम मध्ये मांडला. एकूण ५०किमीच्या आव्हानाची सांगता प्रत्येकी ५० किमीने करण्याचा. धडपड्याही एका पायडलवर तयार झाला.
रविवारी सकाळी ०४:३० वाजताच उठलो. घरच्यांना जागे न करता तयारी केली आणि हळूच निघालो. सायबर कॅफेत आलो आणि सायकल बाहेर काढली आणि निघालो. सकाळचे ०५:१५ वाजले होते निघता निघता. सूर्य उगवण्याच्या आत वाडा पार करायचे ध्येय होते. रस्ता तसा सुस्थितीत असल्यामुळे अंधाराची काही काळजी नव्हती. मजल दरमजल करत वाड्यापर्यंत पोचलो. अख्ख वाडा शहर शांत झोपलेलं वाटत होतं. खरंतर मला काहीतरी खाण्यासाठी घ्यायचं होतं पण सगळी दुकानं बंद दिसली. रस्त्यात लागलं एखादं दुकानं तर घेऊ म्हणत वाडा पार केलं. वाड्याच्या बाहेर आल्यावर वडेकरांचे मॉर्निंग वॉक करून परतणारे थवे दिसले. भरभरून मिळालेल्या निसर्गाचा वडेकरांनी मस्त फायदा उचलायला घेतलाय तर! आता मस्त जंगल आणि मधेमधे छोटी गावं आणि पाडे पार करत तीळस्याच्या रस्त्याला लागलो. वातावरण अगदी आल्हाददायक होतं. नशिबाने रस्ताही चांगल्या स्थितीत होता. उजेड पडला असला तरी सूर्योदय अजून झाला नव्हता. एकंदरीत मी अपेक्षेपेक्षा काहीसा लवकर पोचणार होतो. वळणे आणि चढ-उत्तरांनी भरलेला रस्ता पार करत एकदाचा तीळस्याला पोचलो. इथलीही दुकाने बंदच होती म्हणून मग पुलावरून खाली उतरलो आणि छोट्याश्या बंधाऱ्याजवळील खडकांवर सायकल लावून उगवत्या सूर्याला न्याहाळत बसलो.
tilsa
सूर्योदय

tilsa
नदीकाठ

tilsa
नदीकाठ

tilsa

नदीपात्रातून मंदिर.

आजूबाजूला काही लोक मासे मारत होते. मी ब्रश वगैरे जोडीला आणलेच होते, दात घासून हात पाय धुवायला पाण्यात उतरलो आणि उबदार पाण्याने सुखद धक्काच दिला. आता मला पोहण्याचा मोह आवरणे निव्वळ अशक्य होतं. मग वाट कशाची पाहायची, मारलीच उडी पाण्यात. आहाहा... फार दिवसांनी पोहण्याचा योग आला. अर्धा तास पोहून झाल्यावर पाण्याबाहेर निघालो आणि पुन्हा सायकल घेऊन निघालो. नदीच्या दुसऱ्या काठावर छानशी कमळं फुलली होती. मला भावणाऱ्या फुलांमध्ये कमळ सगळ्यात वरच्या स्थानी. त्यामुळे तिथेही फुलांना न्याहाळत थोडा वेळ घालवला. परतीच्या प्रवासासाठी हॅन्ड पंपाचं पाणी भरून घेतलं आणि तीळसे गावात जाणाऱ्या रस्त्याजवळ आलो. माझ्यासाठी बिस्कीट आणि मास्यांसाठी चणे घेतले आणि पुन्हा मंदिराकडे निघालो.

temple
नदीपात्रातून मंदिर.

temple

temple
नदीपात्रातून मंदिर.

fish
'अमर' मासे.

मंदिरात जाऊन दर्शन घेतले. विलक्षण शांततेचा अनुभव देणारे हे मंदिर माझ्या मनात कायमचे घर करून आहे ते इथल्या परिसरामुळे. नदीच्या मधोमध असणारे हे मंदिर पावसाळ्यात पाण्याने वेढलेले असते. आता सुसज्ज पूल बांधला असल्याने बाराही महिने मंदिरात जाणे सोपे झाले आहे. दर्शन घेऊन थोडा वेळ मंदिरातच रेंगाळलो. परिसर न्याहाळला आणि खाली उतरून मासे असलेल्या डोहाजवळ आलो. हे मासे बाराही महिने या डोहात आढळतात. चांगले फूट दीड फूट लांबीच्या या मास्यांना या डोहात कोणीही पकडत अथवा मारत नाही. यांच्या बाबतीत अनेक दंतकथाही ऐकायला मिळतात(खासकरून त्यांच्या अमरत्वाच्या). येणारे भाविक देवाबरोबरच मास्यांनाहि खायला म्हणून काहीतरी अनंत असतातच. मानवी वावराला सरावलेले हे मासेही आता बिनधास्त जवळ येतात. मास्यांना चणे खायला घालून मीही पत्रातल्या खडकावर बसून बिस्किटांची न्याहारी उरकली आणि निघालो. आता पुन्हा तोच रस्ता चढत उतरत आलो, घर जवळ आलं तसं Strava चेक केलं. घरी पोचेपर्यंत ४८ किमी पूर्ण होतील असा अंदाज आला मग उरलेले दोन किमी अंतर भरून काढण्यासाठी रस्त्यातच लागणारी नेहमीची धावपट्टीची एक फेरी पूर्ण केली आणि घरी पोचलो. आणि 50x7 च्या चॅलेंजची सांगता केली. माझ्या नंतर धडपड्या आणि प्रसाद दातेंनीही प्रत्येकी ५० किमी अंतर पार करून हा विजय जल्लोषात साजरा केला.
या आव्हानात प्रसाद दाते आणि धाडपाड्याची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. ते दोघेच मिळून पन्नाशी गाठत होते त्यामुळे व्यस्त असताना मला फक्त माझ्या हिस्स्याच्या १०किमीची काळजी असायची. एका दिवशी तर या दोघांनीच शंभरी पार करता करता ठेवली. माझ्या १०किमि राईडने ती गाठलीही. हा सगळा शब्दांचा प्रपंचही त्यांच्याच प्रोत्साहनाची फलश्रुती म्हणायची.
record
आमची घौडदौड चित्ररूपात, यातले सेनाकर्ते म्हणजे आपला मिपावरचा धडपड्या बरं का.

track
माझा शेवटच्या राईडचा नकाशा.

date's track
दातेंच्या ट्रॅकची एक झलक.

आता लवकरच 100x7 ची सुरुवात करण्याचा मानस आहे. शुभेच्छा असाव्यात.
तोपर्यंत तेच आपलं... धर हॅण्डल...मार पायडल!

प्रतिक्रिया

एस's picture

19 Apr 2017 - 6:05 pm | एस

खूप छान!

स्थितप्रज्ञ's picture

19 Apr 2017 - 6:09 pm | स्थितप्रज्ञ
स्थितप्रज्ञ's picture

19 Apr 2017 - 6:10 pm | स्थितप्रज्ञ
स्थितप्रज्ञ's picture

19 Apr 2017 - 6:10 pm | स्थितप्रज्ञ

झकास वर्णन आणि छातीत जळजळ वाढवणारे फोटो!!!
लौकरच 100x7 होऊन जाऊद्या....

लय भारी. तिकडच्या रस्त्यांना ते ट्रेलर फार असतात का?

इरसाल कार्टं's picture

20 Apr 2017 - 12:48 pm | इरसाल कार्टं

बऱ्यापैकी असतात.

मोदक's picture

19 Apr 2017 - 7:01 pm | मोदक

झक्कास रे...

मस्त वर्णन, मस्त फोटो.. दातेंनाही लिहिते करा..

या भानगडीत मी एकदाही चॅलेंज घेतले नाहीये.. आता मे महिन्याच्या शेवटी एकदा प्रयत्न करेन.

इरसाल कार्टं's picture

20 Apr 2017 - 12:54 pm | इरसाल कार्टं

पुढचं आव्हान दाते शब्दांकित करतील असे त्यांना न विचारताच जाहीर करतो!

सुमीत's picture

19 Apr 2017 - 8:09 pm | सुमीत

भटकंती हा जीव की प्राण, आधी मोद्क , भटक्या खेडवाला आणी आता तुझ्या मुळे कधी सायकल भ्रमंती सुरु करतो असे झाले आहे.

इरसाल कार्टं's picture

20 Apr 2017 - 12:50 pm | इरसाल कार्टं

लवकर श्रीगणेशा होउद्या.

धडपड्या's picture

20 Apr 2017 - 3:10 am | धडपड्या

हे चॅलेंज स्वतःला पृव्ह करण्यासाठी माझ्यासाठी अत्यंत आवश्यक बनलं होतं..

आदल्याच आठवड्यात सायकलवर गावी जाऊन येण्याचा प्लॅन फसला होता.. अति आत्मविश्वासाने पुणे - पेण - पुणे करण्यासाठी निघालो खरा, पण उन्हाने पार वाट लावली..
आपल्या गृपवर विचारणा केली, तर त्वरीत डाॅक्टर गाठायचा सल्ला मिळाला..
त्याने सनस्ट्रोक झाल्याचे शुभवर्तमान कळवले, आणि दोन बाटल्या सलाईन चढवल्या..
दुसर्या दिवशी काकूने गप गुमानपणे, सायकल आणि मला, व्यवस्थित बांधून, गाडीत घालून पुण्याला पाठवलं होतं..
त्यामुळे एकदम खच्ची झाल्यासारखं वाटत होतं.

त्यात तुम्ही चॅलेंजची विचारणा केली, म्हणून परत एकदा मनाने उभारी घेतली..
गृपवर मिळणारं प्रोत्साहन, तुमचे जळजळ वाढवणारे फोटो, आणि प्रसादजींचे उत्साह वाढवणारे आकडे, यांचा या सगळ्यात मोठा वाटा आहे...

आता पुढचं चॅलेंज 100×7 चं घेऊयात...

इरसाल कार्टं's picture

20 Apr 2017 - 12:59 pm | इरसाल कार्टं

तुम्हीही झकास कामगिरी केलीत.

दाते प्रसाद's picture

20 Apr 2017 - 7:38 am | दाते प्रसाद

रनिंग चॅलेंज पुर्ण केल्यानंतर, सायकलिंग चॅलेंज करायच होतं.

आपला ग्रुप जमल्यावर आणि चॅलेंज ठरल्यावर, मी पुढच्या सात दिवसाचे प्लॅन पुढे ढकलले.

धडपड्या अणि तुमच्याबरोबरीने सायकल चालवायला मजा आली. लवकरच आपण पुढचं चॅलेंज घेऊन पुर्ण करायचा प्रयत्न करुयात.

इरसाल कार्टं's picture

20 Apr 2017 - 12:49 pm | इरसाल कार्टं

लवकरच

वेल्लाभट's picture

20 Apr 2017 - 12:55 pm | वेल्लाभट

कहिच्च्याकहि !

पैसा's picture

20 Apr 2017 - 1:36 pm | पैसा

मस्त!!

पाटीलभाऊ's picture

20 Apr 2017 - 3:54 pm | पाटीलभाऊ

लय भारी

प्रीत-मोहर's picture

20 Apr 2017 - 4:56 pm | प्रीत-मोहर

मस्स्स्स्त!!

भ ट क्या खे ड वा ला's picture

20 Apr 2017 - 6:18 pm | भ ट क्या खे ड वा ला

अशीच सुरु ठेवा सायकल दौड.

शलभ's picture

20 Apr 2017 - 6:24 pm | शलभ

मस्त..
तिळसेश्वर मंदिर परिसर छान आहे. मागे ह्यानेच सांगितल्याप्रमाणे भेट दिली होती..