मूर्खांची लक्षणे !

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
14 Apr 2017 - 5:04 pm

नाही नाही...हुरळून जाऊ नका..हे माझं आत्मचरित्र नव्हे.आतमध्ये काहीही लिहिलं तरी नावं त्याला साजेसं देऊ नये इतपत समज आलीये एव्हाना.आता आत्मचरित्र नसलं तरी ही लक्षणं माझी आणि माझ्यासारख्याच इतर अनेकांची आहेत हे लक्षात येईलच!

रविवारचा दिवस! म्हणजे झी सिनेमा आणि सेट मॅक्सवर अनुक्रमे हम आपके है कौन आणि सूर्यवंशम पाहण्याचा दिवस! त्यातल्या त्यात सूर्यवंशम हा कुठल्याही समीक्षेच्या पलीकडे पोहोचलेला सिनेमा आहे. भारताचे सरन्यायाधीश,तीनही सैन्यदलाचे प्रमुख आणि इतकंच नव्हे तर भारताचे राष्ट्रपतीसुद्धा काहीही करण्याआधी ज्यांचा सल्ला घेतात अशे तेजपुंज ठाकूर भानुप्रताप सिंग ह्यांचे तेजस्वी रूप सहन होईल तेव्हढ्या वेळ पाहायचे. आणि सहन न झाल्यास टीव्ही बंद करण्याची अथवा चॅनेल बदलण्याची गुस्ताखी न करता तिथून निघून जायचे एवढंच आपल्या हातात असते. त्यामुळे सूर्यवंशमविषयी अधिक लिहिण्याची माझी आणि वाचण्याची तुमची पात्रता नाही एव्हढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

पण हम आपके है कौन का पाहायचा? पंचवीस वर्षातही फिटत नाही असं किती कर्ज आपण सुरज बरजात्याकडून घेतलंय? इथून मूर्खांची लक्षणं सुरु होतात. आता मूर्ख कोण हे ओळखण्याची जबाबदारी वाचकांची! ज्याकाळी आम्हाला MBA चा फुलफॉर्मही माहिती नव्हता अश्या काळी प्रेम MBA मध्ये अव्वल येतो काय अन लगेच त्याचा मोठा भाऊ त्याच्यासाठी देशातली सगळ्यात मोठी फॅक्टरी काढतो काय!! सगळंच अचाट! इथे आमचा मोठा भाऊ त्याची सायकलही चालवायला देत नव्हता.लगेच उतराई म्हणून प्रेम मोठ्या भावाचं लग्न लावायचा घाट घालतो. त्याच्या लग्नात स्वतःच सुद्धा सेटिंग लावतो. तेही वहिनीच्या सख्ख्या बहिणीसोबतचं! इथं चार-पाच भावंडांच्या लग्नाच्या पंगती वाढून झाल्या पण वरातीतली एक पोरगी येऊन बोलेल तर शप्पथ! ह्यांचं बरं असतं हो, ह्यांचा मोठा भाऊ छान छान चित्रं काढतो. मग ते दाखवून यांना मुली पटतात. आमच्याकडे मोठ्या भावाच्या गिचमिड्या अक्षरातली अन असंख्य चुकलेल्या गणितांची वही सोडून दुसरं असतेच काय दाखवायला? यांच्याकडे वहिनीच्या बहिणीला घेऊन येण्यासाठी आपल्या हिरोला गाडी घेऊन पाठवण्यात येते. एवढी सूट जर आम्हाला दिली असती तर आमच्या गल्लीतल्या पोरांनी त्याच रूटवर दिवसभर टॅक्सी ड्रायव्हर म्हणूनही काम केलं असतं! घरात स्विमिंग पूल, बाहेर मोठ्ठं क्रिकेट ग्राउंड इथपर्यंत ह्यांची श्रीमंती वगैरे एकवेळ मान्य आहे. पण ह्यांच्या बगिचातल्या क्रिकेट मॅचेस बघायला फुकटातले प्रेक्षक कुठून येतात? या असल्या भव्यदिव्य सिनेमांमध्ये ही एक गोष्ट आकलनापलीकडे असते. ह्यांच्या घरातले दिवाळी-दसरे साजरे करायला स्वतःच घर वाऱ्यावर सोडून सगळं गाव गोळा होते.

असो. तर हे सगळं इतके वर्ष भक्तिभावाने पाहण्याचं एकमेव कारण म्हणजे ती !! तिचं येणं....तिचं बघणं..तिचं हसणं!! अहो एक काय असले हजार रविवार कुर्बान तिच्यावर!! (ती म्हणजे कोण हे फक्त चाणाक्षांच्या लक्षात येईल. कारण मागे एकदा मी असाच तिच्याविषयी बोलत होतो तर समोरच्याने ती म्हणजे प्रिया बेर्डे ना रे असं बोलून मला गार केलं होतं!) आणि तिची ही मोहिनी फक्त माझ्यावरच आहे असं काही नाही बरं का! ह्या सिनेमानंतर घराघरात 'निशा' जन्माला आल्या होत्या.ज्या घरात ह्यांच्या स्वप्नातला 'प्रेम' दिसेल तिथं आधी मोठ्या बहीण-भावाची सोयरीक जुळण्यासाठी ह्यांनी 'सोमवार' धरले होते. तशी ही पद्धत आपल्याकडे आधीपासूनच समाजमान्य होती. आपले मराठी सिनेमावालेसुद्धा ह्या सिनेमाच्या प्रेमात होते. अलका कुबलला घेऊन ह्या सिनेमाचा 'साटलोटं' नामक मराठी रिमेकही येणार होता असं ऐकून आहे. आपल्या सुदैवाने अलकाताईंना ह्या सिनेमासाठी वेळ मिळाला नसावा. असो. मुद्दा असा आहे की मी एकटाच मूर्ख होतो असं काही नाहीये.

पण आता बस्स्स !! काल तीनशे अठ्ठ्यात्तराव्यांदा हम आपके है कौन पाहताना मला साक्षात्कार झाला. ह्याहून जास्तवेळा मी आता मूर्ख बनू शकत नाही. असा तडकाफडकी निर्णय घेण्यामागे कारणही तसंच आहे. सिनेमात शेवटी तिचा सोन्याचा हार योग्य ठिकाणी पोहोचवून ते कुत्रं हिरो बनतं बघा. त्याला श्रीकृष्ण तसा दृष्टांत देतो वगैरे सगळं ठीक आहे.पण कुत्र्याच्या हाती हार दिला कोणी?? तर तिनी!! अगं बाई, त्यांच्याच घरी चाललीस ना आता तू? मग दोन दिवसांनी दिला असतास हार वापस तर काय सोन्याला गंज चढला असता का?? नाही नाही..तुला प्रेमशीच लग्न करायचंय हे मान्य! किंबहुना तसं नसतं झालं तर आंम्हीसुध्दा तिकिटाचे पैसे अक्कलखाती जमा केले असते. आता तुझं लग्न जर सलमानशी होणार नसेल तर आमच्यासाठी मोहनीश बहल काय अन लक्ष्मीकांत बेर्डे काय...एकच!!! पण मुद्दा असाय की तुम्हीच म्हणता ना,"कन्व्हिक्शन का पैसा है बॉस!!". त्या बिचाऱ्या मोहनीश बहलने पत्र लिहून तुला शिस्तीत लग्नाविषयी विचारलं होतं ना? त्याच वेळी त्याला उत्तर पाठवायचं. मग तुझं पत्र हरवून त्याला शेवटच्या क्षणी मिळालं वगैरे 'मामाचं पत्र हारवलं' टाईप शेवट आम्हाला पटला असता ना!! पण तुमचं म्हणजे असं झालं की बारामतीत आघाडीच्या गप्पा करायच्या अन 'वर्षा'वर प्रेमाचे लखोटे पाठवायचे!

म्हणजे तिच्या मुखवट्याआड आमच्यासारख्या निरागस तरुणांना मूर्ख बनवण्याचे धंदे वर्षानुवर्षे सुरु आहेत. या प्रकारात हा एकच सिनेमा आहे असंही काही नाही.त्या चोप्रा-जोहर-कपूर मंडळींचंही कर्ज फिटता फिटत नाही आमच्याकडून.ह्यांच्या सिनेमातला बाप, पोरगं नापास झाल्यावर त्याला युरोपच्या ट्रीपवर पाठवतो (सिनेमा DDLJ). आमच्या इथे पास झालो तरी शेगावच्या पलीकडे कधी पाठवलं नाही.(नापास झालो तर काय हे विचारूच नका!).कसंय की प्रत्येक गोष्टीत तुलना करणं बरोबर नसलं तरी आदर्श ह्यांनाच ठेवतो ना आम्ही.आता लग्नघरी काम केलं म्हणजे खूप सुंदर बायको मिळते अशी शिकवण शाहरुखनेच दिली आम्हाला. त्याने फक्त म्हणायचीच देर की लागलो आम्ही गल्लीतल्या प्रत्येक लग्नात पंगती वाढायला! पण शाहरुखने त्या लग्नघरातली नवरी आधीच पटवली होती हे कोण बघणार? ह्याच सिनेमात प्रीती (मंदिरा बेदी) नावाचं एक भयाड पात्र आहे. भयाड अश्यासाठी कारण ती आमच्याच पंथातली आहे. फरक एवढाच,की आपण फुकाचे कंदील लावत होतो हे तिला सिनेमाच्या शेवटीच कळते पण आम्हाला वीस-पंचवीस वर्ष झाले तरी अजूनही कळलं नाही.

असो. ही मूर्खांची लक्षणे काही एवढ्यात संपणारी नाहीत. जोवर सिनेमा आहे आणि आम्ही आहे तोवर हे सुरूच राहणार!
तूर्तास,
हम आपके है कौन परत सुरु झालाय...ती सुद्धा आलीये..जरा बघून येतो!!
--चिनार

चित्रपटलेख

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

14 Apr 2017 - 5:10 pm | माम्लेदारचा पन्खा

मस्त.....

पैसा's picture

14 Apr 2017 - 5:44 pm | पैसा

मस्त लिहिलंय! बडजात्यांचा सिनेमा अख्खा कसा काय बघता येतो? त्यात माधुरी असली म्हणून काय झालं?

खटपट्या's picture

18 Apr 2017 - 9:49 am | खटपट्या

ऐसा बोलके आपने समस्त पुरूषोंकी भावनाओंको ठेस पहुचाइ है...

पद्मावति's picture

14 Apr 2017 - 5:52 pm | पद्मावति

=)))) अल्टिमेट लिहिलंय.. मस्तच.

बाकी या पिक्चरचे माझ्या वर अनंत उपकार आहे. माझी मुलगी लहानपणी जेवण्यासाठी भयंकर त्रास द्यायची. पण दीदी तेरा, माई न माई सुरू झालं की ते पाहात पाहत गप्पागप वारणभात खायची =))
अजुन एका बडजात्या रत्नाचे हम साथ साथ हैं चे पण असेच उपकार माझ्यावर.

यशोधरा's picture

14 Apr 2017 - 6:08 pm | यशोधरा

=)) बघा!

आम्ही आमच्या दहावीतल्या कविता 'माई नि माई' आणि 'पहला पहला प्यार है' च्या चालीवर म्हणायचो.. =)

'हम साथ साथ है' मधलं कुठलं? 'मैय्या यशोदा' की 'A B C D E F G H I'? =)

संजय क्षीरसागर's picture

14 Apr 2017 - 5:54 pm | संजय क्षीरसागर

किप इट अप !

सतिश गावडे's picture

14 Apr 2017 - 5:55 pm | सतिश गावडे

हा लेख समजण्यासाठी तरी हआहैको पाहावा लागणार एकदा. या चित्रपटाची मराठीत डब केलेल्या गाण्यांची केसेट आली होती चक्क.

त्या कॅसेटचे सुद्धा पारायणं केलेत अस्मादिकांनी...मी तुझा आहे कोण असं नाव होतं

अभ्या..'s picture

14 Apr 2017 - 6:00 pm | अभ्या..

आच्यायला, भारीच की.
नांदीला सूर्यवंशमलाच बुलेट लावली म्हणल्यावर काय बोलणार.
बाकी ते राजश्री आयटम्स आपण बघत नसतो हे सर्वात मोठे सुख.
त्या सगळ्या बडजात्यांना(टफिसकट) आजकालच्या समस्त इव्हेंट मॅणेजरांनी कातड्याचे जोडे करुन घातले तरी बडजात्यांचे उपकार फिटणार नैत.

५० फक्त's picture

14 Apr 2017 - 7:12 pm | ५० फक्त

त्या सगळ्या बडजात्यांना(टफिसकट) आजकालच्या समस्त इव्हेंट मॅणेजरांनी कातड्याचे जोडे करुन घातले तरी बडजात्यांचे उपकार फिटणार नैत. + १००

कुठल्याही सर्कार्ने उपलब्ध केल्या नसतील येवढ्या रोजगाराच्या संधी यामुळे उपलब्ध झाल्या,

छान लिहिलय. मनोरंजन झालं.

किसन शिंदे's picture

14 Apr 2017 - 9:06 pm | किसन शिंदे

=)) जबराट लिहीलंय भौ.

भन्नाट लिहिलंय हो चिनार !!!!! :)

रुपी's picture

14 Apr 2017 - 11:28 pm | रुपी

भारी लिहिलंय..

मी फार पारायणं केली बुवा 'हम आपके..' ची! =) यात सगळा गाव गोळा होतो त्यात 'भोला भैय्या'ही आहे (आताचा जेठालाल गडा).
हा सिनेमा मूळ सिनेमावर आधारित आहे तो 'नदीया के पार' सुद्धा राजश्रीचाच - तो सिनेमा मात्र फार छान आहे - अश्या बुद्धीला न पटणार्‍या गोष्टी त्यात नव्हत्या.

'हम आपके..' वर एवढं लिहिलंय तर तुम्ही एकदा 'विवाह' पूर्ण बघाच आणि त्यावर लिहा =)

अत्रुप्त आत्मा's picture

14 Apr 2017 - 11:32 pm | अत्रुप्त आत्मा

ह्हा ह्हा हा हा! धुव्वा उडविलाय एकदम!

सही रे सई's picture

15 Apr 2017 - 12:26 am | सही रे सई

हआहैको आला तेव्हा लईच आवडला होता .. आणि आवडण्याच मुख्य कारण तीच होती.. माधुरी.. लेडी अमिताभ.. काय किल्लर दिसल्ये ती त्यात.. पण म्हणून तो अत्ता पुर्ण नाही बघवणार.
माझा नवरा असाच डिडीएल्जे चा पंखा आहे. तो प्रत्येक वेळी बघतो हा पिक्चर लागला की..
हल्लीच असा कधीही आणि कितीही वेळा बघितला तरी चालणारा पिक्चर म्हणजे ओह माय गॉड.. परेश रावलचा.. का कोण जाणे तो पिक्चर परत परत बघायला फार काही वाटत नाही.

बाकी लेख मस्त खुसखुशीत लिहिला आहे हे वे सां न ल

आषाढ_दर्द_गाणे's picture

15 Apr 2017 - 12:57 am | आषाढ_दर्द_गाणे

लेखन धमाल!
हआहैको आणि डिडीएल्जे हे दोनही प्रकार जेव्हा आले त्यावेळी पाहिले नाहीत.
आजकाल दोघांपैकी एक लागला की त्यांना 'उपहास' (parody) म्हणूनच पाहतो. म्हणजे मग आम्ल्पित्त होत नाही.

बाकी तुमचं 'ती'च्यावरचं प्रेम खत्रा!
अस्मादिक कधीकाळी अश्याच एका जगतसुंदरीच्या गारुडाखाली होते (सध्या नाही, उगाच चेष्टा नको) त्याची आठवण झाली!

पुणेकर भामटा's picture

15 Apr 2017 - 1:16 am | पुणेकर भामटा

आवडला!

पद्मावति's picture

15 Apr 2017 - 1:38 am | पद्मावति

रूपी =)) भोला भैय्या म्हणजे जेठालाल गडा..खरंच की:)
आणि मैने प्यार किया मधे पण तो होता रामू शामू जोडगळी मधला एक. रामू शामू दोघेही गुलबियाचे पंखे असतात :)

अभ्या..'s picture

15 Apr 2017 - 1:53 am | अभ्या..

टप्पूकेपापा??

चिनार's picture

15 Apr 2017 - 12:45 pm | चिनार

हायला अभ्या..
तू तारक मेहता पाहतो का काय!!!!

अरे हो, भोला भैय्याला विसरून चालणार नाही. माझ्या आईच्या मते आत्याच्या सासरच्या कोणत्यातरी नातेवाईकाचा चेहरा तसा आहे. त्यावर आम्ही अजून हसतो. तेंव्हापासून भोला भैय्या व त्या दूर के रिष्तेदाराचं नाव दुष्यंत असंच ठेवलं गेलं.

पद्मावति's picture

15 Apr 2017 - 1:55 am | पद्मावति

खीक्क..हो.

राघवेंद्र's picture

15 Apr 2017 - 2:40 am | राघवेंद्र

मस्त लिहिलंय चिनार भाऊ !!!

अर्धवटराव's picture

15 Apr 2017 - 5:26 am | अर्धवटराव

लईच भारी.

पिलीयन रायडर's picture

15 Apr 2017 - 9:34 am | पिलीयन रायडर

एक नंबर!!

आजच नवर्‍याला म्हणलं.. दिराच्या लग्नात मला "लो चली मैं.." म्हणावं लागेल हो!! तर म्हणला.. मरते त्यात ती नंतर.. बघ बुवा कसं जमतंय ते! =))

चांगुलपणाचा संपृक्त नमूना, रेनुकाशाहनाइड
एक थेम्ब याचा पडला तर आख्खी भाभी जमात एका पीढित सुधारली.

आषाढ_दर्द_गाणे's picture

19 Apr 2017 - 8:34 am | आषाढ_दर्द_गाणे

रेणुकाशाहनाईड :) =))

इरसाल कार्टं's picture

15 Apr 2017 - 10:13 am | इरसाल कार्टं

नुसते चौकार आणि षटकार!

सुबोध खरे's picture

15 Apr 2017 - 10:44 am | सुबोध खरे

HAHK किंवा HSSH म्हणजे पंजाबी लोकांनी आपली लाल केलेली आहे.
हम साथ साथ है म्हणजे तर तीन तास पंजाबी लग्नात गेल्यासारखेच वाटते.
हे हम आपके है कौन १२-१५ वेळा पाहून आमच्या नात्यातल्या लांबच्या वहिनीने तसलंच कुत्रं (टफी सारखं) पण घरी आणलं होतं. त्याच्या गळणाऱ्या केसांची ऍलर्जी झाल्यामुळे शेवटी ते दुसऱ्याला देऊन टाकावे लागले. शिवाय तिच्याबरोबर त्या सिनेमाला गेलो (आम्ही(मी आणि बायको) पहिल्यांदा आणि ती १३ किंवा १४ व्य वेळेस)तेंव्हा त्या सिनेमाचे धावते समालोचनहि ऐकावे लागले यांनतर काही तो सिनेमा पाहण्याची माझी परत हिम्मत झाली नाही.

हा सिनेमा थेट्रात बरीच वर्षे होता की पुन्हा आला होता हे लक्षात नाही. आमचं लग्न झाल्यावर नवर्‍याला शिनेमा पाहण्यासाठी नेला तर हाऊसफुळ्ळं होता. अर्ध्या तासात हा झोपला, नुसता झोपला नाही तर घोरायला लागला. मग मागील रांगेत बसलेल्यांनी "ओ बहनजी, जरा उनको बोलो ना" म्हटल्यावर नवर्‍याने सांगितले की हे सगळं पाहणं शक्य नाही. मग पहिल्या पाऊण तासानंतर बाहेर पडलो.

पिलीयन रायडर's picture

18 Apr 2017 - 7:01 am | पिलीयन रायडर

हाहाहाहाहाहा!!!! =))

लोनली प्लॅनेट's picture

15 Apr 2017 - 11:03 am | लोनली प्लॅनेट

ख्या..ख्या..ख्या..
मस्त लिहिलंय... बाकी दर शनिवार किंवा रविवारी 3 इडियट्स दाखवला कि सोनी मॅक्स ला पुण्य मिळते
आणि हे सिनेमे ई. स. 2500 मध्ये सुद्धा असेच चालू असतील

चिनार's picture

15 Apr 2017 - 11:44 am | चिनार

धन्यवाद !!

सुबोध खरे's picture

15 Apr 2017 - 11:51 am | सुबोध खरे

आपले लेख सुरेख असतात हे लिहायचं राहिलं
आय माय स्वारी.

चिनार's picture

16 Apr 2017 - 1:24 pm | चिनार

धन्यवाद खरे सर

अद्द्या's picture

15 Apr 2017 - 12:01 pm | अद्द्या

हाहाहाहाहा

मस्तच लिहिलंय ... मजा आ गया

सस्नेह's picture

16 Apr 2017 - 1:49 pm | सस्नेह

खी: खी: ..!!
बरोबरे तुझं चिनार !

संजय पाटिल's picture

16 Apr 2017 - 3:22 pm | संजय पाटिल

मूर्खांची लक्षणे!! धमाल...

फारएन्ड's picture

16 Apr 2017 - 8:39 pm | फारएन्ड

एकदम खुसखुशीत! :)

मराठी_माणूस's picture

17 Apr 2017 - 10:24 am | मराठी_माणूस

मस्त लेख.

अवांतरः हआहैकौ हा ज्या चित्रपटाची डिट्टो कॉपि आही तो चित्रपट "नदियाके पार" हा १००० पटीने छान आहे.

पी. के.'s picture

17 Apr 2017 - 2:25 pm | पी. के.

मस्त, मज्या आली वाचून

पद्मावति's picture

17 Apr 2017 - 2:40 pm | पद्मावति

अवांतरः हआहैकौ हा ज्या चित्रपटाची डिट्टो कॉपि आही तो चित्रपट "नदियाके पार" हा १००० पटीने छान आहे. +१
आपल्याच चित्रपटांचे रीमेक करायची राजश्रीची जुनी परंपरा आहे. उपहार चा रीमेक अबोध :)
खरंतर राजश्री चे सत्तरीच्या दशकापर्यंतचे मूवीज छानच असायचे. मैने प्यार किया पासून मात्र फार फिल्मीपणा करायला लागले :(

इडली डोसा's picture

18 Apr 2017 - 11:05 am | इडली डोसा

मी कितीही वेळा बघु शकते असे दोन सिनेमे म्हणजे - अंदाज अपना अपना (तेजा मै हुं, मार्क इधर है! + अजुन बरेच वन लायनर्स) आणि हेराफेरी १ (ये बाबुभाई का श्टाइल है आणि असे असंख्य डायलॉग) =)

नीलमोहर's picture

18 Apr 2017 - 4:13 pm | नीलमोहर

भारी !

HAHK म्हणजे अतिसज्जन पणाचा कळस होता !!
यावरून एक जोक आठवला...
मोहनीश बहल पैसे देऊन टॅक्सी तुन उतरतो...
टॅक्सी वाला: भैय्या...ये लिजिए आपके बाकी के ३० रुपये...
मोहनीश बहल: तुने मुझे भैय्या कहा ना...ले तू हि रख !!