डाव - १ [ खो-कथा-दुसरी]

Primary tabs

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
3 Apr 2017 - 7:43 am

नमस्कार मिपाकर मंडळी,

आम्ही दुसरी खो कथा आपल्यासमोर घेऊन येत आहोत. पहिल्या कथेला दिलेल्या ऊत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तसेच पहिल्या कथेला काही दिग्गजांनी दिलेले सल्ले अमलात आणण्याच्या यावेळी प्रयत्न करणार आहोत.
यावेळी प्रत्येक लेखक आपापले वेगळे पात्र घेऊन कथा पुढे सरकवत राहील. पहिली कथा अद्भुतिका होती. यावेळी ती रहस्यकथा असेल.

आम्ही आठजण मिळून कथा लिहीणार असलो तरी यावेळी नवीन लेखकांना पुढचे भाग लिहिण्यासाठी आमंत्रित करणार आहोत. जर आपल्यापैकी कोणाला खालील कथेचा पुढील भाग लिहायची इच्छा असेल तर कृपया आम्हाला व्यनी करावा (जव्हेरगंज किंवा अॅस्ट्रोनाट विनय यांना). आपले खोकथेमध्ये स्वागत असेल.

इच्छुक लेखकांसाठी नियमावली:
१. पोस्ट साधारणपणे 500 ते 1000 शब्दांची असावी.
२. पोस्ट शक्यतो 48 तासांच्या आत पुर्ण करावी.
३. शक्यतो अतिरंजीतपणा टाळावा.
४.आपण हवे ते पात्र निवडू शकता. किंवा नवीन पात्र तयार करू शकता. किंवा अगोदरच्या लेखकाने निवडलेले पात्रसुद्धा आपण पुढे घेऊन जाऊ शकता.
५. अजून काही गोष्टी आहेत ज्या व्यनीतून स्पष्ट करूच. :)

तर सुरू करत आहोत नवीन कथा 'डाव'

---------------

पहिला भाग (सखाराम) :

मारूतीचा पार आहे. तिथे एक पिंपळाचं उंच झाड आहे. बुंध्याला एक मोठा दगड आहे. पाठीमागे एक छोटीशी बोळ आहे. त्या बोळीतंच आमची गुप्त मिटींग चालू झाली.

"विक्याला हाणायचा" वस्तादनं ठराव मांडला. त्याच्या मुठी आवळल्या होत्या. ओठ थरथरत होते. नुकत्याच खाल्लेल्या गुटख्याची पिचकारी मारायलाही तो विसरून गेला.

टॉवेल पांघरून चवड्यावर बसलेला दाद्या गांगरून गेला.
"या असल्या लफड्यात आपण पडणार नाही" असे झटक्यात म्हणत तो उठून उभाही राहिला.

"बस रे बुळ्या, फाटली का? विहरीवर केलेली काशी सगळ्या गावात करून टाकेन मग" वस्तादनं आता कुठं पिचकारी मारत दम भरला. घडून गेलेल्या नाजूक गोष्टी त्याला चांगल्याच लक्षात राहायच्या. त्याच जोरावर तो दाद्याला ब्लॅकमेल करू पाहात होता. मलाही त्यानं असंच यात अडकवलं होतं.

पेंद्या वस्तादच्या मांडीला मांडी लावून बसला होता. अशावेळी बोलणं कमी आणि ऐकणं जास्त एवढंच काम तो करायचा. त्यानं खुनेनंच दाद्याला खाली बस म्हणून सांगितलं.

"तर प्लॅन आसा हाय, उद्या तो डुक्कर जवा विहरीवर पोहायला येईल. तेव्हा आपण समद्यांनी त्याला बुडवून मारायचा." वस्ताद हताश नजरेनं आमच्याकडं बघत म्हणाला. बहुतेक त्याला आमची ग्यारंटी वाटत नसावी.

हे ऐकून आतापावतो खाली मान घालून थंडावा घेत असलेल्या पेंद्यानं चुळबूळ केली.
"मी जातो, आयनं जेवायला बोलवलंय" त्यानं चपलेकडे पाय वळवले. मग सगळ्यांचा अंदाज घेत तो हळूच घासत घासत कठड्यावरून खाली उतरला.
"झोपायला येणार नाही का आज?" दाद्यापण अस्वस्थ होता. जिथं पेंद्या तिथं दाद्या. हे समीकरण बरीच वर्ष जुनं होतं.
"नगं बाबा, आई मारते" म्हणून पेंद्या चटाकफटाक चप्पल वाजवत निघून गेला.

वस्ताद हताश झाला. तो काहीच बोलला नाही. त्यानं गुटख्याची अजून एक पुडी उगाचच फोडायला घेतली.
"तुला नाही का जेवायला जायचं?" त्यानं विचारलं.
"ये थांब रं, मी पण येतो" म्हणत दाद्यानंही मग धूम ठोकली.

आता तिथं वस्ताद आणि मी दोघेच उरलो. बोले तो फुल सन्नाटा. वस्तादशी पंगा म्हणजे फुल गावात दंगा. आपण म्हणजे वस्तादचे भक्तच होतो. वस्ताद म्हणेल ती पूर्व दिशा. एकदा रमी खेळताना त्याच्याकडून वीस रूपये घेतले होते. त्याने अजून मागितले नव्हते.

मी शांतता भंग करत म्हटलो.
"वस्ताद, पण त्याला का मारायचा?" वस्ताद जरा भडकलाच. 'च्यायला कुठे येऊन अडकलो' असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते.

"सखाराम, तू जा, जेवण करून ये. पळ" एकाएकी उठत तो म्हणाला. मी मात्र 'असं कसं यानं आपल्याला कोललं?' असलेे भाव चेहऱ्यावर घेऊन तसाच उभा राहिलो.

"पण त्याला जीव मारायला नको. नुसतं भ्याव दाखवू" पण तो ऐकायला थांबलाच कुठं. बुलट स्टार्ट करून भुर्रकन निघून गेलापण.

घरी जाऊन जेवलो. बापानं चार श्या घातल्या. रोजच्यासारखंच मग मी चादर गोणपाट घेऊन देवळापुढं झोपायला आलो. मस्त चांदण वगैरं पडलं होतं. इथं आम्ही भरपूर पोरं ऐन ऊन्हाळ्यात पटांगणात येऊन झोपतो. पटांगण खूप मोठे आहे. बाजूला छोटीमोठी दुकाने आहेत. काहिजण त्यांच्या पायऱ्यांवर झोपतात. कुणी देवळात. कुणी झाडाखाली. तर कुणी देवळाच्या मंडपात.

झोप लागणारंच होती तेवढ्यात पेंद्या आणि दाद्या चादर सतरंजी घेऊन झोपायला येताना दिसले. आज काहिपण करून त्यांच्याकडून विक्याची भानगड शोधून काढली पाहिजे. मी उगाचच झोपेचं नाटक करत पडून राहिलो. त्यांचं बोलणं हळूहळू माझ्या कानावर येत चाललं.
"साली ती रूपी, ह्याला काय भीक घालत नाय. आन ह्यो चाललाय डाव टाकायला....."

_____
इथून पुढे पुढचा खो :::

प्रतिभाविरंगुळाकथा

प्रतिक्रिया

ही तिसरी खो कथा आहे दुसरी मी कालच लिहीली आहे हा तिचा पत्ता.
http://www.misalpav.com/node/39349
मस्त जमल्ये
आणी हो मी पयला !

माझी कथा आपण पुर्ण करु शकाल का?

जव्हेरगंज's picture

4 Apr 2017 - 12:21 pm | जव्हेरगंज

पुढचा खो 'अॅस्ट्रोनाट विनय' यांना. त्यांनी दुसरा भाग लिहावा. :)

अॅस्ट्रोनाट विनय's picture

4 Apr 2017 - 1:16 pm | अॅस्ट्रोनाट विनय

खो स्विकार केला आहे.

Ranapratap's picture

4 Apr 2017 - 9:28 pm | Ranapratap

मस्त लिहिलंय, आणि हो दोन्ही कथा बरोबरीने चालू द्या, एका वेळी दोन कथा वाचायला मजा येईल