वर्षारंभाची सायकल राइड (अंबरनाथ ते वरदविनायक महड -अंबरनाथ)

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in भटकंती
29 Mar 2017 - 10:34 am

गेल्या रविवारी २६ ला कल्याण सायकलीस्ट बरोबर बारवी धरण ची छोटीशी राइड केली तेव्हा, २८ ला कोणती राइड करायची याची चर्चा झाली, पण सोमवार पर्यंत धड काही ठरत नव्हते, उल्हासनगर सायकलिंग क्लब मध्ये ही नुसती चर्चा सुरु होती, बर्याच जणांना सुटी नसल्याने वा सुटी असूनही जावे लागतंय ,या कारणाने सकाळी छोटी १५/२० ची राइड करू असाच सर्वांचा कल दिसत होता. इतक्यात “गोवा मुंबई सायकल २०१७” या ग्रुप वर समीर दातार ची एक पोस्ट दिसली, वाशी ते महड राइड टोटल १३० प्लस.
गुगल बाबा कडे विचारणा केली अंबरनाथ ते महड कसे जायचे? चौक वरून १६ किमी असे उत्तर आले.
तरी दोन मित्राना विचारले तेही असेच जावे लागेल असे म्हणाले. म्हणजे १३४ किमी तर जावे लागणार, पण दोघांचे रस्ते वेगळे असल्याने शेवटचे १६ किमी भेट झाली तर होईल असेच एकंदर चित्र होते.
समीरला ही कोणी प्रतिसाद दिला नव्हता.मलाही इकडून कोणी पार्टनर नव्हता. चला निघू एकटेच असा विचार केला.
अजून एक अडचण होतीच, पाडवा असल्याने घरून आई व सौ यांनी मला सोडले तरच शक्य होती ही राइड.
“ गुढी तयार करून ठेव , दाराला तोरण बांधून ठेव मग गेलास तरी चालेल प्रतिपदा लागली कि आम्ही पूजा करू ” या बोली वर परवानगी मिळाली.
मग सोमवारी दुपारी कामावर जाण्यापूर्वीच गुढी व सायकल दोघींची शक्य ती सर्व तयारी करून ठेवली,कामावरून यायला रात्रीचे १२:३० होणार, पहाटे ५:३० ला निघायचे त्याच्या आत गुढी उभी करून, जायचे म्हणजे ३:४५ ला उठणे भाग होते. म्हणजे ३ तासांची झोप मिळू शकत होती, भरपूर झाली असे म्हणत तयारीला लागलो.एकटेच आहोत वाटलं तर येतांना थांबू कोठेतरी एक डुलकी काढून ,उन कमी झालं कि निघू ,पण जायचेच आता असा निश्चय केला.
रात्री अपेक्षा चा मेसेज आला ,”उद्याचा काही प्लान?”. सांगावे कि नको, असा विचार आला, पण, सांगितले अटी व शर्ती सकट. “ थोडाही उशीर चालणार नाही, स्पेअर ट्यूब, स्पेअर लाईट, सर्व आवश्यक, इमर्जन्सी प्लान म्हणून येताना ट्रेन ने यायची तयारी हवी, उशीर होईल याची घरी कल्पना देऊन ठेवणे,इत्यादी इत्यादि ...”
अपेक्षा, माझी ट्रेकींग विद्यार्थीनी, नेचर स्टडी शिबीर मनाली ला ४एक वर्षांपूर्वी आलेली, अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर च्या सायाकालिस्ट ची व माझी ओळख तिनेच करून दिलेली व १०० किमी राइड चा अनुभव असलेली.तिची परीक्षा झालेली असल्याने सध्या मोकळीच व सायकलिंग च प्रचंड वेड व घरातून सपोर्ट, तिचा दादा ही चांगला सायाकलीस्ट.
३;४५ ला उठलो ठरल्या प्रमाणे सर्व सोपस्कार आटपले, सर्वांचा चहा करून ठेवला, ५:३० स्वामी समर्थ चौकात पोहोचलो, अपेक्षा ला फोन केला, तीही तयारच होती, निघालो. पाईप लाईन रोड ला लागताच वेग घेतला.नेरळ च्या छोट्याशा चढावावर, काही ग्रामस्थ दिसले , लांब लचक नुकताच तोडलेला बांबू घेऊन रहदारीची पर्वा न करता घराकडे निघाले होते. स्वताचा बचाव करत त्यांना ओलांडून चढ पार केला.एक दोन वेळा पाणी पिण्यासाठी फक्त थांबलो, भिवपुरी गाठले, नेहमीचा शहाळ वाला नुकताच उघडला होता. नारळ पाणी पिऊन निघालो, तेव्हा ३७ किमी झाले होते व वाजलेही फार नव्हते, अजून तरी वेळेचे गणित जमलं होते.
तरीही फार वेळ न दवडता दोघांनीही सायकली दामटल्या.कर्जत च्या चार चौकातून उजवीकडे वळलो, ते चौक ला जायच्या इराद्यानेच, चढाव पार केला कि एक रस्ता डावीकडे वळतो व सरळ गेले कि चौक. त्या वळणावर एक रिक्षा उभी होती, त्याला विचारावे, व खात्री करून घ्यावी म्हणून थांबलो. “चौक ला कशाला जाताय, मी ही महडलाच जातोय हा शोर्ट कट आहे,पळसधरी वरून पुढे गेलात कि सरळ हायवे ला मिळाल, उजवीकडे वळलात कि महड” हूश्श, चक्क १०/१२ किमी चा मुनाफा, देवदूतच वाटला तो रिक्षावाला आम्हाला. त्या आनंदातच पळसधरी केव्हा आली ते समजलच नाही. आता रस्ता मात्र अधून मधून खराब होता. पण महड असा बोर्ड कुठेच दिसत नव्हता . “हाल उभाबाण,घोडवली आडवा बाण” ,हाल उभा बाण,तळवली आडवा बाण” असे हाल कॉमन व पुढचे आडवा बाण गाव वेगळे असे तीन चार फलक गेले व एकदाचा हायवे दिसू लागला. हाल संपले एकदाचे.
हायवे ला लागण्या पूर्वी खात्री करावी म्हणून एकाला विचारले, त्याने योग्य मार्गदर्शन करून ५ मिनिटात पोहोचाल असा वर ही दिला. मग काय हायवे स्पीड ने पळू लागलो ते तडक मंदिराच्या पार्किंग शीच थांबलो. ८:३० वा म्हणजे साडे तीन तासात मंजिल सर झाली होती. दर्शन घायचे कि नाही याबद्दल काहीच बोलणे झाले नव्हते, अपेक्षा व माझ्यात, व मुख्य प्रश्न होता सायकली सोडून गेलो व काही छेड छाड केली कोणी सायकल शी तर काय? आमचा संभ्रम तेथील दुकानदाराने ओळखला व जा बिनधास्त कोणी काही करणार नाही असा विश्वास दिला ,त्या भरोशावर सायकल सोडून,आधी पोटोबा मग विठूबा म्हणत आधी दोन कोकम दोन लिंबू सरबत घेऊन मंदिरात गेलो, गर्दी नव्हतीच, पटकन दर्शन घेतले व सायकल जवळ आलो, दुकानदाराकडून आवळा पेठा , राजगिरा लाडू घेतले व हॉटेल गाठले. डिश समोर येईपर्यंत घरी फोन केले.समीरला ही फोन केला तो महड ला येऊन परतीच्या प्रवासाला लागला होता देखील. भरपेट नाश्ता करून बाहेर पडलो. हॉटेल मालकाचे घर ही तेथेच असावे. हिरवागार मांडगा(बांबूची काठी) खाली पाट, रांगोळी , सारवण, असा जामानिमा व बांबूच्या टोकावर तांब्याचा लाल गडू त्याखाली लाल केशरी रंगाची गुढी आंब्याची डहाळी व हारासकट मस्त शोभत होती, अनाहूत पणे हात जोडले गेले. गुढी असावी तर अशीच, धुणे वाळत घालायच्या काठीवर बाल्कनीत उभी केलेली किंवा बाहेर काढलेली गुढी ,का कुणास ठाऊक मला तरी केविलवाणी दिसते.
सोसायटीच्या आवारात एखादे बांबूचे बेट लाऊन,त्याचाच एखादा बांबू वापरून एकच, सार्वजनिक गणपती सारखी सार्वजनिक गुढी असायला काय हरकत आहे, असा एक विचार मनात आला, असो.
परतीच्या प्रवासाला लागलो. हायवे लागला तेव्हा एक फलक दिसला त्यावर हाळ असे गावाचे नाव लिहिले होते . आता खुलासा झाला, “हाल” हे “हाल” नसून “हाळ” आहे. बरोबर आहे, हायवेवरचा फलक तयार करतांना पुण्याची हवा लागून, ल चा ळ झाला असावा.
भरल्या पोटी पाय मारणे जरा कठीण वाटत होते, व उन ही जाणवु लागले होते, पण अंतर माहीत होते व रस्ता ही, त्यामुळे उन्हाचा उगाच बाऊ न करता पण भान राखून, शरीरातील पाणी व क्षार यांचे संतुलन राखले तर आपण दुपारी दो अडीच पर्यंत घरी जाऊ हा विश्वास वाटत होता, अपेक्षाला या बद्दल कल्पना दिली, आपल्याकडचे पाणी तापून, पिण्यासाठी योग्य राहणार नाही तेव्हा दुकान दिसले कि थांबायचे गार पाणी प्यायचे नवी बाटली घ्यायची व पुढे निघायचे असे ठरवले, शिवाय लिंबू सरबत, शहाळी, उसाचा रस यापैकी काहीही दिसले कि थांबून ते ही घ्यायचे, उगाच फार न ताणतां शांतपणे पुढे जात राहायचे. मोठे झाड दिसले कि त्याखाली थोडावेळ थांबून ताजेतवाने व्हायचे असे ही ठरवले. श्रमांची जाणीव कमी करायला संगीता सारखा उपचार नाही, म्हणून फ्रंट पाउच मधला प्लेअर ही सुरु केला, आज मोठी राइड म्हणून साथीला मोठा कलाकार हवा म्हणून मेहदी हसन चे कार्ड प्लेअर मध्ये टाकले होते. पळसधरी सोडल्यावर एका बहाव्याने लक्ष वेधले होत. त्याच्या बरोबर फोटो काढायचा हे मनाशी ठरवलं होतं, तो दिसताच थांबलो, अपेक्षाला फोटो काढायला सांगितला. तिला विचारले तुझा काढायचाय का? नको, तरुण पिढीची निसर्गाबद्दलची उदासीनता, मला माहित असल्याने, आग्रह केला नाही, तरीही ज्या झाडाखाली थांबत गेलो त्याची माहिती तिला देत गेलो, थंडगार सावलीच्या निमित्ताने का होईना झाडानंबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने. भिवपुरी आले, शहाळ वाल्याचे गुऱ्हाळ ही आहे, रस घ्यायचा म्हणून थांबलो, सायकल ला ही थोडी सावली मिळावी म्हणून बाजूच्या शेड मध्ये सायकल आणू का असे विचारले,एक आजोबा होते, त्यांनी ठेवा असे सांगून बसायला खुर्चा ही दिल्या.सायकल ठेऊन प्लेअर बंद करणार इतक्यात आजोबा म्हणाले थांबा, हा कोण गायक, गाणं सुरु ठेवा, आजोबा कान देऊन ऐकू लागले, त्याना शब्द समजत नव्हते पण संगीताची भाषा चांगली अवगत असावी. मला ही गाणी द्याल का ? हो पुढच्या वेळी येताना घेऊन येतो, रस वाल्याकडे गर्दी होती, रस येई पर्यंत आजोबांशी मस्त गप्पा झाल्या, त्यांचे थोरले बंधू बुवा आहेत, घरात संगीताचे वातावरण आहे. मेहदी हसन चे मोठेपण मला ही नव्याने समजले व त्यांच्या बद्दलचा आदर ही दुणावला, आता जेव्हा आजोबांना गाणी देईन तेव्हा संगीत माणसांना कसे जोडते याचा अजून एक अनुभव जोडला जाईल गाठीशी. रस पिऊन आजोबांचा निरोप घेऊन निघालो, एका झाडाखाली एक तरुण क्रिकेट टीम उभी होती, त्यांनी हात उंचावले, मी ही हात दाखवला, ते ही वेडे मी ही, शाळेत असताना असेच खेळायचो, उन्हाची पर्वा नसायची, घरचे म्हणायचे “तुम्हा पोरांना उन कस लागत नाही” चला आपल्याला अजूनही लागत नाहीये, म्हणजे आपण लहानच आहोत या विचाराने मस्त थंड वाटले, “हम भटक कर जुनूनं कि राहोंमे अक्ल से इंतकाम लेते है” तेव्हा क्रिकेट च वेड (जुनून) आता सायकल चे. वेड कायम आहे, वाढत्या वयात एव्हढा बदल हवाच, हां एक फरक आहे आता थोडं भान आलंय अशी वेड जपताना काय काळजी घ्यायची याचे.
वांगणी आलं धाबा दिसला,थांबलो. मागे पाहिले अपेक्षा दिसेना, चिंता वाटू लागली, एव्हढ्यात दिसली. मग राजगिरा लाडू व पाणी प्यायलो, एक पूर्ण बाटली दोघांत संपली, अजून एक घेतली, अपेक्षाच्या पायात क्रान्प आला होता. म्हणून मागे पडली, आता सावधगिरी म्हणून तिला पुढे राहा असे सांगितले, ट्रेन ने जाणार का असे विचारताच “हट” म्हणाली, जिगर आहे करणार ही ११५ पूर्ण असा विश्वास मिळाला. मग बदलापूर ते अंबरनाथ अजून एक विश्रांती थांबा घेऊन निघालो , घरी पोहोचलीस मेसेज टाक असे अपेक्षाला बजावले,घरी पोहोचलो.
लिंबू, कोकम, नारळ,उस,राजगिरा,आवळा केळी चीकू इत्यादी अनमोल पिके पिकवणारे शेतकरी, त्याची उत्पादने विकणारे सर्व दुकानदार, रस्त्याकडेला झाडं लावणारे अद्यात लोक, व अशा वेड्याला परवानगी देणारी घरचीमंडळी, सायकलिंग या खेळाची माहिती देणारे अनेक गुरु या सर्वांच्या सहकार्याने ही गुढी पाडव्याची सायकल यात्रा सफळ संपूर्ण झाली. घरी आल्यावर निवांत पणे मेसेजे पाहिले तर समीर दातार या पठ्याने एकट्याने पहाटे साडेचार पासून ५तास ३४ मिनिटात १३० किमी राइड २३.४ च्या वेगाने पूर्ण केल्याचे समजले.शाब्बास समीर. मान लिया बॉस.
तळटीप: चॉकलेट,केक,कृत्रिम स्वादाची थंड पेय, तथाकथित एनर्जी बुस्टर यांचा वापर या यात्रे आधी दरम्यान वा नंतर केला नव्हता.
बहावा
हाल चा फलक
अपेक्षा

प्रतिक्रिया

नमिता श्रीकांत दामले's picture

29 Mar 2017 - 10:52 am | नमिता श्रीकांत दामले

उत्तम वर्णन, सुंदर प्रवास, असेच भटकत रहा

कंजूस's picture

29 Mar 2017 - 11:08 am | कंजूस

Ambarnath to Varad Vinayak Mahad

कंजूस's picture

29 Mar 2017 - 11:45 am | कंजूस

१ ) Strava record

२ ) सावली एवढी पुरे

३ )प्रवेशद्वारापाशी ,महड

४ ) ही कमान पाहण्यासाठी पाच तास लागले.

५ )

६ ) सायकली आणि स्वारांना थोडी विश्रांती

सुबोध खरे's picture

29 Mar 2017 - 11:42 am | सुबोध खरे

साष्टांग दंडवत साहेब
नवी ४०० सी सी ची मोटर सायकल घेतली आहे तरी त्यावर जाणे होत नाही( आळशीपणामुळे) आणि इथे तुम्ही सायकल वर जाताय.
स्वतःची लाज वाटायला लागली आहे.

५० फक्त's picture

29 Mar 2017 - 2:14 pm | ५० फक्त

कोंची बजाज डोमिनेअर का ?

हेमंत८२'s picture

29 Mar 2017 - 1:19 pm | हेमंत८२

ग्रेट.. खूप छान

इडली डोसा's picture

29 Mar 2017 - 2:22 pm | इडली डोसा

दोघांचे अभिनंदन, पुढील राईडसाठी शुभेच्छा!

झक्कास... आता हे जमले आहे तर पूर्वीचा लेख पण टाकून द्या.

एस's picture

29 Mar 2017 - 2:31 pm | एस

वाह!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Mar 2017 - 8:25 pm | अत्रुप्त आत्मा

नमस्कार माझा तया रायडिंगला.

पाटीलभाऊ's picture

30 Mar 2017 - 1:29 pm | पाटीलभाऊ

सुंदर भटकंती...पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा.