किमान दिड वर्षं ---- कथा (काल्पनीक)

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
27 Mar 2017 - 11:43 pm

किमान दिड वर्षं ---- कथा (काल्पनीक)

विकी , अन्या , रम्या आणी जग्या नुकतेच एका नवीन कंपनीत जॉइन झाले होते . काहि दिवसातच त्यांची एकमेकांशी चांगली ओळख झाली . हे चारहीजण आता एकाच प्रोजेक्टमध्ये काम करणार असले तरी त्यांची कामाची आणी तंत्रज्ञानाची पार्श्वभुमी वेगवेगळी होती . त्यांच्या टिम्सही वेगवेगळ्या असणार होत्या . चौघांनीही याआधी दोन तीन ठिकाणी काम केले होते . त्यामुळे आपापल्या तंत्रज्ञानामध्ये त्यांना मध्यम स्वरुपाचा अनुभव होता . प्रोजेक्टचे मुख्य काम चालु होण्याला अजुन दोन आठवडे अवकाश होता . त्यामुळे सध्या तरी ते निवांत होते . रोजची मिटींग झाली की मग कंपनीच्या कॅन्टिनमध्ये बसुन चहा पिणे , आपापले या आधीच्या कामाच्या ठिकाणचे अनुभव एकमेकांना सांगणे असा त्यांचा दिनक्रम चालु असे .

एकदा असेच चौघांचे कॅन्टिनमध्ये बसुन चहा , गप्पा मारणे चालु होते . तेवढ्यात त्यांची नजर तिथे आलेल्या धिमशुवर गेली . धिमशु हाही नुकताच इथे जॉइन झाला होता. याआधी त्यानेही एक दोन ठिकाणी काम केले होते . त्यालाही त्याच्या कामाच्या तंत्रज्ञानामध्ये मध्यम स्वरुपाचा अनुभव होता . या चौघांना पाहुन धिमशु ओळखीचं हसला आणी तिथलीच एक खुर्ची घेउन त्यांच्या बरोबर बसला . चौघांच्या धिमशुबरोबर जुजबी गप्पा चालु झाल्या .

गप्पा मारताना मध्येच धिमशु डोळे बारीक करत किंचित रडक्या आवाजात म्हणाला "मला खरं तर जॉइन होण्यापुर्वी या कंपनीने सांगितलं होतं की इथे नाईट शिफ्ट नाही . पण आता ते म्हणतात की नाईट शिफ्ट करावी लागेल ."

धिमशुचे बोलणे ऐकुन विकी एकदम भुतकाळातल्या आठवणींमध्ये हरवला . त्याच्या याआधीच्या कंपनीमध्येही त्याच्याबाबतीत असाच काहिसा प्रकार घडला होता . त्या कंपनीने अचानक कामाची गरज म्हणुन नाईट शिफ्ट सुरु केली होती . नेमक्या त्याच कालावधीत विकीला तब्येतीच्या अनेक तक्रारी सुरु झाल्या होत्या . त्यामुळे विकीने नाईट शिफ्ट जमणार नाही म्हणुन स्पष्ट सांगीतले. हवं तर कंपनी सोडायलाही तो तयार होता . तेव्हा विकीच्या मॅनेजरने त्याला गोड बोलुन थांबवले . " तु दोन तीन महिनेच नाईट शिफ्ट कर . नंतर तुला डे शिफ्ट्मध्येच ठेवु . " असेही सांगीतले . तेव्हा कुठे विकी त्यासाठी तयार झाला . पण बघता बघता दोन तीनाचे पाच सहा महिने झाले , तरी त्याच्या शिफ्ट्मध्ये काही बदल होईना . त्याला आश्वासन देणारा मॅनेजर पुढे स्वताच नाहिसा झाला . विकीचं आजारपण , त्याच्या तब्येतीच्या तक्रारी वाढतच गेल्या . अखेर नाइलाजाने विकीने तापाने फणफणलेल्या अवस्थेत ती कंपनी सोडली . पुढे जवळ जवळ दोन महिने तो अंथरुणाला खिळुनच होता . अखेर थोडेफार बरे वाटु लागल्यावर त्याने मोठ्या प्रयत्नाने हा जॉब मिळवला होता . तरीही , जॉईन होण्यापुर्वी त्याने , " आपण तब्येतीच्या तक्रारी असल्यामुळे नाईट शिफ्ट करणार नाही " हे निक्षुन सांगीतले होते . तरिही , "आधीच्या कंपनीत आपण तब्येत पुर्ण बिघडेपर्यंत असे कसे फसलो , आपण वेळीच ती कंपनी का सोडली नाही " हा राग त्याच्या मनात कुठेतरी राहिला होता .

आज धिमशुचे बोलणे ऐकताना त्याच्या त्या जुन्या त्रासदायक आठवणी परत जाग्या झाल्या . मनातल्या रागावर परत डागण्या मिळाल्या . त्याला आपल्या जागी गरीब बिचारा धिमशु दिसु लागला . धिमशुला या त्रासातुन वेळीच वाचवले पाहिजे असा ठाम विचार करुन तो म्हणाला -

"धिमशु , तु तुझ्या मॅनेजरशी आजच याबद्दल बोलुन घे . कारण या गोष्टींचा पुढे खुप त्रास होउ शकतो . तुला जर कोणच मदत करणार नसेल , तर हवं तर तुझ्या आधीच्य कंपनीशी परत बोलुन घे . तुझी तिथली जागा जर अजुन रिकामी असेल , आणी त्यांना जर तुझ्या अटी मान्य असतील तर तु परत तिकडे जाउ शकतोस ."

इतका वेळ रडवेला दिसणारा धिमशु आता मात्र ठामपणाने म्हणाला "नाही ..नाही.. मी किमान दिड वर्षं तरी हि कंपनी सोडणार नाही ."

विकी त्याला समजुतीच्या स्वरात म्हणाला "अरे पण याचा पुढे तुझ्या तब्येतीला त्रास होउ शकतो .." पण त्याचे बोलणे मधेच तोडत धिमशु जोरात मान हलवत म्हणाला

"ते काहिही असो . मी किमान दिड वर्षं तरी हि कंपनी सोडणार नाही ."

हे ऐकुन विकी खजिल होउन थोडा वेळ शांत बसला . आपण तरी कशाला उगाच त्याला आगाउपणे सल्ला द्यायला गेलो असा त्याच्या मनात विचार आला . त्याची ती अवस्था पाहुन त्याचे तीन मित्रही गप्प बसले . धिमशु मात्र विजयी मुद्रेने तिथुन निघुन गेला .

दुस-या दिवशी असेच हे चौघं चहा पित बसले असताना धिमशु परत त्यांना जॉइन झाला . कालचा प्रकार सगळेच विसरले होते . परत नव्याने इकडच्या तिकडत्या गप्पा सुरु झाल्या .

गप्पा मारता मध्येच धिमशु डोळे बारीक करत किंचित रडक्या आवाजात म्हणाला "मला खरं तर जॉइन होण्यापुर्वी या कंपनीने सांगितलं होतं की , तुझा टिमलिडचा रोल असणार आहे . पण आता ते म्हणत आहेत की , टिमलिड मी नाही तर कुणी तरी दुसरंच आहे ."

धिमशुचे हे बोलणे ऐकुन अन्याच्या मनातल्या जुन्या जखमांवरची खपली काढली गेली . त्यालाही त्याच्या याआधीच्या कंपनीत टिमलिडच्या रोलचे गाजर दाखवुन एक वर्ष भर डबल शिफ्ट्मध्ये काम करायला लावले होते . पण , नंतर मात्र कुठल्यातरी तिस-याच , मॅनेजरच्या ओळखीतल्या माणसाला टिमलिड बनवले गेले . सर्वांच्या उपहासाच्या नजरा झेलणे सहन न झाल्याने आणी फसवणुकीच्या दु:खातुन अन्याने ती कंपनी सोडली . या नव्या कंपनीत त्याने आपला रोल टिमलिडचाच आहे हे आधीच खात्री करुन घेतले होते . आपली जशी याआधी फसवणुक झाली , तशी कुणाचीच होउ नये असे त्याला कायमच वाटत असे .

म्हणुनच अन्या धिमशुला तळमळीने म्हणाला " धिमशु , तु तुझ्या मॅनेजरशी आजच याबद्दल बोलुन घे . कारण या गोष्टींचा पुढे खुप त्रास होउ शकतो . तुला जर इथे हवा तो रोल मिळत नसेल , तर माझ्या माहितीतल्या दोन , तीन कंपन्या आहेत . मी तुला तिथले कॉन्ट्क्ट्स देतो . तिथे तुला नक्की टिमलिडचा रोल मिळेल."

इतका वेळ रडवेला दिसणारा धिमशु आता मात्र ठामपणाने म्हणाला "नाही ..नाही.. ते काहिही असो . मी किमान दिड वर्षं तरी हि कंपनी सोडणार नाही ."

काल विकीच्या बाबतीत घडलेला प्रकार अन्याला आठवला . आज तोही खजिल होउन गप्प बसला . धिमशु मात्र विजयी मुद्रेने तिथुन निघुन गेला .

पुन्हा पुढच्या दिवशी चौघं चहा पित बसले असताना धिमशु परत त्यांना जॉइन झाला . थोडं फार इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर , धिमशु डोळे बारीक करत परत किंचित रडक्या आवाजात म्हणाला "मला खरं तर जॉइन होण्यापुर्वी या कंपनीने सांगितलं होतं की , तुला ऑनसाईटला पाठवु . पण आता ते म्हणत आहेत की ऑनसाईटची संधी कॅन्सल झाली आहे ."

हे ऐकुन चकीत होण्याची आज रम्याची पाळी होती . त्यालाही त्याच्या आधीच्या कंपनीत ऑनसाईटचे आमिष दाखवुन , त्याच्याकडुन सहा महिने दुप्पट तिप्पट काम करवुन घेण्यात आले होते . प्रत्यक्षात मात्र त्याला डावलुन ऑनसाईटला , पुढे पुढे करणा-या दुस-याच कुणाला तरी पाठवले गेले . तेव्हा रागाने रम्याने ती कंपनी सोडली होती. ऑनसाईटची संधी आहे ही खात्री करुनच त्याने हि नवीन कंपनी जॉईन केली होती .

हा सगळा प्रकार आठवुन रम्या धिमशुला मनापासुन म्हणाला "धिमशु , तु तुझ्या मॅनेजरशी आजच याबद्दल बोलुन घे . कारण तुझी अशी फसवणुक होता कामा नये . नाहि तर मग सरळ , माझ्या माहितीतल्या काहि कन्सल्टन्सीज आहेत ज्यांच्याकडे ऑनसाईटच्या संधी आहेत . मी तुला त्यांचे आयडी देतो . तु तिकडे ट्राय कर ."

इतका वेळ रडवेला दिसणारा धिमशु आता मात्र परत ठामपणाने म्हणाला "नाही ..नाही.. ते काहिही असो . मी किमान दिड वर्षं तरी हि कंपनी सोडणार नाही ."

विकी , अन्या यांच्याप्रमाणे आज आता रम्याही खजिल होउन शांत बसला . धिमशु मात्र विजयी मुद्रेने तिथुन निघुन गेला .

धिमशु निघुन गेल्यावर विकी आपल्या तिघा मित्रांना म्हणाला "तुम्हाला या धिमशुचं बोलणं काहि लक्षात आलं का ? काहि खटकलं का ? "

अन्या , रम्या आणी जग्या एका सुरात मान डोलवत म्हणाले " काहितरी खटकलं खरं . पण काय ते नक्की समजत नाही ."

"हा धिमशु रोज आपल्याशी गप्पा मारतो . आणी गप्पा मारता मारता मध्येच काहितरी रडगाणं लावतो ."

"हो.. आणी त्याचं रडगाणं कुठेतरी आपण स्वता:शी रिलेट करतो . आणी त्याला मदत म्हणुन आपल्याला आपल्या बाजुनं जो योग्य वाटेल तो सल्ला द्यायला जातो."

"आणी बहुतेक वेळा आपण त्याला शेवटचा उपाय म्हणुन कंपनी बदलण्याचाच सल्ला दिला आहे . पण , आपल्या बाजुनं तोच सल्ला योग्य वाटतो . . त्याला आपण तरी काय करणार ?"

"आणी आपण सहानुभुतीनं काहि सांगायला गेलो तर हा ठोंब्या उलट आपल्यालाच किमान दिड वर्षं तरी हि कंपनी सोडणार नाही असं सुनावतो ."

"तेच तर मला कळत नाही .. त्याला जर किमान दिड वर्षं तरी हि कंपनी सोडायची नाही तर कशाला रोज तक्रारी करुन आपल्या डोक्याची मंडई करतो ? उगाच आपल्या डोक्याला रोजचा ताप.. भेजा फ्राय . "

"ते काहि नाही. आता यापुढे त्याने आपल्याला काहिही रडगाणं ऐकवलं तरी आपण त्याला काहिही सल्ला द्यायला जायचं नाहि . "

"हो..ठरलं तर मग .. हि आपले चौघांची शपथ ."

" हो.. चौघांची शपथ ." असे म्हणत चारही जणांनी एकमेकांना शपथेची खुण म्हणुन एकेक चिमकुटा काढला .

पुन्हा पुढच्या दिवशी चौघं चहा पित बसले असताना धिमशु परत त्यांना जॉइन झाला . थोडं फार इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर , धिमशु डोळे बारीक करत परत किंचित रडक्या आवाजात म्हणाला "मला खरं तर जॉइन होण्यापुर्वी या कंपनीने सांगितलं होतं की , लगेच जॉइन व्हा . कारण प्रोजेक्ट लगेच सुरु होणार आहे . पण आता ते म्हणत आहेत की , प्रोजेक्ट सुरु होण्याला एक महिना तरी लागेल . "

धिमशुचे बोलणे ऐकुन जग्या सुन्नच झाला . कारण त्याच्या आधीच्या कंपनीत त्याच्या बाबतीत नेमका हाच प्रकार घडला होता . त्याच्या बहिणीचे लग्न चार दिवसांवर आलेले असतानाही कंपनीने त्याला प्रोजेक्ट सुरु झाल्याचे कारण सांगुन लगेच जॉइन करायला लावले होते. जॉइन झाल्यावर त्याला समजले की तो प्रोजेक्टच कॅन्सल झाला आहे. या सगळ्या तणावात तो बहिणीच्या लग्नालाही धडपणे जाउ शकला नाही . अखेर तिथल्या अनिश्चिततेल्या वैतागुन त्याने ती कंपनी सोडली .

तो अधिर होउन धिमशुला काहितरी सल्ला देणार होता..बहुतेक कंपनी बदलण्याचाच . धिमशुही उत्सुकतेने त्यांच्याकडे बघत होता . तेवढ्यात जग्याला आपली कालची चौघांची शपथ आठवली . इजा , बिजा , तिजा झालेले त्याचे तीन मित्रही त्याला डोळे वटारुन तीच आठवण करुन देत होते . भानावर येउन जग्या धिमशुला म्हणाला .

"नाही ..नाही.. ते काहिही असो . आता आपण किमान दिड वर्षं तरी हि कंपनी सोडायची नाही ."

जो डायलॉग आपण बोलणार होतो , तो , जग्याने आधीच बोलुन टाकल्यामुळे , धिमशुचा चेहरा पडला . जास्त काहि न बोलता तो तिथुन निघुन गेला . तो गेल्यावर चौघांनी एकमेकांना टाळ्या देउन आनंद साजरा केला .

पुढे एक दोनदा धिमशुने परत त्यांना गाठुन "या अशा त्रासदायक कंपनीत कसं राहायचं ?" असं काहितरी रडगाणं आळवायचा प्रयत्न केला . पण त्याला या सगळ्यांनी ठरलेलं उत्तर देउन पळवुन लावलं . "नाही ..नाही.. आपलं काय ठरलय ? आता आपण किमान दिड वर्षं तरी हि कंपनी सोडायची नाही ."

पुढे काहि दिवसातच सगळ्यांचे रुटीन काम सुरु झाले . प्रत्येकजण आपापले काम , आपापली टिम यामध्ये गढुन गेला . पुर्वीसारखं परत चौघांनी एकत्र भेटणं कमी होउ लागलं. रम्या एक वर्षासाठी ऑनसाईटला गेला . अन्या त्याच्या टिमलीडच्या कामामधे गर्क झाला . विकी आणी जग्या आपापल्या शिफ्ट्मध्ये बिझी झाले .

अधुनमधुन कधी फोनवर एकमेकांशी बोलणे झाले की "किमान दिड वर्ष"ची चौकशी हटकुन व्हायची . कधीतरी कुणालातरी कॅन्टीनमध्ये धिमशु दिसत असे . सतत नाईट शिफ्टमध्ये काम करुन त्याचे डोळे पार काळवंडले होते . त्याच्या तब्येतीला या शिफ्टचा त्रास होत आहे हे तर स्पष्ट दिसत होते . पण हे त्याला सांगुन उपयोग नव्हता . नाहितर त्याने परत "किमान दिड वर्ष" चा डायलॉग ऐकवला असता .

धिमशुही कधी या चौघांपैकी कोणी भेटले तर जुजबी बोलता बोलता मध्येच डोळे बारीक करुन विचारत असे .
"सध्या बाहेर कुठे ओपनींग बघतो आहेस का ? काही स्विच मारण्याचा प्लान आहे का ?"

अशा वेळेला समोरचाही त्याला उत्तर देत असे . " नाही.. मी किमान दिड वर्षं तरी हि कंपनी सोडणार नाही ." धिमशु मग काहि न बोलता निघुन जात असे .

बघता बघता दोन वर्षं संपली . आज खुप दिवसांनी विकी , अन्या , रम्या आणी जग्या कॅन्टिनमध्ये बसुन चहा पीत गप्पा मारत होते . तेवढ्यात त्यांची नजर तिथे आलेल्या धिमशुवर गेली . या चौघांना पाहुन धिमशु ओळखीचं हसला आणी तिथलीच एक खुर्ची घेउन त्यांच्या बरोबर बसला . चौघांच्या धिमशुबरोबर जुजबी गप्पा चालु झाल्या . धिमशुला काहितरी सांगायचं होतं . अखेर त्याने सांगितलं . " मला एका दुस-या कंपनीमधे ऑफर आली आहे . मी हि कंपनी सोडतोय ."

"अरे वा.. कॉन्ग्रॅटस..पण तु तर हि कंपनी किमान दिड वर्षं सोडणार नव्हतास ना ?" विकीने साळसुदपणे विचारले .

"हो ..मग झाली की दिड वर्षं.. दिड काय ? चांगली दोन वर्षं झाली ." धिमशुने गोंधळुन उत्तर दिले .

"अरे हो खरच की .. दोन वर्षे झाली . म्हणजे तसा तु इथे सहा महिने जास्तच थांबलास ." अन्याने टोमणा मारला . पण तो धिमशुच्या डोक्यावरुन गेला .

"आता लक्षात ठेव.. पुढची कंपनीही किमान दिड वर्षं सोडु नकोस ." आता रम्यानेही बोलुन घेतले . पण धिमशु आपल्याच नादात होता .

"हो. ते तर माझं ठरलेलंच आहे . मी किमान दिड वर्षं तरी कंपनी सोडत नाही ."

"शाब्बास . कीप इट अप.." आता जग्याने धिमशुला शुभेच्छा देत बोलुन घेतले .

"थँक यु" म्हणत धिमशु जाउ लागला . तरी जाता जाता त्याने प्रश्न विचारलाच .

"तुमचा काही जॉब बदलण्याचा प्लॅन आहे का ?"

त्यावर त्याला चौघांनी मिळुन उत्तर दिले .

""नाही ..नाही.. आम्ही किमान दिड वर्षं तरी हि कंपनी सोडणार नाही ."

------------------------समाप्त ------ काल्पनीक ---------------------------------------------------------------------------------------

कथाप्रकटनलेख

प्रतिक्रिया

पैसा's picture

28 Mar 2017 - 11:33 pm | पैसा

:)

मराठी कथालेखक's picture

29 Mar 2017 - 2:43 pm | मराठी कथालेखक

हा हा.. वेगळ्या विषयावरची कथा...वाचून मजा आली.
किमान दीड वर्षे मिपा सोडणार नाही :)

रुपी's picture

11 Apr 2017 - 3:18 am | रुपी

हा हा :)

रेवती's picture

11 Apr 2017 - 7:34 am | रेवती

हीही............वाचताना मजा आली कारण मागीलवर्षी मैत्रिणीनं असंच पिडलं होतं. बराच त्रास स्वत:ला करून घेऊन मी गप्प बसले होते आता मी तिला तसा काही विषय निघाला की "नाही, किमान दीड वर्ष तरी नाही" असं म्हणणार आहे. ;)

आपल्याला कथा आवडल्याचे कळवल्याबद्दल खुप धन्यवाद .