हे बंध रेशमाचे...(मध्यरंग आणि पूर्वरंग)

बोलघेवडा's picture
बोलघेवडा in जनातलं, मनातलं
27 Mar 2017 - 10:24 pm

नुकताच शशक स्पर्धेचा निकाल लागला आहे. त्यातील विजेत्यांचे अभिनंदन आणि साहित्य संपादकमंडळाचे स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी आभार मानतो. या स्पर्धेसाठी मी हि एक शशक लिहिली होती. त्याच कथेचा पूर्वरंग (प्रीक्वेल) आणि मुळ कथा इथे सादर करत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------

हे बंध रेशमाचे (मध्यरंग)
(शशक स्पर्धेसाठी लिहिलेली कथा)

"अरे नुसती मजा. तुला सांगतो...हि अशी...उंssच लाट यायची..."
नातू ‘आ’ वासून ऐकतोय.

“पाण्याची?”
"मग!!! इथल्यासारखं नाही...
शंख, शिंपले, खेकडे, मऊ, मऊ वाळू...
अगदी मुबलक!!"
...
...
"बर आता चला हं. वेळ संपत आली, घरी जायचं ना?"

पुढच्या काही क्षणात समोरचा समुद्र आणि पायाखालची वाळू नाहीशी झाली.
...समोर पुन्हा मंगळावरची लाल रेताड भकास जमीन दिसू लागली.

आजोबा आणि नातू अर्थ सिम्युलेटरमधून बाहेर पडले.

अंतराळयानात बसल्यावर हेल्मेटच्या काचेवर आतून वाफ सोडत छोट्यानं आजोबांना विचारलं,
"ग्रँडपा, ग्रॅनी कुटे अशते?"

आजोबा दोन बोटं अंतराळयानाच्या एयरटाइट खिडकीवर ठेऊन दुरदुर जाणाऱ्या एका फिकट निळ्या ठिपक्याकडे बघत होते.
यानाच्या एक्झॅास्टमुळे खिडकीची काच आता धुरकट व्हायला लागली होती...

------------------------------------------------------------------------------------------------------
हे बंध रेशमाचे (पूर्वरंग, प्रीक्वेल)

“अय्या, ती लाल चांदणी बघाना! कित्ती सुंदर दिसतीये ना!”
फेसाळत येणारी लाट पायावर घेत, ती त्याला म्हणाली.

“अगं...चांदणी नाही ती, मंगळ आहे तो!”
“असुदेत!
तुमच्या त्या वेधशाळेतल्या गोष्टी तिकडेच ठेवा. माझ्यासाठी ती चांदणीच!”
हातातल्या शिंपल्यात रेती भुरभुरत ती म्हणाली.

“राहुलच्या वेळेस तस काही वाटले नाही. पण या वेळेस पोटात जरा जास्तच दुखतय.
“माझ काही कमी जास्त झालं तर...”

“अग सायन्स आज काल किती पुढे गेलंय तुला काही कल्पना आहे का?
मागच्याच वर्षी माणूस पार चंद्रावर जाऊन आलाय.”

“डरो मत पारो!! हम तुम्हे चांदसे तो क्या, मंगळसेभी वापस लेके आयेंगे”
कोरड्या पडत जाणाऱ्या रेतीकडे पाहत तो मोठ्याने हसत म्हणाला.

वाङ्मयकथाआस्वादलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

27 Mar 2017 - 11:14 pm | पैसा

दोन्ही कथा छान!