विहार... भाग १

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
21 Mar 2017 - 3:23 pm

निळ्याशार समुद्रात रोजच्याप्रमाणेच अहमद होडी घेऊन निघाला. सोबतीला त्याचा वीस-एकवीस वर्षांचा कोवळा मुलगा इरफान होताच.खरं म्हणजे, आज मुलाला सोबत घेण्याची त्याची इच्छा नव्हती. भर समुद्रात मुलाला काही त्रास झाला तर काय हा प्रश्न आज पहिल्यांदा त्याला पडला होता. पण इरफान घरातही स्वस्थ बसला नसताच. इरफान क्रिकेट खेळायचा.सध्या कॉलेजला सुट्टी असल्यामुळे एकतर वडिलांसोबत समुद्रात जाणे किंवा क्रिकेट खेळणे एवढाच त्याचा उद्योग असायचा. पोरगं आपल्या नजरेसमोर असलेलं बरं असा विचार करून अहमद त्याला घेऊन निघाला.कोळीवाड्यातल्या इतर होड्यासुद्धा एव्हाना निघाल्या होत्या.समुद्रात बऱ्यापैकी आत गेल्यावर अहमदने जाळे फेकले. आता तास-दोन तास वाट बघायची होती. इरफान एकीकडे काहीतरी टिवल्याबावल्या करत बसला होता. एरवी हा रिकामा वेळ अहमदला फार आवडायचा. दूरवर अथांग समुद्राकडे बघत त्याचा वेळ मजेत निघून जायचा. आज हीच वेळ त्याला खायला उठली होती. कितीही प्रयत्न केला तरी त्याचं लक्ष सतत इरफानकडे जात होतं.शेवटी निग्रहाने त्याने नजर दुसरीकडे वळवली.

"निळ्या पाण्यात तश्या बघण्यासारख्या कितीतरी गोष्टी असतात..मधूनच त्या पाण्याचं उचंबळून येणं..त्यातले तरंग..सूर्यकिरण आणि त्या तरंगांचं मिलन..मग बदललेला त्या पाण्याचा रंग…. सूर्यकिरण थेट आतमध्ये शिरल्यावर दिसणारा दगड….अचानक दिसणारी एखादी छोटी मासोळी..त्या मासोळीच्या आशेने येणारे समुद्रपक्षी...लगोलग मासोळीने घेतलेली डुबकी..आणि खोल पाण्यात अविरत सुरु असलेला मासोळीचा स्वछंद विहार.....स्वछंद विहार !!!"

अचानक अहमद भानावर आला. त्याला गेल्या दोन-तीन दिवसातले प्रसंग आठवले. काही दिवसापासून इरफानच्या पोटात दुखत होतं. गावातल्या डॉक्टरच्या औषधाने गुण येईना म्हणून अहमद त्याला घेऊन भरुचला गेला. तिथल्या डॉक्टरने सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफीचा खर्च परवडण्यासारखा नसला तरी अहमदने ती करायचे ठरवले. रेडियोलॉजिस्ट इरफानच्या पोटावरून वारंवार कसलंतरी यंत्र फिरवत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. इरफानच्या पोटात काहीतरी विचित्र दिसत होतं. साधारण अर्धा तास खातरजमा केल्यावर रेडियोलॉजिस्टने रिपोर्ट तयार केला.

"क्या हुआ है साहब?",अहमदने विचारलं.
"मैने रिपोर्टमें लिखा हैं सबकुछ. आपके डॉक्टरसे पूछ लिजिएगा."

खरं म्हणजे रेडियोलॉजिस्टचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्याच्या सतरा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने प्रथमच असं काहीतरी बघितलं होतं. त्याने थोडं घाबरतच तो रिपोर्ट बनवून अहमदला दिला. अहमद निघून गेल्यावर त्याने लगोलग इरफानच्या डॉक्टरांना फोन करून परिस्थिती सांगितली. त्या डॉक्टरांचाही विश्वास बसेना. दुसऱ्या दिवशी ते स्वतः इरफानला घेऊन त्या रेडियोलॉजिस्टकडे आले. त्यांनी स्वतःसमोर पुन्हा सोनोग्राफी करून घेतली. त्या दोघांची अगम्य भाषेतली चर्चा अहमद आणि इरफानच्या कानावर पडत होती. दोघेही गोंधळले होते. शेवटी डॉक्टरांनी इरफानला बाहेर पाठवून अहमदला बसवून घेतले.

"क्या हुआ है साहब? कुछ तो बोलीये"
"अहमद...."
"जी?"

डॉक्टरांना काही सुचेना. शेवटी त्यांनी एका कागदावर मानवी शरीराची रचना काढायला सुरवात केली. माणसाचे हृदय, फुप्फुस,अन्ननलिका,आतडे....आणि शेवटी किडनी त्यांनी त्या कागदावर दाखवली.

"अहमद हमारा शरीर कुछ इस तरह से बना हुआ है. यहा एक और वहा दुसरी किडनी होती है. किडनी समझते हो ना?"
"जी साहब"
"ये दोनो किडनीया इक-दुसरेसें जुडी हुई होती है. लेकिन इरफान के शरीर मे......" डॉक्टर थबकले.
"क्या हुआ साहब?"
"इरफान की किडनी जुडी हुई नही है!!"
"क्या?"
"हा..उसकी एक किडनी उसके शरीर मे घूम रही है !!", डॉक्टरांनी दीर्घ श्वास घेतला.
"ये क्या बोल रहे हो डॉक्टर साहब?"
"हा अहमद..पहले हमें भी यकीन नही हो रहा था."
"पर ऐसा कैसे हो सकता है?"
"ये तो नही पता. पर इसका इलाज यहा नहीं हो सकता.तुम इरफान को लेके नडियाद चले जाओ.”

थोड्या वेळाने अहमद तिथून निघाला.वारंवार विचारूनही त्याने इरफानला काही सांगितले नाही.परतीच्या प्रवासात अहमदच्या डोक्यात तोच विचार सुरु होता की ही गोष्ट इरफानला सांगायची कशी.
कारण सद्यस्थितीत इरफानला कल्पना नसली तरी,

चोवीस तास इरफानच्या शरीरात त्याची एक किडनी स्वछंद विहार करत होती !!

क्रमश:
(सत्यघटनेवर आधारित)

कथाअनुभव

प्रतिक्रिया

एस's picture

21 Mar 2017 - 4:43 pm | एस

बापरे! पुभाप्र.

कंजूस's picture

21 Mar 2017 - 5:37 pm | कंजूस

मला तीन आहेत!
घाबरण्याचं कारण नाही.

पैसा's picture

22 Mar 2017 - 4:52 pm | पैसा

वाचत आहे