सुरवंट

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
21 Mar 2017 - 2:14 pm

मालाडला रहात असतानाची गोष्ट आहे ही. सकाळी लवकर, बहिणी शाळेला गेल्या होत्या. शाळेत जायला, मी अजून लहान होतो.नाना ऑफिसला गेले होते. सकाळपासून, तीनचाकी सायकल, बाहेरच्या गॅलरीत चालवून मला कंटाळा आला होता. मग घरांत येऊन खेळण्यांची पिशवी जमिनीवर रिकामी केली. जड खेळणी तिथेच पसरली आणि गोट्या, बॉल वगैरे मंडळी, सैरावैरा चारी दिशांना पळाली. लाकडी घसरगुंडीवरुन 'टकाक्क- टकाक्क करत खाली येणारा एक मिष्किल डोळ्याचा लाकडी मुलगा होता. ते माझं आवडतं खेळणं होतं तेंव्हा. त्याच्याशी थोडा वेळ खेळलो. मग भोवरा फिरवायचा प्रयत्न केला. पण ती दोरी बांधता बांधता, सैल होऊन सुटून यायची आणि मग भोवरा काही फिरायचा नाही. सर्व धड आणि मोडकी खेळणी हाताळून झाली. तेवढ्यांत आई, खालच्या विहीरीवर धुणं धुवून आली. आल्या आल्या तिला माझा पसारा दिसला. पण ती काही बोलली नाही. तिचं सगळं काम आटोपलं की, ती पलंगावर उताणं निजून पुस्तक वाचत लोळायची. न्हायली असेल तर, लांबलचक केस पलंगाच्या खाली सोडून द्यायची. ते खालच्या जमिनीवर टेकायचे. मीही बराच वेळ स्वतःशीच रमत असल्यामुळे , तिच्या मागे भुणभुण नाही करायचो. पुस्तक वाचताना तिची अगदी तंद्री लागे. मी एका लाकडी मोटारीला हातात धरुन, आधी जमिनीवर, मग वाटेत येणार्‍या सर्व उंच-सखल भागावर चालवायला सुरवात केली. तोंडाने मोटारीचा आवाज काढण्यात मी गुंग होतो.
अचानक, आईच्या हातातले पुस्तक खाली पडले. ती ताडकन पलंगावर उठून बसली. झोकांड्या खात, स्वयंपाकघरातल्या मोरीकडे गेली. मी बावरुन जागच्या जागी उभा राहिलो. आई परत आली तेंव्हा तिचा सगळा चेहेरा पाण्याने भिजला होता, एका डोळ्यावर तिने पदर धरला होता आणि एकाच डोळ्याने ती माझ्याकडे बघत होती. माझा तोंडाचा आ वासलेलाच होता. तिने मला मोठ्या आवाजात सांगितले, " माझ्या डोळ्यांत, वरुन गुल्हा(सुरवंट) पडला. मी डोळा धुतलाय, पण असह्य आग होतीये." मी छताकडे पाहिले. आमच्या चाळीचे छप्पर कौलारु होते. त्यातूनच तो पडला असावा. आधी , झाल्या प्रकाराचे मला आकलनच झाले नाही. पण आपल्या आईला काहीतरी मोठ्ठा बाऊ झालाय, एवढे कळले. कारण बारीकसारीक लागणे, आपटणे वा विळीने कापणे, या गोष्टींनी ती कधी इतकी विचलित झालेली मी पाहिली नव्हती. तिने पुन्हा एकदा डोळा धुतला आणि आरशांत पाहिले. तिचा डोळा नुसताच लाल झाला नव्हता तर प्रचंड सुजून खोबणीच्या अर्धा बाहेर आल्यासारखा दिसत होता. हे दृश्य बघितल्यावर, आता तीही घाबरली होती. शेजारपाजारची फारशी काही मदत होण्याची शक्यता नव्हती. त्याकाळी, पटकन रिक्शा-टॅक्सीत बसून डॉक्टरकडे जाणे शक्यच नव्हते, कारण रिक्शा तर नव्हत्याच. फोन तर पंचक्रोशीत, एखाद्याकडे असायचा. आईने मला म्हटले, " तू घाबरु नकोस, माझा डोळा बरा होणार आहे. तू एकटा जाऊन, मी सांगते ते औषध आणशील का ? 'अल्जेरॉल' नांव लक्षांत राहील का तुझ्या ?" मी होकारार्थी मान हलवली. आमच्या वाडीतून बाहेर पडल्यावर, गल्लीत डाव्या बाजूला चालत गेले की घोडबंदर रोड लागायचा. तिथे उजवीकडे वळून चार दुकाने ओलांडली की केमिस्टचे दुकान होते. आईचा हात धरुन, कैक वेळेस, मी रस्त्याने त्या दुकानात गेलो होतो. मी लगेच, आईने दिलेली नोट हातात घट्ट धरुन निघालो. जिना उतरताना पुन्हा आईचा आवाज ऐकू आला," रस्त्याने सावकाश जा रे, धांवायचं नाही अजिबात!" मी मोहिमेवर निघालो होतो. दुकानात पोचताक्षणी मी ती चुरगाळलेली नोट समोर धरली आणि अल्जेरॉल, अल्जेरॉल असे म्हणालो. काऊंटरवरचा माणूस आश्चर्याने पहात राहिला. पण तो आम्हाला चांगला ओळखत होता. " केम, मम्मी नथी आवी साथे?" असे म्हणत त्याने ती बाटली मला दिली आणि उरलेले पैसे माझ्या सदर्‍याच्या खिशांत कोंबले. मुख्य रस्त्यावरुन मी पुन्हा गल्लीच्या तोंडाशी सावकाश चालत आलो. आता मात्र मला राहवले नाही आणि मी घराच्या दिशेने धूम ठोकली. जिन्याच्या पायर्‍या एक एक करत चढलो. माझ्या पावलांची चाहूल लागल्यामुळे, आई दरवाजाशी उभी होती. माझ्या हातातली बाटली घेऊन, तिने एका डोळ्याने ते पारखून घेतले. लगेच डोळ्यांतही घातले. तोपर्यंत बहिणी शाळेतून आल्या होत्या. आम्ही नेहेमीच्याच वेळेस जेवलो. संध्याकाळपर्यंत , आईने दोन तीनदा ते औषध डोळ्यांत घातले असावे. कारण डोळा प्रचंड लाल दिसत असला तरी उघडता येत होता आणि खोबणीत परत गेला होता.
नशिबाने, त्याच दिवशी नाना लवकर घरी आले. सारा प्रकार कळताच, ते आईला आमच्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेले. त्यांनी आणखी काही औषधे दिली. आठेक दिवसांत आईचा डोळा बरा झाला. पुढे, नातेवाईक जमले की, हा प्रसंग ती अगदी रंगवून सांगे. त्याची अशी बरीच आवर्तने अगदी मोठा होईपर्यंत ऐकल्याने , ती गोष्ट, मीही, तितक्याच बारीक तपशीलाने, आज‌ सांगू शकलो.

इतिहासकथाkathaaप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

खेडूत's picture

21 Mar 2017 - 4:45 pm | खेडूत

हाही भाग आवडला.
रोचक अनुभवांच्या मालिकेतलाच भाग -४ आहे ना?

लहानपणी पाहिलेले कौलारू घरातले सुरवंट चांगलेच लक्षात आहेत. पण हे फक्त जुलै-ऑगस्ट मधेच येत असत.

ज्योति अळवणी's picture

21 Mar 2017 - 10:03 pm | ज्योति अळवणी

अशा काही आठवणी कायम मनात राहतात