कोहोज किल्ला.

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in भटकंती
15 Mar 2017 - 3:26 pm

हरिश्चंद्र गडावरून आल्यापासून सगळे बोंबलत होते... पुढची ट्रीप कुठे(होय, गृपात सगळे ट्रीप ट्रीप करत असतात आणि मी त्यांना ट्रेक ला नेतो नेहमी) ते ठरवा.
मग मी मुरुड जंजिर्याचा प्लान केला. एकाच दिवसाचा. वेळापत्रक थोडं घाईच होतं पण सगळे आनंदाने तयार झाले. पण अचानक मध्ये विघ्न आलं आणि मी स्वत:च हि ट्रीप रद्द केली. आता पुन्हा हि सगळी तोंडं बंद करणं गरजेचं होतं. कुठे जायचं हे डोक्यात येत नव्हतं. अचानक एक किल्ला आठवला...अगदी जवळचा पण दुर्लक्षित... खुप कधी पासून जिथे जायची इच्छा होती असा कोहोज किल्ला.
आमच्याच तालुक्यातला, अगदी वीस किलोमीटर्सच्या अंतरावरच असलेला कोहोज तसा दुर्लक्षितच राहिलाय. म्हणजे अगदी मुंबईहून पर्यटक येतात कधीकधी इथे पण स्थानिक फारच कमी जातात. मग म्हटलं आधी आपल्या जवळचा कोहोज सर करू मगच दूरच्या किल्ल्यांचा विचार करायचा. लगेच त्या अनुषंगाने गृहपाठाला लागलो.

हा किल्ला मुंबई आणि नाशिक या दोन्ही ठिकाणांहून जवळ जवळ ३ तासांच्या अंतरावर आहे.
Via Mumbai
मुंबई ते कोहोज (यातील निळा रास्ता थेट माझ्या गावाहून जातो)

Via NAshik
नाशिक ते कोहोज

ऑफिसमधले प्यून नितीन भाऊंचे गावच कोहोजाच्या पायथ्याजवळ. मग आधी त्यांना विचारले रस्त्याबद्दल. त्यांनी सांगितले कि तीन चार रस्ते आहेत किल्ल्यावर जायला. मुंबईहून येणार्यांना सोयीस्कर असा शेलटे गावाहून जाणारा मार्ग, गोऱ्हे गावाहून जाणारा मार्ग, संगे गावाहून जाणारा आणि नाणे गावातून जाणारा असे चार मार्ग असल्याचे कळले. रात्री वस्तीला जाण्याबद्दल मात्र ते साशंक होते. इथे कोणी कॅम्पिंग केल्याचे त्यांच्या ऐकिवात नव्हते बहुधा.
ग्रुप मध्ये चर्चा सुरु झाली, हरिश्चंद्रगडाच्या अनुभवाने सगळे कॅम्पिंग बद्दल सकारात्मक होते पण त्यासाठी शनिवार आणि रविवार अश्या दोन दिवसांच्या सुट्ट्या कोणाला शक्य वाटत नव्हते. त्यात अल्पेश आणि माझ्या चर्चेत त्याने एक नवी संकल्पना मंडळी, स्वच्छता मोहिमेची. महाशिवरात्रीला गडावरील शिव मंदिरात भावीक मोठ्या प्रमाणात येत असतात असे त्याला कळले होते. गर्दीच्या अनुषंगाने भरपूर कचरा जमेल हे भाकीत त्याने वर्तवले. गडांवरील कचऱ्याचे माझेही अनुभव होतेच मग जेव्हा मी सगळ्या ग्रुपवर हा मुद्दा मंडल तेव्हा सगळ्यांनी एक सुराने होकार दिला. पण त्यासाठी पुन्हा एक मुद्दा महत्वाचा वाटत होता आणि ते म्हणजे वस्तीला थांबणे. संद्याकाळी लवकर निघून चढाई करणे शक्य आहे पण तरीही संध्याकाळी कामावरून लवकर येणे प्रत्येकालाच जमेल असे वाटत नव्हते. मग एकाच दिवसाचा बेत आखला. सकाळी लवकर निघून उन्ह निघायच्या आत चढणे, स्वयंपाकासाठी जागा शोधून काही जणांना स्वयंपाकाला गुंतवणे, काहींनी स्वच्छता मोहीम उघडणे, जेवण झाल्यावर थोडा आराम करून गड फिरून संध्याकाळी लागणे अशी रूपरेषा ठरली.
२६ फेब्रुवारी ला ट्रेक करायचे ठरले. ग्रुप मधील प्रत्येक जण जोशात होकारार्थी मान डुलवु लागले. ट्रेकला आठवडा बाकी राहिल्यावर नेहमीप्रमाणे एक एक भिडू कमी झाले. म्हणजे आधी मी सपत्नीक येणार म्हणणारे हरेश, योगेश आणि विशाल आता 'आमची हि येवो ना येवो, मी येईनच' म्हणायला लागले(अर्थात 'ही' येण्याची शक्यता एक टक्का फक्त). हे ऐकून ऐकून माझी 'ही' बिथरली. 'प्रत्येक वेळी यांच्या बायका वेळेवर रद्द करतात आणि तुम्हा सगळ्या पुरुषांमध्ये मी आणि स्वातीच येतो' असे तिचे म्हणणे. बरे ते स्वातीलाही लगेच पटले आणि तीही नन्नाचा पाढा ऐकवू लागली. एका झटक्यात महिलांचं चाळीस टक्के आरक्षण रद्द झालं. मग पुरुषवर्ग रंग दाखवू लागला. ट्रीपच्या एक दिवस आधी योगेशला साक्षात्कार झाला कि मी तर गावात क्रिकेटचे सामने आयोजित केले आहेत. मग माझे कार्यक्रम स्थळी उपस्थित असणे अनिवार्य आहे. केतनने कुठलेही कारण दिले नाही पण मला जमणार नाही एवढा एक निरोप ग्रुपवर टाकला. अमोल सध्या लग्नासाठी 'बघण्याच्या'(काय ते सांगणे नलगे) कार्यक्रमात व्यस्त झाला. विशालला कुठूनतरी साखरपुड्याचं 'आग्रहाचं' आमंत्रण आलं. तरीही आम्ही सात जण उरलो होतो. हरेश सक्काळीच बदलापूरहून येणार होता. लांबून येणारा तो एकटाच.
मी, वसंत आणि सागरने आवश्यक गोष्टी खरेदी केल्या आदल्याच संध्याकाळी. बरचसं सामान संध्याकाळीच पॅक करून ठेवलं. सागर आणि विकासने सकाळी साडेपाचलाच माझ्याकडे येऊन मला सकाळचा बरोबर नेण्यासाठीचा नाश्ता बनवण्यास मदत करायचे आश्वासन दिले. उद्या बरोब्बर सहा वाजता निघायचं आहे अशी ताकीद सगळ्यांना देऊन झोपी गेलो.

एकदाचा रविवार उजाडला. जमेल त्याला फोन करून उठवण्यास सुरुवात केली. सगळे उठले होते जवळजवळ. हरेश मात्र फोन उचलेना. तो निघाला असेल म्हणून फोन असे गृहीत धरून आम्ही तयारी सुरु ठेवली. हरेशशी संपर्कात राहण्याची जबाबदारी महेशवर सोपवली. मी, सागर आणि विकास नाश्ता बनवून घेतला. वसंताही आला, अल्पेश एक नव्या भिडूला घेऊन आला, महेशही आला. हरेश मात्र फोन उचलेना. त्याची वाट बघत आम्ही एक तास थांबलो कसातरी त्याने फोन उचलला आणि वेळेवर 'मी येणार नाही' असे जाहीर केले. सहाच्या ऐवजी आम्ही सातला निघालो. अर्ध्या तासात पायथ्याशी अपेक्षित होते पण मध्ये लागणारी वैतरणा नदीवरील पुलावर टाईमपास आणि गोऱ्हे येथे भाजी खरेदीसाठी थांबलो आणि हो नाही करत आठ वाजता नाणे गावात पोचलो. नाणे गावाच्या ग्रामस्थांनी इथे एक तोफ जाऊन ठेवली आहे. तिथेच बाकीच्यांची वाट बघत बसलो. वसंत मागे राहिला होता. त्याच्या मते तो जिथे थांबला होता तिथून एक सोपा रास्ता जात होता. पण इथे आम्ही एका ग्रामस्थाला विचारले तर तो हीच सगळ्यात सोपी वाट असे छाती ठोकपणे सांगू लागला. मग वसंतालाही इकडेच बोलावून घेतले.

On the way
रस्त्यात वैतरणा नदीचा पूल लागला तिथे थोडा टाईमपास...

On the way 2
रस्त्यावरून दिसणारा कोहोज.

canon

मग वाटाडयाला घेऊन तडक निघालो. दोनेक किमी चालत गेल्यानंतर मुख्य चढाईला सुरुवात करण्याआधी न्याहारी करायचे ठरवले. बसण्यास छानसे दगड दिसले रस्त्यात तर तिथेच बसून मी नेलेले एग्गी ब्रेड्स, अल्पेशने आणलेली भाजी भाकरी आणि शिरा असे सगळे फस्त केले. थोडा वेळ आराम केला आणि निघालो. आता सगळी चढाई दिसत होती पुढे. पहिला टप्पा सुरु झाला, गप्पा-फोटो काढणे चालू ठेवत चढणे चालू होते. ऊन वाढत होते तसे तसे चढणे कठीण वाटत होते. भरपूर झाडीमुळे सावली बऱ्यापैकी असली घामही खूप येत होता. छोट्याश्या वाटेवरून आम्ही वर चढत होतो. जवळ जवळ पाऊण तासाच्या चढाईनंतर पहिला टप्पा पूर्ण झाला.
First phase
पहिल्या टप्प्यावरचं सपाट मैदान.

वर अगदी मोकळ्या माळासारखे पठार लागले. वरच्या जवळजवळ सगळ्याच झाडांची पानगळ झालेली वाटली पण नंतर कळले की अलीकडेच वणवा लागून गेला असावा. पहिला टप्पा गाठण्यापूर्वीच सगळ्यांनी थोडा वेळ फोटो काढण्याच्या निमित्ताने आराम केला होता त्यामुळे इथे न थांबता निघालो. समोर उभा कातळ दिसत होता. उन्हामुळे सगळेच लवकर थकले होते. त्यातही सगळ्यांच्या अपेक्षेपेक्षा हा किल्ला जास्त उंच वाटत होता. खरंतर हरिश्चन्द्रगडच्या पाचनईच्या सोप्या वाटेमुळे सगळ्यांचा आत्मविश्वास जरा जास्तच दुणावला होता त्याचा हा परिणाम. किल्यावर भरपूर झाडी असल्यामुळे ऊन मात्र तेवढं त्रास देत नव्हतं. मग उभ्या कातळाच्या अंगानेच असलेल्या नळीतून दुसऱ्या टप्प्याकडे वाटचाल सुरु केली. हळू हळू हा टप्पाही पार झाला. एका झाडाखाली बसून पुन्हा थोडं पाणी पिलं आणि वर निघालो. वाटाड्याच्या मते आता फक्त एक टप्पा राहिला होता माथ्यावर जायला. दुसऱ्या टप्प्यावरच्या पसरलेल्या माळावर पाण्याची सहा टाकी आहेत, पुढे गेल्यावर एक छोटेखानी शिवमंदिर लागते. इथेच महाशिवरात्रीला भाविक येत असतात. इथे आल्यावर आम्हाला एका गोष्टीचा प्रचंड पश्चाताप झाला आणि तो म्हणजे इथे वस्तीला न आल्याचा. एवढ्या सुंदर ठिकाणी तेही घरापासून अगदीच तासाभराच्या अंतराजवळ असूनही संध्याकाळी लवकर यायला जमणार नाही म्हणून आम्ही कॅम्पिंग रद्द केलं होत. दु:खाची बाब ही की जे कॅम्पिंगला येऊ शकत नव्हते ते ऐन वेळी एका दिवसाच्या ट्रेकलाही आले नाहीत.
2nd fase start
दुसऱ्या टप्प्याचा चढ.
2nd phase completed
दुसरा टप्पा पूर्ण.

Taake
दुसऱ्या टप्प्यावरील पाण्याचे टाके.

Shivmandir
शिवमंदिर.

इथे आणखी एक गोष्ट जाणवली, आम्हाला भरपूर काम होतं इथे. महाशिवरात्रीच्या भंडाऱ्याच्या खुणा पावलोपावली दिसत होत्या. एवढं काम बघून आम्ही लवकरात लवकर जेवण उरकून 'स्वच्छता मोहीम' हाती घ्यायचं ठरवलं. किल्ल्यात जिथे पिण्याच्या पाण्याचे टाके आहेत तिथेच जेवण बनवायचे ठरवले व नेहमीप्रमाणे सागर आणि वसंताने स्वयंपाकाची तयारी सुरु केली. विकास आणि अल्पेशही त्यांना मदत करत होतेच. आम्ही मस्त सावलीत पडून आराम करत होतो. आता गप्पांना उधाण आले होते. जेवण झाले कि लगेच स्वच्छता मोहीम हाती न घेता आधी किल्ला फिरून मग परतीला निघताना स्वच्छता करायची असे ठरले. एवढ्या उन्हात कचरा एकत्र करून तो जाळणे जीवावर आले होते. मग जेवण तयार होण्याची वाट बघत बसलो.
buruj
जेवण बनवले त्या ठिकाणाहून दिसणारा बुरुज

Buruj

सागर, वसंत आणि विकासने झक्कास जेवण बनवले त्यावर सगळ्यांनी आडवा मारला. उन्हाचा जोर कमी होण्याची वाट बघत तिथेच पहुडलो. अर्ध्या तासाने बुरुज पार करून शेवटच्या टप्प्यावर चढलो. वरून किल्याच्या आजूबाजूचं दृश्य अतिशय लोभस दिसत होतं . हे सगळं पाहून कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं आणि एवढी वर्षे आपण इथे का आलो नाही याचं आश्चर्यही. किल्याच्या कुठल्याही बाजूने पाहिल्यास नयनरम्य देखावे वाट पाहात होते.

किल्याच्या उत्तरेच्या टोकाकडून पाहिल्यास दूरवर वैतरणा आणि तिची उपनदी देहेरजे यांचा संगम दिसतो. जंगल आणि शेतांना कापत जाणारा वाडा मनोर महामार्गही या बाजूने दिसतो. पूर्वेला अगदी माहूलीची डोंगररांग आणि सुळके दिसतात. किल्ल्यावर झाडीही भरपूर आहे. पूर्वेकडे किल्ल्याचेच वेगळे निघालेले दोन सुळक्यासारखे भाग आहेत त्यावर भगवा झेंडाही फडकताना दिसला पण तिथे जायची वाट माहित असलेलं कोणी मला अजून भेटलं नाही. कदाचित रॅपलिंग करत चढावं लागत असेल. कारण किल्ल्याच्या बाजूने तरी आम्हाला खडा पहाड दिसत होता. भरपूर फोटो काढून मग किल्ल्याच्या टोकावर असलेल्या छोट्याश्या मंदिराकडे आलो इथेही दोन छोटे कातळाची सुळके आहेत. त्यांवर चढता येणे शक्य असले तरी उन्हात तापलेल्या पाषाणावरून चढणे धोक्याचे वाटले. इथूनही समोरील दृष्ये मनात साठवून ठेवत परतीला लागलो. आता लवकरात लवकर उतरून स्वच्छता मोहीम हाती घ्यायची होती आणि अंधार पडायच्या आत पायथ्याशी पोचायचे होते. लगबगीत येऊन स्वयंपाक केला होता तिथेच ठेवलेल्या बॅगा घेतल्या, पाण्याच्या बाटल्या तिथल्या थंडगार पाण्याने भरून घेतल्या आणि निघालो. दुसऱ्या टप्प्यावर जिथे शिव मंदिर होते तिथेच महाशिवरात्रीला भंडारा झाला होता त्यामुळे तिथेच सगळ्यात जास्त कचरा होता.

sangam

sulakaaaaa
इथे कोण आणि कसे चढले असेल माहित नाही...

Sulakaaaa

+
किल्ल्याच्या शिखरावरील दोन सुळक्यांपैकी एक.

killyavaril don chte sulake
किल्ल्यावरील दोन छोटे सुळके.

दुसऱ्या टप्प्यावर येताच सगळ्यांनी बॅगा उतरवल्या आणि कचरा जमा करायला सुरुवात केली. असंख्य प्लॅस्टिकच्या बाटल्या, खाऊची, वेफर्सची पाकिटे सर्वत्र विखुरली होती. भंडाऱ्यात जेवलेल्या भाविकांपैकी काहींनी पत्रावळी कुठेही फेकल्या होत्या तर बऱ्याचशा ५-१० च्या संख्येत जमा करून दगडाखाली ठेवल्या होत्या त्यामुळे त्या तेवढ्या विखुरल्या नव्हत्या आणि आम्हाला एकत्र करताना कमी वेळ लागत होता. अशी शेकडो कागदी पात्रे आम्ही ठिकठिकाणी एकत्र करून जाळली. त्यांची आग विझेपर्यंत वाट बघितली आणि पाणी ओतून आग पूर्णपणे विझल्याची खात्री करीत पुढे पुढे जात राहलो.
माझ्या माहितीप्रमाणे वाटते महाशिवरात्रीचा हा स्तुत्य कार्यक्रम शेलटे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आयोजित केला होता. किल्ल्यावरचा रास्ता सजवण्यात आला होता तसेच छोट्या झाडांना कुंपणेही घालण्यात आली होती. कचराही कमीत कमी पसरेल याची काळजी घेण्यात आल्याचे जाणवले. स्वच्छतेचे काम आटोपते घेत दुसरा टप्पा सोडला आणि मध्ये न थांबता पायथा गाठला.

स्वच्छता मोहीम:
clean

clean

clean

plates

सगळे शांत पणे चालत होते. संध्याकाळ झाली होती आणि पक्षी घरट्यांकडे वळत होते. सकाळची किलबिल थंडावली होती. आपल्या जवळच असलेलं काहीतरी नव्यानं गवसल्याचं समाधान हृदयात भरून वाहात होत. पावसाळ्याआधी कदाचित पुन्हा येथे येणार नाही याची जाणीव होती. पण एक गोष्ट प्रत्येकाच्या मनात पक्की ठरली होती की पुन्हा येऊ ते वस्तीसाठीच.
ज्याच्या कुशीत लहानाचे मोठे झालो असा एक किल्ला सर झाला आज, आता आणखी एक खुणावतोय, ज्याच्या परवानगीशिवाय आमच्या गावांत उगवण्याची हिम्मत सूर्यालाही झाली नाही, तो 'माहुली'. रोजचा सूर्योदय मला त्याच्या सुळक्यांतून खुणावतोय. आणि मी मनाशी गाठ बांधतोय 'माहुली किल्याला' भेट देण्याची.

-कल्पेश गावळे

प्रतिक्रिया

वर्षभराच्या ट्रेकविरामानंतर गेल्या वर्षी उत्साहात कोहोज ला गेलो आणि या किल्ल्याने रिअ‍ॅलिटी चेक घडवला होता. अर्ध्यातून परत यावं लागलं होतं. त्यामुळे कोहोज विसरणार नाही, आणि पुन्हा गेल्याशिवाय चैन पडणार नाही.

असो. उत्तमच वर्णन !आणि फोटोही बहार. सध्या फक्त ट्रेकवर्णनं वाचणंच शक्य आहे.

इरसाल कार्टं's picture

15 Mar 2017 - 4:41 pm | इरसाल कार्टं

आणि याला तेव्हा सांगा. मीही येईन.

कंजूस's picture

15 Mar 2017 - 5:16 pm | कंजूस

छान काम केलय॥
मनोर - वाडा मार्गावर आहे का?

इरसाल कार्टं's picture

15 Mar 2017 - 6:59 pm | इरसाल कार्टं

हो, रस्त्यावरूनच दिसतो.

कविता१९७८'s picture

17 Mar 2017 - 10:05 pm | कविता१९७८

मी बोईसरला राहते, मला जवळच आहे, जायला हवे

इरसाल कार्टं's picture

22 Mar 2017 - 9:39 am | इरसाल कार्टं

या किल्ल्याच्या जवळील मिपाकरांमध्ये माझ्यानंतर तुमचाच नंबर लागेल बहुदा.

वेल्लाभट's picture

15 Mar 2017 - 5:27 pm | वेल्लाभट

स्वच्छता मोहिमेसाठी प्रचंड प्रचंड कौतुक ! शिवजयंती साजरी करण्याचा एक श्रेष्ठ मार्ग.

दुर्गविहारी's picture

15 Mar 2017 - 6:52 pm | दुर्गविहारी

मला मी केलेल्या ट्रेकची आठवण आली. आम्ही सांगे गावातून गेले होतो. बाकी गड साफसफाइचा अत्यंत स्त्युत्य उपक्रम तुम्ही राबवलात त्याबध्द्ल अभिनंद्न, उतरताना वेगळ्यावाटेने उतारयाचे म्हणुन आम्ही वाडा - मनोर रस्त्याच्या वाटेने खाली आलो. त्या वाटेवर बदामाच्या आकाराचे तळे आहे. त्यात कोहोजचे प्रतिबिंब अप्रतिम दिसते.
तुमच्या फोटोत जो मोठा सुळका आहे, त्याचे नाव "नागनाथ", त्याच्यावर जायला अर्थातच प्रस्तरारोहण करावे लागते. बालेकिल्ल्याकडे जाताना जमिनी लगत कोरलेली तीन खांब टाकी लागतात, त्यातील मधल्या टाक्याचे पाणी पिण्याजोगे.
बालेकिल्ल्यावर दोन सुळक्याखेरीज महादरवाज्यानजीकचे मारुती मंदिर , तसेच अलिकडे उभारलेले श्रीक्रुष्ण मंदिर आहे.
इतिहासात याचा उल्लेख पुरंदर तहाप्रमाणे मोगलाना दिलेल्या तेविस किल्ल्यात येतो.
एक विनंती शक्य झाल्यास त्या गाइड्चे नाव व मोबाईल नं इथे द्या. नंतर जाणार्याना उपयोगी पडतो.

दुर्गविहारी's picture

15 Mar 2017 - 6:52 pm | दुर्गविहारी

मला मी केलेल्या ट्रेकची आठवण आली. आम्ही सांगे गावातून गेले होतो. बाकी गड साफसफाइचा अत्यंत स्त्युत्य उपक्रम तुम्ही राबवलात त्याबध्द्ल अभिनंद्न, उतरताना वेगळ्यावाटेने उतारयाचे म्हणुन आम्ही वाडा - मनोर रस्त्याच्या वाटेने खाली आलो. त्या वाटेवर बदामाच्या आकाराचे तळे आहे. त्यात कोहोजचे प्रतिबिंब अप्रतिम दिसते.
तुमच्या फोटोत जो मोठा सुळका आहे, त्याचे नाव "नागनाथ", त्याच्यावर जायला अर्थातच प्रस्तरारोहण करावे लागते. बालेकिल्ल्याकडे जाताना जमिनी लगत कोरलेली तीन खांब टाकी लागतात, त्यातील मधल्या टाक्याचे पाणी पिण्याजोगे.
बालेकिल्ल्यावर दोन सुळक्याखेरीज महादरवाज्यानजीकचे मारुती मंदिर , तसेच अलिकडे उभारलेले श्रीक्रुष्ण मंदिर आहे.
इतिहासात याचा उल्लेख पुरंदर तहाप्रमाणे मोगलाना दिलेल्या तेविस किल्ल्यात येतो.
एक विनंती शक्य झाल्यास त्या गाइड्चे नाव व मोबाईल नं इथे द्या. नंतर जाणार्याना उपयोगी पडतो.

इरसाल कार्टं's picture

15 Mar 2017 - 7:03 pm | इरसाल कार्टं

खूप छान माहिती दिलीत.
गाईडचा नंबर नाहीये पण माझा नंबर देतोय.
आधीच कळवलं तर मला मदत करायला मनापासून आवडेल.
माझा नंबर:9225849032

पैसा's picture

15 Mar 2017 - 7:11 pm | पैसा

छान वृत्तांत! गडाच्या साफसफाईसाठी अभिनंदन!

एस's picture

15 Mar 2017 - 7:16 pm | एस

चांगला उपक्रम आहे.

तुम्ही लिहिलं आहे "ही" नाही आली म्हणून "ती" नाही. याबद्दल सांगावेसे /सूचना करावीशी वाटते. हल्ली बय्राच महिलांना असं भटकावंसं वाटतं. जर प्रत्येक गडाखालच्या गावातल्या तरुणींना "गाइड" बनवता/उद्युक्त करता आलं तर त्यांनाही रोजगार मिळेल. शहरांतून जे ग्रुप जातात ते काहिच्या काही मोठे असतात व सर्व वयाच्या स्त्री पुरुष मुला मुलींचा भरणा असतो. त्यातून जावे नाही लागणार

जगप्रवासी's picture

16 Mar 2017 - 1:49 pm | जगप्रवासी

ट्रेक प्लस स्वच्छता मोहीम खूपच छान. फोटो छान आलेत

सानझरी's picture

16 Mar 2017 - 2:38 pm | सानझरी

झकास ट्रेक, लेख आणि फोटो..
'माहुली' ला जाऊन अर्ध्यातून परत आलेय.. आयुष्यातला पहिलाच ट्रेक, तो पण माहुलीचा, त्यामुळे वर जाणं जमलं नाही.. तुम्हाला शुभेच्छा.. फोटो नक्की शेअर करा..

मस्त ट्रेक..स्वच्छता उपक्रम पण छान..

या निमितानं असं वाटलं कि पुढच्या वेळी पण गडावर उत्सव झाल्यावर असाच कचरा जमा होणार, तेव्हा पण नंतर कोनी जाऊन साफ करणार. त्यापेक्षा उत्सवाच्या आधीच जे उत्सव आयोजीत करतात त्यांना हाताशी धरुन कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन कसे होईल ते बघता आलं तर ते जास्त परिणामकारक होईल का? बर्‍याचदा पत्रावळी वगैरे टाकायला ट्रॅश कॅन ठेवलेले असतात पण ते भरुन वहायला लागले तरी कोणी त्यांना मोकळे करुन ठेवत नाही. याचं जर चांगलं नियोजन केलं तर कचरा सगळीकडे पसरणार नाही आणि लोकांनाही चांगले वळण लागेल.

(सध्या देशाबाहेर असल्यामुळे फक्त सल्लाच देऊ शकते. पुढे कधितरी अश्या उप्क्रमात सहभागी व्हायला नक्की आवडेल.)

वेल्लाभट's picture

17 Mar 2017 - 1:04 pm | वेल्लाभट

उत्तम कल्पना. इरसाल भाऊ, लक्ष वेधतो. हे करता येईल तुम्हाला पुढल्या वर्षी.

हेच मी माझ्या अनुदिनीवर टाकले होते, त्याची लिंक व्हाट्सअँप आणि फेसबुक वर शेअर केली होती. चांगले प्रतिसाद मिळाले.
पायथ्याच्या गावांतूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाले आणि पुढच्या वेळी काळजी घेऊ अशी आश्वासनही.

प्रचेतस's picture

17 Mar 2017 - 12:15 pm | प्रचेतस

छान लिहिलंय.

उणिवा असतील तर नक्की आणि हक्काने सांगत जा सगळ्यांनी. __/\__
परिसरात मार्गदर्शक नाही माझ्या काही सुचवायला.

किसन शिंदे's picture

17 Mar 2017 - 5:39 pm | किसन शिंदे

कोहोज करायचा बाकी आहे. या पावसाळ्यात नक्की जमवणार.

बाकी साफसफाईचा तुमचा उपक्रम स्तुत्य आहे.

माझ्या जात्या येत्या रस्त्यावर दिसणारे प्रबळ, माणिक ,कर्नाळा, इर्शाळ गड वाकुल्या दाखवतात.एकावरही जाणे झालेले नाही.

रच्याकने :नुकतंच कविता १९७८ आणि सह्याद्री टीमने आजोबा गड स्वच्छता अभियान उत्कृष्ट रित्या पार पाडले त्याची आठवण झाली.

इरसाल कार्टं's picture

20 Mar 2017 - 2:42 pm | इरसाल कार्टं

घरकी मुर्गी दाल बराबर म्हणतात ते ugich नै.
माझंही अस्संच झालं होतं

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2017 - 10:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर ट्रेकवर्णन आणि फोटो ! स्वच्छता मोहिमेसारखे स्पृहणिय काम केल्यावद्दल खास अभिनंदन !!

स्वच्छता मोहिमेच विशेष कौतुक.

छान.