भांगेचे प्रयोग आणि परिणाम

आगाऊ कार्टा's picture
आगाऊ कार्टा in जनातलं, मनातलं
5 Oct 2008 - 9:39 pm

हा मी जरा वेगळा विषय घेतला आहे. आत्तापर्यंत वाघ, साप, भूत असे गंभीर विषयांवर लिहिले. त्यामुळे सर्वांना भिती वाटू लागली....
भांग सर्वांना माहितच असेल. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांचा प्रसाद म्हणून घेतली जाते.
मी अजून भांग प्यायलेली नाही. पण या भांगेचे झाड असते आणि भांगेची गोळी दुधात उगाळून ते मिश्रण आटवलेल्या दुधात मिसळतात असे मी ऐकले आहे....
ही भांग म्हणे प्यायलाही खूप चांगली लागते. खरे खोटे प्यायलेल्यांना माहित.असो. तर मुख्य विषय असा की ही भांग जर प्रमाणाबाहेर प्यायली तर चढते...
आणि चढली की मग बघायलाच नको... पण भांग चढणे आणि दारु चढणे यात फरक आहे. दारु चढल्यावर माणसाचे नियंत्रण सुटते. तो वाट्टेल ते बरळायला लागतो, चालताना भेलकांडायला लागतो, गटारात ओकतो आणि त्यातच लोळत झोपी जातो. भांग चढल्यावर यापैकी काहीच होत नाही. काय होते ते पुढील किश्शात कळेलच...
का किस्सा मला बाबांनी कधीतरी बोलता बोलता सांगितला आहे.....
सुमारे तीस ते पस्तीस वर्षांपुर्वी, बाबा त्यावेळी कॉलेजला रत्नागिरीला होते आणि बाबांचे तिघे मित्र मुंबईत शिकायला राहिले होते. त्या मित्रांचे हे उपद्व्याप आहेत.
त्या दिवशी महाशिवरात्र होती आणि या तिघांना त्यांच्या मित्रांनी रात्री भांग प्यायला बोलावले होते. त्याप्रमाणे हे सगळे रात्री गेले. आटवलेले गोड दूधातली भांग ती... मग काय विचारता, गोड लागते म्हणून सगळे दणकावून प्यायले. नंतर थोड्या गप्पागोष्टी करुन सुमारे दहा वाजता सगळे आपल्या खोलीवर परत आले. त्यातला एकजण पार्टटाईम रात्रीची नोकरी करत असे. तो सायकल घेऊन दादर स्टेशनला जात असे व तिथे सायकल ठेऊन लोकल ट्रेन ने पुढे जात असे. त्या तिघांनाही भांगेबद्दल फारशी महिती नव्हती पण भांग चढते हे माहिती होते. म्हणून तिघेही खोलीवर आल्यावर थोडावेळ तसेच बसले पण कोणालाही काही फरक जाणवला नाही. त्यामुळे भांग चढते हे खोटे आहे असा लगेच निष्कर्ष काढून मोकळे झाले. त्यातला एक जण जो नोकरी करत असे तो सायकल घेऊन निघाला आणि बकीचे दोघे आपआपल्या पलंगांवर आडवे झाले....
अशीच पाच-दहा मिनिटे गेली. एव्हाना सगळ्यांना चढायला सुरुवात झाली होती. थोड्यावेळाने तो गेलेला मित्र तंबाखूची पुडी विसरली म्हणून परत आला. परत आल्यावर बघतो तर एकजण नाट्यसंगीत आपल्या सुमधूर (?) आवाजात गात बसला होता. आणि दुसरा आडवा राहून आपले हात असे वर करुन काहीतरी तोलून धरावे तसा पडला होता....
परत आलेल्या त्या मित्राने आपली तंबाखूची मळी लावली आणि म्हणाला, "काय रे साल्यानो? भांग चढली की काय"? ......
तो आडवा पडलेला मित्र म्हणाला, "छे! छे! अजिबात नाही".....
"मग तू हात असे वर का केले आहेस?" तो तंबाखू मळता मळता म्हणाला..
"अरे हे छप्पर सारखं खाली खाली येत आहे म्हणून हाताने सारखा वर ढकलतो आहे."
थोड्यावेळाने तंबाखूवाला मित्र निघून गेला आणि पुन्हा पाच दहा मिनिटांनी परत आला. इकडे यांचे आपले चालूच. एक जण तीच तीच नाट्यपदाची ओळ पुन्हा पुन्हा म्हणतोय आणि दुसरा सारखा छप्पर वर ढकलतो आहे...
गाण्याचा कर्कश आवाज अगदी असह्य झाल्यावर उरलेल्या दोघांनी त्या गाणार्‍याला दाबून झोपवले आणि रुमालाने त्याचे तोंड जाम बांधून टाकले....
तंबाखूवाला मित्र निघून गेला आणि या गायकाने रुमाल सोडून टाकला आणि तो पुन्हा ताज्या दमाने गाऊ लागला....
तो गेलेला मित्र थोड्यावेळाने पुन्हा परत आला. शेवटी या छप्पर ढकलणार्‍या मित्राने छप्पर सावरून धरत त्याला विचारले, "अरे तू जातोस पुन्हा परत येतोस पुन्हा जातोस.. हा प्रकार तरी काय"?
तो म्हणाला, "फार मोठ्ठा घोटाळा झाला आहे".
"असं झालय तरी काय"?
"अरे कसं सांगू तुला? मि मघाशी दादर स्टेशन वर गेलो होतो आणि पाहतो तर काय....."?
"काय?"..
"अरे अख्खं दादर स्टेशनच गायब झाले आहे. मी आजूबाजूला शोधून पहिले पण मिळालेच नाही म्हणून शेवटी परत आलो".
"मग आता तुला काही जाता येणार नाही, तेव्हा तू आता इथेच बस."
एव्हढे बोलणे झाल्यावर त्या तंबाखू मळणार्‍याने पुन्हा तंबाखू मळायला सुरूवात केली.
नंतर तो सारखा तंबाखूच मळत होता. मळलेला तंबाखू पुन्हा मळत होता...
आणि बाकी दोघांचा छप्पर ढकलण्याचा आणि गाण्याचा कार्यक्रम चालूच होता तो सुमारे पहाटे पर्यंत...
पहाटे केव्हातरी सगळ्यांना झोप लागली....
..
....
अजूनही काही छान छान किस्से आहेत... वेळ मिळाला की टाकतोच...
तुम्हालाही असे काही किस्से माहित असले तर येथे टाका...
वाचायला मजा येईल...

विनोदअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Oct 2008 - 9:54 pm | बिपिन कार्यकर्ते

अजून एक,

आमच्या कॉलेज मधल्या काही पोरांनी एकदा होळीला भांग प्यायली. मस्त ३-४ तास धमाल केली. त्यातला एक जण सायकल घेऊन घरी गेला. घरी कुणाला कळू नये म्हणून धडपड चाललेली त्याची. घराबाहेर, सायकल उभी केली. बराच वेळ तो त्या सायकलला कुलूप लावायचा प्रयत्न करत होता. ते कुठं जमायला त्याला. :) ती त्याची खुडबूड ऐकून त्याची आई बाहेर आली आणि त्याला म्हणाली, 'अरे काय चाललंय? काय झालं?' हे साहेब म्हणाले, 'काही नाही गं, ही सायकल फार हलायला लागली आहे, जरा धरून ठेव ना'.

त्या नंतर मेलं ते पार. ;)

बिपिन.

अनिरुध्द's picture

6 Oct 2008 - 12:00 am | अनिरुध्द

१. आमच्या आजोबांचे एक मित्र होते. जेव्हा ते आजोबांकडे पुण्याहून आजोबांना भेटायला येत असत (साधारणतः सहा महीन्यानी) ते घरी आले की आजोबा त्यांना भांग प्यायला देत असत. आजोबांना बुंदीचे लाडू छान करता येत. भांग प्यायल्यावर साधारण अर्ध्या तासानी जेवायला बसल्यावर हे महाशय बसल्या बैठकीला २०-२२ बुंदीचे लाडू खात असत आणि जेवल्यावर चांगली ३-४ तास झोप काढत असत.

२. माझ्या मित्राच्या भावाने एकदा त्यांच्याच घराशेजारी रहाणा-या त्याच्या मित्राबरोबर भांग प्यायली. तो रहात असे वाड्यात. पूर्वी शेजारी शेजारीच वाडे - घरं असल्यामुळे वाड्याचे दरवाजे उघडेच असत. हा रात्री १२ वा. घरात कुणालाही कळू नये म्हणून सावकाश घरी आला. बाहेरच थांबला. आणि पुन्हा शेजारी मित्राकडे गेला. परत तिथून घरी आला. असा तो साधारण एक ते दिड तास चक्कर मारत होता. ह्या वाड्यातून त्या वाड्यात. शेवटी कशालातरी पाय लागून पडला. त्या आवाजाने घरातले जागे झाले. आणि मग त्यांना भांग चढली आणि ते ह्याला मारत सुटले. ;-)

माझ्या एका पंजाबी शेतकरी मित्राने ही कथा सांगितली : कापणीच्या वेळेला मजूर भांग घेतात. मग रात्रभर पिके काप-काप कापत राहतात. दमणे नाही, थांबणे नाही. समोर कापायला काही नसले तरी तल्लीनपणे हवा कापणे चालू असते एखाद्या मजुराचे!

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2008 - 12:31 am | बिपिन कार्यकर्ते

जबरदस्त...

आयडियेची कल्पना मस्तच आहे... मला वाटतं, उत्तरे कडे लग्नाच्या वरातीत ढोल वाजवणारे पण भंग चढवून मगच वाजवतात. मी बघितलेल्या एका वरातीत १-२ किलोमीटर चं अंतर कापायला ४ तास घेतले होते वरातीने. आणि एवढ्या अवधीत तो ढोल वाजवणारा फक्त एकदा की दोनदाच थांबला... पुढचा ग्लास मारायला. :)

बिपिन.

भांगेचा एवढा मोठा फायदा आहे ? आयला मग मधुचंद्राच्या पहिल्या रात्री उगाच पुचाट दुध पीण्यापेक्षा भांग घालून पिलेलं किती बरं .. मुद्दा शुड बी नोटेड ... फायद्याचा आहे. प्रभू साहेबांनी कधी अशा प्रकारच्या उपायांवर विचार केला आहे काय ? उगाच परदेशी व्हायाग्रांवर पैसे खर्च करण्यापेक्षा आपली भांग लाख पट बरी असावी असं वाटतंय

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

विनायक प्रभू's picture

6 Oct 2008 - 8:56 am | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
कोनमिती बरोबर असेल तर भांग पण नको आण्खी काय पण नको. ....काय?

विनायक प्रभू's picture

6 Oct 2008 - 10:40 am | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
टार्झटा, लेखात सांगितलेल्या अनुभवाप्रमाणे रात्रभर तंबाखु चोळला गेला तर नंतर काय होईल ह्याचा पण विचार कर की.

विसोबा खेचर's picture

6 Oct 2008 - 1:00 am | विसोबा खेचर

येऊ द्यात अजूनही किस्से..

आमचा किस्सा..

ही १९९६-९७ सालची गोष्ट असेल. आम्ही तेव्हा पोटापाण्याच्या निमित्ताने इंदुरात काही कामाकरता गेलो होतो. सराफा कट्ट्यावरचाच एक दुकानदार मोहनलाल हा आमचा अशील. त्याच्याकडेच उतरलो होतो. त्याच्याच घरात एक लग्नकार्य पार पडलं होतं आणि श्रमपरिहार म्हणून भांगेचा जोरदार कार्यक्रम होता. आमचंही भांगेवर अतिशय प्रेम. मग काय बघायलाच नको!

दुपारची वेळ. तांब्याच्या पैशावर भरपूर चढवलेली, रबडीवजा बासुंदीमध्ये बनवलेली भांग मनसोक्त प्यायलो आम्ही त्या दिवशी! आणि त्यावर साजूक तुपात बनवलेली जिलेबी अगदी यथास्थित खाल्ली. ओहोहो, काही क्षणातच आमचे सगळे सेन्सेस आमच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आणि आम्ही आमच्याच मस्तीत गाऊ लागलो. तिथे त्या भर लग्नघरातच आम्ही वृंदावनी सारंगची मैफल जमवली.. कुणी ऐकतंय, न ऐकतंय याची पर्वा न करता आपल्याच मस्तीत बेधुंद होऊन गाऊ लागलो. मोहनलालच्या मेहुण्याने लगेच आम्हाला साथसंगत करण्याकरता ठेका धरलेला आठवतोय आम्हाला..!

साली तांब्याच्या पैशावर मजबूत चढवलेली, ती पोटात गेलेली बासुंदीतली भांग, वर चापून खाल्लेल्या जिलेब्याही आमच्यासोबत गाताहेत की काय असं वाटायला लागलं! :)

त्यानंतर आम्ही केव्हा झोपलो ते आम्हाला आठवत नाही. जाग आली तेव्हा संध्याकाळचे ७ वाजून गेले होते. तोंडावर जरा पाणी वगैरे मारून फेश होऊन आम्ही भटकायला म्हणून बाहेर पडलो आणि इंदुरात हिंडू लागलो. पण बघा मंडळी, त्या बासुंदीयुक्त भागेची, साजूक तुपातल्या जिलेबीची पुण्याई किती थोर होती! दुपारी अण्णांचं नांव घेऊन, आमच्या परिने का होईना, आम्ही अगदी मन लावून वृंदावनी सारंग गायलो होतो, त्याचं कुठेतरी फळ आम्हाला मिळालं होतं! इंदुरात भटकताना कुठल्याश्या एका हॉलच्या बाहेर एक बोर्ड होता, तो आमच्या नजरेस पडला -

शास्त्रीय संगीत की मैफिल,
आज रात ९ बजे-

कलाकार - पं भीमसेन जोशी.

सभी श्रोताओंको विनम्रतापूर्वक आमंत्रण!

दुपारी खुद्द शंकराने आम्हाला भांगेचा प्रसाद दिला होता, संध्याकाळी खुद्द आमचे गुरुजीच आम्हाला गानरुपी प्रसाद देणार होते..!

आनंद गगनात मावेना कशाला म्हणतात ते त्या दिवशी समजलं आम्हाला! तसाच जरावेळ टाईमपास करत इंदुरातल्या त्या सुंदर संध्याकाळी इकडेतिकडे भटकलो. पुन्हा छप्पन दुकान भागात एका गाडीवर दोन द्रोण भरून, आटवून आटवून तांबूस झालेली रबडी अगदी मनसोक्त चापली, वर एक किवाम जाफरानी पत्ती मघई १२० पान लावून दिलं आणि गेलो ठरल्यावेळी त्या सभागृहापाशी...!

"हो तुम बिन कौन, खबरिया ले मोरी.."

दुपारच्या त्या भांगेसारखाच शुद्धकल्याणाचा ख्याल अण्णांनी चढवायला सुरवात केली होती...! जीवन अगदी भरभरून जगणं म्हणजे काय याचा अनुभव आम्ही त्या दिचशी इंदुरात घेतला!

क्या केहेने...!

आपला,
(भांगप्रेमी) तात्याभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी, इंदौर.

--
"सापडला! आम्हाला आत्मा सापडला काकाजी! वाटून वाटून केली त्याची गोळी आणि मग बंभोले...!" :)
(इति वासूअण्णा, नाटक - तुझे आहे तुजपाशी)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2008 - 9:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

झकास किस्सा आहे तुमचा तात्या!

आणि कार्ट्या, तू झकास लिहितोस हे पुन्हा वेगळं सांगू का?

अदिती

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2008 - 1:14 am | बिपिन कार्यकर्ते

साली तांब्याच्या पैशावर मजबूत चढवलेली, ती पोटात गेलेली बासुंदीतली भांग, वर चापून खाल्लेल्या जिलेब्याही आमच्यासोबत गाताहेत की काय असं वाटायला लागलं!

साला, काय फिलींग असेल ना? तात्या मी पण पहिली भांग इंदूरातच प्यायली आहे बरं का... आणि तो सराफा, छप्पन दुकान... ओहोहो... तीर्थक्षेत्रं आहेत नुसती. तूने भी क्या याद दिलायी यार...

बिपिन.

अंतु बर्वा's picture

6 Oct 2008 - 5:31 am | अंतु बर्वा

होळी चा दिवस... मन्सोक्त रंग खेळुन झालेला... आणी पोर गप्पा हानीत बसलेली...
आणी आमच्या एका नोर्थ इन्डीयन मित्रानं कुठुन तरी भांग पैदा केली.... दोन तीन दुधाच्या पिश्व्या आनी ती भांग..
दोन तास झाले तरी काही होइना... आम्ही नेहमीप्रमाने त्या मित्राला शिव्या घालुन मोकळे की काहीही घेउन येतोस म्हनुन...
काय सांगायचं राव, मी आणी माझा मित्र बाईक वरुन निघालो घरी जायला... आनी हे आमचं ड्राईवर ध्यान रस्त्यातचं लागलं ना हसायला... कशीबशी बाईक १० च्या स्पीड वर घरी पोचवली त्याच्या... तर तो सारखा रुमालाने तोंड पुसायला लागला.. विचारलं तर म्हणे खुप घाम येतोय... दुसर्या दिवशी कळलं की साहेब पुर्ण दिवसभर तोंड पुसत होते....आमची हि अवस्था काही वेगळी नव्हती... घरी आल्यावर आमचा प्रोग्राम चालु झाला...घरी बच्चनचा पिक्चर चालु होता आनि आमच्या अंन्गात खुद्द बच्चन साहेब संचारले... दुसर्या दिवशी जी काही आरती काधली माझी वडीलांनी कि बास....

येडा खवीस's picture

6 Oct 2008 - 8:58 am | येडा खवीस

मी बरीच वर्षे दर होळीत भांग पित होतो...एकदा जरा जास्त झाल्यावर आमच्या घराशेजारीच एका शाळेसमोर रस्त्यावर रेतीच्या ढीगावर ४ तास भर उन्हात पडुन होतो. होळीच्या रंगाने तोंडाचे माकड झाल्याने येणार्या जाणार्या कोणालाच हा कोण झोपलाय हे कळले नाही म्हणुन बरे झाले...शेवटी माझ्या एका मित्राने ( तो ही भांगेच्याच नशेत होता) मला हाताला धरुन घरपर्यंत आणुन सोडले....तेव्हापासुन भांग कायमचि बंद

माझ्यामते भांगेच्या नशेत बरेचदा डिप्रेशन येते...जणुकाही जगात आपण एकटेच आहोत असं वाटतं...त्यात एन्ज्~ओजय्मेंट नसते. त्यामुळे ह्या नशेला आम्ही "गां++" नशा म्हणतो

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

प्रमोद देव's picture

6 Oct 2008 - 9:15 am | प्रमोद देव

माझ्या 'दिल्लीवर स्वारी 'ह्या लेखमालिकेतील हा एक किस्सा.
माझ्या मित्राच्या(नेमिचंद) भावाच्या(लखीचंद) लग्नाला आम्ही काही मित्रमंडळी मुंबईहून थेट राजस्थानला गेलो होतो त्याबद्दलची ही कथा.

राजस्थानमध्ये भांग' सेवनाचे बरेच प्रस्थ आहे. आपल्याकडे जसे घाटावरचे लोक तोंडात दाढेखाली तंबाखूची गोळी ठेवतात तशीच इथली बरीच मंडळी भांगेची गोळी तोंडात ठेवतात. काहीजण थंडाईच्या स्वरूपात घेतात. जसजशी सवय वाढते तसतशी गोळ्यांची(सेवनाची) संख्या वाढते. आणि त्यातच मोठेपणा मानण्याची सवय लागलेली. त्यावर पैजा देखील लागतात... एका वेळी जास्त गोळ्या कोण खातो म्हणून.

तर असेच काही गांजेकस तरुण आम्हाला भेटायला आले.बोलता बोलता भांगेच्या गोळ्यांचा विषय निघाला.मग कोण किती गोळ्या पचवतो ह्यावर थापा-गप्पा झाल्या. मग हळूच एकाने पिलू सोडले. तुमच्यापैकी कोणाची आहे काय हिंमत आमच्या बरोबर स्पर्धा करायची? ह्यात भर घालायला नेमीचंदची काही चुलत-मावस भावंडे देखिल होती.त्यांच्या म्हणण्याप्रमाणे १-२ गोळ्यांनी काहीच होत नाही.३-४ तरी घ्यायला पाहिजे तेंव्हाच खरी मजा येते.मी ह्या सर्व भानगडींपासून पहिल्या पासूनच चार हात दूर होतो त्यामुळे मैदानात राहिले ६ मित्र आणि एक आमच्या बरोबर खास मुंबईहून लग्नाचे फोटो काढण्यासाठी आणलेला छायाचित्रकार(हा नेमीचंदचा कौटुंबिक छायाचित्रकार) असे सात जण. त्या सगळ्यांनी ते आव्हान स्वीकारले. ह्यातले काही पट्टीचे 'पिणारे' होते.त्यांना वाटले आपण 'ते' पितो त्यापुढे 'ह्याची' काय मातब्बरी.मी आपला सगळ्यांना समजावत होतो की, "बाबांनो असं काही करू नका.तुमच्या ह्या अशा करण्यामुळे आपल्या सर्वांची बदनामी होईलच पण आपल्या मित्राच्या वडिलांची सुध्दा (ह्या गावात ते अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून गणले जायचे) नाचक्की होईल.आपण इथे लग्नाला पाहुणे म्हणून आलो आहोत ह्याचे भान ठेवा आणि हे रंगढंग आपापल्या घरी गेल्यावर करा."पण माझे कोणीच ऐकेना. हा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सकाळी करायचे त्या सगळ्यांनी ठरवले. गोळ्यांचा बंदोबस्त ते गाववाले करणार होते.रात्री जेवणाच्या वेळी ही गोष्ट मी नेमीचंदच्या कानावर घातली म्हणून त्याने ही सर्वांना समजवायचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. मित्रांनी त्याचे बोलणे थट्टेवारी नेले आणि "तसे काही होणार नाही, उगीच घाबरू नकोस" वगैरे मुक्ताफळे उधळली.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नवऱ्या मुलाची घोडीवरून वरात निघून ती नवरीच्या घरी जायची होती आणि त्यात आमची उपस्थिती अत्यंत आवश्यक होती. ह्या वरातीच्या वेळी आम्ही हजर राहायचे आहे हे आम्हाला त्याच्या वडिलांनी बजावून सांगितले .आम्ही सर्वांनी होकारही भरला होता.सकाळी नास्त्याचे वेळी ह्या सर्वांनी तिथे असणाऱ्या वडील मंडळींचा डोळा चुकवून ,कुणी एक,कुणी दोन तर कुणी तीन अशा गोळ्यांचे सेवन केले. नंतर दुपारच्या जेवणापर्यंत काहीच कार्यक्रम नव्हता म्हणून आम्ही माडीवर परत आलो. तास दोन तास मंडळी गप्पा मारण्यात रंगली आणि बोलता बोलता एकेक जण झोपायला लागला‍. जेवणाची वेळ झाली तरी कोणी उठवूनही उठेना म्हणून मग मी एकटाच जेवायला गेलो.मला बघितल्यावर नेमीचंदच्या वडिलांनी बाकीचे कुठे आहेत म्हणून विचारले. ते येतातच आहेत असे सांगून मी नेमीचंदला शोधायला पळालो. तो सापडल्यावर मी त्याला झाला प्रकार सांगितला. नेमके काय झाले असावे हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने ७-८ ताटे भरून परस्पर माडीवर पोहोचवायला सांगितली . आम्ही दोघे माडीवर आलो आणि पुन्हा ह्या सर्वांना उठवायचा प्रयत्न केला पण कोणी उठेचना. ताटं तशीच झाकून ठेवली आणि आम्ही दोघे जेवायला खाली गेलो.

जेवण उरकून तासाभरानं आम्ही दोघे परत आलो. त्यांना उठवायचा प्रयत्न केला . जेमतेम ते उठले, कसे तरी अन्न पोटात ढकलले आणि पुन्हा झोपले. नेमीचंदने कपाळावर हात मारून घेतला, म्हणाला, "कशाला मी ह्यांना बोलावले असे वाटतंय.आता माझ्या वडिलांना हे कळले तर एकेकाला हंटरने फोडतीलच आणि बरोबर मलाही चोपतील. निदान संध्याकाळी वराती पर्यंत शुध्दीवर आले तर नशीब म्हणायचे".
विषण्ण मनाने तो निघून गेला आणि मी त्या कुंभकर्णांच्या सहवासात एकटा पडलो. काय करावे मला सुचेना. वेळ जात नव्हता. कोणी उठण्याचे नाव घेत नव्हते. वाट बघण्या व्यतिरिक्त माझ्या हातात काहीच नव्हते.बऱ्याच वेळाने एकजण हालचाल करू लागला. हा पद्या होता.माझा वर्गमित्र दिन्याचा धाकटा भाऊ. त्याने एकच गोळी खाल्ली होती.उठल्या उठल्या तो रडायला लागला. मला कळेना हा रडतोय का? मी त्याला विचारलं तर तो सांगायला लागला, " मला आईची आठवण येतेय". आणि मोठमोठ्याने आईला हाका मारायला लागला, "मम्मी तू खंय असा? मम्मी तू खंय असा"?

हा प्राणी गोंयकार होता आणि एरवी मराठीत बोलणारा हा कोंकणी बोलत होता(घरी कोंकणीच बोलतात). मी त्याला समजावून सांगतोय, "अरे बाबा, आपण इथे राजस्थानात लखीचंदच्या लग्नाला आलोत,इथे तुझी आई कशी येणार"?
पण एक नाही आणि दोन नाही. ह्याचे आपले रडगाणे सुरूच, "मम्मी तू खंय असा"?
ही रडारड ऐकून 'सुध्या'(२गोळ्या) जागा झाला. मला जरा बरे वाटले. चला एक माणूस तरी मदतीला आला. पण कसले काय आणि कसले काय! तो उठला तो हसायलाच लागला. हसत हसत काही तरी असंबध्द बोलत होता. मी त्याला गदगदा हालवले आणि म्हटले, "अरे सुध्या, लेका हसतोस काय? हा पद्या बघ रडतोय आईची आठवण काढून. तू जरा त्याची समजूत घाल. सांग त्याला जरा वस्तुस्थिती समजावून सांग"!
त्यावर तो पुन्हा हसायला लागला आणि पद्याकडे बघून जोरजोरात हसत हसतच ओरडू लागला, "पद्याची आई नाही, पद्याची आई नाही"!
ह्यामुळे पद्या अजून पिसाळला आणि रडू लागला आणि सुध्या टाळ्या वाजवत हसू लागला.

आता मला (एकही गोळी न घेता) गरगरायला लागले. कळेना ह्या लोकांबरोबर मी का आणि कसा आलो. वाटले हे झोपले होते तेच बरे होते . आता झोपलेत त्यांनी असेच झोपून राहावे म्हणून मी जोरजोरात अंगाईगीत गायला लागलो.
माझ्या अंगाईगीत गाण्याचा परिणाम म्हणून की काय दिन्या चुळबूळ करायला लागला.मनात म्हटले, "आता हा काय नवीन प्रताप दाखवतोय कुणास ठाऊक"! हळूहळू तो उठून बसला. त्याने इकडेतिकडे बघितले आणि त्याचा उजवा हात सारखा नाकाकडे न्यायला लागला. मी प्रथम लांबूनच निरीक्षण केले. नेमके काय काय करतो ते तर बघूया असा विचार करत होतो.इतक्यात पद्याने दिन्याकडे धाव घेतली आणि त्याला रडत रडत विचारायला लागला, "दिन्या, मम्मी खंय गेली रे"!
दिन्याला प्रश्न कळला की नाही माहीत नाही. तो आपला एकटक आपल्या नाकाच्या शेंड्याकडे बघत बघत उजव्या हाताने आपले नाक पकडायचा प्रयत्न करत होता,पण ते काही त्याच्या बोटाच्या चिमटीत सापडेना. म्हणून त्याने ओरडायला सुरुवात केली. " माझे नाक कुठे गेले, ए बाप्पा(मला तो ह्याच संबोधनाने पुकारत असे) माझे नाक कुठे गेले रे"?
मी पुढे सरकलो आणि त्याचा हात नीट धरून तो त्याच्या नाकावर ठेवला आणि म्हटले , "हे बघ तुझे नाक. नाक म्हणजे काय पेन किंवा रुमाल आहे हरवायला "?
त्याने बोटाच्या चिमटीत नाक पकडले आणि म्हणाला, " साल्या बाप्पा, तू माझा खरा दोस्त आहेस.माझे हरवलेले नाक शोधून दिले"! असे म्हणून नाक सोडले आणि मला मिठी मारायला लागला.मी लगेच मागे सरकलो.

मला असल्या लोकांच्या सहवासात राहण्याचा मनस्वी तिटकारा आहे. इथे नाईलाज म्हणून मी थांबलो होतो. शक्य असते तर केंव्हाच ह्यांच्यापासून दूर निघून गेलो असतो. पण आता मी परमुलुखात होतो आणि ते सुद्धा ह्या लोकांबरोबर एक मित्र म्हणून आलो होतो. तेंव्हा प्राप्त परिस्थितीला कसेही करून तोंड द्यायलाच हवे होते.मी असा विचार करतोय तोपर्यंत दिन्या पुन्हा आपले नाक शोधायला लागला."ए बाप्पा पुन्हा हरवले माझे नाक. शोधून देना. तू माझा खरा मित्र आहेस ना, मग पुन्हा शोधून दे ना"!
आता मला वैताग आला होता; पण रणांगण सोडून पळ काढणे माझ्या रक्तात नसल्यामुळे मी त्यावर लगेच तोडगा काढला.सुध्याला म्हणालो, "सुध्या लेका नुसता हसतोस काय? ह्या दिन्याचे नाक हरवले आहे ते शोध ना"!
त्यावर तो अजून हसत सुटला आणि टाळ्या वाजवत मोठ्या-मोठ्याने ओरडू लागला , " दिन्याचे नाक हरवले, बरे झाले. पद्याची आई गेली मजा आली"!
हे पालुपद त्याने सुरू केले आणि दिन्या आणि पद्याभोवती गोल-गोल फिरायला लागला. दिन्या त्याला आपले 'नाक शोधून दे' म्हणून आर्जव करायला लागला तर पद्याने "मम्मी खंय गेली"! हा धोशा लावला.

आता माझ्या लक्षात आले की हे तिघे पूर्णपणे भांगेच्या अमलाखाली गेलेत.अहो माझ्याही आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता. आतापर्यंत ऐकून होतो पण आज ह्याची देही ह्याची डोळा अनुभवत होतो. त्यामुळे मी ठरवले आता ह्यांची जरा मजा करूया;म्हणून मी दिन्याला हाक मारली आणि म्हणालो, " दिन्या! हे बघ तुझे नाक माझ्या हातात आहे"!
लगेच दिन्याने आर्जवं करायला सुरुवात केली. " ए बाप्पा, दे ना! दे ना बाप्पा! बाप्पा देना नाक! ए बाप्पा देना नाक"!
आणि ह्या आर्जवांची आवर्तनं सुरू झाली. मी त्याच्या जवळ हात नेला की ते नाक घ्यायला तो पुढे सरसावायचा. मी चटकन हात मागे घेतला की पुन्हा आर्जवं सुरू. तिथे सुध्याचे हसणे,टाळ्या वाजवणे आणि चिडवणे सुरूच होते आणि पद्याचे रडगाणे चालूच होते. थोडा वेळ मला पण गंमत वाटली; पण हे किती वेळ चालू राहणार अशी भीतियुक्त शंका देखिल मनात यायला लागली.ह्याच्या नाकाचा काही तरी सोक्षमोक्ष लावावा म्हणून मी ते नाक खिडकीतून बाहेर टाकले असे दिन्याला म्हणालो(लहान मुलांना आपण फसवतो ना अगदी तसेच; बाकी लहान मुले आणि आताचे हे तिघे ह्यांच्यात ह्या घडीला तरी कोणताच फरक नव्हता). मला वाटले तो आता गप्प बसेल;पण कसले काय आणि कसले काय?तो उठला आणि खिडकीच्या दिशेने धावला. त्या खिडक्यांना गज नव्हते. तो त्या खिडकीवर चढायचा प्रयत्न करत होता;त्याला तिथून उडी मारायची होती; नाक शोधायला जायचे होते.क्षणभर मी गडबडलो. पण लगेच पुढे धावत जाऊन त्याला ओढले आणि खिडकीपासून लांब आणून बसवले. आता हा नवीनच ताप झाला होता डोक्याला. दोन-दोन मिनिटांनी तो उठून खिडकीकडे जायचा प्रयत्न करत होता आणि मी त्याला खेचून पुन्हा लांब नेत होतो. शेवटी एक युक्ती केली. त्याला सांगितले की त्याचे नाक सुध्याला लावले आहे. तो लगेच सुध्याचे नाक ओढायला लागला. आपले नाक मागू लागला.आता सुध्याचे हसणे बंद झाले आणि ओरडणे सुरू झाले. दोघे एकमेकांची नाके खेचायला लागले. सगळाच राडा होऊन बसला.

आता ह्यातनं ह्यांना आणि मला कोण वाचवणार म्हणून मी चिंता करत होतो तेव्हढ्यात नेमीचंद अगदी देवदूतासारखा धावून आला. त्याने हे चाळे बघितले आणि प्रथम त्याला ह्याचे हसू आले पण त्या हसण्याची जागा हळूहळू संतापाने घेतली.नेमीचंद हा खरेच एक सरळमार्गी मुलगा होता. अतिशय शांत आणि प्रेमळ होता .त्यामुळे त्याला ह्या सर्व गोष्टींचा प्रचंड मनस्ताप होत होता. एकीकडे मित्रांना वाईट वाटू नये म्हणून त्यांची मर्जी सांभाळणे आणि दुसरीकडे ह्यातील काहीही वडिलांपर्यंत पोचणार नाही ह्याची खबरदारी घेणे अशा पेचात तो अडकला होता. तो आता आम्हाला चहाला बोलावायला आला होता;पण हे प्रकरण बघून तो मला एकट्यालाच चल असे विनवू लागला.मी दिन्याचे नाक प्रकरण आणि त्यावरून त्याचे खिडकी-उडी नाट्य त्याला सांगितल्यावर त्याने तिथेच चहा पाठविण्याची व्यवस्था करतो असे सांगितले आणि तो तिथून निघून गेला. परत मी त्या माकडांच्यात एकटाच राहिलो.

हळूहळू पद्या वळणावर येण्याची चिन्हे दिसू लागली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याचे रडणे आणि आईचा शोध घेणे बरेच कमी झाले होते. मी बोलत होतो ते थोडे -थोडे त्याच्या डोक्यात घुसायला लागले होते.पण सुध्या आणि दिन्याचा धिंगाणा अजून सुरूच होता. तेव्हढ्यात दिन्याने ओकारी होत असल्यासारखे चाळे करायला सुरुवात केली. पुढच्या कल्पनेनेच मला शिसारी आली. मी पद्याला कसे तरी समजावले आणि त्याने त्याच्या दादाला म्हणजे दिन्याला मोरीकडे नेले आणि दिन्याने भस्सकन ओकायला सुरुवात केली.एक सेकंद जरी उशीर झाला असता तरी त्याने ते 'सगळे' सुध्याच्या अंगावर केले असते. त्या दुर्गंधीने मलाच मळमळायला लागले. काय करावे काहीच सुचेना. अती सुगंध अथवा दुर्गंधाची मला कमालीची ऍलर्जी असल्यामुळे माझ्या जीवाची तगमग सुरू झाली; पण मी मला मोठ्या शिकस्तीने जेमतेम सावरले.तेव्हढ्यात नेमीचंद नोकरासह चहा घेऊन आला. त्याने हे बघितले आणि त्याचे टाळकेच सरकले. तो तसाच चहासकट परत गेला आणि त्या नोकराला ते सगळे साफ करायला सांगितले. मला त्याने खुणेनेच खाली बोलावले आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी खाली गेलो.

मोकळ्या हवेत श्वास घेतला आणि इतके बरे वाटले म्हणून सांगू! शब्दच तोकडे पडतील!चहा पिऊन, जरा इथे-तिथे पाय मोकळे करून मी पुन्हा माडीवर आलो तोपर्यंत साफसफाई झाली होती. हसण्या-रडण्याचा भर ओसरला होता आणि मंडळी पुन्हा पेंगायला लागली होती.ह्या तिघांव्यतिरिक्त जे अजून चार जण राहिले होते त्यातला तो छायाचित्रकार(४ गोळ्या) अस्ताव्यस्त आडवा पडला होता. जिवंत आहे की मेला आहे अशी शंका वाटावी इतका गाऽऽऽढ झोपला होता. त्यामुळे त्याचा त्रास नव्हता. पण एका गोष्टीची काळजी वाटत होती की हा संध्याकाळच्या वराती पर्यंत शुद्धीवर येतो की नाही. अजून दोन तास बाकी होते पण त्याची हालचाल जाणवत नव्हती. मंदपणे हालणारा छातीचा भाता त्याच्या जिवंतपणाची साक्ष देत होता. एरवी तो ज्या स्थितीत झोपला होता तसाच्या तसा जवळजवळ ५-६ तास झोपून होता. बाकीचे तिघे केश्या,पक्या आणि गोट्या(प्रत्येकी १-१ गोळी) जागृत होण्याची चिन्हे दिसत होती . आता हे तिघे काय गुण उधळताहेत हे कुतूहलही होते आणि दडपण पण होते.

अर्धा एक तासात हे तिघे उठून बसले. आजूबाजूला बघितल्यावर साहजिकच त्यांना अपरिचित वातावरण दिसले. त्यामुळे ते काही वेळ तसेच मंदपणे बसून राहिले.पहिल्यांदा पक्या माझ्याकडे बघून म्हणाला, "च्यायला बाप्पा, तू माझ्या घरी कधी आलास? ह्या केश्या आणि गोट्या बरोबर तर नव्हतास"?
मी त्याला आठवण करून दिली," लेका पक्या, अरे आपण इथे राजस्थानात नेमीचंदच्या गावी आलोत. हे तुझे घर नाही. ही तुझी भांग बोलते आहे. तुला चढली आहे. जरा शुद्धीवर ये"!
लगेच पक्या.... " मी शुद्धीवरच आहे. तूच शुद्धीवर नाहीस. च्यायला माझ्या घरी येऊन मलाच दादागिरी दाखवतोस? गोट्या, त्याला घे रे कोपच्यात! आणि केश्या तू पण उठकी लेका! आपल्याला पिक्चरला जायचंय विसरलास वाटते"?
केश्याने हळूच मान वर करून बघितले आणि पुन्हा गुडघ्यात मान घालून बसल्या बसल्या पेंगायला लागला.परत पक्या... " ए गोट्या, आपण बाप्पाला पण पिक्चरला नेऊ या काय? बोल, तू, तू काय बोलतोस? बोल"!
गोट्या उत्तर देण्याच्या परिस्थितीत नव्हता. अजूनही तो संभ्रमित अवस्थेत बसून होता.एकटक आढ्याकडे बघत. एकटा पक्याच पकपक करत होता. त्याच्या बोलण्याला कोणी प्रतिसाद देत नाही असे पाहून त्याने बाजूलाच झोपलेल्या सुध्या आणि दिन्याला ढोसायला सुरुवात केली. ५एक मिनिटांनी ते दोघे उठून बसले आणि आपापसात काहीतरी असंबद्ध बडबडायला लागले.हळूहळू गोंधळ वाढायला लागला.

मला भीती वाटत होती की जर मित्राचे वडील आत्ता ह्या क्षणी आले तर त्यांना तरी हे ओळखतील की नाही?हळूहळू संध्याकाळ व्हायला लागली. खाली रस्त्यावर(ही माडी रस्त्यावरच होती) माणसांची वर्दळ वाढायला लागली.बँडवाले आलेले जाणवत होते. कारण मधून मधून बासरी किंवा ढोलाचा हळुवार आवाज (पूर्वतयारी चालली असावी) यायला लागला होता. तो आवाज ऐकून दिन्या पेटला. तो खिडकीजवळ जाऊन पुन्हा तिथून खाली उतरायचा प्रयत्न करायला लागला. सगळ्यांना बोलवू लागला , " ए, चला चला! गणपतीची मिरवणूक येतेय. चला नाचायला चला"!
मी पटकन पुढे झालो आणि त्याला आत ओढला आणि गादीवर झोपवले. मला शिव्या देत, माझ्याशी झटापट करत तो उठायचा प्रयत्न करत होता;पण मेंदूवर भांगेचा अंमल असल्यामुळे त्याला धड उभे सुद्धा राहता येत नव्हते.एव्हढ्यात जिन्यावर पावले वाजली. मला आता खात्रीच पटली की आतापर्यंत लपवून ठेवलेली ही वार्ता जर नेमीचंदच्या वडिलांना कळली तर आपली काही धडगत नाही. मी धडधडत्या अंत:करणाने येणाऱ्या व्यक्तीची वाट बघू लागलो. सुदैवाने तो नेमीचंदच होता आणि आम्हाला वरातीसाठी बोलवायला तो आला होता.छायाचित्रकाराला उठवायचा प्रयत्न फोल ठरला.तो दादच देत नव्हता. इतरांची अवस्था देखिल असून नसल्या सारखीच होती. म्हणून मी एकट्यानेच चलावे असे नेमीचंदने मला सुचवले.मी त्याला दिन्याचा पुन्हा एकदा सुरू झालेला खिडकी पराक्रम सांगितला आणि अशा अवस्थेत मी कसा येऊ म्हणून विचारले. त्याच्या कडे पण उत्तर नव्हते. एव्हढ्यात जिन्यावर पुन्हा पावले वाजली आणि नेमीचंद लगेच खाली उतरला. त्याचा अंदाज बरोबर ठरला. साक्षात त्याचे वडीलच त्याच्या समोर उभे होते. नजरेनेच त्यांनी इतर सगळे कुठे आहेत म्हणून विचारले आणि नेमीचंदने मान खाली घातली. त्या परिस्थितीत मला त्याची खूप दया आली. पण मी तरी काय करणार?त्याला बाजूला सारून वडील वरती आले. समोरची सोंगे बघून ते हबकूनच गेले. अस्ताव्यस्त पसरलेल्या त्या छायाचित्रकाराला त्यांनी लाथेने ढोसून बघितले आणि मला म्हणाले, "हे सगळे केव्हापासून चालले आहे? आणि तू एकटा ह्यांच्यात कशाला अडकून राहिला आहेस? चल खाली चल, ह्यांना लोळू दे खुशाल डुकरासारखे" !
मी त्यांना दिन्याचा खिडकी -प्रताप सांगितला, आणि म्हणून, कसे येऊ असे विचारले. त्यावर त्यांनी एका भरभक्कम गड्याला बोलावले. खिडक्या बंद करून कुलुपं लावली आणि त्याला देखरेखीसाठी तिथे बसवून मला घेऊन खाली आले.
सचिंत चेहऱ्याने नेमीचंद खाली उभा होता. त्याच्या कडे बघून म्हणाले, " अरे कसले मित्र जोडलेस? लाज वाटते मला तुझा बाप म्हणवून घ्यायला. हा एकच मुलगा सज्जन आहे. त्याच्यामुळे आज आपली सर्वांची इज्जत वाचली. त्या दिन्याने खिडकीतून खाली उडी मारली असती तर आज काय प्रसंग ओढवला असता कल्पना करवत नाही. ह्यापुढे हे तुझे इतर दोस्त आपल्या घरी आलेले मला चालणार नाही.

वरातीचा थाट जबरदस्त होता. जयपुराहून खास मागवलेला पोलिस बँड, त्यामागे नटून थटून नाचगाणी करणारे राजस्थानी कलाकार. पेट्रोमॅक्सच्या बत्त्या डोक्यावर घेऊन चालणारे ते रुबाबदार फेटेवाले आणि नटले -सजलेले स्त्री-पुरुष-मुले असा मोठा रुबाब होता ह्या वरातीचा.मोठ्या मानाने त्यांनी मला नवऱ्या मुलाच्या घोडी पाठोपाठ असणाऱ्या सजवलेल्या मोटारीत नेमीचंदच्या बरोबरीने बसवले आणि वरात धीम्या गतीने वधूच्या घराकडे रवाना झाली.

बापु देवकर's picture

6 Oct 2008 - 3:46 pm | बापु देवकर

वरचे सगळे किस्से वाचुन मजा आली...अजुन ही हसतोय....बहुदा भांग मला पण चढ्ली

अरुण वडुलेकर's picture

6 Oct 2008 - 3:50 pm | अरुण वडुलेकर

अबब केवढी ही प्रतिक्रिया. भांग चढवूनच लिहिली वटतं. हा एक स्वतंत्र लेखच झाला असता की.
पण लेख, स्सॉर्री, प्रतिक्रिया- त्यातले अनुभव- धमाल आहे . वाचून 'तितकीच' नशा आली.
बाय द वे. आमच्या नाशिकला भांगेचे दोन निराळे प्रकार मिळतात.
पहिला म्हणजे 'बंठा' आणि दुसरी ' पंजरी ' (अर्तात् चोरूनच मिळते)

भोट्या (भंगड)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

6 Oct 2008 - 4:23 pm | घाशीराम कोतवाल १.२

वरचे सगळे किस्से वाचुन मजा आली...अजुन ही हसतोय....बहुदा भांग मला पण न पिताच चढ्ली वाट्त च्यायला पण मजा येते राव
दारु सारखा वास येत नाहि तोंडला
म्हन्जे मुख शुधी करायला नको ना

नाम्या झंगाट's picture

6 Oct 2008 - 4:26 pm | नाम्या झंगाट

आता भांग ट्राय करायली हवी.....!!

चतुरंग's picture

6 Oct 2008 - 7:25 pm | चतुरंग

भांगेचे प्रताप जोरदार असतात ह्याची प्रचिती मला आली ती इंजिनियरिंगला असताना. त्याआधी फक्त ऐकिवातलीच माहिती.
थर्ड इअर होते. माझ्या हॉस्टेलला बरेच उत्तर भारतीय पब्लिक होते. दिल्लीचा नागरानी आणि पंचाल, अंबाल्याचा पहवा, मेरठचे माथूर आणि त्यागी ब्रदर्स सगळे सगळ्याच बाबतीत ;) जाम पोचलेले प्रकार! ह्या सगळ्या गोतावळ्यात दारु-बिरु न घेणारे फारच थोडे लोक, त्यात मी एक होतो. पण ह्या सगळ्या कंपूपासून मी दूर वगैरे रहात नसे त्यांच्यात येणे जाणे, गप्पा, अभ्यास, (चकणा)खादाडी हे मला वर्ज्य नव्हते. त्या कंपूत का कोण जाणे पण मला एक प्रकारचा मान होता. हे लोक मला आदराने वागवत (किंवा असे मला वाटत असेल ;) ) असो.
शिवरात्रीला भांग करायची असा बेत ठरला. गवळ्याला जास्तीचे दूध सांगितले गेले. मेसवाल्या इसाकभाईला भरपूर गरमागरम जिलबी सांगून ठेवली. शिवरात्रीला सकाळी सकाळीच पहवाने कुठूनशा भांगेच्या गोळ्या पैदा केल्या. हिरवट रंगाच्या, मोठ्या चण्याच्या आकाराच्या गोळ्या हातात घेऊन मी हुंगून वगैरे बघितल्या. मला तेच थ्रिल वाटत होते! मग पट्टीचे भांगवाले भांग करायला बसले. दोन-तीन तास घोटून दुधाची भांग-रबडी झाली आणि सगळे जमले. त्यागी ब्रद्रर्सपैकी थोरला त्याच्या आदरयुक्त अस्खलित लखनवी हिंदीत आर्जवाने मला म्हणाला, "आओ साहब, हमें मालूम हैं की आप शराब वगैरा नहीं पीते. लेकिन ये शराब नहीं भगवान शिवजी का प्रशाद है. थोडासा ले ही लो. आज के दिन नां नहीं कहेते." >:D<
आपल्या सर्वांच्याच डोक्यात एक बंडखोर बंडू दडी मारुन बसलेला असतो. तो संधी बघून डोके वर काढतो. तसे माझे झाले. महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेल्या मला एकदम वाटून गेले साला, आज ट्राय मारुयात. फारतर काय होईल एखाद दिवस झोपून काढावा लागेल. हरकत नाही थोडी घेऊचयात!
मी होकार देताच त्यागीला काय आनंद झालाय म्हणून सांगू! त्याला तो स्वतःचा बहुमान वगैरे वाटला असावा, त्याने स्वतः एक ग्लास मला भरुन दिला मी दबकतच तो तोंडाला लावला. काहीतरी गैरकृत्य करतो आहे की काय असे सारखे वाटत होते. एक पेला संपवला, मला आवडल्याने दुसराही गटकला! मग मी थांबलो. पब्लिकने सगळी भांग थोड्याच वेळात सत्कारणी लावली. एक दोन तास गप्पा करुन सगळे एकगठ्ठा मेसवर हल्लाबोल करुन गेले. किती जेवावे ह्याला काही सुमार नव्हताच. जिलब्या म्हणजे अशा चेपून हाणल्यात की इसाकभाईचे सगळे पीठ संपून गेले.
मी सावधपणे काय होते आहे ह्याचा आदमास घेत होतो. अजून 'तसे' काही जाणवत नव्हते म्हटले ह्यॅ..काहीच होणार नाही उगीच घाबरतात लोक! हॉस्टेलवर परत आलो तेव्हा दोन वाजलेले. खाऊन जडावलेला एकेक जण रुमवर जाऊन टपकत होता. मी ही झोपलो. जागा झालो तेव्हा संध्याकाळ झालेली असावी. बाहेर कॉरीडॉरमधे आवाज येत होते म्हणून उठायचा प्रयत्न केला आणि जमेचना! डोळे बंद केले की सगळी कॉट स्वतःभोवती गरगरा फिरते आहे असा भास होई मग मी कॉटचे दोन्ही काठ घट्ट पकडून ठेवी. डोळे उघडले की फिरणे बंद! असा थोडा वेळ गेला आणि मी हादरलो. म्हटले हे थांबणार कसे. मग मनाचा हिय्या करुन पडल्यापडल्याच कॉटवरुन खाली लोळत गेलो. जमिनीला अंग टेकताच मी आधांतरी नाही हे बघून मला जरा हायसे वाटले. उठून जरासा भेलकांडतच टेबलापाशी जाऊन पाणी प्यालो, थोडे तोंडावर मारले, मग जरा बरे वाटले. रुममधून बाहेर आलो. मी बाथरुममधे जाउन खसाखसा चेहरा धुतला, डोळ्यांवर सपासप पाणी मारुन तसाच कँटीनला गेलो दोन कप चहा ढोसला तेव्हा कुठे जिवात जीव आला. (चहावाला पोर्‍या माझ्याकडे बघून हसतोय असा मला भास होत होता, त्याचा राग येत होता! ) कसाबसा परत हॉस्टेलला आलो तिथे बाहेर जत्रा भरली होती! :) काय पण एकेक ध्यान होतं वा वा, काय सांगू!
महादेवन संपूर्ण हॉस्टेलमधे दारोदार किशोरकुमारची गाणी म्हणत हिंडत होता (तसा त्याचा आवाज बरा होता तो स्वतःला प्रतिकिशोर समजत असे आणि आज तर फुल्ल टल्ली झाल्याने त्याला मुक्त परवाना होता! ;) ), हदग्याच्या खेळात दोन मुली जशा समोरासमोर उभे राहून एकमेकींचे हात डोक्यावर धरुन कमान करतात ना, आणि एक मुलगी त्या कमानीखालून जाऊन गाणी म्हणते तसे त्यागी ब्रदर्स हातांची कमान करुन उभे होते आणि पहवा अथकपणे त्यांच्या मधून गोलगोल फेर्‍या मारत होता :O . पटण्याचा चौधरी बाबू आपल्या रुममधे 'दरबार' भरवून कोणाची काय गार्‍हाणी आहेत, कुठल्या मास्तरला कसा सरळ केला पाहीजे ह्याबद्दल बिहारी हिंदीतून मोठमोठ्याने बडबड करीत होता :> . पंचाल सुन्नपणे एका खुर्चीत बसून येणार्‍या जाणार्‍याकडे पाहून फक्त हसत होता. अजून एक प्राणी रुममधे कसलासा वास येतोय असे म्हणत सारख्या उदबत्या लावत होता. त्याची रुम धुराने कोंदून गेली होती शेवटी हा उदबत्तीच्या धुरात गुदमरुन मरेल असे वाटून त्याला त्याच्याच रुमच्या बाहेर आणून भिंतीला टेकून बसवला आणि तिथे उदबत्त्या आणि काडेपेटी त्याला दिली म्हटले लाव इथे किती लावयच्या आहेत त्या #:S!
ही धमाल रात्रभर सुरु होती. पहाटे पहाटे थोड्या शुद्धीतल्या पब्लिकने पोरांना त्यांच्यात्यांच्या रुममधे बळेच ओढून नेले आणि सगळे लुढकले ते थेट दुसर्‍यादिवशी दुपारपर्यंत. दुपारचा चहा झाला आणि मग एकेक किस्से ऐकून हसूनहसून पुरेवाट!
हा माझा भांगेचा पहिला आणि शेवटचा प्रयोग. बम्म भोले!!

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2008 - 7:45 pm | बिपिन कार्यकर्ते

रंगाशेठ, हा बंडू फार चावट असतो, कधी प्रामाणिक असतो तर कधी बंडखोर असतो... पण एक मात्र नक्की, आयत्या वेळेला घोटाळा करुन ठेवतो आपल्यासाठी. काय?

बिपिन.

अवांतर - तो चहावाल्या पोरगा का हसत होता तुमच्या कडे बघून? मला वाटतं तुम्ही पण सारखे चहा पित सुटला का? ;)

आपल्या सगळ्यांनाच कधीना कधी टाकलेला गुगली आपला एकदम जानी दोस्त असतो कधी अडचणीत आणतो, कधी मस्तीत नेतो पण दरवेळी काही ना काही शिकवून जातो! :)
(अवांतर - चहावाला पोर्‍याला माझा जडावलेला चेहरा ओळखू येऊन हा पेताड आहे की काय असे वाटले असावे असे मला उगीचच वाटत होते! त्यामुळे तो हसतोय असा संशय येत होता. ;) )

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

6 Oct 2008 - 8:08 pm | मुक्तसुनीत

अशक्य किस्से आहेत एकेक !
च्यामारी अटलांटीकपार कुठे भांग गावण्याचे काही चान्सेस आहेत काय ? एखाद्या वीकेंडला .... ;-)

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2008 - 8:16 pm | बिपिन कार्यकर्ते

जायचा यायचा खर्च द्या... स्वतः येऊन घरपोच डिलीवरी देतो. वाटल्यास भांग घोटून पण मिळेल, तासाचे २५ डॉलर प्रमाणे. ऑर्डर कमीत कमी २ दिवस आधी कळविणेत यावी.

बिपिन चितळे.

प्राजु's picture

6 Oct 2008 - 8:48 pm | प्राजु

धमाल किस्से आहेत एकेकाचे. मजा येते आहे वाचायला. प्रमोद काकांचा लेख त्या तिथे पलिकडे वाचला होता त्यामुळे सगळे आठवत होते. पण चतुरंग, तात्या, बिपिन.. कार्टा सगळेच मस्त. येऊद्यात अजूनही वाचते आहे मी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

झकासराव's picture

6 Oct 2008 - 8:53 pm | झकासराव

=)) =)) =))

जबरा किस्से आहेत एकेक.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

भाग्यश्री's picture

6 Oct 2008 - 10:38 pm | भाग्यश्री

हेहे काय सही किस्से आहेत एकेक.. ! देव काकांचा किस्सा वाचला होता आधी, तो आणि बाकीच्यांचे किस्से अ-फ-ला-तू-न !! :))