#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - मार्च २०१७ - कॅलरी चॅलेंज

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in जनातलं, मनातलं
1 Mar 2017 - 2:07 am

1
नमस्कार मंडळी.

"मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे.
व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.

आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे -

नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८,०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी.
डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९,६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ५४७ किमी.
जानेवारी २०१७ - सायकलिंग - १०,७५५ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ६९५ किमी.
फेब्रुवारी महिन्याचे आकडे लवकरच अपडेट करत आहोत. सायकलिंगचे आकडे मोजणारी स्ट्रावा ही साईट सध्या बंद असल्याने सायकलवीरांचे किमी उपलब्ध नाहीत. साईट चालू लागली की आकडे अपडेट करतो आहोतच.

या महिन्यापासून दर वेळी एक नवीन मिपाकर आपली 'व्यायामगाथा' घेऊन आपल्या भेटीस येत राहील. नुकताच व्यायाम सुरू केलेल्यांपासून ते भरपूर व्यायाम करणारे आणि महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम सातत्याने करणारे मिपाकर हा उपक्रम पुढे चालवतील. "टीम #मिपाफिटनेस" या संदर्भात नवीन नवीन कल्पनांवर काम करत आहे आणि व्यायामासंदर्भात अनेक नवीन गोष्टी आपल्या भेटीला येतील.

#मिपाफिटनेसच्या अप्रतीम लोगोबद्दल अभ्या.. चे भरपूर आभार..!!

मोदक

**************************************************************************************

Run

काहीच महिन्यांपुर्वी मी खरं तर "मी आज केलेला व्यायाम" ह्या धाग्यांकडे न फिरकणारी मेंबर होते. माझं आपलं बरं सुखात चाललं होतं. पण नेमकं ते "७ दिवसांचं चॅलेंज" आलं. यंदा हा धागा मी काढण्याचं कारण इतकंच, की एका गोडपदार्थनामधारी आयडीला "बघा, "ही" करु शकते, तर कुणीही करु शकतं!" हे दाखवुन द्यायचं आहे.. फारसं चूकही नाहीये ते =))

तर मंडळी अगदी एक महिन्या पुर्वी मी एक शुन्य व्यायाम करणारा काऊच पोटॅटो होते. आपण व्यायाम केला पाहिजे असं मला दर वेळेस हा धागा आलं की वाटायचं आणि १-२ दिवसात ते ही बारगळायचं. मोदकने मागच्या महिन्यात "ग्रुपसोबत ७ दिवस चॅलेंज" आणलं. अनंत काळा पर्यंत रोज व्यायाम करण्यापेक्षा "७ दिवस" हा आकडा मला सोप्पा वाटला. त्यातही सोबत अजुन २-४ जण असले की त्यांच्या नादाने आपणही करतोच काही ना काही. म्हणुन मग आम्ही मैत्रिणींनी आमचा लिंबुटिंबू हा ग्रुप स्थापन केला. ह्यातल्या सामान्य वाचक, सविता००१, स्रुजा, इशा अगदी नियमित व्यायाम करणार्‍या. ते ही डाएट सांभाळुन. मी त्यामानाने खरंच लिंबुटिंबु होते. पण फक्त "सातच" दिवस व्यायाम करायचाय म्हणुन मी पण सुरुवात केली.

प्रामाणिकपणे सांगते, पहिल्या १० मिनिटातच मला "मरते की काय आता ट्रेडमिलवरच" अशी धाप लागायची. २० व्या मिनिटाला मी मोदकला खच्चुन शिव्या घालत असायचे. ३० व्याला ट्रेडमिलवर अक्षरशः अंग टाकलेले आणि पाय आपोआप त्या पट्ट्यावर फिरत आहेत अशी अवस्था. पण ते ५ किमी काही पटकन होताना दिसायचे नाहीत. मला तब्बल ५० मिनिटं लागायची ५ किमी करायला. जिममध्ये आजुबाजुला लोक सलग ३० मिनिटं "धावायचे". ग्रुपमधल्या पोरी ७-८ किमीच्या खाली बोलतच नव्हत्या. इथे मला ५ किमी चालायला जमत नव्हतं.

सुरूवातीला दम लागणे, पायात गोळे येणे, पोटात दुखणे, नडगी दुखणे (shin splints) असे प्रकार व्हायचे. पण इथे चर्चा करुन लक्षात आलं की मी वॉर्मअप करतच नाहीये. शिवाय पहिल्या मिनिटापासूनच फुल्ल स्पीडने पळायला सुरुवात करतेय. मग दम लागला की वेग कमी करा, थोड्या वेळाने पुन्हा वाढवा असे खेळ करत बसतेय. इथल्या सूचना लक्षात घेऊन चालायला लागल्यावर लक्षात आलं की स्ट्रेचेस आणि वॉर्मअप करुन सुरूवात केली पायात गोळे येत नाहीत. वेग हळूहळू वाढवत नेला तर शरीरही त्या लयीत चालायला लागते. एकदा लय पकडली की कोणताही अतिरेकी त्रास न होता अगदी पळता सुद्धा येतं. श्वास टिकतो. आणि फुलला तरी नीट बोलता येईल इतपतच दम लागतो.

ह्या व्यक्तिरिक्त काही गोष्टींनी अनपेक्षित बराच फायदा झाला. एक तर सावन वर गाणी ऐकणे. तिथे व्यायामासाठी आयत्या प्लेलिस्ट आहेत. जोरजोरात ढीचॅक गाणी लावली की आपोआप चालायला मजा येते. उगाच रडकी गाणी असतील तर एकूणच आयुष्यात काही राम नाही असंच वाटतं. तेव्हा ट्रेडमिलवर फक्त नाचायचं बाकी उरेल अशी गाणी वाजवा.

दुसरं एक अ‍ॅप जे मला सामान्य वाचकने सुचवलं ते म्हणजे - C25k
ह्या अ‍ॅपमध्ये तुम्ही अजिबात काहीही करत नाही असं समजुन तुम्हाला ५के साठी ट्रेन केले जाते. सोप्पे अ‍ॅप आहे. आठवड्यातले तीन दिवस तुम्ही त्यांनी दिलेल्या वेळापत्रकापमाणे चालणे+पळणे आवश्यक आहे. सुरूवात अगदी सोप्प्या टारगेट पासुन होते. ते ८-९ आठवड्यात तुम्ही ५ किमी पळु शकला इतपत तयारी करुन घेतली जाते. मला ह्याचा भरपुर फायदा होतोय. एक महिन्यापुर्वी मी चालत होते पण अजिबात पळता येत नव्हतं. आता मी ९० सेकंद सलग पळु शकतेय. परत २ मिनिटं चालुन परत ९० सेकंद पळणे असं ४० मिनिटं कोणतीही अतिरेकी धाप न लागता जमायला लागलेलं आहे.

असा माझा हा व्यायाम अल्ट्रामॅन कौस्तुभ राडकर आणि मिलिंद सोमण ह्यांच्या चरणी समर्पित!

सात दिवसांचं चॅलेंज रडत-पडत-उठत-बसत का होईना, पण केलं आहे. ह्या सात दिवसात कैकदा वाटलं की "जाऊ दे ना, काय फरक पडतो आज नाही गेलं तर. बाकीचे मिळुन करतील चॅलेंज पुर्ण." पण भारतात सकाळी सगळ्या ऑफिसला जायच्या आधी व्यायाम करुन जायच्या आणि व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेटही यायचे. मग मात्र मी रात्री ८ ला सुद्धा जिममध्ये जाऊन ५ किमी पुर्ण करुन यायचेच. सात दिवसात ठरल्याप्रमाणे ३५ किमी पुर्ण केले. पण जित्याची खोड.. दोन दिवस आराम करु म्हणता म्हणता आठवडा परत घरात बसून काढला! पुन्हा एकदा "काही होत नाही एक दिवस नाही केला व्यायाम तर" ह्या फेजमध्ये जायला सुरूवात झाली. सातत्य काही ठेवता येईना. आणि जोवर ते नसेल तोवर व्यायामालाही काही अर्थ नाही.

म्हणुनच ह्या महिन्यासाठी डॉ.श्रीहास ह्यांनी सुचवल्या प्रमाणे चॅलेंजचा पुढचा टप्पा घेऊन आलो आहोत.

ह्या महिन्यात आपण ७ दिवसांचे ३ चॅलेंजस घेणार आहोत. ह्यात तुम्ही दोन चॅलेंजच्या मध्ये गॅप घेऊ शकता अथवा सलग २१ दिवसांचे चॅलेंजही घेऊ शकता. कोणतीही सवय लागायला २१ दिवस लागतात. तेव्हा सातत्य येणाच्या दृष्टीने कुणाला २१ दिवस सलग हे चॅलेंज घ्यायचे असेल तर जरूर घ्या!

तर चॅलेंज असे की ३० मिनिटं कोणताही व्यायाम प्रकार करुन किमान २०० कॅलरीज जाळणे. सलग ७ दिवसांची ३ किंवा सलग २१ दिवसांचे एक चॅलेंज तुम्हाला घ्यायचे आहे.

रोज किती वेळ व्यायाम केला आणि किती तीव्रतेचा केला ह्यावर बरेच काही अवलंबुन आहे. उत्तम आरोग्यासाठी रोज किमान ३० मिनिटं घाम फुटेपर्यंत चांगला व्यायाम करणे आवश्यक आहे. ह्या दृष्टीने कॅलरीजची अट घातलेली आहे. सर्वांच्या सोयीसाठी बहुतांशी केले जाणारे व्यायाम आणि त्यातून जळणार्‍या कॅलरीजचा अंदाज देत आहोत. तुमच्या वय आणि वजनाप्रमाणे हे आकडे बदलतील हे लक्षात घ्यावे. आंतरजालावरून तुम्ही तुमच्या व्यायामासाठी वय आणि वजनाप्रमाणे आकडे मिळवु शकता. आपल्याला अचुक कॅलरीजचा हिशोब मिळवायचा नसून, त्या तीव्रतेचा व्यायाम करायचा आहे.

अंदाजे ६५-६८ किलोच्या माणसाने, ३० मिनिटांसाठी केलेल्या व्यायामाची ही आकडेवारी आहे. आंतरजालावरून साभार.

वजन उचलणे - २०० कॅलरी
टेनिस - २३२ कॅलरी
सायकलिंग (14 – 15.9 mph) - ३३१ कॅलरी
पळणे (7.5mph) - ४०० कॅलरी
चालणे (3.5 mph) - १३५ कॅलरी
सूर्यनमस्कार - ४१७ कॅलरी (एक सून - १३.९ कॅ. एका मिनिटाला एक सून असा हिशोब आहे)

तुम्ही करत असलेल्या व्यायामप्रकारात किती कॅलरीज जळाल्या ह्याचा असाच अंदाज तुम्ही लावु शकता आणि त्या हिशोबाने २०० कॅलरीज जाळण्याच्या दृष्टीने व्यायामाची तीव्रता ठरवु शकता.

चला तर मग.. हे नवीन कॅलरीचे चॅलेंज घेऊन कॅलरी जाळूया..!!

आपापला व्यायाम नोंदवण्यासाठी केलेली ही गूगल शीट

आरोग्यआरोग्य

प्रतिक्रिया

स्रुजा's picture

1 Mar 2017 - 2:15 am | स्रुजा

वाह वाह !! हे झकास झालं !

२१ दिवस वजन + ३ माईल्स पर आवर ने (२.५ एलेव्हेशन) ट्रेडमील. मला ३.५ काही केल्या जमत नाही असं लक्षात आलंय त्यापेक्षा मी एलेव्हेशन वाढवते. ते सोपं जातं मला. आणि माझं एलिप्टिकल नंतर १० मिन्स - वजन उचलून झाल्यावर. होतील ना २०० ? हो, मला वाटत>.

डायेट बो<बललं आहे ते परत आणायला हवं.

तू बरच मनावर घेऊन आम्हालाही उद्युक्त केलस म्हणुन आभार - हे मोदक आणि पिरा दोघांना : माझा एम गंडलाय - काही अनुस्वार येत नाहीयेत.

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2017 - 2:16 am | पिलीयन रायडर

अच्छा.. डाएट बोंबललय असं म्हणायचं आहे का?!!!

स्रुजा's picture

1 Mar 2017 - 2:22 am | स्रुजा

लोल हो.. चहा हवाय राव. आलेच घेऊन. डोळे उघडे राहीनात.

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2017 - 2:16 am | पिलीयन रायडर

मागच्या महिन्यात अनेकांनी ग्रुप मध्ये येण्याबाबत विचारणा केली. पण व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या मर्यादा आहेत. म्हणुन ह्या वेळेस मी एक गुगल डॉक्युमेंट तयार केले आहे. सर्वांसाठीच ते खुले आहे. तुमचे व्यायामाचे आकडे आणि इतर चर्चा ह्याच धाग्यात करायची आहे. पण तुम्हाला व्यायामाचा ट्रॅक ठेवायचा असेल तर आपण सगळे ही लिंक वापरु शकतो. प्रत्येक जण आपल्या मिपा आयडीच्या नावाने एक शीट तयार करेल आणि आपला रोजचा व्यायाम त्यात अपडेट करेल.

मिपा फिटनेस - मार्च २०१७ - २१ दिवसांचे कॅलरी चॅलेंज

आषाढ_दर्द_गाणे's picture

2 Mar 2017 - 10:55 pm | आषाढ_दर्द_गाणे

एक सुचलं - हे डॉक्युमेंट मूळ लेखात असायला हवे होते, शोधायला सोपे जाईल

चष्मेबद्दूर's picture

1 Mar 2017 - 10:23 pm | चष्मेबद्दूर

आम्ही प्रत्येकानी वेगळ्या याद्या कशा करायच्या आहेत कळलं नाही.

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2017 - 11:58 pm | पिलीयन रायडर

तुम्ही त्या लिंकवर जा. तिथे नवी शीट तयार करा. खाली + चे चिन्ह आहे. पिरा आणि प्रसन्नच्या नावाने दोन शीट्स आहेत पहा. त्याच्याच बाजुला हे चिन्ह असेल. तिथे तुमची शीट तयार करा. पहिल्या शीटमध्ये टेबल बनवुन दिले आहे. ते कॉपी करुन वापरु शकता.

ऑदर ह्या कॉलम मध्ये काही इतर डिटेल्स टाकायचे असतील तर टाका. जसे की एका दिवशी मी चुकुन लेव्हल २ चे वर्काअऊट केले. म्हणुन लिहुन ठेवले आहे. तशा काही नोंदी असतील तर करा.

गॅरी ट्रुमन's picture

1 Mar 2017 - 11:11 pm | गॅरी ट्रुमन

एकेकाळी मी पण ट्रेडमिलवर चांगला दीड-दोन मैल पळायचो पण पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर ट्रेडमिलावर थोडेही पळले तरी जिथे जखम झाली होती तो भाग दुखायला लागतो. त्यामुळे ट्रेडमिल बंद. घरी ट्रेडमिल असूनही वापरता येत नाही :(

मागच्या वर्षी एक मनुष्य येऊन योगासने वगैरे करून घ्यायचा पण तो पण एकाएकी येईनासा झाला. त्यामुळे तो पण व्यायाम बंद झाला. पण आपल्या कुटुंबात विविध आजारांचा इतिहास आहे हे लक्षात घेता आपण पण काहीतरी करायला हवे हे मनाने घेतले. साधारण १५-२० दिवसांपूर्वीपासून सकाळी उठून घराजवळच्या एका बागेत पळायला जातो. मी यापूर्वी शाळेत असताना पळलो असेन. अन्यथा सध्या पळणे होत होते केवळ ट्रेन पकडण्यापुरते. अर्थातच त्या पळण्याला काही अर्थ नाही. कित्येक वर्षांचा खंड पडल्यामुळे फार अंतर आणि फार वेळ पळता येत नाही. आता बागेच्या साधारणपणे दीडेक फेर्‍या होतात. दररोज पळायला जाताना कालच्यापेक्षा किमान एक पाऊल जास्त पळायचा निर्धार असतो. एक फेरी पूर्ण करायला किती वेळ लागतो हे अजून मोजलेले नाही पण साधारण चारेक मिनिटे जात असावीत. म्हणजे अर्धा तास एकसलग पळायचे असेल तर किमान ७-८ फेर्‍या मारता यायला हव्यात. ते कधी साध्य होते ते बघायचे.

मी एकेकाळी ट्रेडमिलिंग करायचो त्यावेळी ऐकलेला एक फॉर्म्युला सांगतो. २२० वजा आपले वय याच्या ८०% इतका पल्स रेट ४० ते ४५ मिनिटे ठेवला की तेवढा व्यायाम पुरेसा असतो. म्हणजेच समजा एखाद्याचे वय ३० वर्षे असेल तर २२० वजा ३० म्हणजे १९० च्या ८०% म्हणजे १५२ इतका पल्स रेट ४० ते ४५ मिनिटे ठेवता आला पाहिजे. हा पल्स रेट पळून किंवा जोरबैठका काढून किंवा वजने उचलून कसाही साध्य करता आला तरी ते चालण्यातले असते असे ऐकले होते. खरेखोटे इथलीच एक्स्पर्ट मंडळी सांगतील.

असो. किती कॅलरी वगैरे जाळता येतात हे लिहिण्यापूर्वी किमान ८ फेर्‍या मारता येण्याइतका स्टॅमिना यायला हवा.

पिलीयन रायडर's picture

2 Mar 2017 - 7:26 am | पिलीयन रायडर

मी धावण्याची तयारी करतेय. त्यात मध्ये थोडा बदल म्हणुन सुर्यनमस्कार घालत आहे. ह्याने कोअर स्ट्रेन्थ तयार होईल अशी आशा आहे.

वेल्लाने ऑदर ह्या कॉलम मध्ये डायरी लिहील्याप्रमाणे २ ओळी लिहील्या आहेत. ही कल्पना मस्त आहे. स्वतःलाच काही सांगायचे असेल तर तिथे लिहुन ठेवा. मी पण लिहुन ठेवले.

पण ह्या धाग्याला विसरु नका. इथे आपल्याला चर्चा करायची आहे. त्यानेच पुढे जायला मदत होणार आहे.

वेल्लाभट's picture

2 Mar 2017 - 7:36 am | वेल्लाभट

वेळ मिळत नाही. पण कारणं न देता होईल तितकं करायचा निर्धार आहे. त्यामुळे काल १५+१५ जोर मारून सुरुवात केलेली आहे.

सही रे सई's picture

2 Mar 2017 - 9:02 am | सही रे सई

सूर्यनमस्कार : व्यस्त व्यक्तींसाठी व्यायाम प्रकार

१२ मिनिटात २८८ योगासने.

सुर्यनमस्काराच्या एका फेरीत १२ योगासने होतात. दोन सूर्यनमस्कारांचा संच म्हणजे एक संपूर्ण सूर्यनमस्कार. पहिल्या फेरीत शरीराची उजवी बाजू ताणणे आणि दुसऱ्या फेरी मध्ये डाव्या बाजूला ताण देणे. म्हणजेच १२ ते १५ मिनिटामध्ये एका सूर्यनमस्काराच्या  दोन संचामध्ये १२-१२ योगासनांचे १२ सूर्यनमस्कार, म्हणजेच २८८ योगासने.

सूर्यनमस्कार : कॅलरीज (उष्मांक) घटण्याचा हिशोब.

एका सुर्यनमस्काराच्या फेरीमध्ये सर्वसामान्य व्यक्तींच्या १३.९० कॅलरीज जळतात. हळू-हळू १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करा.संकल्पापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही सडपातळ, सुडौल झालेले असाल.

३० मिनीटांच्या व्यायामानंतरची कॅलरी मधील घट

३० मिनिटांच्या विविध व्यायाम प्रकारामध्ये कॅलरीज घटण्याचा तुलनात्मक अभ्यास:

वेट लिफ्टिंग= १९९ कॅलरीज , टेनिस= २३२ कॅलरीज, बास्केट बॉल= २६५ कॅलरीज,

बीच व्हॉली बॉल= २६५ कॅलरीज, फुट बॉल=२९८ कॅलरीज, जलद सायकलिंग = ३३१ कॅलरीज,
रॉक क्लाईबींग = ३६४ कॅलरीज, धावणे= ४१४ कॅलरीज, सूर्यनमस्कार= ४१७ कॅलरीज.

वेळ अपुरा आहे? या कमी वेळेत तंदुरुस्त कसे रहावे- जाणून घ्यायचे आहे..?
‘सूर्यनमस्काराच्या दुनियेमध्ये आपले हार्दीक स्वागत.’
      कामात अति व्यस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्यांची तक्रार असते की, ‘ योगासने करण्यासाठी तेवढा  वेळ नसतो,’ अशांसाठी सूर्यनमस्कार अतिउत्तम आहेत. सकाळी- सकाळी जलद गतीने कमीत कमीत बारा सूर्यनमस्कार केल्याने हृदयाला बळकटी प्राप्त होते, तर संथ गतीने केल्याने स्नायू बळकट बनून मन शांत स्थिर होते. शरीर लवचिक बनल्याचा आनंद मिळतो.

इतर व्यायाम प्रकारापेक्षा सूर्यनमस्कार, सुरवातीचे शरीर सैल करणारे व्यायाम आणि योगासने यांच्यामधील दुवा बनू शकतात. म्हणून सकाळी-सकाळी शरीर सैलावणारे व्यायाम प्रकार झाल्यावर काही सूर्य नमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक होऊन नंतरची योगासने करण्यासाठी शरीर तयार होते.

सूर्यनमस्कार तुमच्या साठी लाभदायक का आहे?

सुर्यनमस्काराचे फक्त वरील लाभच नाहीत तर आणखी बरेच लाभ होतात शरीराच्या सर्व अवयवांना हृदय, यकृत, पचनसंस्था, छाती, अगदी पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत या सूर्यनमस्कारा मध्ये असणाऱ्या योगासनांचा उत्तम परिणाम होतो. रक्त शुद्ध होऊन रक्ताभिसरण सुधारल्याने पोट, आतडी आणि मज्जासंस्थाचे कार्य सुधारते. सूर्यनमस्काराच्या दैनंदिन सरावामुळे वात, पित्त आणि कफ, ज्यांच्यावर आपले आरोग्य अवलंबून आहे, त्यांच्यात समतोल प्राप्त होण्यास मदत होते.सुर्य नमस्काराचे इतर लाभ

सूर्यनमस्कार: योगाद्वारे सूर्याप्रति कृतज्ञता 

‘या ग्रहावरील समस्त जीव सृष्टीचे अस्तित्व सूर्यामुळेच आहे’ हा शाळकरी धडा लक्षात आहे ना? या सोनेरी, तळपत्या ताऱ्याची आपल्या जीवनातील अपरिहार्य भूमिका आपण जाणतो - ज्याच्यामुळे अंधकार दूर होऊन जीवन फुलू लागते. यामुळे आत्ता आपले कर्तव्य आहे - या ताऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे. सूर्यनमस्कार आपल्याला ती संधी प्राप्त करून देतात. सूर्य नमस्काराच्या माध्यमातून संपूर्ण शरीराला व्यायाम देताना, त्या जीवन स्त्रोताचा ‘सूर्याचा’ आपण सन्मान करू शकतो.

सूर्यनमस्कार करण्यासाठी उतावळे आहात नां. सूर्य नमस्कार कसे करावेत यावरील सध्या सरळ आणि सोप्या सूचनांचे पालन करा.  आपल्या योगा चटई घ्या, प्रसन्न चेहऱ्याने सुर्यनमस्कारातील एकेक योगासनांचा आनंद घ्या. सूर्यनमस्कार आणखी पवित्र आणि आशिर्वचन बनण्यासाठी सुर्याप्रतीची कृतज्ञता त्यामध्ये अनुभवा. ही निरोगी शरीर आणि स्वस्थ मन प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे.
Whatsapp fwd

सही रे सई's picture

2 Mar 2017 - 9:09 am | सही रे सई

मागच्या फिटनेस विषयीच्या धाग्यात कोणीतरी कायप्पा ग्रुप वर सूर्यनमस्कार उपक्रम सुरू केल्याबद्दल सांगितलं होतं.. ते वाचून मी पण माझ्या जवळच्या मित्र मैत्रिणींच्या आणि नातेवाईकांच्या ग्रुप वर या बद्दल सूतोवाच केले...आणि काय आश्चर्य काही ग्रुप कडून अनपेक्षित खूपच चांगला प्रतिसाद आला.1 महिन्याचे चॅलेंज घेतले आहे सगळ्यांनी..कमीत कमीत रोज 5 तरी सूर्यनमस्कार घालण्याचे.. त्या पैकीच एका ग्रुप वर आलेली ही वरील फॉरवर्ड आहे. मी स्वतः 12,15 असे सूर्यनमस्कार 2 दिवस घातले आहेत, असेच वाढवत खरोखर 108 करता आले तर काय बहार येईल असे वाटते.. आगे आगे देखेंगे होता है क्या..

अभिनंदन.. प्रगती कळवत रहा.

सही रे सई's picture

2 Mar 2017 - 10:19 pm | सही रे सई

आजचे १६ सुर्यनमस्कार घातले आहेत.

सही रे सई's picture

3 Mar 2017 - 8:50 pm | सही रे सई

आज ३० नमस्कार घातले. माझं मलाच आश्चर्य वाटल याच. कारण काल १२ वरून १६ वर जाताना जाम हाशहुश झाल होत. पण आज १० चे ३ सेट केले आणि मधे थोडा ब्रेक घेतला.. आणि जमले सुद्धा.

खूपच छान. मी आटा पर्यंत खूप माहिती शोधली फिटनेस बद्धल काही जणांनी मला नुसती फळे खायला सांगितली काहींनी मला व्यायाम करायला सांगितलं. पण हि टिप्स खूप छान आहे .

स्विमिंग यात नसल्याने पास आणि शुभेच्छा!!

पिलीयन रायडर's picture

2 Mar 2017 - 5:46 pm | पिलीयन रायडर

"कोणताही व्यायाम प्रकार" असं लिहीलय की!!!! तुम्ही अर्धातास स्विमिंग केल्यावर किती कॅलरीज जळतात हे बघा आणि ते आकडे सांगा.

ह्या चॅलेंजमध्ये व्यायाम प्रकाराचे बंधन नाही.

सूडक्या लोगो बघ मिपाफिटनेसचा. त्यात पवाय लागलेला आयकॉन आहे.

प्रसन्न३००१'s picture

2 Mar 2017 - 12:33 pm | प्रसन्न३००१

बऱ्याच दिवसात व्यायामाला वेळ मिळाला न्हवता. काल तुमचा हा धागा वाचला आणि मनात विचार आला कि हे २१ दिवसांचं चॅलेंज घेऊयात. तसंही नियमितपणा आणि माझं थोडाफार वाकडेच आहे, त्यामुळे सलग २१ दिवस काही ना काही व्यायाम होईल का हा प्रश्नच पडलाय मला.. पण या धाग्यामुळे एक प्रेरणा नक्कीच मिळेल.

सो, काल ठरवून ऑफिस मधून आल्यावर वीकली कॉन्फरेन्स कॉल झाल्यावर जिम ला गेलो.. ट्रेडमिलवर HR प्रोग्रॅम सेट करून १६ मिनिटे चालणे, नंतर साधारण ५.५ किमी सायकल, १० मिनिटे स्टेप-अप आणि १० मिनिटे पिलेट्स असा एकत्रितपणे ४५ मिनिटे व्यायाम झाला आणि हे सगळं Endomondo ट्रॅकर लावून... endomondo प्रमाणे ९८८ कॅलरीज बर्न झाल्यात, यात स्टॅटिक कॅलरीजसुद्धा असल्याने अंदाजे याच्या निम्म्या म्हणजे ४९४ कॅलरीज तरी बर्न झाल्या असाव्यात.

आज जिम मध्ये जायला नाही जमणार पण ऑफिस मधून घरी चालत यायचा प्लॅन आहे (साधारण ३.५ किमी)

हा धागा काढल्यावर पिरा ताईंचे आभार

#KeepUp #Workouts #SweatisnewSwag #FatToFit

प्रसन्न३००१'s picture

2 Mar 2017 - 12:37 pm | प्रसन्न३००१

हा धागा काढल्यावर पिरा ताईंचे आभार

काढल्याबद्दल असे वाचावे :D

गॅरी ट्रुमन's picture

2 Mar 2017 - 2:39 pm | गॅरी ट्रुमन

एक किलो वजन कमी करायचे असेल तर आपण खाण्यातून घेतो त्यापेक्षा १००० कॅलरी जास्त जाळायला हव्यात.वजनाप्रमाणे हा आकडा कमीजास्त होईल.

आपण किती कॅलरी जाळतो यासाठी एक MET रेटिंग हा उपयुक्त प्रकार आहे. आपण काहीही न करता नुसते बसून राहिलो तरी श्वास चालूच असतो, हृदय, किडनी इत्यादी अवयव काम करत असतात. या सगळ्यांसाठी आपल्या वजनाच्या प्रत्येक किलोमागे दर तासाला १ कॅलरी खर्च होत असते. म्हणजे दिवसभरात काहीही केले नाही तरी ७० किलो वजनाची व्यक्ती २४ तासात २४ गुणिले ७० बरोबर १६८० कॅलरी जाळत असतेच.काही न करता नुसते बसून राहणे या अ‍ॅक्टिव्हिटीला MET रेटिंग १ असे म्हणतात.समजा एखाद्या अ‍ॅक्टिव्हीटीमधून नुसते बसून राहण्यात जितक्या कॅलरी जाळता येतील त्याच्या तिप्पट कॅलरी जाळल्या तर त्या अ‍ॅक्टिव्हिटीला MET रेटिंग ३ असे म्हणतात.

जर आठवड्यात १ किलो वजन कमी करायचे असेल तर खाण्यातून आल्या आहेत त्यापेक्षा सरासरी दररोज १४२ कॅलरी जास्त जाळायला हव्यात. आता या जास्तीच्या १४२ कॅलरी कुठून आणणार? समजा प्रतितास ५ किमी इतक्या वेगाने चालले तर ती MET ३.५ इतकी अ‍ॅक्टिव्हिटी असते. म्हणजे या वेगाने अर्धा तास चालले तर ७० किलो वजनाची व्यक्ती ७० गुणिले ३.५ गुणिले अर्धा बरोबर १२२.५ कॅलरी खर्च होतील. तर जॉगिंग करणे ही MET ६.५ इतकी अ‍ॅक्टिव्हिटी असते. म्हणजे अर्धा तास जॉगिंग केल्यास ७० गुणिले ६.५ गुणिले अर्धा बरोबर २२७.५ कॅलरी खर्च होतील.

एकेकाळी (म्हणजे साधारण ११ वर्षांपूर्वी) मी या सगळ्या गोष्टी फॉलो करत होतो तेव्हा मिळविलेली माहिती आहे. कुठच्या अ‍ॅक्टिव्हिटीचे MET रेटिंग किती ही माहिती कुठेतरी मिळेलच.

यातही कळीचा मुद्दा म्हणजे आपण खाण्यातून मिळवितो त्यापेक्षा दररोज १४२ कॅलरी अधिक खर्च करायच्या आहेत. जर पिझ्झा खाऊन एखाद्या दिवशी जास्त कॅलरी खाण्यातून आल्या असतील तर तितक्या प्रमाणात जास्त कॅलरी जाळाव्या लागतील. एकेकाळी मी दिवसातून किती तास झोपतो (०.८ MET रेटिंगची अ‍ॅक्टिव्हिटी) , किती तास खुर्चीत बसून काम करतो (१ ते सव्वा MET रेटिंगची अ‍ॅक्टिव्हिटी), किती वेळ चालतो इत्यादींचा ढोबळ अंदाज घेऊन कोणताही व्यायाम न करता किती कॅलरी तशाही जाळता येतील आणि वजन कमी करायला आणखी किती कॅलरी जाळायला हव्यात आणि त्यासाठी किती व्यायाम करायला हवा या सगळ्या गोष्टींसाठी एक टेबलही बनविले होते हे आठवले.अशा गोष्टी १००% काटेकोरपणे अंमलात आणता येत नाहीत पण प्रयत्न तर होताच.

या धाग्याच्या निमित्ताने तसे परत करायची प्रेरणा मिळाली :) मलाही आता टारगेट सेट करायला हवे :)

प्रसन्न३००१'s picture

2 Mar 2017 - 3:14 pm | प्रसन्न३००१

MyFitnessPal हे अँप्लिकेशन आहे, ज्यात आपण आपला वजन, उंची सेट करायची आणि त्यानुसार आपल्याला दिवसभरात किती कॅलरीज लागतात हे कॅल्क्युलेट केलं जातं. या ऍप मध्ये आपण आपला फूड इन्टेक पण फीड करू शकतो.

तसंच, एखाद्या फिटनेस ट्रॅकर बरोबर हे ऍप आपण सिंक करू शकतो, ज्या योगे आपण केलेला व्यायाम आणि त्यातून खर्च झालेल्या कॅलरीज या MyFitnessPal मध्ये सिंक होतात आणि आपल्या डेली टार्गेट मध्ये अड्जस्ट होतात.

मला तरी हे ऍप खूप उपयोगी वाटतंय.

गॅरी ट्रुमन's picture

2 Mar 2017 - 4:48 pm | गॅरी ट्रुमन

हे पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद. डाऊनलोडवतोच ते अ‍ॅप.

सुबोध खरे's picture

4 Mar 2017 - 8:44 pm | सुबोध खरे

एक दुरुस्ती -- आपण जेंव्हा वजन कमी करायचे म्हणतो ते शरीरातील चरबी जाळायचे म्हणतो. पण १ किलो चरबी म्हणजे १००० नव्हे तर ९००० ( नऊ हजार) कॅलरी( प्रत्यक्ष किलो कॅलरी) जाळायला हव्यात. https://en.wikipedia.org/wiki/Food_energy
तेंव्हा आठवड्याला १ किलो वजन कमी करायचे असेल तर रोजच्या आहारातून १४२ नव्हे तर १३०० (तेराशे) कॅलरी कमी करायला हव्यात किंवा तेवढा व्यायाम करायला हवा. म्हणजे ८० किलोच्या माणसाने साधारण दोन तास पळायला हवे ( मेट ७.०) किंवा दोन्ही मिळून
मेट म्हणजे Metabolic Equivalent of Task (MET)
पहा https://en.wikipedia.org/wiki/Metabolic_equivalent

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2017 - 10:54 pm | पिलीयन रायडर

डॉक, एखादं सोप्पं गणीत सांगा ना. म्हणजे आपण भारत्य आहारातून साधारण किती कॅलरी घेतो (भाजी पोळी वरण भात) आणि वजन कमी करायला नक्की किती कॅलरी त्या हिशोबाने जाळाव्यात.

१३०० कॅलरीज खुप आहेत हो. इतका फरक कसा आणावा?

सुबोध खरे's picture

8 Mar 2017 - 10:17 am | सुबोध खरे

पहिली गोष्ट म्हणजे आठवड्याला एक किलो( महिन्यात चार किलो) वजन कमी करणे हा हेतूच चुकीचा आहे. तुमचे वजन एक महिन्यातच वाढले आहे का ? जे तुम्हाला एक महिन्यात कमी करायचे आहे. साधारण महिन्याला एक ते दीड किलो या दराने वजन कमी होईल असाच आहार आणि व्यायाम ठेवा. कारण एक महिन्यात ४ किलो वजन कमी झाले तर हवा गेल्यात फुग्यासारखी आपली त्वचा सुरकुतलेली होऊन आपण "वयस्कर" ओढलेल्या दिसायला लागाल.
जसे जसे वजन कमी होते तसे त्वचेला आक्रसायला वेळ द्या.
म्हणजेच रोजच्या आहारातून ३००-३२५ कॅलरी कमी करा. म्हणजे रोज साधारण ३५ ग्राम किंवा एक महिन्यात १ किलो वजन कमी होईल. वर्षभरात १२ किलोने वजन कमी झाले तरीहि पुरेसे आहे. वजन कमी करण्यासाठी सुदृढ आहार नव्हे तर (सु) दृढ निश्चय असणे आवश्यक आहे.
वजन कमी करण्यासाठी लागणारे कष्ट हे तुमच्या "फेशियल" करण्यासारखे तात्काळ फळ/परिणाम देणारे नाहीत.
वजन कमी करण्यासाठी तीन p लक्षात ठेवा
PATIENCE
PERSISTENCE &
PERSEVERENCE

Dr prajakta joshi's picture

25 Mar 2017 - 8:33 pm | Dr prajakta joshi

योग्य माहीती

गॅरी ट्रुमन's picture

5 Mar 2017 - 12:46 am | गॅरी ट्रुमन

धन्यवाद डॉक्टरसाहेब.

बापरे माझ्या डोक्यात जे आकडे होते त्या सगळ्यांना आता ८-९ ने गुणायला हवे तर :)

चतुरंग's picture

2 Mar 2017 - 10:00 pm | चतुरंग

२४ सूर्यनमस्कार घालून दिवसाची सुरुवात झाली! :)

वेल्लाभट's picture

2 Mar 2017 - 11:39 pm | वेल्लाभट

वॉर्म अप
जोर २०+२०
लंजेस १०+१०

५० फक्त's picture

3 Mar 2017 - 11:58 am | ५० फक्त

१० मि. ट्रेडमिल , ट्रायसेप्सचे ५ प्रकारचे सेट , प्रत्येकी ३ सेट प्रत्येकी १५ रिपिटेशन
+ साईटवर १८ मजले चढणे आणि उतरणे होणार आहे.

फिटनेस ब्यांड आताच ३४२ क्यालरी दाखवत आहे, दिवस संपेतो ८०० ला टेकेल.

पिलीयन रायडर's picture

3 Mar 2017 - 7:18 pm | पिलीयन रायडर

मी रोज व्यायाम करतेच आहे. साधारण किती दिवसात वजन थोडेसे का होईना पण कमी व्हायला पाहिजे? वजन हे एकच मोजता येण्यासारखे प्रकरण आहे. ते कमी होताना दिसले तर उत्साह टिकुन रहातो. ते जर नाही झाले कमी, तर माझं अवघड आहे... =))

मी आहारात काहिही बदल केलेला नाहीये फार. फक्त चिप्स, बिस्किट इ गोष्टी टाळतेय. आणि व्यायामानंतर प्रोटिन्स पोटात जातील असं बघतेय.

तुमचा काय अंदाज आहे मॅडम?

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2017 - 7:31 am | पिलीयन रायडर

३०-४० मिनिटं व्यायाम करुन बाकी वेळ लोळत काढतेय म्हणुन?
आहारात काडीचाही फरक केला नाही म्हणुन?
कुठे तरी वाचलं होतं की फॅट्स कमी होत असले तरी बोन डेन्सिटी पण वाढते. म्हणुन?

आहारात काडीचाही फरक केला नाही म्हणुन!

व्हाय आर यू जजिंग युअर फिटनेस ऑन द वेइंग स्केल?
वजन ही एका मोठ्या समीकरणाची उकल असते; अ डिराइव्हड नंबर. तुम्ही व्हेरिएबल्स कडे लक्ष द्या की.
वजन आपोआप बदलतं. आणि ते कमीच व्हायला हवं हा अट्टाहासही चूक.

उत्तम व्यायाम, उत्तम आहार याकडे लक्ष द्या. आहारही कमी नको; पण जो आहे त्यात पुरेशी प्रथिनं, पुरेशी कर्बोदकं आहेत ना हे बघा.
व्यायाम केल्यावर गळून गेल्यासारखं वाटायला नको; त्याचा अर्थ तुम्ही ओव्हरट्रेन करताय, किंवा रिकव्हरी होत नाहीये. आहाराकडे लक्ष द्या. प्रोटीन इंटेक बघा.
कालच्या पर्फॉर्मन्स पेक्षा आजचा पर्फॉर्मन्स सरस आहे ना बघा. म्हणजे काल १० सूर्यनमस्कार जितक्या सहज गेले तितक्या सहज पुढच्या वेळी १२ जायला हवेत.
आरामही महत्वाचा. त्याच अवयवाला ४८ तासाच्या आत पुन्हा व्यायाम देऊ नका. चॅलेंज वगैरे सगळं ठीक आहे पण टेक्निकली यू शुडन्ट ट्रेन अ मसल अगेन अनटिल इट इज गिव्हन इनफ टाइम अँड फ्युएल टू रिकव्हर.

बरंच आहे, पण चुकीच्या गृहितकांवर हा प्रवास सुरू करू नका. फर्गेट वेट. मेजर पर्फॉर्मन्स.
बाकी आरसा, आणि आजूबाजूच्या मंडळींच्या प्रतिक्रिया तुम्हाला प्रगती होते आहे किंवा नाही ते सांगतीलच. ती गणितं बाजूला ठेवा असं सुचवेन.

पिलीयन रायडर's picture

6 Mar 2017 - 10:19 pm | पिलीयन रायडर

हे ४८ तासांचं गणित माहिती नव्हतं. तसं असेल तर मग आलपालटुन व्यायाम केले पाहिजेत.

वजन प्रगती मोजायला सोप्पं परिमाण आहे म्हणुन, बाकी केवळ वजन हे आरोग्य चांगले असण्याचे लक्षण नाही हे मान्य आहेच. तरीही आता तू म्हणतोस तर मग जास्त मनावर घेणार नाही. =))

वेल्लाभट's picture

7 Mar 2017 - 12:19 am | वेल्लाभट

गुड टू गो. लिसन टू व्हॉट युअर बॉडी टॉक्स विथ यू.

मी नुकतेच धावणे चालु केले आहे. C25k नुसार रोज धावणे चालु आहे. तुमच्या प्रमाणे ४८ तास पुन्हा व्यायाम नको. म्हणजे काहिच व्यायाम नाही करायचा?
एक दिवस धावणे आणि एक दिवस चालणे असे केले तर? का फक्त आराम

वेल्लाभट's picture

7 Mar 2017 - 3:40 pm | वेल्लाभट

काहीच नाही म्हणजे त्याच बॉडीपार्ट ला नाही. आणि तोही व्यायाम नाही. उदाहरणार्थ तुम्ही आज पायांचा व्यायाम (धावणे, चालणे नव्हे) केलात आणि उद्या स्ट्रेचिंग केलंत तर हरकत नाही. रनिंग एक वेळ चालेल कारण तो प्रामुख्याने कार्डियो प्रकारातला व्यायाम आहे तरीही ते फास्ट रनिंग नसावं कारण पायांचे स्नायू कालच्या व्यायामातून रिकव्हर झालेले नसतील.

आज पायांचा व्यायाम, उद्या अपर बॉडी, परवा रनिंग, तेरवा पुन्हा अपर बॉडी, नंतर पायांचा व्यायाम हे अशा प्रकारचं शेड्यूल असायला हरकत नाही.

आता जे पर्फॉर्मन्स स्पोर्ट्स मधे आहेत, त्यांना संपूर्ण आरामाचा सल्ला दिला जातो. सामान्यांचं तसं नाही. इतका रिगरस व्यायामच नसल्याने रिगरस आरामाचीही गरज नाही.

असा मी असामी's picture

7 Mar 2017 - 3:42 pm | असा मी असामी

धन्यवाद.

सुबोध खरे's picture

8 Mar 2017 - 10:19 am | सुबोध खरे

पण टेक्निकली यू शुडन्ट ट्रेन अ मसल अगेन अनटिल इट इज गिव्हन इनफ टाइम अँड फ्युएल टू रिकव्हर.
बाडीस

सप्तरंगी's picture

3 Mar 2017 - 7:47 pm | सप्तरंगी

मी गेल्या वर्षभरापासून रोज ट्रेडमीलवर ३०-३२ मिनिटात ४km चालत (खर तर फास्ट वॉक) करत होतेच पण आजपासून तुमच्याबरोबर करेन.
कालपर्यंत ४km च्या वर इच्छा असूनही नाही केला पण आता तुमचे सर्वांचे बघून रोज ५km चालणे -पळणे सुरु करेन. myfitnesspal हे चांगले ऍप आहे पण त्यात माहिती भरत राहणे टाळत आले आहे. पण ते आता परत सुरु करते. माझा कार्ब्स वर कंट्रोल नाहीये खास करून गरम भात अहाहा. ते कमी केलं तरच वजन कमी होण्याची शक्यता वाढेल.
तर आजपासूनच माझे aim आहे: पुढच्या १४ दिवसांसाठी रोज ५km चालणे-पळणे, दिवसभरात १ वाटीच्या वर (शिजलेला) भात न खाणे आणि साखर, डाएट मोजत राहणे.
योगा - प्राणायामशी खूप वर्षांपासून संबंध तुटलाय पण ते करू शकेन कि नाही हे आत्ता सांगणे अवघड आहे. गुगलशीट मध्ये अपडेट करेनच.

नेहमीच्या व्यायामाबरोबर एलिप्टिकलवर दररोज २०० कॅलरीज जाळायचे लक्ष्य ठरवले आहे, बघू कितपत जमतेय
त्या गूगल डॉक्युमेंटवर जेमतेम सात जणांनी आपापले तक्ते बनवलेत, बाकीच्यांनी लवकरात लवकर जमा व्हा अशी नम्र विनंती :)

धागा काढल्याबद्दल पिलियन रायडर ह्यांना धन्यवाद!

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2017 - 7:40 am | पिलीयन रायडर

काल माझं ७ दिवसांचं पहिलं चॅलेंज पुर्ण झालं. आज असं वाटलं की स्वतःला थोडं तरी "चॅलेंज" करायला हवं. किमान आठवड्यातुन एकदा तपासुन पहायला हवं की आपली लायकी वाढली की नाही. म्हणुन आज १० मिनिटं एलिप्टिकल करुन ९० सेकंद चालणे - ९० सेकंद पळणे असं १५-२० मिनिटं केल्यावर कुल डाऊनच्या आधी जास्तीत जास्त किती पळता येतंय ते पाहिलं. ५ मिनिटं सलग पळू शकतेय. फार म्हणजे फार छान वाटलं. पळू शकतेय म्हणुन तर आनंद झालाच पण दरदरुन घाम फुटल्याने की काय खराखुरा व्यायाम केल्याचं फिलींग आलं!!
आज पहिल्यांदा पळण्यातली मजा कळाली. :)

५० फक्त's picture

4 Mar 2017 - 11:36 am | ५० फक्त

आज बायसेप्स केले, २० मि. ट्रेडमिल आणि महत्वाचं म्हणजे पोट दुमडता येतील असे व्यायाम केले.

आषाढ_दर्द_गाणे's picture

4 Mar 2017 - 10:36 pm | आषाढ_दर्द_गाणे

द्या टाळी!
मी आज अगदी हेच करणार आहे!
पण बायसेपसकट ट्रायसेप आणि खांदे सुद्धा
२०० कॅलोरीज चे लक्ष्य असल्याने रोज एलिप्टिकल करतोच आहे

आणि 'पोट दुमडण्याचे व्यायाम' हा वाक्प्रचार कायदेशीररित्या ढापण्यात येणार आहे अशी नम्र सूचना :)

वेल्लाभट's picture

4 Mar 2017 - 12:08 pm | वेल्लाभट

२०+२० जोर.

कंजूस's picture

4 Mar 2017 - 6:48 pm | कंजूस

ट्रेक - व्यायाम
भिवपुरी रेल्वे स्टेशन - पाली भुतवली धरण - सागाची वाडी - भोरीची वाडी - गारबट वाडी - गारबट पॅाइंट( माथेरान) - अमन लॅाज - दस्तुरी ट्रेक. सकाळी अकरा ते पाच.
अकरा किमी, साइट ७००मिटर्स।

वेल्लाभट's picture

6 Mar 2017 - 12:05 pm | वेल्लाभट

१२+१२ जोर

माझीही शॅम्पेन's picture

6 Mar 2017 - 12:20 pm | माझीही शॅम्पेन

माफ करा जरा स्पष्ट लिहितोय ,
सूर्य नमस्कार हा इतर शरीर ताणण्याचा फक्त एक प्रकार आहे आणि आधुनिक व्यायाम प्रकारात त्याला सर्वोच्च स्थान वेगरे काही नाही.
हल्ली काही कारणास्तव (हिंदू संस्कृती , योगा आणि काही) खूप जास्त हाईप झाल्यासारखा वाटतोय ,
केवळ सूर्य नमस्कार करण हे पुरेसे नाही , शरीरातील सर्व स्नायू योग्य ठिकाणी आणि आणि योग्य प्रमाणात ताण येईल असा परिपूर्ण व्यायाम केला तरच फायदा आहे ... प्रत्येक शरीरसाठी / शरीर रचने प्रमाणे आणि तुम्ही ठेवत असल्येला गोल प्रमाणे व्यायाम प्रकार बदलत जातात , त्यामुळे योग्य फिसिओ चा सल्ला घेण कधीही चांगल , आपण सर्रास 300 रुपये X 2 = 600 रु तिकीट काढून चित्रपट पाहु शकतो पण तेच 600 रु देऊन योग्य सल्ला घेऊ हा विचार सुध्दा शिवत नाही

वेल्लाभट's picture

6 Mar 2017 - 12:42 pm | वेल्लाभट

मीही काहीसा याच मताचा आहे. योगासने हा आयसोमेट्रिक प्रकारातला व्यायाम असून त्याच्या परिणामाविषयी शंका नाही. पण तो आणि तोच श्रेष्ठ किंवा, तेवढं केलं की झालं, बाकी काही करायची गरज नाही इत्यादी युक्तिवाद पटणारे नाहीत.
'चूजिंग द ईझी ऑप्शन' चं हे एक उदाहरण आहे. सेम अ‍ॅज, 'चालण्यासारखा उत्तम व्यायाम नाही'.

स्विमिंगने पोट कमी होत नाही, उलट वाढतं, अशा मताचं एक काका मंडळ आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार स्विमिंग भूक वाढवतं आणि मग खाणं वाढल्याने पोट देखील वाढतं. तुमचा तुमच्या खाण्यावर एरवीच ताबा नसेल, तर व्यायामप्रकार कोणताही करा शष्प फरक पडणार नाही हे त्यांना एकदा सांगायचा प्रयत्न केला. मग पुन्हा प्रतिवाद करत बसलो नाही.

वेल्लाभट's picture

6 Mar 2017 - 2:54 pm | वेल्लाभट

बरोबर केलंस मित्रा. शाब्बास. तू लक्ष देऊ नकोस. तू चालू ठेव, मुक्तशैली, फुलपाखरू तडाखा... पण तेवढंच तेवढं नको. इतरही यायामप्रकार कर. वैविध्य ठेव. सातत्य ठेव. काठिण्य ठेव.
फिटणेस तुझ्या पायाशी लोटांगण घालेल!

वेल्लाभट's picture

6 Mar 2017 - 2:56 pm | वेल्लाभट

पण त्यांचं म्हणणं विचार करण्यासारखं आहे रे! तू कधी अंतर्वक्र पोट असलेला मासा बघितलायस? नाही की नाही !? सगळ्या माशांची पोटं फुगीर असतात. काकामंडळ इज राइट बॉस.

तू कधी अंतर्वक्र पोट असलेला मासा बघितलायस?

असाच विचार करायचा असेल तर अजून मी अंडी देणारा बाप्या देखील पाह्यला नाहीय. =))

वेल्लाभट's picture

6 Mar 2017 - 4:00 pm | वेल्लाभट

के

सुबोध खरे's picture

8 Mar 2017 - 10:24 am | सुबोध खरे

माशांची पोटे फुगीर असण्याचे कारण ऐरो डायनॅमिक आकार आहे ज्यामुळे पाण्यात वेगाने पोहताना घर्षण कमीत कमी होऊन वेग वाढेल आणि कमीत कमी ऊर्जा जळेल. जुनीच काय आधुनिक जहाजे आणि पाणबुड्या हि त्याच आकाराच्या असतात.

वेल्लाभट's picture

8 Mar 2017 - 11:59 am | वेल्लाभट

तुम्ही कुठे सिर्यसली माहिती देऊ लागलात!

छे बा. मिपावर जोक्क करायची सोयच नई आजकाल. :)

मोदक's picture

8 Mar 2017 - 3:33 pm | मोदक

=))

अप्पा जोगळेकर's picture

8 Mar 2017 - 1:16 pm | अप्पा जोगळेकर

'चूजिंग द ईझी ऑप्शन' चं हे एक उदाहरण आहे.
म्हणजे तुम्ही योग किंवा सूर्यनमस्कार हे 'इझी' कॅटेगरीत टाकले आहे का ?

पण तो आणि तोच श्रेष्ठ किंवा, तेवढं केलं की झालं, बाकी काही करायची गरज नाही इत्यादी युक्तिवाद पटणारे नाहीत.
बाकी काही करायची गरज नाही, तोच श्रेष्ठ असे काही नाही. पण योग हा एक उच्च दर्जाचा व्यायाम प्रकार आहे.
बाकी आधुनिक व्यायामाच्या नावाखाली बर्याच जिममधे थोतांड शिकवतात. असे योग क्लासेस मधेही असू शकेल. पण त्याची कल्पना नाही.

वेल्लाभट's picture

8 Mar 2017 - 5:17 pm | वेल्लाभट

तुम्हाला फक्त वाद घालायचाय हे कळतंय मला.
तुम्ही तुम्हाला वाटतं ते करा, सूर्यनमस्कार घाला की जिम मधे जा किंवा काहीही नको यापैकी. झालं?

तुम्ही काय व्यायाम केलात ते सांगा बघू आज

अप्पा जोगळेकर's picture

9 Mar 2017 - 10:56 am | अप्पा जोगळेकर

तुम्ही काय व्यायाम केलात ते सांगा बघू आज
जेंव्हा २०० किमीची बीआरएम पूर्ण होईल तेव्हा इथे जाहीर कळवेनच.
मधे अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली तेंव्हा पण इथेच जाहीर कळवले होते.
उगा ५-२५ जोर बैठका मारल्या तर त्याची जाहिरात करु नये असे मला वाटते.
हे माझे मत फक्त माझ्या स्वतःपुरतेच लागू आहे. इतरांनी हवी तितकी जाहिरात करावी. काही आक्षेप नाही.

वेल्लाभट's picture

9 Mar 2017 - 12:05 pm | वेल्लाभट

हे माझे मत फक्त माझ्या स्वतःपुरतेच लागू आहे. इतरांनी हवी तितकी जाहिरात करावी. काही आक्षेप नाही.

हे कबूल केलंत बरं केलंत. नाहीतर उगाच.

आणि तसंही हा धागा जाहिरातीसाठी नाही. त्यामुळे इथं कुणीच जाहिरात करायला, तुलना करायला व्यायामाचे आकडे टाकत नाही. तुम्हाला तसं वाटत असल्यास तुम्ही पत्ता चुकलायत. तुम्हाला फक्त तर्क, अंदाज, किंवा हा व्यायाम उत्तम की तो याचा कीस पाडण्या ऐवजी व्यायामाचे आकडे टाका असं सुचवलं तर लगेच वेगळा वास आला. असो.

आणिक विषयांतर टाळतो. आगोदरच्याही प्रतिसादात लिहिलं, आताही लिहितो; तुम्हाला वाद घालायचाय हे उघड आहे. आणि मला त्यात रस नाही.

पिलीयन रायडर's picture

6 Mar 2017 - 10:25 pm | पिलीयन रायडर

सध्या फिजिओचा सल्ला घेणे तर शक्य नाही. आणि सुर्यनमस्कार हे मलाही सर्वोच्च व्यायामाचा प्रकार वाटत नाहीत. फक्त ते करायला सोपे आहेत. म्हणजे मला बाकी बरीच आसनं येतात पण योगशिक्षक नसतील तर आपलं आपण करताना नक्की क्रम काय असावा, किती वेळ आसन करावे इ मध्ये फार गोंधळायला होतं. सुन त्या मानाने ठरलेला क्रम असल्याने आणि जवळपास सर्व मुख्य अवयवांना ताण देतील अशा आसनांचा समावेश असल्याने केले जातात.
पण अर्थात इतर सर्व प्रकारचे व्यायामप्रकार केले पाहिजेत ह्याच्याशी सहमत. म्हणुन ह्या महिन्यापासुन व्यायाम प्रकाराचे बंधन ठेवलेले नाही. सातत्याने रोज आणि किमान ३० मिनिटे हे ह्या वेळेसचे ध्येय आहे.

वेल्लाभट's picture

7 Mar 2017 - 12:22 am | वेल्लाभट

उत्तम.
घरच्या घरी करत असलात तर एक साधारण विभाजन
स्ट्रेंग्थ ट्रेनिंग - कार्डियो - आराम - स्ट्रेंग्थ ट्रेनिंग - कार्डियो - आराम - कार्डिओ (७ दिवस)
असं असू शकतं. सातवा दिवस ऐच्छिक. जे हवं ते.

पिलीयन रायडर's picture

7 Mar 2017 - 12:37 am | पिलीयन रायडर

स्ट्रेंग्थ ट्रेनिंग मध्ये घरी करण्याजोगे व्यायाम कोणते?

वेल्लाभट's picture

7 Mar 2017 - 1:01 am | वेल्लाभट

लोअर बॉडी
बॉडीवेट स्क्वॉट्स, लंजेस, काफ रेजेस, हाय स्टेप अप्स, वॉल सिट
अपर बॉडी
पुश अप्स, पुश अप ची अनेक व्हेरिएशन्स आहेत त्यापैकी जमतील ती, ट्रायसेप डिप्स, चिन अप्स (बार असल्यास), प्लँक, सिटअप्स, हिप रेजेस, रिव्हर्स प्लँक ब्रिज, गुड मॉर्निंग एक्सरसाइज,

असंख्य आहेत.

पिलीयन रायडर's picture

8 Mar 2017 - 6:52 am | पिलीयन रायडर

आज घरी नवर्‍याच्या मार्गदर्शनखाली पुशअप्स आणि क्रंचेस करण्याचा प्रयत्न केला. आजवर व्यायामाच्या नावाखाली मी विनोद करत होते असं लक्षात आलं. मला काही हे प्रकार जमले नाहीत. सोफ्यावर पाय ठेवुनही पुशअप्सचा प्रयत्न केला पण स्वत:ला उचलणं जमण्या एवढी शक्ती हातात नाहीचे असंही कळालं.

हे जमणार नाही तोवर आपण "फीट" आहोत असं म्हणवणार नाही. म्हणुन बाकी कोणताही व्यायाम केला तरीही रोज १५-२० मिनिटं वर सांगितलेले व्यायाम आलटुन पालटुन करायचे असं ठरवलं आहे.

वेल्लाभट's picture

8 Mar 2017 - 7:58 am | वेल्लाभट

a

पुश अप चं सोपं व्हर्जन

पिलीयन रायडर's picture

8 Mar 2017 - 9:02 am | पिलीयन रायडर

गंमत म्हणजे मी शेवटी वैतागुन गुडघे टेकुनच केले पुश अप्स.. आधी आता इथुन सुरुवात करेन मग.

सिक्स पॅक अ‍ॅब्स शॉर्टकट म्हणून तुनळीवर शोधा. त्याने दाखवलेले बर्पीज वैगरेचे वर्कआऊट चांगले आहेत.

सिक्स पॅक अ‍ॅब्स शॉर्टकट म्हणून माईक चॅंगचे व्हिडिओ* तुनळीवर शोधा. त्याने दाखवलेले बर्पीज वैगरेचे वर्कआऊट चांगले आहेत.

स्थितप्रज्ञ's picture

13 Mar 2017 - 8:12 pm | स्थितप्रज्ञ

आयुर्वेदाचं सुद्धा हेच मत आहे. योगासन/सूर्यनमस्कार हे अन्य व्यायामाला पूरक असे प्रकार आहेत. अर्धशक्ती (म्हणजे बगलेत घाम येपर्यंत) दमणूक करणारा व्यायाम करावा असे आयुर्वेदातही सांगितले आहे (कपाळाला घाम आला कि अति व्यायाम झाला असे समजून तात्काळ थांबावे असेहि सुचवले आहे).

सूर्यनमस्कार हा व्यायामाचा सर्वोच्च प्रकार नाही अशी मते वरती वाचली म्हणून जरा गुगलून बघितले तेव्हा एम्डी डॉक्टरांनी केलेला रीसर्च पेपर सापडला.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3289222/
त्यांच्या रिसर्चनुसार स्नायूंची ताकद, शरीराची एकूण क्षमता आणि सर्वांग्सुंदर फिटनेस देण्याची क्षमता नमस्कारांमध्ये आहे!
कमी जागेत, कोणत्याही साधनाशिवाय आणि कोणत्याही ऋतूत सहज शक्य असल्याने हा व्यायामप्रकार मला आवडतो.
अर्थात भरभर चालणे, पळणे किंवा व्यायामशाळेत वजने आणि इतर व्यायामही आवडतात परंतु नमस्कारा बद्दल लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून हा प्रपंच! :)

सुबोध खरे's picture

8 Mar 2017 - 11:49 am | सुबोध खरे

सूर्यनमस्कार हा व्यायामाचा सर्वोच्च प्रकार आहे का ते मला माहित नाही पण तो सुरुवात करणाऱ्या कोणत्याही (आळशी किंवा बैठ्या) माणसाला संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम आहे हे नक्की. कारण यात केवळ कॅलरी जाळतात असे नव्हे तर शरीर ताणले जाते आणि कोणत्याही स्नायूचा अति वापर न केल्याने व्यायामाच्या सुरुवातीला अंग आंबणे / स्नायू दुखणे हे बरेच कमी असते.
आरंभशूर माणसांचा व्यायाम बंद पडण्याचे हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.
Surya Namaskar burns about 3.79 calories per minute हे ६३ किलो वजनाच्या माणसासाठी आहे म्हणजे १ तास सूर्यनमस्कार केले तर साधारण २५० कॅलरी जाळल्या जातात
पहा :-- http://www.stylecraze.com/articles/calories-does-surya-namaskar-help-to-...
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/22326709.cms
http://thegeniusofyoga.com/yoga-to-burn-calories-surya-namaskar/

अप्पा जोगळेकर's picture

8 Mar 2017 - 1:22 pm | अप्पा जोगळेकर

म्हणजे १ तास सूर्यनमस्कार केले तर साधारण २५० कॅलरी जाळल्या जातात
१ तास सायकल चालवली तर ६००+ कॅलरी जळतील.
पण रोज फक्त सायकल चालवणे ऐवजी फक्त सुर्य्नमस्कार अधिक आरोग्यदायी असावे.
व्यायामाचा दर्जा ठरवताना कॅलरीच्या पलीकडे सुद्धा बरेच पॅरामीटर असावेत.
शिवाय एखाद्या व्यायामाने चयापचय वाढत असेल तर कदाचित नंतर अधिक कॅलरी जळतील.

सुबोध खरे's picture

8 Mar 2017 - 6:17 pm | सुबोध खरे

अप्पासाहेब
तुम्ही नुसत्या उठाबशा काढल्या तरी सूर्यनमस्कारापेक्षा जास्त कॅलरी जळतील. पण व्यायामाचा मूळ फायदा शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवणे हा आहे. केवळ वजन कमी करणे हा नव्हे. या दृष्टीने सूर्यनमस्कार हा सर्वांगाचा व्यायाम आहे. पोहणे हा एक असा संपूर्ण अंगाचा व्यायाम आहे. पण स्त्रियांसाठी तो सहजा सहजी करता न येण्यासारखा आहे. कारण अगोदर शॉवर घ्या पोहल्या नंतर शॉवर घ्या शाम्पू लावा, केस वाळवा यातच जास्त वेळ जातो.
कोणालाही व्यायाम सुरु करा सांगताना सर्वात सोप्या गोष्टी म्हणजे वेगाने चालणे किंवा सूर्यनमस्कार या आहेत.

वेल्लाभट's picture

8 Mar 2017 - 6:25 pm | वेल्लाभट

पण रोज फक्त सायकल चालवणे ऐवजी फक्त सुर्य्नमस्कार अधिक आरोग्यदायी असावे.

हा फक्त शब्द जो आहे ना, तो डोक्यातून काढता आला तर बघा. फक्त... काहीच चांगलं नसतं.

आणि हे चांगलं असेल, याने कॅलरी जास्त जळत (मला हा शब्दप्रयोग अजिबात आवडत नाही पण तुम्ही वापरलायत म्हणून तसाच परत करतो) असतील... या जर तर तर्कांपेक्षा वाचा या विषयावर. एक आपला सस्नेह सल्ला.

अप्पा जोगळेकर's picture

9 Mar 2017 - 10:58 am | अप्पा जोगळेकर

या जर तर तर्कांपेक्षा वाचा या विषयावर
सल्ल्याबद्दल आभार. आम्ही काहीच न वाचताच लिहिले असे वाटल्याबद्दल आभार. थांबतो.

वेल्लाभट's picture

9 Mar 2017 - 12:06 pm | वेल्लाभट

बेटर.

राजकारण, समाजकारण याप्रमाणे व्यायाम हा देखील केसाची पिसं काढण्याचा उत्तम विषय आहे.

जाऊदे त्या 'फक्त' वर - रोज सायकल चालवायला काही हरकत नाही (आठवड्यातून २ दिवस सुट्टी द्या). पण सायकलिंग आधी वॉर्मअप आणि नंतर स्ट्रेचिंग आणि मग हलक्या डंबेल्स ने हात, खांदे, पाठ यांचा थोडा व्यायाम आणि त्यानंतर नंतर १२ सूर्यनमस्कार - अत्यंत वेळ घेऊन (प्रत्येक आसन १०-१५ सेकंद) हे फायदेशीर वाटलेत.
तलाव ५-१० किमी अंतरावर असेल तर सायकल ने तिथे जाऊन तासभर स्विमिंग आणि सायकल ने परत असं पण उपयोगी आहेत.

अर्थात रोज कार्डिओ करत असू तर आठवड्याला २ दिवस विश्रांती घ्यावी (सोमवार - गुरुवार). आणि भरपूर फळे-प्रथिने असा आहार.

असो प्रोजेक्त एन्ड ची काम लागलीयेत, रोज व्यायाम होत नाहीये. काल ४० किमी सायकलिंग, खांदे-ट्रायसेप्स-बायसेप्स-बॅक प्रत्येकी २० चे सेट, ५ नमस्कार आणि थोडी पाय/पाठ स्ट्रेच करणारी योगासनं - उदा पश्चिमोत्तानासन, त्रिकोणासन.

अप्पा जोगळेकर's picture

9 Mar 2017 - 11:47 am | अप्पा जोगळेकर

पाध्ये साहेब,
हे सगळ सामान्य लोकांसाठी चाललय. तुमच्यासारखे ५० * ७ किंवा महिन्याला ५ घाट वाल्या 'पवनपुत्र' कॅटेगरीतल्या लोकांचे पॅरामीटरच वेगळे हो.

आषाढ_दर्द_गाणे's picture

9 Mar 2017 - 3:24 am | आषाढ_दर्द_गाणे

त्यांच्या रिसर्चनुसार स्नायूंची ताकद, शरीराची एकूण क्षमता आणि सर्वांग्सुंदर फिटनेस देण्याची क्षमता नमस्कारांमध्ये आहे!

संशोधन शोधून काढल्याबद्दल आभार!
ह्या संशोधनाचा हेतू उत्तम आहे आणि निष्कर्ष उत्कंठावर्धक आहेत.

पण सरतेशेवटी हा उण्यापुऱ्या ७९ वैद्यकीय विद्यार्थ्यांवर केला गेलेला प्रयोग होता.
त्यामुळे एकंदर लोकसंख्येकरता संशोधनाचे निष्कर्ष कितपत लागू पडतील ह्याचा विचार झाला पाहिजे.

बाकी सूर्यनमस्कार हा एक चांगला आणि सुलभ व्यायाम आहे हे मात्र नक्की

वेल्लाभट's picture

8 Mar 2017 - 12:46 am | वेल्लाभट

१५ + १५ जोर
२० बैठका

प्रसन्न३००१'s picture

9 Mar 2017 - 8:57 am | प्रसन्न३००१

गेले ३ दिवस व्यायामाला अजिबात वेळ मिळाला नाहीये. फिलिंग गिल्टी :(

वेल्लाभट's picture

9 Mar 2017 - 12:08 pm | वेल्लाभट

हरकत नाही. कम बॅक स्ट्राँगर.

फार कमी वेळ असेल तर सर्किट ट्रेनिंगचं लहानसं रूटीन करा. १०-१५ मिनिटात होईल व्यायाम.

चतुरंग's picture

9 Mar 2017 - 7:55 pm | चतुरंग

१२ सूर्यनमस्कार
आज स्ट्रेचिंग + २६ सूर्यनमस्कार

सप्तरंगी's picture

9 Mar 2017 - 8:15 pm | सप्तरंगी

मी पूर्वी कधीच सूर्यनमस्कार केले नाहीत, आत्ता मध्ये ४-५ दिवस केले तर सगळ्या स्नायूंवर अति ताण येऊन ते दुखत होते, मग परत सोडून दिले. असे कित्येक दिवसात योगा किंवा सूर्यनमस्कार घालणाऱ्या सगळ्यांचे होते का? सूर्यनमस्कार घालताना घाम किंवा थकवा येत नाही मग वर सांगितल्याप्रमाणे इतक्या कॅलरीज जास्त कश्या काय जळतात?