सोबत

आगाऊ कार्टा's picture
आगाऊ कार्टा in जनातलं, मनातलं
5 Oct 2008 - 5:59 pm

नाना भटजी हे गावाच्या पंचक्रोशीतले एकमेव भटजी...
तसे भिक्षुकी करणारे आणखी एक दोन जण होते.. पण नाना हे जुनेजाणते आणि स्वभावाने अत्यंत गरीब त्यामुळे त्यांना मागणी फार..
वर्षभर काहीनाकाही धार्मिक कृत्ये चालू असल्यामुळे नानांना अजिबात वेळ नसे. त्यातून गणेशोत्सवात तर बघायलाच नको. सकाळी जे पहाटे ४वाजता बाहेर पडत ते संध्याकाळी दमूनभागून घरी परतत. आता त्यांचा मुलगा मोठा झाला असल्यामुळे तो सुद्धा त्यांना मदत करत असे त्यामुळे नानांचा भार थोडा हलका होई.
अशाच एका गणेशोत्सवात नानांच्या जीवावर बेतलेला हा प्रसंग आहे..
नानांनी आपला गणपती नेहमीप्रमाणे गणपती दीड दिवसाने पोहोचवला होता व गावातले इतर गणपती पोहोचवून नाना अतिशय दमून घरी आले. नाना हातपाय धुवून घरात आले तर शेजारच्या गावातले एक प्रतिष्ठित गृहस्थ बसलेले त्यांना दिसले. नाना आपल्या पत्नीला चहा टाकायला सांगायला आत गेले तेव्हा ती त्यांना म्हणाली की ते गृहस्थ गेल्या दोन तासांपासून नानांची वाट बघत बसून आहेत आणि त्यांचे काही महत्वाचे काम आहे...
नाना बाहेर आले. त्यांनी त्या गृहस्थांना नमस्कार केला. इकडच्या तिकडच्या चौकशा झाल्या, तेव्हढ्यात नानांच्या पत्नीने चहा आणला. चहा घेऊन झाल्यावर नानांनी पानाचे तबक पुढे ओढले व सुपारी कातरता कातरता ते म्हणाले, "आता बोला, काय काम काढलंत गरीबाकडे?". ते गृहस्थ म्हणाले, "आमच्या भावाला गेली ४-५ वर्षे मूल होत नाही आहे, म्हणून आम्ही गेल्यावर्षी गणपतीला नवस बोलला होता की पुढच्या वर्षी जर मूल झाले तर आम्ही भटजींच्या हस्ते तुझी साग्रसंगीत पूजा करू आणि दणक्यात आरती मंत्रपुष्प करु. गणपती आम्हाला पावला आणि गेल्याच महिन्यात आमच्या वहिनीला छानशी मुलगी झाली. म्हणून नवस फेडायाला भाऊ मुंबईहून दोन दिवसांची रजा घेऊन आला आहे. तो उद्या जाणार आहे, म्हणून हा कार्यक्रम आजच करायला हवा. म्हणून तुम्ही काहीही करा पण आत्ता आमच्याकडे चला. नाही म्हणू नका." नानांना काय बोलावे तेच कळेना. आधीच ते दमून आलेले, त्यात दुसर्‍या दिवशी तीन ठिकाणी सहस्त्रावर्तनांचे निमंत्रण. त्यामुळे पहाटे लवकर उठून निघायला हवे. बरे मुलाला तरी इतक्या रात्री कसे पाठवणार?
बरे ते गृहस्थ ऐकायलाच तयार नव्हते. शेवटी नाना त्यांना म्हणाले, "मी आत्ता तुमच्या बरोबर येतो पण रात्री दहा वाजायच्या आत माझी सुटका करा आणि माझी परत येण्याची व्यवस्था करा". ते गृहस्थ म्हणाले, "नाना, तुम्ही अजिबात काळजी करु नका. आम्ही तुमची वेळेवर सुटका करतो आणि बैलगाडी ने तुम्हाला सोडायची व्यवस्था करतो, मग तर झालं?". एव्हढे बोलणे झाल्यावर नानांनी पुन्हा आपली पडशी उचलली आणि पत्नीचा निरोप घेऊन ते निघाले.....
त्या गृहस्थांच्या घरी पोहोचल्यावर नानांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. नेहमीप्रमाणे पूजेची कसलीच तयारी झालेली नव्हती. सर्व तयारी होऊन, हा येतोय तो येतोय, जरा थांबा असे म्हणता म्हंणता पूजा आटोपायला सुमारे पावणेदहा वाजले. दहा वाजता जी आरती सुरु झाली ती पावणेअकरा वाजले तरी थांबायाचे नाव घेईना. इकडे घड्याळाचा काटा जसाजसा पुढे सरकत होता तसे तसे नाना अधिकाधिक अस्वस्थ होत होते. शेवटी ते यजमानांना म्हणाले की मी आता निघतो उशीर फार झाला आहे. यजमान म्हणाले, "थांबा हो.. काय घाई आहे? बैलगाडीवाला आत्ता येईल". शेवटी अकरा वाजून गेल्यावर नानांनी यजमानाचा निरोप घेतला, प्रसाद पिशवीत बांधून घेतला, आपला कंदील उचलला आणि ते एकटेच बाहेर पडले. थोडसं चांदणे पडलं होतं पण पौर्णिमा नसल्याने प्रकाश बेताचाच होता. अंधारतून एकटे जायचे म्हटल्यावर नाही म्हटले तरी नानांच्या मनात थोडी भीती होतीच, पण दुसरा काही मार्गच नव्हता. मनातल्या मनात रामरक्षा म्हणत त्यांनी गावाजवळची घाटी ओलांडली. पुढे दोन रस्ते फुटत होते. एक रस्ता खूपच लांबून जाणारा होता. दुसरा रस्ता त्यामानाने बराच जवळचा होता, पण तो स्मशानाजवळून जाणारा होता.....
शेवटी मनाचा हिय्या करुन नाना दुसर्‍या जवळच्या रस्त्याने निघाले .रस्ता कसला छोटीशी पायवाटच होती ती . आजूबाजूला किर्र जंगल, रातकीडयांचा कर्कश आवाज, मधूनच वार्‍याने होणारी झाडांच्या पानांची सळसळ यामुळे वातावरण अधिकच भितीदायक बनले होते. स्मशान जसजसे जवळ येत चालले तसा नानांच्या पायांचा वेग वाढला. जरावेळाने चालताचालता नानांना आणखी कोणाच्यातरी पावलांचा आवाज ऐकू आला. नाना थांबले आणि त्यांनी नीट कानोसा घेतला तेव्हा खरोखरच आपल्यामगून कोणीतरी येत आहे असे त्यांना जाणवले. नाना तसेच थांबले, थोड्याच वेळात तो माणूस नानांजवळ येऊन पोहोचला. सुमारे सहा फूटांच्या आतबाहेर ऊंची, गोरापान वर्ण, काळेभोर केस,पांढरेशुभ्र धोतर आणि सदरा अशा वेशातला तो माणूस नानांजवळ येऊन पोहोचला आणि जणू जुनी ओळख असल्याप्रमाणे नानांना म्हणाला, "काय नाना, इतक्या रात्री इकडे कुठे"? नानांनी त्याला सर्व सांगितले आणि विचारले, "आपण कोण? आणि इतक्या रात्री आपण कुठे चाललात?". तो म्हणाला, "मी विश्वासराव, मी सुद्धा बाजूच्या गावात एका मित्राकडे आरती मंत्रपुष्पाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. आरती झाल्यावर गप्पा मारता मारता निघायला जरा उशीर झाला ". नाना म्हणाले, "काही का असेना, दोघांनाही सोबत झाली". असे म्हणून दोघेही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत पुढे निघाले. थोड्यावेळाने स्मशानाची हद्द सुरु झाली. जवळच एक जुनं खोपटं होते. तिथे स्मशानात चितेसाठी लागणारी लाकडे ठेवली जात असत. त्या खोपटाजवळ आल्यावर विश्वासराव नानांना म्हणाले, "आपण दोघेही दमलो आहोत. तेव्हा या खोपटात आपण थोड वेळ थांबूया. माझ्याकडे थोडा प्रसाद आहे तो खाऊया आणि मग निघूया". स्मशानात थांबायचे म्हटल्यावर नानांच्या पोटात गोळाच आला, पण ते सुद्धा दमले होते आणि या अशा रात्री विचित्र वेळी त्यांना या माणसाची सोबत मिळाली होती त्यामुळे ते तयार झाले. ते दोघेही खोपटात आले. विश्वासराव म्हणाले, "नाना तुम्ही इथेच थांबा. मी जरा पलीकडच्या ओढ्यावरुन संध्या करुन येतो". नाना म्हणाले,"संध्या?? आणि या वेळी"? विश्वासराव म्हणाले, "हो. माझा तसा नेमच आहे". असे म्हणून ते निघाले सुद्धा. नानांना काही कळेच ना. ते तसेच जीव मुठीत धरुन बसून राहिले. बराच वेळ झाला तरी विश्वासाराव परत यायाची काही चिन्ह दिसेना. आता काय करावे ते नानांना कळेना. नको नको ते विचार त्यांच्या मनात येऊ लागले.
शेवटी काय झाले ते बघायला नाना खोपटच्या बाहेर आले आणि ते ओढ्याकडे जायला निघणार इतक्यात.............
ओढ्याकडून आवाज आला "नाना, माझा प्रसाद दे. माझी जायची वेळ झाली". आणि ओढ्याकडून एक लांबलचक हात नानांच्या दिशेने आला.......
क्षणार्धात सर्व प्रकार नानांच्या ध्यानात आला. त्यांच्या सर्वांगाला भितीने कापरां सुटलं. हातातला कंदील गळून पडला. आणि एकदम झटका बसल्यासारखे नाना जे धावत सुटले ते घरी पोहोचेपर्यंत थांबले नाहीत.

कथा

प्रतिक्रिया

मीनल's picture

5 Oct 2008 - 6:18 pm | मीनल

शिर्षकावरून कळलच नाही म्हणून वाचल.
आय वॉज घाबरीफाईड!

मीनल.

अरे बाप रे !
घाबरून हार्ट ऎटक यायचा ना !
नेहमी सारखे छान लिहिले आहे.

मंदार's picture

5 Oct 2008 - 8:53 pm | मंदार

नाना फारच धीटच होते म्हणायचे.
" नेहमीप्रमाणे पूजेची कसलीच तयारी झालेली नव्हती ", हे वाक्य आवडल.

यशोधरा's picture

5 Oct 2008 - 10:50 pm | यशोधरा

कसलं सॉल्लिड!! घाबरले ना मी!! :D

>>>एक रस्ता खूपच लांबून जाणारा होता. दुसरा रस्ता त्यामानाने बराच जवळचा होता, पण तो स्मशानाजवळून जाणारा होता.....
हे वाचल तेव्हा कळल कि काहीतरी विचित्र होणार आहे :-)
हे खरोखर घडलेल आहे कि निव्वळ कथा?
खरोखर असेल तर नानांचा अनुभव कित पर्यंत खरा हा चर्चेचा मुद्दा होवु शकतो..

आगाऊ कार्टा's picture

6 Oct 2008 - 10:42 am | आगाऊ कार्टा

अहो ही काही घडलेली घटना नाही...
ही आपली माझ्या सुपीक डोक्यातून निघालेली एक छोटीशी कथा आहे..

अजुन पिक येवु द्या तुमच्या सुपिक डोक्यातुन.

रेवती's picture

6 Oct 2008 - 7:23 am | रेवती

असलं कायतरी वाचून आता झोप येणार का? रामरक्षा म्हणावी लागणार आता.
मी सातव्या इयत्तेत असतानाचा प्रसंग वाचल्यावर आपल्याला माझ्या धीटपणाची कल्पना येइल. आज्जीनं सांगितल्यावरून कोठीच्या खोलीतून खोबर्‍याच्या वाट्या आणायला गेले. खोली जरा लहान व काळोखी होती. माझ्याच धक्क्यानं तिथली एक सुपारी खाली पडली आणि शेजारीपाजारी गोळा होईतो आरडाओरडा केला मी.

रेवती

अनिल हटेला's picture

6 Oct 2008 - 7:33 am | अनिल हटेला

सही !!!

(अवांतर- अजुन एक भय कथा लेखक ? झोप उडवणार ही लोक माझी !!!)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

धनंजय's picture

6 Oct 2008 - 7:49 am | धनंजय

निघाला की हो विश्वासराव.

नास्तिइशः's picture

9 Oct 2008 - 3:56 pm | नास्तिइशः

ह्या मात्र खरा हा ! आमच्या कोकणात असे खुप गजाली आसत. आइकूक मजा येता.
कार्ट्या सोडीत रव मि आसय हय गुन्डाळुक.
पण कायय म्हण हा कार्ट्यचा कौतुक करुक होय हा. भारी लिहिता तो.
असोच लिहित रव.

प्रमोद देव's picture

9 Oct 2008 - 4:05 pm | प्रमोद देव

आगाऊ कार्ट्या, अरे मस्तच लिहीतोस तू.
वातावरण निर्मितीही मस्तच जमलेय.
झकास! एकदम झकास !