मराठी; समस्येची पाळंमुळं

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
26 Feb 2017 - 9:43 am

जुना, बराच चर्चिलेला विषय आहे, त्यामुळे संपादकांना वाटल्यास धागा अप्रकाशित करू शकता. मराठीदिनानिमित्त टाकावा वाटलं, म्हणून.


सदर लेख लोकमत वृत्तपत्राच्या हॅलो ठाणे पुरवणीत २५-०२-२०१७ रोजी प्रकाशित झाला असून त्याची विस्तारित आवृत्ती या ब्लॉग पोस्ट मधे देत आहे. प्रकाशनाबद्दल #लोकमत चे आभार.


लोकमत मधील लेख

चेहरा, नाव यानंतर एखाद्या व्यक्तीची ओळख म्हणून जर कुठली तिसरी गोष्ट गणली जाऊ शकत असेल तर ती त्या व्यक्तीची भाषा असते. अनेक जण भाषेला केवळ संवादाचं एक माध्यम इतकंच महत्व देत असले तरी भाषा हा अभिच्यक्तीचा, विचारांचा पाया असतो आणि तो किती सशक्त आहे त्यावर व्यक्तिमत्वाची उंची ठरते. भाषेच्या, विशेषतः मराठी भाषेच्या भाग्यात अधून मधून अस्मिता, स्वाभिमान इत्यादी मानही येतात. येऊ घातलेल्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने त्याची प्रचीती आपल्या सगळ्यांना येईलच.

भाषेत माणसांना जोडण्याचं, आणि तोडण्याचं सामर्थ्य असतं, हे ओळखूनच असेल कदाचित पण इंग्रजीची बीजं इंग्रज भारतात पेरून गेले. मानवजात अनुकरणप्रिय असल्याने आणि त्यातही भारतीयांकडे परकं ते आपलंसं करण्याचं जणु कसबच असल्याने इंग्रजीबद्दलचं अप्रूप वाढीला लागलं. पुढे शिक्षणात, कार्यालयीन संभाषणात इंग्रजीचा वापर प्रतिष्ठेचं प्रतीक बनत गेला, आणि आज इंग्रजीची पाळंमुळं इतकी खोलवर गेलेली आहेत की मराठीला, आणि देशातील अनेक प्रादेशिक भाषांना बांडगुळासारखं जिवंत रहावं लागतंय.

हे एक प्रकारचं सौम्य युद्ध गेली तीन एक दशकं आपल्या देशात चालू आहे. इंग्रजीच्या या ठिणगीचा वणवा होण्यामागे मात्र आपलेच देशबांधव आहेत. विचार गहाण टाकून होत आलेलं गोष्टींचं अनुकरण आपल्या मानसिकतेचं लक्षण आहे. मग ती इंग्रजी भाषा असो, किंवा पाश्चात्य संस्कृतीसारखी व्यापक संकल्पना. भाषेबद्दल बोलायचं झालं, तर आज आपल्यापैकी काही मर्यादित टक्के लोकांना मातृभाषेच्या वापराचं, मातृभाषेतून शिक्षणाचं महत्व पटतंय, किंवा पटायला लागलंय. परंतु इंग्रजीचा वेढाच इतका जबरदस्त आहे की अशा लोकांना प्रत्येक दिशेने येणारा हल्ला परतवणं मोठं कठीण होणार आहे.

आजची पिढी, ज्यापैकी कदाचित पन्नास टक्के मातृभाषेतून शिक्षण घेतलेली असेल, स्वत: बोलताना इंग्रजीमिश्रित मातृभाषा बोलते. सुरुवात इथपासून आहे. त्या पन्नास टक्क्यातील बहुतांश मंडळींचा इंग्रजी 'काळाची गरज' आहे असा ठाम समज झालेला असल्याने ते त्यांच्या मुलांसाठी मातृभाषेतून शिक्षणाचा पर्यायही ठेवू इच्छित नाहीत, तिथे निवडीची शक्यता नाहीच. मराठी शाळांकडे वाहणारा एक प्रवाह जोर धरतोय खरा, पण इंग्रजीच्या लाटेपुढे तो थिटाच आहे. उलट नामांकित मराठी शाळाही माध्यमबदलाच्या तथाकथित संक्रमणातून जाऊ पहात असल्याने, उपलब्ध पर्यायांमधे आणखी घट होते आहे. ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूलच्या विश्वस्तांनी गेल्या वर्षी मराठी माध्यमाचं समर्थन करणा-या पालकांच्या मतांनाही कसपटासमान लेखून अनेक आशांना सुरुंग लावला. हा सुरुंग नक्की कुणाचं नुकसान करेल ते काळ ठरवेलच. पण एकंदर शिक्षकांचा दर्जा, शासनाचा निरुत्साह, पालकांची अनास्था अशा तिहेरी कर्करोगाने राज्यातल्या अनेक मराठी शाळांची अवस्था कठीण केलेली आहे. ही परिस्थिती शहरात असली तरी खेड्यापाड्यात चित्र आश्वासक आहे हे नमूद करायला हवं. अनेक जिल्हापरिषदांच्या शाळांना आज आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मिळत आहे, त्यांची दखल घेतली जात आहे हे विशेष आहे. शिक्रापूरजवळच्या वाबळेवाडी, करडेलवाडी या शाळांची उदाहरणं यानिमित्ताने देता येतील.

शाळांची किंवा इतर समाजातल्या मतांची जरी ही वस्तुस्थिती असली तरी त्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याकडे लक्ष दिलं तर असं लक्षात येईल की मातृभाषेतून आपल्या मुलांना शिकवू पाहणा-या पालकाची कशी प्रत्येक दिशेने कोंडी झालेली आहे. या कोंडीची सुरुवात घराघरातून होते आहे. लहान मुलगा बोलू लागला, की त्याला गुड मॉर्निंग, हाय, बाय, शेक हँड, फ्लाइंग किस, गुड बॉय, 'ब्रश' करणे, बेड, चेअर, इत्यादी असंख्य इंग्रजी संज्ञा (जरी त्या आज सर्रास वापरल्या जात असल्या तरी) शिकवल्या जातात. असं होताना, घरात, बाहेर वावरताना, पदोपदी हे रोखायचं म्हटलं तरी कठीण होतं. पुढे पुस्तकं, मोबाईल इत्यादी माध्यमांतून गाणी, गोष्टी यांची ओळख व्हायला लागते. दुकानात गेलं तर दाखवली जाणारी ८०% पुस्तकं इंग्रजी असतात. त्यात अ अननसाचा नसून ए फॉर अ‍ॅपल असतं आणि मुलांना ते शिकवलं जाऊ लागतं. कारण असा ठाम मतप्रवाह असतो की पुढे मुलाला इंग्लिशच बोलायचं आहे. यूट्यूब वर मुलांची गाणी शोधली असता सगळीच इंग्रजी गाणी दिसतात, आणि तीच मुलांना दाखवली जाऊ लागतात. वाढदिवस, माफ करा, बर्थडे इत्यादी सेलिब्रेट होत असताना अनेक खेळणी आणली जातात किंवा भेट म्हणून दिली जातात. त्या खेळण्यांतही जिथे जिथे म्हणून अंक, अक्षरं असतील तिथे तिथे ती इंग्रजीच असतात. पण ही गोष्ट जाणवणारे लोक शोधूनही सापडत नाहीत. मराठीवरचा हा पहिला आणि मोठा हल्ला अनेकांच्या लक्षातही येत नाही.

मुलाला आजकाल बालवाडीत टाकत नाहीत, तर प्ले-ग्रूप मधे टाकतात. शहरांमधलं हे चित्र आहे. मुंबईसारखी शहरं एव्हाना मराठीबहुल शहरं उरली नसल्याने या प्ले-ग्रूप मधे सर्वभाषिक मुलं-मुली असतात आणि मग देशभर राष्ट्रभाषेचा खोटा मुखवटा घालून पसरलेल्या हिंदी भाषेत या प्ले-ग्रूप मधल्या शिक्षिका (?) मुलामुलींशी बोलतात. अगदीच उच्चभ्रू प्ले-ग्रूप असेल तर इंग्रजीत संवाद होतो. ते इंग्रजीही धड नसतं हे वेगळं सांगावं लागेल. पालक अर्थातच 'व्हॉट डिड यू प्ले टुडे?' विचारत या हल्ल्यापुढेही स्वेच्छेने समर्पण करतात. त्या बालवाड्या ओस पडतात जिथे फक्त खेळ न शिकवता, घरी आल्यावर पाय धुणे, इथपासून आईला, बाबांना मदत करणे इथपर्यंत गोष्टी शिकवल्या जायच्या, मुलांच्या आचारांचा, विचारांचा पाया जिथे भरला जायचा.

शाळाप्रवेशाची वेळ जवळ आली की आजूबाजूला बहुतेक घरची मुलं इंग्रजी माध्यमात असल्याने सहाजिकच मराठी माध्यमाच्या विरुद्ध अनेक सल्ले मिळू लागतात. पुढे माध्यम निवडीपर्यंत हे असंच चालू राहतं. त्यानंतर इंग्रजी माध्यमाचे दुष्परिणाम जरी जाणवले तरी ते कबूल करण्याइतकं मोठं मन नसतं आणि सहन करण्यावाचून इलाज नसतो. हे लिहिण्यामागचा उद्देश की, मराठीच्या अस्तित्वाची जी समस्या आहे ती फक्त शाळा कॉलेज पुरती मर्यादित नसून तिची पाळंमुळं पार खोलवर गेलेली आहेत याची उदाहरणं देणं.

एकूण बघायला गेलं तर मुळात मराठीबद्दल आस्था वाटणारे, तिचा आग्रह धरणारे कमी उरलेत. बरं तिचा आग्रह म्हणजे इंग्रजीद्वेष नव्हे हे समजणारे त्याहून कमी. आणि आग्रह धरलाच जरी मराठीचा, तरी लहान मुलांच्या खेळण्यांपासून ते मोठ्यांच्या कामकाजापर्यंत असणारे मराठीचे पर्यायच इतके कमी झालेले आहेत की अनेकदा इच्छा असूनही मराठीचा वापर न करता आल्याची कित्येक उदाहरणं आहेत.

इंग्रजीला काळाची गरज म्हणून कुणी नाकारूच शकत नाही, परंतु इंग्रजीचा शिक्षणाचं माध्यम म्हणून अट्टाहास करणं मुलांच्या बौद्धिइक, मानसिक विकासाला मारक आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे, त्यावर अभ्यास झालेला आहे. युनेस्कोचे दाखले, किंवा जगभर केलेलं संशोधन असूनही आजचा पालक काहीतरी क्षुल्लक कारणं सांगत आपली फसवणूक आणि मुलांचं नुकसान करताना दिसतो. मानव अनुकरणप्रिय असला तरी मानवाला 'विचार' नावाचं कौशल्य दिलेलं आहे, परंतु या बाबतीत माणसं विचाराविनाच निर्णय घेताना दिसतात. धनाढ्यांपासून ते घरोघर कामं करून इंग्रजी शाळेची फी भरणा-या बाईंपर्यंत कुणीही 'इंग्रजी माध्यम का? आपण करतोय ते योग्य आहे का?' असे कुठलेही प्रश्न स्वतःला विचारत नाही, की त्यांची उत्तरं (मतं नव्हे) शोधायचा प्रयत्न करत नाही. मुळात योग्य ते करावं यापेक्षा सगळे करतात ते करावं या तत्वाने आज अधिकाधिक लोक चालतात आणि तिथेच मराठीसाठीच्या समस्येची सुरुवात होते.

मराठी सिनेमाचा होत चाललेला कायापालट, ट्विटर, फेसबुक वरील मराठी समूह हे सगळं जरी वरवर आश्वासक वाटत असलं, तरी मराठीचं शाश्वत संवर्धन व्हायला हवं असेल तर शिक्षणातून मराठी हद्दपार होऊन चालणार नाही. हा राजकीय किंवा तत्सम मुद्दा नसून जगातल्या सर्व इंग्रज्येतर भाषिक देशांमधे मातृभाषेतूनच शिक्षणाला पसंती दिली जाते. जपान, जर्मनी, फ्रान्स आणि असे असंख्य देश आहेत की भविष्यात जिथे मुलांनी काम करावं असं भारतातल्या पालकांना वाटतं, जे देश त्यांच्या त्यांच्या प्रादेशिक भाषांनाच महत्व देतात. पुढे आपली मंडळी त्या भाषा 'फॉरेन लँग्वेज' म्हणून शिकून तिथे काम करायला जाताना दिसतात. पण हे सगळं मराठी माणसांच्या डोक्यात शिरत नाही हे मराठीचं दुर्दैव आहे. आणि पर्यायाने देशातील प्रत्येक प्रादेशिक भाषिकाचं दुर्दैव आहे. शासनाकडून अपेक्षा करण्यासारखा मूर्खपणा दुसरा नसेल कारण त्यांच्याकडून जर काही व्हायचं असतं तर आजवरच्या पन्नास वर्षात झालं असतं. मराठीसाठी प्रामाणिकपणे कुणीच उभं राहताना दिसत नाही. तेंव्हा व्यक्तिगत प्रसार, प्रबोधन, मनपरिवर्तन हेच उपाय दिसतात.

आता मराठी भाषा दिनानिमित्त मराठी प्रेम उफाळून येईल. मोबाईलवर, फेसबुकवर मराठी संदेश फिरतील. 'बोलतो मराठी...' इत्यादी स्टेटस मेसेज ठेवले जातील. पण या सगळ्या शुभेच्छा, प्रेरणा संदेश फक्त पाठवून सोडून न देता भेटणा-या प्रत्येक व्यक्तीशी मातृभाषा शिक्षण, मराठीचा आग्रहाने वापर, हे विषय बोलायला हवेत. आपल्याबरोबर अनेक आहेत हा विश्वास वाटल्यास मराठी की इंग्रजी अशा दोलायमान अवस्थेत असलेले अनेक पालक संघटित व्हायला तयार होतील. पालकांनी मिळून उद्या बालवाड्या सुरू केल्या, छोटे मोठे गट बनवून मुलांना समवयीन, समभाषिक मुलांमधे मिसळायची संधी दिली तर ते चित्र फार आनंद देणारं असेल. तेंव्हा मराठी भाषा दिन साजरा करायला हवाच, पण मराठी भाषा 'दीन' होते आहे आणि ही वस्तुस्थिती बदलायची वेळ हातातून निसटत आहे, याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. मराठी भाषेवर होणारा हा अविरत हल्ला मोडायला मोठी खेळी खेळायची गरज आहे. तेंव्हा या विषयावर प्रत्येकाने वाचावं, विचार करावा व मग आपली, आपल्या मुलांच्या शिक्षणाची दिशा ठरवावी.

समाजविचारमत

प्रतिक्रिया

शिवम काटे's picture

26 Feb 2017 - 6:40 pm | शिवम काटे

खरच सुंदर लेख आहे, याचा विचार सर्वांनी करायला हवा आणि मराठी भाषा संवर्धनासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करायला हवा. मला अभिमान आहे कि माझे प्रार्थमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे.

पल्लवी०८'s picture

27 Feb 2017 - 12:29 pm | पल्लवी०८

दिवसेंदिवस मराठी शाळांची कमी होत चाललेली संख्या, स्थानिक पातळीवर व्यवहारी भाषेचा वाढलेला वापर, मराठी भाषेकडे दुय्यम नजरेने पाहाणारे अशा त्रुटी जाणवू लागल्या, तरी मराठी प्रेमींना भाषेविषयी वाटणारा अभिमान दैनंदिन जीवनातूनही जपता येईल. मराठी भाषा लोप पावेल अशी भिती न बाळगता, आपण हसत खेळत तीला घरातील नव्या पिढीमध्ये रुजवू शकतो. यासाठी, मराठी बालासाहित्यातील छोट्या कथा, बडबड गाणी त्यांचे मनोरंजन करतील व त्यांनाही लहानवयात वाचनाची गोडी लागेल. आज इंग्रजी माध्यमांत शिकणा-या मुलांची संख्या अधिक असून, बालवाडीपासूनच त्यांच्यासाठी इंग्रजी भाषा प्रथमस्थानी येऊन, मराठी फक्त घरात बोलण्यापुरती वापरली जाते, हे कुठेतरी थांबायला पाहिजे.