साहित्यातील survival of the fittest म्हणजे काय ?

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in काथ्याकूट
25 Feb 2017 - 8:52 pm
गाभा: 

श्री. माहितगार यांच्या लेखकास/लेखनास वाचवावे की नाही या लेखावर एक मजेदार संकल्पना आढळली ती म्हणजे "survival of the fittest'' मला साहित्यातील फिटेस्ट याचा अर्थ न कळल्यामुळे किंवा जरा गोंधळून गेल्यामुळे हा विषय चर्चेला घेतला आहे.
survival of the fittest म्हणजे -
-आर्थिक दृष्ट्या
- वाचकांच्या संख्येचा विचार करता
- का लिखाणातील सातत्याचा विचार करता.
- का लोकप्रियतेचा विचार करता
- का सरकार मान्यता मिळाली म्हणून..
- जर एखादा लेखक लिहून मोकळा होत असेल तर ?
- जर एखाद्या लेखकाला एकच वाचक मिळाला तर तो फिट नाही असे म्हणता येते का ?
- समजा एखादा लेखकावर समजा फक्त टीकाच होत असेल तर तो अनफिट होतो का ?
- याअच्यात काळाच्या महिमेचा विचार करावा लागेल काय ?
- किंवा इतरही मुद्दे - आपल्याला सुचतील ते.

यात वेबवरचे लेखक आणि छापलेल्या पुस्तकांचे लेखक या दोन्हींचा विचार अभिप्रेत आहे.
मी लिहित असलेली मोबियस ही कादंबरी बहुतेकांना आवडलेली नाही याची कल्पना आहे. म्हणून हा धागा काढला आहे असा कृपया गैरसमज करुन घेऊ नये. व त्या दृष्टीने विचारही करु नये ही विनंती.

मला खरोखरीच हा प्रश्न पडलाय की जंगलात survival of the fittest हे ठीक आहे, तेथे जिवन मरणाचा प्रश्न असतो. शिवाय शारिरिक क्षमतेविषयी ही संकल्पना ठीक वाटते. पण साहित्यविश्र्वात एखादा जगायला लायक ( survival of the fittest) आहे हे कसे ठरवायचे ?

साधक बाधक चर्चा अपेक्षित आहे. यात साहित्याचा, लेखनाचा, लेखकाचा विचार आपण कराल अशी अपेक्षा आहे.
जयंत कुलकर्णी.

प्रतिक्रिया

वाल्मिकी's picture

25 Feb 2017 - 10:16 pm | वाल्मिकी

कंपू बाजी

संदीप डांगे's picture

26 Feb 2017 - 12:03 am | संदीप डांगे

जयंत काका,
जालावर जे 'साहित्य' येते त्यातले उत्तम ते रसिकांच्या, चाहत्यांच्या जोरावर तरते अशी त्यामागे माझी विचारसंकल्पना होती... त्यास मुद्दामहून मार्केटींग, डिफेन्स करायची गरज पडत नाही असे मला वैयक्तिक वाटते. आपण जो अर्थ घेत आहात (लेखकाच्या दॄष्टीने) तो माझ्या मनात नव्हता.

तरी तुम्ही मांडलेल्या काथ्याकूटाच्या अनुषंगाने विचार करुन बघतो. कदाचित तिथे लिहितांना मी इतका खोलवर विचार केला नव्हता, संकुचित होता असेही म्हणता येईल.

जयंत कुलकर्णी's picture

26 Feb 2017 - 12:16 am | जयंत कुलकर्णी

//जालावर जे 'साहित्य' येते त्यातले उत्तम ते रसिकांच्या, चाहत्यांच्या जोरावर तरते अशी त्यामागे माझी विचारसंकल्पना होती.////
"तरते" ही संकल्पनाच मला मान्य नाही. तरते म्हणजे काय ? यात किती काळ हा प्रश्न महत्वाचा आहे. श्री. ह. ना आपट्यांची पुस्तके आता कोणी वाचेल का ? म्हणून मी "काळाचा महिमा" हा एक मुद्दा अंतर्भूत केला होता.

//आपण जो अर्थ घेत आहात (लेखकाच्या दॄष्टीने) तो माझ्या मनात नव्हता...////
मला नुसता लेखक एवढेच अभिप्रेत नाही. एकंदरीत साहित्यविश्र्वात काय होत असावे याचा आढावा घेतला जावा..

//तरी तुम्ही मांडलेल्या काथ्याकूटाच्या अनुषंगाने विचार करुन बघतो. कदाचित तिथे लिहितांना मी इतका खोलवर विचार केला नव्हता, संकुचित होता असेही म्हणता येईल. ////
जरुर विचार करा. . मला वाटते survival of fittest असे साहित्यात काही नसावे... अर्थात हा माझा विचार झाला. चुकिचा असेल....

संजय क्षीरसागर's picture

26 Feb 2017 - 1:19 pm | संजय क्षीरसागर

साहित्यविश्र्वात एखादा जगायला लायक ( survival of the fittest) आहे हे कसे ठरवायचे ?

साहित्य तगेल का नाही हा मूळ प्रश्न आहे, साहित्यिकाच्या सर्वायवलचा प्रश्न नाही, आणि असला तरी तो साहित्य तरण्यावरच अवलंबून आहे.

साहित्य तरायला एकमेव क्रायटेरिया वाचक त्याच्याशी रिलेट होऊ शकणं आहे. आणि मग बाकीच्या गोष्टी आपोआप जुळून येतात

-आर्थिक दृष्ट्या : साहित्य तरलं तरच आर्थिक संभावना निर्माण होणार.
- वाचकांच्या संख्येचा विचार करता : प्रसिद्धी वाढेल तशी वाचक संख्या वाढणार.
- का लिखाणातील सातत्याचा विचार करता : हे लेखकाच्या अनुभवविश्वावर अवलंबूने.
- का लोकप्रियतेचा विचार करता : मूळात लेखकाला स्वतःचं साहित्य आवडायला हवं !
- का सरकार मान्यता मिळाली म्हणून.. : छे, असले लेखक फारच तद्दन असतील.
- जर एखादा लेखक लिहून मोकळा होत असेल तर ? : ज्याला वाचक नाहीत त्या लेखनाचा काय उपयोग ? लेखन हे अनुभवाचं शेअरींग नाही काय ?
- जर एखाद्या लेखकाला एकच वाचक मिळाला तर तो फिट नाही असे म्हणता येते का ? : ते `लेखन' फीट नाही. उदा. मोबियस.
- समजा एखादा लेखकावर समजा फक्त टीकाच होत असेल तर तो अनफिट होतो का ? : ते लेखकाचा स्वतःच्या लेखनावर किती विश्वास आहे त्यावर अवलंबून आहे. ओशो म्हणाले होते `माझं साहित्य काळाच्या किमान ५० वर्ष पुढे आहे !'
- याच्यात काळाच्या महिमेचा विचार करावा लागेल काय ? मूळात सांप्रत काळात ते तरायला हवं.
- किंवा इतरही मुद्दे - आपल्याला सुचतील ते. उत्तम साहित्य निर्मितीसाठी फक्त दोनच गोष्टी लागतात. एक, अनुभवाची उत्कटता आणि दोन, तो मांडण्याची शैली

जयंत कुलकर्णी's picture

26 Feb 2017 - 7:15 pm | जयंत कुलकर्णी

:-)
//जर एखाद्या लेखकाला एकच वाचक मिळाला तर तो फिट नाही असे म्हणता येते का ? : ते `लेखन' फीट नाही. उदा. मोबियस/////

पण एखाद्याला ते समजण्याची कुवत नसेल तर ? पण मी यावर चर्चा करणे इष्ट नाही आणि तुमच्याशी चर्चा करण्याची माझी पात्रताही नाही. असो.
पण मी विनंती करुनही तुम्ही करायचा तो ...... केलात त्याबद्दल धन्यवाद !

ता.क. तुमच्या माहितीकरता येथे आणि इतरत्र ही कादंबरी जगात अगणित (म्हणजे खरंच अगणित) लोकांना आवडली आहे.
माझ्याकडून पूर्णविराम.

संजय क्षीरसागर's picture

26 Feb 2017 - 7:21 pm | संजय क्षीरसागर

`लेखनाला' वाचक मिळाला नाही तरी `लेखक' अनफीट नाही असं म्हटलंय . यात पर्सनल काही नाही.

साहित्य क्षेत्रात असे काही नसावे. हा, मिपावर नक्कीच हा नियम लागू आहे. :)

संजय क्षीरसागर's picture

26 Feb 2017 - 7:40 pm | संजय क्षीरसागर

साधारण हेच नियम लागू होतात. संकेतस्थळावरचं लेखन इंटर अ‍ॅक्टीव असतं हा प्रिंट मेडियापेक्षा वेगळा आणि ठळक फरक आहे.

अभ्या..'s picture

26 Feb 2017 - 7:52 pm | अभ्या..

नमस्कार जयंतकाका,
माझ्या मते लेखन म्हणजे काय? तर जे दुसर्‍या कुणाला वाचावेसे वाटते ते. मग हा सेट कीतीही अन कसाही असेल.
ह्या सेटमधल्या वाचकांच्या भावना कशाही असू देत. वाचले जाते ते लेखन. पत्र असो की कथा, अनुभव असो की अहवाल, प्रत्येक टाईपच्या लेखणाला वाचकवर्ग असतोच. तो त्यातून काय घेतो हा त्याचा प्रश्न.
अ‍ॅक्चुअल जीवसृष्टीतल्या फिट जीवाला वेगळे काही पोषण मिळालेले नसते. सर्वांसारखेच पोषण त्याचे होते. मग त्यात अधिक फिट, अनफिट अशा संकल्पना कधी तयार होतात? की जेम्व्हा पोषणातून मिळालेल्या ताकदीचा वापर तो सराईव्ह होण्यासाठी करतो. इतरांपेक्षा अधिक सक्षमतेने करतो, अधिक क्रियेटिव्हली करतो.
मग लेखकाला अन लेखनाला तोच रुल लागेल बहुधा.

संजय क्षीरसागर's picture

26 Feb 2017 - 8:02 pm | संजय क्षीरसागर

जेव्हा पोषणातून मिळालेल्या ताकदीचा वापर तो सराईव्ह होण्यासाठी करतो. इतरांपेक्षा अधिक सक्षमतेने करतो, अधिक क्रियेटिव्हली करतो.

लेखनाच्याबाबतीत `आलेल्या अनुभवांचा' वापर तो `अभिव्यक्तीच्या उर्मीसाठी' इतरांपेक्षा किती सक्षमतेनं आणि अधिक क्रियेटिव्हली करतो यावर `लेखन' तगेल की नाही हे ठरतं.

जयंत कुलकर्णी's picture

26 Feb 2017 - 8:42 pm | जयंत कुलकर्णी

नमस्कार !
या येथेच आपल्यात मतभेद आहेत. माझ्या मते लेखन म्हणजे आपल्या भावभावना कागदावर उतरवणे हेच. कित्येक लेखक असे आहेत जे त्यांच्या मृत्युनंतर प्रसिद्धीस पावले. तर "उथळ पाण्याला खळखळाट फार" असे लेखक केव्हा साहित्याच्या पटलावरुन नाहिसे होतात ते कळतही नाही. लेखनाचा उद्देश हे कोणीतरी वाचावे हाच असेल असे वाटत नाही. उदा. तुम्ही जेव्हा एखादे चित्र रेखाटता तेव्हा ते कोणीतरी पहावे असाच हेतू असतो का ? एखाद्या संध्याकाळी तुम्ही तुमच्या भावनांना स्केच बूकवर मोकळे करत नाही का ? उघडून बघा. अशी अनेक स्केचेस तुम्हाला आढळतील... :-)

तसेच लिखाणाचे असावे..

संदीप डांगे's picture

26 Feb 2017 - 8:46 pm | संदीप डांगे

कित्येक लेखक असे आहेत जे त्यांच्या मृत्युनंतर प्रसिद्धीस पावले. तर "उथळ पाण्याला खळखळाट फार" असे लेखक केव्हा साहित्याच्या पटलावरुन नाहिसे होतात ते कळतही नाही.

माझ्या म्हणण्यात हाच अर्थ होता काका!

जयंत कुलकर्णी's picture

26 Feb 2017 - 8:57 pm | जयंत कुलकर्णी

डांगेसाहेब,
पहिल्या प्रकारात फिटेस्टचा प्रश्र्न उदभवत नाही तर दुसर्‍या प्रकारात ते तगले असे म्हणायला लागेल...म्हणजे साहित्य लेखकाने लेखन कागदावर उतरविले की ते वाचले गेले काय नि वाचले न गेले काय फरक पडतो ? हे जर खरे असेल तर फिटेस्टला काय अर्थ उरतो ?
:-)

संदीप डांगे's picture

26 Feb 2017 - 9:15 pm | संदीप डांगे

मी प्रकाशित साहित्याबद्दल बोलत आहे. मूळ मुद्दा लिहिलं ते वाचलं की नाही हा नसून प्रसिद्ध झालं ते वाचलं आणि आवडलं की नाही हा आहे. आता ह्यात दर्जाचा संबंध नाहीच. दर्जा हा सब्जेक्टिव विषय आहे.

इथे थोडं अजून स्पेसिफिक लिहायचं तर... प्रत्येक ठिकाणाचे आपले एक वलय असते, स्वभाव असतो, त्या स्वभावाशी जुळणारे एकत्र येतात.. त्यात त्यांच्या स्वभावाशी आवडीनिवडीशी रिलेट होईल अशाच कलाकृती सादर झाल्यात तर उचलून धरल्या जातात...

एक उदाहरण म्हणजे, सवाई गंधर्व मध्ये द्वयर्थी लोकगीतांचा कार्यक्रम तगणार नाही, व जिथे हा द्वयर्थी कार्यक्रम होतो तिथे शास्त्रिय संगीत तगणार नाही... 'फिट' चा अर्थ असाच आहे ना?

फिट म्हणजे सशक्त, सबळ, सर्वोत्तम असा नसतो. सर्वावयल ऑफ द फिटेस्ट चा मूळ अर्थ हा बळी तो कान पिळी हा नसून जो प्राप्त परिस्थितीला जुळवून घेतो तो तगतो असा आहे. फिटेस्ट म्हणजे जुळवून घेण्यात सर्वोत्तम.

काही कलाकृती बर्‍याच काळाने हिट होतात कारण त्यांना जुळवून घेईल असा काळ तेव्हा येतो, तर काही लगेच मृत होतात कारण तशी परिस्थिती राहत नाही. परिस्थिती म्हणजे कलाकॄतीच्या समकक्ष आवड असणारे रसिक....

तुम्ही वर एक प्रश्न विचारलाय की लेखकाला एक वाचक मिळाला तर काय म्हणता येईल..? मला असं वाटतं की लिहिणार्‍याला रसिक किती मिळतात त्यावर लिहिणार्‍यास फरक पडू नये. एक जर समकक्ष रसिक मिळाला तरी पुरे... माझ्या एका पेन्टींग ला थेट मुकेश अंबानीनेच दहा करोडला विकत घेतले तर मला इतर लोक काय म्हणतात याच्याशी काय घेणेदेणे..? किंवा एखाद्या मध्यमवर्गीय माणसाने हजार ररुपयाला घेतले तरी मला इतरांशी काय घेणेदेणे?

मोबियस कदाचित चारच लोक वाचणार, आणि राजू पवारची कविता लाखो कॉलेजियन फॉरवर्ड करणार... यात तुलना कशी करणार हाच प्रश्न आहे ना? त्यावर थोड्यावेळाने टंकतो...

जयंत कुलकर्णी's picture

26 Feb 2017 - 9:28 pm | जयंत कुलकर्णी

मोबियस सोडा राव.... :-)

संदीप डांगे's picture

26 Feb 2017 - 9:35 pm | संदीप डांगे

सॉरी सॉरी... तुम्हाला जे अभिप्रेतही नाही तेच परत परत होतंय... मनापासून सॉरी!

संपादक महोदय, कृपया माझ्या प्रतिसादात मोबियसचा उल्लेख काढून टाकावा अशी विनंती करतो.... तसेही त्याबद्दल नंतरच लिहायचे आहे..

संजय क्षीरसागर's picture

26 Feb 2017 - 8:51 pm | संजय क्षीरसागर

लेखनाचा उद्देश हे कोणीतरी वाचावे हाच असेल असे वाटत नाही.

मग त्याला `डायरी' म्हणतात .

चॅट्सवूड's picture

27 Feb 2017 - 7:40 pm | चॅट्सवूड

खूप छान प्रश्न! त्यासाठी अभिनंदन!

माझ्या मते लेखकाने लिहीत राहावे, 'बलिष्ठ अतिजीविता' (survival of the fittest) विचार न करता! लेखन ही स्पर्धा नाही, तो एक अनुभव आहे, जो लेखकाला आणि वाचकाला समृद्ध करत असतो आणि अनुभवांना मोजता येत नाही, त्यामुळे स्पर्धा होणे शक्य नाही.

तुमचं लेखन लोंकाना किती समृद्ध करतंय हे बघणं आवश्यक आहे, पण बऱ्याच वेळा, तुमच्या लेखनामुळे झालेले बदल तुमच्या पर्यंत पोहचतीलच असे मात्र नाही, कदाचित बदल शेवटपर्यंत कळणार नाहीत, पण यामुळे वाचकाच्या प्रतिक्रियेचे महत्त्व कमी होत नाही!

कधीतरी, ती प्रतिक्रिया लेखकाच्या मनासारखी असणार नाही, पण त्यामुळे समृद्ध होण्याच्या प्रक्रियेला वाव मिळू शकतो.

कोणतंही साहित्य आयुष्मंत व्हायला हजारो प्रकारचे निकष कारणीभूत ठरतात. त्यामुळे साहित्यासारख्या अशारीर संकल्पनेला 'बलिष्ठ अतिजीविता' हा शारीर निकष लागू पडत नसावा असे मला वाटते.

या विषयावर उत्तम चर्चा वाचायला मिळेल अशी अपेक्षा !

अभिदेश's picture

28 Feb 2017 - 1:40 am | अभिदेश

लेखक केवळ आपल्या भावभावना कागदावर उतरवन्यासाठीच लिहितो असे नाही. त्यामागे एक प्रकारची अमरत्वाची देखील भावना अथवा सुप्त इच्छा असते. आपले लेखन लोकप्रिय व्हावे , लोकांच्या पसंतीस उतरावे ह्यामागे हीच भावना असावी.

वरुण मोहिते's picture

28 Feb 2017 - 8:56 am | वरुण मोहिते

आणि काळ ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत .अनेक लेखक काळ तसा होता म्हणून प्रसिद्ध झाले आणि अनेक लेखक केवळ चांगलं लिहून प्रसिद्ध झाले .जे आजपर्यंत वाचलं जातं.
उदाहरण म्हणजे आताची पिढी ८-१० वर्षाची किंवा त्याहून जास्त ती लोकं पु ल देशपांडे वाचत नाहीत . कारण रिलेटच होता येत नाहीत्या काळाशी . ऐकून माहिती असत पण वाचायला बोर होत त्यांना
उदाहरण दुसरं शाम मनोहर म्हणून एक लेखक आहेत त्यांची पुस्तकं ५० वर्षानेपण वाचली जातील . क्लिष्ट लिहितात पण संदर्भ लागू होतो जगण्यातला .
अशी इंग्लिश मध्ये तर खोऱ्याने उदाहरण आहेत .
सकस लिहिलेलं केव्हाही टिकतं

विचार करायला लावणारा धागा आणि प्रतिसाद. धन्यवाद काका.

साहित्यातील "सर्वायवल ऑफ फिटेस्ट" शोधणे म्हणजे थोडेसे सरसकटीकरण होईल कारण साहित्याला अनेक आयाम असतात. आपण साहित्य आणि जीवसृष्टी अशी तुलना केली तर जीवसॄष्टीतील प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रकाराप्रमाणेच साहित्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते आपल्या जातकुळीसोबत आपल्यासारख्याच बाह्य जाती/प्रजातींसोबतही अस्तित्वाचा लढा देत असतात.

विनोद, काव्य, कथा, इतिहास, सत्यकथा असे साहित्याला अनेक आयाम आहेत यामुळे यांना एकच पातळीवर आणून तुलना करणे अवघड जाईल किंवा अनेकदा चुकीचे निष्कर्ष निघतील. तसेच ही तुलना करताना प्रत्येक वाचक स्वतःच्या वकुबाने तुलना करणार असल्याने एकाच कलाकृतीच्या संदर्भात तुमचे आणि माझे निष्कर्षही वेगळे असतील.

तरीही माझ्या मते, साहित्यातील सर्वाईव्ह होणारे फिटेस्ट साहित्य म्हणजे त्याच प्रकारचे एखादे साहित्य वाचल्यानंतर मूळ साहित्याची आठवण होणे.

उदाहरण - होलोकॉस्ट आणि जर्मनीचे दुसर्‍या महायुद्धातले प्रताप यांवर तुम्ही लिहिलेल्या प्रभावी लेख मालिका किंवा अल्बर्ट स्पीअरचा लेख हे मी संदर्भ म्हणून जपून ठेवले आहेत. कोणत्याही क्षणी या विषयावरचे वेगळेच पुस्तक वाचताना माझा रेफरन्स हा तुमचाच लेख असतो. माझ्या दृष्टीने हे "सर्वायवल ऑफ फिटेस्ट" असेल.