वर्ल्डकप क्लासिक्स - १९९९ - भारत विरुद्ध झिंबाब्वे

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
20 Feb 2017 - 10:04 am

१९९९ चा वर्ल्डकप हा १९७५, १९७९ आणि १९८३ या पहिल्या तीन वर्ल्डकपनंतर १६ वर्षांनी इंग्लंडमध्ये झालेला चौथा वर्ल्डकप. या वर्ल्डकपचं एक वैशिष्ट्यं म्हणजे या वर्ल्डकपमधल्या काही मॅचेस इंग्लंडबरोबरच स्कॉटलंडमध्ये एडींबर्ग, वेल्समध्ये कार्डीफ, आयर्लंडमध्ये डब्लिन आणि हॉलंडमध्ये अ‍ॅम्स्टलव्हीन इथे खेळवण्यात आल्या होत्या. टेस्ट क्रिकेटचा दर्जा नसताना वर्ल्डकपमध्ये यजमानपदाची संधी मिळालेला स्कॉटलंड हा पहिला देश!

या वर्ल्डकपचं एक वैशिष्ट्यं म्हणजे या वर्ल्डकपमध्ये ग्रूप मॅचेसनंतर १९९६ च्या वर्ल्डकपप्रमाणे क्वार्टरफायनलच्या ऐवजी सुपर सिक्स ही पुढची पायरी ठरवण्यात आली होती. दोन्ही ग्रूपमधले पहिले ३ संघ सुपरसिक्समध्ये जाणार होते. सुपरसिक्समध्ये जाणार्‍या संघाविरुद्ध ग्रूपमध्ये जिंकलेल्या मॅचचे पॉईंट्सही सुपरसिक्समध्ये जाणार्‍या संघाला मिळणार होते. सेमीफायनल गाठण्याच्या दृष्टीने हे पॉईंट्स महत्वाचे ठरणार होतेच पण त्यामुळे ग्रूपमधली प्रत्येक मॅचही महत्वाची ठरणार होती! सुपर सिक्समध्ये एका ग्रूपमधल्या प्रत्येक संघाचा दुसर्‍या ग्रूपमधून सुपरसिक्समध्ये दाखल झालेल्या प्रत्येक संघाशी मुकाबला होणार होता. सुपरसिक्सनंतर पहिले ४ संघ सेमीफायनलमध्ये जाणार होते.

***************************************************************************

१९ मे १९९९
ग्रेस रोड, लेस्टर

लेस्टरशायर काऊंटी क्रिकेट क्लबच्या लेस्टरमधल्या ग्रेस रोडच्या मैदानात ग्रूप ए मधली भारत आणि झिंबाब्वे यांच्यातली मॅच खेळली जाणार होती. पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रीकेकडून भारताचा पराभव झाल्यामुळे भारताच्या दृष्टीने ही मॅच महत्वाची होती. परंतु मॅचच्या दिवशीच सकाळी सचिनचे वडील रमेश तेंडुलकर यांचं हार्टअ‍ॅटॅकमुळे निधन झालं होतं. त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्यासाठी भारतात परतल्यामुळे सचिन या मॅचमध्ये खेळू शकणार नव्हता. मॅच सुरु होण्यापूर्वी दोन मिनिटांचं मौन पाळून दोन्ही संघातील खेळाडूंनी रमेश तेंडुलकरांना श्रद्धांजली वाहीली.

अझरुद्दीनच्या भारतीय संघात स्वतः अझर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अजय जाडेजा, रॉबिन सिंग असे बॅट्समन होते. सचिनच्या अनुपस्थितीत गांगुलीच्या जोडीला ओपनिंग बॅट्समन म्हणून सदगोपन रमेशची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. बॉलिंगचा भार हा मुख्यतः जवगल श्रीनाथ आणि अनिल कुंबळे यांच्यावर होता. इंग्लंडच्या विकेट्सवर स्विंग आणि सीम बॉलिंगला मदत मिळत असल्याने त्यांच्या जोडीला वेंकटेश प्रसाद आणि अजित आगरकर यांचाही भारतीय संघात समावेश होता. विकेटकीपर म्हणून नयन मोंगिया होताच!

अ‍ॅलिस्टर कँपबेलचा झिंबाब्वे संघ हा झिंबाब्वेच्या क्रिकेट इतिहासातला निर्विवादपणे सर्वोत्कृष्टं संघ होता. या संघाचं वैशिष्ट्यं म्हणजे ऑलराऊंडर कॅटेगरीमधे जमा होऊ शकेल अशा अनेक खेळाडूंचा त्यात समावेश होता. कॅप्टन अ‍ॅलिस्टर कँपबेल, मरे गुडविन आणि स्ट्युअर्ट कार्लाईल हे निव्वळ बॅट्समन आणि एडो ब्रँडेस, हेन्री ओलोंगा हे निव्वळ बॉलर्स होते. हीथ स्ट्रीक, गाय व्हिटल, नील जॉन्सन असे तीन ऑलराऊंडर्स झिंबाब्वेकडे होतेच आणि त्यांच्या जोडीला लेगस्पिनर पॉल स्ट्रँग आणि कामचलाऊ स्पिन टाकू शकणारा ओपनिंग बॅट्समन ग्रँट हे दोघं होते, पण झिंबाब्वेचा आधारस्तंभ होता तो म्हणजे उत्कृष्टं बॅट्समन आणि विकेटकीपर असलेला अँडी फ्लॉवर!

अझरुद्दीनने टॉस जिंकल्यावर ढगाळ वातावरणाचा फायदा उठवण्याच्या दॄष्टीने फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. श्रीनाथ आणि वेंकटेश प्रसाद यांचे बॉल चांगलेच स्विंग होत होते. ग्रँट फ्लॉवरने सावधपणे भारतीय बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. नील जॉन्सनने श्रीनाथला पहिल्याच ओव्हरमध्ये कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावली, पण तिसर्‍याच ओव्हरमध्ये श्रीनाथला कट् करण्याच्या नादात जॉन्सनच्या बॅटची एज लागली आणि विकेटकीपर मोंगियाने त्याचा कॅच घेतला. झिंबाब्वे १२ / १!

जॉन्सन आऊट झाल्यावर आक्रमक फटकेबाजीच्या दृष्टीने 'पिंच हिटर' म्हणून पॉल स्ट्रँग बॅटींगला आला. स्ट्रँगने प्रसादला मिडऑफवरुन बाऊंड्री तडकावली खरी पण श्रीनाथ - प्रसाद यांच्या अचूक बॉलिंगमुळे स्ट्रँगला फटकेबाजी करणं कठीण जात होतं. स्ट्रँग आणि ग्रँट फ्लॉवर यांनी ३२ रन्सची पार्टनरशीप केल्यावर प्रसादच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या अजित आगरकरला स्क्वेअरकट मारण्याचा स्ट्रँगचा प्रयत्नं पार फसला आणि इनसाईड एज लागून बॉल स्टंपवर गेला. पिंच हिटर म्हणून आलेल्या स्ट्रँगने २६ बॉल्समध्ये एकमेव बाऊंड्रीसह १७ रन्स काढल्या. १० ओव्हर्सनंतर झिंबाब्वेचा स्कोर होता ४५ / २!

स्ट्रँग परतल्यावर बॅटींगला आलेला मरे गुडविन आणि ग्रँट फ्लॉवर यांनी भारतीय बॉलर्सना सावधपणे खेळून काढण्याचं धोरण अवलंबलं होतं. गुडविनने आगरकरला कव्हर्समधून दोन बाऊंड्री तडकावल्यावर अझरने त्याच्याऐवजी गांगुलीला बॉलिंगला आणलं. ही चाल जवळपास यशस्वी ठरली होती, पण गांगुलीच्या बॉलवर मोंगियाला ग्रँट फ्लॉवरचा कॅच घेता आला नाही. प्रसादच्या जागी बॉलिंगला आलेल्या रॉबिन सिंगला ग्रँट फ्लॉवर - गुडवीन यांनी बाऊंड्री तडकावल्या. या दोघांनी ४२ रन्सची पार्टनरशीप केल्यावर गांगुलीच्या बॉलवर कव्हर्समध्ये रॉबिन सिंगने गुडविनचा कॅच घेतला. झिंबाब्वे ८७ / ३!

गुडविन आऊट झाल्यावर ग्रँट फ्लॉवरच्या जोडीला बॅटींगला आला अँडी फ्लॉवर! फ्लॉवरबंधूंनी कोणतीही रिस्क न घेता चाणाक्षपणे १-२ रन्स काढण्यास सुरवात केली. भारतीय बॉलर्सच्या स्वैर बॉलिंगचाही झिंबाब्वेला चांगलाच फायदा होत होता. ग्रँट फ्लॉवरने गांगुलीला बाऊंड्री तडकावल्यावर कुंबळेच्या ओव्हरमध्ये ५ वाईड्चा झिंबाब्वेला बोनस मिळाला. अझरने पुन्हा आगरकरला बॉलिंगला आणलं पण त्याच्या ओव्हरमध्ये ११ रन्स फटकावल्या गेल्या. फ्लॉवरबंधूंनी १० ओव्हर्समध्ये ५७ रन्सची पार्टनरशीप रचल्यावर आगरकरच्या जागी बॉलिंगला आलेल्या अजय जाडेजाच्या पहिल्याच बॉलवर ड्राईव्ह मारण्याचा ग्रँट फ्लॉवरचा प्रयत्नं फसला आणि मोंगियाने त्याचा कॅच घेतला. ८९ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह ग्रँट फ्लॉवरने ४५ रन्स काढल्या. ३२ व्या ओव्हरमध्ये झिंबाब्वेचा स्कोर होता १४४ / ४!

ग्रँट फ्लॉवर परतल्यावर बॅटींगला आलेल्या कॅप्टन अ‍ॅलिस्टर कँपबेलने आपली पहिली रन काढण्यासाठी तब्बल १० बॉल्स घेतले, पण नंतर मात्रं आक्रमक पवित्रा घेत भारतीय बॉलर्सना फटकावण्यास सुरवात केली. श्रीनाथच्या लेगस्टंपवर पडलेल्या बॉलवर मिडविकेटला बाऊंड्री मारल्यावर त्याने जाडेजाला कव्हर्समधून दोन बाऊंड्री तडकावल्या. अझरने पुन्हा एकदा आगरकरला (!) बॉलिंगला आणण्याचा प्रयोग करुन पाहिला, पण अँडी फ्लॉवरने त्याला बॅकवर्ड पॉईंट आणि बॅकवर्ड स्क्वेअरलेगमधून बाऊंड्री फटकावल्या! अँडी फ्लॉवर - कँपबेल यांनी ९ ओव्हर्समध्ये ६० रन्सची फटकेबाज पार्टनरशीप केली. हे दोघं शेवटच्या ओव्हर्समध्ये भारतासाठी डोकेदुखी ठरणार असं वाटत असतानाच ४१ व्या ओव्हरमध्ये...

कुंबळेचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
कँपबेल मिडविकेटला बॉल फटकावण्याच्या इराद्याने क्रीज सोडून पुढे सरसावला पण...
कुंबळेचा गुगली त्याला पार चकवून गेला...
मोंगियाने बेल्स उडवण्यात कोणतीही कुचराई केली नाही!

२९ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह कँपबेलने २४ रन्स फटकावल्या.
झिंबाब्वे २०४ / ५!

कँपबेल परतल्यावर जेमतेम ७ रन्सची भर पडते तोच कुंबळेच्या पुढच्या ओव्हरमध्ये गाय व्हिटलची दांडी उडाली. व्हिटलच्या जागी बॅटींगला आलेला स्ट्युअर्ट कार्लाईलही श्रीनाथला ड्राईव्ह करण्याच्या नादात बोल्ड झाला. ४४ ओव्हर्सनंतर झिंबाब्वेचा स्कोर होता २१६ / ७!

अँडी फ्लॉवर आणि हीथ स्ट्रीक यांनी शांतपणे ५० ओव्हर्स खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. श्रीनाथच्या हाफव्हॉलीवर लाँगऑफला बाऊंड्री तडकावण्यात स्ट्रीकने कोणतीही कसूर केली नाही. प्रसादलाही स्ट्रीकने मिडऑफवरुन बाऊंड्री तडकावली, पण त्याच ओव्हरमध्ये प्रसादला अ‍ॅक्रॉस द लाईन फटकावण्याच्या नादात स्ट्रीकच्या बॅटची टॉप एज लागली आणि मोंगियाने जवळपास स्क्वेअरलेग अंपायरच्या शेजारी त्याचा कॅच घेतला! झिंबाब्वे २४४ / ८!

अखेर ५० ओव्हर्स संपल्या तेव्हा झिंबाब्वेचा स्कोर होता २५२ / ९!

अँडी फ्लॉवर ८५ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह ६८ रन्स फटकावून नॉटआऊट राहीला.
अँडी फ्लॉवरच्या खालोखाल झिंबाब्वेच्या इनिंग्जमध्ये दुसर्‍या क्रमांकावर होत्या त्या ५१ एक्स्ट्रा!
भारतीय बॉलर्सनी १६ नोबॉल आणि २१ वाईड्स उधळले होते!
आगरकरच्या ९ ओव्हर्समध्ये तब्बल ७० रन्स फटकावण्यात आल्या होत्या.

निर्धारीत साडेतीन तासात ५० ओव्हर्स टाकण्यात आलेल्या अपयशाचा भारताला फटका बसणार होता हे उघड होतं.
२५३ रन्सचं टार्गेट गाठण्यासाठी भारताला फक्तं ४६ ओव्हर्स मिळणार होत्या!

सौरव गांगुलीने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत पहिल्याच बॉलवर एडो ब्रँडेसला मिडऑनला बाऊंड्री फटकावली. नील जॉन्सनच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये गांगुलीने त्याला कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली पण आणखीन दोन बॉल्सनंतर जॉन्सनचा शॉर्टपीच बॉल गांगुलीने फाईनलेग बाऊंड्रीवर ब्रँडेसच्या हातात पूल केला. भारत १३ / १!

गांगुली आऊट झाल्यावर आलेल्या राहुल द्रविडनेही झिंबाब्वेच्या बॉलर्सना फटकावण्याचा मार्ग आवलंबला होता. पाचव्या ओव्हरमध्ये त्याने ब्रँडेसला लागोपाठ दोन बाऊंड्री मारल्या, पण ब्रँडेसच्या जागी बॉलिंगला आलेल्या स्ट्रीकला ड्राईव्ह करण्याचा त्याचा प्रयत्नं फसला आणि कव्हर्समध्ये ग्रँट फ्लॉवरने डाईव्ह मारत त्याचा अफलातून कॅच घेतला! द्रविड परतल्यावर बॅटींगला आलेल्या अझरच्या बॅटची एज लागून जॉन्सनचा बॉल बाऊंड्रीपार गेला, पण पुढच्याच ओव्हरमध्ये स्ट्रीकच्या बॉलवर स्लिपमध्ये अ‍ॅलिस्टर कँपबेलने अझरचा कॅच घेतला. अझर आऊट झाला तेव्हा ९ ओव्हर्समध्ये भारताचा स्कोर होता ५४ / ३!

अझर परतल्यावर बॅटींगला आलेला अजय जाडेजाने कोणतीही रिस्क न घेता झिंबाब्वेच्या बॉलर्सना खेळून काढत १-२ रन्स काढण्याचा मार्ग पत्करला. पण गांगुलीबरोबर ओपनिंगला आलेल्या रमेशने १२ व्या ओव्हरमध्ये जॉन्सनच्या शॉर्टपीच बॉलवर स्क्वेअरलेगला दणदणीत सिक्स ठोकली. पुढच्याच ओव्हरमध्ये रमेशने स्ट्रीकला कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली. रमेशची फटकेबाजी सुरु असताना जाडेजा चाणाक्षपणे स्ट्राईक रोटेट करत होता. ओलोंगा आणि गाय व्हिटलला जाडेजाने दोन बाऊंड्री मारल्या पण लेगस्पिनर पॉल स्ट्रँग आणि ग्रँट फ्लॉवरच्या कामचलाऊ स्पिनमुळे रमेश - जाडेजा यांना फटकेबाजी करणं कठीण झालं होतं. २७ व्या ओव्हरमध्ये जाडेजाने स्ट्रँगला कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली, पण पुढच्याच ओव्हरमध्ये ग्रँट फ्लॉवरला क्रीजमधून पुढे सरसावत फटकावण्याचा रमेशचा प्रयत्नं पार फसला आणि मिडऑनला मरे गुडविनने त्याचा आरामात कॅच घेतला.

७७ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि जॉन्सनला मारलेल्या सिक्ससह रमेशने ५५ रन्स फटकावल्या.
रमेश आऊट झाला तेव्हा २८ ओव्हर्समध्ये भारताचा स्कोर होता १५६ / ४!

रमेश परतल्यावर बॅटींगला आलेल्या रॉबिन सिंगने १-२ रन्स काढत जाडेजाला सपोर्ट देण्याचं धोरण अवलंबलं. जाडेजाने पॉल स्ट्रँगला दोन बाऊंड्री तडकावल्या, पण स्ट्रँगच्या ऐवजी बॉलिंगला आलेन्या स्ट्रीकच्या इनकटरवर जाडेजा एलबीडब्ल्यू झाला. ७६ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह जाडेजाने ४३ रन्स केल्या. ३३ ओव्हर्समध्ये भारताचा स्कोर होता १७५ / ५!

शेवटच्या १३ ओव्हर्समध्ये भारताला ७९ रन्सची आवश्यकता होती!

३४ व्या ओव्हरमध्ये...
ग्रँट फ्लॉवरचा दुसरा बॉल अजित आगरकरने मिडऑनला ड्राईव्ह केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
रॉबिन सिंगने आगरकरच्या कॉलला प्रतिसाद दिला पण...
मिडऑन वर ग्रँट फ्लॉवरने बॉल पिकअप केला आणि नॉनस्ट्रायकर एन्डला स्टंप्सचा अचूक वेध घेतला...
आगरकर जेमतेम अर्ध्या पीचपार पोहोचला होता!
भारत १७५ / ५!

आगरकर आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या नयन मोंगियाने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. ३५ व्या ओव्हरमध्ये जॉन्सनला त्याने मिडविकेटवरुन सिक्स ठोकली. आणखीन दोन बॉल्सनंतर जॉन्सनच्याच लेगस्टंपवर पडलेल्या हाफ व्हॉलीवर मोंगियाने पुन्हा मिडविकेटलाच बाऊंड्री तडकावली. मोंगियाची फटकेबाजी सुरु असताना रॉबिन सिंग चलाखीने स्ट्राईक रोटेट करत होता. ग्रँट फ्लॉवरचा शॉर्टपीच बॉलवर मोंगियाने पुन्हा मिडविकेटला पूलची बाऊंड्री तडकावली. ३८ ओव्हर्समध्ये भारताचा स्कोर होता २१० / ६!

शेवटच्या ८ ओव्हर्समध्ये भारताला ४३ रन्स हव्या होत्या!

स्ट्रँग आणि ग्रँट फ्लॉवरच्या पुढच्या दोन ओव्हर्समध्ये फक्तं ५ रन्स निघाल्या. ग्रँट फ्लॉवरचा स्पेल संपल्यावर त्याच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या व्हिटलच्या बॉलवर शॉर्ट फाईअनलेगला ओलोंगाला मोंगियाचा कॅच घेता आला नाही. पण त्याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर व्हिटलला अ‍ॅक्रॉस द लाईन मिडविकेटला फटकावण्याचा मोंगियाचा इरादा पार फसला आणि त्याचा ऑफस्टंप उडाला. २४ बॉल्समध्ये २ बाऊंड्री आणि जॉन्सनला मारलेल्या सिक्ससह मोंगियाने २८ रन्स फटकावल्या. भारत २१९ / ७!

शेवटच्या ५ ओव्हर्समध्ये अद्याप ३४ रन्स बाकी होत्या!

मोंगिया परतल्यावर आलेल्या श्रीनाथने पॉल स्ट्रँगच्या ४२ व्या ओव्हरमध्ये मिडविकेटला दणदणीत सिक्स ठोकल्यावर मॅच पुन्हा भारताच्या आवाक्यात आली. रॉबिन सिंगने चाणाक्षपणे १-२ रन्स काढण्याचा उद्योग सुरुच ठेवला होता. ४३ व्या ओव्हरमध्ये पहिल्या ५ बॉल्समध्ये रॉबिन सिंग - श्रीनाथ यांनी ५ रन्स काढल्यावर शेवटच्या बॉलवर क्रीजमधून पुढे सरसावत श्रीनाथने गाय व्हिटलला मिडऑनवरुन सिक्स ठोकली!

शेवटच्या ३ ओव्हर्समध्ये - १८ बॉल्समध्ये - भारताला १४ रन्स हव्या होत्या!

अ‍ॅलिस्टर कँपबेलने शेवटचा उपाय म्हणून हीथ स्ट्रीकला बॉलिंगला आणलं. स्ट्रीकने द्रविड, अझर, जाडेजा यांच्या विकेट्स काढल्या होत्या, पण रॉबिन सिंग आणि श्रीनाथ यांनी शांत डोक्याने स्ट्रीकच्या ओव्हरमध्ये फटकेबाजीच्या मोहात न पडता ५ रन्स काढल्या. ४४ ओव्हर्सनंतर भारताचा स्कोर होता २४४ / ७!

१२ बॉल्समध्ये भारताला ९ रन्सची आवश्यकता होती.

गाय व्हिटलच्या आधीच्या ओव्हरमध्ये श्रीनाथने सिक्स तडकावल्यामुळे कँपबेलने हेन्री ओलोंगाला बॉलिंगला आणलं. ओलोंगाच्या पहिल्या ३ ओव्हर्समध्ये १७ रन्स फटकावण्यात आल्या होत्या.

ओलोंगाचा पहिला बॉल...
ऑफस्टंपच्या बाहेर असलेला बॉल रॉबिन सिंगने स्क्वेअर ड्राईव्ह केला आणि बाऊंड्रीवरुन स्ट्रीकचा थ्रो येण्यापूर्वी २ रन्स काढल्या...

११ बॉल्स - ७ रन्स!

ओलोंगाचा दुसरा बॉलही ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
रॉबिन सिंगने कव्हरड्राईव्ह मारण्याचा प्रयत्नं केला पण त्याच्या बॅटाची एज लागली...
शॉर्ट कव्हरला असलेल्या कँपबेलने पुढे डाईव्ह मारत अप्रतिम कॅच घेतला!
४७ बॉल्समध्ये १ बाऊंड्रीसह रॉबिन सिंगने ३५ रन्स काढल्या.
भारत २४६ / ८!

१० बॉल्स - ७ रन्स!

ओलोंगाचा तिसरा बॉल अनिल कुंबळेने स्क्वेअरड्राईव्ह केला...
गलीत असलेल्या स्ट्रँगचा थ्रो येण्यापूर्वी कुंबळे - श्रीनात यांनी एक रन पूर्ण केली!

९ बॉल्स - ६ रन्स!

ओलोंगाचा चौथा बॉल श्रीनाथने कट् केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
बॅकवर्ड पॉईंटला ग्रँट फ्लॉवरने बॉल पिकअप केला...
ग्रँट फ्लॉवरचा थ्रो अँडी फ्लॉवरला कलेक्ट करता आला नाही, बॉल फाईनलेगच्या दिशेने घरंगळला...
श्रीनाथ आणि कुंबळेनी ओव्हरथ्रोची आयतीच एक रन घेण्याची संधी साधली!

८ बॉल्स - ४ रन्स!

ओलोंगाचा पाचवा बॉल ऑफस्टंपच्या लाईनमध्ये पडला...
श्रीनाथने आधीच दोन सिक्स ठोकल्या होत्या, त्यामुळे एका शॉटमध्ये मॅच संपवणं त्याला शक्यं होतं...
नेमक्या याच विचाराने श्रीनाथने मिडविकेटला बॉल फटकावण्याचा प्रयत्नं केला पण बॉल आणि बॅटची गाठ पडलीच नाही...
श्रीनाथ बोल्ड झाला!
भारत २४९ / ९!

७ बॉल्स - ४ रन्स!

भारताचा शेवटचा बॅट्समन वेंकटेश प्रसाद बॅटींगला आला...
प्रसाद कॉर्टनी वॉल्श, डॅनी मॉरीसन, ग्लेन मॅकग्राथ, क्रिस मार्टीन यांच्या योग्यतेचा बॅट्समन!

ओलोंगाचा शेवटचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
प्रसादने बॉलच्या लाईनमध्ये येत तो लेगसाईडला खेळण्याचा प्रयत्नं केला...
मिडलस्टंपच्या समोर बॉल त्याच्या पॅडवर आदळला...
झिंबाब्वेच्या एकूण एक खेळाडूंनी एलबीडब्ल्यूचं अपिल केलं...
....आणि अंपायर पीटर विलीचं बोट वर झालं!
भारत २४९ ऑल आऊट!

झिंबाब्वेने ३ रन्सनी मॅच जिंकली!

झिंबाब्वेच्या बॉलर्सनी भारताच्या तोडीस तोड १० नोबॉल आणि २४ वाईड्सची खैरात केली होती. दोन्ही संघांनी मिळून तब्बल ९० एक्ट्रा रन्स या मॅचमध्ये उधळल्या होत्या, पण झिंबाब्वेने पहिली बॅटींग केल्यामुळे त्यांना पूर्ण ५० ओव्हर्स खेळायला मिळाल्या तर भारतीय बॉलर्सच्या स्वैर बॉलिंगमुळे भारताच्या ४ ओव्हर्स कमी झाल्या.

कमी झालेल्या या ४ ओव्हर्सच भारताला महाग पडल्या होत्या!

झिंबाब्वेच्या इनिंग्जनध्ये ४५ रन्स काढल्यावर अचूक बॉलिंग करत १० ओव्हर्समध्ये फक्तं ३३ रन्स देणार्‍या ग्रँट फ्लॉवरची मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड झाली.

क्रिकेट लेखक अरुणभा सेनगुप्ता म्हणतो,
"India excelled beyond imagination to earn defeat! It had taken unfailing perseverance. The match had been almost won, more than once. But ultimately the Indians had managed to pull defeat out of the jaws that had so nearly clamped down on victory."

क्रीडालेख

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

20 Feb 2017 - 1:26 pm | गॅरी ट्रुमन

या मॅचमधील पराभवामुळे खूपच वाईट वाटले होते. शेवटी अगदीच आत्मघातकीपणे खेळले होते आपले लोक. आपल्या बॉलर्सनी २१ अधिक १६ बरोबर ३७ वाईड आणि नो बॉल टाकले असतील तर आणखी ३७ बॉल्स म्हणजे आणखी ६ ओव्हर्स टाकाव्या लागल्या होत्या. आपल्याला ४६ च ओव्हर्स खेळायला मिळाल्या असतील तर ते स्वाभाविकच आहे. शेवटी तर आपले बॅट्समेन अगदी आत्मघातकीपणे खेळले.

या मॅचनंतर सचिनने केनियाविरूध्द शतक मारले आणि तो सामना जिंकला. नंतर गांगुली आणि द्रविडने श्रीलंकेला धू धू धुतले आणि पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात इंग्लंडलाही हरवून भारताने सुपर सिक्समध्ये प्रवेश केला.

अभिजीत अवलिया's picture

20 Feb 2017 - 1:55 pm | अभिजीत अवलिया

ह्या मॅचची आठवण देखील नकोशी वाटते. तत्कालीन भारतीय संघ हाराकिरी करण्यात खूप प्रसिद्ध होता. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही मॅच.

श्रीगुरुजी's picture

20 Feb 2017 - 3:25 pm | श्रीगुरुजी

सौरव गांगुलीने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत पहिल्याच बॉलवर एडो ब्रँडेसला मिडऑनला बाऊंड्री फटकावली. नील जॉन्सनच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये गांगुलीने त्याला कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली पण आणखीन दोन बॉल्सनंतर जॉन्सनचा शॉर्टपीच बॉल गांगुलीने फाईनलेग बाऊंड्रीवर ब्रँडेसच्या हातात पूल केला. भारत १३ / १!

गांगुली हा खरं तर ऑफसाईडचाच फलंदाज. लेगसाईडचे फटके त्याला फारसे जमत नसत आणि तो लेगसाईडला फारसा खेळतही नसे. तो क्वचितच पूल मारताना दिसायचा व तो फटका खेळताना अतिशय विनोदी पद्धतीने एका पायावर अर्धगोल फिरून पूल मारायचा. गांगुलीप्रमाणे सेहवागही बहुतांशी ऑफसाईडचाच फलंदाज. सेहवाग तर २-३ वेळा पूलचा प्रयत्न करताना स्केअर लेगच्या हाताच उंच झेल देऊन बाद झालेला पाहिला आहे. हे दोघेही धडाकेबाज फलंदाज असले तरी लेगसाईडला ते काहीसे कच्चे होते. याउलट द्रविड, कोहली, तेंडुलकर हे दोन्ही बाजूला तितक्याच सहजतेने खेळायचे.

सचिनच्या अनुपस्थितीत गांगुलीच्या जोडीला ओपनिंग बॅट्समन म्हणून सदगोपन रमेशची भारतीय संघात निवड करण्यात आली होती.

सदागोपन रमेशचे फूटवर्क भयंकर होते. तो खेळताना पूर्ण जागेवर उभा राहूनच पायांची अजिबात हालचाल न करता खेळायचा. असं वाटायचं याचे दोन्ही पाय सिमेंट काँक्रिट ओतून कायमस्वरूपी जखडून ठेवले आहेत.

झिंबाब्वेने या सामन्यात भारताला हरविले. पण या स्पर्धेत त्यांची उत्कृष्ट कामगिरी ऑसीजविरूद्ध झाली होती. ऑसीजने पहिली फलंदाजी करून ३०२ धावा केल्यावर झिंबाब्वेने मॅक्ग्रा, शेन वॉर्न इ. तगड्या गोलंदाजांसमोर जबरदस्त फलंदाजी करून सामना जवळपास जिंकत आणला होता. शेवटी ५० षटकात ३०१ धावा केल्याने फक्त १ धावेने त्यांचा पराभव झाला होता.

चावटमेला's picture

20 Feb 2017 - 8:33 pm | चावटमेला

झिंबाब्वेने या सामन्यात भारताला हरविले. पण या स्पर्धेत त्यांची उत्कृष्ट कामगिरी ऑसीजविरूद्ध झाली होती. ऑसीजने पहिली फलंदाजी करून ३०२ धावा केल्यावर झिंबाब्वेने मॅक्ग्रा, शेन वॉर्न इ. तगड्या गोलंदाजांसमोर जबरदस्त फलंदाजी करून सामना जवळपास जिंकत आणला होता. शेवटी ५० षटकात ३०१ धावा केल्याने फक्त १ धावेने त्यांचा पराभव झाला होता.

गुरुजी, ती मॅच वायली - २००१ च्या तिरंगी मालिकेतली.

वर्ल्ड कप मॅच मधे झिम्बाब्वे ४४ रन्स नी हारली होती

http://www.espncricinfo.com/ci/engine/match/65227.html

श्रीगुरुजी's picture

21 Feb 2017 - 2:25 pm | श्रीगुरुजी

अरे हो. पुन्हा एकदा माझी गडबड झालेली दिसते.

मी-सौरभ's picture

20 Feb 2017 - 6:28 pm | मी-सौरभ

मी मामाकडे गावाला रेडीओ वर मॅच ऐकत होतो आणि मॅच हरल्यावर खुप निराश झालो होतो.

तुषार काळभोर's picture

20 Feb 2017 - 8:53 pm | तुषार काळभोर

Now Waiting for
You've just dropped the world cup, mate!

चावटमेला's picture

20 Feb 2017 - 9:06 pm | चावटमेला

बाकी त्या सदागोपन रमेश ची बॅटींग पाहणे म्हणजे डोळ्यांवर अत्याचार होते

स्थितप्रज्ञ's picture

21 Feb 2017 - 2:13 pm | स्थितप्रज्ञ

बाकी लेखांप्रमाणेच हाही लेख खूप छान

प्रसन्न३००१'s picture

21 Feb 2017 - 4:14 pm | प्रसन्न३००१

मॅच फिक्सिंग प्रकरण बाहेर आल्यावर, हि मॅचसुद्धा अझर, जडेजा यांनी फिक्स केली होती असे म्हणतात.. रॉबिन सिंग बॅटिंग करत असताना, १२व्या खेळाडूबरोबर त्याला मेसेज गेला होता कि आरामात खेळ अजून बऱ्याच ओव्हर्स शिल्लक आहेत. त्यामुळे तो गाफील राहिला आणि शेवटी घाईघाईत हाणामारी करायला लागली.