साप मारण्याचा पराक्रम

आगाऊ कार्टा's picture
आगाऊ कार्टा in जनातलं, मनातलं
4 Oct 2008 - 4:18 pm

सर्वप्रथम माझ्या अनुभवाला आपण सर्व मिपाकरांनी दिलेल्या प्रतिसादबद्दल मनापासून आभार...
हा माझा साप मारण्याचा उपद्व्यापसुद्धा सुट्टीतलाच आहे पण यात आम्ही सगळी भावंडे सहभागी होतो.
झालं काय.. आमच्या गावात त्या दिवशी एका घरी लग्न होते. आमचे त्यांच्याशी खूप जुने संबंध होते त्यामुळे आमच्या घरातले सगळे तिकडे गेले होते. आम्ही सगळी भावंडे सुद्धा गेलो होतो पण लग्न जरा लवकर होते आणि जेवायला थोडा वेळ होता म्हणून लग्न लागल्यावर आम्ही घरी धूम ठोकली आणि घरी दडवून ठेवलेला चिवड्याचा डबा शोधायला सुरुवात केली.
थोड्यावेळाने मी कशालातरी स्वयंपाकघरात गेलो तेव्हा मांजराचा ओरडण्याचा आवाज ऐकला. मला मांजराचा आवाज जरा विचित्र वाटला म्हणून मी जरा पुढे गेलो तर मांजर तिथल्या फडताळाजवळ बसून पंजे मारत होते. म्हणून मी बाकीच्यांना हाका मारल्या व बॅटरी घेऊन यायाला सांगितले. त्याबरोबर सगळे धावत आले. आणि सगळ्यांनी एकदम फडताळाखाली वाकून बघायला सुरुवात केली त्यामुळे कोणालाच काही धड दिसेना. सगळ्यांना बाजूला करुन बॅटरीचा प्रकाश टाकला तेव्हा आंम्हाला तो साप दिसला.
साप आहे असे म्हटल्याबरोब्बर दोघी बहिणी एवढ्या जोरात किंचाळल्या, की त्या आवाजाने मांजराने एकदम दचकून ओट्यावर उडी मारली आणि ओट्यावरचे दोन कप फोडले आणि ते खिडकीतून उडी मारुन चालते झाले.
साप आहे आणि घरात कोणी मोठे माणूस नसल्यामुळे आमच्या अंगात एकदम उत्साहाचा संचार झाला. नाहीतर एरव्ही घरात साप आला तर सापाला बाहेर काढण्याच्या आधी आम्हाला हाकवून बाहेर काढीत असत. आणि आम्हाला आमचे शौर्य दाखवायची संधीच मिळत नसे.
मी बाकीच्यांना सांगितले की मी सापावर लक्ष ठेवतो, तुम्ही चांगल्या १-२ काठ्या घेऊन या. त्याबरोबर सगळी चारी दिशांना धावली आणि हां हां म्हणता सुमारे १०-१२ मोठे दांडके गोळा करुन घेऊन आले. एका बहिणीने तर गुढी उभारायचा लांबलचक बांबू ओढत आणला. तिच्या म्हणण्याप्रमाणे आपण सुरक्षित अंतरावर राहून या बांबूने सापाला मारावे. आमची ही तयारी जर सापाने बघितली असती तर त्याने स्वतःच आत्महत्या करुन घेतली असती. तेव्हढ्यात माझा भाऊ आमच्या दडवलेल्या वेताच्या काठ्या घेऊन आला. मग मी आणि माझा भाऊ काठ्या घेऊन तयारीत ऊभे राहिलो. चौघा बहिणींनी जेवणचे टेबल आणि ओट्यावर सुरक्षित जागा पकडल्या आणि तेथून त्या आम्हाला साप कसा मारावा याबद्दल बहुमोल मार्गदर्शन करु लागल्या. तेव्हढ्या वेळात मघाशी पळालेले ते मांजर आणखी चार मांजराना घेऊन आले आणि त्यांनी एकदम कालवा सुरु केला.
त्याबरोबर आम्ही हातातल्या काठ्यांचा पहिला प्रयोग त्या मांजरांवर केला आणि ती पिडा तेथून घालवली.
मांजरे हाकवल्यावर आम्ही सापाकडे मोर्चा वळवला. प्रथम आम्ही आजूबाजूला काठ्या आपटल्या, फडताळा खाली हळूच काठी ढोसून बघितली, पण साप बाहेर येण्याचे काही चिन्ह दिसेना. मग कोणाच्यातरी डोक्यात शक्कल आली की आपण मिरच्यांचा धूर करुया. मग एका तव्यावरुन चुलीतले निखारे आणले गेले , त्यावर मिरच्या टाकल्या. आणि तो तवा जमिनीवर, फडताळापासून थोडा लांब ठेऊन येणारा धूर कपाटाखाली घालवण्यासाठी आडवी फुंकर घालू लागलो. याचा परिणाम एव्हढाच झाला की सगळीकडे नुसता धूरच धूर झाला. आणि तो नाकातोंडात जाऊन सगळ्यांना एकदम ठसका लागला आणि नाकातोंडातून पाणी येऊ लागले. आम्ही सगळे बाहेर पळालो.
थोड्यावेळाने जरा धूर कमी झाल्यावर आम्ही आत आलो. मधल्याकाळात सगळीकडे शांतता झालेली पाहून तो साप सटकण्याच्या बेतात होता आणि तेव्हढ्यात आम्ही आत गेलो.
साप बाहेर आलेला बघून सगळ्याजणी जोरात किंचाळल्या. त्याबरोबर आम्ही दचकून आम्ही एकदम सापावर काठ्या फटाफट आपटल्या.....
हाताला झिणझिण्या येण्यापलीकडे यातून काहीच निष्पन्न झाले नाही. साप केव्हाच पुन्हा फडताळाखाली पोहोचला होता. दोन्ही काठ्या मात्र साफ पेचल्या...
मग मात्र प्रत्येकाने आपआपले स्वतंत्र प्रयोग सुरु केले. बहिणींनी सगळ्यांनी एक एक पातेली आणि पळी घेऊन कर्णकर्कश्श ठणाणा करायला सुरुवात केली. का तर म्हणे असा आवाज केला की तो साप वैतागून बाहेर येईल आणि मग त्याला मारायचा. बरं सगळ्याजणी अतिशय शूर असल्यामुळे टेबलावर उभे राहून त्या हा उद्योग करीत होत्या. त्यामुळे टेबल गदागदा हलत होते व टेबलावरची आणखी तोन तीन भांडी पडून आणखी मोठा आवाज झाला. या सर्व गोंधळात भावाने ते फडताळ गदागदा हलवायला सुरुवात केली. त्यामुळे फडताळातली दुधाची आणि दह्याची भांडी खाली पडून त्याचे एक विचित्र मिश्रण जमिनीवर पसरले. एव्हढे सगळे होऊनसुद्धा साप आपला ढिम्म....
शेवटी मी चुलीतले थोडे पेटते निखारे आणले आणि भावाला काठी घेऊन तयार रहायला सांगितले. मी एका हातात निखार्‍यांचा तवा आणि दुसर्‍या हातात काठी घेऊन सज्ज झालो.
हातातल्या तव्यावरचे निखारे मि जोरात फडताळाखाली भिरकावले आणि तवा फेकून दिल.....
त्या निखार्‍यांचा चटका बसल्याबरोब्बर तो साप सळसळत बाहेर आला. पण सुदैवाने जमिनीवर ते दह्यादुधाचे मिश्रण पसरलेले असल्यामुळे त्याला जोरात पळता येईना. आम्ही लगेच मुरारबाजी किंवा बाजीप्रभू देशपांडे यांनाही लाजवील अशा वेगात सापवर काठ्यांचे प्रहार केले. यावेळी मात्र त्याला २-३ तडखे बसले व त्याचा पळायचा वेग कमी झाला.
त्याबरोबर आम्ही त्याला आणखी चार तडाखे मरुन पुरता अर्धमेला केला....
या भानगडीत बाहेर कोणाचेच लक्ष नव्हते. लग्नघरात काकांना कोणीतरी सांगितले के तुमच्या घरातुन धूर येतो आहे आणि काठ्यांचे आणि भांड्यांचे आवाज येत आहेत. त्यामुळे माझे बाबा, काका, आजोबा असे धावत घराकडे आले. आणि घरी येऊन बघतात तर काय....
आम्ही दोघे सापाजवळ काठ्या घेऊन उभे, दही - दूध सगळीकडे सांडलेले, दोन कप फुटलेले, ओट्यावरची भांडी जमिनीवर, बहिणी पातेल्या वाजवीत टेबलावर उभ्या... हे सर्व बघून आजोबांनी विचारले, "काय चालवलात काय इथे?". आम्ही काही बोलणार तेव्हढ्यात मगाचची ती निर्लज्ज मांजरे तिथे आली आणि त्यांनी जोरजोरात ओरडत तो साप आपल्याकडे खेचायला सुरुवात केली. बहुधा तो साप कसा वाटून घ्यावा यासंबंधी त्यांच्या वाटाघाटी चालल्या असाव्यात. आम्ही मोठ्या आवेशात सांगितले, "आम्ही साप मारला..". हे ऐकल्यावर आमच्या पराक्रमाचे कौतुक तर सोडाच, पण आजोबांनी तिथलीच एक काठी उचलली आणि पहिला "काठीचार्ज" त्या माजरंवर केला. आणि "थांबा... बघतोच एकेकाला.." असे म्हणत आमच्याकडे मोर्चा वळवला....
आम्ही एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेऊन दुसर्‍या दाराने जी धूम ठोकली ते संध्याकाळापर्यंत घरात तोंड दाखवले नाही.....

मौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीराम's picture

4 Oct 2008 - 4:26 pm | श्रीराम

चान्गले पराक्रम आहेत तुमचे ... :S .

नास्तिइशः's picture

4 Oct 2008 - 4:32 pm | नास्तिइशः

अरे मी जरा सान्गतय फडताळ = कपाट , काय हा मालवणातलो ह्यो शब्द आसा!

हसरा सुहास's picture

4 Oct 2008 - 4:33 pm | हसरा सुहास

आमची ही तयारी जर सापाने बघितली असती तर त्याने स्वतःच आत्महत्या करुन घेतली असती,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,नक्कीच;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; तरिपण खूप छान..

प्रभाकर पेठकर's picture

4 Oct 2008 - 4:34 pm | प्रभाकर पेठकर

त्याबरोबर आम्ही हातातल्या काठ्यांचा पहिला प्रयोग त्या मांजरांवर केला आणि ती पिडा तेथून घालवली.
अहो! त्या बिचार्‍या मांजरानेच तुम्हाला घरात साप शिरल्याची वदंता दिली होती नं! त्यालाच हाणलेत? किती हा कृतघ्नपणा....!

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

सर्वेश's picture

4 Oct 2008 - 4:36 pm | सर्वेश

आगाऊ कार्टे पुरवी पराक्रमी होते तर.....असो. :))
परयत्न चांगला होता. (कथेतला)

चिंगी's picture

4 Oct 2008 - 5:04 pm | चिंगी

इइइइइइइइ...
मांजर साप खातं...? पहिल्यांदाच ऐकलं....
अनुभव सणसणीत आहे....

सुर's picture

4 Oct 2008 - 5:19 pm | सुर

=)) =)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Oct 2008 - 6:14 pm | बिपिन कार्यकर्ते

छानच लिहितोस रे, कार्ट्या.... पु.ले.शु.

बिपिन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Oct 2008 - 9:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणखी येऊ देत.

विसोबा खेचर's picture

5 Oct 2008 - 5:02 pm | विसोबा खेचर

बिपिनभावजींशी सहमत..

खवीसराव, येऊ द्यात अजूनही.. :)

तात्या.

शितल's picture

4 Oct 2008 - 6:15 pm | शितल

अनुभव छान मांडला आहे.
:)

सहज's picture

4 Oct 2008 - 9:47 pm | सहज

आधी वाघ मग साप मस्त आहे.

लिहत रहा.

:-)

प्राजु's picture

4 Oct 2008 - 11:31 pm | प्राजु

सह्ही! येउदे अजून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुक्या's picture

5 Oct 2008 - 12:08 am | सुक्या

तूमी म्हाराज लै आगाउ दिस्त्यात. वाग काय बगतो साप काय मारतो. असुन्दे. आमचं चुलतभवाचं कार्ट बी असच अगुचर हाय.
बाकी काही म्हना लिवलय झ्याक. अजुन येउंदे.

सुक्या (बोंबील)

बापु देवकर's picture

5 Oct 2008 - 6:54 pm | बापु देवकर

आता पुढे काय्.....उंदीर, कुत्रा.....जे असेल ते सांग....मजा येतेय्....

मंदार's picture

5 Oct 2008 - 8:38 pm | मंदार

पहीला प्रतिसाद पाहून फारच मनावर घेतलेले दिसतय बुवा !
या पराक्रमाची नोन्द गिनीज बुकातच व्हायला हवी होती हो.

शर्मीला's picture

5 Oct 2008 - 8:47 pm | शर्मीला

शौर्य अनोखे होते.
आपण पराक्रमी दिसतात.
आम्हि कॉमेडीची दाद देतो.
पूडच। पराक्रम कधी.

धनंजय's picture

5 Oct 2008 - 8:50 pm | धनंजय

ही गोष्ट आजोबांनी वेगळी सांगितली असती म्हणा.

पण तुमच्या बाजूने ऐकायलाच जास्त आवडली.

पु.ले.शु.