उल्फत

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
9 Feb 2017 - 12:17 am

रस्ता काळोखाचा. मध्यरात्रीचा. रिकामा भयाण भेसूर.
कानात इयरफोन. सुपरबास. पाठीवर सॅक आणि बोचरी थंडी.
हे वातावरण किती गूढ आहे. मला नेहमी वाटायचं, एखाद्या झाडामागे एखादं भूत आपली वाट बघत थांबलं असेल तर..

पावले झपाझप. शक्यतो मी झाडाकडे बघतंच नाही. शहरातला हा भाग एखाद्या स्मशानासारखा शांत आहे. फार दूरवर उंच इमारती रात्रभर चकाकत राहतात. हा रस्ताही चकाकतोय. पण माणूस इथं औषधाला नाही.

उड्डाणपुलाखालून जाणारा खुश्कीचा मार्ग मी नेहमी स्विकारतो. पण फक्त दिवसा. झोपडपट्टीतून जाऊन रेल्वेरुळ ओलांडायचा, मग छोट्याश्या पायवाटेवरुन झाडंझुडपे तुडवत बसस्टॉप गाठायचा. अंतर कमी पडते म्हणूनच नाही पण काहीवेळासाठी का होईना शहरातून बाहेर आल्यासारखे वाटते. ती एक निर्मनुष्य पायवाट. जी आल्हादायक आहे. आणि हा रात्रीचा डांबरी. क्षणोक्षणी धडकी भरवणारा.

रात्री उड्डाणपुलाखालून न जाण्याचे दुसरे कारण म्हणजे तिथे एक अॅक्सीडेंट झाला होता. तोही रात्रीचाच.
रात्री मी उड्डाणपुलाखालून कधीच जात नाही.

जवळ जवळ पोहोचलोच होतो. एक मरतुकडे कुत्रे कचराकुंडीजवळ झोपले होते. भुकेने कंगाल होऊन दिनवाणे वाटत होते. त्याला माझी चाहूल लागली आणि उठून भुंकायला लागले. मला क्षणभर हसूच आले. ही भटकी कुत्री रात्री किती धीट होतात.
साफ दुर्लक्ष करुन मी पुढे चालू लागलो. पण ते माझ्यासमोर धावत येऊन गुरकावायला लागले. आता मात्र मला त्याचा राग आला. फुटपाथच्या खालची दोन तीन दगडं घेऊन त्याच्याकडे भिरकावली. तसे ते लांब पळत गेले. असावी म्हणून मी अजून दोनचार दगडं जवळ ठेवली. ते कुत्रे लांब जाऊन पुन्हा भुंकायला लागले.

मी जास्त लक्ष न देता पुन्हा चालू लागलो. पण आजूबाजूला झोपलेले त्याचे दोनतीन सवंगडी जागे झाले आणि ते ही भुंकायला लागले. खरतंर ते सुरक्षित अंतर ठेऊन भुंकत होते. त्यातलं एक मी जसा जसा पुढे जाईल तसे जास्त जवळ येत गुरकवायला लागले. अशावेळी मला त्यांना एक सरप्राईज द्यायची हुक्की आली. मी धावतच जाऊन त्यांच्याकडे झेपावलो. हातातली दोनचार दगडंही त्या पळणाऱ्या कुत्र्यांच्या अंगावर भिरकावली.

मात्र याचा इफेक्ट उलटा झाला. अचानक दहाबारा कुत्री कुठून आली कळले नाही. "साल्यांनो दिवसा या, दाखवतोच तुम्हाला" मनात विचार आला. फार आक्रमक पद्धतीनं ती कुत्री अंगावर यायच्या बेतात होती. अगदी फुटभर अंतरावरुन जोरजोरात भुंकत होती. मला आता भिती वाटायला लागली होती. सावधगिरी म्हणून मी पाठीवरची सॅक हातात घेतली. माझी सॅक हेच माझे हत्यार. पुढे मागे बघत आपण त्या गावचेच नाही असा विचार करत चालू लागलो. पाळीव कुत्रीही फाटकाच्या आतून भुंकू लागली. मला वाटले एखादा वाचमन वगैरे काठी घेऊन येईल आणि माझी सुटका करेल. पण तसे काही झाले नाही.

रात्रीचे दोन वाजले होते आणि या कुत्र्यांकडे मी सपशेल शरणागती पत्करली. त्यांना हाकलून लावायचा विचार मी सोडून दिला. गल्लीत असतील नसतील तेवढी कुत्री माझ्याकडे बघून भुंकत होती. दूरवरच्या दुसऱ्या गल्लीतूनही कुत्र्यांचा आवाज येत होता. पण मी चालणे सोडले नव्हते.

खोलीवर आलो तेव्हा गदारोळ झाला होता. मी पटकन आत शिरत फाटक लावून घेतले. तरीही एक कुत्रे फाटकाच्या भिंतीवर चढायच्या प्रयत्नात होते.

तेव्हा कुठे आमचा घरमालक बाहेर येताना दिसला. हा आत्ता उगवला.
"काय केलं हो तुम्ही?" त्याने मलाच विचारले.
"काही नाही हो, ही कुत्री भुंकायला लागली."
"एवढी?" त्यालाही आश्चर्य वाटले असावे. मलाही माहीत नव्हत की मी असं काय केलंय.

दरवाजा ठोठावला. पार्टनरने दार उघडलं. तो झोपेतंच होता. आणि तसाच जाऊन झोपला. खोलीत आल्यावर मला हायसं वाटलं. आजचा दिवस फारंच वाईट गेला. आजपर्यंतच्या रात्रीची ही सगळ्यात वाईट रात्र. आजचं थोडक्यात निभावलं. पण उद्या येताना काय करायचं हा एक भयंकर प्रश्न घेऊन धडधडत्या छातीनं मी झोपायला गेलो.

क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

वाचतोय. भूतकथा असावी की काय!

प्रचेतस's picture

9 Feb 2017 - 9:03 am | प्रचेतस

उत्कंठावर्धक सुरुवात.

उत्कंठावर्धक कथा . त्या सॅकमधे काहितरी असणार ..

पैसा's picture

9 Feb 2017 - 12:58 pm | पैसा

चांगली सुरुवात

राजाभाउ's picture

9 Feb 2017 - 7:49 pm | राजाभाउ

उत्कंठावर्धक !!! पुभाप्र.

फेदरवेट साहेब's picture

10 Feb 2017 - 1:43 pm | फेदरवेट साहेब

फक्त आपल्या गड्याला (नायकाला) सॅक मधून चौकोनी डबा काढून परत क्लिक करायला लावू नका , इतकी नम्र विनंती करतो.

(नव्याचा अपेक्षेत) फेदूदा

जितेन्द्र अशोक नाइक's picture

10 Feb 2017 - 2:07 pm | जितेन्द्र अशोक नाइक

जुने दिवस आठवले, जेव्हा अनेक वेळा मी पण कामावरून उशिरा घरी जायचो ....

अॅस्ट्रोनाट विनय's picture

10 Feb 2017 - 4:25 pm | अॅस्ट्रोनाट विनय

मस्तंग
और आनेदो

Ranapratap's picture

10 Feb 2017 - 4:48 pm | Ranapratap

जव्हेर भाऊ तुमचं लेखन वाचायला आवडते पण अलीकडील काही कथा थोडक्यात सम्पवल्या. आता कस दीर्घ कथा बर वाटलं. लिखते रहो, जितें रहो.