माझा अनुभव

आगाऊ कार्टा's picture
आगाऊ कार्टा in जनातलं, मनातलं
3 Oct 2008 - 4:26 pm

माझ्या जीवनातील एक अनुभव लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. चु.भु.दे.घे.
हा प्रसंग म्हणजे माझ्या अनेक नसत्या उचापतींपैकी एक आहे.

मे महिन्याचे दिवस होते. बारावीची परीक्षा नुकतीच संपली होती. दिवसभर नुसते उंडराणे, कैर्‍या, चिंचा धोंडे मारुन पाडून खाणे आणि गावभर गजाली करत हिंडणे याशिवाय दुसरा उद्योग नव्हता. अशातच एक दिवस बातमी समजली की आमच्या गावाजवळच्या जंगलात एक वाघ आला आहे.
माझा भाऊ (अभिनव) सुद्धा तेव्हा आमच्याकडे आला होता. मला ही बातमी समजल्यावर मी अभिनवला म्हटले की आपण वाघ बघायला रात्री जाऊया.....
पण यात एक मोठा "पण" होता. मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे माझे काका, आत्या, आते-मामे भावंडे अशी भरपूर मंडली आली होती. त्यामुळे या सर्वांचा डोळा चुकवून जाणे हे थोडे कठीणच होते...
म्हणून मग आम्ही एक योजना आखली (शेजरच्यांच्या बागेत बसून त्यांच्याच बागेतल्या चोरलेल्या कैर्‍या खात खात..).
त्यानुसार प्रथम आम्ही रात्री फार गरम होते या सबबीखाली बाहेर अंगणात झोपायला सुरुवात केली. एक चांगला टॉर्च घरातुन लंपास करुन सुरक्षित जागी, चटकन मिळेल असा दडवुन ठेवला. दोन चांगल्या वेताच्या काठ्यासुद्धा अंगणातील फुलझाडांच्या मागे दडवुन ठेवल्या. अशा रितीने पूर्वतयारी झाली..
दोन - तीन दिवस बाहेर झोपायचे नाटक झाल्यावर..(नाटकच ते.. डास फोडून काढायाचे...मग दिवसा झोपेची उरलेली थकबाकी गोळा करायाचो..).. एके दिवशी आम्ही ठरवले की आज रात्री जायचे..
त्या दिवशी (म्हणजे रात्री) जरा लवकरच जेवून सुमारे साडेनऊ वाजता आम्ही आमच्या पथार्‍या पसरल्या.. आणि 'प्रथम ग्रासे मक्षिका पातः' या उक्ती प्रमाणे माझे काका त्या दिवशी आमच्या बरोबर बाहेर झोपायला आले... आता आली का पंचाईत !!!.. पण तरीसुद्धा आम्ही आमचा निश्चय कायम ठेवला...
सुमारे अकरा वाजता आम्ही उठलो. सगळीकडे शांतता होती. सर्वजण झोपले होते. काकांचा संथ लयीत भैरव चालू होता. आम्ही गपचूप उठलो. टॉर्च उशाशी होताच तो उचलला आणि फुलझाडांच्या मागे दडवलेल्या काठ्या उचलल्या. तेव्हढ्यात कशी कोण जाणे, पण माझ्या हातातली काठी अंगणातल्या फरशीवर पडली आणि मोठा आवाज झाला.
काकांचा भैरव थांबला आणि अर्धवट झोपेत ते ओरडले, "कोण रे ?". मी हळूच ओरडलो. "मियॉवं..मियॉवं..". अभिनव अनावधानने पटकन म्हणाला, "मी ते.. मांजर". माझ्या पोटत एकदम गोळा आला, आता काका उठणार, मग आमचे काही खरे नाही. पण काका अर्धवट झोपेत असल्याने ते एकदम करवादले, "हड.. हड... काय कटकट आहे. झोपू सुद्धा देत नाही.. हाकव त्याला ".. असे म्हणून पुन्हा झोपी गेले. पाच मिनिटांनी त्यांचा पुन्हा संथ लयीत भैरव सुरु झाल्यावर आम्ही निघालो....
आमच्या गावापासून जवळच एक छोटासा डोंगर आहे आणि पलीकडे सर्व जंगल आहे..त्या रात्री लख्ख चांदणे नव्हते, पण पायवाट दिसेल एव्हढा प्रकाश होता.
आम्ही जंगलाच्या हद्दीजवळ आलो तेव्हा बारा वाजत आले होते. जंगलात एक छोटासा पाणवठा आहे. पाणवठा कसला डबकेच आहे. तिथे वाघ रात्री पाणी प्यायला येतो असे आम्हाला कळले होते. आम्ही त्याच दिशेने निघालो होतो. आजूबाजूला किर्र जंगल.. मधून जाणारी छोटीशी पायवाट. चालताना आजूबाजूला काहीतरी खसफसल्याचे.. कोणीतरी सरसरत गेल्याचे आवज येत होते. भिती तर इतकी वाटत होती की एकाने जरी कोणी परत जाऊया असे म्हटले असते तरी आम्ही धूम ठोकली असती.
आम्ही पाणवठ्या जवळ आलो. आमच्या पावलांचा आवाज होणार नाही याची काळजी घेत होतो. पाणवठ्यावर कोणीतरी पाणी पीत होते, पण आमची जराशी चाहूल लागताच ते पळले. बहुधा कोल्हा असावा..
एका बर्‍याश्या झाडाजवळ(ज्याच्यावर चटकन चढता येईल अशा) आम्ही टॉर्च बंद करुन बसलो. आजूबाजूला सर्वत्र शांतता होती. बारीकसारीक खसफसल्याचे आवाजसुद्धा त्या शांततेत खूप मोठे वाटत होते. असं वाटत होतं की सगळं जंगल आपल्या अंगावर येत आहे. मंद वार्‍याने हलणार्‍या झाडांच्या सावल्या चित्रविचित्र आकर धारण करीत होत्या.
सारखे असे वाटत होते की कोणीतरी आपल्यावर नजर ठेऊन आहे...इकडून कोणीतरी बघते आहे..नाही पलीकडून...डोळ्यांच्या कोपर्‍यात कसलीतरी हालचाल जाणवते आहे... कोण असेल तिकडे???
एव्हाना चंद्र चांगला वर आला होता. त्यामुळे बर्‍यापैकी प्रकाश पसरला होता. अशा विचित्र अवस्थेत सुमारे तासभर गेला. वाघ लांबच राहिला पण साधा ससा सुद्धा फिरकला नाही.. मला वाटले की आमचा कोणीतरी पोपट केला..
मी अभिनवला म्हणालो की आपण आता परत जाऊया.. तो माझ्या या वाक्याची वाटच बघत होता. आम्ही झाडाखालून उठलो आणि परत जायला पाऊल उचलणार..
तेव्हढ्यात...............
कुठेतरी जोरात झुडपे खसफसल्याचा आवाज झाला. कोणीतरी जोरात धावत येत आहे असे जाणवले.. आणि निमिषार्धात एक काळ्या रंगाचे मोठे धूड पाणवठ्यावर येऊन धाडदिशी आदळले. दुसर्‍याच क्षणी त्याने पलीकडच्या झुडपात उडी मारली आणि ते दिसेनासे झाले (ते बहुधा रानडुक्कर असावे असा माझा अंदाज होता तो नंतर खरा ठरला). माझी छाती तर बुलेटच्या इंजिनासारखी धडधडत होती. पाय लटालटा कापत होते.
आणि या धक्क्यातुन सावरण्याच्या आतच पुन्हा जोराचा आवाज झाला आणि प्रत्यक्ष वाघोबाच तिथे अवतीर्ण झाले...
वाघोबांना बहुतेक फारशी घाई नसावी.. कारण त्याने आजुबाजुला चाहूल घेतली व मनसोक्त पाणी प्यायला सुरुवात केली... आम्ही मंत्रमुग्ध झाल्यासरखे त्याच्याकडे बघत होतो.
तो पिवळाधमक रंगाचा पट्टेरी वाघ होता एव्हढेच माझ्या लक्षात आहे..त्याची बाकी मापं काढण्याच्या मनःस्थितीत मी नव्हतो. वाघाच्या आणि आमच्या मध्ये सुमारे २५-३० फुटांचेच अंतर होते बहुतेक (ही मापे अर्थातच घरी आल्यानंतर काढलेली).
मनसोक्त पाणी पिऊन झाल्यावर स्वारीने छानपैकी हातपाय ताणून आळसं दिला आणि इकडेतिकडे बघताबघता त्याची आमच्यावर नजर गेली आणि तो गुरगुरला. आम्ही त्याच्या बरोबर समोर तसेच भानरहित अवस्थेत उभे. त्याची गुरगुर ऐकल्यावर आम्ही भानवर आलो आणि निमिषार्धात सर्व परिस्थितीचे आकलन झाले आणि माझ्या काळजाचे पाणीपाणी झाले. काय करवे ते सुचेना. घशाला कोरड पडली. पाय लटालटा कापू लागले. प्रसंग मोठा बाका होता. असेच ४-५ सेकंद गेले....
पण वाघोबांना आमच्यात काही स्वारस्य नसावे. त्याने पुन्हा पाण्याल तोंड लावले. तेव्हढ्यात पुन्हा कसलातरी आवाज आला. वाघाने कान टवकारले आणि एक मोठी झेप घेऊन तो आम्ही आलो त्याच वाटेन निघून गेला....
भानवर यायला तब्बल पाच मिनिटे लागली.. मघापेक्षा आता परिस्थिती बिकट होती.. आम्हाला ज्या पायवाटेवरुन परत जायचे होते त्याच वाटेवरुन तो वाघ गेला होता..
आता काय करावे???
पण आमच्यासमोर घरी जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. कारण आमच्या या उपद्व्यापाची जर घरी बोंब झाली असती तर त्यापुढच्या ओढवणार्‍य प्रसंगापुढे हा प्रसंग म्हणजे काहीच नव्हे. त्यामुळे आम्ही सगळा धीर एकवटून, हातातल्या काठ्या अशा तलवारीसारख्या धरुन आम्ही निघालो...
पायवटेवरुन दबकत, दबकत, जीव मुठीत धरुन आम्ही कसेबसे जंगलाच्या बाहेर आलो..
एकदाचे रस्त्यावर आलो आणि हुश्शऽऽऽऽऽऽ म्हणून श्वास सोडला.रस्त्यावरुन आम्ही जी धूम ठोकली ते घर जवळ येईपर्यंत थांबलो नाही. घरी पोचलो तेव्हा सुमारे ३ वाजले होते..
घामची नुसती आंघोळ झाली होती. घरी पोचल्यावर काठ्या पुन्हा दडवून ठेवल्या.. आणि डोक्यावरुन चादर घेऊन झोपी गेलो.
अशा प्रकारे सुमारे ३ तास चाललेल्या रोमहर्षक नाट्याचा शेवट झाला....

मौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

3 Oct 2008 - 4:36 pm | महेश हतोळकर

अभिनंदन कर्ट्या! च्यायला असल्या उचापती करायची आता खूप इच्छा होते पण......

महेश हतोळकर

मनस्वी's picture

3 Oct 2008 - 4:41 pm | मनस्वी

सॉल्लिड किस्सा! छान अनुभवकथन.

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Oct 2008 - 4:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच अनुभवही आणि कथनही!

धनंजय's picture

4 Oct 2008 - 9:28 pm | धनंजय

मस्त अनुभवकथन.

ज्या उचापतींनी कोणाचा जीव जात नाही. त्यांनी उत्तम शिक्षण मिळते!

अनिल हटेला's picture

3 Oct 2008 - 4:53 pm | अनिल हटेला

नावा सारखाच आहेस !!

आगाउ कार्टा !!

पण सही अनुभव कथन !!

नशिब वाघच होता , बिबट्या नव्हता !!

नाय तर ~~~~~~~~~~

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

श्रीराम's picture

3 Oct 2008 - 5:06 pm | श्रीराम

मस्त ,
आम्हाला नुसते सान्गायचास , त्या पेछा कथन (लिखान ) मस्तच ... :)
तु तर लेखक व्हायला हवे होते ... ;) असो ..
नवीन अनुभवाची वाट पाहु ...

नास्तिइशः's picture

3 Oct 2008 - 5:25 pm | नास्तिइशः

एकदम भारी लिहीतोस लेका तू ! आमका म्हायती नाय होता ह्या!
असोच लिहीत रव!

फारतर नेने's picture

3 Oct 2008 - 5:48 pm | फारतर नेने

आयला!!! एकदम भारी.

वाचताना अंगावर काटा आला राव.

सुपरफास्ट
फारतर नेने

प्रभाकर पेठकर's picture

3 Oct 2008 - 6:02 pm | प्रभाकर पेठकर

अनुभव एकदम थरारक आहे.

दोन चांगल्या वेताच्या काठ्यासुद्धा अंगणातील फुलझाडांच्या मागे दडवुन ठेवल्या.
वाघाशी सामना करायला? मला वाटतं हे बघुनच वाघाला तुमची कीव आली असणार आणि तो निघून गेला.

निमिषार्धात सर्व परिस्थितीचे आकलन झाले आणि माझ्या काळजाचे पाणीपाणी झाले.
असे पाणी नॉर्मली चड्डीवाटे बाहेर पडते पण तुमचे तसे झाले नाही, अभिनंदन. (की 'घशाला कोरड' पडते, तसे काही.....)

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

रेवती's picture

3 Oct 2008 - 6:59 pm | रेवती

मला तर वाचतानाच भीती वाटत होती.
लेख अगदी जमून आलाय (अनुभवच असा होता म्हटल्यावर काय करणार?).

रेवती

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Oct 2008 - 7:54 pm | बिपिन कार्यकर्ते

अरे काय येडे की खूळे तुम्ही? कसलं पण धाडस? :) पण मजा आली असेल ना असा प्रत्यक्ष समोर आणी एवढ्या जवळ वाघ बघायला?

आगाऊ कार्टा's picture

3 Oct 2008 - 9:21 pm | आगाऊ कार्टा

काय राव... मजा कसली...???
त्या वेळी आमची ** फाटायची फक्त बाकी राहिली होती....

सर्वेश's picture

3 Oct 2008 - 8:22 pm | सर्वेश

खरोखरच सांगतोयस का नुसत्या टेपा?

नास्तिइशः's picture

3 Oct 2008 - 9:20 pm | नास्तिइशः

अरे ह्यो झुरळाक घाबरता तो वाघ बघुक काय जातलो?

चतुरंग's picture

3 Oct 2008 - 9:07 pm | चतुरंग

अरे कसले भाग्यवान आहात तू आणि तुझा भाऊ अभिनव!
साक्षात जंगलचा राजा तुम्हाला २५-३० फुटावरुन दिसला, वा वा, मला तुमचा हेवा वाटतो!!
अरे लोकांना हत्तीवरुन ताडोबा आणि कुठली कुठली अभयारण्य हिंडून दिसत नाही ते तुम्हाला इतकं समोर दिसावं! तुमच्या धाडसाचं कौतुक आहे.
(धाडस जरा जास्त अगोचर होतं खरं पण खरं सांगू वाघ बघायचा ना तर अशीच वाघासारखी छाती हवी)

(खुद के साथ बातां : रंग्या, तुला पिंजर्‍यातला वाघ दिसला तरी तू बघ्यांच्या सगळ्यात मागच्या रांगेत उभा राहतोस त्याचं काय? :T :SS )

चतुरंग

भाग्यश्री's picture

3 Oct 2008 - 10:23 pm | भाग्यश्री

सहीच अनुभव.. मीही इथे घाबरले वाचताना! प्रत्यक्ष वाघ बघायचा म्हणजे काय खाऊ आहे का! :SS

प्रमोद देव's picture

3 Oct 2008 - 10:35 pm | प्रमोद देव

त्या दिवशी वाघ पाहायचाच असे मी मनात ठरवले होते आणि अगदी तसेच घडले.
मी पाणवठ्यापासून दहा पावलांवर उभा होतो. कोल्हे-लांडगे वगैरे चिल्लर प्राणी माझ्या आसपास फिरून गेले पण कुणाचीही हिंमत झाली नाही मला इजा करण्याची. तेवढ्यात वाघाची चाहूल लागली आणि बघता बघता साक्षात वाघ माझ्यासमोर येऊन उभा राहिला. त्याला बहुधा जोराची तहान लागली असावी म्हणून आधी त्याने लपलप आवाज करत जिभेने पाणी पिऊन घेतले.
मी वाघाकडे बघून त्याच्यासारखाच गुर्गुरलो. माझे गुर्गुरणे ऐकून त्याने त्यापेक्षाही जास्त जोरात गुर्गुराट केला. मग मीही त्यापेक्षा जास्त जोरात गुर्गुराट केला आणि मला काही समजायच्या आत त्याने माझ्यावर झेप घेतली आणि.................

मी रिमोटने टीव्ही बंद केला. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Oct 2008 - 10:35 pm | बिपिन कार्यकर्ते

वाहव्वा !!! सुभानअल्ला.... क्या बात है...

सहज's picture

4 Oct 2008 - 10:33 pm | सहज

प्रमोदकाका जबरी!!!!!!

हिंट - स्मायलीच्या आधीची जागा

प्राजु's picture

3 Oct 2008 - 11:25 pm | प्राजु

श्वास रोखून वाचत होते...
लय भारी!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

4 Oct 2008 - 8:24 am | शितल

मस्त अनुभव आहे तुमचा.
:)
जिम कार्बेट्ची पुस्तके वाचायचा का जास्त तुम्ही ?

मंदार's picture

4 Oct 2008 - 10:48 am | मंदार

प्रथम वाचताना खरे वाटले हो! पण मग लेखकाच नाव वाचुन जरा विचार करावा लागला कि....................................

भडकमकर मास्तर's picture

4 Oct 2008 - 3:38 pm | भडकमकर मास्तर

अगदी आधी खसफस , रानडुक्कर आणि वाघ...
....
खरेच वाटले आधी...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वैदेहीजी's picture

4 Oct 2008 - 3:40 pm | वैदेहीजी

खुपच छान वर्णन केले आहे. glued to the chair reading experience म्हणतात ना तसे काहीसे वाटले
वैदेही
www.davbindu.com

आगाऊ कार्टा's picture

4 Oct 2008 - 4:24 pm | आगाऊ कार्टा

आपल्या सगळ्यांचा मी अत्यंत आभारी आहे....
माझा नविन पराक्रम मी आत्ताच लिहिला आहे...
जरुर वाचा...

vidhya ghodake's picture

4 Oct 2008 - 6:54 pm | vidhya ghodake

किस्सा एकदम मस्त आहे.
वाचताना शहारे येत होते.

देवदत्त's picture

4 Oct 2008 - 7:09 pm | देवदत्त

अरे वा, धमाल केलीत :) पण वाचलात.
मी वाघ पाहिला तो राणीच्या बागेत, बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात आणि बंगळूरूच्याही राष्ट्रीय उद्यानातच.

अवांतरः तो वाघ घरी आला नाही का अहो का मला एकटे सोडून आलात म्हणत? ;)

--------------------------------------------------------------------------------------------
प्रत्येक संस्थेत (किंवा कार्यालयात) एक माणूस असा असतो ज्याला माहित आहे की काय चाललंय? त्या व्यक्तीला लगेच कामावरून काढून टाकले पाहिजे.

प्रगती's picture

4 Oct 2008 - 8:04 pm | प्रगती

बापरे! आम्ही वाचतानाच इतके घाबरलो तर तुम्ही प्रत्यक्षात कसं निभावलं असेल. :SS

विजुभाऊ's picture

15 Oct 2008 - 5:55 pm | विजुभाऊ

इतका मस्त अनुभव...मस्तच

शुचि's picture

18 Apr 2014 - 5:47 am | शुचि

अतिशय रसाळ वर्णन!!! अनुभवकथन फार आवडले.