रायरेश्वर आणि केंजळगड

पाटीलभाऊ's picture
पाटीलभाऊ in भटकंती
2 Feb 2017 - 1:08 pm

हा आठवडा जरा जास्तच वाईट जातोय...प्रचंड काम आणि त्यातही मॅनेजरकडून खाल्लेल्या शिव्या(नेहमीचंच झालं आहे म्हणा हे...) यामुळे डोकं जरा जास्तच सटकलं होतं. तेव्हाच मनात आलं कि या वीकांताला कुठेतरी ट्रेक झालाच पाहिजे. पुरंदर, रोहिडा, रायरेश्वर, केंजळगड, तिकोना असे नानाविध पर्याय समोर उठे राहिले. पण नक्की काय ते ठरत नव्हतं. आणि त्यात कोणीही मित्र ट्रेकसाठी तयार होतं नव्हता...! प्रत्येकाकडे आपापली कारणे तयार होतीच. :(
शुक्रवार आला आणि गेला पण...मी एकटाच उरलो होतो...! मनात आलं कि आता एकटाच आहे तर कुठे जाणार मी ट्रेकला...पण तेवशी एक आवाज घुमला...'एकला चलो रे'...आणि म्हटलं काही झालं तरी उद्या सकाळी ट्रेकला जायचंच! रात्रीच रायरेश्वराच्या पर्यायावर माझंच एकमत झालं...आणि केंजळगडाची अतिरिक्त पर्याय म्हणून निवड झाली.
सकाळी जरा आरामातच उठलो...सहा वाजले होते. पटापटा आवरून तयार झालो. दुचाकीला किक मारली...आणि निघालो..! वाकड, चांदणी चौक, वारजे, कात्रज वगैरे कधीच मागे पडलं. भूक जरा जास्तच लागली होती...मग कापूरहोळच्या आधी एका ठिकाणी मस्त मिसळ वर ताव मारला...आणि निघालो. कापूरहोळच्या थोडं पुढून भोरला जायला एक फाटा फुटतो. तो रस्ता पकडून आगेकूच केली. अजून एक रस्ता होता...तो म्हणजे वाई-सुरूर रस्ता...पण तो रस्ता थोडं लांबचा होता...म्हणून मी भोरवाला रस्ता निवडला होता. भोर सोडलं...पुढे थोडं वैराण वाटू लागलं. त्यातच मध्ये किल्ले रोहिडा ला जाणारा रस्ता आला...मनात विचार आला...रायरेश्वर अजून बराच दूर आहे....त्यापेक्षा रोहिडाला जायचं काय...? पण म्हटलं कि आता रायरेश्वर ठरवलंच आहे तर तिथेच जाऊयात. आंबेघर वरून म्हाकोशीला आणि नंतर रायरेश्वराला जाणारा रस्ता पकडला. पण इथे एक फाटा आलाय...इथून २ रस्ते फुटतायत...आणि कसलाही फलक नाहीये...! मग स्वतःच ठरवत...उजवीकडचा रस्ता पकडला. पुढे २-३ झोपडीवजा घर दिसली तिथे एका माणसाला रायरेश्वराचा रस्ता विचारला...आणि मी चक्क बरोबर होतो. पण एक पंचाईत झालीये...कि रस्ता अतिशय खराब आहे...खरं तर रस्ता नव्हताच तो...तिथे होते फक्त दगड आणि दगड. आता काळजीच कारण म्हणजे २-३ दिवस आधी माझ्या दुचाकीच्या मागच्या टायरमध्ये ३-४ ठिकाणी पंक्चर झाले होते. आणि इथे जवळपास कोणतेही गॅरेज दिसत नव्हते. मनात म्हटलं अजूनपर्यंत तरी सगळं ठीक आहे ना...पंक्चर झाल्यावर बघू काय ते. रस्त्याच्या कडेने कशी बशी गाडी पुढे चालवत होतो. पुढे १ वयस्कर माणूस चालत जाताना दिसला. म्हटलं "दादा...रायरेश्वरला जायला हाच रस्ता आहे ना?" "हो.." असं प्रत्युत्तर आलं आणि त्याबरोबरच "बाळा जरा थोडं पुढंपर्यंत सोड कि गाडीवरून" आता झाली ना खरी पंचाईत...आधीच रस्ता खराब आणि त्यात माझ्या दुचाकीच्या मागच्या टायरची अवस्था मलाच माहित होती...मग त्यांना असं समजावलं. तरी "अरे काही जास्त दूर नाहीये...आणि थोडं पुढे गेल्यावर चांगला रस्ता आहे" म्हटलं "बसा". १० मिनिट झाले...खराब रस्ता काही पिच्छा सोडताच नव्हता. म्हटलं "दादा...अहो अजून कितीवेळ असं खराब रस्ता आहे?" "हे काय आला कि चांगला रस्ता..." मला मात्र चांगला रस्ता दूरदूरवर दिसत नव्हता. अखेर ६-७ किलोमीटर नंतर जरा चांगला रस्ता लागला आणि मनातली धाकधूक संपली. माझ्या दुचाकीच्या मागच्या टायरने मला दगा दिला नव्हता. केंजळगडाच्या पायथ्याशी त्या माणसाला सोडले. आणि मी निघालो रायरेश्वराकडे.
रस्त्यात एक झोपडीवजा हॉटेल दिसले...तिथेच गाडी लावून रायरेश्वराकडे निघालो.

रायरेश्वराचे प्रथम दर्शन

पायथ्याशी एक बस आणि जीप दिसली. म्हटलं...च्यायला गडावर बरीच गर्दी असेल तर. चालत चालत थोड्याच वेळात पहिली शिडी लागली. गाडी चालवून थोडा थकलो होतो म्हणून शिडीवर बसूनच थोडा आराम केला.

हिवाळ्याचे दिवस असले तरी ऊन बऱ्यापैकी जाणवत होत. थोडं दूरवर २-३ लोक डबक्यांसदृश तलावात मासे पडण्याचा प्रयत्न करत होते. गडावर झाडी कमी असल्याने चालण्याचा थोडा कंटाळा येत होता. अजून पुढे गेल्यावर बरीच लहान मुलं, माणसं, बायका अशी गर्दी दिसली. पटकन शंभू महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. हेच ते मंदिर जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली होती. बाहेर असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना नमन केले. म्हटलं कि इथेच थोड्या वेळ आराम करूयात. पण तिथे बऱ्यापैकी गोंधळ असल्याने विचार बदलला.

शंभू महादेवाचं मंदिर

रायरेश्वरावर शंभू महादेवाचं मंदिर आणि महाराजांचा पुतळा याव्यतिरिक्त पाहण्यासारखे असे काही खास नाही. पण आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर मात्र न्याहाळता येतो. एका बाजूला घेरा केंजळगड आणि धोम धरणाचा जलाशय, दुसरीकडे महाबळेश्वर, पाचगणीचा परिसर याचे दर्शन घडले. तसं तर रायरेश्वरावरून सिंहगड, राजगड, तोरणा, चंद्रगड, मंगळगड असा सर्व परिसर दिसतो...पण मला नक्की कोणत्या दिशेने काय आहे हे कळत नव्हते. नाही म्हणायला चंद्रगडाचा थोडा अंदाज येत होता. जवळपास ५-६ किमीवर पसरलेले रायरीचे पठार पाचगणीच्या टेबललँडपेक्षाही उंचावर आहे. इथे पठारावर लोकांनी वस्तीसोबत शेतीहि सुरु केली आहे.

रायरेश्वरावरून दिसणारा केंजळगड

परत शिडीजवळ आलो...थोडा क्लिकक्लिकाट केला आणि तिथेच एका झाडाखाली निवांत पडून राहिलो. आता हवेत थोडा गारवा जाणवत होता. मस्त डुलकी लागली. भुकेची जाणीव होताच निद्राभंग झाला...आणि खाली उतरण्यास सुरुवात केली. गाडी जिथे लावली होती त्याच छोटेखानी हॉटेलमध्ये पोहे खाल्ले, ताक प्यायलो आणि थोडं बरं वाटलं. घड्याळात बघितलं तर अजून दुपारचे १२-१ वाजले होते. म्हटलं अजून तर आपल्याकडे बराच वेळ आहे...तर मग केंजळगड पण करून येउयात.
१०-१५ मिनिटांतच केंजळगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. गावाच्या मंदिर आणि शाळेच्या आवारातच गाडी लावून गडाकडे निघालो. केंजळगड तसा फार रांगडा. चोहोबाजुंनी कातळकडा.

पायथ्यावरुन दिसणारा केंजळगड

खाली गावात रस्त्याची चौकशी करून चढायला सुरुवात केली. खडी चढण होती आणि त्यात ठिकठिकाणी सुकलेले गवत. कसा बसा स्वतःला सावरत वर जात होतो. तरी १-२ ठिकाणी घसाऱ्यावरून पाय सटकलाच...नशीब चांगलं कि बाजूला १-२ लहान झुडुपं होती...त्यांचा आधार घेऊन कसंतरी सावरलं. आता असं वाटत होतं....कि जाऊ दे तो केंजळगड...गुपचूप खाली उतरू...आणि घरी परत जाऊ. पण म्हटलं आता एव्हढे कष्ट घेऊन इथपर्यंत आलोच आहोत तर जाऊयात वरपर्यंत. मग परत सावरत वर चढायला सुरुवात केली. आणि थोड्याचवेळात प्रचंड अशी कातळभिंत समोर येऊन ठाकली. म्हणजे मी त्या कातळभिंतीच्या समोर येऊन पोहोचलो. थोडा उजवीकडे चालत गेल्यावर एक गुहा आणि पाण्याचे टाके दिसले. आणि पुढे कातळात कोरून काढलेल्या पायऱ्या दिसत होत्या. ते पाहून जरा हायसे वाटले. अशा दुर्गम ठिकाणी कातळात पायऱ्या खोदणे...किती कठीण काम असेल...आणि तेही त्याकाळात. मनोमन महाराज व त्या कारागिरांना नमन करून पायऱ्या चढण्यास सुरुवात केली.

५०-६० पायऱ्या चढून गेल्यावर गडाच्या माथ्यावर पोहोचलो. गडावर थोडीफार तटबंदी आहे. पुढे गेल्यावर केंजाई देवीचं मंदिर दिसलं. मंदिराला छप्पर वगैरे काही नव्हतं. जवळच एक चुन्याचा घाणा चांगल्या अवस्थेत होता. गडावर एक कोठारासारखी घरासदृश इमारत होती. त्याकाळात कदाचित दारुगोळा साठविण्यासाठी तिचा वापर होत असावा.

केंजाई देवीचं मंदिर

चुन्याचा घाणा

कोठार

अख्ख्या गडावर मी सोडून कोणीच नव्हतं. आणि त्यात भयाण शांतता, कानात गुंजणारा वारा, जवळपास छातीएवढ्या उंचीपर्यंत असलेले वाळलेलं गवत आणि मधूनच कानाजवळून गुंगवत जाणारा एखादा भुंगा. एकूणच नाही म्हणायला थोडी भयप्रद अशी अवस्था झाली होती माझी. थोडं अजून पुढे जाऊन बुरूजसदृश जागेवर जाऊन निवांत बसलो. दूरवर रायरेश्वर दिसत होता. मागच्या बाजूला महाबळेश्वरच्या डोंगररांगा आणि धोम धरणाचा जलाशय इथूनही दिसत होता.

सह्याद्रीच्या विस्तीर्ण पसरलेल्या परिसराचं सौन्दर्य मनात साठवून परतीची वाट धरली. गड उतरायला सुरुवात केली तेव्हा ३-३.३० वाजले होते. गड चढताना पाय घसरण्याचा चांगलाच अनुभव आला होता...त्यामुळे जरा सावकाशचं उतरत होतो. शेवटी पाऊण-एक तासात सुखरूप खाली पोहोचलो.
गाडीला किक मारली व परतीचा प्रवास सुरु झाला. आता जाताना वाईवरून जाणार होतो. रस्ता बराच फिरून होता...पण चांगला होता. त्यामुळे टायर पंक्चर होण्याची शक्यता थोडी कमी होती. रायरेश्वरावरून मेणवली-वाई हा रस्ता पकडला. रस्त्याच्या डाव्या बाजूने केंजळगड दर्शन देत होता. तर उजव्या बाजूने धोम धरणाचा जलाशय सुखावत होता.

रस्त्यावरून दिसणारा केंजळगड

थोड्याच वेळात वाई सोडलं. मॅप्रोमध्ये काहीतरी खाण्याचा मोह कसाबसा आवरला आणि चक्क न थांबता पुढे निघालो. बंगळूर-पुणे महामार्गावर चहा घेण्यासाठी थांबलो. अडीच तासांच्या प्रवासानंतर अखेर ६.३०-७ वाजेच्या सुमारास रूमवर पोहोचलो. प्रथमच एकट्याने केलेला हा ट्रेक मनाला ताजातवाना करून गेला.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 Feb 2017 - 2:28 pm | कंजूस

फार आवडलं. फोटोही छान!

पद्मावति's picture

2 Feb 2017 - 2:32 pm | पद्मावति

मस्तच.

सुंदर. या परिसरात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये गेल्यास फुलांचे गालिचे प्रचंड सुंदर दिसतात. आता बरीच वरपर्यंत गाडी जाते असे दिसतेय.

फोटो दिसत नाहीयेत काही काही. चांगलं लिहिलंय.

पैसा's picture

2 Feb 2017 - 10:21 pm | पैसा

काही सुरुवातीचे फोटो दिसत नाहीयेत.

अजया's picture

2 Feb 2017 - 11:10 pm | अजया

मस्त भटकंती.

जगप्रवासी's picture

3 Feb 2017 - 3:03 pm | जगप्रवासी

केंजळगडचे फोटो दिसले पण रायरेश्वर चे फोटो काही दिसेनात

रायरेश्वर चे फोटो दिसेनात.. केंजळगडचे फोटो झकासच अगदी!!

फार आवडलं. १ हि फोटो दिसत नाहि मला,

पाटीलभाऊ's picture

3 Feb 2017 - 3:34 pm | पाटीलभाऊ

रायरेश्वर आणि केंजळगड...दोघांचे फोटो एकाच पद्धतीने टाकले आहेत...पण तरी रायरेश्वराचे फोटो का दिसत नसावेत?
गुगल अकाउंट वर लॉगिन करून फोटो दिसतील अशी अपेक्षा आहे.

पैसा's picture

3 Feb 2017 - 5:10 pm | पैसा

म्हणजे लॉग इन न करता दिसले पाहिजेत.

पब्लिक शेअर केले आहेत सगळे फोटो

स्वच्छंदी_मनोज's picture

3 Feb 2017 - 7:19 pm | स्वच्छंदी_मनोज

पाटीलभाऊ मस्तच.. आमच्या फार फार पुर्वी केलेल्या रोहीडा, रायरेश्वर आणि केंजळगड ट्रेकची आठवण आली. फोटो मात्र थोडेच दिसले.

रायरेश्वरावर शंभू महादेवाचं मंदिर आणि महाराजांचा पुतळा याव्यतिरिक्त पाहण्यासारखे असे काही खास नाही.

>> असं नाहीये हो.. रायरेश्वराचे पठार हे महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या टेबललँडपैकि एक आहे हो.. नुसते मंदीर आणी पुतळा सोडाच.. खुद्द रायरेश्वराला जायलाच किमान ६ वाटा आहे (दरा असा स्थानीक शब्द आहे त्याना)... शिवाय शिकारीची वाट, जननी राई, नाखींदा, पाठशिला असे बरेच आहे बघण्या सारखे...पुढच्या वेळेला नक्की बघा..

जवळपास ५-६ किमीवर पसरलेले रायरीचे पठार पाचगणीच्या टेबललँडपेक्षाही उंचावर आहे.

>>> हेही चूक.. रायरेश्वरचे पठार जवळजवळ १४ ते १६ किमीचे आहे.. हे सगळे स्वतः तुडवलेले असल्याने हे पठार किती मोठे आहे आणी एका टोकाकडून दुसर्‍या टोकावर जाताना काय वाट लागते हे स्वतः अनुभवलेले आहे :)

पाटीलभाऊ's picture

6 Feb 2017 - 1:17 pm | पाटीलभाऊ

माहितीसाठी आभार.

इथे आजवर कधी गेलो नाही. मस्त फोटो आहेत.

आषाढ_दर्द_गाणे's picture

7 Feb 2017 - 10:07 pm | आषाढ_दर्द_गाणे

नवीन गडांची (गड्यांची?) ओळख झाली.
धन्यवाद!