तीन सेकंदाचा जीव

अद्द्या's picture
अद्द्या in जनातलं, मनातलं
21 Jan 2017 - 7:44 pm

बुधवार ची संध्याकाळ हि काही प्यायला बसण्याची वेळ नव्हे . शनिवार रविवार समजू शकतो . पण बुधवार ? एक तर दुसरे दिवशी ऑफिस ला जायचं असतं. त्यामुळे मनसोक्त पिता येत नाही . तीर्थ घेतल्या सारखं सालं एक एक घोट घेऊन गप्प बसावं लागतं . घरी जायला जास्ती वेळ करून उपयोग नाही . किंवा मग काही बाही कारण सांगावं लागतं घरी . म्हणजे . कैच्याकाय कारणं सांगणे हे नवीन नाही माझ्यासाठी . मी कुठे मोठा राजा हरिश्चंद्र लागून गेलोय ! तो पण माणूस मूर्ख होता च्यायला . पण म्हणून .. बुधवार संध्याकाळ ?

झालं असं कि कॉलेज ग्रुप मधला एक कार्टा २ वर्षांनी भारतात आला . आणि आला तो आला आठवड्याभरात लग्न ठरवून मोकळा झाला . बरं , लग्न ठरलं . तर गप आपल्या घरी बसून तयारीला लागेल . तर ते हि नाही . बेळगाव ला आला . आता गावात येतोय . तर आधी कळवण्याची पद्धत हि नाही . सकाळी ६ वाजता आकिब च्या घरचं दार बडवलं . बाहेरून शिव्या देत " हरामी भेन्चो दरवाजा खोल. ठंड से फट री है. जल्दी दरवाजा खोल " आता तुम्ही म्हणाल, कि काय मूर्ख माणूस आहे . असं कोणी करतं का . ते हि हे माहित असताना . कि अकिब चं ५-६ महिन्या पूर्वीच लग्न झालंय . आणि तो "सोडलेला बैल" या स्टेज मधून पोट सुटलेला रेडा झालाय . पण एवढा विचार करेल तो सतीश कसला . बडवलं दार . आणि आमचे रेडे साहेब . स्वतः उठले नाहीत . बायको ला सांगितलं . " जा गे अम्मा देख जा जरा . " ती बिचारी आधीच घाबरून अर्धा जीव झाली होती . दार उघडून बघती तर स्लीव्ह लेस शर्ट आणि अर्धी चड्डी , पाठीवर ही भली मोठी बॅक सॅक . अश्या अवतारात सतीश उभा . आणि उभा राहून करतोय काय ? सिगरेट फुंकत मला फोन करतोय . " आदी, उठ रे गांडू .. किती झोपशील .. अक्क्याच्या घरी उतरलोय . संध्याकाळी बसू आपण . प्लँनिंग करायचंय जरा . "

कसलं प्लॅनिंग ? नाही माहित . कुठे बसू? नाही माहित .
पण तरी . "ठीके . ठेव आता फोन . झोपू दे " किती झोपेत असलो तरी घरी होतो .. फॅमिली फिल्टर ठेवावं लागतं फोनवर बोलताना. तो एक वेगळाच त्रास असतो च्यायला .

तर .. संध्याकाळी बसलो होतो . तासभर इकडचे तिकडचे किस्से झाले . रम चे दोन दोन पेग पोटात गेले होतेच. हजामच्या खुर्चीवर दाढी करायला बसतो तसा मागे रेलून वर बघत पाय लांब टाकून बसलो होतो तिघेही . एकदम काय डोक्यात आलं माहित नाही . टेबल वर हाथ आपटला सतीश ने , " सोमवारी सुट्टी टाका बे , शनिवारी हाफ डे घ्या , गोव्याला जाऊ . मंगळवारी आहेच सुट्टी दसऱ्याची " इतर दोघांनीही माना डोलावल्या लगेच. ४ महिने प्लांनिंग करून , पन्नास हजार गोष्टी ठरवून एक हि ट्रिप करू शकलेलो नाही आजपर्यंत . त्यामुळे असं एकदम काही तरी ठरवून च काही तरी करावं लागतं . त्यातलीच हि एक गोष्ट होईल असा अंदाज होता . पण गेल्या तास दोन तासात पोटात गेलेली रम आणि इतर गोष्टींच्या प्रभावात बोलून गेल्या असण्याची शक्यता हि होतीच . त्याला चढते हि लगेच . त्यामुळे मान डोलावण्याशिवाय दुसरं काही करू हि शकत नव्हतो . आकिब बाजूलाच बसला होता . तो फक्त माझ्याकडे एकदा बघून हसला, आणि सतीश ला दिसणार नाही असं बघून दोन्ही मनगटे एकमेकांवर फिरवली . आणि मला समजलं . "कल देखेंगे इसको " आणि मग As the बैल्स we are , मी त्यालाही मान डोलावली.

सतीश . कॉलेज मधला अकिब चा वर्गमित्र . आणि त्यामुळे माझाही मित्र . प्रचंड हुशार. याच्या म्हणण्यानुसार , ' कॉलेज फक्त बास्केटबाँल खेळण्यासाठी आलोय , बाकी क्लासेस वगैरे फालतू गोष्टी आहेत रे. ' असे उच्च विचार असल्यामुळे , कॉलेज मध्ये असताना (क्लास मध्ये नाही . फक्त कॉलेज मध्ये ) दंगा मस्ती करत फिरण्यात , इकडे तिकडे नको ती लफडी करायला अजून एक माणूस मिळाला होता. एवढं बोलून साला कधी ८० टक्क्याच्या खाली नाही आला.

असो ठरल्याप्रमाणे , शनिवारी दुपारी निघायची तयारी सुरु झाली. पाऊस होताच . आणि मध्ये चोर्ला घाटात तर पावसाला अजूनच जोर चढेल याचा अंदाज हि होता . पण तरी , अंगातली मस्ती म्हणा किंवा विसरभोळेपणा, एकानेही रेनकोट नव्हता घेतला . रेनकोट दूरची गोष्ट . ३ दिवसाच्या ट्रिप साठी फक्त एक जोड कपडे घेतले होते . पण मासे पकडायला गल आणि धागे मात्र न विसरता बॅगेत घातले होते . हि सगळी तयारी चालू असताना सत्या पचकला "मी मजा करायला आलोय इथे , गाडी अजिबात चालवणार नाही. तुम्हीच दोघे काय ते बघा " बरं . तशीहि त्याला गाडी द्यायची कि नाही हा विचार करतंच होतो . गोवा ट्रिप म्हणलं कि आम्ही आधी चांगल्या बाईक्स भाड्याने घ्यायच्या ठरवल्या . सगळं जवळपास ठरत हि आलं होतं . पण बाइकवल्याच्या ऑफिस मध्ये थांबून अकिब मियाँ ला अल्ला पावला . "आदी , नया गाडी ले को जारे . आदत बी नई और कुच पता बी नई . बीच मी बंद पडी तो ये ३०० किलो का भैस ढकलेगा कोण ? फालतू भाव मारनेका नक्को सुन मेरी बात. चूप अपने गाड्या लेते. " बरं , माझी १०० सीसी डिस्कव्हर आणि त्याची युनिकोर्न . दोघांनीही या गाड्या ४-५ वर्ष नुसत्या रगडल्या असल्यामुळे गाड्यांवर पूर्ण भरोसा होता . गाडी वर्षातून एकदाच म्हणजे फक्त दिवाळीला धुतली असली . तर न चुकता तर ३ महिन्यांनी सर्व्हिसिंग करत होतोच दोघेही . पण आता अकिब चं लग्न झाल्यामुळे हे हि बदललं होतं. दर दोन दिवसांनी गाडी धुवायचा . मान्य आहे कि लग्न झालंय . म्हणून इतकं बदलावं माणसाने ?
असो, तो आणि त्याची गाडी .

३ दिवसातले दोन दिवस गोव्यात फिरणार होतो, तिसरा दिवस कारवार ला जायचं ठरलं होतं. त्यामुळे रात्रींचाही प्रवास होणार होताच . बाकी काही प्लॅनिंग नसलं, तरी घाट रस्ते आम्ही दिवस उजेडी येतील याची खबरदारी घेतली होती . सुरक्षा म्हणून नाही . आजूबाजूचे नजारे चुकतील म्हणून . पहिला टप्पा होता साधारण १५० किलोमीटर चा . बेळगाव ते हरमल (अरंबोल ). मध्ये चोर्ला घाट होताच . आणि त्या आधी आणि नंतर हि चांगले पण प्रचंड वळणा वळणाचे आणि छोटे रस्ते . ज्याला गाडी चालवायची मजा घ्यायची आहे . त्याच्यासाठी स्वर्गच. तर ठरलं असं , कि दोन्हीपैकी माझी गाडी 'छोटी ' म्हणून त्यावर मी एकटाच बसेन . आणि मागे बॅग बांधायची . मुलांचे असे कपडे असतात किती, त्यामुळे तिघांची मिळून अशी एकच बॅक-सॅक झाली होती. दुसरी गाडी होती युनिकोर्न , त्यामुळे ती गाडी डबल सीट ओढेल आरामात घाटात सुद्धा. ह्या अंदाजाने एक ८० किलोचा रेडा आणि एक ९० किलोचा उंट बसला.

साधारण तासाभरात आम्ही आम्ही दंगा मस्ती करत सुरल ला पोचलो ,म्हणजे गोवा सुरु झालं , चहासाठी थांबलो. आता इथून सिरीयस रायडींग . गाड्या जरी छोट्या असल्या , तरी काही गोष्टी पाळाव्याच लागतात . जसं दोन गाड्यांमध्ये २०-३० मीटर पेक्षा जास्ती अंतर ठेवणे . उगाच आपलं थ्रोटल दिलाय म्हणून तो न पिळणे इत्यादी . पण सगळं मुद्दाम एकमेकाला सांगावं लागत नाही . जुन्या मैत्रीचा हा फायदा असतो . तिघेही उंडगेच , त्यामुळे काहीही कारण नसताना पुण्यापर्यंत गाडी पळवलेली आहे . तर असो . गेल्या २-३ वर्षांपासून एक सवय लागले . लागले म्हणजे , लावून घ्यावी लागली . झालं असं , की केस जायला लागलेत . ते होणार होतंच . कारण गेल्या तीन पिढ्यात २६-२७ वयात डोकं झाकेल एवढे केस उरलेले असणारा मी एकटा पुरुष . शेकडो उपायांपैकी एक म्हणजे . हेल्मेट घालण्याआधी डोक्यावर एक कापड बांधणे . कोणी तरी सांगितलं कि हेल्मेट च्या दाबामुळे येणारा घाम, आणि त्यामुळे उखडणारे केस , हे सगळे प्रकार कमी होतील . किती खरं किती खोटं कोणाला माहित . त्या दिवशी नेमका मी ते नेहमीचं कापड विसरलो होतो. हे त्या दोघांना सांगितल्यावर कन्नड मराठी हिंदी इंग्लिश कोकणी सगळ्या भाषांमध्ये शिव्या देऊन झाल्यावर .. " अबे तो खिशे मी रुमाल क्या पिछवाडा पोछने के लिये रखा क्या? बांध ले ना वो ! " असा सल्ला मिळाला . झालं डोक्यावर रुमाल बांधण्यात आला .

पण काही तरी विचित्र वाटत होतं . जसं काही तरी विसरतोय . पण काय ते समजत नव्हतं . चोर्ला घाट उतरताना याचं उत्तर मिळालं. एक उजवीकडचा हेयरपीन टर्न . डाव्या बाजूला दरी , पाऊस आणि धुक्यामुळे आधीच भीतीदायक होती . उजव्याबाजूने उलट्या दिशेने येणाऱ्या गाड्या . अश्या रस्त्याला ब्रेकच्या भरवश्यावर राहून उपयोग नसतो . दोन्ही गाड्या चवथ्या गियर ला अडकवून उतरत होतो . आणि बरोबर वळण ५ मीटर वर असताना हेल्मेटच्या आतून डोक्यावर बांधलेला रुमाल डोळ्यासमोर उतरला . पूर्ण आंधळा झालो होतो .. आजवर गाडी चालवताना जीवाची भीती फक्त दोनदा वाटली . ब्रेक लावण्यात काहीच अर्थ नव्हता . पण ऐनवेळी हाथ पाय चालले आपल्यापण . गाडी पहिल्या गियर ला टाकून क्लच सोडून दिला . खाट्कन बंद पडली गाडी आणि थांबली . काही दिसत तर नव्हतं . पण कान ऐकत होते . बहुदा जरा जास्तीच . मागच्या बाईकवर अकिबने ब्रेक आणि हॉर्न शक्य तेवढ्या जोरात दाबला होता . मागे असल्यामुळे त्यांना माहित नव्हतं कि काय झालाय . समोरून एका कारने कर्कच्चून ब्रेक दाबल्याच्या आवाज आला होता . तो हि माणूस आणि त्याच्या बाजूला बसलेली बाई दोघेही ओरडत होते . का माहित नाही.. पण मला मी अधांतरी आहे असं वाटत होतं . या सगळ्याला जास्तीत जास्त तीन सेकंद लागले होते . असं म्हणतात कि शेवटच्या क्षणात पूर्ण आयुष्य दिसतं . पण सर्वात जास्त दिसतात त्या आयुष्यभरात केलेल्या चुका , करायच्या राहून गेलेल्या गोष्टी . सगळं झर्रकन फिरल्या डोळ्यासमोरून .

आणि एकदम माझ्या खांद्यावर , हात पडले . कोणी तरी हेल्मेट ओढून काढलं , डोळ्यावरचा रुमाल सोडला . कठड्यापासून एक फूट अंतर ठेऊन गाडी थांबली होती . समोरची कार आपली बाजू सोडून रस्त्यात आडवी झाली होती . मागून येणारी युनिकोर्न माझ्यागाडीला येऊन लागली होती . आणि त्या धक्क्याने अर्ध्या एका सेकंदासाठी मी उचलला गेलो होतो . बहुतेक हाच अधांतरीपणा होता . पण माझे पाय प्रोटेक्शन बार मध्ये अडकले होते . दोन्ही हाथ पूर्ण ताकदीने हॅण्डल ला पकडले होते . . माझे दोन्ही मित्र. हाताची हॅण्डल वरची पकड सोडवण्याचा प्रयत्न करत होते . पुढची १५-२० मिनिटे . कोणी पाणी पाजतंय , कोणी चेष्टा करून माझं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतंय . पण माझ्या डोक्यात एकच विचार . आणि तो मी आयुष्यभरात कधी बदलणार नाही .

जाऊदेत केस च्यायला . पण हेल्मेटच्या आत कधीही कापड बांधणार नाही . . सर सलामत तो केस पचास

कथालेख

प्रतिक्रिया

गवि's picture

21 Jan 2017 - 9:14 pm | गवि

बापरे. भयानक अनुभव.

टवाळ कार्टा's picture

21 Jan 2017 - 9:27 pm | टवाळ कार्टा

म्हणून डोक्याला व्यवस्थित बसेल असे हेल्मेट घालावे...आत रुमाल असला तर ते आणखी घट्ट बसेल....हेल्मेट बदल लवकर

अद्द्या's picture

22 Jan 2017 - 6:20 pm | अद्द्या

साईझ बघूनच घेतलाय रे . पण असो :D

कौशी's picture

21 Jan 2017 - 9:59 pm | कौशी

भयानक प्रसंग...

संदीप डांगे's picture

21 Jan 2017 - 10:43 pm | संदीप डांगे

च्यामारी... ड्येंजर.. बचावलात हे नशीब! काळजी घ्य!

ज्योति अळवणी's picture

21 Jan 2017 - 11:44 pm | ज्योति अळवणी

मस्त लिहिलं आहे. थरारक अनुभव. खूप काही शिकण्यासारखा

तुषार काळभोर's picture

22 Jan 2017 - 8:03 am | तुषार काळभोर

लायसन्स काढायचं ठरवलं होतं. तीर्थरुपांनी भेट म्हणून हेल्मेट डोक्यावर ठेवलं आणि लर्निंग लायसन्स साठी पैसे दिले. अजून अपवादात्मक (वर्षातनं एखादी वेळ) सोडलं तर हेल्मेटशिवाय मोटरसायकल अन् सीटबेल्टशिवाय कार चालवली नाही.

बापरे! अद्या, काळजी घे बाबा.

पण हेल्मेटच्या आत कधीही कापड बांधणार नाही . . सर सलामत तो केस पचास

शहाण्यासारखं बोललास, आता हे विसरु नको म्हंजे झालं.

अद्द्या's picture

23 Jan 2017 - 10:19 am | अद्द्या

हौदु

पैसा's picture

22 Jan 2017 - 5:03 pm | पैसा

काय रे हे!

अद्द्या's picture

23 Jan 2017 - 10:21 am | अद्द्या

वेडेपणा :D

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Jan 2017 - 10:08 pm | कैलासवासी सोन्याबापु

फ्रॉम अ बायकर टू अ बायकर ,

स्टे सेफ. एकदम आरामात राहा असले अनुभव खूप भयानक असतात पण त्यातून शिकण्यासारखे सुद्धा खूप काही असते. ते शिकायचे अन बाईक दामटत राहायची. तुमची त्या वेळची अवस्था समजू शकतो. खुश रहो आबाद रहो घुमते रहो इतकेच म्हणतो , काळजी घेत चला ब्रदर.

बाकी , आकीब प्रकार लैच आवडलेला आहे. आमच्या एका म्लेंच्छ बालमित्राची आठवण आली एकदम.

अद्द्या's picture

23 Jan 2017 - 10:20 am | अद्द्या

यास सार .
तेवढा किती जरी फाटली असली .. तरी नंतर भयानक हसू येत होतं . अजूनही येतं .

शेवट काय कळला नाही, गाडी थांबलीच ना फक्त जागच्या जागी? ह्यावरुन काही कळलं नाही.

माझे दोन्ही मित्र. हाताची हॅण्डल वरची पकड सोडवण्याचा प्रयत्न करत होते . पुढची १५-२० मिनिटे . कोणी पाणी पाजतंय

कठड्यापासून एक फूट अंतर ठेऊन गाडी थांबली होती . समोरची कार आपली बाजू सोडून रस्त्यात आडवी झाली होती

बहुदा माझ्या लिहिण्यात गडबड असेल :D

ओह ओके, हातीपायी सुखरुप आलास ना, मग झालं तर!! पुण्यातल्या कन्यका माफिया टाईप पंचा बांधतात, ते शिकून घे. ;) =))

अद्द्या's picture

23 Jan 2017 - 3:40 pm | अद्द्या

=]]]

नशीब पंचा च म्हणालास

सूड's picture

23 Jan 2017 - 3:42 pm | सूड

=))

Nitin Palkar's picture

23 Jan 2017 - 2:17 pm | Nitin Palkar

सुंदर वर्णन! सुरेख लेखन!!

तिरकीट's picture

23 Jan 2017 - 3:45 pm | तिरकीट

लय भारी अनुभव !!!

काळजी घ्या. याउपर सांगणे न लगे. जीव फार मोलाचा असतो.

कवितानागेश's picture

24 Jan 2017 - 12:08 am | कवितानागेश

अरे बापरे!

निखिल माने's picture

27 Jan 2017 - 2:24 pm | निखिल माने

हे माझ्या बाबतीत पण झालाय. मी निन्जा मास्क घालून गाडी चालवत होतो, थोडा वरती सरकालाय म्हणून मी ओढला जोरात तर डोळ्यावरच आला.
बरं झालं आजूबाजूला कुणी नव्हतं नाहीतर मेलोच असतो

कल्जि घेणे, असले प्रकार परत क्रू नये, अद्द्या रावसाहेब !!