लॉलीपॉप - 3

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
19 Jan 2017 - 10:03 am

लॉलीपॉप - १

लॉलीपॉप - 2

आदूने तिच्या बाहुलीला हातात घेतलं. हळू हळू अगदी सावकाश तिनं तिचा ड्रेस काढला. त्या बाहुलीला अगदी प्रेमानं गोंजारलं आणि माझ्यासमोर धरलं.

काही क्षण मला काय करावं हेच समजलं नाही. मी पटकन पुढे होऊन तिच्या हातातून बाहुली घेतली. पण मला त्या बाहुलीला तसं हातात घ्यायचं नव्हतं. मी दुसऱ्या हाताने तिचा ड्रेस मागितला. आदूने काहीशा प्रश्नार्थक चेहऱ्याने मला तो दिला. तिच्या बाहुलीला मी पुन्हा काही क्षणातच तो ड्रेस घातला आणि माझ्या डेस्कवर बसवलं. त्यादिवशी पहिल्यांदा आदू हसली. निखळ,निर्व्याज हसू. हसता हसता तिच्या डोळ्यातून एक थेंब ओघळला. पण मी तो पुसण्यासाठी पुढे गेले नाही. जाऊच शकले नाही. खूप वेदना होती तिच्या डोळ्यांत, पण त्या वेदनेला व्यक्त करण्याचा विश्वास तिला वाटला होता. माझ्यासाठी आतापर्यंत मी पाहिलेल्या सर्व केसेसमधला तो सर्वात निरागस ब्रेकथ्रू होता.

त्यानंतर ती बराच वेळ रडली. काही वेळाने स्वतःच शांत झाली. त्यादिवशी तिने बहुदा पहिल्यांदा माझ्या रुममधली एकूण एक गोष्ट पाहिली.

सेशन संपल्यावर अपर्णाही तिथे आली. मी अजूनही विचारांच्या तंद्रीत होते त्यामुळं आदूला तिचं लॉलीपॉप द्यायलाच विसरले.

अपर्णा येताच आदू तिच्या खुर्चीवरून उठली आणि डेस्कवरच्या जारमधून लॉलीपॉप घेत मला बाय म्हणाली.

अपर्णा प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पहात होती. तिला बहुदा खूपच आश्चर्य वाटलं असावं, आदूने अगदी हक्काने तिचं लॉलीपॉप घेतलं होतं. इतक्या सेशननंतर आज पहिल्यांदा ती माझ्याशी बोलली होती. अपर्णाला उत्सुकताही असेल सर्व काही ऐकण्याची. पण मी तिला खुणेनेच नंतर असं सांगितलं आणि खिडकीतून बाहेर पाहू लागले.

त्यानंतर पुढचे दोन तीन दिवस मी अपर्णाला आणि अजयला वेगवेगळ्या वेळी भेटत राहिले. कधी एक एकटे तर कधी एकत्र. आदूच्या खेळण्यांविषयी, तिच्या रुटीनविषयी शक्य तेवढं सगळं जाणून घेतलं. मी त्यांना त्यादिवशी रूममध्ये जे झालं ते सांगितलं तेव्हा त्यांना पहिल्यांदा धक्का बसला. पण पुन्हा सावरण्याचाही प्रयत्न केला.

"असंच खेळतात लहान मुलं. बाहुलीला कपडे घालायचे, अंघोळ घालायची हेच करणार. थोडक्यात आपण जे करतो तेच ती करणार ना." अपर्णा स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करत होती.

"हो मला अगदी मान्य आहे. असं खेळतात लहान मुलं. पण आदूच्या बाबतीत ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाहीये. इतके दिवसात तिनं स्वतःहून एकदाही माझ्याबरोबर खेळण्याचा प्रयत्न केला नाही. आणि फक्त त्या दिवशीच का बरं तिन बाहुलीचा ड्रेस काढून ती मला दिली. नक्की मी काय करेन असं तिला वाटलं असेल? मला का दिली? जर ती खेळायच्या मूडमध्ये होती तर तिने स्वतःच तिला तो ड्रेस का नाही घातला? मी बाहुलीचे कपडे परत घातले तेव्हा तिला झालेला आनंद तुम्ही पहायला हवा होता."

"पण मग नक्की काय झालंय? आता आम्ही काय करू?"

"मला सांगा, तुम्ही दोघे घराबाहेर जाता तेव्हा आदुबरोबर एक ताई असते असं म्हणाला होता. कशी आहे ती? दिवसातला बराच वेळ आदू तिच्याबरोबर घालवते. तिला आवडते का या ताईबरोबर खेळायला?"

"आदू कायमच अशीच असते. अबोल. त्यामुळे ताई फक्त खाणं पिणं वेळेवर होतंय की नाही हे पाहते. तिला खाली मुलांमध्ये खेळायला पण घेऊन जाता येत नाही. जुनी ओळख आहे आणि आमची तशी कामाबाबत काहीच अपेक्षा नसते, तिनं फक्त आदूला व्यवस्थित सांभाळावं एवढीच अपेक्षा आहे आमची. "

"जुनी ओळख म्हणजे? किती वर्ष झाली तिला तुमच्याकडे कामाला येऊन? आदूच्या लहानपासून?"

"नाही, आदूच्या लहानपणापासून नाही. तरी झाली असतील आता दोनेक वर्षं. सीमा. आमच्याकडे आधी ज्या मावशी यायच्या त्यांची मुलगी. त्या मावशी अचानक वारल्या त्यामुळं सीमा यायला लागली. आम्हालाही वाटलं आदूला जुन्या मावशींचा फार लळा होता, सीमाच आली तर तिलाही आवडेल."

"तुम्ही काही दिवस राहिला असाल ना घरी, आदू नवीन ताईबरोबर सेट होतीये की नाही हे पहायला."

"हो अर्थातच. तसं तिचं घरी येणंजाणं असायचं. त्यामुळं तिला सर्व गोष्टींची माहिती व्हायला फार वेळ नाही लागला..आदूही सुरवातीला खुश होती. पण मला वाटत आदूला मात्र हा बदल आम्हाला वाटलं तितका सोपा झाला नाही. कदाचित तिला असं वाटलं असावं की मावशी काही दिवसांसाठी गावी गेल्यात आणि परत येतील. पण तसं होत नसल्यानं ती चिडचिड करायला लागली असावी."

"अच्छा. अजून एक, माझा सेलफोन पाहिल्यावर आदू त्याप्रकारे रिऍक्ट झाली होती. असं घरी कधी झालय का?"

अजयने आठवल्यासारखं करून पुन्हा नाही म्हणून मान हलवली. अपर्णाला मात्र काहीतरी आठवलं होतं.

"हो हो .. मध्यंतरी ती आमचा फोन दिसला की आरडाओरडा करायची. फोन बंद कर, फोन नको म्हणून मागे लागायची."

"मग तुम्ही काय करायचा?"

"आम्ही तसं विशेष काही नाही करायचो, तिला समजवायचा प्रयत्न करायचो..कधी कधी अगदीच ऐकत नसेल तर रागवायचो.."

"पण तिचं काही चुकत होत का?"

अपर्णाला बहुतेक माझा प्रश्न कळला नसावा.

"म्हणजे? उगीच एखादी वस्तू बघून दंगा करणं चूकच ना? बरं वाघ सिंह असेल तर मी समजू शकते पण साधा मोबाईल तो! त्याला काय घाबरायचं?"

"असं तुला वाटतं अपर्णा.याचा अर्थ असा नाही की आदूसुद्धा त्या गोष्टीशी तशीच रिलेट होईल. तिला त्यामागे काहीतरी वेगळं जाणवत असणार. तुम्ही तिला समजवायचा प्रयत्न करायचा त्यावेळी ती काही सांगायची का?"

"तरी मी तुला सांगत होतो. सारखं तिला रागवत जाऊ नको. " अजयने न राहवून एकदा मनातलं बोलून घेतलंच.

"रागवू नको तर काय? ऑफिसमधुन आलं की हिची भुणभुण सुरु. मीसुद्धा माणूस आहे."

"एक मिनिट, एक मिनिट मला आता फक्त आदूच्या वागण्याला तुम्ही कसे रिस्पॉन्स देत गेलात हेच महत्वाचं आहे."

"काय करणार, काही दिवस रागावलो, काही दिवस समजावलं. नंतर नंतर दुर्लक्ष करू लागलो. राग आला की आदू उगीच तिच्या रुममध्ये जाऊन खेळणी अस्ताव्यस्त टाकून द्यायची. खूप पसारा करायची. तिला आवडत नाही म्हणून आम्हीही घरी आल्यावर फोन शक्यतो बंदच ठेवू लागलो. काही दिवसांनी ती शांतपणे एकटी तिच्या रूममध्ये खेळू लागली. त्यामुळं असं वाटलं की प्रॉब्लेम सुटला असावा."

"नाही प्रॉब्लेम सुटला नाही अपर्णा, प्रॉब्लेमची सुरवात झाली. ती तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. तिला तुमची काहीतरी ठोस मदत हवी होती. रागावून किंवा समजावून सांगणं ठीक आहे पण त्यावेळी तिला नक्की काय सांगायचं आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला असतात तर आज कदाचित आदूला इथे यावं लागलं नसतं. तुमच्या आमच्याप्रमाणेच लहान मूल ही सुद्धा एक व्यक्ती आहे. तिला स्वतःच्या भावना आहेत, विचार करण्याची शक्ती आहे. आपण म्हणतो एवढ्याशा मुलाला काय कळणार? पण इथेच तर चुकतो. लहान मुलांबरोबर आपणही काही गोष्टी त्यांच्याबरोबरीन समजून घ्यायच्या असतात. प्रत्येकवेळेस त्यांना आपल्यासारखं व्यक्त होता येईलच असं नाही आणि प्रत्येकवेळेस त्यांच्या मनाप्रमाणे आपल्याला वागता येईलच असं नाही, पण एक आई आणि एक वडील म्हणून आपण त्यांना व्यक्त होण्याची संधी तरी देत राहीलच पाहिजे."

एव्हाना अपर्णा मुसमुसून रडू लागली होती. अजय तिला शांत करायचा प्रयत्न करत होता.

"हे बघ अपर्णा आणि अजय, झालेल्या चुकांमधूनच माणसं शिकत असतात. आपण आपल्याला माहीत असलेल्या एकाच साच्यात मुलाला बसवायचा प्रयत्न करतो. जर त्या प्रयत्नांना मूल प्रतिसाद देत नसेल तर आपणच साचा बदलून बघायला हवा. पण हा विचारच आपण करत नाही. उलट आपण अजून त्रागा करू लागतो, स्वतःवरही आणि मुलावरही."

अपर्णा आणि अजय दोघेही शांत झाले होते. बहुदा ते भूतकाळात झालेल्या काही प्रसंगांची मनातल्या मनात उजळणी करत असावेत. त्या दोघांना मी पुन्हा बोलवेन असं सांगितलं आणि घरी निघून आले. पण घरी येऊनही आदूचा विचार काही केल्या डोक्यातून जात नव्हता.

खूप विचार केल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली, दिवसाचा बहुतांश काळ आदू तिच्या नवीन ताईबरोबर राहतिये. जोपर्यंत जुन्या मावशी होत्या तोपर्यंत आदूचे माईलस्टोन्स अगदी सर्वसाधारण मुलांप्रमाणे होते. तिच्या वागण्यात हा बदल साधारण दीड वर्षांपूर्वी जेव्हा नवीन ताई येऊ लागली तेव्हाच झाला आहे. याचा अर्थ तिच्या दैनंदिन जीवनात असं काही झालंय किंवा अजूनही होतंय की ज्यामुळे आदू डिस्टर्ब् झालीये. पण तिला ते व्यक्त करता येत नाहीये. तिला विश्वास वाटेल, तिला सांगता येईल असं माणूस आजूबाजूला नाहीये.

जर ही सेपरेशन अँक्झायटी असेल तर अपर्णा किंवा अजयने आदूला वेळ देऊन आता असलेल्या लक्षणांची तीव्रता कमी करता येईल. पण मला ज्या गोष्टीची शंका आहे, तसं असेल तर हा उपाय म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी होईल. हे जर खरोखर सिरीयस काही असेल तर त्याच्या मुळाशी आताच जायला हवं. आज ना उद्या आदूला बाहेरच्या जगात जायचं आहे. तिच्या मनातल्या भितीनं जर पुन्हा डोकं वर काढलं तर तेव्हा तिच्यावर उपचार करणं तितकं सोपं राहणार नाही. पण मग जर असं काहीच नसेल तर आपण थेरपी वेगळ्याच ट्रॅकला नेऊन अजून किचकट करून ठेऊ. असं काही झालं तर अपर्णा आणि अजयचा विश्वास गमावून बसू. मुळात आपल्या मुलांना अशा थेरपीची गरज असावी हेच आपल्याकडे पालकांना लक्षात येत नाही. जर लक्षात आलं तर त्यांना त्यात कमीपणा वाटतो. त्यामुळं आता आपण जो निर्णय घेऊ त्याचा परिणाम कदाचित आदूची थेरपी बंद होण्यातही होईल. मला जेवढी आदूची काळजी होती, तितकीच या गोष्टीचीही होती की ही केस जर अशी अर्धवट राहिली तर मी कर्णिकसरांना काय उत्तर देणार?

*****

मी ज्या आत्मविश्वासाने थेरपीला सुरुवात केली होती त्याच्या एक शतांशही आत्मविश्वास मला थेरपीच्या या निर्णायक क्षणी वाटत नव्हता. उद्या आपण कर्णिकसरांशी आपल्याला असलेली शंका डिस्कस करायलाच हवी असं मी मनातल्या मनात ठरवलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी क्लिनिकला पोचेपर्यंत आदूच्या केसची मनातल्या मनात उजळणी केली. केबिनवर नॉक करताच नेहमीचं प्रेमळ आवाजातलं "कम इन" ऐकलं तेव्हाच मनावरची जळमटं गळून पडली. सरांचं व्यक्तिमत्वच तसं होतं, भरकटलेल्या अनेक पेशन्ट्सना सर एखाद्या दीपस्तंभासारखे वाटायचे. माझीही स्थिती आता जवळपास तशीच होती.

सरांशी सगळे मुद्दे बोलल्यानंतर मी शांत बसून राहिले. बराच वेळाने सर काहीशा आश्वासक आवाजात म्हणाले,

"हे बघ मानसी, तुझी शंका रास्त आहे. एक सायकियाट्रिस्ट म्हणून आपण सर्व शक्यतांचा विचार करायला हवा. तू तो करतेस याचं कौतुक आहे. शरीराचा आजार असेल तर आपण अनेक टेस्ट्स करू शकतो, नक्की प्रॉब्लेम कुठे आहे हे समजून घ्यायला, पण मनाच्या बाबतीत अशी कुठली टेस्ट नाही. पेशन्ट जे सांगतील, जसं वागतील त्या निरिक्षणातूनच आपल्याला ओळखायचं असतं की यावर काय उपाय करता येतील. मला वाटतं तू तुझी ही शंका आणि तुला सुचलेला उपाय दोन्ही पेशन्टच्या पालकांबरोबर डिस्कस करायला हवेत. जर खरोखरच असं काही असेल तर, यावर आताच ऍक्ट करायला हवं."

"पण सर असं काही नसेल तर, मला अशी भिती वाटतीये की थेरपी चुकीच्या दिशेने नेल्यामुळे खूप वेळ जाईल..."

"हॅव पेशन्स माय डियर! तू निःशंक मनानं थेरपी कंटिन्यू कर. तुला हवा तेवढा वेळ घे. तुझ्या पेशन्टच्या थेरपीमध्ये तुला स्वतःला जर काही डाऊट असतील तर आधी तू स्वतः ते दूर करण्यासाठी जे आवश्यक असेल ते केलंच पाहिजे. "

सरांच्या या बोलण्यानं फारच धीर आला. त्यांच्या केबिनमधून बाहेर पडल्यावर मी लगेच अपर्णाला फोन केला आणि दोघांनाही वेळ काढून ऑफिसमध्ये यायला सांगितलं.

एक तासाभरातच दोघेही माझ्या कन्सल्टिंग रूममध्ये माझ्यासमोर बसले होते.

"अपर्णा, अजय, मला माहीत नाही, या गोष्टीवर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल. पण आदूच्या आताच्या मनःस्थितीचे कारण समजून घ्यायला तुम्हाला एवढी मदत मला केलीच पाहिजे. प्लीज मी रिक्वेस्ट करते. "

"रिक्वेस्ट वगैरे काय करता डॉक्टर, तुम्ही सांगा ना आम्ही काय करू." अजय अगदी मनापासून बोलला.

"अपर्णा?"

"हो नक्की. तुम्ही फक्त सांगा आम्हाला काय करायचं आहे."

"मला आदू तुम्ही घरात नसताना काय करते हे पाहायचं आहे. काय खेळते, कशी झोपते. इन जनरल तिचा दिवस कसा असतो. त्यासाठी तुम्हाला घरी सीसीटीवी कॅमेरे बसवून घ्यावे लागतील. पण ही गोष्ट आपल्या तिघांशिवाय कुणालाच कळता कामा नये. सीमाला आणि आदूलाही नाही. मला त्यांचा अगदी नॉर्मल दिवस कसा असतो हे पाहायचं आहे."

अपर्णा आणि अजय काहीसे विचारात पडल्यासारखे वाटले. पण पुन्हा पहिल्याच उत्साहाने म्हणाले,

"नक्की डॉक्टर. आम्ही आजच व्यवस्था करतो."

कॅमेरे बसवून झाल्यानंतरही आदूबरोबरच्या सेशनमध्ये मात्र खंड पडला नव्हता. दर आठवड्याला आदूबरोबर येताना अपर्णा मागच्या आठवड्याची रेकॉर्डिंगची सीडी घेऊन यायची. आदू माझ्याबरोबर हळू हळू रुळत होती. अजूनही बोलत नव्हती पण कमीत कमी हसत होती. रूममधल्या तिला आवडेल त्या गोष्टीना हात लावून पाहात होती.

मी न चुकता ती सीडी पहायचे, पण तरीही काही ठोस असा धागा सापडत नव्हता. ताई यायची, घरातली छोटी छोटी कामे करायची. बहुतेक वेळा आदू तिच्या रूममध्ये असायची. त्या दोघीमध्ये काही बॉण्ड आहे असं मला जाणवलं नाही. आता अजून एकच आठवडा हे करून मग ही सेपरेशन अँक्झायटीच असावी असं फायनल निदान अपर्णा आणि अजयला सांगावं असा विचार करून मी त्या आठवड्याची सीडी पाहायला लागले.

आणि मला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. एक दिवस आदूच आणि सीमाचं, रुटीन बदललं.

*****

आदूच्या घरी कुणीतरी आलं असावं. सीमानं दार उघडून त्याला आत घेतलं. सोफ्यावर दोघे निवांत बसले होते. थोड्यावेळाने त्यानं त्याचा फोन काढला. उभा करून कॉफी टेबलवर ठेवला. ते सगळं बघताना मलासुद्धा काहीतरी विचित्र वाटत होतं. असा उभा करून का ठेवला असेल फोन? काहीतरी रेकॉर्ड करतोय हा? काय रेकॉर्ड करतोय?

पुढचे काही क्षण माझ्या नजरेपुढे संपूर्ण अंधार होता, मी जे पाहिलं ते पाहिलं नसावं, हे स्वप्न असावं असं मला राहून राहून वाटत होत.

हळू हळू तो विवस्त्र झाला होता, त्याच्यासोबत सीमा. एक लहान मूल बाजूच्या रूममध्ये खेळतंय, ती जागीये, झोपली नाहीये आणि तरीही त्याची काही पर्वा न करता त्यांनी निलाजरपणे ते कृत्य केलं. मी आदूच्या रुममधलं रेकॉर्डिंग पाहिलं. आदू रडत होती. तिनं कानावर हात ठेवले होते. हमसून हमसून रडत एका कोपऱ्यात जाऊन पाय पोटात घेतले होते तिनं. तिला कळत नसणार हे कसले आवाज आहेत. यापूर्वी ती कधी बाहेरही गेली असावी. तिला त्यांनी एकमेकांना केलेले स्पर्श पाहून कदाचित किळस वाटली असावी. हे काहीतरी खूप चुकीचं आहे एवढीच त्या भाबड्या जीवाची समजूत झाली असणार. त्या क्षणी मला धावत आदूकडे जावंस वाटलं. तिला कुशीत घ्यावंसं वाटलं.

पण तो सगळा भूतकाळ होता. त्या मनुष्याने आदूला तर काही केलं नाही ना हे पाहण्यासाठी मी सीडी फॉरवर्ड केली. काही वेळाने तो मनुष्य हातात फोन घेऊन तसाच आदूच्या रूमकडे चालला होता. माझ्या काळजाचा ठोका चुकला. म्हणजे याने आदूला..? पण सीमा त्याला वारंवार हात जोडत होती, विनवण्या करत होती.. म्हणजे मला वाटलं होती तशी सीमा यात सामील नाहीये, उलट तीही एक बळीच आहे.

तो जसजसा आदू असलेल्या रुमजवळ गेला तसं मला स्वतःलाच खूप असहाय्य वाटू लागलं. माझ्यात पुढे काय घडलं ते पाहायची हिम्मत नव्हती. सीमाला ढकलून त्यानं आदूच्या रूमचं दार उघडलं. त्याला पाहताच आदू घाबरून तिची खेळणी इकडे तिकडे टाकत होती. तो विकृत मनुष्य हसत होता. त्यानं नेमकी आदूची बाहुली घेऊन तिचा ड्रेस काढला आणि ती फोनसमोर धरून विक्षिप्त हावभाव करु लागला. कुठला आसुरी आनंद मिळवत होता तो? अशा विकृत वर्तणुकीची, त्यामागील कारणांची अनेक वर्णनं मी वाचली होत. पण जेव्हा मी स्वतः ते पाहत होते, तेव्हा सगळं पुस्तकी ज्ञान एका बाजूला होतं, आणि त्या मनुष्याबद्दल मला असलेली चीड, किळस एका बाजूला होती. सीमाने खूप विनवण्या केल्यावर शेवटी तो तिथून निघून गेला.

अपर्णा आणि अजयला तातडीनं बोलावून घेऊन मी वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आले. चार वेळा तोंड धुतलं तरी डोळ्यासमोरून त्या इमेजेस जात नव्हत्या. आदूनी कसं सहन केलं हे सगळं? किती प्रचंड घुसमट झाली असेल त्या कोवळ्या जीवाची.

अपर्णा आणि अजयने ते रेकॉर्डिंग पाहिल्यावर त्यांची अवस्थाही माझ्यापेक्षा वेगळी नव्हती. अनेक वर्षांच्या विश्वासू बाईंची मुलगी म्हणून आपण जिच्यावर विश्वास ठेवला त्या मुलीनं हे असले उद्योग करावेत? आपल्या घरात? आपल्या आदूच्या समोर?

अजयच्या मिठीत अपर्णा ओकसाबोक्शी रडत होती. तिला आता काहीही समजावता येणारच नव्हतं. आपल्या मुलांच्या बाबतीत काहीही झालं तरी, साधं खरचटलं तरी आया ते मनाला लावून घेतात. माझंच लक्ष नव्हतं असं म्हणून स्वतःला दोष देतात. इथे तर एवढी मोठी गोष्ट तिच्या चिमुकलीच्या आयुष्यात घडत होती आणि तिला त्याचा थांगपत्ताही नव्हता. एक आई म्हणून तिच्या मनाची अवस्था मी समजू शकत होते.

अपर्णा आणि अजयने घरी जाऊन सीमाशी या विषयावर बोलल्यावर तिनं पहिल्यांदा असं काही झालं नसल्याचं सांगितलं. पण पोलिसात जाऊ अशी धमकी दिल्यावर शेवटी तिनं खरं काय ते सांगितलं. सीमाचा भाऊ दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. ते ज्या भागात राहायचे तिथल्या एका गुंठामंत्र्यांचा हा गुंड. दारूच्या बदल्यात सीमा असा सौदा तिच्या भावाने आणि या गुंडाने आपसात करून टाकला होता. सीमाने आधी या गोष्टीला विरोध केला पण तिची ताकत कमी पडत होती. उत्पन्नाचे हेच एक साधन असल्यामुळं तिला खूप इच्छा असूनही अपर्णाला काही सांगता येत नव्हतं. गेल्या काही दिवसांमध्ये त्यानं आपण विरोध केला तर आदूला त्रास देऊ अशी धमकी द्यायला सुरवात केली होती. सीमाने स्वतः अपर्णा आणि अजयच्या पाठींब्याने या गुंडाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली.

ह्या सर्व प्रकारामुळे अपर्णा स्वतः कोलमडून गेली होती. अजयची अवस्थाही फार वेगळी नव्हती, पण आपण आता खंबीर असणं खूप गरजेचं आहे हे ओळखून तो शांत होता. अपर्णा आणि आदू दोघींना सावरायचा प्रयत्न करत होता. अपर्णाच्या मनातून अपराधीपणाची भावना निघून जावी म्हणून मी बरेचदा आदूबरोबरच्या सेशनमध्ये तिलाही बसायला सांगत असे. आदूमध्ये होत असलेले बदल पाहणं खूप समाधानकारक होतं, आम्हा दोघींसाठीही. काही महिन्यांनी अपर्णाने स्वतः माझ्याकडून गरजू स्त्रियांसाठी असलेल्या संस्थाची माहिती घेऊन सीमाला एका संस्थेत दाखल केले. सीमाला उपजीविकेच साधन शोधून देणं हा हेतू तर होताच, पण त्याहीपेक्षा कुणीही उठून तुझा सौदा करावा इतकी तू एकटी नाहीयेस, आम्ही तुझ्याबरोबर आहोत हा विश्वास तिच्या मनात निर्माण करणं हा होता.

आणि आदू? आदू कशी आहे? तिला आता पाहिलं तर कुणालाही विश्वास बसणार नाही की एक वर्षांपूर्वी ही मुलगी एवढी शांत होती. मिटलेली एक कळी हळू हळू पुन्हा खुलू लागली आहे. माझ्या कन्सल्टिंग रूमच्या प्रत्येक भिंतीवर आदूने काढलेली चित्रं आहेत. अधून मधून आदूमॅडम येतात. मनसोक्त धिंगाणा करून जातात रूममध्ये आणि जाताना न विसरता लॉलीपॉप घेऊन जातात.

(समाप्त)

कथा

प्रतिक्रिया

अप्पा जोगळेकर's picture

19 Jan 2017 - 10:51 am | अप्पा जोगळेकर

यक.

अप्रतीम कथा. शेवट फार आशादायी वाटला. लहानग्यांच्या मनावर उमटलेले ओरखडे समजण्याची कुवत यावी यासाठी तरी प्रत्येक वूड बी पालकांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे असं वाटतं. इतक्या सुंदर कथेकरता धन्यवाद.

राजाभाउ's picture

19 Jan 2017 - 10:57 am | राजाभाउ

जबरदस्त !!! फार ताकदीन लिहलय. शेवटचा परिच्छेद वाचुन डोळे पाणावले खुप बर वाटल अदु नार्मल झाली..

संजय क्षीरसागर's picture

19 Jan 2017 - 11:04 am | संजय क्षीरसागर

लॉलीपॉपचं काय झालं?

नीलमोहर's picture

19 Jan 2017 - 11:01 am | नीलमोहर

सुरुवातीपासून श्वास रोखला गेला होता, ते शेवटी एकदाचं हुश्श झालं,
मध्यंतरी एका पाळणाघरात घडलेली घटना आणि या अशा गोष्टी पाहून वाटतं पालकांनी याबाबतीत अधिक जागरूक राहिलं पाहिजे.

संजय पाटिल's picture

19 Jan 2017 - 12:24 pm | संजय पाटिल

मध्यंतरी एका पाळणाघरात घडलेली घटना आणि या अशा गोष्टी पाहून वाटतं पालकांनी याबाबतीत अधिक जागरूक राहिलं पाहिजे.

सहमत..

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2017 - 11:03 am | टवाळ कार्टा

:(

पैसा's picture

19 Jan 2017 - 11:52 am | पैसा

निदान कथेत एक पोरगं जास्त वाईट काही होण्यापासून वाचलं. सगळ्यांनीच डोळे उघडे ठेवायला पाहिजेत.

मराठी कथालेखक's picture

19 Jan 2017 - 12:13 pm | मराठी कथालेखक

चांगली कथा
पण ब्रेक थ्रू मिळताना थोडी जास्त नाट्यमयता आणली आहे असं वाटलं. शिवाय घरात , किंबहूना आदूच्या जीवनात तिसरी व्यक्ती असताना सायकीअ‍ॅट्रीस्ट सुरवातीलाच अजय-अपर्णाकडे तिच्याबद्दल खोदून चौकशी करेल, इथे सायकीअ‍ॅट्रीस्टने पेशंट सोबत खूप सारे सेशन्स केले पण त्याचवेळी किंबहूना त्याआधीच पालकांसोबत जास्त सेशन्स करुन सखोल माहिती मिळव्ण्याचा प्रयत्न ती करत नाही हे पटण्यासारखं नाही. तसंच सीमाच्या येण्यानंतर आदूमध्ये बदल झालाय तेव्हा हा बदल सीमाशी संबंधितच असण्याची दाट शक्यता अजय आणि अपर्णाच्या ध्यानात आली नाही हे पण तितकेसे पटत नाही, खासकरुन अशा घटना समाजात घडतात आणि आपण त्याबद्दल वाचत / ऐकत असतोच.

मराठी कथालेखक's picture

19 Jan 2017 - 12:14 pm | मराठी कथालेखक

आणि लॉलीपॉपचं कनेक्शन लक्षात आलं नाही.

सिरुसेरि's picture

19 Jan 2017 - 12:33 pm | सिरुसेरि

डेंजरस . सावध करणारी कथा .

किसन शिंदे's picture

19 Jan 2017 - 1:22 pm | किसन शिंदे

अपेक्षित वळण. कथा आवडली.

लाडू's picture

19 Jan 2017 - 1:49 pm | लाडू

सुन्न करणारी कथा...

एस's picture

19 Jan 2017 - 2:38 pm | एस

कथा आवडली.

कवितानागेश's picture

19 Jan 2017 - 9:36 pm | कवितानागेश

महत्त्वाचा विषय......

खूपच सुंदर व डोळ्यात सणसणीत अंजन लेखमाला. लहान मुलांच्या मनावर इतक्या लहान वयात काय चालू असेल ते ओळखून, त्यांच्या भावविश्र्तात शिरून पालकांनी त्याच्यांशी मोकळेपणाने बोलले पाहिजे असं वाटतं.

शित्रेउमेश's picture

20 Jan 2017 - 10:14 am | शित्रेउमेश

कथा आवडली.

शित्रेउमेश's picture

20 Jan 2017 - 10:14 am | शित्रेउमेश

कथा आवडली.

अत्रन्गि पाउस's picture

20 Jan 2017 - 12:29 pm | अत्रन्गि पाउस

सुरुवातीला अंदाज आलाच बहुलेचे कपडे वाचून ...
म्हणून आधी क्रमश: नाही हे बघून मगच पुढचे वाचले ...

लिखाण अत्युत्तम ..
ह्या क्षेत्रातले असे आणि इतर अनुभव अजून लिहा असे सुचवतो ...

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2017 - 3:01 pm | श्रीगुरुजी

सुन्न करणारा अनुभव! सुदैवाने सुखान्त झाल्यामुळे हायसं वाटलं.

खूप छान अनुभव सांगितलात. अजून असेच अनुभव इथे मांडावे ही विनंती.

विनिता००२'s picture

20 Jan 2017 - 4:52 pm | विनिता००२

आदू बरी झाली याने आनंद वाटला. पण अशा किती आदूंचे आयुष्य खराब होत असेल.
माणूस असा विकृत का वागत असेल??

रातराणी's picture

20 Jan 2017 - 11:47 pm | रातराणी

सर्व वाचक आणि प्रतिसाद कर्त्यांचे मनापासून धन्यवाद :)
कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, प्रथमपुरुषी एकवचनात लिहिल्यामुळे मी मानसोपचार तद्न्य आहे आणि स्वतःचा अनुभव सांगतीये असा गैरसमज झाला असेल तर त्याबद्दल मनापासून क्षमस्व.

संजय क्षीरसागर's picture

21 Jan 2017 - 12:12 am | संजय क्षीरसागर

लॉलीपॉपचं काय झालं ?

रातराणी's picture

21 Jan 2017 - 6:25 am | रातराणी

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. कथेचे शीर्षक पटले नाही, आवडले नाही, किंवा अगदीच गंडलेय असं स्पष्ट शब्दात सांगितलं असत तरी चाललं असत. पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारून खोडसाळपणा करत आहात असे वाटते. तसा तुमचा हेतू नसेल तर पुन्हा एकदा धन्यवाद कथा वाचल्याबद्दल.

सॉलीड ग्रीप असल्या शिवाय ललित लेखन माझ्याकडून वाचले जात नाही; तीनही भाग पूर्ण वाचले, पहिला दुसरा तिसरा प्रत्येक भाग स्वतंत्रपणे प्रतिसाद देऊन कथा मांडणी बद्दल कौतुक करण्यासारखा होता. नाजूक विषयावर जबाबदारीने लेखन केलेत. कला, रंजन, प्रबोधन या तिन्हीबाबींचा मेळ क्वचितच एकत्रित जमतो तो जमला असे वाटले.

अंशतः वेळेच्या अभावाने लगोलग प्रतिसाद देणे जमले नाही. नाही म्हणावयास अगदी पहिल्या भागातही शीर्षक आक्षेपार्ह वाटले नाही तरी कथेसाठी झेपते आहे असे वाटले नव्हते. अर्थात त्यात कथा लेखक/कीने मनास लावून घेण्यासारखेही काही नसावे. खोडसाळपणा वाटावयास नको म्हणूनही प्रतिसाद टाळला होता विषय निघाल्यामुळे प्रतिसाद देणे सोपे झाले हेही खरे.

मनाला वगैरे नाही लाऊन घेत अशा छोट्या छोट्या गोष्टी, फक्त सांगायची पद्धत आवडली नाही इतकेच.

संजय क्षीरसागर's picture

21 Jan 2017 - 4:26 pm | संजय क्षीरसागर

मुख्य व्यक्तिरेखा लॉलीपॉप का मागते हे कळण्यासाठी शेवटापर्यंत मालिका वाचली गेली. लॉलीपॉपचा कथेशी सुतराम संबंध नसेल तर वाचकांचा लॉलीपॉप झाला असा नवाच शब्दप्रयोग रुढ होईल.

एमी's picture

23 Jan 2017 - 12:18 am | एमी

लेखनशैली चांगली आहे.

मला जरा वेगळाच प्रश्न पडलाय. विचारल्यास प्रतिसादाला पंख लागण्याची शक्यता आहे. पण तरी विचारतेच:
कर्णिक, देसाई, वर्तक... गुंठामंत्र्याने पाळलेला गुंड... हे नकळत होतं की जाणीवपुर्वक केलं जातं?

आमच्या अपार्टमेंटसमोरच्या चाळीत कित्येक घरात एकाच खोलीत अख्खं कुटुंब रहायचं; एकाततर तीनेक कुटुंबं रहायची. त्यातले विवाहीत नक्की कुठं जाऊन सेक्स करत असतील?

मराठी कथालेखक's picture

23 Jan 2017 - 7:38 pm | मराठी कथालेखक

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. कथेचे शीर्षक पटले नाही, आवडले नाही, किंवा अगदीच गंडलेय असं स्पष्ट शब्दात सांगितलं असत तरी चाललं असत. पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारून खोडसाळपणा करत आहात असे वाटते.

कथा वाचताना (त्यातही लेखक प्रथितयश असेल तर) जर आपल्याला काही गोष्टींचा अर्थ कळाला नाही तर नक्कीच आपल्या समजण्यात काही राहून गेलेय का असे वाचकाला वाटू शकते. 'लॉलीपॉप'चा प्रश्न मी सुद्धा वर विचारला होता.
आपल्या सारख्या लेकिखेने अशाप्रकारे उत्तर देणे उचित वाटत नाही.

तसेच वर माझ्या प्रतिक्रियेत मी आणखीही काही मुद्दे उपस्थित केले होते जे कथानकाच्या दृष्टीने महत्वाचे होते. पण आपण त्या मुद्द्यांवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, ते मुद्दे विचारात घेण्याजोगे वाटले नसतील तरी तसे नमूद करण्यास हरकत नसावी.

धन्यवाद

सॉरी, तुमच्या सूचना वाचल्या. त्यातले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. धन्यवाद.

राहता राहिला लॉलीपॉपचा प्रश्न, मला वाटत कथेच्या पहिल्या भागात अस वाक्य आहे की मानसीला आदूच्या विश्वात जाऊन तिला पाहायचाय. पहिल्या सेशनच्या शेवटी आदू आईकडून लॉलीपॉप घेते तेव्हा तिला तोच दुवा वाटतो तिच्या जगात जाण्याचा. तिला आवडणारी एक गोष्ट जर सतत आपण तिला देत राहिलो, तिच्याकडून कोणतेही अपेक्षा न करता तर तिला आपल्या विषयी विश्वास वाटेल असं मानसीला वाटत राहत. ह्या एका आवडणाऱ्या गोष्टीमुळे थेरपी कँटिन्यू होत राहते. म्हणून कथेचं नाव लॉलीपॉप.

मराठी कथालेखक's picture

24 Jan 2017 - 1:34 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद

तसा गैरसमज झाला ही खरं तर लेखनातली जमेची बाजू! खास करुन पहिल्या दोन भागांत वातावरण निर्मिती आणि बाकी पैलू फारच छान जमलेत.

हा भाग त्यामानाने थोडा घाईत संपल्यासारखा वाटला.

प्रचेतस's picture

21 Jan 2017 - 8:56 am | प्रचेतस

कथा आवडली.

यशोधरा's picture

21 Jan 2017 - 9:55 am | यशोधरा

कथा उत्तम जमली आहे.

रातराणी's picture

21 Jan 2017 - 11:11 am | रातराणी

पुन्हा एकदा सर्वांचे आभार.

जगप्रवासी's picture

27 Jan 2017 - 5:37 pm | जगप्रवासी

मनातून देवाकडे प्रार्थना करत होतो की आदूसोबत तसं काही होऊ नये. अशीच एक जाहिरात पाहिली होती, कथा वाचताना तीच एकसारखी आठवत होती.

जाहिरात