दक्षिण घळ भाग 7 (शेवटचा)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
16 Jan 2017 - 12:53 am

दक्षिण घळ भाग 1

दक्षिण घळ भाग 2

दक्षिण घळ भाग 3

दक्षिण घळ भाग 4

दक्षिण घळ भाग 6

दक्षिण घळ भाग 5

दक्षिण घळ भाग 7

"मालक... ती उठली नव्ह. कन्हती हाय. काय करू?" भिकुने विचारल.

"आरे मुर्खा विठा काकुना बोलाव ना मग." यशवंता भिकुवर वैतागत ओरडला. "त्या म्हन्ल्या हुत्या रातीचा नको येऊ. सकाळच्याला बोलाव. मग आता?" भिकुने घाबरत विचारल.

त्यावेळी यशवंताला जाणीव झाली की खरच खूपच रात्र झाली आहे. "बर चल मी येतो. तू भात आण ताटलीत घालून." तो म्हणाला.

भिकू स्वयंपाकघराच्या दिशेने गेला आणि यशवंता माजघरात आला. ती मुलगी कण्हत होती. पण जागी झाली होती. "तुम्हाला आता कस वाटत आहे?" यशवंताने तिला विचारल.

त्याच्या आवाजाने ती उठून बसायचा प्रयत्न करायला लागली. "अरे ... उठू नका. अजून तुम्हाला बर वाटत नाही आहे. पडून रहा." यशवंता म्हणाला.

तिने पडल्या पडल्या यशवंताकडे बघितले. "तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही. त्या घळीतून बाहेर पडायची वाट मिळत नव्हती हो मला. अडकले होते." ती म्हणाली. नंतर आजूबाजूला बघत तिने यशवंताला विचारले,"आता मी कुठे आहे हो?"

"काळजी करू नका. तुम्ही माझ्या घरी आहात. मी दाजींचा धाकटा मुलगा. यशवंता!" यशवंताने हसत उत्तर दिले.

"तुम्ही तर बरेच लहान दिसता. माझ्या माहिती प्रमाणे त्यांचा मुलगा खूप मोठा होता." ती आश्चर्याने म्हणाली.

"अरे तुम्ही ओळखता का दाजीना? मी त्यांचा धाकटा मुलगा. मला मोठा भाऊ आहे... म्हणजे होता. आप्पा. पण काही वर्षांपूर्वी तो अचानक गायब झाला. गावकरी म्हणतात तो पळून गेला. मी देखील अनेक वर्षे इथे नव्हतो. अलीकडेच आलो आहे. तुम्ही याच गावच्या की काय? कुठे राहाता?" यशवंता म्हणाला.

"तशी या गावची नाही... पण तुम्ही म्हणू शकता तस. मी इथे........" ती पुढे काही बोलणार होती पण तेव्हाच भिकू गरम-गरम मऊ भात घेऊन आला. त्याने तो तिच्या समोर ठेवला. ती काही क्षण त्या भाताकडे बघत राहिली.

"तुम्हाला अजून काही हव आहे का? मला वाटल की तुम्हाला बर नाही त्यामुळे मऊ भात खाऊन बर वाटेल थोड. हव तर दुसर काही भिकू बनवून देईल." ती खात नाही अस बघून यशवंता म्हणाला.

"नाही नाही... हा भात बघून काही जुन्या आठवणी चाळवल्या इतकच. खाते न मी." अस म्हणून तिने तो भात खायला सुरवात केली.

"आमच्या घरात कोणी स्त्री नाही. मी बाजूच्या विठा काकुना बोलावल होत तुमच्यासाठी. तुम्हाला हव तर परत आता बोलावतो." तिच खाण आटपल तर यशवंता म्हणाला.

"नको नको. इतक्या रात्री कशाला? तस ही मी काही फार थांबणार नाही आहे." ती संकोचून म्हणाली.

"अरे तस नाही. तुम्ही हवे तितके रहा. काही हरकत नाही."यशवंता म्हणाला. त्यावर ती फक्त हसली. "बर.. आता आराम करा. मी माझ्या खोलीत आहे." अस म्हणून तो त्याच्या खोलीकडे परतला.

यशवंता देखील तसा दिवसभराचा दमलेला होता. झोप झाली असली तरी पावसात भजल्याने त्याला अंगात थोडी कणकण वाटत होती. त्यामुळे तो खोलीत येऊन लगेच झोपून गेला. रात्र बरीच झाली होती. कितवा प्रहर असेल याची कल्पना येत नव्हती. अचानक यशवंताला जाग आली. त्याला खूप तहान लागली होती. अगोदर तो भिकुला हाक मारणार होता. पण मग ती मुलगी दमून झोपली असेल ते त्याला आठवले. आपल्या हाकेमुळे ती जागी होईल असे वाटले आणि पाणी आणण्यासाठी तो स्वतःच उठला. ती मुलगी माजघरात झोपली असावी म्हणजे भिकू स्वयंपाक घरात असेल अस वाटून तो स्वयंपाक घराकडे गेला. त्याने आत बघितले तर आत कोणी नव्हते. यशवंताला आश्चर्य वाटले. 'कुठे उलथला हा भिकू. असा विचार करत त्याने माजघरात डोकावले. तर तिथे कंदिलाची वाट मोठी ठेवूनच भिकू झोपलेला त्याला दिसला. आजूबाजूला ती मुलगी नव्हती.

यशवंताला आश्चर्य वाटले. त्याने आत जाऊन भिकुला उठवले. "भिक्या उठ. अरे ती मुलगी कुठे आहे? असा घोरत पडला आहेस.... कमाल करतोस." यशवंता चिडून भिकुवर ओरडला.

"मालक मी काय करनार? ती मला म्हन्ली ती झोपलं दुसऱ्या खोलीमंदी. मंग मी म्हन्लो हिथ खाली नाय एकपण खोली. तर म्हन्ली वर जाती ती. म्हून मीच तिला वर खोलीत सोडली ती गेली कंदील घेऊन वर झोपली. म्हनून मी परत हिथ झोपलो." भिकू झोपेतून जागा होत डोळे चोळत म्हणाला.

"वर? अरे गाढवा. त्या मुलीला तू वरच्या खोलीत पाठवलेस? मूर्ख कुठला. जा बोलावून आण." यशवंता वरच्या खोलीच्या उल्लेखाने देखील बिथरला होता.

"पण ती बरी होती ना मालक. आपनहून चालत गेली की वर. मंग काय म्हून तुम्ही काळजी करता. सकाळच्याला बघू की." पावसाळी हवेमुळे गारवा खूप होता. त्यात गाढ झोपेतून जाग झाल्यामुळे भिकू वैतागला होता. त्यामुळे उबदार घोंगड सोडून वर जायला भिकुची तयारी नव्हती.

वरच्या खोलीबाद्दलच यशवंताच मत भिकुला माहीत नव्हत. म्हणून तर त्याने यशवंताला न विचारता त्या मुलीला वरच्या खोलीत झोपायला दिल होत. यशवंता काहीच बोलला नाही कारण ती मुलगी दुसऱ्या दिवशी जाणार होती. पण यशवंताला भिकुची गरज तो इथे असे पर्यंत होती. त्यामुळे जास्त काही न बोलता यशवंता माजघरातून बाहेर आला. त्याने वर जाणाऱ्या जिन्याकडे बघितले. यशवंता माजघरातून बाहेर पडल्या पडल्या भिकू आडवा झाला आणि घोरायला लागला होता.

आपल्या खोलीकडे जाताना यशवंताची नजर जिन्याकडे गेली. 'जाऊन बघावं का वर एकदा ती मुलगी ठीक आहे की नाही.' त्याच्या मनात आल. पण मग त्याने तो विचार झटकून टाकला. त्याची एकट्याने वर जाण्याची हिम्मत नव्हती आणि भिकू आता वर येईल अस वाटत नव्हत. 'जाऊ दे. सकाळी बघू काय ते.' असा विचार करून तो त्याच्या खोलीकडे जाऊ लागला. तेवढ्यात त्याला ती मुलगी जिन्याच्या वरच्या अंगाला उभी असलेली दिसली.

"अरे तुम्ही जाग्या आहात? काय झाल? काही हव आहे का?" त्याने जिन्याच्या जवळ जात विचारल.

"अहो..... इथे काहीतरी आवाज येतो आहे. त्यामुळे मला जाग आली. जरा मदत करता का? त्या आवाजाने मला झोप नाही येत." ती वरूनच म्हणाली.

यशवंताला वर जायची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे तो तिला म्हणाला;"अहो तुम्ही वर का गेलात? आम्ही वरचा मजला वापरत नाही. त्यामुळे तिथे उंदीर बिंदीर असेल. तुम्ही या खाली. मी तुमची सोय माजघरात करतो."

"अहो तिथे तुमचा भिकू झोपला आहे. आणि तसा काही त्रास नाही इथे वर. उंदीर असेल असच वाटत आहे. तुम्ही थोडी मदत करा. उंदीर गेला की मी खिडकी बंद करून घेईन. म्हणजे काही प्रश्न नाही."ती म्हणाली.

यशवंताची आता पंचाईत झाली. नाही म्हणावं अस कारण त्याच्याकडे नव्हत आणि हो म्हणायची त्याची तयारी नव्हती. तो विचार करत उभा राहिला.

"येता न?" तिने परत विचारल.

"थांबा ह. भिकुला बोलावतो."यशवंता म्हणाला.

त्यावर ती मुलगी हसायला लागली. नकळून यशवंताने विचारले;"का हो... हसता का?"

"तुम्हाला बहुतेक उंदराची भिती वाटते अस वाटल म्हणून हसायला आल." ती हसत म्हणाली.

तिला हसताना बघून यशवंता थोडा चिडला. 'च्यायला... माझ्या घरात येऊन मलाच हसते. दाखवतोच हिला.' असा विचार करून तो दोन-दोन पायऱ्या चढून वर गेला. त्याने पहिल्या पायरीवर पाउल ठेवले आणि त्या मुलीने मंद स्मित केले. तो वर येतो आहे याची खात्री करून ती मागे वळली आणि खोलीच्या दिशेने चालू लागली. यशवंता तोवर वर पोहोचला होता. त्याने बघितले तर ती आप्पाच्या खोलीच्या आत जात होती. तिला आप्पाच्या खोलीकडे जाताना बघून मात्र तो खरच घाबरला.

"अहो.. त्या खोलीत कशाला झोपता. इथे अजून एक खोली आहे न." तो तिला हाक मारत म्हणाला. पण तोपर्यंत ती खोलीच्या आत गेली होती. यशवंताला काय कराव सुचेना. तो भिकुला बोलवायला परत खाली उतरणार होता पण तेवढ्यात त्या खोलीतून त्याला तिची किंचाळी एकू आली. त्याबरोबर तो त्या खोलीच्या दिशेने धावला.

"काय झाल? काय झाल?" तो आत जात म्हणाला. त्याने आत पाउल टाकल आणि गर्भगळीत झाला.

समोर आप्पा उभा होता आणि त्याच्या शेजारी ती मुलगी हसत उभी होती.

"ये यशवंता. किती वर्ष तुझी वाट बघतो आहे." आप्पा म्हणाला.

यशवंताची जीभ त्याच्या टाळूला घट्ट चिकटली होती. त्याचे डोळे विस्फारले गेले होते. समोर काय चालू आहे ते त्याच्या मेंदू पर्यंत पोहोचत तर होते पण त्याचा अर्थ त्याला लागत नव्हता. त्याच्या शरीराचा कणन कण गोठला होता.

"तुला प्रश्न पडला असेल ना की मी असा अचानक इथे कसा? मग एक.. अरे मुर्खा. ज्या दिवशी तू दाजीना फसवून पोलीस बोलावलेस ना त्यादिवशी मी घरी नव्हतो. पण रात्री मी घरी आलो होतो. इथेच माझ्या खोलीत आलो होतो. समोरच्या खिडकीतून. दाजीना याची कल्पना होती. मला वाचवायला म्हणून त्यांनी मला आत येताच या बाजूच्या कपाटात जायला सांगितले आणि कपाट बाहेरून बंद केले. पण त्यांनी बहुतेक किल्ली फिरवली आणि काढून घेतली. नंतर तुमच्यात झालेले संभाषण देखील मी एकले. तू इथेच रात्री थांबणार होतास हे लक्षात येऊन मी रात्रभर कपाटात बसायची मनाची तयारी केली. मला खात्री होती सकाळी दाजी मला इथून बाहेर काढतील. पण काय झाले कोण जाणे. मी खूप खूप वाट बघितली. कोणी कपाट उघडेना. कित्तेक तास गेले... शेवटी मी दार वाजवायला सुरवात केली. सारखा मी दार वाजवत होतो. पण मग माझी शक्ती संपली... आणि मग माझे प्राण संपले. शेवटपर्यंत मला हे समजलेच नाही की दाजींनी अस मला आत कपाटात टाकून का मारले. माझा जीव कासावीस झाला होता या एकाच विचाराने." आप्पा बोलत होता आणि त्याचे शब्द यशवंताच्या मेंदू पर्यंत जाऊन आदळत होते. त्या परिस्थिती देखील त्याला आठवले की दाजी गेले त्यावेळी वरच्या खोलीतून आवाज येत होता. त्याला आता लक्षात आले की तो आवाज कोणता होता. पण आता फार उशीर झाला होता.

'पण मग ही मुलगी कोण? आणि जर आप्पा म्हणतो की त्याचा प्राण गेला तर मग तो आता इथे कसा.?' यशवंताला वाटले आता त्याला वेड लागेल. त्याची नजर त्या मुलीकडे गेली. ती अजूनही हसत होती.

"मी विजया." ती म्हणाली. "आज तुमच्या मागून आले मी. खूप रात्र झाली आहे. या ना... इथेच झोपता का तुम्ही या पलंगावर?" तिने यशवंताला विचारले आणि हळू हळू त्याच्या दिशेने येऊ लागली.

तिला जवळ येताना बघून यशवंता मोठ्याने किंचाळला आणि खाली कोसळला. मात्र त्याच्या किंचाळण्याचा आवाज त्या खोलीच्या बाहेर गेलाच नाही.

सकाळी भिकूला थोडी उशिरा जाग आली. चहा करून तो यशवंताला उठवायला त्याच्या खोलीकडे गेला. पण यशवंता तिथे नव्हता. भिकुला आश्चर्य वाटले. कदाचित त्या कालच्या ताईना उठवायला मालक वर गेले असतील असा विचार करून तो जिन्याने वर गेला. ती स्त्री झोपली होती त्या खोलीच दार बंद होत. पण पलीकडच्या खोलीच दार उघड होत. म्हणून आश्चर्य वाटून भिकुने आत डोकावल. यशवंता खोलीत जमिनीवर अस्ताव्यस्त पडला होता... खोलीतल कपाट उघड होत... आणि परसातल्या अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडाची एक फांदी आत डोकावत होती.....

भिकू यशवंताला असा जमिनीवर बघून घाबरला. तो त्याच्याकडे धावला आणि त्याला हलवत हाका मारू लागला;"मालक... मालक... काय झाल? उठा मालक..."

भिकुच्या आवाजाने बाजूच्या खोलीत झोपलेली ती कालची तरुणी जागी झाली. तिला कळेना नक्की काय प्रकार आहे. त्यामुळे काय झाल ते बघायला ती तशीच भिकू होता तिथे आली. काल ज्याने तिला मदत केली होती तोच जमिनीवर पडला होता आणि भिकू त्याला उठवायचा प्रयत्न करत होता.

"काय झाल भिकू?" तिने भिकुला विचारल.

"ताई मी आता मालकांना उठवायला त्यांच्या खोलीत ग्येलो तर ते नव्हत तिथ. मला वाटल तुम्हाला बघाया आल असतील. म्हनून वर आलो. तुम्हास्नी ती खोली उघडून दिली होती. पन ही खोली उघडी दिसली म्हनून हित आलो तर मालक अस हित पडल होत." भिकू घाबरून रडत म्हणाला.

"सरक बघू. मी बघते काय झाल ते. अरे मी या गावची नाही. पण सध्या इथल्या दवाखाना मीच बघते आहे. तेच तर सांगत होते यांना काल रात्री. पण राहूनच गेल. चल आपण दोघे मिळून यांना उचलून पलंगावर ठेवूया. मग तू जाऊन विठा काकुना बोलाव बघू." ती तरुणी म्हणाली.

यशवंताला तिच्या मदतीने पलंगावर ठेवून भिकू विठा काकुना बोलवायला गेला. काकूंबरोबर त्याने आजू-बाजूच्या सगळ्याना बोलावले. सगळेच यशवंताला काय झाल ते न समजून त्यांच्या घरी धावले. सगळे यशवंता असलेल्या खोलीत आले. ती तरुणी त्याच्या जवळ बसून त्याला तपासात होती. आलेल्या मंडळींपैकी एकाने तिला ओळखले.

"ताई तुम्ही कशा इथे? मी काल दवाखान्यात गेलो होतो तर तुम्ही दिसला नाहीत." तो म्हणाला.

"अरे काल मी जरा पाय मोकळी करायला बाहेर पडले आणि चालत चालत बरीच दूर गेले. मग पाउस पडायला लागला आणि त्यात माझा पाय मुरगळला. त्यामुळे मी परत येऊ शकत नव्हते. तेवढ्यात हे तिथे आले आणि त्यांनी मला मदत केली. काल रात्री मी इथेच याच वाड्यात होते. रात्री थोड खाल्यावर मला बर वाटायला लागल. भिकू म्हणाला तो रोज माजघरातच झोपतो म्हणून मग मी त्याला म्हंटल मला वरची एक खोली उघडून दे... रात्री मी झोपले होते तेव्हा मला कोणीतरी बोलल्याचा आवाज आला खरा... पण तशी दमलेले होते आणि झोपेत होते. त्यामुळे मला भास होतो आहे अस वाटून मी परत झोपले. आता उठून इथे आले तर हे जमिनीवर पडले होते." ती म्हणाली.

भिकू परत यशवंता जवळ जाऊन उभा राहिला होता. "ताई काय झालय मालकांना?" त्याने काळजीने विचारले.

"भिकू ... तुझे मालक आता या जगात नाहीत. त्यांना कोणता तरी जबरदस्त धक्का बसला मनाला आणि बहुतेक त्यामुळेच ते गेले आहेत." ती तरुणी म्हणाली आणि तिच बोलण एकून आलेल्या सगळ्यानाच आश्चर्य वाटले.

त्याचवेळी आपल्या कलेवारापासून लांब उभा असलेला यशवंता चाललेला सगळा प्रकार पाहात आणि एकात होता..... त्याला फक्त एकच प्रश्न पडला होता की जर ही तरुणी बाजूच्या खोलीत होती तर मग रात्री जिन्यात उभी असणारी आणि आपल्यला या खोलीत आणणारी ती कोण होती?....

समाप्त

कथा

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

16 Jan 2017 - 8:13 am | आनन्दा

शेवट आवडला नाही

vikrammadhav's picture

16 Jan 2017 - 8:42 am | vikrammadhav

जबरदस्त !!!!

एस's picture

16 Jan 2017 - 8:45 am | एस

छान झाली लेखमाला.

ज्योति अळवणी's picture

16 Jan 2017 - 9:09 am | ज्योति अळवणी

धन्यवाद.

मागील एक दोन कथांना घाईघाईत शेवट आहे असा प्रतिसाद होता. त्यामुळे या कथेच्या शेवटच्या भागा नंतर येणाऱ्या प्रतिसादांबद्दल खूप उत्सुकता आहे

चिनार's picture

16 Jan 2017 - 10:25 am | चिनार

छान जमलीये कथा...!

बापू नारू's picture

16 Jan 2017 - 11:50 am | बापू नारू

छान आहे लेखमाला ,पण शेवटी थोडी घाई केलीत

कायतरीच. सचिन ९९ वर आउट व्हावा तसं झालंय.

किसन शिंदे's picture

16 Jan 2017 - 5:07 pm | किसन शिंदे

सगळे भाग एकत्रच वाचून काढले आता, मस्त उत्कंठावर्धक लिहीली आहे कथा. शेवट मात्र जरा पटकन गुंडाळल्यासारखा वाटला.

असो. कथा फुलवण्याचे कसब आहे तुमच्यात. अशाच छान छान कथा आणखी येऊंद्यात.

Ranapratap's picture

16 Jan 2017 - 8:08 pm | Ranapratap

अजुन थोड़ लिहायला हव होत. पण ठीक आहे. बाकी कथा छान जमलिय.

ज्योति अळवणी's picture

16 Jan 2017 - 11:17 pm | ज्योति अळवणी

आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद....

पुढील कथेचा विषय अगदी वेगळा आहे. त्या कथा देखिल तूम्ही वाचावीत ही विनंती

कथा आवडली, ती स्त्री कोण होती हा क्लोजर आप्पाने यशवंतला द्यायला हवा होता असं वाटलं.

इतक्या छान कथेचा शेवट असा का केलात? खरंच घाईघाईत गुंडाळल्यासारखा वाटला.

एक राहील, फक्त शेवट सोडून कथा उत्तम जमली आहे.