ती सध्या काय करते - मराठी चित्रपट परीक्षण

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
12 Jan 2017 - 9:35 pm

प्रत्येक प्रौढ पुरुषी मनात "ती"ची एक प्रतिमा असते. लहानपणी/तरुणपणी, कोणीतरी/कुठेतरी/कधीतरी भेटलेली. या तीची प्रतिमा धूसर किंवा स्पष्ट हे बघणार्यावर अवलंबून असते पण clarity कितीही विवादित असली तरी "ती" अस्तित्वात असते हे नक्की. प्रथितयश मराठी दिग्दर्शक सतीश राजवाडे या सदाबहार कल्पनेला घेऊन आपल्यासमोर आले आहेत. आर्या आंबेकर आणि अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे यांचे रुपेरी पडद्यावरील आगमन हि या चित्रपटाची त्याच्या विषयाप्रमाणेच एक खासियत. खरं तर हा विषयच इतका सदाबहार आहे कि कोणत्याही संवेदनशील मनाची पाकळी अलगद उलगडणारा. बरे तुमच्याजवळ संवेदनशील मन नसले तरी, तुमच्या मनात अलगद शिरून तुम्हाला भूतकाळात जाण्यास बाध्य करणारा हा विषय. त्यामुळे सगळेच अप्रतिम जुळून आलेल्या या चित्रपटाने रसिकांच्या मनात स्थान न मिळवले तरच नवल!!

अनुराग आणि तन्वी हे मित्र अन मैत्रीण. या दोघांची लहानपण-तारुण्य अन प्रौढपण यांची कहाणी म्हणजे 'ती सध्या काय करते' !! या कहाणीत अनुरागचे लहानपण, तारुण्य अन प्रौढपण यातल्या विविध कला दिग्दर्शकाने कौतुकास्पदरित्या टिपलेल्या आहेत. लहानगा अनुराग, तारुण्यातला अनुराग अन जरासा मोठा झाल्यावर mature झालेला अनुराग यांच्यातील फरक हा रसिकांना पटणे हे या कहाणीला प्रेक्षकांच्या गळी उतरवण्यास आवश्यक होते, कितीही चांगला विषय असला अन या आघाडीवर अपयश असतं तर कपाळमोक्ष (तिकीटबारीवर) नक्की होता. हा फरक प्रेक्षकांनी विश्वास ठेवण्यालायक जुळून आलेला आहे.
अनुरागचे आणि तन्वीचे लहानपण हा या कहाणीच्या पाया बनविण्यासाठी आवश्यक घटक होता. हृदित्य राजवाडे आणि निर्मोही अग्निहोत्री यांनी अक्षरश: अप्रतिमरीत्या हे लहानपण उभे केलेले आहे. मध्यमवर्गीय अन अपेक्षांना बासनात न बांधणारे लहानपण जे सदैव सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते.सकारात्मक तर असते पण या सकारात्मकतेतही practicality ची कास न सोडणारे लहानपण. या अभिनेता वा अभिनेत्रीने दिग्दर्शकाच्या अपेक्षांना जरा चुकविले असत तर जो पाया कहाणीच्या मजबुतीसाठी आवश्यक होता तो ठिसूळ राहिला असता अन.......

वास्तविक बघता 'ती' च्या बद्दल हळवे असणारे कोणतेही 'त्या'चे मन ज्या वयात तिला बघते ते वय म्हणजे तारुण्य आणि म्हणूनच कदाचित पण या कहाणीत सगळ्यात नजाकतदार अन अन साकारण्यास कठीण हि भूमिका अभिनयची होती. अभिनयात नावाप्रमाणेच बऱ्याच ठिकाणी तो उजवा असल्याचे भासवून देतो प्रेक्षकांना. बरेच प्रसंग असे होते उदा. त्याचा कॉलेजचा पहिला दिवस, कॉलेजच्या फेयरवेलला तन्वीसोबतचे शेवटचे भांडण असे कि त्यात तो जर पुरला नसता तर दिग्दर्शकाला अपयशी हा शिक्का मिळवून देण्यात मुख्य हिस्सा त्याचा असता. पण तसे तर घडले नाहीच उलट मराठी चित्रपटसृष्टीला एका उत्कृष्ट अभिनेत्याने आपल्या आगमनाची चुणूक दाखवून दिलेली आहे हे मात्र नक्की.

त्याच्या भूमिकेप्रमाणेच तिची भूमिकाही इथे महत्वाची होती. ती सध्या काय करते (?/!) हा प्रश्नच मुळात एखाद्या त्याला पडेल जेंव्हा एखाद्या त्याला एखाद्या तिच्याबद्दल काहीतरी माहित असेल. ती एक मैत्रीण जी 'वीट' येण्याइतकी सवयीची. जिच्या असण्याची इतकी सवय एखाद्या त्याला व्हावी कि तिच्या नसण्याने तो जिवंतपणी नेस्तनाबूत व्हावा. आर्या आंबेकर ने अपेक्षेबाहेर उत्कृष्टरित्या हि भूमिका निभावलेली आहे हे नक्की. तिचे सौंदर्य हे एका मध्यमवर्गीय मराठी मुलीचे प्रतीक म्हणून इतके व्यवस्थितरीत्या शोभून गेलेले आहे कि कदाचित म्हणूनच बघणारा प्रत्येक 'तो' त्याच्या 'ती'ला शोधतो यात अन बघणारी प्रत्येक 'ती' आरसा. 'ती सध्या काय करते (?/!)' या शीर्षकातील ती म्हणजेच तरुणपणची. आणि म्हणूनच या चित्रपटाची खरी नायिका.

सुपरस्टार अंकुश चौधरी म्हणजेच आमचा 'दुनियादारीतला दिग्या' अन येथे प्रौढ अनुराग देशपांडे बनलेला आहे. प्रेयसीशी ब्रेक-अप झाल्यानंतर उन्मळून पडलेला पण नंतर स्वतःच स्वतःला सावरून कालांतराने एक यशस्वी व्यक्ती बनलेला 'तो'. प्रौढ तन्वी आहे तेजश्री प्रधान. ती हि तिच्या आयुष्यात मश्गुल पण त्याच्याशी सामना होताच ती हि थोडीशी अडखळते. अगदी क्षुल्लक भूमिका दोन्ही अप्रतिमरीत्या निभावल्यात दोघांनीही.

सतीश राजवाडेंचे दिग्दर्शन हे 'ती सध्या काय करते' (?/!) चे मुख्य यश. सतीश राजवाडे म्हणजे 'प्रेमकथांना अप्रतिमरीत्या हाताळणारा व्यक्ती' अशी एक प्रेक्षकांची मानसिकता मुंबई-पुणे-मुंबई (१/२) अन 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या दोन मुख्य यशानंतर त्यांनी अन झीने मराठी प्रेक्षकांची बनवून ठेवलेली आहे. पण या मानसिकतेत 'फक्त स्वप्नील जोशी बरोबर' या शब्दांना वगळण्यास प्रेक्षकांना बाध्य करण्यात राजवाडे यशस्वी होतात हे नक्की. वेवेगळ्या वयातल्या प्रेमकथांना हाताळताना एकाचवेळेस (म्हणजे एकाच तीन तासांच्या कथेत/पडद्यावर) फक्त भाव-भावनांना महत्व देऊन मराठी प्रेक्षकांना पचेल इतपत संयमितरित्या हाताळणे हे नक्कीच कठीण होते. मुळात तीनही वयातल्या या प्रेमकथांना हाताळताना त्या-त्या वयाप्रमाणे त्यांच्या भावनांना 'manipulate ' करणे हेच जोखमीचे होते. हे शिवधनुष्य व्यवस्थित पेलल्याबद्दल सतीश राजवाडेंचे कौतुक.

"ती" हा प्रत्येक "त्या"च्यासाठीचा नाजूक विषय. अगणित "त्या"च्यासाठी भळभळणारा अन काही मोजक्या “त्या”च्यासाठी आयुष्याचे सार बनलेला. अश्या या विचित्र गोष्टीत म्हणजे कश्या तर एका 'त्या'ला महत्व दिले तर दुसरा 'तो' नाराज व्हायचा अन तिच्यासाठी व्हायसेव्हर्सा. तर असल्या या नाजूक विषयावर लेखक सतीश राजवाडे अन पटकथा लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांचे विशेष कौतुक कारण आपापल्या भूमिकांना दोघेही यशवीपणे पुरेपूर निभावतात.

मराठीत आता खरोखर दिवस बदलले असून मागील वर्षीच्या 'कट्यार', 'नटसम्राट' अन सैराट नंतर यावर्षीची सुरवात करण्याचे अप्रतिम कारण असणाऱ्या 'ती सध्या काय करते' ला मी पाच पैकी पाच (५*) देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

माधव's picture

12 Jan 2017 - 10:16 pm | माधव

सुंदर चित्रपट! सगळ्यांचाच अभिनय छान!

छान परिचय. चित्रपट पाहिला जाईल.

संजय क्षीरसागर's picture

13 Jan 2017 - 12:26 am | संजय क्षीरसागर

जमलं तर उद्याच पाहीन.

जालावर आल्यानंतरच पहायला मिळण्याचा ऑप्शन आहे. वाट बघते.
कालच असं ऐकलं की चित्रपट फारसा बरा नाही. अभिनयचा अभिनय फसलाय वगैरे.
आता पाहून ठरवीन.
तुमचे परिक्षण वाचून उत्कृष्ट चित्रपट असावा का काय इतपत शंका आलिये पण राजवाडेबुवा दिग्दर्शक आहेत म्हटल्यावर अपेक्षा आधीच कमी करून ठेवते.

प्रसन्न३००१'s picture

13 Jan 2017 - 11:29 am | प्रसन्न३००१

चांगला आहे चित्रपट, पण झी मराठीने सारखी सारखी गाणी वाजवून डोकं उठवलंय

तुषार काळभोर's picture

13 Jan 2017 - 11:50 am | तुषार काळभोर

१) चित्रपट : बराय. पहिले दोन टप्पे (दाखवताना) इटरेष्टिंग वाटतं. तिसरा टप्पा बोअर वाटतो. शेवट अव्यावहारिक वाटतो. (अर्थात तो 'माझ्या पोजिशन'मधून मला अव्यावहारिक वाटतो. त्या सामाजिक/आर्थिक/भौगोलिक स्थितीमध्ये तो सामान्य असू शकेल).

२) अभिनय बेर्डे : पोरात दम वाटतो. बट ही हॅज अ लाँ......ग वे टू गो. वरती आणि सुपरस्टार वडीलांशी होणारी तुलना. (याने विनोदी भुमिका जाणीवपूर्वक टाळायला हव्यात, असं वाटतं)
३) आर्या आंबेकर : धागालेखकाने म्हटल्याप्रमाणे टिपीकल मध्यमवर्गीय मुलगी - गर्ल नेक्स्ट डोअर टाईप वाटते. त्यामुळे बर्‍याच जणांना आपल्या 'तिचा' चेहरा 'दोन नंबर' तन्वी मध्ये दिसू शकतो.
४) अंकूश चौधरी : 'तिसरा' अन्या त्याने चांगला जमवलाय.
५) तेजश्री प्रधान : टिपीकल तिशीतील उसगावकरीन वाटते. ते तिनं चांगलं जमवलंय.

संदीप डांगे's picture

13 Jan 2017 - 12:49 pm | संदीप डांगे

चित्रपट पाहिला नाही आणी पाहणारही नाही, पण अभिनय बेर्डेबद्दल अपेक्षा आहेत. वडिलांच्या नावाची व इमेजची ओझी सोडून स्वतंत्र रस्ता चोखाळला तर यश काबीज करण्याचं पोटेन्शियल आहे असं वाटतं पोरात.

अप्पा जोगळेकर's picture

13 Jan 2017 - 12:50 pm | अप्पा जोगळेकर

ओके. एकंदर भंकस पणाच दिसतोय.
खर तर वयात आल्यानंतर मरेपर्यंत पुरुषांना इतक्या वेळा इतक्या वेगवेगळ्या स्त्रिया सातत्याने आवडत असाव्यात की कोणा एकीला विशेष स्थान दिले जाईल हे अशक्यच वाटते. असो.

संदीप डांगे's picture

13 Jan 2017 - 12:59 pm | संदीप डांगे

आवडण्याबद्दल नै हो, पहिल्या प्रेमाबद्दल आहे. :-)

मराठी कथालेखक's picture

13 Jan 2017 - 4:38 pm | मराठी कथालेखक

मला राजवाडेंचे चित्रपट विशेष आवडत नाहीत. प्रेमाची गोष्ट आणि बदाम राणी गुलाम चोर पाहिले होते. मुंबई-पुणे-मुंबई (पहिला) अर्ध्या तासात बंद केला.
त्यापेक्षा (ते दोन) "फुगे" बघावा म्हणतोय
पण या सिनेमाचे नाव खूप आवडले..."ती सध्या काय करते" ..वा.. क्या बात है.. बघू कधी चॅनेलवर आल्यावर

अनुप ढेरे's picture

13 Jan 2017 - 5:17 pm | अनुप ढेरे

ओह, गेले काही दिवस या नावाने सुरू होणारे जोक येत होते. ते यावरून बनलेले होते होय!

शलभ's picture

13 Jan 2017 - 5:35 pm | शलभ

ती सध्या काय करते
.
.
.
मराठी चित्रपट परीक्षण
:)

बाकी हा सिनेमा लिस्ट मधे आहे अंकुश साठी.

समीर_happy go lucky's picture

13 Jan 2017 - 9:06 pm | समीर_happy go lucky

सगळ्यांचे धन्यवाद

पैसा's picture

13 Jan 2017 - 10:32 pm | पैसा

छान परीक्षण. गेल्या काही वर्षात मराठी सिनेमात खूप वेगळे कथानक आणि प्रकार येत आहेत. त्यामुळे मराठी सिनेमा एकदातरी बघावा असं वाटतं. तेजश्री प्रधान असताना ५/५ मार्क्स दिलेत याचं आश्चर्य वाटलं जरा. काहीही हं श्री! =)) बाकी अभिनय बेर्डेबद्दल उत्सुकता आहे. आर्या आंबेकर गायिका म्हणून पुढे येता येता अभिनयाकडे वळलेली दिसते. अंकुश चौधरीचा सिनेमा म्हणून नक्कीच बघणार.

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Jan 2017 - 12:52 pm | हतोळकरांचा प्रसाद

आवडले परीक्षण!

समीर_happy go lucky's picture

17 Jan 2017 - 9:01 pm | समीर_happy go lucky

सगळ्यांचे धन्यवाद

समीर_happy go lucky's picture

1 Jul 2017 - 7:38 pm | समीर_happy go lucky

मी सध्या काय करतो ?
नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ह्या विश्वात म्हणे दोन हजार अब्ज आकाशगंगा आहेत. तर या अब्जावधी आकाशगंगांमधल्या अब्जावधी ग्रहांपैकी एका ग्रहावरच्या अब्जावधी लोकांपैकी मी एक !
एवढ्या प्रचंड विस्तारलेल्या विश्वात माझी ओळख ही आमच्या गल्लीतल्या तिसऱ्या घराच्या पलीकडे जाणार नाही हे मी आधीच ओळखलं होतं. ते ही त्या घरात गोडलिंब आणायला आई मला वारंवार पाठवायची म्हणून! असं असताना, मी सध्या काय करतो हा प्रश्न एखाद्या मुलीलाचं काय अगदी कोणालाही पडण्याची काहीही शक्यता नाही. एवढंच काय! अनेक वर्षांनी एखाद्या ठिकाणी गर्दीत मी दिसलोच तर 'देवा,हा अजून आहेच का ?'असा प्रश्न पडण्याची शक्यता जास्त आहे. आता माझ्याविषयी असणाऱ्या ह्या सार्वत्रिक अनास्थेचं एकमेव कारण,'मी तेंव्हातरी काय करायचो?' या प्रश्नाच्या उत्तरात आहे!
तसं आमच्या लहानपणी लोकसंख्येचा उद्रेक वगैरे व्हायचा असल्यामुळे एका वर्गात 'साठ-सत्तरचं'(!) मुलं असायची. अश्यावेळी उजवीकडल्या दुसऱ्या लाईनीतील पाचव्या बाकड्यावर बसलेल्या माझ्याकडे बाईंचं लक्ष जाण्याची शक्यता कमीच होती. त्यासाठी वर्गात असलेली अप्रतिम प्रकाशयोजना आणि आमचा एकंदरीतच शैक्षणिक अंधार ह्या दोन्ही गोष्टी कारणीभूत होत्या. तरीसुद्धा कर्मधर्मसंयोगाने बाईंनी विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं देण्यासाठी हात वर केला तरी तो त्यांना दिसत नसे. वर्गात प्रश्नाचं उत्तर देणं हे ब्राउनी पॉईंट्स मिळवण्यासारखं असतं. त्याचा प्रत्यक्ष उपयोग नसला तरी अप्रत्यक्ष फायदे असतात. तर ब्राउनी पॉईंट आमच्या नशिबात नव्हते. मग आम्ही वर्गात फेमस कसे होणार? मग एखादी मुलगी आमच्याकडे कशी बघणार? आणि “मी सध्या काय करतो” हा प्रश्न तिला कसा पडणार? तसं शाळेतल्या एका पद्धतीप्रमाणे, तिमाही-सहामाही परीक्षेचा निकाल सांगताना वर्गात त्या त्या विद्यार्थ्याला पुढे बोलावून मोठ्याने सांगायचे. इथे फेमस व्हायचा थोडाबहुत चान्स होता. पण आमचा रोल नंबर चाळीस-बेचाळीस आणि मार्कही साधारण तेव्हढेच !! त्यामुळे पुढे जाऊन निकाल घेऊन येण्याची परिक्रमा मी ०.००३ सेकंदात पूर्ण करायचो. मग तीसुद्धा संधी गेली (त्या शिक्षकांवर अब्रुनुकसानीचे खटले दाखल कारण्याएवढं कायद्याचं ज्ञान त्यावेळी नव्हतं ह्याची खंत वाटते.) तसं वर्गात जोड्या लावण्याचे प्रकार भरपूर चालायचे. पण जोडी 'लावण्यायोग्य' अशीही स्वतःची ओळख मी कधी निर्माण करू शकलो नाही. आणि मी स्वतः लावलेल्या जोडीची व्हॅलिडिटी अट्ठेचाळीस तासाच्या वर टिकत नव्हती. शाळेच्या वार्षिक उत्सवात हिंदी-मराठी गाण्यांवर मुलामुलींचे नाच बसवण्यात यायचे. तिथेही आमची वर्णी कधी लागली नाही. फारच फार 'शूर आम्ही सरदार' या गाण्यासाठी कोरस मध्ये मला उभं करायचे. बरं शाळेत जाऊद्या, पण रिक्षातून येताजाता एखाद्या मुलीशी ओळखबिळख व्हावी म्हणावं तर बोंबलायला आमचं घर शाळेच्या बोडख्याशी! प्रार्थनेचा 'पssssssssssहिsssssssला नमस्कार' सुरु झाल्यावर घरून निघालं तरी पाचव्या नमस्कारापर्यंत मी शाळेत पोहोचायचो. अश्या प्रकारे आमचं शालेय जीवन तर 'ती'च्याविनाच गेलं.
कॉलेजमध्ये गेल्यावर भेटतेच ना बे' या एकमेव आशेवर आम्ही शालेय शिक्षण पूर्ण केलं. पण मधल्या या कालखंडात जग किती बदललंय हे आमच्या ध्यानातच आलं नाही. शाळेतल्या "चल हो बाजूला" म्हणणाऱ्या साळकाया- माळकाया आता "ओह एक्सक्यूज मी प्लीज" म्हणत होत्या. अन आम्ही अजूनही "आय माय कमीन सर?" च्या पलिकड़े गेलो नव्हतो. त्यांच्या नवीन कोऱ्या स्कुटया आमच्या हर्क्युलस बाबाच्या शेजारी ऐटीत उभ्या राहायच्या. आता ब्राउनी पॉईंट्स मिळवायची पद्धतही बदलली होती. त्यासाठी एक्स्ट्रा लेक्चर अटेंड करून नोट्स वगैरे काढाव्या लागायच्या. चला एकवेळ ते ही केलं असतं, पण नोट्स काढायला समोरचा कुठल्या विषयावर बोलतोय हे तरी कळायला हवं ना? आमच्यातले काही उत्साही कार्यकर्ते प्रॅक्टिकलच्या वेळी मुलींना मदत करायला जायचे. जणू इंजिनाचा शोध यांच्या परसातचं लागला होता या थाटात बोलायचे. मला तर व्हर्नीयर (का कॅलिपर काय म्हणतात ते?) वापरून रीडिंगही घेता येत नव्हतं. त्यातल्या त्यात समाधान म्हणजे माझे कॉलेजमधले मित्र 'जोड्या लावणे' खेळत नव्हते. 'अबे कोणाशीही लाव पण लाव' अशी भूमिका असायची. कारण त्यांचीही परिस्थिती काही फार वेगळी नव्हती. शेवटी काही सीनियर्सनी,'नजरेत येण्यासाठी' आम्ही गँदरिंगमध्ये वेगवेगळ्या कमिट्यांमध्ये सामील व्हावं असं सुचवलं.पण आमची 'नसलेली ख्याती आणि असलेले गुण' बघता आम्हाला दरवेळी एकच कमिटी मिळायची. डिसिप्लिन कमिटी !! केंद्रीय मंत्रीमंडळात समाजकल्याण मंत्र्याचं जे स्थान असतं तेच कॉलेज गॅदरिंगमध्ये डिसिप्लिन कमिटीचं असतं. त्यांना कोणीही विचारत नाही! उलट नुसतेच उभे असतात म्हणून एखादयाची बॅग पकडायची जबाबदारी त्यांच्यावर येते. गॅदरिंगच्या त्या दोन दिवसात एखाद्या मुलीने मदत मागितलीच तर ती जास्तीत जास्त 'ह्या नाटकाची प्रॅक्टिस कुठे सुरु आहे रे?' एवढं विचारण्यापुरती असते! शेवटी आमचं कॉलेजही तिच्याविनाच गेलं.
अर्थात या सगळ्यासाठी इतर कोणाला दोष देऊन उपयोग नाही. पण आत्यंतिक वेंधळेपणा, अफाट न्यूनगंड आणि तरीसुद्धा असलेली बेफिकीर वृत्ती(किंवा निर्लज्जपणा म्हणा हवं तर) परमेश्वराने आमच्यांतच का भरावा हे कोडं काही सुटता सुटत नाही. बरं एवढं असताना मुलींनी इंप्रेस व्हावे ही मनीषा तरी बाळगू नये, पण नाही ना ! येताजाता एखाद्या मुलीने चुकून एकदा जरी आमच्याकडे बघितलं तर स्वप्नांचे इमले डायरेक्ट वरातीपर्यंत पोहोचायचे! नंतर ह्याच मुलींच्या लग्नाच्या वराती आमच्या डोळ्यासमोरून गेल्या.
या परिस्थितीत ती सध्या काय करते हा प्रश्न मला शंभर मुलींच्या बाबतीत पडत असला तरी मी सध्या काय करतो असं प्रश्न एक शंभरांश मुलींनाही पडणार नाही.आणि पडलाच तर त्याचे तिच्या मनातले संभाव्य उत्तरं खालीलप्रमाणे नसावे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना !
"तो सध्या काय करतो?....कॉलेजमधून बाहेर पडला असेल ना एव्हाना?
--चिनार

अभ्या..'s picture

1 Jul 2017 - 7:48 pm | अभ्या..

हांय........
समीर की चिनार?
हवां का झोंका की आमचा वर्‍हाडी बोका? ;)

चिनार's picture

3 Jul 2017 - 9:49 am | चिनार

बोका..बोका..

समीर_happy go lucky's picture

13 Jul 2017 - 4:54 pm | समीर_happy go lucky

बाकी चिनार चा हा लेख माझ्या लेखाला झाकून टाकलेला मी बघितला, खरोखर चिनारभौ, जबरदस्त ....

चिनार's picture

14 Jul 2017 - 3:33 pm | चिनार

धन्यवाद समीर भौ!

मराठी_माणूस's picture

3 Jul 2017 - 12:24 pm | मराठी_माणूस

मस्त.

आशु जोग's picture

3 Jul 2017 - 12:16 pm | आशु जोग

सैराट हा म्हणे ग्रामीण पार्श्वभूमीवरचा सिनेमा होता, अनेक शहरी लोकांना तो आवडला नाही. ती कसर भरून काढावी म्हणून स्वतःला शहरी मानणार्‍या वर्गासाठी काढलेला असा हा झी चा सिनेमा ती सध्या काय करते

जालावर हा मूव्ही पाहिला. शेवटचा अर्धा तास जरा बरा वाटला. बाकी सगळा वेळ 'अजून किती वेळ राहिलाय संपायला' हे बघण्यातच गेला. त्यामानाने नुकताच पाहिलेला मुरांबा उजवा होता.

समीर_happy go lucky's picture

16 Sep 2017 - 1:54 pm | समीर_happy go lucky

सगळ्यांचे धन्यवाद