महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

छत्रपती शिवराय आणि आपण

Primary tabs

कर्रोफर नमुरा's picture
कर्रोफर नमुरा in जनातलं, मनातलं
11 Jan 2017 - 5:29 pm

चला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला पुन्हा आठवले!

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावामध्ये महाराज जोडून ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात येणार आहे. छत्रपतींचा यथोचित मान राखणे चांगले आहे.
पण मुळात, ज्या क्षेत्राचा छत्रपती शिवाजी महाराजांशी काही संबंधच नाही, त्याला त्या राजर्षीचे नाव देण्यात रम्यत्व काय? जे महाराजांशी अंतस्थ निगडित आहेत, ते छत्रपतींचे गडकिल्ले ढासळत आहेत, त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही.

पण, विमानतळाला छत्रपती शिवाजी हे नाव देण्यापासून, त्यात महाराज शब्द नाही हा वाद ते त्याला निवडणुकांच्या तोंडावर देण्या इथपर्यंत संधीसाधुपणा एवढाच काय तो शिवरायांचे ह्यांच्या लेखी महत्त्व आहे.
छत्रपती शिवाजी महाराज ही एक अशी विभूती आहे, कि जिला कोणाच्या छत्रपती किंवा महाराज म्हणण्याची ती अवलंबून नाही. त्यांनी शून्यातून अलौकिक पराक्रम आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वराज्य मिळवले व छत्रपती पदवी चिरशाश्वत केली. तुम्हा आम्हा कोणाच्या बोलण्या न बोलण्याची ती प्रभृती मोहताज नाही.

जय भवानी, जय शिवाजी च्या आरोळ्या देणाऱ्या व्यक्ती, मग ते सामान्यजन असोत वा राजकारणी, प्रत्यक्षात त्या थोर पुरुषाचे किती आदर्श पाळतात? आपल्यापैकी किती लोकांना खरे छत्रपती शिवराय व त्यांचे चरित्र खऱ्या अर्थाने कळले? आपल्यापैकी किती जण त्यांचा आदर्श, त्यांचा अमूल्य वारसा जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत? जे करीत आहेत त्यांच्यापैकी किती जणांची नीतिमत्ता निर्मळ आहे? निस्वार्थ भावना किती जणांच्या मनात आहे?
वरील प्रश्नांची उत्तरे अपेक्षित नाहीत, किंबहुना ती पडताळण्याचीही गरज नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि आप्पासाहेब गोनी दांडेकर या दोन इतिहासदुर्ग तपस्वी द्वयींनी अनेक परिश्रम घेऊन, गडकिल्ल्यांच्या पायवाटा शोधत, त्या पुन्हा अधोरेखित केल्या. ठराविक प्रमुख किल्ले माहीत असलेल्या महाराष्ट्राला ज्ञात अज्ञात अनेक गडकिल्ले व घटमाथे शोधून दुर्गवैभव दृष्टिपथात आणले.

त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अनेक इतिहासदुर्ग प्रेमींनी त्यांच्या वारीच सुरु केल्या. पण, पुढे याच दुर्गराऊळांचे पिकनिक स्पॉट आम्हीच केलेत. तटाबुरुजांवर आपले नाव गिरवणे आणि त्यांची दुर्दशा करणे हा तर अनेक करंट्यांचा छंदच झाला. गडकिल्ल्यांवर जाणे आणि स्वतःचे फोटो काढून मिरावणे या पलीकडे त्यांचे महत्व आम्हाला कळलेले नाही. किल्ल्यावर गेल्यावर त्याचे स्थापत्य, त्यांची दुर्गमता, त्याकाळी ते बनवण्यात घेतलेली मेहनत, दुर्गव्यवस्थापन यांची बहुतेकांना सोयरिक नसते. कुठल्या कड्यावरून, बुरुजांवरून व माचीवरून आपले फोटो चांगले येतील हेच काय ते आमच्या दुर्गभेटीचे फलित होऊन बसले आहे.

जिथे दस्तुरखुद्द श्रीशिव छत्रपतींनी कधी आपल्या एकही बांधलेल्या दुर्गावर आपले नाव कोरले नाही, कधी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जिवलग सरदार, शिलेदारांचे नाव कोरले नाही, तिथे या करंट्या अवलादी आपले व आपले स्नेहजनांचे, प्रेयसीचे नाव पोतून मोकळे होत आहेत.

पण कधी कुठे काही वाद उमटला किंवा शिवरायांबद्दल काही आक्षेपार्ह गोष्ट नजरेस आली की यांच्या मुखीची गटारगंगा वाहू लागते. पण विधायकपाने प्रतिकार किंवा विरोध करणे वा प्रत्यक्ष चळवळ करणे यांच्या कुवतीबाहेरचे आहे. तसा, छत्रपतींचा उपमर्द कोणी करू नये, किंवा तो खपवून घेऊ नये हा विषय वेगळा. पण, निष्क्रीय वाचळपणा काही उपयोगाचा नाही.

राजकारणी हे फक्त राजकारण करतात. पण, त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही. प्रशासन हे समाजाचा आरसा असते. जिथे आपणच जागरूक नाही, कृतिशील नाही, तिथे राजकारण आणि प्रशासनाला दोष देण्यात अर्थ नाही. लोकप्रतिनिधी हे आपल्यातूनच निवडून येतात, ते आपल्यातीलच एक असतात व समाजाचे नियुक्त प्रतिनिधी असतात.

लोकांच्या व महाराजांच्या खऱ्या कळकळीने राजकारण करणारा विरळाच. छत्रपती शिवरायांनी रयतेचे, शेतकऱ्यांचे, कष्टकाऱ्यांचे राज्य - स्वराज्य उभारले. पण, आज त्याच पुण्यश्लोक राजाच्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करीत आहे, कष्टकरी उपाशी मारत आहे आणि रयत वेठीस धरली जात आहे. छत्रपती शिवरायांनी अनेक गडकिल्ले उभारली, त्या भोवती स्वयंपूर्ण गावे उभारलीत, गडकिलल्यांवरचे टाके आजही पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. आजमितीलाही ते टाके आसपासच्या गावांची तहान भागवत आहेत. पण, आजच्या आधुनिक जगात, आधुनिक तंत्रज्ञानाने आम्हाला पावसाळी पाणी अडवणे शक्य झालेलं नाही.

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणजे कोकण. पण आजही कोकणात सर्व पाणी समुद्रात वाहून जाऊन जानेवारी पासूनच अनेक ठिकाणी दुष्काळ पडतो. कोकणात सोने पिकते, पण सामायिक कुलजमिनींचा प्रश्न स्वातंत्र्योत्तर सात दशके लोटली तरी आम्हाला सोडवता आलेली नाही. हीच परिस्थिती विदर्भ, मराठवाडा, खानदेशाची आहे.

पण, आम्हाला या सगळ्याचे काय? गडकिल्ले कोलमडून पडोत, शेतकरी आत्महत्या करोत वा जनतेची सतत फसवणूक होवो, आमचे सुरळीत चालले आहे ना, बस! आम्ही आपले रेल्वे स्थानकांना, विमानतळांना महाराजांचे नाव देणार आणि ते कसे अपूर्ण आहे यावरून वितंडवाद आणि राजकारण करत बसणार. जागतिक दर्जाचे महाराजांचे स्मारक अवश्य व्हावे, पण गडकिल्ले उध्वस्त होत असताना नाही. गडकिल्ले जिवंत करून ती जिवंत स्मारके जपणे, त्यांना गतवैभव प्राप्त करून देणे आणि कोकणच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देणे, हीच त्या राजशिवछत्रपतीस खरी निष्ठा आणि समर्पण ठरेल. मग आणि मगच आपण त्यांचे वारस असल्याचा दावा काळाच्या कसोटीवर खरा उतरेल. नाहीतर भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीच, उलट त्यांच्या श्रपांचे धनी मात्र आपण नक्की होऊ.

कर्रोफर नमुरा | sahebefutuhatiujjam@gmail.com

विचारसमाज

प्रतिक्रिया

पैसा's picture

11 Jan 2017 - 11:25 pm | पैसा

खरं आहे. सगळे निवडणुकांसाठीच.

कर्रोफर नमुरा's picture

12 Jan 2017 - 4:44 pm | कर्रोफर नमुरा

माहितीच्या अधिकारात स्मारकाचे उत्पन्न गडकिल्ल्यांसाठी वापरण्याचा विचार आहे का, या प्रश्नाला, तसं अजून काही प्रस्तावित नाही, असे उत्तर आले आहे.

mayu4u's picture

12 Jan 2017 - 11:38 am | mayu4u

रच्याकने: तो ई-मेल पत्ता काही कळला नाही राव!

कर्रोफर नमुरा's picture

12 Jan 2017 - 4:45 pm | कर्रोफर नमुरा

साहेब ए फुतू हाती उज्जम

फार डेंजर यीमेल पत्ता हे भावुंचा, नाव भी.

कर्रोफर नमुरा's picture

12 Jan 2017 - 4:46 pm | कर्रोफर नमुरा
कर्रोफर नमुरा's picture

12 Jan 2017 - 4:47 pm | कर्रोफर नमुरा
कर्रोफर नमुरा's picture

12 Jan 2017 - 4:47 pm | कर्रोफर नमुरा
कर्रोफर नमुरा's picture

12 Jan 2017 - 4:47 pm | कर्रोफर नमुरा

पदवी आहेत दोन्ही