महाराष्ट्राचे दुर्गसंवर्धन आणि आपण

Primary tabs

कर्रोफर नमुरा's picture
कर्रोफर नमुरा in जनातलं, मनातलं
11 Jan 2017 - 12:06 am

महाराष्ट्र सारखा ज्वलंत इतिहास आणि ऐतिहासिक वारसा क्वचितच कुठल्या राज्याला लाभला असेल. क्षेत्रफळाचा विचार करता एकट्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण एवढे किल्ले जरी मोजले तरी त्याच्या अर्धे किल्लेही दुसऱ्या राज्यात नसतील. पण, कर्नाटक, गोवा, राजस्थान, तामीळनाडू व इतर राज्यात जशी जोपासना किल्ल्यांची आणि इतर ऐतिहासिक वारशांची झाली तशी ती महाराष्ट्रात होत नाही. हा आपला कर्मदरिद्रीपणाच म्हणावा लागेल. समाज आणि प्रशासन दोन्ही आघाड्यांवर आपण अपयशी ठरलोय. राज्य सरकारने तर मुंबई उच्च न्यायालयात एका जनहीत याचिकेच्या सुनावणी वेळी, ऊन-पाऊस-वाऱ्यामुळे किल्ल्यांची वाताहात झाली असे प्रतिज्ञापत्र दाखल केले. गडकिल्ले जोपासणे म्हणजे आर्थिकदृष्ट्या अवाजवी असल्याचे मतही त्यांनी मांडले. राजस्थान आणि गोवा ही दोन राज्ये तर प्रामुख्याने पर्यटन आणि त्यात ऐतिहासिक पर्यटनावरच चालत आहेत. राजस्थान, कर्नाटक, तामीळनाडू आणि केरळ यांनी तेथील किल्ले, ऐतिहासिक मंदिरे आणि इतर ऐतिहासिक वास्तू/ वस्तू ह्या संवर्धन करून त्यातून मिळकत ही मिळवली आहे. ते सर्वात प्रगतीशील म्हणवणार्या महाराष्ट्र राज्याला जमले नऊ, नव्हे त्यांनी तो प्रयत्न समाज-प्रशासनाच्या उदासीनते मुळे कधी मनावर घेतलाच नाही.

यात सरकार-प्रशासनाला फक्त दोष देऊन चालणार नाही. कारण ते लोकनियुक्त सरकार हे समाजाचेच प्रतिबिंब आहे. सरकार बहुमताने चालते तसेच बहुतांश मराठी माणसाला आपल्या इतिहास आणि ऐतिहासिक संस्कृती विषयी अनास्था आहे, हे कुणालाही अमान्य करता येणार नाही. आपला घराण्याचा ऐतिहासिक ठेवा - मोडीपत्रे, शस्त्रे व इतर वारसा रद्दी-भंगारात काढणाऱ्या महाराष्ट्राकडून गडकिल्ले ह्यांची हेळसांड झाली तर नवल वाटण्याचे कारण नाही. एकदा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे खानदेशातील एका देशमुखांच्या घरी काही ऐतिहासिक संदर्भ सापडतात का बघायला गेले होते. तिथे बाबासाहेब पोचल्यावर सदर असामी वाड्याच्या अंगणात स्नान घेत होती. स्नानासाठी पाणी कढवण्यासाठी केलेल्या चुलीत मोडीलिपीतली कागदपत्रे जाळण म्हणून वापरण्यात येत होती. बाबासाहेब चक्रावलेत. त्या मोडी लिपीच्या पत्रांमध्ये एखादा महत्वाचा कागद/ ऐतिहासिक पत्र जाळून गेले असतीलही. कारण ते कुणीच वाचले नव्हते. देशमुखांना त्याची कल्पना दिल्यावर त्यांनी मोडी लिपी येत नसल्याने मजकूर कळत नाही व आम्ही ती जाळण म्हणून वापरतो असे उत्तर दिले व यापुढे तसे करणार नसल्याची ग्वाही दिली.

पण, सर्वच तसे नसतात. काही घराणी तर आताच्या जगात काय करायचा आहे इतिहास, तलवार म्हणत ती मुद्दाम भंगारात टाकतात. याच, किलोच्या भावाने लोखंड म्हणून विकलेल्या वस्तू पुढे पुरतानवस्तू संग्रहकांकडे, देशात नव्हे परदेशात प्रामुख्याने जातात. मग, आपण बोंबा मारत बसतो, परदेशात गेली कशी, इंग्रजांनी नेली का? वगैरे वगैरे, व कालांतराने विसरूनही जातो. हा क्रम असाच सुरु राहतो. बाबासाहेबांनी अशाच काही भंगारात टाकू घातलेल्या वस्तू त्यांची विटंबना थांबवून जतन करण्यासाठी नेल्या, तर आज त्यांच्यावर घराण्याची शस्त्रे व इतर ऐवज अभ्यासासाठी नेऊन परत न केल्याचा आरोप होत आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

गडकिल्ले फिरणारे वाया गेले, इतिहासाची साधने वाचणारी माणसे सनकी असतात, अशी शेरेबाजी कॉर्पोरेट म्हणवणाऱ्या व मराठी इतिहासाची लाज वाटणाऱ्या सुशिक्षीत मराठी तरुण करू लागतो तेव्हा आपला तो दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. भले आज इतिहास, गडकिल्ले यांच्याबद्दल आत्मीयता वाढली आहे, तरी तो वर्ग अजून फारच नगण्य आहे. कुंपणावरून बघ्याची भूमिका करून शेरेबाजी करणाऱ्यांची संख्याच अधिक आहे. आजच्या जगात विमाने, मिसाईलने युद्धे होत असताना गड किल्ल्यावरून तलवारी घेऊन लढणार का, ही शेरेबाजी सर्वाधिक ऐकायला मिळते. हाच बुद्धिवादी वर्ग पावसाळ्यात किल्ल्यालगतच्या निसर्गात स्वतःचे कॉर्पोरेट त्राण घालवण्यासाठी मराठी-अमराठी सवंगड्यांना घेऊन पिकनीक साठी जात असतो आणि सोशल मिडीयावर आपले आत्मा हरवलेला सेल्फी टाकत असतो. मराठी माणसानेच महाराष्ट्राची अशी लाज काढल्यावर अमराठी लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही.

पांढरा हत्ती का पोसायचा, अशी गडकिल्ले संवर्धनाची अवहेलना केली जाते. मुळात, अज्ञान आणि संकुचित वृत्ती हे या खोडसाळ वक्तव्याला कारणीभूत ठरते. आपल्या दुर्गसंपत्तीकडे निव्वळ भूतकाळाच्या खुणा म्हणून न बघता त्याकडे आजच्या काळानुरूप एक पर्यटन आणि सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून बघणे अधिक श्रेयस्कर आहे. कॉर्पोरेट आणि पुरोगामी म्हणवणार्या आजच्या पिढीला हे उत्पन्नाचे साधन कसे उमगत नाही हाच एक प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ले दुरुस्त करून, बांधून त्याभोवती गावे वसवली. ढेपाळलेली बाराबलुतेदार पद्धत पुन्हा सुरळीत करून स्वराज्याची विस्कटलेली सामाजिक आणि आर्थिक घडी पुन्हा सावरली व गावे स्वयंपूर्ण केली.

आजच्या आधुनिक शतकात त्याचे रूपांतर आपण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनात करू शकतो. गडकिल्ले संवर्धन/ जीर्णोद्धार करून त्यावर अभ्यास सहली, ध्वनिप्रकाश यंत्रणा वापरून इतिहास रंजकपणे मांडता येऊ शकतो. शिवाय, आजूबाजूच्या गावात वाटाडे (guide), आसपासची कलाकुसर, वन्यजीवन, खाद्यसंस्कृती, निसर्ग या द्वारे आपण रोजगारही उपलब्ध करू शकतो. गावे स्वयंपूर्ण होऊन, गावातील तरुण वर्ग आपल्या गावाशी, मातीशी आणि कुटुंबाशी एकरूप होऊन राहू शकेल. त्याला मुंबई, पुणे सारख्या शहरांकडे नौकरी साठी भटकावे लागणार नाही. पण, यासाठी समाज आणि प्रशासन जागृत झोके पहीजे. गडकिल्ल हीे भूतकाळाची स्मारके नसून आपला ज्वलंत इतिहास आहे आणि तो जपून, जगाला सांगून आपण त्यांना भविष्याचे भांडार बनवू शकतो, ही भावना मनात रुजली पाहिजे.

यासाठी, समाज प्रबोधन होणे आवश्यक आहे. सरकारी धोरण बनून दुर्गसंवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्था, तज्ज्ञ यांना नियमित करून आवश्यक ते सहकार्य केले पाहिजे. परदेशी पर्यटकांकडून अशा सहली, व्याख्यानं आणि उत्सवांची प्रचंड मागणी आहे. त्यांना योग्य ती व्यवस्था, मार्गदर्शन आणि सुरक्षा सरकारने पुरवले पाहिजे. स्थानिक तरुणाईला वाटाडे, सुरक्षा, प्रथमोपचार, गिर्यारोहण, इतिहास संशोधनात प्रशिक्षण आणि इतर संलग्न बाबींत आपले व्यवसाय निवडण्याचे व त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांचे पर्याय खुले करून दिले पाहिजेत.

त्यासाठी, तज्ञ मंडळी आणि संस्थांसोबत सरकारने नियमावली घालून करार केले पाहिजेत, ज्यामुळे या सर्वाला चालना मिळेल. गडकिल्ले यांच्यासोबतच गुफा, लेणी, समाध्या, घटमाथे, गिर्यारोहण, निसर्गसहल, साहसखेळ यांचाही विचार व्हावा, जेणेकरून देशीविदेशी पर्यटकांना एक परिपूर्ण पर्याय उपलब्ध होईल व समाजसोबतच सरकारलाही उत्पन्नाचे स्रोत खुले होतील. महाराष्ट्र एक परिपूर्ण राज्य आहे, उठे डोंगरदऱ्या, नद्या, समुद्र, इतिहास, संस्कृती, उद्योग, निसर्ग, वन सारे काही उपलब्ध आहे. क्वचितच एखाद्या भारतीय राज्यात एवढे परिपूर्ण साधने असतील. पण जेव्हा समाज आणि सरकार विवेकपूर्ण पाऊले उचलतील, तेव्हाच आम्हाला ते साधेल.

तोपर्यंत, कालाय तस्मय नमः

कर्रोफर नमुरा | sahebefutuhatiujjam@gmail.com

कर्रोफर बुरांजी

विचारइतिहास