दस दस की मॅच - उत्तरार्ध - कथा ( काल्पनीक )

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
8 Jan 2017 - 10:55 pm

दस दस की मॅच - उत्तरार्ध - कथा ( काल्पनीक )

पहिल्या भागाची लिंक -

सुरुवातीला मैदानातच पडलेला एक छोटा दगड घेउन ओली सुकी झाली . ती गबन्याच्या टिमने जिंकली .

"आम्ही बॅटिंग करणार ..." सगळी एका सुरात ओरडली . त्यांच्या टीममधली पहिली दोघे फळकुटं फिरवत बॅटिंगला आली. गबन्या आणी बाकीची मंडळी बाजुच्याच एका कट्ट्यावर बुड टेकवुन बसली . आपला नंबर येईपर्यंत तिथे बसुन दुस-या टिमला नावं ठेवायची आणी आपल्या टिमला चीअर करायचं हा उद्योग सुरु झाला .

" काय गबन्याभाई , कुठं या चिल्ल्यापिल्ल्यांशी मॅच खेळायची ? आपण कुठं ? ती लहान पोरं कुठं ?" टिममधल्या एकाने मुद्दामुन जोरात ओरडुन गबन्याला विचारले .

"काय करणार ? हि चिट्टिपिट्टी जादाचा नाद करायला लागली , तेव्हा त्यांना आपल्या टिमचा हिसका दावलाच पाहिजे ." गबन्यानेही जोरात ओरडुन उत्तर दिले . हा सर्व दुस-या टिमला डिवचायचा प्रकार होता . कारण खरं तर दोन्ही टिममधले भिडु जवळ जवळ एकाच वयाचे होते . मन्या , डावक्याच्या टिमच्या हे लक्षात आले होते . त्यामुळे प्रत्येकजण एकमेकांना हाताने खूण करुन शांत राहायला सांगत होता .

" चिल्ली पिल्ली काय ? त्यांना दाखवुन देतो कोण चिल्ली पिल्ली आहे ? " मन्या बॉलिंगसाठी स्टार्ट घेताना पुट्पुटत होता.

गबन्या त्यांच्या टिमच्या तोंडात जेवढा जोर होता , त्या मानाने त्यांची बॅटिंग जेमतेमच होती . प्रत्येकजण कुठुन तरी समोर आलेला बॉल नीट न बघताच आंधळी मारायला बघत होता . पळुन रन्स काढतानाही बरीच ढिलाई चालली होती . या घाई गडबडीमुळे जवळ जवळ प्रत्येक ओव्हरला निदान एक तरी विकेट निघत होती . कुणी कॅच देउन आउट झाले , कुणाची दांडी गुल झाली , कुणी रन आउट तर कुणी हिट विकेट आउट झाले . पाचव्या नंबरला आलेला गबन्याही २० रना काढुन कॅच आउट झाला . मॅच दहा ओव्हर्सची असली तरी आठव्याच ओव्हरला एकुण ५४ रनांवर या टिमचा ऑलडाउन झाला .

गबन्याच्या टिममधली पोरं जरा निराश झाली होती तरी गबन्या मात्र जोरात ओरडुन त्यांना धीर देत होता .

"अरे , ५४ काय वाईट स्कोर नाही . ५०च्या वर रना म्हणजे तर डोक्यावरुन पाणी . आपण त्यांना ५० च्या आतच घरी पाठवुया ."

मन्या डावक्याची टिम या सगळ्या बाता ऐकुन सोडुन देत होती . आता त्यांना बॅटिंग करायची होती . मन्या , डावक्या दोघेही ओपनींगला आले . पहिल्या ओव्हर्सपासुनच त्यांनी चौके , छक्के मारत चोपायला सुरुवात केली . दोन ओव्हर्समधेच त्यांचा २६ स्कोर झाला . गबन्या आणी त्याची टिम फिल्डींगमधे पण चुकारपणा करत होती . कॅच सुटला , रना गेल्या की गबन्या आपल्या टिमवर खवळुन ओरडत होता . त्याच्या ओरडण्यामुळे त्याची टिम मनातुन त्याच्यावर वैतागली .

पण मन्या , डावक्या यांची फोडाफोडी बघुन पुढच्या नंबरला असलेल्या अजाने तोंड वाकडे केले . टिममधले पुढचे मेंबरही त्याचीच री ओढु लागले .

"काय राव , सगळ्या रन्स जर तुम्हीच काढल्या तर आम्हाला कधी बॅटिंग मिळणार ? आम्ही काय नुसतच बघत बसायचं काय ? "

"अरे लेका , थांब थोडं" मन्या , डावक्याने त्यांना थोडं समजावुन सांगायचा प्रयत्न केला . पण कूणीच ऐकेना .

" ते काही नाही . तुम्ही आता रिटायर्ड हर्ट डिक्लेअर करा . खुप झाली तुमची बॅटिंग ."

शेवटी नाइलाजाने आणखी एक दोन बॉल खेळुन मन्या आणी डावक्याने स्वताला रिटायर्ड हर्ट डिक्लेअर केले . अजा आणी अश्क्या खुशीत खेळायला गेले . स्कोरमध्ये आणखी १५ रनांची भर घातल्यावर अजा कॅच देउन आउट आला . एकुण स्कोर ५० झाल्यावर अश्क्याने स्वताला डिक्लेअर केले . उरलेल्या ५ धावा या पुढच्या मेंबर्सनी पुर्ण केल्या . मन्या डावक्याची टिम जिंकली . ज्यांना बॅटिंग मिळाली नाही त्यांना "पुढच्या मॅचला तुम्हीच ओपनींगला जा " अशी समजुत घालुन सगळ्यांनी शांत केले .

गबन्या आणी त्याची टिम मैदानातुन गपचुप निघुन जात होती . तेवढ्यात मन्याला काहितरी आठवले . " थांबा रे" तो ओरडला . त्याने आपल्या खिशातुन एक कागदाचा कपटा काढला . भराभरा त्याने त्या कागदावर एक मजकुर खरडला .
"आज दिनांक ... रोजी चौकी मैदानावर इलेव्हन टायगर्स आणी इलेव्हन फायटर्स या टिममध्ये मॅच झाली . हि मॅच इलेव्हन टायगर्स टिमने जिंकली . खाली सहि करणार - इलेव्हन फायटर्स टिमचा कॅप्ट्न ____________________________________"

तो कागद घेउन मन्या गबन्यापाशी गेला . त्याने त्या मजकुरावर गबन्याची सही घेतली . गबन्या निमुटपणे सही करुन चालु लागला .

आता डावक्याच्या मनातलाही इतका वेळ दाबुन ठेवलेला राग वर आला . तो जोरात ओरडला .

"काय रे गबन्या , येडताका , तु मगाशी काय बोललास ? ५०च्या वर रना म्हणजे डोक्यावरुन पाणी काय ? आमची तर बुटं सुद्धा भिजली नाहित ."

निमुटपणे चाललेला गबन्या एकदम चिडुन वळला आणी रागाने म्हणाला " काय रे , शाणा झाला काय ? "

" होय .. दाखवु काय ? " आता अश्क्याने या वादात भाग घेतला . अखेर या पोरांपुढे आपले काही चालणार नाहि हे ओळखुन गबन्याने तिथुन पाय काढला . तरी जाता जाता परत थोडी बोलाचाली झालीच .
" जादा शाणपना केला तर आमच्या विजय गल्लीतली ट्रकभरुन पोरं घेउन येईन मारायला . "
"अरे जा रे .. आम्ही पण आमच्या हनुमान तालमीतली पोरं घेउन येऊ ."

गबन्या निघुन गेला तशी मन्या , डावक्या आणी टिम परत मैदानावर आली . आता त्यांना आपल्याला तहान लागल्याचे लक्षात आले . इतका वेळ खेळण्याच्या नादात ते तहान भुक विसरुन गेले होते . त्यांनी आपल्या सायकला लावलेल्या पाण्याच्या बाटल्या बघितल्या तर त्या कधीच रिकाम्या झाल्या होत्या .

"चला , चपट्याच्या घरी जाउया .. पाणी प्यायला .." एकाने सुचवले . त्यांच्या वर्गातला चपट्या मामा हा तिथंच जवळपास राहत होता .

"नाही . चपट्या गावाला गेलाय . त्याचं घर बंद असेल . जाउन काहि उपयोग नाही ." दुस-याने माहिती पुरवली . आता काय करायचे हा सगळ्यांनाच प्रश्न पडला .

"मी एक सांगु का ? " अश्क्या बोलायला लागला . "आपल्या वर्गातली वेदिका तिठेकर ..तिचे इथुन जवळच घर आहे . आपण जायचं का पाणी प्यायला ?"

मन्याला काहि हा सल्ला पसंत पडला नाही . हे असं वर्गातल्या मुलीच्या घरी जाणे त्याला कसेतरीच वाटत होते . एकतर त्याचा वर्गातल्या मुलींवर राग होता . या मुली अभ्यासात , परिक्षेत कायम पुढे असत . वर्गात सरांनी , बाईंनी विचारलेल्या प्रश्नांना लगेच बरोबर उत्तर देत असत . त्यांच्या तुलनेत मन्या आणी मित्रांना कायम शिक्षकांकडुन बोलणी खावी लागत असत . वर्गात मुलांमधे आणी मुलींमध्ये कधी काही वाद झाला तर मुली लगेच डोळ्यांतुन पाणी काढत असत . आणी मग त्या रडण्यामुळे विरघळलेल्या सरांच्या आणी बाईंच्या हातचा मार मुलांना पडत असे . त्यामुळे या मुलींना काहितरी जादु येत असुन त्याचा वापर त्या मुलांना त्रास द्यायला करतात असे त्याचे ठाम मत होते . मुलींना तो आणी त्याचे मित्र शत्रुच मानत होते . पण आज त्याचे मित्र चक्क शत्रुच्या गोटात जायची भाषा करत होते .

" हो जाउया की . काय बिघडलं वर्गातल्या मुलीच्या घरी पाणी प्यायला गेलं तर ? " अजा आणी अश्क्या तयार झाले . ते पाहुन बाकिचेही तयार झाले .

या सल्ल्याला मन्याचा विरोध असण्याचं आणखी एक कारण होतं . मागच्या आठवड्यात वर्गात एका ऑफ तासाला मुलांचा दंगा चालु होता . तेव्हा मन्या मागच्या बाकावरुन ओरडला होता . " ए वेदिका .... तु वेडी का ? " सगळ्या दंग्यात हे नक्की कोण ओरडलं हे काही कुणाला समजलं नव्हतं . पण तरीही मन्याला धोका पत्करायचा नव्हता . पण अखेर सगळ्या मित्रांसमोर त्याला आपला विरोध मागे घ्यावा लागला . शेवटी मार खाल्ला तर सगळे मिळुन खाउ असा विचार करुन तो तयार झाला .

तिथुन जवळच असलेल्या एका जुन्या वाड्यामधे मागच्या बाजुला दोन तीन खणांच्या घरात काहि बि-हाडे भाड्याने राहात होती . आतमधे जायला एक छोटी बोळकांडी होती . मुले त्या बोळातुन आतमध्ये शिरली . आतमधे एक पाण्याचा हापसा होता . तिथल्याच काहि बायका पाणी हापसुन आपापल्या बादल्या भरुन घेउन जात होत्या.
मुलांनी एका बाईला घराचा पत्ता विचारला . तिने खुणेनेच एका दार बंद असलेल्या घराकडे बोट दाखवले . मुलांनी तिथे जाउन दार ठोठावले .

एका मध्यमवयीन बाईंनी दार उघडले . या मुलांना पाहुन त्या जोरात ओरडल्या .
"काय रे ..तुम्ही परत वर्गणी मागायला आला काय ? .. एकदा सांगितलं ना काहि वर्गणी मिळणार नाही . " आणी त्या परत धाडकन दार लावायला लागल्या .
" अहो काकु .. आम्ही वर्गणी मागायला नाही आलो .. आम्ही वेदिकाच्या वर्गात आहोत . पाणी प्यायला आलो होतो . " एकाने कसेबसे सांगीतले .

काकुंनी परत दार उघडले . तो पर्यंत वेदिकाही दारापाशी कसला आवाज येतो आहे ते बघायला आली होती . तिने मुलांना ओळखले .

"हो आई .. हि मुलं माझ्याच वर्गात आहेत . " तिने आईला सांगितले . आता काकुंचा चेहरा हसरा झाला . त्यांनी मुलांना हसुन आत घेतले .
"अरे बाळांनो , आत या ना मग . बाहेर का उभे आहात ? " त्या हसत बोलल्या . त्यांचा चेहरा आता प्रेमळ झाला होता .

"अं ..हो..हो.. आम्ही इथे चौकी मैदानावर क्रिकेट खेळायला आलो होतो . तहान लागली म्हणुन पाणी प्यायला आलो . सॉरी.. तुम्हाला त्रास झाला. " मन्या चाचरत बोलला .
"अरे त्रास कसला . बसा तुम्ही इथे . " काकुंच्या बोलण्यामुळे आता सगळ्यांना जरा धीर आला . सगळे त्या खोलीतल्या सोफ्यावर बसले . काकुंनी त्वरेने सगळ्यांसाठी भांड्यांमधुन सरबत आणी लाडु असा खाउ आणला . मुलांसाठी चिवडा आणायला त्या परत आतमध्ये गेल्या . काकुंनी केलेला पाहुणचार पाहुन मुलं खुश झाली . लाडु खाता प्रत्येकजण मन्याकडे "बघ लेका .. तु उगाचच घाबरत होतास .." अशा नजरेने बघत होता . मन्या लाडु खात खात या नजरा चुकवत होता .

समोर टिव्हीवर केबल चॅनलवर कुठलातरी याआधी २०,२५ वेळा दाखवुन झालेला पिक्चर लागलेला होता .

"हात लेका .. केबलवाल्यानं आज परत भुरटा पिक्चर लावलाय" .. डावक्या खाता खाता पुटपुटला .

"काय रे काय झालं" काकुंनी त्याला विचारलं . " काहि नाहि काकु .. लाडु खुप टेस्टी झाला आहे . मस्त." डावक्याने सफाइ दिली . बाकिच्यांनीही मान डोलावली .

काकुंनी मग प्रत्येकाला नाव , राहतो कुठे , आई वडील काय करतात हि माहिती विचारुन घेतली . एकुण सगळे मजेत चालले होते . सगळेच खुश होते .

"काय रे बाळांनो .. तुम्हाला या सहामाहीला किती टक्के मिळाले ? " काकुंनी अचानक विचारलेला प्रश्न तीरासारखा सगळ्यांच्या कानात शिरला .
"फु...." अजाच्या तोंडातला बाहेर पडु पाहणारा लाडवाचा बकणा त्याने कसाबसा गिळला . त्याने परत एकदा पाणी पिले .
"पहिल्या दहांमधे कोण कोण आलं ? " काकु परत कौतुकाने विचार होत्या . इतका वेळ बेफिकिर असलेले सगळे आता चांगलेच सावध झाले होते .

या मुलांना खरे तर मनातुन काकुंना ओरडुन सांगावेसे वाटत होते . " अहो काकु , चांगले मार्क पाडणारी , पहिल्या दहांत येणारी मुले हि वेगळीच असतात . ती खास परग्रहावरुन घडुन आलेली असतात . आम्ही आपली आधी साधी खेळ , दंगा , मस्ती करत जगणारी मुले आहोत . आम्हाला असे भलते सलते प्रश्न विचारु नका . आम्हाला आमचा खाउ मुकाट्याने खाउ द्या बरे ."
पण हे सगळं बोलणं त्यांच्या मनातच राहिलं . कारण काकुंना असं डायरेक्ट कसं आणी कोण बोलणार ? काकु अजुनही त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने बघत होत्या . शेवटी मन्याने धीर करुन आपल्या मार्कांमध्ये ३ ,४ टक्के अजुन वाढवुन एक ब-यापैकी आकडा काकुंना सांगितला . काकुंनी मार्क ऐकुन कौतुकाने मान हलवली .
ते पाहुन इतरांनीही आपल्या मार्कांमध्ये थोडे फार मनाची भर घालुन काकुंना आपले मार्क सांगितले . काहिंनी आपल्या वर्गातल्या हुशार मुलांचे मार्क हातउसने घेतले . तर काहिनी पुढे कधीतरी पडणारे मार्क आधीच सांगुन टाकले .

"छान आहेत कि तुमचे मार्क . " काकु कौतुकाने म्हणाल्या . सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला . तेवढ्यात काकुंनी शंका काढली .
"तुम्हाला सगळ्यांना जवळ जवळ सारखेच मार्क आहेत ." पण मुलांनी त्यांचे शंका समाधान केले .
"हो काकु . कारण आम्ही नेहमी एकत्रच अभ्यास करतो ना म्हणुन ."
"छान ..पण मुलांनो , परिक्षेत पेपर सोडवताना एकत्र सोडवत नाहि ना ? कारण आमची वेदिका सांगत असते , परिक्षेत कशी देवाण घेवाण चालते ते . काप्या करणं वाइट बरं का बाळांनो .. वैट... तुम्ही कधी करु नका .."

मुलांचे चेहरे अगदीच पडले होते . मुलं पार अगतिक होउन गेली होती . मन्या आता सगळ्यांकडे "तरी मी सांगत होतो .." अशा नजरेने बघत होता . सगळे त्याची नजर चुकवत होते . इकडे काकुंचे बोलणे सुरुच होते .

"वेदिकाचे बाबा येतीलच इतक्यात . त्यांनाही तुमचे मार्क सांगा . तुमच्यासारखी हुशार मुलं त्यांना खुप आवडतात . "

"मेलो...नाहि म्हणजे मला एक घरातले अर्चंट काम आठवले . ते विसरलो तर मी मेलोच.. काकु मी निघतो आता .." मन्याने घाबरुन खुलासा केला . तो बाहेर पडला . त्याचे पाहुन इतरांनीही "आम्हीही निघतो ..उशीर झालाय.." असे सांगत काढता पाय घेतला . मुलांची हि धांदल , गडबड पाहुन काकु आणी वेदिका खुसुखुसु हसत होत्या.

अशा प्रकारे मैदानावरची दस दस की मॅच हसत हसत जिंकलेल्या या बालवीरांना काकुंनी एकाच गुगलीत क्लीन बोल्ड केले .

-------------------------------------- समाप्त ( काल्पनीक ) ----------------------------------------------------------------------------------------

कथालेख

प्रतिक्रिया

खुसखुशीत! एकदम आमच्या फुलांच्या किश्श्यांची आठवण करून दिलीत! आजच्या तणावग्रस्त दिवसाचा शेवट छान हसून झाला. धन्यवाद!

Ranapratap's picture

9 Jan 2017 - 8:25 pm | Ranapratap

क्या बात है। शाळेतले दिवस आठवले.

सिरुसेरि's picture

10 Jan 2017 - 5:47 pm | सिरुसेरि

धन्यवाद .. !!