कौनो ठगवा नगरीया लूटल हो

मिडास's picture
मिडास in जनातलं, मनातलं
6 Jan 2017 - 2:45 pm

एकदा चाललेल्या वाटे वरून पुन्हा चालता येत नाही असं म्हणतात. वाट तीच असते पण आपण मात्र बदलले असतो. तारुण्याचे वयच असतं नविन वाटा तुडवायचं. पण परत त्याच वाटेवरून चालता येईलच असं नाही. आज मागे वळून बघताना हसायला येतं. कालच्या भाबडेपणावर हसावं कि आजच्या निगरगट्ट पणाची कीव करावी कळत नाही. हळवे असतात काही क्षण. भोळे निरागस आणि तितकेच मूर्ख सुध्दा. अशाच एका हळव्या क्षणी मी माझ्या मैत्रिणीला विचारलं होतं "तुझा शेवटचा क्षण कसा असावा असं तुला वाटतं ?" त्या वेळेला का हा प्रश्न विचारला माहित नाही. पण कुठली तरी कविता वाचून शेवटच्या क्षणाबद्दल काहीतरी काव्यात्मक सुचलं होतं हे खरं. बर माझी मैत्रीण म्हणजे माझ्यावर वरचढ. तिने मलाच याचं उत्तर पहिल द्यायला सांगितलं. मी म्हटलं "धो धो पाऊस पडत असावा आणि मृत्यू ने एका सुंदर तरुणीच रूप घेऊन माझ्यापुढे यावं आणि म्हणावं चल मी तुला न्यायला आलेय. बस तोच शेवटचा क्षण असावा." बापरे आज आठवताना पण शरम वाटतेय. किती मूर्खपणा करावा माणसाने? पण मैत्रिणीला त्याची फिकीर नसावी. एखादी गोष्ट ऐकल्याप्रमाणे तिने माझं ऐकून घेतलं. आणि मग ती बोलायला लागली. "मला काय वाटतं माहित आहे ? माझ्या आयुष्याच्या शेवटी मी सुवासिनी असावी. मला नवरीच्या लाल कपड्यात सजवलेलं असावं. हातात बांगड्या कपाळावर कुंकू आणि सगळीकडे चंदनाचा वास. तो वास घेत घेतच मी शेवटचा श्वास घ्यावा."

"च्यायला! ही तर माझ्यापेक्षा भारी निघाली." मी मनात म्हटलं. पण मनात असून सुद्धा मला तिच्यावर हसता नाही आलं. ती बोलत असताना तिचे चमकणारे डोळे मी कधीच विसरू शकलो नाही. ती जे काही बोलत होती ते मनापासुन बोलत होती. कुणीतरी भूल टाकून भारावलेला क्षण होता तो. त्या मंतरलेल्या क्षणाची जादू हसून झटकून टाकायची हिम्मत नाही झाली माझी.

आज अचानक तो क्षण चाल करून आला माझ्यावर. निमित्तं होतं कबीराच. त्याचा एक दोहा ऐकताना मी गाफील पकडला गेलो.

कौनो ठगवा नगरिया लूटल हो । चंदन काठ ही बनल खटोलना ।
का करु दुलहिन सुतल हो । ठगवा नगरिया लूटल हो ।

खरं तर या सुरुवातीच्या ओळीं पासूनच मी अडकायला सुरुवात झाली होती. जनरली माणूस मेल्यावर असंच काहीतरी माणसं बोलत असतात. दोष देतात नशिबाला, देवाला कुणालाही. म्हणूनच कुण्या चोराने लुटलेल्या नगरीची कहाणी मला गुंतवत गेली. चंदनाच्या काठीचा पाळणा म्हणजे चिताच. मला वाटलं मला बरोबर समजतोय कबिर. पण शेवटी संतांचा संत तो, पुढच्याच ओळी मध्ये पार भुइसपाट केलं त्याने मला. म्हणे नवरीला झोपण्यासाठी म्हणुन हा चंदनाचा पाळणा. फक्त ३-४ ओळी मधेच डोळ्यापुढे सगळं चित्रं उभं राहिलं माझ्या. त्याच्या पुढच्या ओळींनी तर अजूनच खिंडीत गाठलं मला.

उठो री सखी मोरी मांग सावरो । दुल्हा मोसे रूठल हो ।
आये यमराज पलंग चढी बैठे । नैनन असुवा छुटल हो ।

श्रुंगार हा जणू स्त्री जीवनाचा अविभाज्य भाग असावा. आपल्या अखेरच्या क्षणी नवऱ्याने नाही तर सखीने तरी तिच्या भांगेत कुंकू भरावं हि तिची इच्छा कुठल्या ओढीतून आली कुणास ठाऊक ? पण हीच कुंकवाची रेघ गेल्या शतकातल्या बाईला माझ्या आजच्या काळातल्या मैत्रिणीशी अलगद जोडून घेते हेच कदाचित कबीराच यश असावं. शेवटची ओळ वाचताना माझ्या मैत्रिणीचे पाणीदार डोळे आठवून अजूनही जीव कासावीस होतो.

चारी जने मेरी खाट उठाईन । चहु दिशि धुं धुं ऊठल हो ।
कहत कबीरा सुनो भाई साधू । जगसे नाता छुटल हो ।

तसं बघितलं तर फक्त एका अंत यात्रेचं हे वर्णन असेल पण अजूनही अंगावरून सर्रकन काटा उमटून जातो. आज हा दोहा ऐकताना मला स्पष्ट अस्पष्टपणे माझ्या मैत्रिणीची भावना जाणवते. काळजात आत कुठे तरी हलल्या सारखं वाटतं आणि परत एकदा त्याच जुन्या आठवणीच्या रस्त्यावरून जावंसं वाटतं. पण मगाशीच म्हटलं न मी, एकदा चाललेल्या वाटे वरून पुन्हा चालता येत नाही

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

पैसा's picture

6 Jan 2017 - 4:01 pm | पैसा

सुंदर लिहिलंय. राहुल देशपांडेच्या आवाजात सीडी आहे माझ्याकडे. खूपदा ऐकते. लहान वयात मृत्यू जवळून पाहिलेला अनुभवलेला नसतो तेव्हा असले रोमँटिक काही सुचते पण अनुभव येत जातो तसा पुढे पुढे मृत्यूचा विचारही नको वाटतो.

अल्बमचं नाव सांगशील का? हे 'अनकही' सिनेमातलं मी ऐकलंय आत्तापर्यंत. आशा भोसलेने गायलेलं. तेही ऐक. त्यातली सगळीच गाणी सुश्राव्य आहेत.

पैसा's picture

7 Jan 2017 - 12:41 pm | पैसा

खूप सर्क्युलेट झाली नसावी. कव्हरचे नाव बघून सांगते मग. पण त्यात राहुलने म्हटलेली कबीराची भजनेच आहेत. उड जाएगा हंस अकेला, हिरना, शून्य गढ वगैरे. मला पुण्यात कट्ट्याला मिपाकर समीरने दिली होती. http://kabir-bani.blogspot.in/ ही बघ ती सीडी.

आनन्दा's picture

6 Jan 2017 - 4:04 pm | आनन्दा

.....

खुप सुन्दर लिहिले आहे.

गाणे म्हणून ऐकले होते. सुंदर विवेचन.

फार छान आहे हा दोहा. छान विवेचनही.

आनंदयात्री's picture

6 Jan 2017 - 7:26 pm | आनंदयात्री

>>आज अचानक तो क्षण चाल करून आला माझ्यावर. निमित्तं होतं कबीराच. त्याचा एक दोहा ऐकताना मी गाफील पकडला गेलो.

तुमचा हा लेख, असाच आम्ही गाफील असतांना चाल करून आला आमच्यावर.
ललित लेखन आवडले आणि अजूनही वाचायला आवडेल.

संजय क्षीरसागर's picture

6 Jan 2017 - 10:40 pm | संजय क्षीरसागर

असं बिनचूक आणि ओघवतं हल्ली वाचायला मिळत नाही.

पिलीयन रायडर's picture

7 Jan 2017 - 12:46 am | पिलीयन रायडर

खुप छान दोहा आहे हा. कधी ऐकला नव्हता.

तुम्ही सुद्धा चांगलं लिहीलंय.

रातराणी's picture

7 Jan 2017 - 1:19 am | रातराणी

सुरेख लिहलंय!

कबीरानं मृत्यूबद्दल म्हटलंय :

भला हुवा मेरी मटकी फूटी,
मैं तो पनीया भरनसे छूटी |

म्हणजे शरीर ते काय, आज ना उद्या जाणारच. मृत्यू मला कृतार्थ करुन गेला, कारण आता दैनंदिन जीवनाची आपाधापी संपली !

ज्याला शरीरात कुणीही नाही हे माहिती आहे, त्यानं दोहा असा लिहायला हवा :

काहे ठगवा नगरिया लूटल हो । चंदन काठ ही बनल खटोलना ।
का करु दुलहिन सुतल हो । तू सूनी नगरिया लूटल हो ।

उठो री सखी मोरी मांग सावरो । दुल्हा काहे रूठल हो ।
आये यमराज पलंग चढी बैठे । चेहरन हसुवा छुटल हो ।

चारी जने मेरी खाट उठाईन । चहु दिशि धुं धुं ऊठल हो ।
कहत कबीरा सुनो भाई साधू । झूटसे नाता छुटल हो ।